मराठी माणसाचे स्वभाववैशिष्ट्य अथवा स्वभाववैगुण्य?
नमस्कार मंडळी. दोन दिवसांपूर्वी वर्तमानपत्रात एक छोटीशी बातमी आली होती. तिचा सारांश असा की हिंदुस्तान कंस्ट्रक्शन् कंपनी (तीच ती, लवासा फेम) गुजरात राज्यात लवासाच्या धर्तीवर सुनियोजित शहर वसवण्याच्या कामी गुंतवणूक करणार आहे. गुजरात राज्य सरकारने सर्व सुविधा तात्काळ एका खिडकीवर उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली आहे.एकूण चाळीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होईल असा अंदाज आहे.
लवासाबाबतचे आपल्या महाराष्ट्रातले प्रखर प्रतिकूल जनमत पहाता मनात प्रश्न उद्भवला की देशाच्या एका भागात टोकाचा विरोध आणि लगतच्याच प्रदेशात पायघड्या घालून स्वागत असे चित्र का असावे?सलग भूभागातल्या दोन लोकसमूहांची मानसिकता इतकी भिन्न का असावी?
ह्या भविष्यातल्या शहराची उभारणी भांडवलबहुल,भांडवलखाऊ असणारच; अगदी लवासासारखीच.
या शहरामुळे पर्यावरणाचा र्हास होणारच,अगदी लवासा एवढा नसला तरी पुष्कळच.
इथे निवासी(बहुधा अनिवासीही) लोकांचे लोंढे वाढणारच.
इथे पायाभूत सुविधांवरचा ताण वाढणारच. लवासासारखाच.
इथे सुपीक शेतजमीन नागरीकरणामुळे नष्ट होणारच.
मग इथे वेगळे असे काय आहे की ह्या प्रकल्पाचे आनंदाने स्वागत व्हावे?
माझ्या अल्पमतीप्रमाणे काही उत्तरे सापडली ती अशी:
गुजराती लोक पैश्याला मित्र मानतात तर आपण महाराष्ट्रीय त्याला शत्रू मानतो.
पैसेवाल्यांप्रती आपली भावना 'धनदांडगे' अशी असते. ह्या शब्दामधून जवळ पैसे असणार्यांविषयी उघड मत्सर आणि द्वेषभावना दिसते.'आम्ही पैश्यासाठी काही करीत नाही ' हे उच्चरवात सांगण्यात आम्हाला प्रचंड अभिमान वाटतो.जिथे जिथे पैश्याची निर्मिती/देवाणघेवाण/विनिमय/चलनवलन शक्य असेल तिथे तिथे गुजराती लोक ती शक्यता चाचपून बघून विकसित करतात तर आपण असे उगमस्रोत सील करून टाकतो. गुजराती लोक साहसप्रिय आहेत.गतिप्रिय आहेत.स्थितिप्रियता त्यांना मानवत नाही.ते स्थलांतरास तयार-नव्हे- उत्सुक असतात.देशांतरात गुजराती लोक आघाडीवर असतात. गाव एके गाव किंवा शेती एके शेती असे धरून बसत नाहीत. व्यवसाय बदलही सहजतेने करतात.अत्यंत मेहनती आणि मधुभाषी असतात.
आता काही प्रत्यक्षातली उदाहरणे,तथ्ये,मिथ्ये पाहू.
गुजरातमध्ये जामनगर ओखा कांडला परिसरात एस्सार्,रिलायन्स् इ. कंपन्यांनी मोठमोठे भूपट्टे व्यापले आहेत.खनिजतेल शुद्धीकरण हा इथला प्रमुख उद्योग आणि त्यावर आधारित इतर रासायनिक उद्योग हे सर्व अतिशय प्रदूषणकारी आहेत. पण ह्या प्रदूषणावर काहीतरी उत्तर शोधले गेले असावे, कारण स्थानिकांच्या मनात त्याबाबत आकस नाही.उलट हा पट्टा सधन स्वच्छ,सुनियोजित वाटतो.
कुठल्याही गुजराती माणसाला एखाद्या स्थळाचा पत्ता किंवा एखाद्या वस्तूची उपलब्धता याविषयी विचारले तर तो उत्साहाने आणि नम्रतेने अचूक माहिती पुरवतो.त्याला ती बहुधा ठाऊकच असते. नसेल तर आजूबाजूला शोध घेऊन तो समोरच्याची गरज पुरी करतो/समोरच्याला मदत करतो. बदल्यात पैशाची अपेक्षा नसते. या बाबतीत आपल्याकडची मग्रूरी , उद्धटता आणि अज्ञान नजरेला खुपते.
