दारु
मध्यंतरी मी फेसबुकवर अकाउंट काढल तेव्हा पाहीलं की माझ्या काही नातेवाइकांनी त्यांचे भरपुर फोटो टाकले आहेत. फोटो छान होते पण एक स्त्री नातेवाईक आणि दुसरा एक पुरुष नातेवाईकांच्या प्रत्येक फोटोत दारुचा हिंदकळणारा ग्लास दिसत होता. ही दोन वेगळी अकाउंट होते.
दारु प्याली किंवा नाही प्याली हा चर्चेचा विषय नाही पण त्याची जाहीरात कराविशी लोकांना का वाटते? त्यातून त्यांना काय मिळते? काय दाखवून द्यायचे असते?
दारु पिणे हे स्टेटस सिम्बॉल का मानले जाते?
तुम्हाला अशाप्रकारे दारु पिताना आपले फोटो जाहीर करणे आवडते/पटते का? आवडत/पटत असल्यास का आवडते/पटते आणि आवडत/पटत नसल्यास का आवडत/पटत नाही?
ज्या व्यक्ती मद्यधुंद पार्ट्यांचे फोटो लावतात त्यांच्या हातून असे सहजच होत असते असे तुम्हाला वाटते जा?
आधीच्या एका चर्चेत चित्राताईंनी माझे विचार मांडायला सांगितले होते म्हणून माझे मत लिहिते -
मला दारु पितानाचे फोटो लावून काही मिळते का हे कळत नाही. मी क्वचित कधीतरी वाइन घेते आणि क्वचित एखादा फोटो कोणी क्लिकला तर माझी ना नाही पण मुद्दाम ग्लास वर करून माझा फोटो काढा असे मी कुणाला सांगणार नाही आणि सांगितले तरी तो स्वतः जाऊन सोशल नेटवर्किंग साइटवर पब्लिश करणार नाही.
तुम्हाला काय वाटते?
Comments
सहमत
आमी बी कवा कवा घेतो. आमच बी तुमच्यावानीच मत हाय!
प्रकाश घाटपांडे
खरच पटल!
अहो एवढच काय हल्ली स्वत:च्या रिलेशनशिप मध्ये काय होत नाही हे सुद्धा फेसबुक वर टाकायला मुलींना काहीच वाटत नाही.तो अमुक दिवशी भेटला,तमुक दिवशी असं बोलला,त्याचा राग आला इ.पण हा खरच विचित्र प्रकार आहे.आपण काय लिहितोय आणि त्याचे परिणाम काय आहेत् हे मुलींच्या दृष्टिने तर जास्त महत्त्वाचं आहे.
सहमत
हाहाहा! तुमचे माझे नातेवाईक एकच तर नव्हे? ;-) एक किस्सा आठवला -
आमच्या कुटुंबातील एका ज्येष्ठ बाईंना त्यांच्या मुलीने फेबुची सहल करवली. या सहलीत त्यांना आमच्या कुटुंबातील एका मुलाचे (ज्याचे डिसेंबरात लग्न व्हायचे होते) सर्व गिल्लासधारी फोटु दिसले. त्यांनी सर्व कुटुंबाला फोन फिरवून सांगितले
"तो xxxxचा मुलगा साफ कामातून गेला आहे. फार पितो तो. कसे व्हायचे त्या मुलीचे?"
असो. ही बातमी बहुधा मुलीपर्यंत न पोहोचल्याने लग्न पार पडले. ;-)
अगदी.
तशी भरलेले ग्लास हिंदकळवण्याची फॅशन मराठी संकेतस्थळांवरही आहे बरं का! - उगीच सर्वांच्या माहितीसाठी. ;-)
फोटो
फोटो काढणे ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे असे वाटते.
चर्चा गंभीर नाही असा माझा समज होता म्हणून कैच्याकै प्रतिसाद दिला होता. गंभीर उत्तर द्यायचे झाले तर विषय बराच सापेक्ष आहे. प्रत्येकाची आवडनिवड वेगळी. ज्याला जसे वाटते/रूचते तसे त्याने/तिने करावे. यातून काही सिद्ध वगैरे होते असे वाटत नाही.
--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/
सिद्ध
वाक्याच्या पूर्वार्धाशी सहमत आहेच पण उत्तरार्धाविषयी माझा पूर्वीचा बॉस सांगत असे की त्याच्याकडे रेज्युमे आले की तो त्या नावांना फेबु, ट्विटर वगैरेवर शोधतो. विशेषतः सोशल नेटवर्किंग साइटवर मनुष्य काय लिहितो, कसे फोटो पब्लिश करतो यावरून त्या माणसाविषयी रेज्युमेमध्ये नसणारी पण अतिशय उपयुक्त माहिती गोळा करता येते. अशा माणसांना आपल्या टिममध्ये घ्यायचे की नाही याचा निर्णय करण्यासाठी या माहितीचा उपयोग होतो.
मान्य
यावरून माणसाविषयी बरीच माहिती मिळू शकते हे अर्थातच मान्य आहे. बॉस लोकांनी असे केल्याच्या बातम्याही वाचल्या आहेत.
असे फोटो असणे म्हणजे स्टेटस सिम्बॉल असे सिद्ध होत नाही असे म्हणायचे होते.
--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/
फेसबुकावर लोक का येतात?
१. अरे माझे किती मस्त चालले आहे बघ बघ हे दाखवायला
२. माझी अभिरुची किती उच्च आहे हे दाखवायला
३. मी किता हायक्लास आहे हे दाखवायला
४. माझ्या किती ओळख्यापाळख्या हे दाखवायला
५. एकमेकांची पाठ खाजवायला
६. थोडक्यात जाहिरात करायला
आम्ही मात्र फेसबुकावर मित्रांना भेटायला, आणि त्यांच्यापैकी किती हेपलतात हे बघायला, येतो. फेसबुकावर आमचे असंख्य जुने मित्र भेटले. त्यामुळे मी फेसबुकाचा आभारी आहे.
तुमच्या नातेवाईकांनी टाकलेले फोटो खासगी वितरणासाठी असल्यास असे फोटो टाकण्यात काही वावगे नाही असे माझे मत आहे. ( मित्रांसोबत बेवडा मारतानाचे आमचे काही जुने उघडबंब फोटो आहेत. ते टाकीन म्हणतो.)
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
दारु
मी एकदा आमच्या इथल्या सुपरमार्केटमधे $300ची वाइन पाहिली होती पण ती ग्लासात ओतून फोटो काढला तर तीनशेची आहे की तीन डॉलरचे हे कस कळणार?
पण् धम्मकलाडूंचे बरोबर आहे -
१. अरे माझे किती मस्त चालले आहे बघ बघ हे दाखवायला
२. माझी अभिरुची किती उच्च आहे हे दाखवायला
३. मी किता हायक्लास आहे हे दाखवायला
४. माझ्या किती ओळख्यापाळख्या हे दाखवायला
५. एकमेकांची पाठ खाजवायला
६. थोडक्यात जाहिरात करायला
जाहिरात करायला येतात याच्याशी आणि इतर कलमांशी सहमती आहे. माझ्या नातेवाइकांचे फोटो फक्त फ्रेंडसाठी नव्हते. कोणीही येऊन बघावे असे होते.
>>मित्रांसोबत बेवडा मारतानाचे आमचे काही जुने उघडबंब फोटो आहेत. ते टाकीन म्हणतो.
तुम्ही माझ्या फ्रेंडलिस्टमधे नाही ते बर झालं.
काही प्रसंगी जाहिरात नसावी
आताच माझे फेसबुक पान बघितले. मी स्वतः डकवलेले फोटो, आणि अन्य लोकांनी डकवलेले माझा सहभाग असलेले फोटो बघता काय दिसले? बरेचसे फोटो सहभोजन-प्रीतिभोजन प्रसंगांमधले होते. टेबलाबर किंवा हातात वाईनग्लास आहे असलेले कित्येक फोटो आहेत.
यात जाहिरात आहे असे काही मनातही नव्हते.
पण काहीतरी संदेशन होते, याबद्दल आंशिक सहमती आहे. उदाहरणार्थ, माझ्या फोटोंमध्ये कुठल्या फॅशनचे कपडे मी घालतो त्याबद्दल कोणाला काही कळू शकते. म्हणजे माझे काही मित्र बंद गळ्याचे शर्ट घालणे पसंत करतात, त्यांच्या पुष्कळ फोटोंमध्ये त्यांनी बंद गळ्याचे शर्ट घातलेले असतात. असा फोटो बघून कोणी "याला अशी फॅशन आवडते" असा संकेत घेतला तर अगदी काही चूक नाही. पण तरी "तो व्यक्ती फॅशनची जाहिरात करतो आहे" असे म्हणणेसुद्धा ठीक वाटत नाही.
