सेकंड लाइफ!

सुमेधला आजकाल स्वत:च्या रूटीन आयुष्याचा फार कंटाळा आला होता. लहानपणापासूनच आपण भरपूर पैसे कमावणारा एखादा सुपरस्टार गायक व्हावे हे स्वप्न उराशी बाळगून तो होता. इंटरनेटवरील सेकंड लाइफची जाहिरात वाचताना लहानपणीच्या स्वप्नाची त्याला एकदम आठवण आली. त्यानी नेटवरील दोन्ही कंपन्यांशी संपर्क साधून त्यांचे फॉर्म्स डाउनलोड करून घेतले. प्रिंट करून घेतलेले दोन्ही फॉर्म्स आता त्याच्यासमोर होत्या.

गेले दोन तास तो फॉर्म्सकडे नुसताच न्याहाळत बसला होता. यापैकी कुठल्या कंपनीचा फॉर्म भरावा याचा विचार तो करत होता. त्याच्या आयुष्याच्या यापुढील वाटचालीचा हा प्रश्न होता. यातून निवडलेली कंपनी त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली असती. त्याच्या सांगीतिक भविष्याचे दरवाजे उघडू शकली असती. यापैकी एलिक्सिर ऑपेरा ही कंपनी वास्तव जगातील गायकांच्या समस्या जाणून घेवून होतकरू गायक - गायिकांना मार्गदर्शन करणार होती. वैयक्तिक लक्ष पुरवत त्यांच्यातील आत्मविश्वास जागृत करून त्यांना गायनविश्वाच्या अत्युच्च शिखरावर पोचवण्याची स्वप्नं दाखवत होती. वास्तव जगाच्या समस्यांचे सुलभीकरण करून पुढील वाटचाल सुखद करण्याचे आश्वासन देत होती. अशा प्रकारची आश्वासक स्वप्नं फार काळ टिकत नाहीत याची पुरेपूर जाणीव सुमेधला होती. गायनात यश मिळवण्यासाठी शॉर्टकट्सचा उपयोग होत नाही हेही तो जाणून होता. रियाज हवा, संधी हवी, आवाज हवा, प्रसिद्धीचे व जीवघेण्या स्पर्धेत जिंकण्याचे ट्रिक्स माहित असायला हवेत. गर्दी खेचण्याची (व त्यातून लाखोंनी कमवण्याची!) कला अवगत असायला हवी.

दुसरी पॅराडाइज हॅपिनेस कंपनी मात्र सुमेधला अगदी अल्पशा काळात (काहीही श्रम न करता! ) मायकेल जॅक्सनसारखे एक फार मोठा गायक बनवण्याची हमी देत होती. मोठा गायक झाल्यानंतर आयुष्यातील सर्व ऐषाराम, सुख - समाधान त्याच्यासमोर लोळत पडणार होत्या. खरे पाहता पॅराडाइज हॅपिनेस कंपनीची माहिती वाचल्यानंतर कुठल्या कंपनीचा फॉर्म भरून पाठवावा याबद्दल शंका घेणेसुद्धा चुकीचे ठरले असते. पहिल्या कंपनीचा फॉर्म फाडून टाकायला हवा होता. कारण या पॅराडाइज हॅपिनेसने त्याच्या मनातले ओळखले होते. त्याच्या आयुष्याला पुरेल तेवढे दिले असते.

परंतु या पॅराडाइज हॅपिनेस कंपनीत एकच गोम होती. पहिली कंपनी याच वास्तव जगातील समस्यांना उत्तरं शोधून सुमेधच्या आयुष्याला कलाटणी देण्याचे वचन देत होती. मात्र दुसरी कंपनी त्याला स्वर्गसुख देणार्‍या मशिनमध्ये ढकलून भ्रामक वास्तवातील (virtual reality) जगात गायक बनवणार होती. एकदा त्या 'मशीन'मध्ये शिरल्यानंतर वास्तवाचे भान सुटणार होते.

