नगरी पतंग महोत्सव

संक्रांतीला १४ / १५ जानेवारीला अहमदाबादमधे, मुंबईमधे जो पतंग उत्सव दिसतो, तितक्याच उत्साहात नगरमधे पतंगबाजी होते. ही पतंगबाजी दिवाळी संपली की, लगेच सुरु झालेली असते. पोरं कधी एकदाची शाळा सुटतेय आणि पतंग ऊडवायला मिळतेय ह्याची वाट पहात असतात. दिवसही लहान झालेला असतो त्यामुळे संध्याकाळी शाळा सुटली की, अंधार होईस्तोवर जेमतेम अर्धा-पाऊण तास मिळतो. शनवार-रवीवारी मात्र फुल्ल धमाल!

दिवाळीनंतर पतंगबाजी सुरु होण्याची काही शास्त्रीय कारणे आहेत तर काही अशीच. थंडीच्या काळात वारं ९०% वेळातरी हळूवारपणे वाहतं. दुपारी जरा वेग वाढतो व हवा वर जाऊ लागते, त्यामुळे पतंगांना चांगली थाप लागते. वा-याची दिशाही खूप सोयीची असते. दिवसभरात पतंग ऊडवणा-यासाठी योग्य असते. सकाळी उत्तरेकडे वाहणारं वारं, सूर्य डोक्यावर आला की, पुर्व, उत्तर, दक्षिणेकडे आलटून-पालटून वाहू लागतं. संध्याकाळी मात्र कधी उत्तर तर कधी दक्षिण असं स्थिरावतं. त्यामुळे पतंगबाजाच्या डोळ्याला सूर्याचा त्रास होत नाही. असे सोयीचं वारं इतर ऋतूत सहसा नसतं.

ह्या पतंगबाजांची भाषा एकदम टरारबुंग असते. त्यातील शब्द खूप मजेदार असतात त्याचीच ही गोष्ट-

पतंगांची नावं:

१. टुक्कल: लहान पोरं ५ पैसेवाली पतंग घेऊन उडवायचे ती ही. वीतभर रुंदीची आणि सहसा शेपुट लावल्याशिवाय न उडू शकणारी.

२. शेपटाड: ही पतंग अशी कोणतीही की जी, शेपुट लावल्याशिवाय नाही ऊडू शकत. शेपुट लावण्याचं कारण म्हणजे एखादी पतंग स्थिर राहून ऊडू शकत नाही, गिरक्या घेत राहते, मधेच खपते, एका बाजुला कलते. अशा पतंगीला मीटरभर लांबीची पेपरची (वर्तमानपत्राची) शेपुट लावतात. ह्या शेपटीचं वजन पतंगापेक्षा जास्त होऊ नये ही काळजी घ्यावी लागते. टुक्कलला काळजीने शेपुट लावावी लागते.

३. बॉम्बेटॉप: ही मशिनमेड पतंग पुण्याहून विक्रीसाठी येते. महाग असल्यामुळे फारशी लोकप्रिय नव्हती. पण दिसायला रुबाबदार!

४. दाढी: ह्या पतंगाला खालील दोन बाजुला एक वाढीव ताव लावलेला असतो, जो दाढीसारखा दिसतो. ही पतंग वारं जरा जोरदार असलं की, फर्रर्र.. असा आवाज करते, त्यामुळे हीला फर्रेबाज असेही म्हणतात

५. तागाभरी: पतंग जसजसा आकाराने मोठा होतो, तसा त्याच्या तावावरील ताण वाढतो. त्यामुळे ताव खालच्या बाजूने फाटतो. असे होऊ नये म्हणून त्यास बारीक दोरी लावून ताव त्या दोरीवरुन वळवून चिकटवतात. हे नक्की काय सांगितले आहे ते नुसत्या वर्णनाने डोळ्यासमोर उभे करणे अवघड आहे.

६. रब्द्या: हा सगळ्यात मोठा पतंग, हा कापला की, एकच जल्लोष होतो. हा कापलाही जातो कारण चपळ नसतो. हत्तीसारखा संथ, पटकन वळत नाही, त्यामुळे वरची गोत घेता येत नाही व तेथेच फसतो. पण वारं चांगलं असलं की, ह्याला असा काही ताण येतो की, बाकीचे पतंग ह्याच्या जवळपासजरी फिरकले तरी सपाक्कन कापले जातात.

मांजाची तयारी आणि त्यासंबंधातील शब्द:

दो-याची वर्णने:

१. मसरई: साड्या विणण्यासाठी जो धागा वापरतात तो. अत्यंत बारीक पण नीट सुतवून उडवला तर टुक्कल उडवायला योग्य. नाहीतर टूक्कलचे वजन इतके कमी असते की, जाड धाग्याचा मांजा वापरला तर थोडी ढील दिली की, टूक्कल खाली बसते. मसरई वाला मांजा कापायला महाकठीण. गोत फार लांब जाते व सगळा मांजा आपल्या मांजावर गुंता होतो. पण ह्या मांजाने दुस-याचा पतंगही कापता येत नाही.

२. ४० नंबर: हा सगळ्यांच्या ओळखीचा शिवण्याचा धागा. एका रीळात १००० मीटर तरी मिळतो व रीळही बरीच स्वस्त त्यामुळे लहान पोरांना हाच रीळ परवडतो. हा ही नीट सुतवला की, टुक्कलपेक्षा थोडी मोठी पतंग उडवता येते. हा मांज एका फटक्यात कापता येतो. त्यामुळे ४० नंबर वाले काटा-काटीत फारसे भाग घेत नाहीत.

