ब्लॅक फ्रायडे

निवेदनः

  1. खालील चर्चा अनुराग कश्यप यांच्या ब्लॅक फ्रायडे या चित्रपटाबद्दल नाही. सदर चित्रपटाबद्दल येथे चर्चा अपेक्षित नाही.
  2. ही चर्चा मुख्यत्वाने अमेरिकास्थित सदस्यांसाठी असण्याचा संभव आहे.
  3. ही चर्चा खरेदीत रुची राखणार्‍या सदस्यांसाठी असण्याची शक्यता आहे.

वरील विधाने लागू नसणार्‍या सदस्यांनी चर्चेकडे दुर्लक्ष करण्यास हरकत नाही.

-----------

थँक्स गिविंगनंतरचा शुक्रवार अमेरिकेत ब्लॅक फ्रायडे म्हणून ओळखला जातो. थँक्स गिविंगनंतर येणार्‍या ख्रिसमससाठी भेटी-गाठींची खरेदी वगैरे करण्यासाठी या दिवशी ग्राहकांची झुंबड उडते. अनेक मॉल्स आणि दुकाने या दिवशी मध्यरात्री उघडली जातात किंवा पहाटेच्या दरम्यान उघडतात. अनेक उत्साही खरेदीदारही रात्रीपासून दुकानांबाहेर रांगा लावून चांगले डील मिळवण्यासाठी उत्सुक असतात.

दुकानांनीही डोअरबस्टर सेलची जाहीरात करून ग्राहकांना आधीपासूनच आकर्षित करून ठेवलेले असते. बाहेर थंडीत कुडकुडत उभ्या असलेल्या ग्राहकांना दुकान उघडल्यावर किंवा उघडण्याआधी डोनट्स आणि कॉफी पाजणारे दुकानदारही दिसतात. कुटुंबातील व्यक्ती विभाजित होऊन वेगवेगळ्या दुकानांत जाऊन गोष्टींचा भाव बघून योग्य वस्तूंची योग्य भावात खरेदी करतात असे पाहिले आहे.

असो. तर चर्चा अशी आहे की

१. तुम्ही ब्लॅक फ्रायडेच्या दिवशी उत्साहाने खरेदीस जाता का?
२. नेमकी कोणती खरेदी करायची याची यादी तुम्ही करता का? www.blackfriday2010.com वर फेरी मारता का?
३. कोणत्या खरेदीत तुम्हाला रुची असते? (जसे, इलेक्ट्रॉनिक्स, कॅमेरा, कपडे, गृहसजावट वगैरे)
४. या खरेदीच्या निमित्ताने गंमतीशीर प्रकार तुमच्या अनुभवास येतात का?
५. अशा विक्री किंवा सेलमधून ग्राहकांची फसवणूक होते, चांगली डील्स मिळतात, मनपसंत खरेदी होते असे तुम्हाला वाटते का?
६. अंदाजे किती डॉलर्सची खरेदी तुम्ही करता किंवा केली आहे?

या दिवशी होणार्‍या उलाढालीवरून अमेरिकेच्या अर्थकारणावर होणार्‍या परिणामांवर प्रश्न टाकलेला नसला तरी चर्चा त्या अंगाने गेल्यास हरकत नाही.

Comments

४. कृपया ही

४. कृपया ही चर्चा श्रद्धा व अंधश्रद्धा या दिशेने वळवू नये.

हे राहिलंच... :)

आजकाल, म्हणजे गेली अनेक वर्षं मी या सेल्सच्या भानगडीत पडलेलो नाही. एकंदरीतच घरात वस्तु खूप जास्त झालेल्या असल्यामुळे खरेदीच बेताची करावी असा सध्या माझा कल असतो. त्यात भल्या पहाटे चार वगैरे वाजता उठून दुकानात जाणं (किंवा एकंदरीतच इतक्या लवकर उठून काहीही करणं) यासाठी जो उत्साह लागतो तो माझ्यात नाही. पण जेव्हा एकदोनदा मी गेलो आहे, तेव्हाचे माझे काही अनुभव.

काही डीलं चांगली मिळाली. बहुतांशी इलेक्ट्रॉनिक वस्तू वगैरे (ब्लॅंक सीडी फुकट, काही सॉफ्टवेअर, हार्डवेअर अतिशय स्वस्त) काही बाबतीत थोडंसं गंडायला झालं. म्हणजे फसवणूक या अर्थाने नाही. तर बऱ्याच गोष्टींसाठी रिबेटचं कुपन, रिसिटसकट पाठवायचं असतं. ती नक्की किती पाठवली, आणि त्यातली किती आली याचा हिशोब नाही. पण रिबेट कुपनांबाबत काही ग्राहक किमतीला भुलणार आणि आळशीपणाने ते पाठवायला विसरणार हे गृहित असावं.

या वर्षी जायचा बिलकुल इरादा नाही. पण बाकीच्यांनी जाऊन इकॉनॉमी सुधरवावी असं मनापासून वाटतं.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

हाहा!

नं.४ चा मुद्दा मस्ट होता, विसरले कशी कोणजाणे? आठवण करून दिल्याबद्दल आभार.