आणखी एक उदाहरण एका बातमीचेच. नुकतेच झायडस् कॅडिला कंपनीचे मालक शेठ प्राणलाल भोगीलाल वारले. ते जुन्या गाड्यांचे, वस्तूंचे संग्राहक आणि शौकीन होते.भारतात अनेक ठिकाणी त्यांची अनेक प्रासादतुल्य घरे असून ती उत्तमोत्तम आणि अभिरुचीपूर्ण वस्तूनी सजवलेली आहेत. तेही एक असो.पण अहमदाबाद सारख्या गर्दीने गजबजलेल्या शहरानजिक त्यांचे २२०० एकर इतक्या प्रचंड जागेवर बांधलेले निवासस्थान/वस्तूसंग्रहालय/फार्महाऊस् आहे; आणि ते कुणाच्याही नजरेत येत नाही; उलट तो एक अभिमानाचा विषय आहे! आपल्या मुंबई-पुणे परिसरात कोणी 'धनदांडगा' असे काही करू पाहील तर केवढा हलकल्लोळ होईल! (माजी संस्थानिकांकडे अशा मोठमोठ्या जमिनी आहेत पण त्या वंशपरंपरागत आणि महानगरांपासून दूर आहेत.)
असे कितीतरी लिहिता येईल.विद्येच्या प्रांतातही अशी अनेक आश्चर्ये आहेत.कितीतरी नामवंत संशोधन संस्था, व्यवस्थापन संस्था गुजरातेत आहेत आणि उत्तमरीत्या चालू आहेत.गुजरात विद्यापीठातले सुनियोजित,शिस्तीचे, सौजन्याचे आणि अगत्याचे वातावरण पाहिले तर मुंबई विद्यापीठ आठवून मान शरमेने खाली जाते.गुजरातेतला पुस्तक प्रकाशनव्यवहार सुद्धा थक्क करणारा आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक दिनकर जोषी यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेल्या संस्थेचे अंदाजपत्रक कित्येक कोटी रुपयांचे आहे.
ही सगळी गुजराती माणसाची स्वभाववैशिष्ट्ये अथवा त्यामुळे/त्यानिशी साधलेली कर्तबगारी लिहिली. आता यापुढे मराठी माणसाची स्वभाववैशिष्ट्ये अथवा कर्तबगारी वेगळी लिहिण्याची आवश्यकता आहे का?
कशामुळे आपण असे बनलो?यामागे काही भौगोलिक,सामाजिक,सांस्कृतिक ऐतिहासिक कारणमीमांसा असू शकेल का?की पूर्वीपासूनच आपण 'दिण्हले-गहितले' अशी मारामारी करणारे लोक आहोत?
Comments
घोडा अडीच घरे का चालतो?
पु.ल.देशपांडे यांच्या ' तुझे आहे तुजपाशी' या नाटकातल्या एका प्रसिद्ध संवादामधे तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रत्येक समाज त्याचा इतिहास, भूगोल व सामाजिक परिस्थिती या नुसार बदलत जातो व त्याप्रमाणे त्या समाजात सामाजिक पद्धती रूढ होत जातात.
गुजरात मधे अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत या बद्दल वादच नाही. परंतु याचा अर्थ मराठी माणूस कुठेतरी कमी पडतो आहे असा आपण का घेता हे समजू शकले नाही. घोडा अडीच घरे चालतो म्हणून उंटाला तसे चालता येत नाही. तो त्याच्या पद्धतीनेच तिरपा जाणार. युरोपातले उदाहरण द्यायचे तर अत्यंत शिस्तप्रिय व कष्टाळू जर्मन लोकांचे शेजारी असलेल्या फ्रेंच लोकांचा स्वभाव कितीतरी निराळा आहे असे दिसते. गुजरात मधे औद्योगिक कर्तबगारी आहे यात शंकाच नाही. त्यांना कमी लेखण्याचा मी प्रत्यत्न करूही इच्छित नाही. पण अंकलेश्वर भागात जे प्रदुषण आहे हे त्यांना चालू शकते. महाराष्ट्रात ते चालेल असे नाही. मराठी समाजात काहीतरी कमीपणा आहे हे मला पटत नाही. प्रत्येक जण त्याची चाल चालत असतो हेच खरे.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
तुलना
मान्य सुद्धा आहे आणि अमान्य सुद्धा आहे.
यशाची तुलना अनेकदा सापेक्ष असते. या चर्चेला सुद्धा सापेक्ष तौलनिक मुद्दे अपेक्षीत आहे. किंबहुना असे म्हणता येईल की मराठी माणून बदलतो आहे. त्याला आता दुसर्याचे यश खुणावते आहे. हि चांगलीच गोष्ट आहे. या मुद्यांसोबत महत्वाचा मुद्दा लोकनेता हा सुद्धा आहे जो समाजाला स्वप्ने दाखवतो आणि ती स्वप्ने खरी करण्यासाठी लागणारी इच्छाशक्ती देतो आणि मार्गदर्शक बनतो. गुजरात आणि बिहारला असे नेते लाभले आहेत निद्दान गेल्या दशकभरात तरी. कदाचित महाराष्ट्रात नेते जरा जास्तच झाले आहे :)
मराठी माणूस
याच्याशी सहमत आहेच. बर्याचदा कठिण हवामान, राजकीय परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती माणसाला चिवट, कोडगे आणि धीरोदत्त बनवते. कदाचित, राही यांना असे विचारायचे असेल की मराठी माणसाच्या सामाजिक परिस्थितीत असे बदल घडले (जसे गिरण्या बंद पडणे) पण त्याच्या परिस्थितीत सकारात्मक बदल घडला नाही, तेव्हा मराठी माणसाचे कुठे चुकते आहे का? (चू. भू. द्या घ्या)
मराठी माणूस कुठेतरी कमी पडला नसता तर मुंबईतली घरे सोडून उपनगरांत किंवा मुंबईबाहेर पळाला नसता. मुंबईतले रिक्शावाले, हातगाडीवाले आणि इतर लहान उद्योग करणार्या व्यक्ती अमराठी दिसल्या नसत्या.