तसेच हातात वाईनग्लास असण्याबाबत. माझ्या त्या सर्व फोटोंमध्ये "अमुक-अमुक मित्रांबरोबर आनंदी प्रसंग" असा प्रमुख हेतू होता. दुय्यम संकेत मिळतो, तरी "दारू पिण्याची जाहिरात" हा प्राथमिक हेतू नाही.
फेसबुक हा चर्चेचा विषय नाहीये
उपक्रमींना दारुऐवजी फेसबुक जास्त आवडते वाटते. मला नीटसं लिहिता येत नाही म्हणून चर्चा नीट मांडली गेली नाही. दारु पिण्यात आणि त्याची प्रसिद्धी करण्यात मोठेपणा का वाटतो अस विचारायच्ं होतं. मोठेपणा वाटतो म्हणुन माणसं फोटो लावतात. इथे तर सर्वांनी फेसबुकवर चर्चा सुरु केली.
@धनंजय - माणूस फोटो काढतो आपल्या आठवणींसाठी पण दुसर्यांना दाखवतो ते त्यांनी बघुन प्रशंसा करावी म्हणुन ना. म्हणजेच फोटो जाहीर करुन त्याला काहीतरी बदल्यात मिळवायचे असते म्हणुन मी जाहिरात म्हटलं.
बरोबर पण प्राथमिक प्रशंसेचा हेतू
तो फोटो अनेक लोकांनी बघावा (कदाचित प्रशंसा करावी) असा हेतू असतो खरा.
पण प्राथमिक हेतू "बघा या मित्रांसोबत एक आनंदमय ठिकाणी मी होतो" हे जाहीर करायचा हेतू असतो. आणि प्राथमिक प्रशंसा "मित्रांसह आनंदी वातावरणात सहभागी होणारा" ही प्रशंसा अपेक्षित असते.
- - -
परदेशातून घरी आल्यावर एकदा माझ्या एका चुलतचुलत्यांनी डोळे मिचकावत विचारले होते - "तिकडे काय दररोज मासमच्छी खात असणार, आणि दररोज दारू..."
या परिस्थितीत काय उत्तर द्यायचे याबद्दल मी बराच गोंधळलो होतो. मी बहुतेक दिवशी शाकाहारच खातो, ही बाब सोडूया. पण जेव्हाकेव्हा मांसाहार खातो, तेव्हा काही विशेष डोळे मिचकावून खाल्ल्यासारखे वाटत नाही. तर अधूनमधून मांसाहार करतो हे त्या चुलत्यांना सांगितले असते, तर "अधूनमधून सदसद्विवेकबुद्धी झोपवून मज्जा करण्यासाठी व्यभिचार केल्यासारखा मांस खातो" असे त्यांनी मनातल्या कानात ऐकले असते. अशीच काही बाब दारूबद्दल. तर मी उगाच विषय बदलून वगैरे बघितला. (पण ते काका मोठे मातब्बर होते - "लाजतोस काय" म्हणून पुन्हा तोच प्रश्न विचारला. आणि त्यांना असे नक्की वाटले असणार - "मांस खाण्याबद्दल लाज वाटते, तरी व्यभिचार केल्यासारखा हा मांस खातो.")
आता समोर नॉनव्हेज थाळी असलेलेदेखील माझे फोटो आहेत. माझे आई-वडील-मित्र बघतात, तेव्हा त्यांना काय दिसते "धनंजय काहीतरी खातो आहे - कुठलासा पार्टीचा प्रसंग आहे." पण या चुलतचुलत्यांना काय दिसले असते "धनंजय निर्लज्जपणे मांस खाल्ल्याचा फोटो दाखवतो आहे." त्यांचे हे असे वाटण्यात नेमकी काय चूक आहे, त्यावर बोट ठेवता येत नाही. कारण (१) थाळीत मांस असते, हे तर खरेच. (२) आमच्या काही नातेवाइकांत मांस खाणे लज्जास्पद मानले जाते, आणि त्या घरांत मी त्यांच्या नियमांप्रमाणे वागतो, हे सुद्धा खरे. (३) मी फोटो प्रदर्शित करत असतो, हेसुद्धा खरे. मग चुलतचुलत्यांच्या डोळे मिचकावून "(१+२+३=) लज्जास्पद म्हणून माहीत असलेले मांस खाल्ल्ल्याचा फोटो निर्लज्जपणे प्रदर्शित केला."
या १+२+३ विचारात नक्की काय चुकलेले आहे? पण काहीतरी चुकलेले आहे, हे नक्की.
तोच प्रकार दारूबद्दल.
प्रतिसाद
@धनंजय - मांसाहाराबद्दल तुम्ही म्हणता ते मान्य आहे पण मांसाहाराची चटक लागली आणि दारुची चटक लागली या दोन्ही वाक्यात फरक वाटतो का?
दारुला अंमल आणणारा पदार्थ मानतात ना. तिच्या सेवनाने तोल सुटू शकतो. मांसाहाराने तसं होत नाही. आता मांसाहाराने तोल सुटतो असं मानल तर शाकाहारानेही सुटतो त्यामुळे भोजन बंद करावे हा उपाय नाही म्हणुन दारु आणि मांसाहार यात मला फरक वाटतो.
ग्लास वर करुन चीअर्सच्या थाटात फोटो काढला जातो तो फक्त आनंदमय वातावरण दाखवायला असं वाटत नाही. मी जर प्रेसिडेन्टसह फोटो काढला तर माझी प्रेसिडेन्टपर्यंत पोहोचायची ऐपत आहे किंवा त्यांच्याशी ओळख आहे हा माझा मोठेपणा आहे अस दाखवायचं असतं. ओळख नसताना सहज भेट झाली म्हणुन फोटो काढला तरी त्या फोटोतली ट्रॉफी प्रेसिडेन्ट असते तर मग दारुच्या फोटोतली ट्रॉफी दारु का नाही? आनंदमय वातावरण का? दोन्ही असू शकेल असं वाटत्.
माझ्या मुळ प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही - दारु पिणे हे स्टेटस सिम्बॉल का मानले जाते?
मी स्टेटस सिंबॉल नाही मानत
मी दारू पिणे स्टेटस सिंबॉल मानत नाही.
आता माझे स्वतःचे जे फोटो आहेत, त्यांच्या हेतूबद्दल मी सांगितले - मित्रांमध्ये आनंदमय गेटटुगेदर झाले, हे दाखवण्यासाठी मी फोटो प्रदर्शित केले. माझे मन आणि हेतू मला जितपत ठाऊक आहेत तिथवर मी खरे बोललो. त्याहून खरे काय बोलू शकणार?
आता उघड मनाहूनही वेगळे गुप्त असलेले हेतू काही असू शकतील, हे शक्य आहे. ते मला स्वतःहून कळणारच नाहीत. आणि हा गुप्त हेतू स्टेटस सिंबॉल मिरवण्याचा असेल, हे विश्लेषण ऐकून-समजून पचवण्यास मी तयार आहे. पण हा गुप्त हेतू मोठाच अयशस्वी आहे, असे अनुभवावरून सांगावे लागेल. "तुमच्या फोटोत दारू दिसते, म्हणून तुम्ही मोठ्या स्टेटसचे" अशा प्रकारची माझी प्रशंसा आजवर कोणीही केलेली नाही. इतक्या वर्षांच्या नंतर आतातरी तो गुप्त हेतू चेचून नाहिसा व्हायला हवा होता.
आता "मी स्टेटस सिंबॉल मानत नाही" असे असून "अन्य लोक स्टेटस सिंबॉल मानत असतील" असेसुद्धा असेल. पण या लोकांबाबत मी काय सांगणार? "मला हे लोक फारसे भेटले नाही" एवढेच सांगू शकतो.
- - -
दारूच्या अतिरेकाने तोल सुटतो हे बरोबर आहे. पण मला वाटते "समाजव्यवहारात वंगण" या प्रमाणात दारूचे सेवन करता तोल सुटत नाही. तो मुद्दा वेगळा आहे, असे सध्यातरी वाटते.
कल्पना नाही, पण
हे स्टेटस सिंबॉल आजच नाही, पूर्वीपासून असावे.