मी दरवर्षी नित्यनियमाने खरेदीला जाते. काही घ्यायचं असतं म्हणून नाही पण भल्या रात्री लगबग बघायला मजा येते. एके वर्षी असेच काहीच घ्यायचे नव्हते किंवा जे हवे होते ते सेलवर नव्हते म्हणून घेतले नाही पण परततेवेळी आठवण झाली की घरातले कांदे संपले आहेत. तेव्हा ब्लॅक फ्रायडेच्या दिवशी भल्या पहाटे ६ वाजता मी कांदे खरेदी करून परतले. त्याची अनेक वर्षे आठवण काढून अजूनही आमच्या घरात हसू होते.

सीडी फुकट मिळत होत्या तेव्हा आम्हीही घेतल्या होत्या. अजूनही घरात आहेत पण हल्ली फुकट काही मिळत नाही असे वाटते. :-(

-१

ब्लॅक् फ्रायडे बद्दल तुम्ही बालवाडी, ब्लॉग येथे लिहू शकता. विवेकवाद्यांच्या अड्यावर तुम्ही खरं तर ह्या विषयावर लिहायला हवे!!! ;-)

काळजी नसावी

अमेरिकेतले बहुसंख्य उपक्रमी ब्लॅक फ्रायडेसंदर्भात विवेकवादी नसावेत. ;-)

या वर्षी "एक्स्क्यूझ प्लीज" आहे

या वर्षी काळ्या शुक्रवारी यु.एस.बाहेर आहे. म्हणून अर्थकारणाला मदत करण्याबाबत "एक्स्क्यूझ प्लीज".

मागच्या वर्षी बहुधा खरेदीला गेलो नव्हतो. पण का ते आठवत नाही. (द्राक्षासवाचा अमल?)

त्याच्या आदल्या काही वर्षी गुरूवारचे अती खाल्ल्यामुळे, अती जागरणामुळे ब्लॅक फ्रायडेला खरेदीला जायच्या हालतीत नव्हतो. त्याच्या आधी विद्यार्थीदशेत दारिद्र्य फार होते :-)

बिंग फुटले

अमेरिकेतले बक्कळ डॉ. कमवणारे लोक ब्लॅक फ्रायडेला खरेदी करण्यास उत्सुक नसतात असा निष्कर्ष धनंजय आणि घासकडवींच्या प्रतिसादांवरून होऊ शकतो. अमेरिकेच्या ढासळणार्‍या अर्थव्यवस्थेची गोम येथे तर नाही? ;-)

गल्लत

अमेरिकेच्या ढासळणार्‍या अर्थव्यवस्थेची गोम येथे तर नाही? ;-)

तूर्तास, कार्यकारणभावाची गल्लत होते आहे एवढंच मी मोघमपणे लिहितो.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

+१

बक्कळ डॉ. कमावणारे भल्या सकाळी उठून रांगा लावत नसतात.

कोण्या लक्ष्मीचंद शेठने रेशनच्या लाईनमधुन धान्य खरेदी करण्यास उभे रहावे हे सार्वजनीक अन्नधान्यवितरणसंस्था ज्या आर्थीक कारणाकरता तयार झाली त्या तत्वाच्या विरुद्धच नाही का?

असहमत

बक्कळ डॉ. कमावणारे भल्या सकाळी उठून रांगा लावत नसतात.

असहमत. अशा अनेक लोकांना मी ओळखते. श्रीमंती(चा माज, त्यामुळे येणारा आळस वगैरे) आणि खरेदीचा आनंद लुटणे यांचा परस्परसंबंध नाही.

कोण्या लक्ष्मीचंद शेठने रेशनच्या लाईनमधुन धान्य खरेदी करण्यास उभे रहावे हे सार्वजनीक अन्नधान्यवितरणसंस्था ज्या आर्थीक कारणाकरता तयार झाली त्या तत्वाच्या विरुद्धच नाही का?

ब्लॅक फ्रायडेच्या दिवशी दारिद्र्यरेषेच्या खालील व्यक्तींसाठी कोणत्याही प्रकारचे वितरण होत असल्याचे ऐकिवात नाही. हा सेल समाजातील सर्व स्तरांतील व्यक्तींसाठी आणि सर्व स्तरांतील दुकानांमध्ये असतात. चू. भू. दे. घे. थँक्स गिविंगच्या दिवशी थँक्सगिविंग डीनर वगैरेंचे आयोजन असते. त्याचा या खरेदीशी संबंध नाही. तेथे लक्ष्मीपुत्रांनी फुकट खाण्यासाठी जाऊ नये असे मलाही वाटते.