मशीनमधील वास्तवसुद्धा भासमयच असणार याची त्याला खात्री होती. वास्तव जगातील अगदी सामान्यातील सामान्य आयुष्यसुद्धा भ्रामक जगातील स्वर्गसुखापेक्षा अनेक पटीने स्वीकारार्‍ह ठरली असती. स्वर्गसुखाच्या मशीनमधील ते भासमय विश्व अत्यंत खोटे, निसरडे, धोकादायक असणार असे त्याला वाटत होते.

स्वर्गसुखाच्या अनुभवाचे आश्वासन देणार्‍या भासमय जगातील हा व्यवहारच आतबट्यातला, नकली, झुलवत ठेवणारा, सुखाची नशा चढवणारा वाटत होता. त्यातून काहीही चांगले निघणार नाही याची त्याला खात्री होती. म्हणूनच फॉर्म हातात धरून मख्खपणे तो बसला होता.

Source: Anarchy, State and Utopia by Robert Nozick (1974)

सुमेधच्या मनातील घालमेल आपण समजू शकतो. पॅराडाइज हॅपिनेस कंपनीच्या 'स्वर्गसुख' मशीनमधील जीवन अत्यंत काल्पनिक, तद्दन खोटे, नकली, भ्रामक आहे, हे सर्व खरे आहे. परंतु ठिकठिकाणी खाच खळग्यानी भरलेल्या, सुखाची अंधुकशी झुळुकसुद्धा नसलेल्या दाहक वास्तवातील या कंटाळवाण्या, यातनामय आयुष्यापेक्षा सिलिकॉन जगातील भासमय आयुष्य शतपटीने बरे. त्याच्याइतके आणखी चांगले काय असू शकते? भरभरून सुखाचे आश्वासन देण्याचे गाजर दाखवणार्‍या पॅराडाइज हॅपिनेसचा विक्रेताच या प्रश्नांची उत्तरं चांगल्या प्रकारे देऊ शकेल.

वास्तव, अस्सल म्हणजे नेमके काय? अस्सल म्हणजे जे आहे ते व नकली म्हणजे जे नाही ते आहे म्हणून दाखविणारे. परंतु सुमेध वास्तव जगात असो की भासमय जगात, तो स्वत:च्या व्यक्तीमत्वासकट, भल्या बुर्‍या गुणासकट सुमेधच असणार. मशीनमध्ये असो की मशीनच्या बाहेर, सुमेध स्वत:च्या व्यक्तीमत्वाप्रमाणेच वागणार, अनुभवांचा आस्वाद घेणार. त्याच्यात तसा फार मोठा बदल दिसणार नाही.

परंतु वास्तव जगात चांगला गायक होण्यासाठी भरपूर कष्ट घ्यावे लागतात. गुणवत्ता असावी लागते. प्रतिभा असावी लागते. परंतु भ्रामक जगात वावरण्यासाठी आपल्याला पूर्णपणे मशीनच्या तांत्रिक स्पेसिफकेशन्सवर अवलंबून रहावे लागते. इनपुट्समधील अल्पशी चूकसुद्धा औटपुट्सवर परिणाम करू शकते. त्यात सुमेधच्या व्यक्तीमत्वाला काडीचीही किंमत नाही. परंतु आजच्या जमान्यातील लोकप्रिय गायक-गायिकांच्याकडे पाहिल्यास त्यांच्याकडे प्रतिभा आहे वा भरपूर कष्ट करून अतीव प्रयत्नांती ते लोकप्रियतेच्या शिडीवर चढून आलेले आहेत असे काही वाटत नाही, योग्य संधी व नशीबाचा भाग म्हणूनच (वा SMSच्या मार्‍यामुळे!) ते तेथे पोचले असावेत असे म्हणता येईल. पॅराडाइज हॅपिनेस कंपनीच्या मशीनमध्ये जावून आलेला सुमेध प्रथितयश गायक झाल्यास त्या यशाचे सर्व श्रेय मशीनलाच द्यावे लागेल. त्याच्या कर्तृत्वाला नाही.