प्लेगसदृश रोगाच्या उद्रेकानंतर सूरतची सूरत गुजराथ्यांनी बदलून टाकली असे वाचले होते. (आता ही सूरत कशी आहे ते माहित नाही.) २००५च्या पावसानंतर मुंबईत किती सकारात्मक बदल झाले?
बुद्धीबळातले घोडा आणि उंट बुद्धिबळाच्या नियमांत बद्ध आहेत. मराठी माणूस बुद्धी आणि बळाच्या कोणत्या नियमांचा बंदी आहे हेच बहुधा जाणून घ्यायचे असेल.
थोर संत परंपरा
मारामारी म्हणजे "शाब्दीक" मारामारी. आपण लोकं मूळातच पैशापेक्षा बौद्धीक संपदेस जास्त महत्व देतो हे नाकारण्यात अर्थ नाही. त्यातूनच या "शाब्दीक" मारामार्या उद्भवतात. कारण जिथेतिथे बौद्धीक वर्चस्व सिद्ध करण्याची दांडगी हौस.
परंतु एक मात्र नक्की "पैसा हे दैवत मानणार्या" लोकांमध्ये रहावे लागल्यास आपली घुसमट होइल. महाराष्ट्राला थोर संत परंपरा आहे त्याचादेखील परीणाम नक्कीच आपल्या जडणघडणीवर झाला आहे असे मला वाटते.
संत परंपरा
भारतातल्या बहुतेक राज्यांना संत परंपरा आहे. जुन्या मोठ्या राज्यांच्या चिरफळ्या होऊन नव्याने निर्माण झालेल्या काही राज्यांमधे कोणी संत जन्माला आले नसतील कदाचित,पण ही राज्ये पूर्वी ज्या प्रदेशाचा भाग होती, त्यांच्या संत परंपरेवर नव्यांचा हक्क राहतोच. (अवांतरः तक्षशिलेवर आपला आहे तसाच.) शिवाय संत परंपरा काही उद्धटपणा आणि मग्रूरी शिकवत नाही. मग हे (दुर्)गुण कुठून आले असावेत? अथवा हे दुर्गुण नसावेतच? अथवा ते सर्व भारतीयांचेच व्यवच्छेदक लक्षण आहे? आणि बौद्धिक संपदा पाहिली तर ती दाक्षिणात्य आणि बंगाल्यांत जास्त दिसते...एकेकाळी बिहारी लोक भारतीय प्रशासनसेवेच्या स्पर्धापरीक्षांमधे मोठ्या संख्येने उत्तीर्ण होत असत.आणि राजस्थानातले कोटा हे शहर आय्.आय्. टी. च्या प्रवेशपरीक्षांचे सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण देणारे शहर असा त्याचा लौकिक आहे... आणि अमेरिकेतील संगणक आणि माहितीतंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीयांमधे आंध्रीयांची संख्या जास्त आहे असे ऐकून आहे...(चू.भू.दे.घे.)
मग्रूरी अथवा उद्धटपणा (?)
मला मग्रूरी अथवा उद्धटपणा हे दुर्गुण महाराष्ट्रीअन लोकांचे वाटत नाहीत. तर पैशाला कमी लेखणे आणि उलट बुद्धीस महत्व देणे हे मला आपले वैशिष्ट्य वाटते. बुद्धी म्हटली की मग तिचे बरेवाईट पैलू स्वीकारावे लागतात. अति वाद घालणे हा त्यातलाच एक, जो उद्धटपणाकडे झुकत असेल.
एक प्रकारचा सच्चेपणा असल्यामुळे मनात एक आणि तोंडावर गोड बोलणं आपल्याला रुचत नाही. हा गुणच म्हणायला हवा.
संतांचे बोलायचे तर दक्षीण भारत आणि महाराष्ट्राला उल्लेखनिय संत परंपरा आहे. (चू भू दे घे) दक्षीण भारतीय लोकदेखील पैशाच्या बाबतीत आपल्याइतकेच उदासीन आणि द्न्यानलालसेच्याबाबतीत आपल्यासारखेच कट्टर असतात् असा अनुभव आहे.
स्वभाव..रक्तातले गुण आणि जडणघडण
मराठी माणूस मोजताना प्रामुख्याने मराठा समाज व ब्राह्मण यांचाच विचार केलेला दिसतो.कारण राज्याचे व त्यातील समाजाचे नेतृत्व त्यांच्याकडेच आहे , सुमारे साडेतीनशेवर्षे. मराठ्यांमध्ये लढावूवृत्ती, तर ब्राह्मणांमध्ये बौद्धीक लढाईची वृत्ती दिसून येते.छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये या दोन्हींचा वापर तारतम्याने करण्याचा दुर्मिळ गुण होता, तसेच तो थोरल्या बाजीरावांकडेही होता.त्यामुळेच मुसलमानांविरुद्ध अनेक अवघड लढाया जिंकू शकले.मुसलमान अमदानीत गुजरातमध्ये शिवाजी जन्माला का आला नाही, हा प्रश्न का विचारला जात नाही? गुणांची चर्चा न होता दुर्गुणांचीच चर्चा जास्त होते.