ब्लॅक फ्रायडेच्या निमित्ताने

अमेरिकेतील माझ्या वास्तव्यात ब्लॅक फ्रायडे हा प्रकार मी अनुभवला होता. त्याच्या जाहीराती वर्तमानपत्रातून सुरू झाल्यानंतर अमेरिकन मंडळी आपण कोठल्या दुकानात जायचे वगैरे ठरवतात. एका वर्षी माझ्या एका स्नेह्यांना डिजिटल कॅमेरा घ्यायचा होता व फ्राईज ची तो 50 डॉलरला या दिवशी मिळेल म्हणून जाहिरात होती. सकाळी उठून दुकानात गेल्यावर असे लक्षात आले की असे फक्त 12 कॅमेरे या किंमतीला विक्रीसाठी होते व ते पहिल्या 2/3 मिनिटात संपले. कॅमेरा घेण्यासाठी एवढे कष्ट करून गेलेला ग्राहक मग रिकाम्या हाताने परत जाणार नाही ही विक्रीचे सूत्र या मागे असते. पुढचे ग्राहक मग असेल त्याच किंमतीला कॅमेरा खरेदी करतात हे ही खरेच आहे. अमेरिकेतील दुकाने सर्व वस्तूच्या किंमतीवर केवढा मोठा मार्क अप लावतात व नंतर त्यावर डिसकाऊंट देऊन ग्राहकांची कशी दिशाभूल करतात हा मोठा संशोधनाचा विषय हो ऊ शकतो. एक उदाहरण देतो.

रॉल्फ लॉरेन या ब्रॅ न्डचे कपडे इंडोनेशिया मधे बनतात. या देशात या ब्रॅ न्डचा शर्ट मी स्वत: 10 अमेरिकन डॉलर्सला खरेदी केलेला आहे. अमेरिकेत हाच शर्ट 50 ते 60 डॉलर्सच्या खाली विकला जात नाही. अशा विशेष प्रसंगी मोठा डिसकाऊंट देऊन हा शर्ट 25 डोलरला उपलब्ध असल्याचे मी बघितलेले आहे. अमेरिकन ग्राहकांची ही दुकाने जेवढी दिशाभूल करतात तेवढी जगात कोठेही होत नसेल.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

रॉल्फ लॉरेन

रॉल्फ लॉरेनच्या वाटेला मी कधीही जात नाही. कपडे खरेदी करण्याच्या बाबतीतले हे माझे नावडते दुकान आहे. कारण हेच, अव्वाच्या सव्वा किंमती आणि त्यामानाने क्वालिटी नाही.

अमेरिकेत कपड्यांच्या किंमती जास्त असतात हे खरे आहे. कपडेही प्रत्येक सीझनप्रमाणे बदलतात. त्यामुळे एखादा कपडा २-३ महिन्यांपेक्षा जास्त काळ विकता येत नाही. या काळात दुकानदार जास्तीत जास्त नफा मिळवतात नंतर त्याची किंमत घटवावी लागते. ती घटत घटत ७०-८०% नी कमी होते. अमेरिकेत इतर वेळेसही कपडे खरेदी करताना जेव्हा ५०% सेल पर्यंत किंमत येते (अनेक डील्स असतात - ५० डॉ खरेदीवर १० डॉ. ऑफ/ आधीच २५-३०% ऑफ, त्यावर एक्स्ट्रा ३०% ऑफ वगैरे.) तेव्हाच खरेदी करण्यात अर्थ असतो.

अनेक शहाणे लोक सीझन गेल्यावर कपडे खरेदी करतात आणि पुढल्या सीझनमध्ये वापरतात. अर्थात, असे करताना आउट-ऑफ-फॅशन कपडे वापरावे लागण्याचा धोका असतो.

आणखी एक गोष्ट आठवली ती अशी की इंडोनेशियात मिळणारा रॉल्फ लॉरेनचा शर्ट आणि अमेरिकेत मिळणारा शर्ट यांच्या क्वालिटीत फरक असू शकतो. किंबहुना, सॅम्स आणि कॉस्टको वगैरेमध्येही अशा कमी प्रतीचे ब्रँडेड कपडे दिसतात. याविषयी एक चांगला लेख येथे वाचता येईल.

संकष्टी

गुरुवारी रानकोंबडी (वारुणीसहित) वर यथेच्छ ताव मारल्यावर शुक्रवारी रामप्रहरी उठून बाजाराला जाण्यार्‍या लोकांबद्दल मला नेहेमीच आदर वाटत आलेला आहे!

असो, ह्यावर्षी गुरुवारी संकष्टी असल्याचे समजते. तेव्हा बहुधा रानकोंबडीऐवजी वरण-भात, साबुदाण्याची खिचडी खावी लागणारसे दिसते!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

तुका म्हणे हरिच्या दासा । शुभकाळ दाही दिशा

खरेदी करण्यासाठी अमुकच दिवस चांगला आणि अमुक दिवस वाईट असे आम्ही मानत नाही. आम्ही कधीच खरेदी करत नाही. :)

(कंजूष) आजानुकर्ण


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

माझ्याशी मयतरी करणारे...

मी अमेरिकास्थित नाही आणि खरेदीत रुचीही राखत नाही, पण पुष्कळ दोस्त अमेरिकास्थित असल्याने नाक खुपसतो. माझ्या दोस्तांपैकी कुणीच या दिवशी खरेदीला जात नाही. मी त्याविषयी त्यांचं मत विचारलं तर बहुतेकांचं मत (खांदे उडवत वगैरे) असं पडलं की ती एक वेगळीच अमेरिका आहे; आम्ही त्या देशातले नाही असं म्हटलं तरी चालेल.

