क्ष-किरणांच्या शोधाचा वाढदिवस

रोजच्याप्रमाणे आजचा दिवसही गुगलशिवाय पुढे जाणं शक्य नव्हतं. इंटरनेट वापरायचं आहे, इंटरनेटवर काही कुठेतरी वाचायचं आहे आणि गुगल वापरलं नाही हे माझ्यासाठी जवळजवळ अशक्य असतं. तसंच आजही काहीतरी धुंडाळताना 'सर्च रिझल्ट्स'च्या डाव्या बाजूला वर गुगलचा चमत्कारिक लोगो दिसला. आज क्ष-किरणांच्या शोधाचा ११५वा वाढदिवस आहे हे गुगलबाबाकडून समजलं.

क्ष-किरण सर्वप्रथम शोधले ते जर्मन शास्त्रज्ञ विल्हेम कॉनराद राँतजेन याने, आजचीच तारीख, साल १८९५. आणि या शोधासाठी त्याला नोबेल पुरस्काराची फार वर्ष वाट पहावी लागली नाही, १९०१ साली राँतजेनही नोबेल लॉरिएट झाला.

क्ष-किरणही विद्युतचुंबकीय लहरींपैकी एका प्रकारच्या लहरी आहेत, दृष्य प्रकाशाचा अधिक उर्जावाला भाऊ (का बहिण?) आहेत अतिनील किरण (ultraviolet rays), क्ष-किरण (X-rays), आणि गामा किरण (Gamma rays). दृष्य प्रकाशाची तरंगलांबी ४०० (निळा) ते ७०० (लाल) नॅनोमीटर्सच्यामधे असते तर क्ष-किरणांची ०.०१ ते १० नॅनोमीटर्स. १ नॅनोमीटर म्हणजे एका मीटरचा १००००००००० (एकावर नऊ शून्य) एवढा भाग, किंवा १० चा -९ वा घात किंवा ०.०००००००००१.

क्ष-किरणांचा उपयोग वेगळा सांगायची गरज नसावीच. हाडं मोडली आहेत का नाहीत, कुठे, कितपत दुखापत आहे हे शोधण्यासाठी सर्रास क्ष-किरण वापरले जातात. शिवाय CT scan, MRI इ. साठीही क्ष-किरण वापरले जातात. प्रत्यक्ष रुग्णोपचारासाठीही क्ष-किरणांचा उपयोग होतो तो कर्करोगाच्या उपचारांपैकी रेडीओथेरपीमधे; या पद्धतीसाठी तपासणीपेक्षाही जास्त उर्जा असणारे क्ष-किरण वापरले जातात. पण चुकीच्या प्रमाणात मिळालेला क्ष-किरणांचा डोस कर्करोगास निमंत्रण ठरू शकतो.

अवकाशस्थ वस्तूंकडून येणारे क्ष-किरण आपल्या वातावरणात शोषले जातात आणि आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाहीत. अवकाशस्थ वस्तूंचा क्ष-किरणांमधे अभ्यास करण्यासाठी विशेष उपग्रह सोडावे लागतात, असेच दोन उपग्रह किंवा दुर्बिणी आहेत, रोझॅट आणि चंद्रा. या दुर्बिणींनी घेतलेल्या चित्रांमधून दीर्घिकांच्या समूहातल्या तप्त वायूचा, गॅमा रे बर्स्ट्स, एका तार्‍याने दुसर्‍या तार्‍याला गिळणे इ. अवकाशस्थ घटनांचा अभ्यास शक्य झाला.

प्रगत अशा क्ष-किरण दुर्बिणीला 'चंद्रा' हे नाव सुब्रमण्यन चंद्रशेखर या दुसर्‍या नोबेल मानकर्‍यावरून दिलं गेलं आहे. चंद्राने घेतलेली काही चित्रं (नासाच्या वेबसाईटवरून):

3C 186 नावाच्या क्वेझारभोवती असणार्‍या दीर्घिकासमूहातला निळ्या रंगात दाखवलेला हा तप्त वायू क्ष-किरणांमधेच दिसतो
दोन दीर्घिकासमूहांच्या एकत्र येणं ही विश्वातला महास्फोटाखालोखालचा सगळ्यात जास्त उर्जा-उत्सर्जन करणारी घटना आहे. वरच्या चित्रात लाल आणि निळ्या रंगात क्ष-किरणांत घेतलेलं चित्र दिसत आहे, तर पिवळट रंगात दृष्य प्रकाशात घेतलेलं चित्र दिसत आहे. या अतिप्रचंड दीर्घिका समूहाला 1E 0657-56 किंवा 'बुलेट क्लस्टर' असं नाव आहे.

माहितीचा स्रोत: अर्थातच विकीपिडीया आणि पुन्हा एकदा गुगल-इमेज-सर्चवरून नासाचं संकेतस्थळ.

