'पानिपत' पुस्तकाच्या आठवणी आणि श्री. विश्वास पाटील यांची मुलाखत

'रामायण'कार वाल्मिकी ऋषी आणि 'महाभारत'कार व्यास मुनी यांचे भारताच्या इतिहासामध्ये जे स्थान आहे तेच स्थान महाराष्ट्रीय इतिहासाच्या संदर्भात श्री. विश्वास पाटील यांना दिले पाहिजे. असे मराठी घर नसेल, असा मराठी उंबरा नसेल, असे मराठी मन नसेल की जे पानिपतच्या पराभवाच्या आठवणीने कातर होणार नाही. अर्थातच या महायुद्धाच्या इतिहासाला ही जी उंची लाभली आहे ती प्राप्त करुन देण्याच्या श्रेयाचे हक्कदार नि:संशयपणे श्री. पाटील हेच आहेत. मनामध्ये भावनांचा कल्लोळ माजवून देणारे त्यांचे लिखाण कुठेही वास्तवातले तपशील सोडत नाही आणि अतिरंजित सुद्धा वाटत नाही हे विशेष. पानिपतच्या युद्धाचा इतिहास हा एक पदरी इतिहास नाही. इथे असंख्य नायक आहेत, महायोद्धे आहेत्, खलनायक आहेत आणि आणि धन्याला रणांगणामध्ये एकटं सोडून पळ काढणारे रणछोडदास सुद्धा आहेत. मल्हारराव होळकरांचे स्वजनद्रोही राजकारण आहे आणि खाल्ल्या मीठाला जागण्यासाठी सर्वस्व पणाला लावणारा इब्राहिमखान गारदीसुद्धा आहे. भाउसाहेब, विश्वासराव, जनकोजी शिंदे, समशेर बहाद्दर्, पराक्रमी अहमदशहा अब्दाली, शहावलि खान, बरकुरदारखान, सुजा उद्दौला, गाजुद्दीन, सूरजमल जाट आणि शिवाय तो इतिहासातील कुप्रसिद्ध नजीबखान. नावं लिहावीत तितकी थोडी आहेत. पण उल्लेख करण्यासारखी बाब ही की ही सगळी पात्रे एकापाठोपाठ घडत जाणार्‍या घटनांच्या संदर्भात नकळतपणे प्रवेश करत जातात. त्यामुळे कुठेही पुस्तकाचा प्रवाहीपणा खंडित झाल्यासारखा वाटत नाही. दत्ताजी शिंद्यांनी लढलेल्या बुराडी घाटाच्या लढाईचे संदर्भ घेत घेत कादंबरीचे पहिले प्रकरण संपते. आणि हळूहळू पुस्तक मनावर पकड घेउ लागते. त्यानंतर दिल्लीवर केलेला हल्ला, कुंजपुर्‍याचा विजय आणि यात्रेकरुंमुळे होणारी भाउसाहेबांची कुचंबणा, मराठी सैन्याची उपासमार अशा असंख्य घटनांचा वेध घेत घेत लेखक वाचकांना अशा जागी आणून सोडतो की वाचकांना आता आपण स्वतः प्रत्यक्ष रणांगणावरती जाउन युद्ध पाहणार की काय असं वाटू लागतं. 'संगर तांडव' हे प्रकरण म्हणजे तर अक्षरशः मास्टरपीस आहे. भाउसाहेब युद्धाच्या आधीच्या दिवशी संपूर्ण फौजेसमोर अत्यंत हॄदयस्पर्शी भाषण करतात. या भाषणामध्ये जवळ जवळ एक पान भरुन नुसती मराठी आडनावेच दिलेली आहेत. अख्खा महाराष्ट्र जात्-पात विसरुन एकदिलाने अखिल हिंदुस्थानच्या पातशाहीसाठी लढला हे ठसवण्यासाठी लेखकाने कदाचित हे भाषण दिले असावे. अर्थातच ते भाषण केल्याचे ऐतिहासिक संदर्भ आणि पुरावेसुद्धा असू शकतील कारण बाजीराव पेशवे, अ‍ॅलेक्झांडर हे सुद्धा लढाईआधी त्यांच्या सैनिकांसमोर अत्यंत स्फूर्तिदायक भाषणे करायचे असे कुठेसे वाचल्याचे आठवते ( राज ठाकरे सुद्धा राडा करण्याआधी एक सणसणीत भाषण करतातच ना. तसेच काहीसे.) पण पन्नास हजार सैनिकांच्या समोर मायक्रोफोन शिवाय भाषण कसे केले असेल हा प्रश्न मनात येउन जातोच. ते काय असेल ते असो पण ते प्रकरण वाचून संपल्यावर आपण ट्रॉय सारखा एखादा महाभव्य युद्धपट पाहिला आहे असे वाटल्यावाचून राहात नाही. ते वाचून संपल्यानंतर्सुद्धा त्यातल्या असंख्य घटना मनामध्ये घर करुन राहतात. भाउसाहेबांचा भीमपराक्रम आणि मॄत्यू, विश्वासरावांचा मॄत्यू, सिंहासारखा चवताळलेला इब्राहिमखान आणि 'गोल मोडू नका रे, घात होईल' असे आतडी पिळवटून विनवणारा इब्राहिमखानाचा भाऊ, जीवात जीव असेपर्यंत लढून पावन झालेले गारदी, गोलाची शिस्त मोडणारे आणि नंतर पळ काढणारे दमाजीराव, मल्हारराव आणि विंचूरकर, आता आपले काही खरे नाही असे वाटून जीवाचा थरकाप उडालेला अब्दाली आणि कळीकाळाशी झुंज घेण्याच्या ईर्ष्येने लढलेल्या एकंदर मराठी फौजा वारंवार डोळ्यांसमोर येत राहतात. शेवटचे 'पांढरे आभाळ' हे प्रकरण मन उदास करुन टाकते. आणि त्या विषणावस्थेतच पुस्तक संपते. फाईव्ह आऊट ऑफ फाईव्ह रेटिंग द्यावे असे हे पुस्तक आहे याबद्दल मला तरी कोणातीही शंका वाटत नाही.