अवांतरः असे खांदे उडवतात म्हणूनच ते (खरेदीत रुची राखत नसणार्‍या) माझे दोस्त झाले असा काही यामागचा कारण-परिणाम परस्परसंबंध असल्यास कल्पना नाही. माझ्या ज्ञानविस्तारासाठी एकदा एका दोस्तानं मला कॉस्कोमध्ये नेलं होतं (ब्लॅक फ्रायडेला नाही). थोड्या वेळानं काहीही खरेदी न करता आम्ही बाहेर आलो (फुकटातली पदार्थांची चव फक्त घेतली!). तिथल्या पांढर्‍याफक्क प्रकाशानं मला मळमळायला लागलं होतं. हे मी दोस्ताला सांगितल्यावर तो म्हणाला 'दे टाळी. मलाही असंच होतं. मला फक्त तुझी प्रतिक्रिया पाहायची होती म्हणून तुला एकदा इथं आणलं. एक प्रॅक्टिकल जोक समज आणि मला माफ कर.' मग यावर उतारा म्हणून आम्ही एका संग्रहालयात जाऊन व्हॅन गॉगची चित्रं डोळे भरून पुन्हा एकदा पाहिली आणि स्वच्छ झालो.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

प्रयोजन कळले नाही

माफ करा पण प्रतिसादाचे प्रयोजन कळले नाही. चर्चेच्या सुरुवातीलाच ज्यांना खरेदीत रुची नाही त्यांनी या चर्चेकडे दुर्लक्ष करावे असे लिहिले आहे. खरेदी ही चित्रकलेप्रमाणेच एखाद्याची आवड असू शकते, गरजही असू शकते.

कॉस्कोमध्ये खरेदीची आवश्यकता भासेल तेव्हा पांढर्‍या प्रकाशाने मळमळणार नाही. कॉस्को आणि सॅम्स क्लबमध्ये सातत्याने खरेदी बहुधा सर्वच अमेरिकन (आणि नाकाने कांदे सोलणारे भारतीयही) करतात आणि बहुसंख्य तिथे मिळणार्‍या मालाबद्दल आणि किंमतींबद्दल समाधानी असतात. प्रत्येकाची खरेदीची निकड वेगवेगळी असू शकते. पुरुषांना कपडे घेण्यात इंटरेस्ट नसेल पण इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये असू शकतो. बायकांचे उलट असण्याची शक्यता असते. मुलांना या दोन्ही गोष्टींत इंटरेस्ट नसतो परंतु खेळण्यांत असू शकतो.

खरेदीला नाकेच मुरडायची असतील तर त्यासाठी अमेरिका आणि कॉस्कोच गाठायला नको. पार्ले पूर्व आणि तुळशीबागेतल्या दुकानांवरही टिका केली की झाले.

कृपया, अशा प्रतिसादांनी ही चर्चा वाचून जे खरेदीला जाऊ इच्छितात त्यांच्या उत्साहावर पाणी नको. ब्लॅक फ्रायडेला कुठे/ कशी/ कसली खरेदी करावी. ती करताना फसवणूक कशी टाळावी किंवा डील्स कशी बघावीत याबाबत चर्चा सुरु आहे.

आतापर्यंत घासकडवी आणि चंद्रशेखर यांचे प्रतिसाद उपयुक्त आहेत. असो.

हॅहॅहॅ

कृपया, अशा प्रतिसादांनी ही चर्चा वाचून जे खरेदीला जाऊ इच्छितात त्यांच्या उत्साहावर पाणी नको.

त्याचा अनुभव न घेताच सारखे म्हणत राहणे व ज्यांना पहायला जावेसे वाटेल त्यांच्या मनांत उगाचच संभ्रम निर्माण करणे हीच खरी जाहिरातबाजी नव्हे काय?

हाहाहा!

जाहिरातबाजी नाही पण उत्साहावर पाणी टाकणे नक्कीच आहे. ;-)

डिस्क्लेमरः ब्लॅक फ्रायडेची चर्चा टाकण्याबद्दल मला कोणत्याही अमेरिकन दुकानाकडून डील मिळालेले नाही. ;-)

क्षमस्व

निरुपयोगी प्रतिसादाबद्दल क्षमस्व. प्रत्येकाची खरेदीची निकड वेगवेगळी असू शकते हे मान्यच आहे. प्रकाटाआ असं समजावं.
कुतुहलः आता ऑनलाईन डील्सच जास्त चांगली नसतात का? पांढर्‍या प्रकाशानं मळमळणारे माझे दोस्त आता बरीच खरेदी घरबसल्याच करतात असं दिसतं.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

ऑनलाइन डील्स

आता ऑनलाईन डील्सच जास्त चांगली नसतात का?

ऑनलाइन डील्स चांगली असू शकतात. तपासली आणि फरक पाहिले तर ते ठरवता येईल. जास्त चांगली असतात का तर ब्लॅक फ्रायडेच्या दिवशी नसावीत. याचे कारण चंद्रशेखर यांच्या प्रतिसादात आहे. इथे कल असा असतो की ग्राहक एकदा दुकानात शिरला की हात हलवत बाहेर येत नाही. (भारतीय हात हलवत बाहेर येण्याचा शहाणपणा दाखवतात. हा आपल्याला गरजेपुरते घ्यावे असे सांगून वाढवले जाते त्याचा परिणाम असावा.) त्यामुळे इन-स्टोअर डील्स अधिक बरी मिळतात.