सोमरसाचे पान देवांनाही प्रिय मग आपणच का नाही प्यायची, असा एक विचार आढळतो. :)
दुसरे एक असे की आजही बाटल्यांमध्ये मिळणारे मद्य हे तसे महाग, उंची पेय आहे. आपण मित्रांबरोबर बसून आनंद घेतो, हे लोकांना दाखवायला आवडते. आपण मित्रांना मद्य पाजतो, म्हणजे आपण उदार, आणि मित्रांबरोबर (तसेच मैत्रिणींबरोबर) मजा करू शकणारे, क्षण आनंदात घालवायला उत्सुक असणारे असे आहोत याची जाहिरात असते.
जसा तोटा असतो तसा याचा कधीकधी काही लोकांना फायदाही होत असावा. उदा. निवडणुकीत उमेदवार लोकांना "आपल्यातला" वाटणे महत्त्वाचे ठरते.
अमेरिकेचे अध्यक्ष जॉर्ज बुश आणि त्यांचे प्रतिस्पर्धी केरी यांच्यात जेव्हा चुरस होती, तेव्हाचे मत हे असे आहे.
President Bush, despite his many problems, strikes most of the American people as a pretty nice guy —... more standoffish Kerry projects little warmth. A recent Zogby/Williams Identity Poll reflected .. found that 57% of undecided voters would rather have a beer with Bush than Kerry. (In Bush's case, it would be a nonalcoholic beer.)
http://www.usatoday.com/news/opinion/columnist/benedetto/2004-09-17-bene...
त्याआधी, २००० मध्येही जॉर्ज बुश यांचे लोकांमधले अपील/ त्यांना सहज अप्रोच करता येणे हे महत्त्वाचे विषय होते.
According to a just-released Sam Adams/Roper Starch poll, more people would rather sit down to drink a beer with George Bush than Al Gore.
http://findarticles.com/p/articles/mi_m0EIN/is_2000_Oct_17/ai_66149137/
मांसाहाराचे थोडे तसेच आणि किंचित वेगळे आहे. आहारावरून माणसांचे कंपू ठरतात. त्यामुळे कंपूत प्रवेश करण्यासाठी आपला आहार दुसर्यांसारखा आहे किंवा आपल्याला हेही अप्रिय नाही, असे दाखवण्याची गरज वाटत असावी.
>>तुम्हाला अशाप्रकारे दारु पिताना आपले फोटो जाहीर करणे आवडते/पटते का?
लोकांचे न पटण्याचा/पटण्याचा संबंध नाही. कोणी लावले तर मी नावे का ठेवू? मला एखादी व्यक्ती दारू पिते/पीत नाही किंवा मांसाहार करते/करत नाही, यावरून तिच्याशी पटणे/न पटणे ठरत नाही.
फेसबुक ही सोशल नेटवर्किंगची साईट आहे, ती बरीचशी सार्वजनिक आहे. मी सार्वजनिक ठिकाणी जितपत माझ्या सगळ्या आवडीनिवडी उघड करण्याबाबत कॉन्शस असते, तेवढीच फेसबुकवर असते. त्याहून जास्त नाही, आणि कमी नाही. पण कोणी इतरांनी तसे केले तर करू देत असा माझा विचार असेल.
वर एच आर बद्दल विचार आला आहेच. तो खरा आहे, पण काही कामांसाठी नेटवर्किंग करता येणेही आवश्यक असते. आता फेसबुकावर ऍक्टिव्ह नाही म्हणून एखाद्या एच आर वाल्याने जर असे म्हटले की या माणसाला/व्यक्तीला मित्रच नाहीत, तर? किंवा नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करू शकण्यात फारच जुनाट दिसतो/दिसते आहे, तर? तेव्हा एच आर वाल्यांनी अगदीच रेड फ्लॅग करण्यासारखे कोणी काही सातत्याने करत/बोलत/वागत करत असले, तर ठीक आहे, नाहीतर एच आरला किंवा कोण काय म्हणतील याला घाबरून, मन मारत जगण्याला काही अर्थ नाही.
तुमचे नातेवाईक असे का करतात हे माहिती नाही, पण माझे असे मत आहे की त्यांना जवळचे बरेच मित्र असावेत, आणि अधिकाधिक मित्र करून घेण्याची इच्छा आहे असे दिसते आहे.
निरर्थक चर्चा.
मुळात् फेसबुकावर् लोक् सर्वप्रकारचे फोटो लावतात्. पार्टीत् फोटो घेणारे शेकड्याने असतात्, कोणी फोटो घेउ लागला तर् त्याला हसुन पोझ देणे यात् काही चुक् नाही. पार्टीत दारु पिताना कोणी फोटो काढला आणि त्यावेळी हसुन् ग्लास् दाखवला ('चीअर्स केले') तर त्यात काही चुक वाटत नाही.
पुर्वी कुठल्याही समारंभाचे फोटो इतरांना दाखवण्यात् जितका आनंद लोकांना होत होता तितकाच् आनंद अजुनही लोकांना होतो, फक्त फोटो काढणे पुर्वीइतके महाग् राहिले नाही आणि ते इतरांना दाखवणे अगदी सहज शक्य झाले आहे हा बदल् अनेकांना पचत नाही असे वाटते.
थोडक्यात दुसर्यांच्या फेसबुकावर् कसले कसले फोटो असतात याची चिंता इतर लोक् कशाला करतात हे मला न सुटलेलं कोडं आहे. उद्या ' लोक पोहायला जाताना उघडे होउनच का जातात् (अन् त्याचे फोटो फेसबुकावर् का लावतात्), तुम्ही लावता का, तुम्हाला आवडते का, तुम्हाला पटते का' यावरही चर्चा करुयात्. (अजुन् भरपूर् विषय आहेत, सवडीने घेउच)
-Nile
धन्यवाद
मी स्टेटस सिम्बॉल का मानले जाते असा प्रश्न केला होता.
चित्रा यांचे उत्तर - दुसरे एक असे की आजही बाटल्यांमध्ये मिळणारे मद्य हे तसे महाग, उंची पेय आहे. आपण मित्रांबरोबर बसून आनंद घेतो, हे लोकांना दाखवायला आवडते. आपण मित्रांना मद्य पाजतो, म्हणजे आपण उदार, आणि मित्रांबरोबर (तसेच मैत्रिणींबरोबर) मजा करू शकणारे, क्षण आनंदात घालवायला उत्सुक असणारे असे आहोत याची जाहिरात असते. - पटले. इतरांची उत्तरे वाचायला आवडतील.
मी चर्चेत लिहिल होतं - एक स्त्री नातेवाईक आणि दुसरा एक पुरुष नातेवाईकांच्या प्रत्येक फोटोत दारुचा हिंदकळणारा ग्लास दिसत होता. ही दोन वेगळी अकाउंट होते. हे दोघे दारुबाज नाहीत. मद्याचे फोटो फक्त पार्टीतच काढले जातात असे इथल्या काही लोकांना वाटलेले दिसते. मी फक्त तसे म्हटले नाही.
@Nile
तुम्हाला चर्चा निरर्थक वाटल्यास भाग घेऊ नका. जबरदस्ती नाही. इतर करत आहेत त्यांना करू द्या. चर्चा फेसबुकबद्दल नाही, दारु पिण्यात काय मोठेपण वाटते त्यावर आहे. मी विषय नीट मांडला नाही म्हणुन असे झाले.
हिंदी सिरीअल्स आणि सिनेमे
टिंकरबेल आपण विषय नीटच मांडला आहेत. त्या त्या वेळी आपल्यापाशी जेवढी माहीती उपलब्ध असते तेवढ्या माहीतीच्या आधारे आपण विषय मांडत असतो. जसे जसे चर्चेमध्ये सहभागी होणारे लोक वाढतात, तसे फाटे फुटत जातात म्हणा अथवा विषयाची व्याप्ती आपल्या लक्षात अधिक चांगल्या रीतीने येऊ लागते. कितीही अभ्यास करून साकल्याने एखादा विषय मांडला तरी हेच होत असावे बहुधा. तेव्हा वाईट वाटून घेऊ नये.
