बहुमुखी मुशर्रफ
बहुमुखी मुशर्रफ
आपण ब्रह्मदेवाला चार तोंडे आहेत असे आपण मानतो व म्हणून त्याला ‘चतुरानन’ म्हणतो. तसेच लंकापती रावणाला दहा तोंडे होती म्हणून त्याचा उल्लेख ‘दशानन’ असा केला जातो. पण मुशर्रफ इतक्यांदा आपली निवेदने बदलतात कीं त्यांना किती तोंडे आहेत हा एकाद्या संशोधनाचाच विषय व्हावा! "या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्याचे" त्यांचे चातुर्य पहाता त्यांना एका वेगळ्याच अर्थाने "चतुरानन ("चतुर+आनन)" म्हटले पाहिजे. एका पाठोपाठ परस्परविरोधी निवेदने करण्यात त्यांचा हात कोणीही धरू शकणार नाहीं. कसलाही विधिनिषेध न ठेवता ते असे करतात. खरं तर हे गृहस्थ इतके वारंवार रंग बदलतात कीं त्यांना मी तर ‘सरडा’च म्हणतो!
तसे पहाता जवळ-जवळ सगळेच पाकिस्तानी नेते दुतोंडी आहेत. दुर्दैवाची गोष्ट अशी कीं त्यांचा दुतोंडीपणा अमेरिकेचे राष्ट्रपती, अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री आणि त्यांचे मंत्रीमंडळातील नेते यांच्यासारख्या-म्हणजे ज्यांना माहीत असायला हवे त्यांना-सोडून सार्या जगाला माहीत आहे. अमेरिकेच्या त्यावेळच्या राष्ट्रपतींना (धाकल्या बुशना) त्यांनी आपल्या संभाषण चातुर्याने मस्त ‘पटविले’ होते. पण याचे कौतुक करायचे कीं असला शत्रू आपल्यापुढे उभा आहे म्हणून दुःख करायचे? धाकल्या बुशसाहेबांवर त्यांनी इतकी मोहिनी घातली होती कीं मुशर्रफना वाचविण्यासाठी त्यांनी आर्मिटेजसारख्या माणसाकडून षड्यंत्र रचवून दोन वेगवेगळ्या राष्ट्रप्रमुखाकडून नीशान-ई-इम्तियाज हा मुलकी किताब दोनदा मिळविणार्या पाकिस्तानच्या एकुलत्या एक सुपुत्राचा-डॉ. अब्दुल कादिर खान यांचा-बकरा बनवला होता! त्यांच्या विविध वक्तव्यांचा अभ्यास केल्यावर त्यांचे प्रत्येक तोंड वेगळी-वेगळी निवेदने देत असते हे स्पष्ट दिसते! त्यामुळे आज ते सत्तेवर नसले तरी आपल्या पित्त्यांतर्फे ते आपल्यावर संकट आणू शकतात म्हणून आपण त्याला बरोबर ओळखून आपले धोरण आखले पाहिजे!
मुशर्रफ यांच्या पातळयंत्री कारवायांची आणि त्यांच्या असत्यवचनांची "न्यूक्लियर डिसेप्शन" या सुंदर पुस्तकात खूप ठिकाणी खूप वेगवेगळ्या संदर्भात माहिती आलेली आहे आणि ही मालिका ई-सकाळवर वाचणार्या वाचकांना याची माहिती आहेच.
बेनझीरबाईंनी त्यांना लष्करी मोहिमांचे डायरेक्टर-जनरल (Director-General Army Operations) म्हणून नेमले तेंव्हांपासून त्यांनी काश्मीरमध्ये लुडबूड करायला सुरुवात केली. १९९२ साली त्यांनी बेनझीरबाईंच्याकडे त्यांना न विचारता काश्मीरमध्ये हल्ले करायची परवानगी मुशर्रफनी बेनझीरबाईंकडे मागितली पण ती त्यांनी नाकारली! पण (कदाचित् त्या बदली) त्यांनी मुशर्रफना हजारो घुसखोरांना काश्मीरमध्ये घुसवून आतंक माजवायला मात्र परवानगी दिली होती! पण हा ‘चतुर आनन’ आग्र्याला शांतीचा जप करत आला आणि त्या भेटीत शेवटी आपलेच राज्यकर्ते किती उथळ विचाराचे आहेत हेच दिसून आले. दिल्लीच्या वास्तव्यात त्यांनी पत्रकारपरिषद बोलावली पण भारतीय पत्रकारांना व भारतीय सरकारला न सांगता त्या परिषदेचे थेट प्रक्षेपण केले! त्यात काश्मीर द्यायला मी आलेलो नाहीं. तसे मी केल्यास “मला माझी नेहरवाली कोठी परत विकत घ्यावी लागेल” असा विनोद करून पाकिस्तानी जनतेवर एक त्यांनी केला होता.