३. १० नंबर: हा खरा मांजा. एका रीळात ४०० मीटर मिळतो. त्यामुळे २ रीळे तरी सुतवावा लागतो, तरच लांबच्या गोतीला पुरतो. चक्रीही मोठी घ्यावी लागते. साखळी छाप दस नंबरी खूप प्रसिद्ध धागा. तो घेऊन किल्ल्याच्या मैदानावर सुतवायला जायचं असा शनी-रवीचा कार्यक्रम. ह्या मांजांने मोठयात मोठी पतंग ऊडवता येते.

४. ८ नंबरी: फार जाड धागा. सहसा मांजासाठी नाही वापरत पण एखाद्याला हुक्की आली की, तो सुतवतो. मांजाचे वजनच इतकं असतं की, खूप मोठा पतंग असल्याशिवाय पतंग ऊडतंच नाही. मांजाला घोळ येतो.

मांजा बनवण्याची साधने:

काच: हीरवट दिसणारी काच असलेली सरबताची बाटली म्हणजे फीट्ट! ही बाटली घेऊन, खलबत्ता घ्यायचा, जाड कापड घेऊन बत्ता जाईल असे भोक पाडायचे, खलात काचेचे तुकडे टाकून, तोंड बांधायचे आणि कुटायची. कापडामुळे तुकडे उडून अंगावर येत नाहीत. बारीक पुड होईस्तोवर कुटली की, तलम वस्त्राने गाळून घ्यायची की अगदी तोंड-पावडरसारखी बारीक करायची.

सरस (शिरस): ही सरस २०० ग्राम पुरते. नगरमधे काही खास दुकानांत मिळते. ही सुद्धा बत्त्यात घालून थोडी बारीक केली की, पटकन उकळता येते. उकळली चिकट व घट्ट होते. एक बोर्नव्हीटाचा डबा घेऊन तिन दगडाची चूल करुन त्यात अर्धे पाणी भरुन सरस टाकून उकळवायची. ह्यातच रंग टाकायचा. उकळ्या घेऊन घेऊन उतू जाणे थांबले की, समजायचे की सरस शिजली. थोडी थंड होऊ द्यायची पण गरमच लागते कारण थंड झाली की, पुन्हा कडक होते व पुन्हा वापरता येत नाही.

दाभण: हा डब्यापेक्षा जास्त उंचीचा दाभण त्यात दोरा ओऊन उलटा डब्यात धरायचा. रीळात एक काडी घालून एकाला रीळ धरायला बसवायचं. दुसरा दाभण आणि एक चिठ्ठी धरणार. धागा थोडा पाण्याने ओला करुन ठेवायचा असतो.

चिठ्ठी: कापडाची एक हातात मावेल अशी बारीक घडी. ही डब्याच्या सरसातून बाहेर येणा-या धाग्याला लावून त्यावरील जास्तीचा सरस डब्यात पुन्हा पडेल अशी धरायची. सरस गरम असल्यामुळे हा पोरगा वैतागतो.

आणखी एकजण बारीक काच अशाच चिठ्ठ्यात दोन्ही हातात एक-एक धरुन त्यातून नुकताच सरस लागलेला धागा न्यायचा. ह्यामुळे गरम असलेल्या सरसाला लगेच धाग्याच्या सगळ्याबाजून समान काच लागली जाते. पहील्या हातातील चिठ्ठी जरा कमी दाबाने व दुस-या हातातील चिठ्ठी जास्त दाबाने धरली की, जास्त काच लागली जाऊन ती पुढच्या हातातील दाबाने काढता येते व धाग्याचा आत पर्यंत घुसते. पण ह्यातच मांजाचे भवितव्य ठरलेले असते व ज्याला मांजा करायचा असतो तोच हे काम करतो त्यामुळे त्याला मनाप्रमाणे काच लावता येते. अशा प्रवासातून धाग्याचे बाहेर आलेले टोक चकरीला बांधायचे व एका पोराने नेमक्या वेगाने धागा चालत चालत ओढायला सुरुवात करायची. असे करतांनाही नेमका अंदाज लागतो. व काच धरणारा पोरगा त्याला सुचना देत असतो.

मांजा सुतवतांना तो सरसामुळे ओला झालेला असतो, त्यामुळे तो काचेच्या चिठ्ठीतून बाहेर आल्यानंतर कुठेही लागू न देता ओढायचा असतो, नाहीतर लागलेली काच लगेच निघुन जाते. थोडावेळ उन्हात वाळला की, (२-३ मिनीटे) की, चकरी ओढत गेलेला पोरगा तो गुंडाळत-गुंडाळत परत येतो. असे करतांना त्याच्या बोटाला लागलेली काच पाहून मांजाचा मालक धागा किती वाळू द्यायचा हे ठरवतो.

इतर मजेशीर शब्द:

सुत्तर: मांजा घेऊन हे त्रिकोणी आकाराचे सुत्तर पतंगाला बांधायचे. हे जितक्या कौशल्याने जमते तितके नेमके नियंत्रण पतंगावर करता येते. अनेकांना ह्यातील शास्त्र कळत नाही. व दोन पायातील अंतर किती ठेवायचे हे समजत नाही. गाठ कुठे मारायची हे ही महत्वाचे. ह्यालाच मांजाचे टोक बांधून पतंग ऊडवायला तयार होते. संक्रांतीच्या आदल्या रात्री पतंगी सुत्तर बांधुन तयार ठेवल्या जातात. पतंग कटली की, लगेच थोडाही वेळ न घालवता उडवायची घाई असते.

