आभाळा येवढा- श्री नानाजी देशमुख

वरील मथळ्याचा लेख कालनिर्णयाच्या दिवाळी अंकात मी वाचला. एखाद्या विषयाचा लेख आपण तेव्हाच वाचतो जेंव्हा त्यात आपल्याला रस असतो. नानाजी देशमुख हे नाव माझ्या नेहमीच वाचनात होते माझ्या वयाच्या १० वर्षापासुन. नंतर् ते अतर्धान पावले. माझ्या लहानपणी निवडणुक आली की बिल्ले वाटत असत आणि ते बिल्ले मिळवण्यासाठी आम्ही मुले त्या सायकल रिक्षाच्या मागे पळत असु. त्यावेळी काँग्रेस व जनसंघ हे दोनच पक्ष आम्हाला माहित होते. ही गोष्ट आहे १९६०-६२ ची माझे वय त्यावेळी होते १०-१२ वर्षाचे. काँग्रेसचे नेहरु चाचा व जनसंघाचे नानाजी देशमुख हेच आमचे दैवत. नंतर मात्र यातली गंमत गेली कारण आम्ही पोटापाण्याला लागलो आणी आज वयाच्या ६० व्या वर्षी हा लेख वाचनात आला आणी नवीन पिढीला माहीती व्हावी म्हणुन आज ही माहिती नविन पिढीला मिळावी या उद्देशाने हा उपद्व्याप. दत्तप्रसाद दाभोळकरांचा हा लेख साभार त्यांच्याव शब्दात देत आहे.

" आनंद यात्री म्हणुन आजन्म प्रवास करणारा हा कर्मयोगी थकत चालला होता. विनोबाच्या भाषेत " सूर्य काहीच करत नसतो, पण तो तिथे असतो म्हणुन आपल्यासकट सारेजण नकळत कुठल्यातरी कामात गुंततात, त्याचे नुसते असणे महत्वाचे असते."

१९९५ मध्ये कालनिर्णय सांस्क्रूतीक दिवाळी अंक यासाठी दत्तप्रसाद दाभोळकर यांनी नानाजींची सविस्तर मुलाखत घेतली होती. नानाजींनी एवढी सविस्तर काय , स्वतःच्या आयुष्याबद्दल जुजबी मुलाखतसुध्दा, भारतात आणखी कुणाला दिलेली नाही. ते नानाजींना 'वाट्टेल ते' प्रश्न विचारीत होते. १) दिनदयाल उपाध्याय यांचा खुन तुम्ही केला असे आपण पुरव्यासकट बोललो आहे, असे बलराज मधोक म्हणतात त्याचे काय? २) महात्मा गांधीचा खुन झाला त्या वेळी दफा ३०२ खाली तुम्हाला अटक केली होती. ३) महंत दिग्विजय व नथुराम गोडसे यांची भेट तुम्ही घडवून आणली आणी गोडसेकडील पिस्तुल त्या वेळी महंतानी दिले, असा आरोप होता. हे कसे घडले? ४) आणीबाणीच्या वेळी, माझ्या स्वयंसेवकांना त्रास देणार्‍यांना मी संपवेन असे तुम्ही म्हणाला होता. आणि म्हणुन संजय गांधीच्या विमानाला अपघात झाल्यावर तुमची वरिष्ठ अधिकर्‍यांनी फार कसून चौकशी केली होती त्याचे काय? ५) आणि एकदा जनसंघाच्या एका अधिकार्‍यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यावर , आता मी काय प्रायश्चीत्त घ्यावे, म्हणुन त्याने बैठकित विचारल्यावर , तुम्ही त्याला वरुन उडी मारुन जीव दे, असे सांगितले व त्याने तशी उडी आमच्यासमोर मारली असे सांगणारे स्वयंसेवक खरे बोलतात की खोटे?

नानाजी शांतपणे हसत या सर्व प्रश्नांना उत्तरे देत होते.