ज्याच्यामध्ये जे गुण नाहीत त्याला ती गोष्ट हट्टाने करायला लावली, तर यशस्वी होण्याची शक्यता कमीच. सैन्यामधे गुजराती व्यापार्यांच्या मुलांची भरती केल्यास काय होईल ? मराठी व्यापार्याचे जसे दिवाळे निघते , तसे देशाचे दिवाळे निघेल. जेणू काम तेणू थाय! क्षत्रिय राज्य मिळवतात, पण व्यापारीच राज्य चालवितात. राजाला कर आणि प्रशासनाला 'मलिदा' पुरवितात.नोकर व सैनिक 'इमानदारच' असायला हवा.व्यापारी 'लाच' देण्यात वाकबगार/चतुर असायलाच हवा. चांगला गुण कुठला आणि दुर्गुण कुठला? संस्कारांमुळे रक्तात भिनलेला गुण कसा जाणार?
तुम्ही सांगा
जितक्या मराठी लोकांशी माझा संपर्क आला आणि मी नीरीक्षण करु शकले त्यावरुन काही निष्कर्ष मी मांडले आहेत. त्यातही जर तुम्हाला जर मराठा आणि ब्राह्मण रंग दिसत असतील तर मग तुम्ही सांगा इतर जातींची काय उल्लेखनिय आणि सातत्याने उठून दिसणारी वैशिष्ट्ये आहेत जी माझ्याकडून टिपायची राहून गेली. बाकी मला कोणतीही सफाई द्यायची गरज वाटत नाही. माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्ती या सर्व जातींच्या होत्या. आमच्या घरामध्ये आम्ही अठरापगड जातीची माणसे एकत्र एका छताखाली रहात आहोत.
असेच नाही
अगदी गुजराथेत नाही पण मुसलमान राज्यकाळात महाराणा प्रतापही होता आणि शिवाजीच्या आधी होता. शेवटी गुजराथेत शिवाजी नसूनही त्यांचा सर्वांचा सुंता झाला नाही ही देखील महत्त्वाची गोष्ट आहे ना कारण राज्य हिंदु राजाचे असो की मुसलमान राजांचे ते पैशांवरच चालते आणि पैशांची आवक करणार्यांना सहजी दुखवून चालत नाही. बंगालमधील मुसलमानी राजवटीला कंटाळलेल्या हिंदु व्यापारी आणि शेट्यांमुळे ब्रिटिशांना भारतात पाय रोवता आले.
पुन्हा अगदी गुजराथी नाही पण त्यांच्यापेक्षाही मवाळ मानल्या गेलेल्या पारशी समाजातील सॅम माणेकशॉ हे भारताचे एक उत्तम सेनानी होते.
ही घ्या आणखी पारशी सेनानींची नावे..
फिल्ड मार्शल सॅम माणेकशाँप्रमाणेच
लेफ्टनंट जनरल अदी मेहेरजी सेठना
एअर मार्शल ऍस्पी इंजिनिअर
ऍडमिरल जाल करसेटजी
लेफ्टनंट कर्नल अर्देशीर तारापोर
लेफ्टनंट जनरल फरिदून बिलिमोरिया
शंका
ते मवाळ 'मानले जातात' हे मान्य.
झर्क्सिस आणि कावस नानावटी हेही पारशीच होते. मुंबईत पारशी लोकांनी अनेक दंगे केलेले आहेत.
मानले जातात
संपूर्ण चर्चा मानले जातात या शब्दांभोवतीच फिरणारी आहे. मराठी माणसे चर्चाप्रस्तावकांना उद्धट वाटतात आणि गुजराथी व्यवसायक वाटतात वगैरे. सर्वचजण अशाप्रकारे इतरांचे लेबलिंग करत असतात. अर्थात, त्यात अपवाद असणे किंवा तथ्य नसणे वगैरे प्रकारही असू शकतातच.
पैसा,स्वभाव आणि संत परंपरा
'आपण' म्हणजे नक्की कोण?
महाराष्ट्रीयन लोक
महाराष्ट्रीयन लोक
लवासा
मुळात महाराष्ट्रातही हेच घडले होते. म्हणजे एक खिडकीने लवासाला मान्यता दिली नाही तर प्रत्यक्ष लवासात जाऊन मान्यता दिली आणि जमीन पण दिली. (निदान असा आरोप आहे.)
महाराष्ट्र सरकार आणि तेथील जनता यांचा या प्रकल्पाला विरोध नसावा.
सध्या जे घडले आहे ते केंद्रिय पर्यावरण मंत्रालयाने केलेल्या कारवाई बद्दल आहे. अशी कारवाई हेच मंत्रालय गुजरात मधे जाऊनही करू शकेल.
बाकी मेधा पाटकर यांनी गुजरात मधे (नर्मदा आंदोलन) यापेक्षा तीव्र आंदोलन केले होते.
