झपाटलेला...

माझ नाव प्रकाश,. मला कुठेतरी वाचल्याच आठवतं.की मी जोपर्यंत विचार करू शकतो तो पर्यंत मी अस्तित्वात आहे, याची खात्री देता येईल. मी आता विचार करत आहे, म्हणजे माझे अस्तित्व आहे. मी, प्रदीप, मला विचार करण्यासाठी जगायचे की जगता जगता विचार करायचे, यातले कुठले बरोबर व कुठली चूक?
मी स्वप्नात असू शकेन, मी ठार वेडा असू शकेन, किंवा मी कुठल्यातरी तुरुंगात खितपत पडलेला असेन. परंतु मी, म्हणजे राहुल, जोपर्यंत विचार करू शकतो, तोपर्यंत तुम्ही माझे अस्तित्व नाकारू शकत नाही. मला या सगळ्यातून अतिशय समाधान मिळते.
मुंबई शहरातील माझ जगणं तणावपूर्ण आहे हे मान्य. नगरमध्ये स्फोट होणार नाही व माझ्या सुरक्षिततेची तुम्ही हमी देत असाल तर जगण्याविषयी मला विश्वास आहे. रोज सकाळी मी जेव्हा डेक्कन जिमखान्यावर, रंकाळ्याच्या तलावाकाठी, सीताबर्डीच्या परिसरात फिरायला जातो तेव्हा माझ्याभोवती हे जग आहे याचेच मला आश्चर्य वाटू लागते. खरोखरच मी आता जसा विचार करत आहे तशीच नाशिकची गोपाळपुरी असेल का?
पक्या पक्या , तुझ्या अशा कल्पना भरारीमुळे एखाद्या दिवशी तू ठार वेडा होशील रे असे माझे मित्र नेहमीच म्हणत असतात. परंतु मी वेडा नाही याची मला पूर्ण खात्री आहे. या बेभरवश्याच्या जगात विचार करत राहण्याचा (भर) वसा मला मिळाला आहे. मी, उदय, असा विचार करत असतो की मी मुळातच सुहास आहे.... नव्हे, नव्हे, प्रदीप, नव्हे, प्रकाश, खरोखरच प्रकाश आहे......

Source: Discourse on Method, Rene Descartes (1637)