पाकिस्तानच्याच सक्रीय सहकार्याने तालीबान अफगाणिस्तानात सत्तेवर आले. त्यांच्या राजवटीला सर्वात आधी मान्यता दिली ती पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि संयुक्त अमिराती (UAE) या तीनच देशांनी. ९/११ नंतर सौदी अरेबिया आणि संयुक्त अमिराती या देशांनी आपली मान्यता काढून घेतली. मुशर्रफ यांच्या सत्तेखाली असलेले पाकिस्तान हे एकच असे राष्ट्र उरले ज्याने अद्यापही तालीबानला मान्यता दिली होती. पाकिस्तानने तालीबान राजवटीला मान्यता द्यायच्या आधीपासून त्यांना हत्यारे दिली होती व काश्मीरमध्ये घुसून आतंक माजविणार्या सुन्नी अतिरेक्यांची शस्त्रसज्ज टोळकी त्यांना देऊन मनुष्यबळही पुरविले होते. ९/११ आले आणि गेले पण मुशर्रफ कुंपणावरच बसून होते.
मग अफगाणिस्तानवर अमेरिका, नाटो आणि इतर राष्ट्रांनी आक्रमण केले तरीही मुशर्रफ यांनी चुप्पीच चालू ठेवली होती. या युद्धाच्या काळात CNN वर रोज तालीबानच्या पाकिस्तानातील दूतावासातील अधिकारी रोजच्या युद्धाच्या वार्ता (थापा) जगाला देतानाचे दृष्य अद्यापही माझ्या डोळ्यासमोर आहे.
पण युद्ध संपता-संपता मुशर्रफना Ground realities बदलल्याचा अचानक व नव्याने साक्षात्कार झाला व त्यांनी कोलांटी उडी मारली व तालीबानची मान्यताच काढून घेतली असे नव्हे तर त्यांचा निःपात करण्याची (तोंडदेखली) प्रतिज्ञा करून तसे वचनही धाकल्या बुशना दिले. त्यामुळे असेल पण इराण, उत्तर कोरिया, लिबिया आणि इराक या अमेरिकेचे कट्टर शत्रू असलेल्या राष्ट्रांना अण्वस्त्र तंत्रज्ञान पुरविल्याची मुशर्रफ यांची पापेही नजरेआड करण्यात आली.
पाकिस्तानचे लष्करी मोहिमांचे डायरेक्टर-जनरल असल्यापासून ते सत्तेवरून फेकले जाईपर्यंत त्यांचा दुटप्पी व्यवहार चालूच होता. अलीकडेच ‘विकीलीक्स’मुळे यातल्या बर्याच गोष्टींवर अधिकृतपणाचा शिक्काही बसला. पण आता तर मुशर्रफनी ‘डेर स्पीगेल’ या लोकप्रिय जर्मन नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत या त्यांच्या पापांची स्वतःच कबूली दिली आहे. त्यांनी सांगितले कीं पाकिस्तानी लष्कराने आतंकवाद्यांना काश्मीरमध्ये शिरून आतंक व हाहाकार माजविण्याचे प्रशिक्षण नक्कीच दिले. त्यापुढे जाऊन ते हेही म्हणाले कीं काश्मिरात शिरून लढण्यासाठी भूमिगत तुकड्याही पाकिस्तानी लष्कराने उभ्या केल्या. याकडे पाकिस्तानी सरकारने जाणून बुजून काणाडोळा केला कारण त्यांना भारताला काश्मीरबद्दल वाटाघाटी करण्यासाठी भाग पाडायचे होते. नाक दाबून भारताचे तोंड उघडायचाच हा प्रयत्न होता.