झीलबींडा: खास नगरी शब्द! मांजाच्या आर्धामीटरभर तुकड्याला दोन्ही बाजुला दगड बांधायचे. एखादी पतंग अरुन उडत असेल आणि तिला पळवायची असेल तर असा झीलबींडा करुन तो वर फेकला जातो. अचुकतेने पतंगाच्या मांजावर फेकला तर तो लटकतो दगडांच्या वजनाने खाली येतो. मग मागचा मांजा तोडून टाकुन पतंगावर कब्जा करायचा व खाली घ्यायचा व लपवायचा आणि दोन-चार दिवसांनी ऊडवायला घ्यायचा.

झीलबींडा टाकून पतंग पकडणे हे भांडणाला आमंत्रण असते. पतंगबाजांच्या दुनियेतील अलिखीत नियम असा आहे की, झीलबींडा टाकून पतंग पकडायची नाही. कटलेला पतंग मात्र जो धरेल त्याच्या मालकीचा असतो. मांजापण बराच लुटला जातो. पतंग कटल्यानंतर मांजा खाली येतो व गच्चीवर तयारीतच उभे असलेले पोरं धरतात व दोन्ही बाजुने ओढायला सुरुवात करतात. एक-दोन लांबच्या गोतीत पतंग कटली तर एक रीळ मांजा संपायला वेळ लागत नाही.

कन्नी: पतंग एकाच बाजुला झुकत असेल तर, त्याच्या अर्थ त्याच्या अर्धगोलाकार कामटीचे वजन एकाबाजुला जास्त असते. ते संतुलन ह्या कन्नीने करावे लागते. कन्नी कापडाचा बारीक तुकडा किंवा मांजाचाच एक छोटी अट्टी करुन कामटीच्या उलट बाजुला बांधतात. एक-दोन वेळा पतंग थोडी उडवून अंदाज येतो की, कन्नी योग्य वजनाची आहे की नाही.

संक्रांतीला पोरं दिवसभर गच्चीवर गाणी लावून दंगा करतात; जेवायची पण शुद्ध नसते. वारं नसलं की, नुसती घालमेल होते. पण दिवस संपता-संपता, प्रत्येकाने आनंदाने घालवलेला दिवस, पुन्हा लवकर यावा अशा अपेक्षेने शिडी ऊतरुन पत्र्यावरुन खाली येतो. दुस-या दिवशीपासुन आकाश रंगहीन होतं ते पुढील दिवाळीपर्यंत!

लेखनविषय: दुवे:

Comments

मस्त..!

माहितीपूर्ण लेख आवडला. बाकी, तुम्ही जे सुत्तर म्हणताय त्याला आम्ही 'कन्ना' म्हणतो.
पतंग एका बाजूला झूकायला लागला की त्याला पतंग 'कन'खातोय असे म्हणतो.
पण,मला तुमचा सुत्तर शब्द आवडला राव...!

दोन तीन रंगाच्या पट्टीवाले पतंग. पट्टी पतंग.
एकदम लहान पतंग म्हणजे 'डुग्गी' पतंग.
चार रंगाची चौकडी तिला दुल्हन असेही नाव आहे.
अजून बरीच नावे सांगता येतील पण आता काही आठवेना. आठवली की डकवतो. :)

-दिलीप बिरुटे

बरीच समानता.

डुग्गी मी पण म्हणाल्याचे आठवते. सहसा परगावचे पाहूणे भेटले की, पतंगाच्या माहीतीची देवाणघेवाण होत असे त्यावेळी हा शब्द ऐकल्याचा आठवतो. नगरला कन'खातोय असेही म्हणले जाते.

पतंग म्हणजे जीव की प्राण्!

पतंगांच्या आठवणीने पार घायाळ् झालो राव. आख्खं नगर अनवाणी पतंगाच्या मागे धावायचो ते दिवस आठवले! आखुष्यातले पतंगाचे दिवस हे स्वर्गीय होते असं म्हणलं तर अजिबात अतिशयोक्ती होणार् नाही. एकमेकाला जोडलेल्या घरांच्या गच्च्या ओलांडत पतंग धरायला धावणे, कुणाच्या छपरावरुन् जाताना खाली माती पडल्यामुळे, कुणाची कौलं फोडल्यामुळे खाल्लेल्या शिव्या, (कधी कधी तर काही जुनी पुराणी छपरंही कोसळलीत आमच्यामुळे), विजेचे खांब्, पडायला आलेली घरं, भिंतीच्यावरतील् लावलेल्या काचा, मांजा लुटण्यामुणे होणारी भांडणं.. काही श्रीमंत-बरेली,अहमदाबादी मांजावाली-घरं, ठरावीक दिशेने वारं वाहु लागलं की त्यांचे मांजे लुटायला टपुन बसणं, सकाळी उडवलेला आणि ५० गोतीनंतरही थेट् संध्याकाळी अंधार् पडल्यावरच् उतरवेला तो पतंग, सुतवलेले मांजे, हाताची कापलेली बोटं, जानेवारीच्या सकाळी धुक्यात ओल्या मांजाने उडवलेले पतंग, रात्री मेणबत्ती असलेला कागदाचा कंदील अडकवुन उडवलेले पतंग.. ते एक आयुष्यच.. टुक्कल पासुन सुरु होणारं... संपुर्ण!