मधु लिमये आणि नानाजी देशमुख हे दोघेही विलक्षण ताकदीचे मात्र पुर्णपणे वेगळ्या, खरेतर परस्पर विरोधी विचारधारा बरोबर घेऊन , दोघेही आजन्म कार्यरत राहीले. केवळ विचारधाराच नव्हे तर जीवन शैली, कार्यपध्दती यातही या दोघांत फरक होता. मात्र अनेकांना माहित नसेल. दोघे मित्र होते. किमान त्या दोघात कायम एक संवाद होता .त्यालाही एक कारण संभवते. जनता पक्षाची यशस्वी पण नंतर पार फसलेली खेळी दोघे बरोबरीने खेळले. खरेतर ते दोघेही त्याचे प्रमुख शिल्पकार होते. बलाढ्य काँग्रेस चा त्यांनी खुळखळा करुन वाजवला किंवा काँग्रेसच्या तुतारीची पिपाणी करुन दाखविली! आणि नंतर जवळजवळ एक्दमच दोघांनी राजकारणाचा संन्यास घेतला.

दाभोळकरांच्या शब्दात "नानाजीनी राजकारण का सोडले, याचा उलगडा एकदा अचानक झाला. मी, विजय तेंडुलकर आणि प्रशांत दिक्षीत काही वेगळ्या कामासाठी एकदा मधु लिमयेंकडे गेलो होतो . आमचे काम बाजुलाच राहिले. लिमये प्रचंड अस्वस्थ होते, आतून उद्ध्वस्थ झाल्यासारखे. लिमयेंच्या हातात 'हवाला' चे कागद होते. अडवाणींपासून शरद यादव पर्यंत सर्वांनी हवाला रैकेट मधून प्रचंड पैसे घेतले होते. आणखी अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे 'हवाला' मधून त्यांना पैसे देणारी मंडळीच हवालामधून काश्मीर आणी पंजाब मधील आतंक वाद्यांना पैसे देत होती! लिमयेंनी अस्वस्थ होऊन रज्जुभैयांपासुन सर्वांना पत्रे पाठविली. एकानेही लिमयेंच्या पत्राला साधी पोचसुध्दा दिली नाही. लिमये म्हणाले, "दाभोळकर, आता मी नानाजींना सविस्तर पत्र लिहितो. पत्र घेऊन त्यांच्याकडे जा. त्यांच्याकडुन उत्तर लिहून घ्या आणि मग माझ्याकडे या."

पण खचलेले लिमये चार-पाच दिवसांत अचानक गेले. तेंडुलकर म्हणाले "हा या देशातील हवालाचा पहिला बळी आहे. दुसरा बळी आपली लोकशाही१" मी नानाजींकडे गेलो त्यांना म्हटले " लिमये तुम्हाला पत्र देणार होते. ते पत्र आता माझ्याकडे नाही. पण त्या पत्रात काय होते, हे मला माहीत आहे. कारण तो मजकुर त्यांनी मला तेंडुलकर, दीक्षित यांच्या समोर सांगितला होता !" नानाजी शांतपणे म्हणाले, " त्या पत्रात काय असणार, याची मला जाणीव आहे, तो मजकूर काय होता , हे तुला सांगतो ! लिमयेंना हवालाबद्दल विचारायचे असणार! खरं सांगु, लिमये माझ्यापेक्षा खूप अधिक बुध्दिमान आणि अभ्यासू आहेत. पण व्यवहारज्ञ्यान आणि माणसे वाचणे , यात मी त्यांच्यापेक्षा उजवा होतो! या देशातील राजकारण या मार्गाने जातेय हे लिमयेंना आज समजलय! मात्र या देशातील राजकारण फक्त याच मार्गाने जातेय आणि जात राहिल हे मला अस्वस्थ करीत १९७७ मध्येच समजले. म्हणुन मी राजकारण सोडले. या मार्गाने या देशाचे काहीही भले होणार नाही. आजचे सारे पक्ष अगदी भाजपसुध्दा या सत्तेसाठी वखवखलेल्या लोकांच्या टोळ्या आहेत!"

लेखनविषय: दुवे:

Comments

चांगली माहीती...