खालील दुवे उघडून याबद्दल सविस्तर वाचा!
1) http://www.bbc.co.uk/news/world-south-asia-11474618
2) http://www.spiegel.de/international/world/0,1518,721110,00.html
3) http://www.spiegel.de/international/world/0,1518,721110-2,00.html
पण ही कबूली त्यांनी आधीही दिली होती, पण कां कुणास ठाउक, पण त्या कबूलीला एवढी प्रसिद्धी मात्र मिळाली नाहीं. याचे कारण कदाचित् त्या बातमीचा उगम भारतात होता. फेब्रूवारी २०१०मध्ये पाकिस्तानी वंशाच्या इंग्लिश खासदारांपुढे House of Lordsच्या एका छोट्या खोलीत दिलेल्या भाषणात मुशर्रफ यांनी सांगितले होते कीं काश्मीरमधील आतंकवादाचा जन्म पाकिस्तानातच झाला होता. Kashmiri militancy fathered in Pakistan: Musharraf, (http://www.zeenews.com/news607311.html) हा दुवा उघडल्यास ही बातमी व त्यावर माझ्यासह अनेक वाचकांच्या प्रतिक्रिया वाचायला मिळतील.
मुशर्रफ यांचा नाटकीपणा चाललाच होता. लंडनच्या मेट्रो व बसेसवर झालेल्या बाँबहल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्यांबद्दल त्यांना केवढा कळवळा! 'मृदुहृदयी मुशर्रफ'नी आढ्यतेखोरपणे टोनी ब्लेअरना त्यांना दुःख झाल्याचा शोकसंदेश पाठविला, पण मुंबईतील लोकल गाड्यांमध्ये मृत्यू पावलेल्यांबद्दल त्यांना माया नव्हती. गंमत अशी कीं दोन्ही हल्ले आतंकवादाच्या पाकिस्तानी कारखान्यात प्रशिक्षण घेतलेल्या आतंकवाद्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीनेच घडवून आणले होते!
आता या तळ नसलेल्या खड्ड्यात (Bottomless pit) अमेरिका आणखी २०० कोटी डॉलर्स ओतणार आहे. त्या आधी येत्या पाच वर्षांत ओतायला मंजूरी मिळालेले ७५० कोटी डॉलर्स आहेतच. हे सारे डॉलर्स ओरपत असताना अमेरिकेने नाकारलेल्या मुलकी परमाणू तंत्रज्ञानाच्या करारासाठी पाकिस्तानची चीनबरोबरची शय्यासोबतही चालूच आहे!
‘डेर स्पीगेल’च्या मुलाखतीदरम्यान पत्रकारांनी त्यांना पाकिस्तानी अणूबाँबच्या पिताश्रीनी “इराण आणि उत्तर कोरियाला अण्वस्त्रांबद्दलचे तंत्रज्ञान विकण्याच्या व्यवहारावर देखरेख ठेवण्यात व त्यामागच्या व्यवस्थापनात पाकिस्तानी लष्कर पूर्णपणे गुंतले होते” या आरोपांबद्दल छेडले असता दोन वेळा दोन वेगवेगळ्या राष्ट्रप्रमुखांकडून ‘नीशान-ई-इम्तियाज’ हा पाकिस्तानचा सर्वोच्च मुलकी किताब मिळविलेले खानसाहेब खोटे आरोप करत असून ते एक चारित्र्यहीन गृहस्थ आहेत असे मुशर्रफ संतापात सांगून मोकळे झाले. आता चारित्र्यहीन कोण याचा निर्णय वाचकांनीच करावा. सत्य परिस्थिती अशी होती स्वतःची चामडी बचावण्यासाठी मुशर्रफनी खानसाहेबांचा ‘बकरा’ बनविला!