प्रमोद
प्रत्येक गाव लवासाइतके सुंदर व्हावे
--जनता यांचा या प्रकल्पाला विरोध नसावा.--
मला तर असे वाटते की, महाराष्ट्रातील प्रत्येक गाव लवासाइतके सुंदर व्हावे. पर्यावरणाच्या हानी-बीनी बाबत कार करायचे त्यासाठी वेगळा आराखडा करुन झाडे-बिडे लावत बसणे जास्त जरुरी- त्याने अनेकांना रोजगार मिळेल.
मनोरंजन
लेख /चर्चाप्रस्ताव वाचून चोख मनोरंजन झाले. कोण म्हणतो उपक्रमावर रंजक लेखनाला मनाई आहे? अ) मराठी माणूस व त्याचा स्वभाव ब) गुजराथी माणूस व त्याचा स्वभाव असे वर्गीकरण करता येते हे कळाल्याने गहिवरलो. आपण मराठी आहोत आणि आता आपण 'अ' गटात आहोत म्हणजे वर्ल्ड कप प्रमाणे आपल्याला सुरवातीला तरी लीग म्याचेस खेळाव्या लागणार हे वाचून थोडे वाईट वाटले. आपला स्वभाव कसा आहे हे जाणून घेण्यासाठी अंतर्मुख होताना आपला स्वभाव असा होण्यामागे गिरण्या बंद पडणे हे कारण तर नाही ना अशी शंका आली. तूर्त तरी मी गरीब लोकांमध्ये राहून आपली घुसमट कमी करण्याचे ठरवले आहे.
शंका: अमेरिकेत लोक पैशाला दैवत मानतात असे ऐकून आहे. मग अमेरिकेतल्या मराठी माणसांची घुसमट होते का?
मला तर असे वाटते की, महाराष्ट्रातील प्रत्येक गाव लवासाइतके सुंदर व्हावे. पर्यावरणाच्या हानी-बीनी बाबत कार करायचे त्यासाठी वेगळा आराखडा करुन झाडे-बिडे लावत बसणे जास्त जरुरी- त्याने अनेकांना रोजगार मिळेल.
सहमत आहे.
सन्जोप राव
सीनेमें जलन आंखोंमे तूफानसा क्यों है
इस शहरमें हर शख्स परेशानसा क्यूं है
शक्य
फरकच नाहीत असे काहींचे मत दिसते. फरक आहेत हे माझे निरीक्षण आहे.
अर्थात हे फरक काळे/पांढरे असे नेमके नसून टक्केवारीत असणे स्वाभाविक आहे (म्हणजे, एखाद्या समाजात एखादा स्वभावविशेष अधिक आढळला तर इतर समाजांतही कमी प्रमाणात तरी आढळतोच, असे). पराचा कावळा करण्यासाठी मुदलात 'शून्य' चालत नाही.
गडकर्यांच्या श्रीमहाराष्ट्रगीतामध्ये जातींची स्वभाववैशिष्ट्ये प्रतिपादिली आहेत, त्यांविषयी उपक्रमींना काय वाटते?
इतर काही असूच शकत नाही त्यामुळे अशी कारणमीमांसाच शोधावी लागेल.
टाइपकास्ट
कुठल्याही गटाला भाषा, संस्कृती, देश, इ. वरून टाइपकास्ट करणे जगभर चालते. हे अर्थातच १००% अचूक नसते पण त्यात कुठेतरी सत्याचा अंश असतो.
आणखी उदाहरणे -
ज्यू लोक बुद्धीमान आणि अतिशय नेहेनती असतात.
एशियातील लोक पाश्चात्य लोकांच्या तुलनेत गणितात हुशार असतात.
पंजाबी भीडभाड न ठेवता इन्फॉर्मल वागणारे.
मारवाडी लोकांचा बिझनेस सेन्स अतिशय चांगला.
इ. इ.
--
"आधी इतरांचा विचार करा.. घर्रर्र..घर्रर्र.." विश्वसुंदरी मिस चिनी यांचे आवाहन
http://rbk137.blogspot.com/
हातच्या कांकणाला आरसा कशाला?
इतिहासातील धुणी वर्तमानाच्या कट्ट्यावर धुणारा समाज शहाणा असतो का?
एक दिवस नमस्कार आणि पाच वर्षे बलात्कार करणार्यांना पुन्हा पुन्हा निवडून देणारा समाज शहाणा असतो का?
ज्यांच्या एकाही नेत्याबद्दल देशात आदर नसतो तो समाज शहाणा असतो का?
उद्योगधंदे काढून स्वयंपूर्ण होण्यापेक्षा नोकरीत हयात घालवणारा समाज शहाणा असतो का?
डोळ्यादेखत आपल्या मातृभाषेला मरु देणारा समाज शहाणा असतो का?
बहुतांशी मराठी तरूण प्रेमात अनाडी असतात म्हणून...!
चर्चा प्रस्ताव छान आहे.
गुजराती लोक पैश्याला मित्र मानतात तर आपण महाराष्ट्रीय त्याला शत्रू मानतो.
हे वाक्य पटले. माझ्या मते माणूस 'प्रेमाला, प्रेमातून येणार्या कामवासनेला' कसा सामोरा जातो, त्यानुसार तो 'पैशाला, पैका कमवण्याच्या मानसिकतेला' आकार देतो. वायसे-वरसा.