लेख आवडला. काही प्रश्न पडले: आपण हा लेख १९९५ सालच्याच कालनिर्णय दिवाळी अंकात वाचलात का तो आता परत कुठेतरी पुर्नप्रकाशित झाला आहे?

मधु लिमये आणि नानाजी देशमुख हे दोघेही विलक्षण ताकदीचे मात्र पुर्णपणे वेगळ्या, खरेतर परस्पर विरोधी विचारधारा बरोबर घेऊन , दोघेही आजन्म कार्यरत राहीले. केवळ विचारधाराच नव्हे तर जीवन शैली, कार्यपध्दती यातही या दोघांत फरक होता. मात्र अनेकांना माहित नसेल. दोघे मित्र होते.

त्याचे एक कारण दोघांना एकमेकांच्या प्रामाणिकपणावर संशय नव्हता आणि एकापेक्षा भिन्न आणि तरी देखील प्रामाणिक विचारसरणी असणे हे मान्य् होते. असे परीपक्व विचार/आचार आता फारच दुर्मिळ आहेत.

लिमये माझ्यापेक्षा खूप अधिक बुध्दिमान आणि अभ्यासू आहेत. पण व्यवहारज्ञ्यान आणि माणसे वाचणे , यात मी त्यांच्यापेक्षा उजवा होतो!

या दोन्ही संदर्भात लिमयांच्या दोन ऐकीव गोष्टी आठवल्या. एकदा नेहरू अशा अर्थाचे म्हणाले होते की "संसदेचे ग्रंथालय केवळ एकाच व्यक्तीने आजपर्यंत खर्‍या अर्थाने वापरले आहे, ते म्हणजे लिमयांनी." त्यांच्या इतकी सांसदीय माहीती असलेली व्यक्ती नंतरच्या काळात देखील विरळाच होती... इंदीरा गांधी जेंव्हा नेहरूंनंतर राजकारणात आल्या तेंव्हा ते (आणि इतर समाजवादी) त्यांना "गुंगी गुडीया" असे संबोधू लागले. त्यावेळेस यांना इंदीरा काय चीज आहे हे समजलेच नाही असे म्हणत अत्र्यांनी त्यांची (अत्रे स्टाईलमधे) "अधू बुद्धीचा मधू" असे म्हणून संभावना केली होती.

उद्याचे कलियुग

उद्याचे कलियुग आजच्या पेक्षा भयानक असते. म्हणुन आपण दम नाही तोडायचा. आपल्या परीने कर्म (चांगले) करत रहायचे. बाकी ईश्वराधीन. हरी ॐ.

लेख आवडला

लेख थोडासा विस्कळीत वाटला पण आवडला.
नानाजी देशमुख नावाची कुणी व्यक्ती होती हेच मला माहित नव्हते. :-( घोर अज्ञान, दुसरे काही नाही.

फुल बॉडी स्कॅनिंग मशीन संसदभवन, विधीमंडळ, लोकसभागृह, राज्यसभागृह वगैरे वगैरे ठिकाणी किती आवश्यक आहे त्याची पुन्हा जाणीव झाली. ;-)

असेच म्हणतो

असेच म्हणतो.

(पूर्ण राजसंन्यास हाच एकमेव मार्ग नसावा, असे वाटते. माणसे वाचून, ती स्खलनशील आणि काहीशी स्वार्थी आहेत असे समजूनही राजकारणात राहाता येत असावे.)

वैराग्य

पूर्ण राजसंन्यास हाच एकमेव मार्ग नसावा, असे वाटते. माणसे वाचून, ती स्खलनशील आणि काहीशी स्वार्थी आहेत असे समजूनही राजकारणात राहाता येत असावे.

पूर्ण राजसंन्यास हाच एकमेव मार्ग नाही या धनंजय यांच्या मताशी सहमत आहे परंतु प्रत्येक व्यक्तीची मानसिकता वेगळी असल्याने त्यापैकी काही व्यक्तिंना नापसंत कारभार पाहून वैराग्य येण्याची शक्यता आहेच.