लेखनविषय: दुवे:

Comments

सकाळीच

सकाळीच गूगलचा नवा अवतार पाहून क्ष किरणांचा बड्डे असावा अशी कल्पना आली होती. क्ष किरणांची छोटेखानी ओळख आवडली.

धन्यवाद!

छान

छान लेख.
राँतजेनने सर्वात पहिला एक्स-रे त्याच्या बायकोच्या हाताचा काढला होता, अंगठीसकट. :)

--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/

वा!

वा. परवाच क्ष - कीरणांच्या संशोधनावरील लेख वाचतांना ह्या फोटोचा उल्लेख त्यात् होता.

ओळख

विषयाची ओळख करून द्यायला छान आहे लेख.

धन्यवाद!

खगोलशास्त्रीय ओळख

खगोलशास्त्रीय ओळख आवडली.

क्ष-किरण शोषले जातात

--अवकाशस्थ वस्तूंकडून येणारे क्ष-किरण आपल्या वातावरणात शोषले जातात आणि आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाहीत.--- म्हणजे नक्की काय आणि कसे होते, ह्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल.

वातावरणातले 'शोषण'

पृथ्वीच्या वातावरणातून जमिनीपर्यंत पोहोचू शकणार्‍या विद्युतचुंबकीय लहरी / atmospheric wincows

पृथ्वीच्या वातावरणात विविध प्रकारचे वायू आणि प्लाझ्मा (मराठी शब्द?) आहेत. त्यात असणार्‍या मुख्यत्त्वे इलेक्ट्रॉन्समुळे आणि अणू-रेणूंमधील वेगवेगळ्या हालचालींमुळे विविध प्रकारची प्रारणं आणि अतिउर्जावान कण वातावरणात शोषले जातात. (हे कण पृथ्वीच्या वातावरणात कसे अडकतात त्याची अगदी थोडक्यात माहिती.) मायक्रोवेव्ह्ज आणि जास्त उर्जेचे अवरक्त(near infrared) प्रारणं पाण्याच्या वाफेमुळे शोषले जातात. त्यामुळे जास्त उर्जेच्या अवरक्त किरणांचा अभ्यास करणार्‍या दुर्बिणी अंटार्क्टीकासारख्या 'कोरड्या' जागी बांधल्या जातात. पाण्याच्या रेणूत होणार्‍या व्हायब्रेशन्समुळे मायक्रोवेव्ह किरण शोषले जातात. ओझोनचा थर अतिनील (ultraviolet) किरण शोषून घेतो.

वरच्या चित्रात ज्या क्ष-किरण प्रतिमा दाखवल्या आहेत त्या आपल्याला जमिनीवरून दिसणार नाहीत कारण वातावरणातला ऑक्सिजन हे क्ष-किरण शोषून घेतो आणि त्यात ऑक्सिजनचे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडून धनभारीत ऑक्सिजन तयार होतो. क्ष-किरण वातावरण शोषून घेतं यात आपल्या वातावरणाची तुलना ५ मीटर जाडीच्या भिंतीशी करता येईल.

अंदाज आलाय

धन्यवाद. थोडासा प्रकाश पडलाय. काय होत असावे ह्याचा अंदाज आलाय. ब्लॉगवरील इतर लेखही वाचले- खूप आवडले. इतरांनाही सांगेन.

ओळख

ओळख आवडली (समजली!).
अवांतरः तू इतकी अभ्यासू असशीलसे वाटत नाही!

निषेधार्ह!

तू इतकी अभ्यासू असशीलसे वाटत नाही!

हाहाहाहाहाहाहा. निषेधार्ह!

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

कृष्णविवरे

छान ओळख.
कृष्णविवरे जेंव्हा सभोवतालचे तारे मटकवतात तेंव्हा देखील क्ष-किरणे उत्सर्जीत होतात. या अप्रत्यक्ष निरिक्षणांमुळेच अनेक दिर्घीकांच्या केंद्रस्थानी असलेल्या कृष्णविवरांबद्दल आपल्याला ज्ञान होतं.

छोटी कृष्णविवरे

अशीही एक थेअरी आहे की, काही अत्यंत छोटी कृष्णविवरे आपल्या अवती-भवती असु शकतात. अनेक अनाकलनीय घटना ह्या कृष्णविवरांमुळे झाल्याची शक्यता मांडली जाते.

अस्थीर

कृष्णविवरे जितकी छोटी तितकी ती लवकर नष्ट होतात (हॉकींग रेडीएशन मुळे होणार्‍या वस्तुमान क्षयामुळे). त्यामुळे असे व्हायची शक्यता नगण्य.

चांगला लेख

चांगला ओळखपर लेख. धन्यवाद. असेच तुमच्या विषयावरचे छोटेखानी लेख येऊ द्या.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

 
^ वर