सध्या मुशर्रफ आपल्या स्वतःच्या राजकारणातील पुनर्प्रवेशासाठी अमेरिकेच्या दौर्यावर आहेत. ओबामांनी लोकसभेतील आपल्या भाषणात भारताच्या अफगाणिस्तानातील रस्तेबांधणी, विद्युतीकरण आणि त्यांच्या नव्या प्रतिनिधीगृहाच्या इमारतीची निर्मिती अशा मुलकी प्रकल्पातील १३० कोटी डॉलरच्या भरघोस सहकार्याबद्दल नुकतेच आभार मानले ते झोंबल्यामुळे असेल कदाचित्, पण भारत अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानबद्दल शत्रुत्वाची भावना जागृत करीत आहे नवे तारे त्यांनी न्यूयॉर्कच्या Council on Foreign Relations येथील त्यांच्या भाषणात तोडले. बलुचिस्तानातील विभक्तवाद्यांच्या संदर्भात असेल पण त्यांनी काबूल येथील "पाकिस्तानी अतिरेकी" ही संघटनेचे कार्यकर्ते भारताच्या गुप्तहेरांना भेटल्याचा आरोप केला व त्या प्रसंगाची छायाचित्रेही पाहिल्याचे सांगितले. भारताचे कंदाहार-जलालाबादचे उपदूतावास (Consulate) पाकिस्तानविरुद्ध कारस्थाने करण्यासाठीच आहेत असा आरोप करत त्यांनी विचारले कीं हे उपदूतावास दक्षिणेलाच कां आहेत, उत्तरेला कां नाहींत असाही प्रश्न त्यांनी केला! पण महाशय हे विसरले कीं भारताचे उपदूतावास मझार-ए-शरीफ (उझबेकिस्तान-ताजिकिस्तानच्या बाजूला) व हेरत (इराणच्या बाजूला) उत्तरेकडील भागातही आहेत हे ते ‘विसरले’!! ते कदाचित् हेही विसरले कीं काबूल येथील आपल्या दूतावासावर गेल्या वर्षी तालीबान्यांनी अतिरेकी हल्लाही केला होता!
तालीबान आणि अल कायदाचे नेत्यांना (कदाचित् ओसामासुद्धा) अमेरिकेच्या लष्करापासून पळत असतांना त्यांना पाकिस्तानातील सरक्षित जागी आश्रय दिल्याबद्दल दोष दिल्याचे आरोप त्यांना झोंबले असावेत.
मुशर्रफनी जी कबूली दिली त्यात नवे कांहींच नाहीं. पण आता त्यांच्याच तोंडून असा कबूलीजबाब आल्यावर अमेरिकेचा आणि सार्या जगाचा पाकिस्तानकडे पहाण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे कीं नाहीं? त्या चारित्र्यहीन देशाला आर्थिक आणि लष्करी मलिदा चारणे चालूच रहाणार आहे कां? पाकिस्तानातील पूरग्रस्तांच्या व्यथा आणि हाल पहावत नाहींत, पण अशा आणीबाणीच्यावेळीही एरवी उदार असलेली पाश्चात्य राष्ट्रे उदासीन आहेत त्या मागचे कारण हेच आहे कीं त्यांच्यासाठी दिलेला पैसा त्यांच्यापर्यंत पोचणारच नाहीं व बराचसा पैसा नेत्यांच्या खिशात किंवा भारताविरुद्ध (आता तर अमेरिकेविरुद्ध व पाश्चात्य राष्ट्रांविरुद्धही) वापरण्यासाठी खरीदल्या जाणार्या शस्त्रास्त्रांतच खर्च होईल अशी शंका सगळ्यांनाच आहे.
अलीकडेच तीस लाख शस्त्रास्त्रे पकिस्तानच्या शस्त्रागारातून ’चोरी’ला गेल्याचे वृत्त डॉन या पाकिस्तानी वृत्तपत्रात वाचले. (http://news.dawn.com/wps/wcm/connect/dawn-content-library/dawn/the-newsp...) त्यात ग्रेनेड व AK-47 सारख्या स्वयंचलित बंदूकीही होत्या. हे सारे अतिरेक्यांना विकले तरी गेले असावे किंवा त्यांना उदारपणे दान दिले गेले असावे अशी शंका आहे. भारतातूनही स्फोटकांनी भरलेले १५०पेक्षा जास्त ट्रक नाहींसे झाल्याची बातमीही वाचनात आली. राजस्थानातून मध्यप्रदेशाकडे पूर्वेला चाललेले हे ट्रक दिशा बदलून पश्चिमेला तर नाहीं ना नेले गेले? या हरविलेल्या ट्रकचा अद्यापही कसलाही पत्ता लागल्याचे वृत्त वाचनात आलेले नाहीं!