आता "दारू" विषयाकडे - हो मला वाटतं की स्टेटस सिंबॉल अशी प्रतिमा नाहक उंचावली आहे. हिंदी सिरीअल्स आणि सिनेमे या "उंचावलेल्या" प्रतिमेला अंशतः कारणीभूत आसाव्यात. उच्चभ्रू समाजातील स्त्री-पुरुष हसत हसत एकमेकांच्या कमरेभोवती वेढा घालत, लाडीक ओठांचा चंबू करून , हातात मद्याचा पेला असलाच पाहीजे अशा अवस्थेत गप्पा मारतात , सिनेमात तर कॅबरे वगैरे होतो . यांच्यापैकी कोणीही भडाभडा उलटी करत नाही, गटारात जाऊन लोळत नाही, डोकेदुखीने त्रस्त होऊन वसकन जोडीदाराच्या अंगावरही येत नाही. आपल्याला जे लहानपणापासून दिसतं ते हेच की - सधन लोक ....... मुक्त वाहणारी दारू ......मोठमोठ्या गप्पा ...... दारू चढलेल्या , किंचीत मोकळ्याढाकळ्या बायका आणि मग मेंदू एक समीकरण (असोसिएशन) बनवितो जे की ग्लॅमरस वाटते .
दारु
'मी पितो' हे सांगण्यात प्रौढी मिरवण्यासारखे काही नाही. लपवण्यासारखेही काही नाही.
सन्जोप राव
तुमचा स्वभाव कसा आहे? गिरण्या बंद पडण्यापूर्वी कसा होता?
+१
'मी पितो' हे सांगण्यात प्रौढी मिरवण्यासारखे काही नाही. लपवण्यासारखेही काही नाही.
माझ्या मते चर्चाप्रस्तावाला दिलेले सोपे, सुटसुटीत आणि सम्यक् उत्तर. याव्यतिरिक्तचा उहापोह (विशेषतः सोशल मेडीया बद्दलचा) अप्रस्तुत वाटतो.
आक्षेप ?
ग्लास दारूचा असेल किंवा पाण्याचा, तुम्ही जी गोष्ट समाजात करता तिची अजून जाहीर वाच्यता झाल्यास आक्षेप का आहे? हे म्हणजे कुठेतरी आपण पितो ह्या गोष्टीची टोचणी आहे, ती असेल तर पिउच नये.
आता ग्लास बरोबर असलेले फोटो हे मुद्दाम काढलेले नसतात. समारंभात लोक फोटो काढतात, त्यावेळी लोक एकतर खात असतात, पीत असतात किंवा बोलत असतात, ह्यापैकी एका वेळचे ते फोटो असू शकतात.
कोणी मुद्दाम एक दारूचा ग्लास असलेला फोटो काढत नाही, काढलाच तर चित्र विचित्र फोटो काढतात, अनेक ग्लास हातात घेतलेला किंवा एकूणच काहीतरी गमतीशीर प्रकार असतात.
आक्षेप गोष्टीची वाच्यता चुकीची आहे हा आहे कि चुकीच्या गोष्टीची वाच्यता हा आहे?
स्वीकृतीतील सुख
युरोट्रिप या चित्रपटातील दोन पात्रांना हशीश घातलेले केक खायचे असतात. त्यांना केवळ प्लॅसिबो इफेक्टनेच हशीश चढते.
धनंजय यांनी स्वतःचे उदाहरण दिले आहे ते मान्य आहे. परंतु, छायाचित्रातील कथावस्तूच दारू असल्याचे टिंकरबेल यांनी अनुभवलेले आहे असे मला वाटते. माझ्या अनेक मित्रांचेही मी असे निरीक्षण केले आहे की त्यांना दारू 'आवडण्यास आवडते'. मुळात, ऑर्कुट, फेसबुक (किंवा इंडियन आयडॉल, सारेगमप) या सार्यांचे मूळही "लोकांना आवडणारी वस्तू मला आवडलीच पाहिजे" असेच नाही काय?
--
मुळात दारूतून मिळतेच काय? 'हलके वाटते, बंधने मोकळी होतात' अशी अलंकारिक वर्णने अनेकांनी मला सांगितली आहेत पण मला कधीच तसे काही जाणवलेले नाही.
--
@चित्रा: फेसबुक/ऑर्कुटवर अनेकजण लीटस्पीकमध्ये नावे लिहितात, साध्या अक्षरांचा शोध घेऊन ती सापडणार नाहीत. नावाचा शोध बंद करण्याचीही सोय आहे असा माझा अंदाज आहे (माझे दोन्हीवरही खाते नाही). त्यामुळे खाते सापडले नाही तरी "याला मित्रच नाहीत" असा समज नोकरी देणारे करून घेऊ शकत नाहीत असे मला वाटते. (नोकरी देताना फेबु/ऑर्कुटचा निकष त्यांनी लावणे मात्र मला पटते.)
बोलणारे कसेही बोलतातच
त्यामुळे खाते सापडले नाही तरी "याला मित्रच नाहीत" असा समज नोकरी देणारे करून घेऊ शकत नाहीत असे मला वाटते.
मला एवढेच म्हणायचे होते की बोलायचे तर कसेही बोलता येईल. याही बाजूने आणि त्याही. शिवाय एच आर वाले नक्की कसा विचार करतात हे कोणाला माहिती? तेव्हा अतिरिक्त विचार करणे काही खरे नाही.
एचआर
एच आरमध्ये काही जवळची माणसे असल्याने ते नक्की असा विचार करत नाहीत हे नक्की माहित आहे. असो.
काही विस्कळीत विचार
या चर्चेनिमित्त काही विस्कळीत विचार डोक्यात आले ते खाली लिहिते -
फेसबुकावर लोकांच प्रोफाइल तपासणार्या माझ्या बॉसला मी विचारले, "मग तुझे अकाउंट आहे का फेबुवर?" त्याने उत्तर दिले, "अर्थातच नाही. माझे काम, माझी तीन मुले, बायको, कुटुंब, मित्रमंडळी यांच्यात इतका गुंतलेला असतो की आणखी फेबुवर जाण्यास वेळ नाही आणि तिथून लोकांनी माझ्याबद्दल निष्कर्ष काढावे असे मला वाटतही नाही पण ही दुय्यम गोष्ट आहे. मला आवड नाही ही खरी गोष्ट." त्याचे उत्तर मला प्रामाणिक वाटले. कोणतेही एच-आर फेबुवर अकाउंट नाही म्हणून माणूस निरुपयोगी आहे असे ठरवते असे मला वाटत नाही.
----------
दारूचे सोडा पण फेबुवर दोन-तीन हजार मित्र मैत्रिणी बाळगणार्या व्यक्तीस* मीही नोकरी देणार नाही कारण इतके मित्र बाळगणारा माणूस लोकांशी फोनवर बोलणे, चॅट करणे यांत इतका बिझी असेल की कामे कधी करेल अशी शंका मला येईल. तसेच, फेबुवर माणसाची भाषा आणि कल तपासणे अधिक सोपे असते असे मला वाटते.
--------
बारशी, मुलांचे वाढदिवस, ग्रॅज्युएशन पार्टी, देवाची पूजा, लग्न वगैरे समारंभात दारू वाटणारे आपला मोठेपणा दाखवत असतात असे माझे वैयक्तिक मत आहे. अनेक लोकांना स्टेटस सिम्बल आहे असे वाटत असावे.
एका ओळखीच्या व्यक्तिस 'मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला दारू का बरे वाटली?' असा प्रश्न करता त्याने 'नाहीतर मोठ्यांना वाढदिवसाला येण्यात काय इंटरेष्ट?' असा प्रतिप्रश्न केला.
---------
जसे वयानुसार कपड्यांची, मेक-अपची, छंदांची आवड बदलते (आणि बदलावी असे अनेकांचे म्हणणे पडते) तशी वयानुसार दारूची आवड बदलते का?
----------
आमचे देवही दारू पित असल्याने दारू पिणे यांत काही मोठे नाही. संभाजीमहाराजही पित असावे आणि पहिला बाजीरावही पित असावा. पित नव्हता तो बहुधा औरंगजेब. यावरून दारू न पिणे ही वाईट गोष्ट असावी. - ह. घेणे.
-----------
रिटेप्रमाणेच दारू प्याल्यावर हलके वाटून बंधने मोकळे होण्याचे वगैरे अनुभव नाहीत. डोकेदुखी होते असा मात्र अनुभव आहे. याचा अर्थ मी आणि रिटेने हलके वाटण्याइतपत दारू प्याली नसावी असाही होतो.
---------
खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात भरत दाभोळकर आणि सुदेश भोसले यांनी 'आम्ही दारूच्या थेंबाला स्पर्शही केलेला/ करत नाही.' असे जाहीर केल्यावर मला त्यांची प्रशंसा करावीशी वाटली. त्यांचे हे वाक्य त्यांनी इतरांना 'समारंभात दारू घेतल्यानेच डील्स होतात असे नाही.' याची जाणीव करून देण्यासाठी वापरले होते. तसेच, आपली प्रशंसा व्हावी म्हणूनही ही जाहीरात असावी.