बाकी टुक्कल नंतर येतात ते गोंडे, टुक्कल चार आण्याला असेल् तर् गोंडे रुपयाला असायचे. एखाद्या गोंड्याला 'हनुमान शेपुट' लावुन काही लोक् उडवत असत. बॉम्बेटॉप शिवाय लोकल मेड् असे बॉट्टल माझे आवडते. पतंग उडवण्यात् तुम्ही माहिर असाल् तरच् बॉट्ट्लच्या वाटेला जा. सतत गिरक्या खाणारे बॉट्ट्ल हे लांबच लांब चालणार्‍या गोतींमध्ये फार् कामाला येतात्. सोबतीला साखळी किंवा डबल्-हातोडा घरी सुतवला असेल् तर बेस्ट. ए

बॉट्टल सारखेच हैद्राबादी म्हणुन् पांढरे आणि खाली हिरवी किंवा काळी त्रिकोणी तावाची ठिगळ असलेले पण् क्लासीक पण् बॉट्टलपे़शा नाजुन् पतंग बरेली वगैरे मांजाबरोबर् बेस्ट. अर्थात खरा पतंगबाज तोच जो कुठल्याही मांजावर इतरांचे पतंग कापु शकतो.

महत्प्रयासाने साचवलेल्या पैशात तागाभारी परवडायचे नाहीत, त्यामुळे कटुन आलेले तागाभारी बरेच दिवस लाकडाच्या पेटीत पडुन राहत असत. झिलबिंडा करुन उडणार्‍या पतंगांना ढापणे वगैरे म्हणजे तर धमाल्! त्याशिवाय विजेच्या तारा, झाडी. किंवा कोणी रहात नसलेले घर्-छप्पर् यात अडकुन पडलेले पतंग मिळवायला झिलबिंडे फार् कामाला येतात, मात्र हे काम् येर्‍यागबाळ्याचे नोहे, तेथे पाहिजे जातीचेच.

बाकी लफ्फड मोडणे, चुकलेली सुत्तरं दुरुस्त करणे, कन्नी बांधणे, पतंग चिकटवणे वगैरेही सगळ्यांना जमतंच असं नाही. शेवटच्या संक्रातीला दहा वर्षं होतील, पण् अजुनही घरातल्या मोठ्या लाकडाच्या पेटीत् भरपूर पतंग सापडतील्, दोन तीन मांजाच्या चकर्‍या असतील्, त्याच पेटीत भगव्या कापडात बांधलेली गीतेची पुस्तकं असतील, दासबोध असेल...

पतंगांच्या आठवणी बद्दल धन्यवाद अजय!

-Nile

पतंगबाज नगरी भेटला!

वाह! एक पतंगबाज नगरी भेटला! गोंडेवाला, बॉट्टल आणि डब्बल हातोडा साफ विसरुन गेलो होतो.
होय, तागाभरी महाग असायचाच. त्यावर मेणाने उभ्या-आडव्या रेषा असत, त्या खूपवेळ निरखून पाहण्यात मजा येई व एक भारी पतंगाचे आपण मालक आहोत ह्याचा आनंद मिळायचा.
मी तर पतंग घरी बनवुन विकले आहेत (मजा म्हणून)- १३-१४ वर्षांचा असेल मी तेव्हा. पण पहील्या गि-हाईकाने पतंग घेतल्यानंतर झालेला आनंद आजही विसरु शकत नाही. पोरं भावही करायचे.
एक दगड बांधलेला झीलबींडाही ग्रेटच. पत्र्यावर अडकलेल्या पतंगी हळूहळू ओढत काढायला मजा यायची.

तुम्हाला १० वर्षे झालीत; मला २०! ह्या वेळेस संक्रांत १५ ता आहे व शनवार आहे. मित्रांचा आग्रह आहे, पाहूया जमतं का!

लेख आवडला

लहानपणी पतंगाच्या मांज्यासाठी काचा कुटल्याची आठवण आहे. मांजा घरी करून बघायचे सर्व प्रयत्न फसले होते हा भाग वेगळा. लहानपणी मला पतंग उडवायला फारसा मिळत नसे कारण माझे भाऊ वगैरे मला मांजा लपेटण्याचे (नो पन इंटेन्डेड ;-)) काम देत.

असो. आता पतंग चांगला उडवता येतो. आम्ही वसंत ऋतूत उडवतो. आमच्या राज्यात सतत वारे वहात असतात (बॅडमिंटन वगैरे आम्ही कधीच खेळू शकत नाही) तेव्हा एखाद्या दिवशी मंद वारा असल्यास पतंग चांगले उडतात.

लक्झरी

"'लहानपणी मला ... काम देत.''
:-) शोफर असल्यासारखी लक्झरी असते ती.

लेख मस्त झालाय.

लेख माहितीपूर्ण झाला आहे. छान!
आम्ही तुमच्या 'सुत्तर' ला 'कणी' म्हणायचो. 'कणी बांधणे' हा माझ्या साठी एक मोठा विधी असायचा, कारण मला ती कधीच बांधता येत नव्हती. इतरांना विनंती करावी लागायची. बहुतेकदा माझा लहान भाऊ हे काम करायचा.