पांढर्‍या प्रकाशानं मळमळणारे माझे दोस्त आता बरीच खरेदी घरबसल्याच करतात असं दिसतं.

:-) आधी पांढर्‍या प्रकाशाचं लॉजिक बघू. कॉस्टको आणि सॅम्स या दोनच चेन माझ्या राज्यांत असल्याने त्याबद्दल बोलते. ही दोन्ही दुकाने होलसेल वेअरहाउस आणि नो फ्रिल्स या तत्त्वांवर चालतात. त्यामुळे मालाचा भाव कमी राखण्यासाठी अतिरिक्त खर्च (सजावट, दिवे, सोयी, पिशव्या) वगैरे टाळलेले असते. ही दुकाने म्हणजे थोडीशी सॉफिस्टिकेटेड गोदामे आहेत. म्हणूनच तिथे प्रकाशाची सजावट नसते आणि पांढरा प्रकाश फार दिसतो. मला इथल्या प्रकाशामुळे नाही पण प्रथमतः अमेरिकेत आले तेव्हा दुकानाचा लांबच लांब विस्तार, त्यात मिळणार्‍या विविध गोष्टींचे रचलेले थर पाहून छाती दडपल्यासारखे होत असे. आता सवय झाली.

इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी घरबसल्या करणे सोपे असते. एकतर ब्रँड आणि स्पेसिफिकेशन्स पटले की गोष्ट पटते. कपडे, खाणे, खेळणी, अत्तरे इ. इ. गोष्टींना स्पर्श/गंध वगैरे वगैरे अनेक चाचण्या गरजेच्या असतात तेव्हा त्यांची ऑनलाइन खरेदी होईलच असे नाही.

अवांतरः मळमळणार्‍या पांढर्‍या प्रकाशामुळे मला ऋषीकेश (उपक्रमी सदस्य) यांची आठवण झाली. अमेरिकन घरात सहसा दिसणार्‍या मंद पिवळ्या प्रकाशामुळे ते येथे पहिल्यांदा आले तेव्हा बरेच वैतागले होते. त्यांना घरात ट्यूबलाईटची सवय होती. तेव्हा मी त्यांना सांगितले होते की हा सर्व सवयीचा प्रश्न असतो. नंतर आपण सरावतो. :-)

कॉस्टको

श्री. चिंजं यांचा कॉस्टकोचा अनुभव वाचून आश्चर्यच वाटले. मला वैयक्तिक रित्या हे दुकान अतिशय आवडते. अमेरिकेला लॅन्ड ऑफ अफ्ल्युअन्स व प्लेन्टी असे का म्हणतात ते या दुकानाला दिलेल्या एका भेटीवरूनही समजते. या दुकानात खरेदी केलेल्या पॅन्ट्स मी अनेक वर्षे वापरतो आहे. सुप्रसिद्ध ब्रॅन्डस च्या इतक्या स्वस्त पॅन्ट्स सहसा दुसरीकडे मिळत नाहीत. भारताशी तुलना करायची म्हटली तर आज कलर प्लस सारख्या टॉप ब्रॅन्डची पॅन्ट भारतात 2100 ते 2400 च्या घरात मिळते. मग कॉस्टकोमधे मिळणार्‍या डॉकर्सच्या 25 किंवा 30 डॉलर्सना मिळणार्‍या पॅन्ट्स हा एक मोठा डील आहे असे मला वाटते.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

याच किंमतीत

कॉस्टकोमधे मिळणार्‍या डॉकर्सच्या 25 किंवा 30 डॉलर्सना मिळणार्‍या पॅन्ट्स हा एक मोठा डील आहे असे मला वाटते.

चंद्रशेखर, याच किंमतीत किंवा थोड्याशा कमीही. (सुमारे २० डॉ.) तुम्हाला कोह्ल्स मध्येही डॉकर्सच्या पॅन्ट्स मिळतील. फक्त त्यासाठी कोह्ल्सचे कूपन आणि चांगल्या सेलचा दिवस निवडायला हवा. शनिवार सकाळ हा दिवस अर्ली बर्ड अवर्सचा असतो. तो खरेदीसाठी उत्तम.