बहुतांशी मराठी मनावर कामवासनेवर ताबा ठेवणे, प्रेमात पडून बिघडू नये, अशी व तत्सम उदाहरणे लहानपणापासून-ते प्रौढ होईपर्यंत कानावर आदळली जातात. विविध कथा, मोठ्या लोकांची वर्णने देखील तशीच सादर केली जातात. गुजराती लोक गरब्याला 'वसंतोत्सव' साजरा करतात. म्हणून ती मंडळी पैसा कसा कमवायचा?, गोड-गोड बोलून धंदा कसा वाढवायचा?, धंद्यातील मंडळी आप-आपसात एकमेकांना कशी मदत करायची? हे जाणून असतात.
मराठी समाजात देखील तरूण-तरूण स्त्रीयांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने काही परंपरा सूरू करायला हव्यात. निदान पुढची मराठी मुले तरी 'गोड बोलत आपल्याला हवे ते कसे मिळवायचे?' हे शिकतील.
नाहीतर बसतील आमच्यासारखे वाद घालत.
अगदी पटले
माझ्या मते माणूस 'प्रेमाला, प्रेमातून येणार्या कामवासनेला' कसा सामोरा जातो, त्यानुसार तो 'पैशाला, पैका कमवण्याच्या मानसिकतेला' आकार देतो. वायसे-वरसा.
कामवासना हेच सगळ्याचे मूळ. फ्रॉईड वाचा. वसंतोत्सवात संततीनियमक साधनांचा मुबलक खप होतो असे ऐकून आहे. पैसा कमवण्याची मानसिकता हीच काय? आम के आम, गुठलियोंके दाम...
मराठी समाजात देखील तरूण-तरूण स्त्रीयांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने काही परंपरा सूरू करायला हव्यात.
पुन्हा सहमत. क्रॉस जेंडर हळदीकुंकवांवर आणि पानसुपार्यांवर आता भागणार नाही, असे दिसते. मराठी माणसा, फेड ती परंपरेची बुरसटलेली वस्त्रे!
सन्जोप राव
तुमचा स्वभाव कसा आहे? गिरण्या बंद पडण्यापूर्वी कसा होता?
च्यामारी, पुन्हा चूकीचे टंकले!
मराठी समाजात देखील तरूण-तरूण स्त्रीयांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने काही परंपरा सूरू करायला हव्यात.
हे वाक्य
- 'मराठी समाजात देखील तरूण-तरूणींना एकत्र आणण्याच्या उद्देशाने काही परंपरा सूरू करायला हव्यात.'
असे हवे होते. संजोप राव, थॅंकू! ऍंड टेन्शन नॉट!
पुन्हा संतपरंपरा
केवळ दक्षिणच नव्हे तर पूर्व,पश्चिम,उत्तर,दक्षिण,मध्य भारताला सुद्धा फार मोठी संतपरंपरा आहे.चैतन्य महाप्रभू,तुलसीदास,रविदास,कबीर,गुरु नानक,संत मीराबाई,नरसी मेहता ही काही ठळक उदाहरणे. नरसी मेहता यांचे 'भलुं थयुं भांगी जंजाळ, सुखे भजीशुं श्रीगोपाळ' हे वचन प्रत्येक गुजरात्याच्या मुखात असते.तोट्यात चालणार्या धंद्याचे दिवाळे निघाले की हमखास हे वाक्य त्याला आठवते.
शिवाय, पैसा किंवा बुद्धी असा समास सोडवण्याऐवजी मराठी माणूस तो समास पैसा आणि बुद्धी असा सोडवू शकणार नाही का? आपल्या इथल्या कित्येक संस्था,समाजकार्ये पैश्याविना अडून आहेत. त्याउलट गुजरातमधील प्रत्येक जातीने आपापल्या प्रभावक्षेत्रातील प्रदेशात उत्तमोत्तम इस्पितळे,शाळा,महाविद्यालये काढली आहेत आणि त्यामधून त्या त्या जातीतल्या लोकांना सवलतीच्या दराने प्रवेश,शिक्षण,उपचार इ. मिळते.सोनार,लोहाणा,कंसारा,पांचाळ-मिस्त्री वगैरे जातींच्या प्रचंड चॅरिटीज् आहेत.शिवाय जैनांच्या,स्वामीनारायणपंथीयांच्या,पटेलांच्या चॅरिटीज् वेगळ्याच.
गुजरात हे इराणला भारतातल्या इतर प्रदेशापेक्षा त्यातल्या त्यात जवळ असल्यामुळे तिथे मुसलमानांचा प्रवेश खूप अगोदर झाला. त्या काळात सिंध,कच्छ,काठियावाड,राजस्थानचा काही भाग हे सर्व एकाच थोड्याफार सामायिक अशा राजकीय आणि सामाजिक संस्कृतीचा भाग होते. अर्थात् छोटे-मोठे राजे आणि त्यांची संस्थाने सर्व द्वीपकल्पात होती तशी इथेही होती. मुंबई च्या मुंबादेवी चे महत्त्व सांगताना 'मुंबारक' दैत्याचे पारिपत्य करण्यासाठी ती अवतरली,किंवा ह्या देवीने मुंबारकाचे पारिपत्य केले म्हणून तिचे नाव मुंबादेवी पडले अशी काहीशी कथा सांगण्यात येते.त्यातील मुंबारक म्हणजे गुजरातचा सुल्तान मुबारकशहा हा असावा असे कित्येक लोकांचे म्हणणे आहे. मुद्दा एवढाच की गुजरातवरही मुसलमानी अंमल कित्येक शतके होता. तिथेही देवळांची तोडफोड,लुटालूट झाली. पण गुजराती लोकांनी आपला शांतपणा,समंजसपणा,धूर्तपणा,व्यवहारकुशलता ,अंगमेहनत सोडली नाही. ह्या गुणांच्या जोरावरच ते सध्याच्या संपन्न स्थितीला पोचले असावेत असे मला वाटते.