आयुष्यात यश मिळवण्यासाठी योग्य संधी, योग्य वेळ, स्थळ - काळ, या गोष्टी जमून यावे लागतात. तुमच्या आई - वडिलांच्या, नातलगांच्या, त्यांच्या मित्रांच्या, ओळखीतल्यांच्या कतृमकतृत्वावर, त्यांच्या मॅनिप्युलेशन्सच्या क्षमतेवर तुमचे यश अवलंबून असते. तुमच्या कष्टाला, तुमच्या प्रतिभेला या समाजात किंमत नाही. त्यामुळे आपले आयुष्य अशा बिनभरवशाच्या नशीबावर उधळून टाकण्यापेक्षा मशीनच्या स्वाधीन केल्यास, भ्रामक जगातील सेकंड लाइफमध्ये स्वत:ला बुडवून घेतल्यास काय वाईट आहे?

भासमय जगात वावरण्यापेक्षा वास्तवाला भिडावे, त्याचा सामना करावा, असे अनेकांना वाटत असते. आपले वास्तव जग म्हणजे आपल्या अनुभवांचा एकूण गोळाबेरीज असतो. आपण काय बघतो, काय ऐकतो, कसली चव घेतो, कसा विचार करतो, कसा प्रतिसाद देतो, कठिण प्रसंगांना कशाप्रकारे सामोरे जातो, इत्यादींचे ते फलित असते. वस्तूंमधील अणू रेणूंच्या क्रिया-प्रक्रियामधून या गोष्टी घडत असल्यामुळे आपण त्यांना वास्तव म्हणतो.

परंतु हे सर्व अनुभव भ्रामक अवस्थेत संगणकीय चिप्समधून मिळत असल्यास वा व्यक्त होत असल्यास बिघडले कोठे? अनुभवांच्या आवाक्याच्या पलिकडे असलेल्या विज्ञानालासुद्धा वास्तव जगातील प्रयोग व नीरिक्षण यांचाच आधार घेत तात्विक चर्चा करावे लागते, हे आपल्याला विसरून चालणार नाही. त्यामुळे आपल्याला जे वास्तव वाटते ते मुळातच भासमय असण्याची शक्यता जास्त आहे. (परंतु हे संगणकीय जग तहान, भूक, मिटवू शकणार नाही. त्यामुळे आपल्याला वास्तव जगात परत यावेच लागते.)

तरीसुद्धा आपल्याला त्या मशीनमध्ये प्रवेश करण्यास संकोच वाटतो. धैर्य होत नाही. कारण आपल्या अथक प्रयत्नामधूनच आपले आयुष्य घडवण्याचा आपण विडा उचललेला आहे. आपल्या या इच्छाशक्तीला आपण दाबू शकत नाही. मशीनची मनमानी चालवून घेणे आपल्याला आवडणार नाही. मुळातच आपण ऐतखावू जगणे, वा सुख समाधान यांच्यापेक्षा आणखी काही गोष्टींना महत्व देत असावेत. म्हणूनच स्वर्गसुखाचा परमोच्च अनुभव देवू शकणार्‍या मशीनमध्ये जाण्यास नकार देत आहोत.

संगणक - इंटरनेट इत्यादीमधून निर्माण होणारी भासमय वास्तवता व यातून उद्भवणार्‍या सेकंड लाइफची कितीही तरफदारी केली तरी वास्तवातील जीवनानुभवाची सर त्याला नाही. इंटरनेटच्या फॉर्वर्डमधून आलेल्या गुबगुबीत गोर्‍यापान लहान बाळाच्या फोटोंपेक्षा आपल्या घरात रांगणारे शेंबडं पोर आपल्याला थक्क करत असते. माणसाच्या आयुष्याचे अंतिम ध्येय केवळ सुख समाधान नाहीत; त्याच्याही पलिकडच्या जीवनानुभवातील अस्सलपणात आहे. म्हणूनच मशीनमध्ये जाण्याचा मूर्खपणा आपण करणार नाही!

हेच जर खरे असल्यास स्वर्गसुखाच्या या अद्भुत मशीनऐवजी पारलौकिक सुखाच्या अनुभवाचे गाजर आपल्यापुढे धरणार्‍या बुवा - बाबांच्या मागे आपण का लागतो याचे उत्तर आता आपल्याला शोधावे लागेल!

लेखनविषय: दुवे:

Comments

करीत, करतात, करतील

माणसाच्या आयुष्याचे अंतिम ध्येय केवळ सुख समाधान नाहीत; त्याच्याही पलिकडच्या जीवनानुभवातील अस्सलपणात आहे. म्हणूनच मशीनमध्ये जाण्याचा मूर्खपणा आपण करणार नाही!