--------
दारूच्या एका घुटक्यासरशी तोल ढळलेल्या व्यक्ती पाहिल्या आहेत परंतु वर रिटे म्हणतो तसा हा प्लॅसिबो इफेक्ट असावा किंवा दारूचा आडोसा घेऊन इच्छापूर्तीचा प्रयत्न असावा.
-------
अजून बरेच विचार डोक्यात आले होते. वेळ मिळाला तर टाकेन. ;-)
तूर्तास, चीअर्स!!!! ;-)
--------
* कोणाला यांची नावे हवी असल्यास निरोपातून पाठवता येतील. ;-)
एक तांत्रिक मुद्दा!
फेसबुकावर लोकांच प्रोफाइल तपासणार्या माझ्या बॉसला मी विचारले, "मग तुझे अकाउंट आहे का फेबुवर?" त्याने उत्तर दिले, "अर्थातच नाही.
मुळात फेसबुकवर स्वतःचे खाते असल्याशिवाय कुणीही दुसर्याचे खाते कसे पाहू शकेल?
आत प्रवेश कसा मिळवणार?
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
बरोबर आहे, पण
ऑफिसात एकच मनुष्य इंटरव्यू करत नाही. जे अनेक करतात त्यांच्यापैकी कुणाचेही लॉग-इन पुरेसे असते. किंबहुना या बॉसला स्वतःला जाऊन बघायची गरज नाही. तो त्याच्या सेक्रेटरीला हे करण्यास सांगू शकतो.
फरक
व्यावसायिक हेरगिरीसाठी, टोपणनाव वापरून सदस्यत्व घेतले पण तेथे वैयक्तिक माहिती ठेवली नाही तर त्यात 'पावित्र्यभंग' होत नाही असे म्हणता येईल. तशा परिस्थितीत "खाते आहे" असे म्हणू नये असे मला वाटते.
सांस्कृतिक असावे
सांस्कृतिक असावे.
वर चित्रा यांनी अमेरिकन राष्ट्र्पतीविषयी उदाहरण दिल्याप्रमाणे "सोबत बसून बियर पिणारा हा अति-शिष्ट नसून आपणा सामान्य लोकांपैकी आहे" हे ध्वनित होते.
उच्च स्टेटस दाखवणे आणि सामान्य स्टेटस दाखवणे या दोन्हींना "स्टेटस सिंबॉल" म्हटले, तर कदाचित हे संस्कृतीनुसार बदलणारे स्टेटस सिंबॉल आहे.
येथे अनेक लोकांनी स्टेटस सिंबॉल आहे, असे मत सांगितले आहे. आपण एक वाटाघाटी करूया. बरेच लोक माझे फोटो बघून "हा स्टेटसची प्रौढी मिरवतो" असा अर्थ घेतील, हे मी लक्षात ठेवतो. आणि जर व्यक्तीच्या प्राथमिक हेतूबद्दल जाण असण्यात अन्य लोकांना जर काही रस असेल, तर "अशा फोटोंमध्ये स्टेटस सिंबल म्हणून मिरवण्याचा प्राथमिक हेतू नसलेले काही लोक असतात." असा बोध घ्यावा.
ज्या लोकांना या विषयाबाबत खरोखर कुतूहल आहे, त्यांनी माझ्या मताला विशेष वजन द्यावे, असे सुचवतो. "आपले असे फोटो उपलब्ध आहेत, आणि आपला आंतरीक हेतू अमुक आहे", असे सांगणारा या चर्चेतला मी एकटाच आहे. आणि चर्चा फोटो लावणार्या लोकांच्या आंतरिक हेतूंबाबत असल्यास तो हेतू जोखण्यासाठी बाकीची मते थेट नाहीत. जोवर "आपला आंतरिक हेतू प्रौढी मिरवण्याचा आहे" असे सांगणारे लोक येथे उत्तरे देऊन मला अल्पसंख्येत पाडत नाहीत, तोवर माझ्या मताला नको इतके वजन येते - पण काय करावे?
"आंतरिक हेतूंबद्दल अन्य लोक बहुतेक 'प्रौढी' म्हणून योग्य-समज-किंवा-गैरसमज करून घेतात" हे ५०-६०% फोटो-लावतो-असे-न-सांगणार्या लोकांचे आंतरिक इन्टरप्रेटेशन असते, हे मात्र बाकी सर्वांच्या मतप्रदर्शनातून थेट जोखता येते. ही दुसरी माहिती सुद्धा अतिशय उपयोगी आहेच .
- - -
चर्चाप्रस्तावकाला दोन्ही बाजू अपेक्षित असाव्यात असे वाटते. त्या विचारतात :
येथे फोटो लावणार्याच्या आंतरिक हेतूचा वेध आहे. हा प्रश्न चर्चाप्रस्तावक त्यांच्या त्या दोन नातेवाइकांना विचारू शकल्या असत्या. पण एक तर त्या विचारू शकल्या नाहीत, किंवा त्यांना उत्तर मिळालेले नाही, किंवा त्यांनी ते येथे दिलेले नाही. त्या नातेवाइकांच्या उत्तराच्या अभावात माझे एकुलते एक मत "फोटो लावणार्याचा आंतरिक हेतू" म्हणून येथे उपलब्ध आहे.
येथे फोटो बघणार्या व्यक्तीवर पडणार्या आंतरिक ठशाचा वेध आहे. येथे अनेक लोकांची मते उपलब्ध आहेत. हे चांगलेच आहे.
शंका
आपण बर्यापैकी उहापोह केला आहे जो अर्थातच मान्य आहे, पण आपण एवढा विचार केला आहे म्हणून एक शंका विचारतो -
हातात जेवणाचे ताट किंवा पेप्सी चा ग्लास घेऊन फोटो काढला आणि हातात दारूचा ग्लास घेऊन फोटो काढला ह्या दोन्ही विधानात काय फरक आहे? अगदीच विनोदी पद्धतीने दारूचा ग्लास हातात धरलेला अपवाद सोडल्यास इतर वेळी तो 'विशेष' कसा वाटू शकतो?
मी मूळ चर्चाप्रस्तावाकाला देखील ह्या प्रकारचा प्रश्न विचारला आहे, त्यांचा माताबरोबर आपले मत देखील जाणून घेण्यास मी उत्सुक आहे.
पूर्वी दारू पिणे निषिद्ध होते, हा फरक
पूर्वी दारू पिणे निषिद्ध होते, हा एक ठळक फरक जाणवतो.
उपक्रमावर लेखन-वाचन करणारे सदस्य आहेत, त्यांच्यापैकी अनेकांच्या पूर्वजांमध्ये पूर्वी दारू पिणे निषिद्ध होते, किंवा त्यांच्या ओळखीच्या नातेवाइकांमध्ये, स्वतःच्या कुटुंबात सध्यादेखील दारू पिणे निषिद्ध आहे.
(उदाहरण माझे घ्यावे : माझ्या पणजोबांच्या पिढीतले नातेवाईक बघता, दारू पिण्याबाबत सामाजिक निषेध सर्वांना मान्य होता - त्यांच्यापैकी काही जण दारू पीत असतील ही बाब अलाहिदा. आणि माझ्या हयात नातेवाइकांपैकी काही चुलत-चुलत नातेवाइकांच्या घरात दारू पिण्याबाबत सामाजिक निषेध असल्याचे मानतात. माझ्यासारखे खूप सदस्य उपक्रमावर असतील.)
आपण मिश्र समाजात राहातो, त्यामुळे जे लोक असे निषेध मानतात, त्याबद्दल आपल्याला सहानुभूती असते. असे निषेध मानणार्याचे मन दुखावू नये, असा प्रयत्न आपण पुष्कळदा करतो. (म्हणजे आजीसमोर मी मांसाहारही करत नाही, दारू पिण्याचे सोडा.) पेप्सीबाबत असे विधिनिषेध कुठलेच नाहीत.
पेप्सीबाबत किंवा पावाबाबत असा विधिनिषेध फारच पूर्वीच्या काळी होता १६००-१८०० काळात, त्या पिढीतले लोक उपक्रम सदस्यांनी बघितलेले नसावेत. परंतु असे शक्य आहे, की त्या काळात "वडलांसमोर विदेशी पेय-पाव वगैरे खाणार नाही, पण मित्रांसोबत खाईन" अशी परिस्थिती असेल.*
आता मांसाहार किंवा वाईनग्लास असलेला माझा फोटो "जाहीर" असल्यामुळे आजी तो बघू शकेल. काही लोकांना माझ्या वागण्यात विसंगती दिसत असावी.