एक पत्र
आजच्या सकाळमध्ये एक पत्र गुजरातच्या प्रगतीवर आले आहे. लेखक म्हणतो की सिंगापूरचे लोक जे दूध पितात ते गुजरातमधून आलेले असते, कॅनेडियन्स जे बटाटे खातात ते गुजरात मधून आलेले असतात आणि अफगाण जे टोमॅटो खातात तेही गुजरातमधून आलेले असतात. गुजरातमधल्या एका मंत्र्याने असे विधान केले की असे चारपाच मोदी भारताला मिळाले तर काही वर्षातच भारत महासत्ता होऊन जाईल.
ही माहिती खरी आहे का? कुणाला काही कल्पना आहे का?
मला तरी असे वाटते की हल्ली एकवेळ नेता स्वच्छ प्रतिमेचा ( नुसती स्वच्छ प्रतिमा काय चाटायची आहे? चीनचा सगळीकडे फिरणारा वरवंटा, भारताचे गुळमुळीत धोरण बघितले की रात्री मला झोप येत नाही.) नसला तरी परवडले पण तो धडाडीने कामे करणारा पाहिजे. गुजरात हे राज्य मोदींमुळे महाराष्ट्रापेक्षा खूपच पुढे गेले आहे. (शून्य तास भारनियमन, गावांमध्ये थ्री फेज वीजपुरवठा, सर्वत्र उत्तम रस्त्यांचे जाळे, नुकत्याच झालेल्या एका गुंतवणूक परिषदेत झालेले कोट्यावधींचे करार वगैरे वगैरे...)
आणि या गुजरातचा विकास होत असलेला पाहून मला माझ्या भारतातले एक राज्य अशी प्रगती करत आहे याचे कौतुकही वाटते आहे. बिहारही त्याच मार्गावर निघाले आहे.
मात्र महाराष्ट्र मागे पडू नये ही इच्छा आहेच मात्र पुण्यात नुकत्याच झालेल्या अविनाश धर्माधिकारी यांच्या व्याख्यानमालेत महाराष्ट्राची सगळीकडे पिछेहाट कशी चालू आहे याची तपशीलवार आकडेवारी ऐकून महाराष्ट्राबद्दल चिंता वाटायला लागली आहे.
-सौरभ.
==================
डुंबा हो रे डुंबा हो रे डुंबा हो रे!
प्रगती
काही ठोस वस्तुस्थिती.....
http://unidow.com/india%20home%20eng/statewise_gdp.html
येथे दिलेल्या माहितीनुसार.
२००८ मध्ये विकासदर (जीडीपी ग्रोथ)
गुजरात १५.६१% महाराष्ट्र १६.१५%
२००९ मध्ये विकासदर
गुजरात ११.०२% महाराष्ट्र १३.५५%
दरडोई जीडीपी
महाराष्ट्र २००८ - ५५६९०, २००९- ६३२३४
गुजरात २००८ - ५२८८४ २००९ - ५८७१३
http://www.rediff.com/business/slide-show/slide-show-1-the-hottest-fdi-d...
येथे दिलेल्या माहिती नुसार गेल्या वर्षात भारतात झालेल्या परकीय गुंतवणुकीतली ३५% महाराष्ट्रात झाली.
http://www.thaindian.com/newsportal/business/india-incs-investment-plans...
येथे दिलेल्या माहितीनुसार (माहिती २००८ मधील आहे)
महाराष्ट्र हेच भारतीय उद्योजकांसाठी देखील प्रेफर्ड डेस्टिनेशन आहे. (गुजरात यादीत दिसत देखील नाही).
गुजरात प्रगतीविषयी सध्या वाचायला/ऐकायला मिळणारे बरेच लेख/बातम्या पेरलेल्या किंवा पेड न्यूज असाव्यात असा संशय येतो.
गावांमध्ये थ्री फेज पुरवठा महाराष्ट्रातही असतोच.
रस्त्यांच्या जाळ्याचा प्रत्यक्षानुभव महाराष्ट्रापेक्षा फार वेगळा नाही. शहरांतले अंतर्गत रस्ते महाराष्ट्रातल्याप्रमाणेच खड्ड्याखड्ड्यांचे असतात. बडोदा अहमदाबाद एक्सप्रेसवे मात्र मुंबई पुणे एक्सप्रेसवे पेक्षा आरामदायक आहे (काँक्रीटाऐवजी डांबरी असल्यामुळे असेल कदाचित)
लोडशेडिंग नसते हे मात्र खरे. त्याचे कारण गुजरातेत प्रकल्प अरबी समुद्रात बुडवणारे लोकनेते आणि 'इतक्या विजेची गरजच नाही' असे अहवाल देणारे माधव गोडबोले निर्माण झाले नाहीत. (नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातही विजेचा सुकाळ होता. आणि एमेसीबी इतरांना वीजपुरवठा करीत असे).