नानाजी देशमुख

आपण हे नाव ऐकले नाही याचे कारण कदाचित आपण जनता पार्टी स्थापन झाल्यानंतरच्या कालातील असाव्या. दाभोळकरांच्या च शब्दात "नानांजींनी राजकारण पूर्णपणे सोडले हे खरे की खोटे? नानाजी राजकारणात राहिले असते तर अडवाणी की बाजपायी या संभ्रमात परिवार राहिला नसता हे खरे की खोटे? राजकारणाचा पूर्ण सन्यास घेतल्यावर नानाजींनी राज्यसभेचे खासदारपद का स्वीकारले? ती परिवाराची अपरिहार्य गरज होती म्हणून ? महत्त्वाचे म्हणजे राजकारण संन्यास घेतल्यावर इंदिराजींच्या हत्त्येनंतर, सर्वांनी पक्ष विसरुन राजीवजींच्या मागे उभे राहावे, असे मत प्रदर्शन त्यांनी कां केले? एका ज्येष्ट स्वयंस्वेवकाने असे बोलणे चूक आहे, असे सरसंघचालक म्हणाल्यावर्ही नानाजी आपल्या मताशी पक्के राहिले? प्रश्न अनेक आहेत. पाहिजे तसे उलगडावेत असे. पण एक मात्र नक्की खरे. राजकारणाकडे पाठ फिरविल्यावर , सत्तेचे कुठलेही पद जवळ नसताना नानाजींचा सत्तेच्या वर्तुळात दबदबा होता. नानाजी संघाचे म्हनजे सनातनी हिंदू ही अनेकांची धारणा. पण नानाजींनी शरिरदान केले होते. ते सावरकरांना जमले नाही . ना. ग. गोरेंनी केलेले असूनही त्यांच्या नातेवाइकांनी करावयास दिले नाही. मधू लिमयेंनी इच्छा असूनही चंपाताईंना आवडणार नाही, म्हणून त्यांनी केले नव्हते.

नानाजी कोण होते? चाणक्य? चंद्रगुप्त? की काहीजण म्हणतात तसे, चाणक्य आणि चंद्रगुप्त एकाच कुडीत बसविण्याचा वेडा ध्यास त्यांच्याकडे होता? की नानाजी होते समाजसुधारक , किंवा कृतीशूर विचारवंत? खरे सांगतो . मी या शब्दांच्या चकव्यात सापडून नानाजींना समजावून घेण्याचा प्रयत्न केव्हाच थांबवलाय. कारण मला माज्यापुरते नक्की समजलंय. नानाजी हा माणूस शब्दांच्या चिमटीत अजिबात न मावणारा-आभाळायेवढा."=दत्तप्रसाद दाभोळकर.

विश्वास कल्याणकर

लेख आवडला.

अशा स्वरूपाचे आणाखी लेख वाचायला आवडेल. नानाजी देशमुखांच्या कार्याबद्दल आणखी सविस्तर लिहिता आले तर पाहावे.

संन्यास

नानाजी देशमुख हे जसे जनसंघ-जनता पार्टी या प्रवासात एक दुसर्‍या स्तरावरचे पुढारी होते.

माझ्या आठवणीत त्यांनी राजकारण संन्यास घेतला तो 'वय' झाल्याने. राजकारणातही साठ हे निवृत्तीचे वय असावे अशी त्यांची भूमिका होती. त्यावेळचे महत्वाचे पुढारी (मोरारजी, चरणसिंग, जगजीवनराम, जयप्रकाश नारायण) कधीच साठी ओलांडून गेले होते. त्यांचे हे मत कोणीच मनावर घेतले नाही. त्यानंतर त्यांनी लोककारणाचा प्रवास सुरू केला. यात ते फारसे यशस्वी झाले नाहीत अशी माझी समजूत आहे.