पतंग एका बाजूला झूकायला लागला की मुंबईत काळाचौकी,लालबाग मध्ये 'पतंग झोत खातेय' असे म्हणयचो.
मोठ्या पतंगीला आम्ही 'ढॅप' म्हणायचो.
रात्रीच्या पतंगाबाबत काही लिहीले नाही. मुंबईत रात्रीच्या वेळी आकाशकंदिल लावलेले बरेच पतंग ही उडवले जायचे. सध्या बोरीवली/दहिसर मध्ये काहिच दिसत नाही, बुवा! :-(

लेख मस्त झालाय. त्यात तुमचे स्थानिक शब्दही बरेच आलेले आहेत. जसे 'वरून' ला 'अरून' वैगरे! तेही वाचायला आवडले.

पतंगबाज राहीले नाहीत?

" 'पतंग झोत खातेय' असे म्हणयचो."... माझ्यामते आजही तेच म्हणत असावेत..की पतंगबाज राहीले नाहीत?

रात्री काही रीक्षावाले हे असे आकाशदिव्यावाले पतंग उडवीत. मी कधी नाही उडवला. त्यात मला तो पतंग गोती शिवाय उडवायचा ही कल्पनाच सहन होत नसे.

छान लेख

लेख आवडला. कन्नी, सुत्तर हे शब्द बरेच दिवसानी ऐकले. मांजा करताना फेविकॉलचे पाणी (शिरस ऐवजी) वापरले तर जास्त मजबूत होतो अशी एक आठवण आहे.
झीलबिडा ऐवजी आम्ही गिरगोट वापरत असू. गिरगोटात एकच दगड असे. हे दोन दगडांचे शस्त्र पुढील टप्पा दिसतो आहे.

पतंगावर चांगली टेक्निकल माहिती वाचायला आवडेल. उदा. सुत्तर बांधताना वरच्या बाजुचा धागा जास्त ठेवला जातो. पतंग दोन बासांच्या काडी (कमची) ने बांधला जातो. त्यातली एक उभी असते तर दुसरी बाकदार. या बाकदार कमचीने कागदात अनसिमेट्रिक ताण (वरच्या बाजूला जास्त) तयार होतो. तसेच वजन कन्नीने फक्त उभ्या काडीभोवती संतुलीत केले जाते. बाकदार कमचीने ते वरती सरकते. या सर्वाचा पतंग उडवण्याशी संबंध असला पाहिजे. पण तो काय यावर कधी विचार केला नाही. पतंगाच्या एकाच दोरीने त्याला नॅव्हिगेट करता येते. ती ओढून जास्त ताण दिल्यास उभा पतंग वर जातो . तोच बाकदार कमची खाली असेल तर खाली जातो. (ताण दिल्यावर बाकदार कमचीच्या दिशेने जाणे.) या प्रकाराने त्याला डावीकडे वा उजवीकडे नेता येते. (त्याचे तोंड फिरत असताना नेमकी वेळ साधून ताण द्यायचा.)

खेळांचे अलिखित शास्त्र यावर कसे तयार होते हा एक वेगळा मजेदार भाग.

प्रमोद

प्रतिसाद

>" मांजा करताना फेविकॉलचे पाणी "> ही माहीती नवीन आहे, प्रयोग करुन बघायला आवडले असते त्यावेळी.

>सुत्तर बांधताना वरच्या बाजुचा धागा जास्त ठेवला जातो.> मी नेहमी समान ठेवत असे. काहीजण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे बांधीत.

>बाकदार कमचीने कागदात अनसिमेट्रिक ताण (वरच्या बाजूला जास्त) तयार होतोथे खरे आहे, पण तेच तंत्र आहे. सिमेट्रीक ताणाचा पतंग उडेल की नाही शंका आहे. त्यास एरोडायनामिक आकार आपोआप आला पाहीजे तरच त्याला आपल्याला हव्या तशा करामती करण्यास भाग पाडले जाते असे मा़झे अंदाजपंचे मत आहे. हल्ली दोन्ही कामट्यांना चहूकडून धागा बांधतात त्यामुंळे अर्धगोलाकार कामटीचा ताण कमी होतो.

>पतंगावर चांगली टेक्निकल माहिती वाचायला आवडेल..> अशा अनेक वेबसायटी आहेत.

बाकी तुमचाही दुरान्वये काहीतरी संबंध नगरी पतंगबाजांशी आलेला दिसतोय.

मस्तच मस्त

लहानपणी एकदोनदा नागपूरला नातेवाइकांनी पतंग उडवताना काटाकाटी करताना बघितले आहे. आमच्या गावात पतंगाचा छंद फारसा लोकप्रिय नव्हता :-(

लेख माहितीपूर्ण असला, अनेक अनोळखी शब्दांनी भरलेला असला, तरी जिवंतपणा मुळीच कमी झालेला नाही.

लेख फार आवडला.

वोह काटा

मस्त लेख. नाइलचा प्रतिसादही.

मांजा बनवणे हा आमचा एक आवडता उद्योग. सोडावाटरच्या बाटल्या, ट्यूबलाइट, शिरस, अंडी, सेलचा मसाला काय काय असायचे त्या लुद्दीत. मग ती लुद्दी सद्दीवरून (तागा) फिरवायची. मांजा कसा चिकना झाला पाहिजे. खडदुड किंवा खरखरीत नको.