काळा शुक्रवार

हा माझ्या आणि माझ्या मित्रमंडळाचा अगदी आवडीचा विषय - त्याविषयीच्या धाग्याबद्दल सर्व प्रथम धन्यवाद.
पूर्वी बॅचलर् असताना आणि नंतर् मुलं व्हायच्या आधी नेहेमी सकाळी जायचो सगळे मिळून - अर्थात आदल्या दिवशी जाउन रांगेत उभे रहाणे वगैरे अघोरी प्रकार कधी केले नाहीत पण सकाळी उठून, जॅकेट्स् वगैरे घालून थंडीत कुडकुडत, मित्रमंडळासोबत बाहेर् जायला मजा यायची. आजकाल आधीच् वेगवेगळ्या साईट्स् वर् डील्स् बघून् ठरवतो कि कुठून् 'ऑनलाईन' काय घ्यायच.
माझ मत् अस की 'फसवणूक्' टाळण्यासाठी
- नीट् आधी साईट्स् बघून् ठरवणे कुठे सर्वात चांगले डील् आहे व त्याची यादी करणे
- त्या विशिष्ट गोष्टीची 'नेहेमीची' किंमत माहिती असणे
- इतरांबरोबर् विचार-विनिमय् करुन् कुणी कुठे जायचे ते ठरवणे
- रिटर्न् पॉलिसी नीट् पाहून् घेणे त्याचप्रमाणे वॉरंटी
- रिबेट् बहुतेकवेळा 'एका घरासाठी एक्' असाच असतो - सो तुम्हाला एकापेक्षा अधिक् हवे असेल् तर् पर्यायी व्यवस्था करणे (मित्राला सांगून्)
- रिसिट्स् नीट् जपून् ठेवणे

(अर्थात ह्यातल्या बर्‍याच गोष्टी इतर नेहेमीच्या खरेदीसाठी सुद्धा लागू आहेत).

'ब्लॅक् फ्रायडे' बरोबरच् अलीकडे 'सायबर मंडे' देखिल लोकप्रिय होत आहे.

उत्तम

प्रतिसादासाठी धन्यवाद. तुम्ही दिलेल्या सर्व सूचना आवडल्या.

ज्या गोष्टी हव्यात त्यांची यादी केली की आपल्याला नेमके कुठे पोहोचायचे आहे, कुठल्या दुकानांत जायचे आहे, दुकानात शिरल्यावर कोणता विभाग गाठायचा आहे याची कल्पना येते आणि वेळ वाचवता येतो.

जे विकत घ्यायचे आहे त्याची रेग्युलर किंमत माहित असली तर आपल्याला डील मिळते ते बरे की वाईट हे ठरवता येते. यात आणखी थोडी भर म्हणजे त्याच गोष्टीची किंमत दोन-तीन दुकानांत किती आहे हे बघून घ्यावे.

चांगली डिले तरी सांगा

मी मागच्या वर्षी लॅपटॉप घेतला/मागवला होता. मला ह्या वर्षीच्या काळ्या शुक्रवारी हार्डवेअर मिळणारी चांगली डिले तरी सांगा कुणी. गुगलायचा कंटाळा आला आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

गूगलू नका

वर साईट दिली आहे त्यावर चटकन शोधता येईल. हार्डवेअर म्हणजे नक्की काय हवे आहे?

ब्लॅक फ्रायडे

थँक्सगिव्हिंगच्या दिवसांत मला खरेदी करायला आवडते. ख्रिसमसच्या सुमाराला फार उत्साह नसतो.

१. तुम्ही ब्लॅक फ्रायडेच्या दिवशी उत्साहाने खरेदीस जाता का?

इतक्या वर्षांत तीनदा गेले आहे. एकदा खूप कपडे घ्यायचे म्हणून गेले, आणि आणताना इलेक्ट्रॉनिक वस्तू आणल्या (अर्थात नवर्‍याने).
एकदा नातेवाईकांबरोबर गेले होते. ते वातावरणच मस्त असते. जसे दिवाळीला भारतात पहाटे उठल्यावर मजा वाटते, तसे इथेही वाटते!

२. नेमकी कोणती खरेदी करायची याची यादी तुम्ही करता का? www.blackfriday2010.com वर फेरी मारता का?

यावर्षी केली आहे! नेहमी करीत नाही. वरच्या साईटवर फेरी मारत नाही.

३. कोणत्या खरेदीत तुम्हाला रुची असते? (जसे, इलेक्ट्रॉनिक्स, कॅमेरा, कपडे, गृहसजावट वगैरे)

कपडे, इलेक्ट्रॉनिक्स.

४. या खरेदीच्या निमित्ताने गंमतीशीर प्रकार तुमच्या अनुभवास येतात का?

हम्म.. लोक प्रचंड उत्साहात असतात ते पाहून गंमत वाटते.

५. अशा विक्री किंवा सेलमधून ग्राहकांची फसवणूक होते, चांगली डील्स मिळतात, मनपसंत खरेदी होते असे तुम्हाला वाटते का?

डील्स कधीकधी छान असतात. पण आपण गरजेच्या वस्तू आणणार नसलो तर उगाचच खरेदी करण्याची शक्यता वाढते.

६. अंदाजे किती डॉलर्सची खरेदी तुम्ही करता किंवा केली आहे?

हम्म. एकदा दोनतीन कॅमेरे घेतले होते - घरच्यांनाही हवे म्हणून त्यामुळे भरपूर खरेदी केली आहे.

अनुभवण्यासारखा माहौल

>> १. तुम्ही ब्लॅक फ्रायडेच्या दिवशी उत्साहाने खरेदीस जाता का?
एकदा गेलो आहे.. खरेदीपेक्षा नवा अनुभव घेण्यासाठी. ते वातावरण आवडले होते.