अशा परिस्थितीत पाकिस्तानी अण्वस्त्रेंही त्यांच्या शस्त्रागारांतून चोरीला जाऊन चुकीच्या हातात पडली तर ती अमेरिका आणि पाश्चात्य राष्ट्रांवर आणि भारतावर डागली गेली तर एकच हाहाकार माजेल. अमेरिका स्वतःला अजून किती दिवस फसू देणार आहे?
Comments
सरडा
सर्व सरडे रंग बदलत नाहीत. रंग बदलणे हे केवळ शॅमेलिऑन प्रकारच्या सरड्यांना जमते.
शॅमेलियॉनला मराठीत काय म्हणतात?
शॅमेलियॉनला मराठीत काय म्हणतात?
नॉन-शॅमेलियॉन सरड्याला इंग्रजीत काय म्हणतात?
आतापर्यंत शॅमेलियॉन म्हणजेच सरडा अशी समजूत होती!
___________
जकार्तावाले काळे
ये जकार्ता मेरी जान!
इंग्रजीत बहुधा कमीलिअन
बरोबर. पण इंग्रजीत बहुधा कमीलिअन म्हणतात असे वाटते. फिरंगी (फ्रेंच) भाषेत शॅमेलिआँबिआँ म्हणत असावेत.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
अच्छा.......
अच्छा हे जाँ पॉल सारखे प्रकरण आहे का?
उत्तम लेख
लेख आवडला. काळे काकांचा नेहमी प्रमाणेच अतिशय अभ्यास पूर्वक लिहिलेला हा लेख आहे.
चन्द्रशेखर
एंटरटेनर मुशर्ऱफ़
लेख चांगला आहे.
मुशर्ऱफ़ एंटरटेनर आहेत.
१.
२.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
असे का?
फक्त अमेरिकेच्या राष्ट्रपतींना, अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांना आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील नेत्यांनाच हे माहित असणे गरजेचे का आहे?
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
त्यांच्याकडून 'अपात्री दान' होत आहे म्हणून.....
होय, ते गरजेचंच आहे. पाकिस्तानने 'कमावून' कधी खाल्लंच नाहीं. त्या देशाच्या सार्या गमज्या अमेरिकेच्या पैशावरच चालतात. अमेरिकेकडून 'अपात्री दान' होत आहे म्हणून त्यांना माहीत असणे महत्वाचे, एरवी नाहीं.
आणि आपल्याला पाकिस्तान नेहमीच पाण्यात पहातो म्हणून आपल्याला महत्वाचे!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
___________
जकार्तावाले काळे
ये जकार्ता मेरी जान!
धन्यु.. मात्र....
उत्तराबद्दल धन्यवाद! मात्र आता असा प्रश्न पडला की जे तुम्हालाही माहित आहे ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना माहित नाहि असे तुम्हाला का वाटते?
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
एक शक्यता
वॉशिंग्टनला 'डॉन' मिळत नसेल.
गरज सरली तरी वैद्य हटत नाहींय्
ऋषिकेश-जी,
असे म्हणतात कीं गुन्हेगारीच्या विश्वात शिरणे सोपे पण तिथून बाहेर पडणे महाकठीण! अमेरिकेची परिस्थिती कदाचित् अशीच झाली असावी! पाकिस्तानबरोबर सोयीची (किंवा गरजेपोटीची) मैत्री तर केली पण गरज सरली तरी आता वैद्य हटत नाहींय्! म्हणून अमेरिकेला या देशावर 'पॉकेटमनी'चा वर्षाव अद्यापही करावाच लागतोय्. अमेरिकेच्या दृष्टीने पाकिस्तान ही एक "धरले तर चावते व सोडले तर पळते" या जातीची समस्या झाली आहे.