आजच या पुस्तकासंदर्भातल्या आठवणी जाग्या होण्याचे काहीच कारण नव्हते. काल अचानकपणे आयबीएन लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी विश्वास पाटील यांची घेतलेली मुलाखत पाहण्याचा योग आला. त्यानिमित्ताने कोणे एके काळी वाचलेल्या या पुस्तकाबद्दल काही लिहावेसे वाटले इतकेच. श्री. वागळे एकामागोमाग विश्वास पाटील यांना त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांसंदर्भात बोलते करत होते. सुरुवात अर्थातच पानिपत पासून झाली. आणि मग एकामागोमाग झाडाझडती, पांगिरा, महानायक, संभाजी आणि नॉट गॉन विथ द विन्ड बरोबर ही यादी संपली आणि मुलाखतसुद्धा. झाडाझडती पुस्तक खूप वर्षांपूर्वी वाचल्याचे स्मरते. विश्वास पाटील यांचे पुस्तक म्हणून हौसेनं वाचायला घेतलं खरं पण मला ते वाचताना मजबूत कंटाळा आला होता. अर्ध्याहून अधिक पुस्तक वाचेपर्यंत पेशन्स टिकला मग त्यानंतर भुक्कड पुस्तक आहे असं ठरवून अर्ध्यातच सोडून दिल्याचे आठवते. त्यांची इतर पुस्तके वाचलेली नाहीत पण त्यांच्या संभाजी या कादंबरीतल्या संभाजी राजांची क्रूरपणे कत्तल केलेल्या भागाचे काळीज चिरुन टाकणारे वर्णन ढकलपत्रातून आले होते. ते वाचल्याचे आठवते. श्री. पाटील हे सिद्धहस्त लेखक तर आहेतच पण याशिवाय त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये छायाचित्रण करताना श्री. बिनोद प्रधान यांना सहाय्य केल्याची नविनच माहिती या मुलाखतीतून ऐकायला मिळाली. त्यांच्या प्रशासकीय सेवेसंदर्भात एकही प्रश्न विचारला गेला नाही याचे मात्र आश्चर्य वाटले. कदाचित वेळ कमी पडला असेल. पण इतक्या मोठ्या लेखकाच्या मुलाखतीकरता केवळ एकच एपिसोड आणि महागुरू पिळगावकरच्या मुलाखतीकरता दोन एपिसोड हा हिशोब मला तरी बरोबर वाटला नाही.

Comments

झाडाझडती

झाडाझडतीसुद्धा आवडले होते मला.

पण इतक्या मोठ्या लेखकाच्या मुलाखतीकरता केवळ एकच एपिसोड आणि महागुरू पिळगावकरच्या मुलाखतीकरता दोन एपिसोड हा हिशोब मला तरी बरोबर वाटला नाही.

हे काही मुद्दाम केलेलं नसावं. कोणाकडे फावला वेळ किती आहे त्यावर आहे. ;)

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

पानिपत

'पानिपत' ही माझीसुद्धा आवडती कादंबरी आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, 'पानिपत' ही शोकांतिका किंवा पराभवाची गाथा असल्याचे भान लेखकाने कुठेही सुटू दिलेले नाही. कुठेही त्या पराभवाचे अवास्तव गौरवीकरण केलेले नाही. (जे सध्या प्रचलित होते आहे.)

विश्वास पाटलांची पानिपत, झाडाझडती, पांगिरा, चंद्रमुखी, महानायक, संभाजी ही सगळीच पुस्तके वाचली आहेत. ते नव्या पिढीतले सर्वोत्तम मराठी कादंबरीकार आहेत, असे माझे मत आहे.

मला पण

पानिपत ही माझी पण आवडती कादंबरी आहे.

छान परिक्षण.

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

 
^ वर