२. नेमकी कोणती खरेदी करायची याची यादी तुम्ही करता का? www.blackfriday2010.com वर फेरी मारता का?
३. कोणत्या खरेदीत तुम्हाला रुची असते? (जसे, इलेक्ट्रॉनिक्स, कॅमेरा, कपडे, गृहसजावट वगैरे)

प्रत्यक्षात त्यावेळची खरेदी ऑनलाईनच करतो.. लाईन लावणे हे फक्त अनुभव म्हणून केले होते.. ऑनलाईन मात्र मी आतापर्यंत इलेक्ट्रॉनिक्स खरेदी केली आहे.. प्रत्यक्षात स्टोरमधे जाऊन बघून मॉडेल पसंत केले होते आणि ब्लॅकफ्रायडेला ऑनलाईन बुक केले होते

४. या खरेदीच्या निमित्ताने गंमतीशीर प्रकार तुमच्या अनुभवास येतात का?

मी एखाद्या गर्दीत आहे आणि ती गर्दी आवरायला पोलिस लागताहेत हा बहुदा माझ्या आयुष्यातील पहिलाच प्रसंग होता ;) एकूण नुभवच गमतीशीर होता. .. उत्साह, शॉपिंग सेंटरचे नकाशे काढून प्लान करणारी टीन एकजर्सची टोळकी, उगाच दंगा करायला आलेली ट्ळकी, माझ्यासारखे उत्सूक, आपल्याला हवी ती वस्तु मिळेल की नाही या शंकेत असणारे (खरतर असणार्‍या) ग्राहक, आणि त्यानिमित्ताने तयार झालेले वातावरण एकदा तरी अनुभवण्याची चीज आहे हे नक्की!

५. अशा विक्री किंवा सेलमधून ग्राहकांची फसवणूक होते, चांगली डील्स मिळतात, मनपसंत खरेदी होते असे तुम्हाला वाटते का?

चांगली डिल्स मिळतत असे वाटते.

६. अंदाजे किती डॉलर्सची खरेदी तुम्ही करता किंवा केली आहे?

डिपेंडस.. जास्तीत जास्त खरेदी $६०० ची केली आहे.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

अबब !

डिपेंडस.. जास्तीत जास्त खरेदी $६०० ची केली आहे.

सहाशे डॉलरचे डिपेंड्स् अंमळ जास्त होतात, असे आमचे प्रामाणिक मत आहे. पण गरजच असेल, तर घेतलेले वाईट नाही.

--
|| बुद्धं सरणं गच्छामि ||

मेटाडिपेंड्स!

डिपेंड्स जास्त होतात की नाही तेही डिपेंड्स :)

ब्लॅक फ्रायडे

विद्यार्थीदशेत एकदा रात्रभर जागून, मग पहाटेच्या कुडकुडत्या थंडीत (पंचावन्न डिग्री फॅ ;)) ब्लॅक फ्रायडेच्या खरेदीसाठी गेलो होतो. तिजोरीतील खडखडाटामुळे फक्त सीडीज् आणि एक स्वस्तातला डिजिटल कॅमेरा इतकीच खरेदी झाली होती. त्यानंतर कधी गेलो नाही.

कॉलेजमधील एका विशिष्ट भाषक मुलांचा उत्साह मात्र अनेक वर्षे अमाप टिकला होता. त्यात मग ज्या गोष्टींवर फार चांगले डील आहे आणि मागणीमुळे ज्या लवकर संपतात, त्या थँक्सगिव्हिंगच्या आदल्या दिवशी रात्री जाऊन दुकानातच कुठेतरी खुणेच्या जागी ठेवणे (उदा. मेमरी कार्ड एखाद्या फुलदाणीत) इ. लीला आणि त्या अनुभवांची देवाणघेवाण, फोनवरून कोणी कुठल्या दुकानातून कुठली वस्तू उचलायची इ. गोष्टी चालत असत. ते पाहून गंमत वाटे.

बाकी वर दिलेल्या दुव्याबरोबरच हा दुवाही उपयुक्त असल्याचं ज्ञान आत्ताच फेसबुकवर प्राप्त झालं :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

धन्यवाद

चित्रा, ऋषीकेश, नंदन प्रतिसादांसाठी धन्यवाद.

नंदनचे मेमरी कार्ड फुलदाणीत लपवण्याचा किस्सा मस्त आहे. अशाप्रकारचे किस्से मी ऐकले आहेत पण प्रत्यक्षात अनुभव नाहीत. ;-)

सायबर मंडे

आम्ही सायबर मंडे वाले लोक.

--
|| बुद्धं सरणं गच्छामि ||

मग?

आम्ही सायबर मंडे वाले लोक.

सायबर मंडेचा बेत काय आहे तेही सांगा की. कुठली डील्स बघून ठेवली आहेत?

कॅपटलिस्ट मूर्खपणा

आजकाल सगळी डील्स ऑनलाईन तेवढ्याच किंवा कमी पैशात (+ टॅक्स फ्री) मिळतात.

तरीही पहाटेच्या थंडीत कुडकुडत उभ्या राहणार्‍या आम जनतेची गंमत वाटते. रेशनच्या रांगांसारख्या, लॅपटॉप आणि कॅमेरे घ्यायच्या रांगा बघून हसायला येते. आम्ही तरी त्यादिवशी सुट्टी असल्याने १०च्या आत बिछाना सोडत नाही.