१. ज्या अर्थी आजीच्या समोर दारू पीत नाही, त्या अर्थी याच्या मनात दारूबद्दल लाज असावी.
२. अन्यत्र दारू पिताना सुद्धा याच्या मनात "लाजिरवाणी कृती" असे मनात येत असलेच पाहिजे, पण लपवत नाही याच्यामागे "लपवणार नाही" हे जाहीर करण्याचा हेतू असावा.
अशी विसंगती कल्पिली जात असावी.
मात्र माझ्या मनातले विचारचक्र असे असते.
१. आजीचे मन दुखावेल, हे ठाऊक असल्यामुळे तिच्यासमोर दारू पीत नाही.
२. अन्यत्र दारू पिताना आजीबद्दल विचार मनात नसतो, त्यामुळे जसे वागतो तसे सहज वागतो.
त्यामुळे माझ्या आंतरिक दृष्टीने वागण्यात विसंगती नाही.
- - -
* मला अंधुक आठवते, की "स्मृतिचित्रां"त लक्ष्मीबाई सांगतात की ना. वा. टिळकांच्या धर्मांतराच्या वेळेला त्यांच्या कुटुंबात अशी एक धारणा होती : अभक्ष्यभक्षण-अपेयपान करता यावे, हा धर्मांतराचा हेतू होता. ना. वा. टिळकांना कोणी पटवायचा प्रयत्न केला, की घरी गुप्तपणे या गोष्टी केल्या तरी चालतील. वगैरे. म्हणजे अभक्ष्यभक्षण गुपचूप घरी करण्याबाबत किंतू नव्हता, पण तेच अभक्ष्यभक्षण उघड करण्यात काहीतरी लाजिरवाणे आहे, असा कुटुंबात एक मतप्रवाह होता. अभक्ष्यभक्षण-अपेयपान करायचेच, तर लपून करावे, उघड करणार्यास मात्र जाब द्यावा लागतो..
या वर्णनावरून असेही वाटते, की त्या काळात असे म्हणणारे लोक अनेक असतील "या नारायणाला आपण इंग्रजांसारखे खातो-पितो याची जाहिरात करायची असेल" = "स्टेटस सिंबॉल हा नारायणाचा प्रमुख हेतू आहे".
आता ना. वा. टिळकांना कुठल्याशा बाबतीत इंग्रजांचे अनुकरण करायचे होते, हे तर उघडच आहे. ते अनुकरण केल्याने त्यांचे "स्टेटस" (म्हणजे त्यांचे मित्र-सहकारी कोण, वगैरे तपशील) वेगळे आहे, हे जाहीर होणार होते, हेसुद्धा खरेच. पण माझ्या मते हे जे जाहीर होते, ते "साईड-इफेक्ट" म्हणून जाहीर होते. मूळ हेतू म्हणून नव्हे.
- - -
"बूर्ज्वा झाँतिय्योम्" (मोलिए) किंवा "अतिविशाल महिला मंडळ" (पु. ल. देशपांडे, "तुझे आहे तुजपाशी" नाटकातली पात्रे) या अंगाने विश्लेषण :
अभिजात संगीत, अभिजात नृत्य, फॅशनेबल कपडे, देशविदेशी मसाले वापरलेले अन्न, उंची मद्ये, प्रसिद्ध आचार्य-गुरुजींची प्रवचने, वगैरे सर्व अभिरुची महागड्या असतात. नवश्रीमंत जेव्हा खानदानी श्रीमंतांसह वावरतात, तेव्हा या सर्व बाबतीत नवश्रीमंतांची जाण नवखी आणि काहीशी उपरी-खोटी असते. अशा परिस्थितीत अभिजात गोष्टींबद्दल आपल्या उथळ जाणकारीचे "प्रदर्शन" करतात, ते हास्यास्पद असते. याचा असा अर्थ नाही, की जुने श्रीमंत अभिजात कला आणि महागड्या शौकांबद्दल बोलत नाहीत, किंवा गुप्तपणा राखतात. पण जुने श्रीमंत उघडपणे या कलांचा आस्वाद घेतात, किंवा शौक उपभोगतात, तेव्हा त्यांच्या वागण्यात अनोळखीपणाचे प्रदर्शन दिसत नाही.
कदाचित टिंकरबेल यांच्या प्रश्नाचा या विश्लेषणाशी संबंध लावता येईल. अशा प्रकारे दारू पिणारे नवश्रीमंत असतीलच : त्यांना दारूबाबत खरे तर शौक नाही की आवड नाही की जाण नाही की इच्छा नाही. पण तरी आपण जुन्या श्रीमंतांसह वावरतो = स्टेटस, म्हणून आपण दारू प्यालीच पाहिजे असे त्यांना वाटते. असे लोक दारू पिताना अशोभनीय प्रकारे वागतात. त्यामुळे त्यांचे दारू पिणे हास्यास्पद असते. "स्टेटस सिंबल" हा त्यांचा प्राथमिक हेतू असतो, तोसुद्धा फसतो... वगैरे. पण असे सर्व असता "जुने श्रीमंत दारू पितात ते हास्यास्पद आणि स्टेटस सिंबल साठी नव्हे" ही तुलना पार्श्वभूमीत असते.
पण एक लक्षात घेतले पाहिजे : दारू पिण्यासाठी काही खूप श्रीमंती लागत नाही.
आणि दुसरे : टिंकरबेल यांच्या वर्णनात जुन्या-वि.-नव्या श्रीमंतांच्या स्टेटस-चढाओढीबाबत फारसा उल्लेख नाही.
माझा प्रश्न..
आपले म्हणणे रास्त आणि मान्य आहेच, "आपल्या दारूच्या ग्लास सोबतच्या फोटोचे आपले आंतरिक मत" असे हे विश्लेषण मला वाटले पण माझा प्रश्न हा चर्चा प्रस्तावातील मुद्द्याबाबत होता जे मला अजूनही एकार्थी अनुत्तरीत वाटते, ते कसे हे सांगतो -
आपल्या जवळच्या व्यक्तींना त्रास होऊ नये म्हणून त्यांच्यादृष्टीने निषिद्ध असलेल्या गोष्टींची वाच्यता त्यांच्यासमोर होऊ नये हि काळजी घेणे मान्य आहे, पण चर्चा प्रस्तावातील मुद्दे त्या अनुषंगाने आहेत असे वाटत नाही त्यामध्ये दारू पिणे हि गोष्टच मुळात वाईट आहे तर तिची जाहीर वाच्यता लोक का करतात असा प्रश्न आहे. काही अपवाद* सोडल्यास त्या फोटोंमध्ये काही गैर आहे असे त्यांच्या फोटोतील भावांवरून वाटत नाही, ती वाच्यता नसून एक क्षणाची स्मृती आहे एवढेच प्रतीत होते.
आपला प्रतिसाद आपले आंतरिक मत आहे पण, हि जाहीर वाच्यता निषिद्ध गोष्टीची आहे आणि ती गोष्ट (दारू पिणे) निषिद्ध आहे हे मानल्यास माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल, पण ते निषिद्ध नाही असे म्हणून परत जाहीर वाच्यता कशी हा प्रश्न चुकीचा वाटतो.
*विनोदी पद्धतीने काढलेले फोटो
सांस्कृतिक असावे - उदाहरणार्थ धूम्रपान
मुळात वाईट आहे की नाही याबद्दल दुमत आहे. लहान मुले, गरोदर स्त्रिया, वाहनचालक, वगैरेंच्या साठी दारू आरोग्यास हानिकारक आहे, हे मान्य. पण त्याचा अर्थ "मुळातच वाईट" असा होत नाही. लहान मुलांसाठी प्रियकर-प्रेयसींचे वर्तन ठीक नाही, गरोदर स्त्रियांना कित्येक पथ्ये असतात, आणि वाहनचालकांनी भ्रमणध्वनी वापरणे घातक असते. पण त्या सर्व कृती "मुळात" वाईट मानल्या जात नाहीत.
परंतु चर्चाप्रस्तावक त्या गोष्टी "मुळात वाईट" मानतात (तसेच माझी आजीही "मुळात वाईट" मानते), हे मी समजू शकतो. म्हणूनच मी वर विश्लेषण सांगितले आहे, की बहुधा त्या "फोटो दाखवणारासुद्धा मुळात वाईट मानतो" असे गृहीत धरत असाव्यात.