हे स्वगतपर भाषण विसंगतीपूर्ण आहे असे कदाचित तुम्हाला वाटतही असेल. स्वगत म्हणणारा क्षणोक्षणी नाव बदलतो, गाव बदलतो. तो काही तरी बाष्कळ बडबडतो, बोलतो असे वरील परिच्छेद वाचताना वाटले असेल. परंतु थोडे खोलात जाऊन विचार करू लागल्यास या स्वगत भाषणात अजिबात विसंगती नाही. विशेष म्हणजे रेने देकार्ते या सतराव्या शतकातील तत्वज्ञानी मांडलेल्या मी विचार करतो म्हणून मी आहे.("I think, therefore I am"....) हे विधान आत्म्याच्या वा स्वत्वाच्या संदर्भात होते. परंतु देकार्तेच्या तात्विक सिद्धांताच्या विश्लेषकांना मात्र देकार्ते यांच्या विधानात शब्दश: अर्थापेक्षा काही तरी वेगळे सांगण्याचा प्रयत्न आहे असे वाटत आहे. त्यामुळेच वर उल्लेख केलेले स्वगतपर भाषण असंबद्ध वाटत असले तरी तात्विकदृष्ट्या ते योग्य आहे.
मी विचार करतो म्हणून मी आहे. या विधानातून मिळत असलेला भरवसा फक्त तसा विचार करतानाच असतो, हेच त्याचे वैशिष्ट्य आहे. हा विचार म्हणजे तसा विचार करणारा पण अस्तित्वात आहे, हे सूचित करते. परंतु हा (क्षणिक) भरवसा, विचार करणारा दीर्घ काळ अस्तित्वात ऱाहणार की काही क्षणापूर्वी विचार करणारा तोच परत परत येत राहणार की विचार करणारा क्षणा-क्षणाला बदलत राहणार यापैकींची कुठलीही खात्री देत नाही. ज्या क्षणी विचार येतो त्याच क्षणापुरती त्याचे अस्तित्व असते.
वरील स्वगताच्या अर्थाची व्याप्ती आणखी वाढवता येईल. येथे उच्चारलेले शब्द एकाच व्यक्तीचे नसतील. किंवा व्यक्तीच्या विचाराशी सुसंगत असे बोललेले नसतील. ते एकाच वेळी अनेक विचारातून आलेले असतील. किंवा कित्येक व्यक्तींच्या विचारातून आलेले असतील. याचा अर्थ कुणी तरी वेडा, झपाटलेला बोलत आहे असे नव्हे. छिन्नमानसविकारग्रस्तांचे (schizophrenia) उदाहरण म्हणून घेतल्यास त्यांच्या एकंदर विचारशैलीत, त्यांच्या आवाजात अनेक व्यक्तींची सरमिसळ झाली आहे हे लक्षात येईल. प्रत्येक वेळी त्या क्षणातील व्यक्ती मी विचार करतो म्हणून मी आहे असेच म्हणत असेल. त्याक्षणी तरी आपण त्याचे अस्तित्व नाकारू शकत नाही. जेव्हा ती व्यक्ती मी, माझे.... असे म्हणत आपल्या अस्तित्वाची झलक दाखवण्याच्या आतच त्या व्यक्तीचे अस्तित्व नाहिशी होते व दुसरीच व्यक्ती तिची जागा घेते, तेथे हजर होते. काही वेळा - या स्वगतात उल्लेख केल्याप्रमाणे - पहिल्यांदा आलेली व्यक्ती शेवटी आल्यास सर्व काही ठीक आहे असेच वाटण्याची शक्यता असते.
परंतु तुरळक अपवाद वगळता आपल्यातील बहुतेक जण स्किझोफ्रेनिया वा बहुविधव्यक्ती या प्रकारच्या विकारांनी बाधित झालेले रुग्ण नसतो. त्यामुळे या सर्व गोष्टींचा आपल्याशी काय संबंध असे वाटण्याची शक्यता आहे. देकार्तेचे ते प्रसिद्ध विधान त्याच्या शब्दश: अर्थापेक्षा जास्त काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे हे लक्षात घेतल्यास आपण गृहित धरलेल्या काही गोष्टींचा पुनर्विचार करावा लागेल. आपण अस्तित्वात आहोत असे वाटत असले तरी आपण कोण आहोत, आपण असेच राहणार आहोत का, आपण तीच व्यक्ती म्हणून किती काळ टिकणार आहोत, आपल्यातील व्यक्तीचा ’शेवट’ कसा असेल इत्यादी प्रश्नांची सरबत्ती करता येईल. यासंबंधात देकार्तेच्या त्या प्रसिद्ध विधानात अशा प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत.
मी विचार करतो म्हणून मी आहे या विधानातील भरवश्यासाठी आपल्याला फार मोठी किंमत मोजावी लागेल. आपले विचार येत असताना त्या विचारपरिघाच्या बाहेर चुकून जरी एखादे पाऊल बाहेर पडले तरी आपले अस्तित्व शून्यवत होईल, हे मात्र खरे.

Comments

"मी" शब्दाला फक्त संदर्भमूल्य आहे

"मी" शब्दाला फक्त संदर्भमूल्य आहे.

असे असल्यामुळे देकार्तचे "कोगितो एर्गो सुम्" (मी विचार करतो म्हणून मी अस्तित्वात आहे) हे वाक्य व्याकरणाच्या तर्कशास्त्रातले आहे - खर्‍या तर्कशास्त्रात चालत नाही.

(बौद्धांचे वचन आहे - विचार आहेत पण विचार करणारा कोणी सापडत नाही... हे विधान बघता देकार्तच्या वाक्याची स्वयंस्पष्ट सिद्धता गळून पडते. "असणे" शब्दाचा व्याकरणशास्त्रातील कर्ता हा अन्य क्रियापदांच्या व्याकरणशास्त्रातील कर्त्यापेक्षा प्रत्यक्षात वेगळीच संकल्पना आहे, हे अनेक तत्त्वज्ञांना विचाराअंती समजलेले आहे. पैकी भारतातले नव्यनैयायिक, पाश्चिमात्यांमधील कांत, रसेल वगैरे आहेतच.)

समजला नाही

हा लेख मला खूप कमी समजला. (नेहमी मात्र तसे नसते.)

देकार्तच्या म्हणण्याचा अर्थ आणि प्रकाशचे स्वगत यातील संबंध कळला नाही. तसेच तुमचे देकार्तच्या म्हणण्यावरचे म्हणणे काय हे पण कळले नाही.
विषय चांगला निवडला आहे. अजून लिहाल तर बरे होईल.