मधु लिमये यांचा राजकारण संन्यास हा जवळपास त्यांनी ओढवून घेतला होता. जनता पार्टी फोडण्यात त्यांचा मोठा हातभार होता. अशा वेळी ते ज्यांच्याबरोबर (चरणसिंग) होते त्यांची प्रतिमा काही धुतल्या तांदळासारखी नव्हती. यात इंदिरा गांधींनी डाव साधून घेतल्याने चरणसिंग आणि मधु लिमये एकाकी झाले. मधु लिमयांनी त्यानंतर राजकारण केले. त्यांचे जुने सहकारी आणि शिष्य म्हणजे जॉर्ज, मुलायम आणि लालू यांचा जनता दलाचा प्रवास कायम राहिला. काही वर्षे तरी त्यांना यात मोठे यश मिळाले.

राजकारणात दोघांनीही इतकी वर्षे काढली होती की गैरप्रकार त्यांना अज्ञात होते असे म्हणणे बरेचसे धाडसाचे ठरेल. त्यातल्या त्यात हवालाची भानगड अशी की त्यावर कुठलाही खटला नीटसा चालू शकला नाही. (यापूर्वीच्या भानगडी कदाचित यापेक्षा जास्त गंभीर असाव्यात. )

या दोघांची वैयक्तिक मैत्री असणे हे शक्य आहे. पण राजकारणात त्यांची निश्चित दुष्मनी होती. (मधु लिमयांनी जनता पार्टीतील दुहेरी सदस्यत्वाचा मुद्दा पहिल्यांदा उपस्थित केला. रा.स्व.स. आता बरखास्त करा अशी मागणी केली होती.)

प्रमोद

थोडे अधिक...

माहीतीपूर्ण प्रतिसाद.

माझ्या आठवणीत त्यांनी राजकारण संन्यास घेतला तो 'वय' झाल्याने. राजकारणातही साठ हे निवृत्तीचे वय असावे अशी त्यांची भूमिका होती.

(आधी लिहीलेले) सगळ्यांशी मिसळून वागणार्‍या नानाजींना रा.स्व. संघातील असूनही लोहीया पण दूर नव्हते आणि विनोबा पण. १९४८ साली संघावर नेहरूंनी बंदी घातलेली असताना, त्यांच्याच मंत्रीमंडळातील रफी अहंमद किडवई यांच्या घरातून त्यांनी भूमिगत काम चालू ठेवले होते. मात्र अशा अनेक गोष्टींपेक्षा खर्‍या अर्थाने लक्षात ठेवण्याजोग्या दोन गोष्टी आहेतः एक म्हणजे वयाच्या पासष्टीला आलो आहे तेंव्हा नवीन लोकांना राजकारणात स्थान मिळावे म्हणून मंत्रीपद मिळत असूनही निवृत्त झाले ते आणि नंतरची ३० वर्षे केलेले दिनदयाळ रिसर्च इन्स्टीट्यूटचे काम - ज्याचे एक फळ म्हणजे चित्रकूटचा पहीला टप्पा.

त्यानंतर त्यांनी लोककारणाचा प्रवास सुरू केला. यात ते फारसे यशस्वी झाले नाहीत अशी माझी समजूत आहे.

याबाबत मात्र मी जरा वेगळे ऐकलेले आहे. त्यांनी चित्रकूट,मध्यप्रदेश येथे दिनदयाळ रिसर्च इन्स्टीट्यूट स्थापली. शेती, आरोग्य, उद्यमशीलता, शिक्षण आदी विषयांसंदर्भात त्यांनी अनेक सामाजीक प्रकल्प चालू केले आणि यशस्वी करून दाखवले. येथे जाऊन आलेल्यांकडून देखील बरेच काही ऐकलेले आहे.

माझ्या माहितीप्रमाणे

१९४८ साली संघावर नेहरूंनी बंदी घातलेली असताना

माझ्या माहितीप्रमाणे संघावर बंदी तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेलांनी घातली होती.

बाकी, या फेब्रुवारीतच नानाजींचे निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. त्यांनी केलेले काम खूप मोठे आहे. काही अधिक माहिती इथे
आणि इथे वाचा.

 
^ वर