पतंगांचेही अनेक प्रकार, नावे. ढढ्ढा, चील वगैर वगैरे नावे आकार आणि आकारमानानुसार. सैती सैती म्हणजे हळूहळू ढील देत रमलेल्या पेचाची मजाच काही न्यारी. सद्दी संपत आली की मग नवीन संखलची रीळ लावायची. पण बिना गठानीची रिळ असणे कधीही चांगले. मांज्याविरुद्ध तुमची गठान आली की कटण्याची भीती जास्त. पेचे असे रमत की पतंग अगदी क्षितिजाशी दिसेनासे होत असत. आणि मग पतंग कटला की ओ पार चा एकच गलका व्हायचा. काटेरी लग्गी घेऊन कटलेल्या पतंगी पकडायला काही मंडळी धावत. काही जण मांजा लुटत. आपल्या पतंगीने दुसऱ्याचे कटलेले पतंग हिलकावण्याची कलाही काही जणांना अवगत असे. (अरे कटी पतंग है हिलकाले हा डायलॉगही आठवला.) पेचा चालू असताना पतंगाला चक्रोल देणे म्हणजे तो गोलगोल फिरवणे सगळे काही जिवंत झाले. अचानक वारा पडला की पतंगाचे झाप खाणेही. (एखाद्याचे अचानक झाप खाणेही मजेशीर असते.) असो. पण आजकालची मुले पतंगबाजी करतात कुठे? कंचेही खेळताना दिसत नाही कुणी. असो.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

अप्रतिम लेख

अप्रतिम, मनोरंजक आणि माहितीपूर्ण लेख. अनोळखी शब्दांनी खच्चून भरलेला. प्रतिसाददेखील तसेच.--वाचक्नवी

+१

>अप्रतिम, मनोरंजक आणि माहितीपूर्ण लेख व प्रतिसाद!

सहमत आहे.

छोटे आणि मोठे पतंग..

आमच्याकडे छोट्या पतंगाला 'लेपटी' आणि मोठ्या पतंगांना 'झब्बू' म्हणत.

काची मांजाची चक्री बाजारात विकत मिळायची त्यामुळे फार थोडे लोक तो उद्योग घरी करायचे.
आमच्याकडे पतंग दुकानदार (या उद्योगात बहुधा मुसलमान जास्त होते) नुसता पतंग आणि मांजाच विकायचे नाहीत, तर दुकानातच कनापण बांधून द्यायचे.

दिवाळीला बलून उडवायचो. चारी बाजूंनी हलक्या कामट्यांना झिरझिरीत कागद आणि सगळीकडून बंदिस्त झाला की खालच्या बाजूला मध्ये तारेचा फडकी बांधलेला गोल. त्याला चुंबळ म्हणायचे. हा पतंगी आकाश कंदिल तयार झाला, की रात्रीच्या वेळेस मैदानात सायकलच्या टायरचा तुकडा जाळायचे. त्याचा धूर आकाशकंदिलात सोडायचे आणि कंदिल डोलू लागला, की मग चुंबळ पेटवायचे. हळू हळू हा पतंगी कंदिल उंच जायला लागे. एका वेळी असे दहा-वीस कंदिल आकाशात सोडत. फार छान दिवस होते ते.

धन्यवाद

छान लेख आणि चर्चा.

सहमत

लेख आणि चर्चा आवडली.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

लपेट

पतंग उडवण्यावरून हिंदी मराठी शब्दांना काही अर्थ आले आहेत.

'कटी पतंग' दिशाहीन जगणे. (सिनेमात वापरलेले नाव)
'ढील' बावळटपणा. (काटाकाटीत मांजा ओढायचा किंवा ढील द्यायचा ही दोन तंत्रे. ढील दिल्यावर आपला पतंग कटला तर पतंग ही गेला आणि मांजाही गेला.)
'लपेट' बाता मारणे. (पतंग उडवताना चक्रधारी सहायकाला मांजा लपेटून घ्यायला सांगायचे.)

प्रमोद

हं गुंडाळ

शाळेत असताना कोणी थापा मारु लागला तर आम्ही ऐकणारे लगेच "हं गुंडाळ" म्हणुन चिडवत असु त्याची आठवण झाली.

-Nile

हापस...

कधी कधी वारा एकदम बंद झाला, की पतंग पडायला लागायचा. अशावेळी आपला पतंग आणि मांजा जाऊ नये म्हणून चक्री गुंडाळणार्‍याला जसे 'गुंडाळ' म्हणायचे तसे पतंग उडवणार्‍याला 'हापस' म्हणायचे. म्हणजे लांब हात करुन मांजा भराभर ओढून घेणे. त्यातूनच हा शब्द आमच्याकडे हावरटपणा किंवा पैसे खाणे यालाही रुढ झाला. पंगतीत एखादा मागमागून खायला लागला, की म्हणायचे ' आयला! त्ये बेणं बग कसं हापसतंय ते.' महसूल खात्यात किंवा पोलिसात असलेल्याच्या पोरीचे लग्न ठरले, की त्याच्या चर्चेत हा शब्द हटकून यायचा. ' मनीच्या बापाला काय कमी हाय का? लोकांचं हापसलंय की मायंदाळ.' थापा मारणार्‍याला मात्र आमच्याकडे 'गुंडाळतंय' न म्हणता 'लपेटतंय' असं म्हणण्याची पद्धत आहे.