नितिन थत्ते
नाही...
जीडीपीची आकडेवारी फसवी असू शकते ना? व्याख्यानातही हीच माहिती दिलेली होती. पण धर्माधिकारींनी याचा बराच विस्तार करुन सांगितलेला होता. मी त्याच्या नोंदी घ्यायला हव्या होत्या. त्यामुळे तुम्हाला अजून काही सांगू शकत नाही. अर्थशास्त्रातली माझी माहिती तशी केविलवाणीच आहे.
दुसरा एक ऐकलेला मुद्दा म्हणजे ७०,८० च्या दशकात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला मिळालेल्या आघाडीमुळे आज महाराष्ट्र प्रगत दिसतो आहे. पण पुढच्या वीस पंचवीस वर्षात तो तसाच आघाडीवर राहिल असे खात्रीपूर्वक सांगता येईल का?
-सौरभ.
==================
डुंबा हो रे डुंबा हो रे डुंबा हो रे!
सहमत. आकडे फसवे असू शकतात.
तुमच्या म्हणण्याशी सहमत आहे. आकडेवारी देण्याचा हेतू "गुजरात मध्ये सध्या जादूची कांडी फिरली आहे" आणि महाराष्ट्राच्या तुलनेत काहीच्या काही पुढे गेला आहे असा जो प्रचार चालू आहे त्याचे चित्र आकड्यांत दिसत नाही. शेवटी बिहारमध्ये २४% ग्रोथ झाल्याचे कौतुक याच आकड्यांच्या आधारे चालू आहे ना?
धर्माधिकारींचे भाषण ऐकलेले नाही. दुवा मिळाल्यास द्यावा.
२५ वर्षांनी काय असेल ते २५ वर्षांनी पाहिलेले बरे. ते चित्र वाईटच असेल असे गृहीतक नको. कारण विथ ऑल धिस हाईप महाराष्ट्रातली गुंतवणुक गुजरातपेक्षा जास्तच दिसते आहे.
नितिन थत्ते
मोदी आणि मोदी आणि मो....
गुजरातविषयीची कोणतीही चर्चा मोदी या शब्दापाशी येऊन थांबते. 'आमच्यामधे मोदी नाहीत म्हणून आम्ही हे असे' असे म्हटले की झाले.आत्मपरीक्षणाची कटकट मिटली. 'यथा राजा तथा प्रजा' ही म्हण राजेशाहीच्या काळात समर्पक होती असेल कदाचित पण सध्याच्या शासनव्यवस्थेत 'खाण तशी माती' किंवा 'आडात नाही तर पोहोर्यात कुठून येणार'या म्हणी अधिक चपखल ठरतील. लोकशाहीमधे नेते हे लोकांसारखे(च) आणि लोकांमधून(च) निपजणार.
खरे तर द्वैभाषिक मोडले आणि गुजरात एक स्वतन्त्र राज्य बनले तेव्हापासूनच मुंबईतल्या गुजराती व्यापार्यांनी महाराष्ट्रापेक्षा गुजरातमधे अधिक गुंतवणूक करायला सुरुवात केली. आणंद ची यशोगाथा तेव्हापासूनचीच. त्याच्याच आगेमागे आमच्या दापचरी दुग्धयोजनेचा मात्र फज्जा उडाला. त्यानंतर आले सुरतेचे टेक्स्टाइल् मार्केट् आणि हिरेबाजार. पश्चिम रेल्वेनेही गुजरात मधे आपले कार्य वाढवले. आज सुरत-भुसावळ-बडनेरा या आणि लगतच्या वैदर्भीय पट्ट्यातले लोक रोजगारासाठी मुंबईऐवजी सुरतेस जातात;जाणे पसंत करतात. गुजरातराज्यनिर्मितीनंतर गांधीनगर ही वसाहत राजधानीसाठी वसवली गेली.(तिथल्या पर्यावरणाचे काय झाले कुणास ठाऊक.)
स्वतंत्र राज्य मिळाल्यावर गुजरातच्या प्रगतीचा वेग वाढला. पण अजूनही महाराष्ट्राइतका वेग त्यांनी कमावलेला नाही. अर्थात् भविष्यात ते तो गाठू शकतात.आणखी अर्थात जसजसा भारताच्या इतर प्रांतांचा विकास होईल तसतशी महाराष्ट्राला तीव्र स्पर्धा निर्माण होईल हे शक्य,खरे आणि इष्ट आहे.
गुजरात आणि बंगाल ह्या खूप काळापासून (वेगवेगळ्या कारणांसाठी) मला 'वंडर् लँड्स्' -आश्चर्यभूमी वाटत आलेल्या आहेत. कृष्णाची 'शामळदास',' रणछोडदास 'ही नावे गुजराती लोक आदराने मिरवतात. आपण मात्र शामळदासचे शामळू करून टाकले. असो.
:)
एक नंबर लिहीलंय :)
- टारझन