पुस्तक परिचय: पर्यटन सम्राट

पुस्तकः पर्यटन सम्राट

लेखकः डॉ. विजय ढवळे, कॅनडा लेखकाचा विरोप-पत्ता
प्रकाशकः नवचैतन्य प्रकाशन
प्रकाशनकाळः पहिली आवृत्तीः जुलै २०१०
पृष्ठेः २१२
बांधणीः कडक खर्ड्याची सुबक बांधणी
किंमतः रु. ३५०/-फक्त

प्रस्तावनाः मनोहर जोशी, खासदार, माजी लोकसभा सभापती

ते म्हणतात, "पर्यटन सम्राट कै. राजाभाऊ पाटील यांची स्फूर्तीदायक जीवनगाथा" हे पुस्तक माझे मित्र डॉ. विजय ढवळे यांनी लिहिले आहे. अनेक वर्षे कॅनडात राहूनही त्यांनी, राजाभाऊंना त्यांच्या मृत्यूनंतरही पुन्हा प्रकाशझोतात आणले, ह्याचा आनंद मी कोणत्या शब्दांत सांगू? मी आयुष्यात अनेक व्यवसाय केले. पण मनात असूनही पर्यटनाचा व्यवसाय करू शकलो नाही. तो राजाभाऊंनी केला. राजाभाऊंचे सुवाच्य अक्षर, स्वदेशाभिमान, शिस्त, वक्तशीरपणा, रंगवून गोष्टी सांगण्याचा छंद, ’लर्न टू ट्रॅव्हल अँड ट्रॅव्हल टू लर्न’ हे त्यांचे ब्रीदवाक्य, त्यांची गुणग्राहकता अशासारखे राजाभाऊंचे गुण ते यानिमित्ताने पुन्हा उजागर करतात.

’पुस्तकात महत्त्वाची असते ती प्रस्तावना’ असे ढवळे यांनीच राजाभाऊंच्या वाचनाच्या आवडीबद्दल लिहून ठेवलेले आहे. प्रस्तावना वाचनीय वाटली तरच राजाभाऊंच्या वाचनाची गाडी पुढे सरकायची. या पुस्तकाची रसग्रहणात्मक प्रस्तावना सरांनी अतिशय रोचक लिहिलेली आहे. ते म्हणतात, "राजाभाऊंना पुस्तकरूपाने श्रद्धांजली वाहणे आणि त्यांची जडण-घडण कशी झालेली असावी याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करणे या दोन उद्देशांनी" ढवळे यांनी हे पुस्तक लिहीले आहे. प्रमाणपत्रे देणे हा माझा व्यवसाय आहे. ढवळे यांचे हे दोन्हीही उद्देश सफल झाले आहेत असे मी प्रमाणपत्र देतो.

डॉ. विजय ढवळे यांचा मलपृष्ठावर दिलेला अल्प-परिचय

डॉ. विजय ढवळे हे गेली तीन तपे कॅनडामध्ये एक अत्यंत यशस्वी उद्योजक म्हणून प्रसिद्ध आहेत. कॅनडियन सरकारचे सर्वोच्च सन्मान दोन वेळा मिळवलेले ते एकमेव भारतीय आहेत. शिवाय त्यांना आँटेरिओ राज्यानेही गौरवले आहे. आजपर्यंत त्यांना ६८ पुरस्कार, प्रशस्तीपत्रके व मानपत्रे मिळालेली आहेत. उत्तर अमेरिकेतील मराठी भाषकांतील सर्वात उठून दिसणारे व्यक्तिमत्व अशा शब्दांत अमेरिकेच्या बृहन्महाराष्ट्र मंडळाने त्यांचा जाहीर गौरव केलेला आहे. खाण-व्यवसायात त्यांनी प्रचंड गुंतवणुक केलेली आहे. डॉ. ढवळे हे "साऊंडस ऑफ इंडिया" या टी. व्ही. कार्यक्रमाचे दहा वर्षे यजमानपद भूषवत होते. ते चांगले वक्ते आणि लेखकही आहेत. त्यांच्याकडे क्युबात तयार होणाऱ्या कोडावरील प्रभावी औषधाचे वितरण हक्क असून त्यामुळे ९५ कोडग्रस्त रोगी पूर्णपणे बरे झालेले आहेत. डॉ. ढवळे यांचे चरित्र अशोक चिटणीसांनी "कर्मयोगी उद्योजक" या नावाने प्रसिद्ध केलेले आहे. लातूरला भूकंप झाला, डॉ. ढवळे ह्यांनी २ कोटी रुपयांची मदत पाठवली. जानेवारी २००१ मध्ये भूजला भूकंप झाला, डॉ. ढवळे ह्यांनी ४४ कोटी रुपयांची मदत कॅनेडियन सरकारकडून मिळवून दिली. निरपेक्ष समाजकार्य करणाऱ्या ९ संस्थांमध्ये ते नेहमी कार्यरत असतात. डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर हे त्यांचे सूत्र आहे. दुसऱ्यांच्या गुणांचा गुणाकार व दोषांची वजाबाकी करण्याची त्यांची सवय आहे. त्यांचा स्वभाव विनोदी असल्याने ते कॅनडा व महाराष्ट्रात विख्यात आणि लोकप्रिय आहेत.