हे पटले नाही. दिवसातून चारसहा तास त्या यंत्रात जायची सोय असेल तर त्याची फी परवडण्यासाठी बाकी वेळेपैकी आठ तास पाट्या टाकण्याचा पर्याय काय वाईट आहे?

पुनश्च सर्परज्जुविवेकाचा उखाणा

पुनश्च सर्परज्जुविवेकाबद्दल उखाणा.

पण कथा चांगली रेखाटली आहे. काही नवीन आहे का? याबद्दल विचार करतो आहे.

तोपर्यंत सुमेधला एक आगाऊ सल्ला - पॅराडाइज हॅपिनेस कंपनीकडून सेवा मागवली, तर कल्पनायंत्रात जेवणखाण पुरवण्याची व्यवस्था काय आहे? याबद्दल चौकशी करून घ्यावी. बोलाच्या ताकाची बोलाची कढी शरिराला कितपत पौष्टिक असते, त्याबद्दल मी साशंक आहे.
- - -
आणि आणखी एक - "व्हर्चुअल" वस्तू या "कल्पित" किंवा "सारतत्त्व-गुणात्मक (जडतत्त्वविहीन)" असतात; की "भ्रामक" असतात?
- - -

सोबत

तोपर्यंत सुमेधला एक आगाऊ सल्ला - पॅराडाइज हॅपिनेस कंपनीकडून सेवा मागवली, तर कल्पनायंत्रात जेवणखाण पुरवण्याची व्यवस्था काय आहे? याबद्दल चौकशी करून घ्यावी.

सोबत ड्यूएट गाण्यासाठी आणि इतर कारणांसाठी एखादा जोडीदार आणि मशिनमध्ये थोडीशी प्रायवेट स्पेस मिळेल का ही चौकशीही करून घ्यावी.

यंत्रातील अस्सलपणा

लेख वाचून थोडा गोंधळ झाला.
पहिले म्हणजे सुमेधला हे का ते असा प्रश्न का आहे? हे आणि ते असा पर्याय का नाही?
दुसरे म्हणजे वर्च्युअल रियलिटी अनुभवल्याशिवाय ती अस्सल जीवनापेक्षा कम-अस्सल आहे हे कसे ठरवायचे?
तिसरे म्हणजे वर्च्युअल रियलिटी याचा संगणक आणि इंटरनेटचा काय संबंध?

प्रमोद

सहमत आहे

तिसरे म्हणजे वर्च्युअल रियलिटी याचा संगणक आणि इंटरनेटचा काय संबंध?

तसेच बुवा-बाबा लोक आणि पॅराडाईज कंपनीची मशिन यात काय फरक आहे?

अवांतरः हा लेख ललित लेखनाचा एक प्रकार वाटला. या लेखाचे उद्दिष्ट समजले नाही.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

गोंधळ झाला

मी लेख दोनदा वाचला पण तरीही माझा गोंधळ कमी झालेला नाही. लेखकाला नेमके काय सांगायचे आहे ते मला ते कळून येत नाही.

पॅराडाइज हॅपिनेस कंपनीच्या मशीनमध्ये जावून आलेला सुमेध प्रथितयश गायक झाल्यास त्या यशाचे सर्व श्रेय मशीनलाच द्यावे लागेल. त्याच्या कर्तृत्वाला नाही.

हे खरे नाही. मशीनमध्ये जाणारा डेटा हा त्या मशीनचे कार्य सुयोग्य चालावे यासाठी योग्य असावा लागतो. अयोग्य डेटा भरला असता मशीन हवेतसे आउटपुट देऊ शकत नाही. सुमेधप्रमाणे अनेकजण या मशीनमधून गेले तर त्या प्रत्येकाचे आउटपुट वेगळे असेल. समान आउटपुट येण्यासाठी सुमेधचे (किंवा आवाजाचे) क्लोनिंग करावे लागेल. तेव्हा सुमेधच्या कर्तृत्वाला श्रेय नाही असे होणार नाही. फारतर यांत्रिकीकरणाचे जे फायदे इतरांना आहेत (कष्ट कमी होणे) तेच सुमेधला आहेत. (फायदा मशीननुसार आणि मशीनच्या स्पेसिफिकेशन्सनुसार कमी जास्त असू शकतो.)