चिकण्या पोरींनाही त्यांच्या आकारावरुन पतंगाची नावे दिलेली असत. :)

शिडशिडीत अंगाची व केसांचा लांब शेपटा असलेली मुलगी - लेपटी
गोबरे गाल आणि अंगाने भरलेली असली तर - झब्बू
दिसायला मस्त, पण स्थूल असेल तर - ढेप

आखडणे

हा हा. ह्याला नगरमध्ये आखडणे म्हणतात. कधी कधी गोतीचा निर्णय होतच नाही. दोघांचे पतंग गिरक्या खाउन खाउन एक गुंता करुन् ठेवतात, या गोतीचे रुपांतर मग आखडपेचीत होते. जो पटकन आखडुन पतंग खेचुन् घेतो त्याला अर्थातच् दोन्ही पतंग मिळतात. ही गोत असहसा कुणाला आवडत नाही, काही लोक जाडधागे वापरुन मुद्दाम् अश्या गोती घेउन् दुसर्‍याचे पतंग हडपायचेही प्रयत्न करतात. बर्‍याचदा दोन्ही पतंग मध्येच कुठेतरी राहतात, खेचाखेची एकाचा मांजा तुटुन पतंग् दुसर्‍याला मिळते किंवा कुठेतरी अडकुन पडते.

-Nile

हापस - प"तंग"

योगप्रभूजी, हापसचा वापर आवडला. बोली भाषेची गोडीच निराळी!

अवांतर- प"तंग" आकाराने वाढत नाहीत. त्यामुळे त्या उपमा क्षणीक आहेत.

अट्ट्या

"अरे, लै अट्ट्या सोडत व्हता त्यो!" - खास नगरी वाक्य!

लेख

उत्तम सचित्र लेख. नाईल, धम्मकलाडू यांच्या प्रतिक्रिया अत्यंत मनोरंजक.

- हातभर बदवण्याकरता भुकेल्या पोटी माध्यान्ही उन्हाची तिरीप सहन केलेला.

संदर्भ

>>हातभर बदवण्याकरता भुकेल्या पोटी माध्यान्ही उन्हाची तिरीप सहन केलेला.>>
हा संदर्भ नाही कळला. तो तुमच्या प्रतिक्रियेचा भाग आहे असे वाटले म्हणून विचारले.

स्पष्टीकरण

"हातभर बदवणे" = पतंग हातभर तरी वर जावी (की जावा !?) म्हणून प्रयत्न करणे. असे कधीकाळी केल्याची आठवण जागी झाली म्हणून "तसे केलेला मी" अशी स्वाक्षरी जोडली.

मराठवाड्यात पतंगाच फँड नायी आता

पतंग उडवायचा जमाना गेला राव. . आजकाल सगळे व्हर्चुअल खेळ खेळतात. .

हम्म

>>>मराठवाड्यात पतंगाच फँड नायी आता
मराठवाड्याचं म्हैती नै. पण, औरंगाबादेत संक्रातीच्या दुस-या दिवशी लै धूम राहते.
येताय का मकब-याजवळ माझ्याशी पेज घ्यायला. :)

-दिलीप बिरुटे

+१

हेच म्हणतो. औरंगाबादेत माझ्या आठवणीत जाम रंगीत आकाश आहे संक्रांतीचं. सद्य परिस्थिती काय ते ठाऊक नाही.

उडवतात हे नक्की

नाही राहुल. आजही खूप पोरं पतंग ऊडवतात. पुर्वी इतका वेळ नसेल देता येत त्यांना पण उडवतात हे नक्की.

वाचकजनहो, धन्यु!

वाचकजनहो, लेख लिहायला घेतला तेव्हा एकहाती संपवायला २ तास लागले. संपला तेव्हा तो उपक्रमींना आवडेल ह्याची जाणीव झाली होती. पण इतका भरभरुन प्रतिसाद आणि तोही समरस (एंपथी) होऊन! खूप आभारी आहे!

नगरी लोक नगरचा म्हणावा इतका विकास होऊ शकला नाही म्हणून फटाफट संधी मिळताच बाहेर पडले आहेत. मी २०-२५ वर्षांपूर्वी नगर सोडले. पण आठवणी त्या आठवणीच! ह्यावेळी संक्रांत शनीवारी आहे म्हणून मित्र बोलवत आहेत. त्या सगळ्या आठवणी दाटून येऊन हा लेख लिहायला घेतला व मनाला हलके वाटले.

धन्यु!

लेख आवडला

खूपच छान लेख. मला यातील बरेच शब्द माहिती नव्हते. पण आमचे मुख्य काम पतंग धरून वर उडवण्याचे. बाकी भाऊ करीत असे. पतंग कटवत असताना बघायला आवडत असे. दुसरा पतंग उडवणारा दिसतही नसताना पतंग कटवत असत त्याचे खूप आश्चर्य वाटत असे. आकाशात आला की कोणीतरी कटवणार हे गृहितच धरलेले असे.

वरचं वारं

कोल्हापूरात थोडा वेगळा शब्दप्रपंच आहे. शेपटी असलेल्या पतंगाला नागीन म्हणतात . मोठ्या बिनशेपटीच्या पतंगाला जम्बो , थगाड्या. वयानं मोठी मुलं नागीन उडवत नाहीत. असेच सूत , आट्या , हेंडकूळ , कण / कनवणे , गोत मारणे , पतंग तळपणे , तळपी काढणे , ताण असणे/ नसणे ,पोट येणे, वरचं वारं लागणे वगैरे शब्दप्रयोग आहेत.