कुडकुडणारे

तरीही पहाटेच्या थंडीत कुडकुडत उभ्या राहणार्‍या आम जनतेची गंमत वाटते.

मला वाटते कुडकुडणार्‍या लोकांना डीलपेक्षा थ्रील हवे असते. एकदा लाईनमध्ये उभा राहून कुडकुडून आलेला (शहाणा) मनुष्य दुसर्‍या दिवशी जात असेल का याची शंका वाटते.

असो.

ऑनलाईन खरेदीदार शिपिंगचे काय करतात? शिपिंगची किंमत पकडूनसुद्धा माल स्वस्तच पडतो का?

थ्रिलपेक्षा

मला वाटते कुडकुडणार्‍या लोकांना डीलपेक्षा थ्रील हवे असते.

थ्रीलपेक्षा 'किक्' हवी असते.

बहुतांश साइट्सवर 'शिपिंग फ्री' डील दिलेले असते. उदा. बाय.कॉम/ऍमेझॉन.कॉम ($२५+ खरेदी)

माहिती द्या

उद्या काय काय खरेदी करावे ह्याची माहिती द्यावी.

सांगा

खरेदी वगैरे आटोपून मंडळी आता घरी परतली असतीलच. तेव्हा आता कुणाला कुठले डील चांगले मिळाले वगैरे ते सांगावे!

नूक

मी नूक घेतला. सहसा $१४९.९९ ला असतो मला $९९.९९ ला पडला. नेटबूक हवे होते पण सेलमध्ये मिळाले नाही. बाकीची खरेदी साधी होती. मला गृहोपयोगी सामान हवे होते ते मनपसंत मिळाले.

आमच्या इथे

सकाळी बेस्ट-बायला गेलो होतो. आम्ही सव्वापाचला पोचलो, त्याआधी आम्हाला हवे ते कॅमेरे संपले होते!
दुसर्‍या बेस्ट-बायला गेलो तर पार्किंगला जागाही नव्हती. स्टेपल्समध्ये खूपच लांब रांग होती, तेव्हा न थांबता घरी आलो.

नंतर टारगेट मध्ये लहान मुलांचे कपडे चांगले मिळाले. परत सकाळी जरा उशीराने बाहेर पडलो. एक वाजेपर्यंत कपडे, लहान-सहान वस्तू यांची खरेदी चांगली झाली.
जे. सी. पेनी, टारगेट येथे कपडे, लहानसहान दागिने नेहमीपेक्षा ६०-७०% आणि ५०% कमी किंमतीला होते.
बाकी दुकानांमध्ये जायला वेळच झाला नाही.

एकंदरीत ग्राहकांचा उत्साह बराच होता.

ग्राहकांचा उत्साह

मला नेटबूक हवं होतं म्हणून मी सकाळी ४ च्या सुमारासच बेस्ट बायला पोहोचले होते. तिकिट घेऊन परत यायचं या हिशेबाने परंतु नेटबूकचे तिकिट मिळाले नाही. :-( नूकचे मिळाले. टारगेटमध्ये इतक्या प्रचंड रांगा होत्या की त्यात उभे राहिले असते तर नंबर लागेपर्यंत १० वाजले असते. ;-) सॅम्समध्येही नेटबूक सेलवर होते पण तिथेही आम्ही पोहोचेपर्यंत संपले होते पण सॅम्समध्ये फ्री-ब्रेकफास्ट होता. त्याच्यासाठी लागलेली लाईन सर्वात मोठी होती. :-)

बेड बाथ अँड बीयाँडला या दिवशी २०% ऑफ ऑन ऑल आयटेम्स असल्याने मी तिथे बरीच खरेदी केली.

क्यानडामध्ये $१०० खर्च केले

कुटुबीयांसाठी कपडे वगैरे.
क्यानडामधील थँक्सगिव्हिंगचा सण ऑक्टोबरमध्ये होता. तरी शुक्रवारी काही दुकानांमध्ये विशेष सूट जाहीर केली होती.

विषय भरणे अनिवार्य आहे.

१. तुम्ही ब्लॅक फ्रायडेच्या दिवशी उत्साहाने खरेदीस जाता का?

नाही.

५. अशा विक्री किंवा सेलमधून ग्राहकांची फसवणूक होते, चांगली डील्स मिळतात, मनपसंत खरेदी होते असे तुम्हाला वाटते का?

अशा ग्राहकांची मनपसंत खरेदी होत असावी. असे ग्राहक (ब्लॅक फ्रायडेच्या पहाटे किंवा मध्यरात्री खरेदीस जाणारे) मूर्ख असतात असे माझे वैयक्तिक मत आहे.

वैयक्तिक मत वगैरे

प्रतिसादासाठी धन्यवाद.

असे ग्राहक (ब्लॅक फ्रायडेच्या पहाटे किंवा मध्यरात्री खरेदीस जाणारे) मूर्ख असतात असे माझे वैयक्तिक मत आहे.

असे ग्राहक मूर्ख असणे अगदी शक्य आहे. माझ्या वैयक्तिक मतानुसार मी सोडून जगातील इतर सर्व व्यक्ती मूर्ख आहेत. तेव्हा ... असो. :-)

 
^ वर