इनपुट्समधील अल्पशी चूकसुद्धा औटपुट्सवर परिणाम करू शकते. त्यात सुमेधच्या व्यक्तीमत्वाला काडीचीही किंमत नाही.

सुमेधचा आवाज हा या मशिनचा मुख्य डेटा असावा. हा मुख्य डेटा मिळवण्यासाठी सभोवतालचा डेटाही मशिनला मिळवणे गरजेचे आहे. हा सभोवतालचा डेटा हे सुमेधचे व्यक्तिमत्व असावे. तेव्हा त्याला मोल नाही हे पटत नाही.

मशीनप्रमाणेच वास्तवजगातही अल्पशी चूक आउटपुटवर परिणाम करू शकते. किंबहुना मशीनमध्ये जे इनपुट फीड केले जाते तेव्हा एक्स्पेक्टेड आउटपुट काय येणार त्याची कल्पना असते. मशीन जर योग्यप्रकारे चालत असेल तर योग्य आउटपुट येण्याची हमी जवळपास १००% च्या आसपास देता येते. वास्तवात ते तसे होईलच असे नाही.

इंटरनेटच्या फॉर्वर्डमधून आलेल्या गुबगुबीत गोर्‍यापान लहान बाळाच्या फोटोंपेक्षा आपल्या घरात रांगणारे शेंबडं पोर आपल्याला थक्क करत असते.

पडद्यावर हाडामांसाच्या कत्रीना कैफला पाहण्यापेक्षा ऍवॅटॅरमधली नेय्तिरी अधिक भावते. निदान, विविध प्रसंगात तिच्या चेहर्‍यावर बदलणार्‍या भावना स्पष्ट दिसून येतात. (तशी दोघींनाही वर्च्युअल रिऍलिटी म्हणायला माझी हरकत नाही)

संगणक - इंटरनेट इत्यादीमधून निर्माण होणारी भासमय वास्तवता व यातून उद्भवणार्‍या सेकंड लाइफची कितीही तरफदारी केली तरी वास्तवातील जीवनानुभवाची सर त्याला नाही.

हे म्हणजे भिकार्‍याची भूमिका करण्यासाठी एखादा हरहुन्नरी कलाकार झोपडपट्टीत जाऊन राहतो टैप वाटलं.

हेच जर खरे असल्यास स्वर्गसुखाच्या या अद्भुत मशीनऐवजी पारलौकिक सुखाच्या अनुभवाचे गाजर आपल्यापुढे धरणार्‍या बुवा - बाबांच्या मागे आपण का लागतो याचे उत्तर आता आपल्याला शोधावे लागेल!

यांच्या आठवणींशिवाय येणारे लेख चालतील उपक्रमावर.

मान्य

तुम्ही अगदी इगोलाच हात घालताय, तेंव्हा हो भासमय जग नकोच असे वाटणार. सेकंड लाइफ पेक्षा second hand life म्हणता येईल का? आणि कुठलीही second hand गोष्ट जाणीवेला नको असते.

>> (परंतु हे संगणकीय जग तहान, भूक, मिटवू शकणार नाही. त्यामुळे आपल्याला वास्तव जगात परत यावेच लागते.)
हा शाप नसता तर कदाचित ह्या जगात काही गांजलेल्या लोकांनी आभासी आयुष्याचा प्रस्ताव स्वीकारला असता.

पण कुठे तरी आपण जे करू शकत नाही ते आभासी सत्यात करायला मिळाले तर माणूस सुखावतो हे देखील खरे आहे, म्हणूनच चित्रपटामध्ये माणूस रमतो, किंवा video games मध्ये देखील भयानक गुंतून जातो. वास्तवाची जाणीव आहे पण कुठेतरी एक भूक आहे जी वास्तव पूर्ण करू शकत नाही तिच्यासाठी आभासी गोष्टींकडे वळावे लागते.