- - -
आता गंमत म्हणून उलट परिस्थिती घेऊया. धूम्रपान जवळजवळ नेहमीच शरिराला हानिकारक कृती आहे असे मी खुद्द मानतो (थोडक्यात "मुळात वाईट" मानतो). आणि याबाबत असंख्य घोषणा, रेडियो-टीव्ही-शालेय-अभ्यासक्रम यांतून लोकशिक्षण झालेले आहे. त्यामुळे समाजधुरिण धूम्रपानाला "मुळात वाईट" मानतात याचा बोलबाला रोजव्यवहारात आहे.
तरी आजकालसुद्धा उघडपणे धूम्रपान करणारे कित्येक लोक आपल्याला दिसतात. मात्र यांच्याबाबत माझे साधारणपण अशापैकी विचारचक्र येते - (अ) त्यांना सवय असेल, (आ) त्यांना हानी अजून पटली नसेल, (इ) त्यांना मिळणारे सुख हानीपेक्षा अधिक भावते, इत्यादि.
मात्र ते लोक "आपण धूम्रपान करतो याची जाहिरात ते लोक करत आहेत" असा विचार आजवर मनात आलेला नाही. तुमच्या मनात येतो काय? आणि जर धूम्रपानाबद्दल "जाहिरात" हा विचार येत नसेल, तर वरील तर्ककोडे :
हे काही ठीक नाही.
काही कॉलेजकुमार-कुमारी खोकला-जळजळ-नावड-असताना धूम्रपान करतात त्याबद्दल हेतूंची कारणमीमांसा करावीशी वाटते, हे खरे आहे. परंतु येथे त्यांना नावड आहे, तरी पण ते धूम्रपान करत आहेत, यातल्या विसंगतीची व्यवस्था लावायचे कुतूहल आपल्याला असते. मग "पियर प्रेशर", "सिनेतारकांसारखी ऐट" वगैरे हेतू - शारिरिक नकोसेपणावर मात करणारे सामाजिक-मानसिक हेतू = "जाहिरात" - आपण शोधून काढतो.
(मात्र स्पर्धा-परीक्षांसाठी शारिरिक त्रास होईस्तोवर अभ्यास करणे, सिनेतारकांसारख्या फॅशन आपल्या अंगाला मानवल्या नाही तरी करणे, वगैरे कृतीसुद्धा "पियर प्रेशर" किंवा "ऐट" या हेतूंमध्ये येतात, त्या "मुळात वाईट" नसतात. पण त्रास-तरीपण-कृती ही विसंगती असल्यामुळे आपण मानसिक-सामाजिक हेतू शोधतो... विषय भरकटू नये म्हणून इत्यलम्.)
मान्य
>> पण त्रास-तरीपण-कृती ही विसंगती असल्यामुळे आपण मानसिक-सामाजिक हेतू शोधतो.
मान्य, फक्त अश्या विसंगतीचा जरा अतिरेक असल्यावर जे कुतूहल असते ते इथे जाणवले. चर्चाप्रस्तावक देखील ह्याच कुतूहलाने प्रश्न विचारात आहेत हे लक्षात येते. फक्त ते कुतुहूल तुमच्या आजीला असणे आणि चर्चाप्रस्तावकाला असणे ह्यात फरक आहे (मला वाटला) म्हणून मला उलट कुतूहल वाटले. :)
शंका का बरे वाटली?
हा प्रश्न पडावा याचे नवल वाटले. धनंजय यांनी सविस्तर उत्तर दिले आहेच पण लोकांना जेवण करण्यास किंवा पेप्सी पिण्यास परवानगी लागत नाही. तशी काही माणसे मुलांनी पेप्सी पिऊ नये म्हणून आग्रह धरतील. ते मुलांनी चॉकलेट खाऊ नये म्हणूनही धरतील पण जवळपास सर्व माणसे मुलांनी दारू पिऊ नये म्हणून सांगतील. गुजराथेत किंवा गल्फमधील देशांत दारूबंदी आहे. दारूसाठी ड्रायडे वगैरे पाळले जातात. अमेरिकेतही रविवारी दारूची विक्री बंद असते किंवा दारू विकत घेताना आपले ओळखपत्र दाखवावे लागते. अमेरिकेतील शाळांमध्ये दारूचे दुष्परिणाम वगैरेंवर खास प्रशिक्षण दिले जाते. दारूपासून सुटका करून देण्यासाठी रिहॅब्स असतात वगैरे वगैरे.
यावरून दारू, पेप्सी आणि जेवण यांना एकाच पारड्यात तोलले जात नाही हे कळते आणि हे कोणाही सर्वसामान्य माणसाला कळते असे वाटते तेव्हा आजूनकोणमी यांना ही शंका का यावी असा प्रश्न पडला.
??
चर्चा प्रस्तावकाचा मुद्दा अमुक एका वयाला अनुसरून नसून एकूणच असे फोटो काढनारयानविषयी आहे. लहान मुलांबाबत दारू पिणे हे निषिद्ध आहे हे जसे तुम्ही मानता म्हणून अश्या फोटोंची जाहीर वाच्यता हि देखील चुकीची मानली जाऊ शकते तसेच मोठ्यांबाबत देखील दारू पिणे निषिद्ध आहे असे मान्य केल्यास जाहीर वाच्यता कशाला हा प्रश्न योग्य वाटेल.पण दारू पिणे निषिद्ध नाही त्याची वाच्यता निषिद्ध हे पटत नाही.
धनंजय ह्यांनी जवळच्या माणसाला न दुखावण्याचे आपले कारण सांगितले जे पटते, पण तसा प्रकार चर्चाप्रस्तावकाच्या मुद्द्यांमध्ये आढळत नाही म्हणून मी शंका विचारली.
विपर्यास
नाही मीच मानते असे नाही. माझ्यामते जवळपास सर्वच असे मानतात. तुम्ही मानत नसाल तर मला तुमच्या हेतूबद्दल शंका वाटेल.
जसा अधोरेखित वाक्यांत विपर्यास आहे तसाच मला तुमच्या प्रश्नात दिसला म्हणून मी तुम्हाला प्रतिप्रश्न केला होता. निषिद्ध हा शब्द टोकाचा आहे. चर्चाप्रस्ताविकेने निषिद्ध हा शब्द वापरलेला नाही किंवा तसे त्यांना म्हणायचेही नसावे (संदर्भः त्या स्वतः वाइन घेतात) माझ्याही प्रतिसादात मुले, राज्ये, देश वगैरेंचे संदर्भ आहेत.
यावरून दारू पिणे हे आक्षेपार्ह कृत्य असूनही प्रतिष्ठेचे का मानले जाते असे त्यांना विचारावेसे वाटले असावे अशी माझी समजूत झाली पण आपल्या पेप्सी, जेवण आणि दारू या प्रश्नातून आपण विपर्यास करता आहात अशीही माझी समजूत झाली. असो. चूक भूल द्या घ्या.
बर
>>नाही मीच मानते असे नाही. माझ्यामते जवळपास सर्वच असे मानतात. तुम्ही मानत नसाल तर मला तुमच्या हेतूबद्दल शंका वाटेल.
:) हा हा. मी देखील निषिद्धच मानतो, ते फक्त उपमान होते.
>>यावरून दारू पिणे हे आक्षेपार्ह कृत्य असूनही प्रतिष्ठेचे का मानले जाते असे त्यांना विचारावेसे वाटले असावे अशी माझी समजूत झाली
माझा प्रश्नच मूळ तो होता, कि दारू पिणे आक्षेपार्ह असेल तर त्याचे फोटो देखील आक्षेपार्ह आहेत, मग चर्चाप्रस्तावक स्वतः मद्यपान करतात पण त्याचे फोटो त्यांना आक्षेपार्ह वाटतात हे कसे? जर दारू पिणे आक्षेपार्ह नसेल तर दारूचा ग्लास हा पेप्सीच्या ग्लास सारखाच आहे मग त्याचे फोटो आक्षेपार्ह कसे? म्हणून पेप्सीचे उदाहरण. असो आपले मत मला पटते पण चर्चाप्रस्ताव नाही पटला म्हणून हा प्रतिसाद प्रपंच.
संस्कृती
मलाही कारण सांस्कृतिक वाटते म्हणुन मी विषयात संस्कृती असं लिहिल आहे. बुशप्रमाणे मनमोहनसिंग आपला फोटो सामान्य जनतेसोबत दारू पिताना काढणार नाहीत अस वाटत्.