वरचं वारं

कोल्हापुरी शब्द कडक आहेत.

वरचं वारं लागणेला थाप लागणे म्हणतात. दुपारी दोन प्रकारचे वारे वहात असते- एक आडवं आणि त्याच्या वर- साधारणपणे १०० ते २०० मीटरवर- दुपारच्या उन्हाने हवा तापुन वर-वर जात असते. ह्या आडव्या वा-याने पतंग नेहमी सारखा उडतो. पण त्यावरच्या वा-याला लागला की, अक्षरशः ९० अंशात वर जातो. अशा वेळी गोती लागुन जर पतंग कटला तर तो कित्येक किमी लांब जाऊन पडल्याची उदाहरणे आहेत. नगरच्या आजुबाजुच्या गावात असे कटलेले पतंग जातात.

लफ्फू आणि बिलींग

आणखी दोन शब्दः

पतंगाचे वर्णन-
लफ्फू: लफ्फू पतंग खूप ढीली असते. त्याच्या कामटीची साइज आणि तावाचा आकार ह्याचा रेशो बिघडलेला असतो. त्यामुळे ही पतंग हवा तो ताण निर्माण करु शकत नाही. ज्या पोरांना पतंग कशी विकत घ्यायची हे कळत नाही ते, असली पतंग घेऊन येतात.

बिलींगः म्हणजे गोत खूप लांबवर नेऊन किंवा खूप उंचावर नेणे. हे तेव्हाच शक्य होते, जेव्हा दोन्ही काटकरी तगडे असतात. त्यांच्याकडे खूप मांजा असतो. त्यामुळे ही गोत लवकर निर्णायक होत नाही. मग जो शेवटी जिंकतो, तो म्हणतो, "अरे, लै बिलींगला नेऊन कापला त्याला".

छतरणे आणि उखडणे

पेचा लढवण्यासाठी आपला पतंग दुसऱ्या पतंगाच्या वर न्यायचा. मग तो मुरकवून खाली आणायचा. आणि मग होऊन जाऊ द्या. खीचतानीच्या किंवा खेचाखेचीच्या पेच्यात मजा नाही. पेचा कसा विलंबित ख्यालाचा हवा. (उस्ताद अमीर खान ह्यांचा विलंबित ख्याल गृहीत धरावा) असा पेचा लडवण्यासाठी पतंगबाजाकडे भरपूर सद्दी, मांजा हवा आणि, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, कलेजा हवा. त्यासाठी नेहमी अगदी २-३ चक्र्या तयार हव्या.

कधी वारा एवढा जोरात आणि अनुकूल असतो की पतंग छतरू लागतो. आणि कधी कधी तर पार उखडतोही. शेवटी तलम कागदच तो.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

शब्द!

हे शब्द बरोडा, अहमदाबादमधील आहेत का?

एकच गोष्ट राहिली..

एकाच गोष्टीचा उल्लेख राहिला.ती म्हणजे रात्रीच्या वेळी पतंग उडवणे. त्यात मग मांजाला एक आत छोटी मेणबत्ती असलेला जिलेटीन चा कागदी दिवा टांगून भरपूर ढील देणे व तो दिवा उंच दूर दूर जातांना सगळे उत्सुकतेने बघतात . मेणबत्तीच्या ज्योतीने धागा ही जळता कामा नये,वाराही नेमका हवा तितकाच असायला पाहिजे दिवा ही जळून खाक होता कामा नये वा वार्‍याने विझूनही जाउ नये. हा एकदम स्पेशलिस्ट लोकांचा उद्योग असल्याने व त्यामुळे जरा कमीच पाहायास मिळे. अकोल्यात पश्चिमेकडे जुन्या शहरात उडवले जाणारे असे दिवा वाले पतंग शहराच्या पूर्वे कडच्या आमच्या घरावर जवळ दिसत,म्हणजे दिवा आकाशात हलतांना दिसत असे. तो नीट दिसावा म्हणून आम्ही मित्र रात्री भटकत असु.

इथे सौदी अरेबियात चिनी बनावटीचे पतंग उडतांना पाहिले आहे पण अजून उडवून् पाहिले नाहीत. हा लेख पाहिल्यावर जरा सुरसुरी आली आहे , आज जातोच.

प्रकार नावडता होता

>>>मेणबत्तीच्या ज्योतीने धागा ....त्यामुळे जरा कमीच पाहायास मिळे.>>>

हो, ती भीती नेहमीच असे व त्यामुळेच त्या वाटेला गेलो नाही. पण मुळात नुसती पतंग ऊड्वायची आणि नुसती स्थिर धरुन ठेवायची ही कल्पना सहनच काय विचारही करण्यासारखी नसे म्हणूनही हा प्रकार नावडता होता.

मेनबत्ती

पतंगबाजी लै केली आहे. पण साला, हा मेनबत्तीचा प्रयोग कधी जमलाच नाही.
काय टेक्नीक असतं कोणी समजावून सांगितलं तर यंदा ट्राय मारुन पाहतो.

-दिलीप बिरुटे

पावसाळ्यात पतंग

पुण्यात पावसाळ्यात पतंग उडवतात. - ह्या पेक्षा मोठा विनोद दुसरा नाही. :-)

 
^ वर