मागच्या वर्षी आलेला inception हा चित्रपट अश्याच संकल्पनेवर आधारित होता, किंवा मेट्रिक्स मध्ये देखील हा पैलू आहेच. किंवा fountain head ह्या कादंबरीत देखील second hand life आणि first hand life बद्दल जे मत मांडले आहेत ते काही अर्थी तुमच्या लेखातील काही विचारांशी जुळणारे आहे.

Inception - Dreams feel real while we're in them. It's only when we wake up that we realize something was actually strange.

कथा आवडली

आपली कथा खुप आवडली मला.

पुन्हा मॅट्रिक्स + टोटल रिकॉल

असे गृहित धरू की भौतिक विश्वातील सुमेधचे शरीर जिवंत ठेवण्यासाठी पॅराडाइज हॅपिनेस यंत्रातून योग्य ती सर्व द्रव्ये सुमेधच्या शरीरात जातात.
(मॅट्रिक्समधली सेल).
मग?

सुमेधला आपल्या दुसर्‍या इनिंगमध्ये यशस्वी गायक व्हायचे आहे की उत्तम गायक व्हायचे आहे? हा प्रश्न त्याने स्वतःला विचारावा.

वास्तव जगाच्या समस्यांचे सुलभीकरण करून पुढील वाटचाल सुखद करण्याचे आश्वासन देत होती. अशा प्रकारची आश्वासक स्वप्नं फार काळ टिकत नाहीत याची पुरेपूर जाणीव सुमेधला होती. गायनात यश मिळवण्यासाठी शॉर्टकट्सचा उपयोग होत नाही हेही तो जाणून होता.

स्वर्गसुखाच्या अनुभवाचे आश्वासन देणार्‍या भासमय जगातील हा व्यवहारच आतबट्यातला, नकली, झुलवत ठेवणारा, सुखाची नशा चढवणारा वाटत होता. त्यातून काहीही चांगले निघणार नाही याची त्याला खात्री होती. म्हणूनच फॉर्म हातात धरून मख्खपणे तो बसला होता.

- हे जर खरे असेल तर प्रश्नच मिटला.
'मनाचे समाधान' हे भौतिक सुखांपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे असे त्याला वाटत असेल तर दोन्ही कंपन्यांचे अर्ज फाडून त्याने रीतसर गायन शिकावे.
'आपण चांगले गातो'याची स्वतःला खात्री पटली की मग लोकांपुढे आपली कला मांडावी. शेवटी 'स्वान्तसुखाय' आहेच! :)

सहमत आहे

'मनाचे समाधान' हे भौतिक सुखांपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे असे त्याला वाटत असेल तर दोन्ही कंपन्यांचे अर्ज फाडून त्याने रीतसर गायन शिकावे.
'आपण चांगले गातो'याची स्वतःला खात्री पटली की मग लोकांपुढे आपली कला मांडावी. शेवटी 'स्वान्तसुखाय' आहेच! :)

अगदी सहमत आहे.

प्रकाश घाटपांडे

हा एक प्रकारचा पुनर्जन्मच की

सुमेधला आपल्या दुसर्‍या इनिंगमध्ये यशस्वी गायक व्हायचे आहे की उत्तम गायक व्हायचे आहे? हा प्रश्न त्याने स्वतःला विचारावा.

हे सगळे एक प्रकारचे पुनर्जन्माचेच प्रकार आहेत की. कारणे कोणतीही असो, प्रक्रिया कोणतीही असो व जिवीत माणुस अथवा आत्मा कोणतेही असो.

माझे ब्लॉग्स्
www.bolghevda.blogspot.com (मराठी)
www.rashtrarpan.blogspot.com
www.rashtravrat.blogspot.com

किक

आभासी वास्तवातून खऱ्या वास्तवात परत येण्यासाठी इन्सेप्शनमधील "किक"सारखी गरज असते का? (इन्सेप्शनमध्ये ❛आभासी वास्तवा❜च्या ऐवजी ❛स्वप्न❜ आहे.) शक्य असल्यास इतर पर्यायांचा देखील ऊहापोह करावा.

हा हा!

मी वर उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. प्रश्न मुळात एवढा खुळचट असेल, याची प्रचिती देखील आली नव्हती, असो.

 
^ वर