मनोगत

मनोगतात ढवळे लिहितात, "माझ्या मनात खंत होती, की स्वतः राजाभाऊ किती ग्रेट होते हे लोकांना कधी समजलेच नाही. त्यांच्यावर शिंतोडे उडवणारे, टीका करणारे भरपूर आहेत; पण त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे यथार्थ मूल्यमापन अजून झालेलेच नाही. मग मनात विचार आला की मीच ते काम का करू नये? मीच ते निःपक्षपातीपणे करू शकेन. कारण मी कॅनडात राहत असल्याने विरोधी प्रचारापासून अलिप्त होतो! राजा ट्रॅव्हल्सचे ९५% ग्राहक मराठी. म्हणून ते मराठीतून लिहिणे गरजेचे होते. मात्र राजा ट्रॅव्हल्सचे जगभर पसरलेले स्नेहसंबंध पाहता मला ते इंग्रजीतूनही प्रकाशित करणे आवश्यक वाटत होते. " सावरकरांच्या मार्सेलिस येथील ऐतिहासिक उडीला ८ जुलै २०१० रोजी १०० वर्षे पूर्ण होत होती. त्यानिमित्ताने राजाराणी ट्रॅव्हल्स तर्फे जो कार्यक्रम तिथे करण्यात येणार होता, त्यात पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या शुभहस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचे ठरले. पुस्तकाची अर्पणपत्रिकाही त्यांचेच नावे केलेली आहे.

मुंबईस दिलेल्या दोन भेटी. प्रत्येकवेळी आठवडा आठवडा केलेले इथले वास्तव्य. ३५ जणांच्या प्रत्यक्ष घेतलेल्या मुलाखती आणि काही जणांशी फोनवर केलेल्या गप्पांच्या आधारे ढवळ्यांनी हे पुस्तक सिद्ध केलेले आहे. त्यांचा रोजचा अत्यंत व्यस्त दिनक्रम पाहता या कामाकरता वेळ काढणे अवघड होते. तरीही, सव्वादोनशे पानांचे पुस्तक लिहिण्याकरता किमान १०० तास मिळायला हवेत म्हणून सकाळी ४ ते ७ आणि संध्याकाळी ६ ते ८ या वेळांत लिहून, ठरवल्याप्रमाणे तीन आठवड्यांत त्यांनी हे काम पूर्ण केले.

परिचय

लहानपण, मुलांच्या नजरेतील आप्पा, आठवणींचा खजिना, यादों की बारात, इतीश्री आणि उपसंहार अशा प्रकरणांमध्ये हे चरित्र विभागलेले आहे. राजाभाऊंचा खून कसा झाला असावा याची कल्पना, उपलब्ध मुलाखतींच्या आधारे करून, ’इतीश्री’ हे प्रकरण त्यांनी सर्वात आधी लिहीले आहे. ऐतिहासिक घटना एकमुस्तपणे समजाव्यात यासाठी अशी मांडणी मला अत्यंत सोयीची वाटली. अभिजीत, विश्वजीत आणि सत्यजीत ऊर्फ भरत यांच्या मुलाखतींवर आधारित आमचे आप्पा या शीर्षकाखाली लिहीलेली तीन प्रकरणे, राजाभाऊंची मुलांच्या मनातील तसेच समाजातील निखळ प्रतिमा उत्तम उभी करतात. इतर अनेकांच्या ’आठवणींचा खजिना’ नंतर उघडलेला आहे. त्यात अरूण मणेरीकर, रमेश वारगे, काही पर्यटक यांच्या आठवणी आहेत. १९८३ सालचा राजाराणी ट्रॅव्हल्सचा रौप्यमहोत्सवी सोहळा व राजाभाऊंचा राष्ट्रीय एकता सफरीचा गाजलेला उपक्रम यांबद्दलची सुरस आणि स्फूर्तीदायक वर्णने ही या पुस्तकाची मला आवडलेली उत्तम प्रकरणे आहेत. सोमनाथ समेळांनी शब्दांकित केलेल्या, "केल्याने देशाटन" या राजाभाऊंच्या आत्मचरित्राचाही उपयोग या पुस्तकाच्या लेखनात झाला असेही डॉ. ढवळेंनी लिहून ठेवलेले आहे.