कांहीं अंशी हा आपण रशियाशी गाढ दोस्ती केल्याचा परिपाकसुद्धा (Corollary) असेल!
अर्थात् हे माझे माझ्या वाचनावर आधारित पण वैयक्तिक मत आहे. आणि अशा विषायांवर 'व्यक्ती तितकी मते' असू शकतात.
___________
जकार्तावाले काळे
ये जकार्ता मेरी जान!
ख्यॉ ख्यॉ ख्यॉ
मुशर्रफ काका एकदम हॉलिवुड च्या हिरो सारखे दिसतात. त्यांना जेम्स बाँड च्या भुमिकेत पहयला आवडेल.
- डाळीतले काळे
काहीही म्हणा,
काहीही म्हणा, एक व्यक्तिमत्व म्हणून मुशर्रफ हा इसम बाकी स्मार्ट आहे एकंदर. आवडतो आपल्याला..
अर्थात, तो एक पाकडा आहे हे विसरता येणार नाही..
तात्या.
न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!
तरीच बुश भाळला त्यांच्यावर!
नाटक्या पण! तरीच बुश भाळला त्यांच्यावर!
___________
जकार्तावाले काळे
ये जकार्ता मेरी जान!
कोण आहेत बरं हे बुश आणि मुशर्रफ?
नाटक्या पण! तरीच बुश भाळला त्यांच्यावर!
हाहाहाहाहा. काळेकाका कोण आहेत बरं हे बुश आणि मुशर्रफ? ह्या बुशने मुशर्ऱफला ३ टक्क्यावर पैसे दिले आहेत की कॅन्सररुग्णासाठी मदत मागितली म्हणून मनी देऊ केला आहे.
व्याज तर सोडाच, पण मुद्दलावरही उदक सोडून!
हे पाळलेल्या राक्षसा,
(काका असे संबोधलेस म्हणून एकेरी संबोधन वापरतोय्. चालेल ना?)
बुशने अब्जावधी डॉलर ओतलेत त्या मुशर्रफच्या बिनबुडाच्या खड्ड्यात! तेही अगदी फुक्कट. व्याज तर सोडाच, पण मुद्दलावरही उदक सोडून!
पण अगदीच अपात्री दान हो! बुशचे पैसे घेऊन त्याच्याच पाठीत खंजीर खुपसताहेत हे पाकिस्तानी!!
___________
जकार्तावाले काळे
ये जकार्ता मेरी जान!
बुश
बुश यांचे आत्मचरित्र नुकतेच (का?) प्रसिद्ध झाले. यावर एक रोचक लेख.
यातील माझे आवडते वाक्य : George Bush.. has the self-awareness of a bison. :)
--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/
वाचकांच्या प्रतिक्रिया? तोबा तोबा!
लेख चांगला आहेच, पण वाचकांच्या प्रतिक्रिया? तोबा तोबा! 'बुशर्रफ' यांची त्यांच्या पुस्तकाबद्दलची NBC वरील मुलाखत वाचा: http://www.bbc.co.uk/news/world-us-canada-11715774
___________
जकार्तावाले काळे
ये जकार्ता मेरी जान!
धन्य
तुम्ही प्रतिक्रियाही वाचल्यात? धन्य आहात. :)
--
अनुदिनी : मै और मेरे पाहुणे..
http://rbk137.blogspot.com/
लोकांच्या
लोकांच्या ओबामा आणि बुशबद्दल प्रतिक्रिया वाचनीय असतात.
ओबामाला २०१२ मध्ये निवडणुकीची तरी संधी मिळेल की नाही या बद्दल शंका वाटते.
या बाबतीत मी अधाशी आहे असेच म्हणावे लागेल
या बाबतीत मी अधाशी आहे असेच म्हणावे लागेल. खास करून 'डब्या' बुश आणि मुशर्रफ हे माझे "लाडके" नेते आहेत! या दोघांच्या बाबतीत प्रतिसाद हे मूळ लेखनापेक्षा जास्त वाचनीय आणि सरस असतात. नवीन-नवीन विशेषणेही वाचायला मिळतात.
___________
जकार्तावाले काळे
ये जकार्ता मेरी जान!