मी नातेवाइकांना विचारू शकत नाही कारण ते अगदी जवळचे नातेवाइक नाहीत.नात्यात त्रास नको त्यांना आणि मला म्हणुन विचारल नाही त्यापेक्षा परक्यांना विचारावे आणि उपक्रमावर अशा चर्चा करता येतात म्हणुन इथे चर्चा टाकली.
@आजुनकोणमी - फक्त समारंभातच असे फोटो काढलेले मी पाहिलेले नाहीत. नवर्याने घरात बायकोचा आणि बायकोने घरात नवर्याचा, एका मित्राने दुसर्याचा फोटोही काढलेला पाहिला आहे. फोटो काढताना प्रसंग आनंदाचा असावा हे बरोबर आहे.
पेप्सी किंवा जेवण हे अंमली नाही, दारु अंमली आहे तेव्हा तिच्यासोबत फोटो काढण्यात मोठेपणा कसला हा प्रश्न आहे.
इन रोम...
बुशप्रमाणे मनमोहनसिंग आपला फोटो सामान्य जनतेसोबत दारू पिताना काढणार नाहीत अस वाटत्.
सामान्य माणसाबरोबर माहीत नाही पण सामान्य माणसाला दिसणारे छायाचित्र मात्र त्यांचे दिसू शकते... :-)
त्यात मला तरी काही गैर दिसले नाही फक्त हा फोटो आठवला आणि मिळाला म्हणून थोडेसे स्पष्टीकरण केले इतकेच.
पाणी
वरल्या फोटोत मला चक्क पाणी दिसते आहे आता ते देठधारी ग्लासातून प्याले तर चढत असल्यास कल्पना नाही. :-( प्रयोग करून बघेन. ;-)
ओबामा - पाणी, मनमोहनसिंग - रंगीत पाणी
गूगल वर लाईफ मासिकातले चित्र :
बघा...
कौन कितने पानी मे...
पंतप्रधान नक्की काय (ग्लासातून) घेत आहेत हे माहीत नाही आणि तसे त्यांनी अगदी माझी परवानगी विचारली तरी हवे ते घ्या असेच म्हणेन... ;) पण खालील फोटोत मात्र अमेरिकन राष्ट्रपतींच्या हातात पाण्याचा ग्लास नाही हे समजते..
भारतीय राष्ट्रपती मात्र नक्की पाण्याचाच ग्लास घेऊन उभ्या दिसत आहेत... (अती अवांतरः एक अंगरक्षक सोडल्यास, दोघांचे ही फोटो काढला जात आहे त्याकडे लक्षच नाही. :) )
छे! छे!
विकास यांच्या चित्रांवरून मनमोहनसिंगांना पब्लिक प्लेसमध्ये काय उघड करावे आणि काय नाही याची जाणीव आहे असे दिसले. ;-) धनंजय यांच्या चित्रात मनमोहनसिंग खात्रीने ऍपल ज्यूस पित आहेत. ;-) ह. घ्या.
दुसर्या चित्रात ओबामा वी-एट पित असावेत. कोण म्हणाले ब्लडी मेरी?
ज्याप्रकारे दोन्ही फोटोंत मनमोहनसिंगांनी ग्लास पकडला आहे ती पकड लक्षात ठेवून वापरात आणण्याजोगी आहे. ;-) ती पकड लक्षात घेता पहिल्या चित्रात नक्कीच ऍपल ज्यूस. तिसर्या फोटोत ओबामाने ती स्वीकारलेली दिसते.
अवांतरः
म्हणजे हळूच दोघांचा तोल ढळलेला आहे असे सूचक वाक्य तर नाही हे? ;-) तरी बरं बाईंचे ओठ चीअर्स असे म्हणण्याच्या आविर्भावात आहेत असे नाही म्हटले.
सर्वांनी ह. घेणे.
उत्तर
धन्यवाद, माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले, ती गोष्ट निषिद्ध आहे हे तुम्ही मान्य करत आहात असे दिसते. तसे असल्यास तिची जाहीर वाच्यता चुकीची आहे हे मी मान्य करतो.
बाकी घरातले फोटो टाकणारे महाभाग विनोदीच असतात, त्यांच्याबाबत काही तर्क लावणे चुकीचेच आहे.
सिगरेट...
खालील बहुतांशी प्रतिसाद हा केवळ भारतीयांच्यापुरता मर्यादीत आहे कारण प्रत्येक देशाचे म्हणून एक कल्चर असते त्यामुळे उत्तर थोडेफार बदलू शकेल...
दारु प्याली किंवा नाही प्याली हा चर्चेचा विषय नाही पण त्याची जाहीरात कराविशी लोकांना का वाटते? त्यातून त्यांना काय मिळते? काय दाखवून द्यायचे असते?
मला वाटते, गेल्या पिढीपर्यंत ज्या एका गोष्टीस प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बंधने होती अशा गोष्टी आता, "काटोंसे खिच के ये आचल, तोड के बंधन बांधे पायल" अशा पद्धतीने एकीकडे मोकळेपणा आला आहे. परीणामी स्वतःच्या "आज फिर जिने की तमन्ना है" हे कुठेतरी टिपले जाते आणि कुठेतरी दाखवावेसे वाटते. एकदा का ही सामाजीक भूक भागली की ते देखील थांबेल, अजून एक-दोन पिढ्यांमधे आणि नवीन काहीतरी येईल...यात ते चांगले-वाईटचा संबंध नाही, केवळ माझे विश्लेषण इतकेच..
दारु पिणे हे स्टेटस सिम्बॉल का मानले जाते?
कुठल्या कंपूत आहात त्यावर स्टेटस् सिंबॉल का अजून काही ते ठरू शकते. केवळ अल्कोहोलच्याच बाबतीत नाही तर खाणेपिणेओढणे सगळ्यातच.
या संदर्भात मला आठवते आहे की भारतात मी जेंव्हा जॉब करत होतो तेंव्हा अभियंता म्हणून वरपासून ते तळागाळापर्यंत अनेकांशी संबंध येत होता. माझ्या इथल्या एका अनुभवी सहकार्याने मला सांगितले की कामे करून घेण्यास मैत्री लागते. आणि जी मैत्री ही चार वेळा भेटून होत नाही ती एक सिगरेट शेअर करून सहज होते. अर्थात ही देखील एक रुढीच झाली होती. मला सिगरेट न ओढता देखील मित्र करता आले आणि कामे करून घेता आली. अर्थात मी ओढणार्यांना कधी शिकवायला गेलो नाही, फक्त "नो थँक्स" इतके पुरायचे... सुरवातीस आजूबाजूच्या ओढणार्यांना वेगळा (यडा) वाटलो पण नंतर त्यांना सवय झाली आणि कालांतराने त्यातील काहीजण म्हणू लागले की बरे करत आहेस, आम्हाला आता सोडता येत नाही.... असो. सांगण्याचा मुद्दा एकच यात स्टेटस सिंबॉल पेक्षा आपण करतो कुठेतरी कंपूबाजी असते, विशेष करून अशा गोष्टींमधे ज्यांचा अतिरेक हा हानीकारक असतो, तरी देखील केला जातो आणि म्हणून नकळत इतरांकडून पाठींबा हवा असतो. थोडक्यात ज्यांना स्टेटस सिंबॉल वाटतो त्यांना कुठेतरी कसला तरी न्यून/अहं गंड असतो असे वाटते.
ज्या व्यक्ती मद्यधुंद पार्ट्यांचे फोटो लावतात त्यांच्या हातून असे सहजच होत असते असे तुम्हाला वाटते का?
प्रत्येक वेळेस कोणी मुद्दामून शो ऑफ करत नसावेत पण अनेकदा शो ऑफ असतो हे देखील वास्तव आहे. जाहीर संकेतस्थळांवर फोटो जर स्वतः लावले तर कदाचीत शो ऑफ असेलही. पण जर दुसर्या कोणी काढलेल्या फोटोत आपण दिसलो तर गोष्ट वेगळी आहे... तात्पर्य, केवळ एका फोटोवरून एखाद्या व्यक्तीचे विश्लेषण करणार नाही...
तुम्हाला अशाप्रकारे दारु पिताना आपले फोटो जाहीर करणे आवडते/पटते का? आवडत/पटत असल्यास का आवडते/पटते आणि आवडत/पटत नसल्यास का आवडत/पटत नाही?
माझे फोटो ठेवत नाही आणि इतरांचे बघायला मुद्दामून जात नाही... बघितले तरी जो पर्यंत सवंगपणा आढळत नाही तो पर्यंत काही विशेष वाटत नाही. :-)