जगण्याचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क आणि सुखाचा शोध घेण्याचा हक्क ही तीन तत्त्वे अमेरिकन घटनेच्या पहिल्याच कलमात नोंदवलेली आहेत. त्यानुसार तिथले लोक मनात जागणारी देशभक्ती प्रच्छन्नपणे अभिव्यक्त करण्याकरता सर्वत्र राष्ट्रध्वज खांद्यावर मिरवतात. त्याच धर्तीवर, १९७१ च्या युद्धानंतर पर्यटनाची आक्रमक जाहिरात करतांना राजाभाऊंनी राष्ट्रध्वजाचा वापर केला. म्हणून त्यांच्यावर राष्ट्रध्वजाचा वापर, धंदा वाढवण्याकरता केला या आरोपाखाली खटला चालला. कोर्टाने राजाभाऊंच्या राष्ट्रप्रेमाविषयी गौरवोद्गार काढले, मात्र कायदा आहे त्या स्थितीत पाळला जावा म्हणून त्यांना कोर्ट उठेपर्यंत कोर्टात बसून राहण्याची शिक्षा दिली. राजाराणी ट्रॅव्हल्सच्या मालकीच्या इमारतीवर तिरंगा फडकवण्यावरूनही असाच खटला झाला. राजाभाऊ तो जिंकले. त्यांना राजाराणी पर्यटनभवनावर तिरंगा फडकवण्याची अनुमती मिळाली. ती सर्वच कहाणी लेखकाने अत्यंत रोचकपणे सादर केलेली आहे.

यादोंकी बारातमध्ये पर्यटन व्यवसायात राजाभाऊंना आलेले संस्मरणीय अनुभव सुरसपणे गुंफलेले आहेत. फटकळ, संशयी आणि शिस्तीबाबत हट्टाग्रही स्वभावामुळे मुले, नातेवाईक आणि निष्ठावंत कर्मचारीही हळूहळू त्यांच्यापासून कसे दुरावत गेले त्याचे वर्णनही सुसंगतपणे केलेले आहे. मात्र त्यांच्या हत्येनंतर ज्या प्रेरणेने ते सर्व पुन्हा एकत्र येऊन, त्यांनी तो व्यवसाय पुन्हा प्रवाही केला त्याचेही वर्णन यथास्थित केले आहे. त्यांच्या गुणांबद्दलचा जनमानसातील आदर किती भक्कम होता हे अधोरेखित करण्यात लेखक यशस्वी झालेला आहे. त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या भावनेचे केलेले वर्णन आणि तिची पुढे कशी वाट लागली त्याचेही वर्णन मुळातच वाचायला हवे. पुन्हा यादोंकी बारात हे प्रकरण तर अगदी खास लिहिले आहे. पर्य़टन व्यवसायावर कुठला अभ्यासक्रम पुढे मागे कधी निर्माण झालाच तर, हे प्रकरण त्याकरता बायबल ठरेल.

अमेरिका - युरोपात पर्यटन करायचे तर आपल्या परंपरागत सवयींना कशी मुरड घालणे अगत्याचे ठरते याचे प्रशिक्षणच ते पर्यटकांना देत असत. थॉमस कूक यांच्या ऑफिसात त्यांना, "आम्ही चोवीस तासात रिफंड देतो" अशी पाटी पाहायला मिळाली. प्रत्यक्षात त्यांना मोजून चोवीस मिनिटांत रिफंड मिळाला. या घटनेने राजाभाऊ खूपच प्रभावित झाले. आपल्याही ऑफिसात त्यांनी तशीच कार्यप्रणाली विकसित केली. हे सर्व वर्णन रसदार करावे तर डॉ. ढवळेंनीच. पुस्तक परिचय फार लांबू नये, म्हणून आवरते घेतो. मात्र इतक्या गोष्टी ह्यात सांगण्यासारख्या आहेत की मोह आवरत नाही. तरीही, यामुळेच हे पुस्तक चरित्र न वाटता, पर्यटन व्यवसायाचा आढावा घेणारे एक स्वतंत्र पुस्तकच आहे असे वाटते. कसेही असले तरी वाचनीय. शेवटी ते डॉ. ढवळे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून आलेले ओघवते कथन आहे. कुठेच कंटाळवाणे होत नाही. सुरस वाटते.

नरेंद्र गोळे या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.
 
^ वर