प्रमोद

रेने देकार्तचे विचारविश्व

देकार्तचे (1596-1650) तत्वज्ञानाला ख्यातनाम योगदान म्हणजे त्याचे स्वयंसिद्धतेचे विधान. मी सर्व गोष्टींच्या अस्तित्वासंबंधी शंका घेऊ शकतो, पण ज्या अर्थी मी शंका घेतो, विचार करतो त्या अर्थी (शंका घेणारा, विचार करणारा) मी अस्तित्वात आहे. I think therefore I exist. हा विचार देकार्त तत्वज्ञानाचा पहिला सिद्धांत मानीत असे. देकार्तच्या सिद्धांताची प्रक्रिया अशी: वस्तुमानाच्या अस्तित्वाला सिद्ध करता येईल का? (हा मूलगामी सत्ताशास्त्रीय प्रश्न) त्यासाठी सेंट ऑगस्टिनने (आणि बेकननेही) म्हटल्याप्रमाणे पद्धतशीर संशयाने सुरुवात करणे उत्तम. मी सर्व गोष्टींच्या अस्तित्वाचा संशय घेतो, पण संशय घेणारा मी त्यामुळेच अस्तित्वात असल्याचे सिद्ध होते. .... या विचारप्रक्रियेचे आणखी एक फलित देकार्तचा द्वितत्ववाद (Dualism). आपल्या जगात उघडच दोन भाग आहेत. एक अंतर्गत जीवन म्हणजे आपल्या जाणिवा, भावना, विचार इ. जे संशयातीत असतात. य़ा भागातील केंद्र आहे आत्मा म्हणजेच मन. हे मन केवळ विचार करणारी (Thinking thing) शक्ती आहे. उरले ते बाह्य जग, केवळ वस्तुमात्र. या दोन्हींच्या भिन्नतेबद्दल देकार्त इतका ठाम होता की शरीर आणि मन यासुद्धा दोन वेगळ्या गोष्टी आहेत असे त्याचे मत होते. अशा द्वितत्ववादाचा लाभ विज्ञानाला झाला यात शंका नाही.

देकार्तला (सॉक्रेटिसप्रमाणे) समकालीन ज्ञानाची परिस्थिती समाधानकारक वाटली नाही. त्याच्या दृष्टीने गणित ही एकमेव ज्ञानव्यवस्था जिथे गोँधळाला, अस्पष्टतेला, संदिग्धतेला वाव नाही. म्हणून त्याने विचारविश्वात निगामी ( deductive ) पद्धत आणण्याचा प्रयत्न केला. त्याच्या विचारपद्धतीतील मुख्य पथ्ये होती - पूर्वग्रह दूर ठेवणे, परिकल्पनांची मांडणी शास्त्रशुद्ध आणि वस्तुनिष्ठ असणे, सत्याला झाकळणारे विकार (passions) सक्तीने टाळणे - थोडक्यात विचारप्रक्रियेला स्वच्छ, सबल, विवेकनिष्ठ ठेवणे. या पद्धतीचा शास्त्रीय दृष्टी आणि विचारस्वातंत्र्य यांच्या प्रगतीला आधार मिळाला. देकार्तची बुद्धी तत्वज्ञानाबरोबरच विज्ञान, भूमिती, गणित, विश्वोत्पत्तीशास्त्र (Cosmology), यंत्रज्ञान, शरीरविज्ञान अशा अनेक शास्त्रात प्रभावीपणे चालत होती. म्हणूनच त्याचा विचार (कार्टेशिअन विचार या नावाने ओळखला जाणारा) माणसाच्या वैचारिक इतिहासात महत्वाचा ठरतो.

-- के. रं. शिरवाडकर यांच्या आपले विचारविश्व या ग्रंथातून

मुळात हा लेख उपक्रमावर प्रसिद्ध करावा की नको याच द्विधा मनस्थितीत मी होतो. मला देकार्तच्या तत्वज्ञानाचा गाभा कळला नसला तरी काही उपक्रमींना नक्कीच याविषयी जास्त माहित असणार व त्यामुळे माझ्याही ज्ञानात भर पडणार म्हणून प्रसिद्ध करण्याचे धैर्य दाखविले. Cogito, ergo sum चा संबंध तत्वज्ञानाशी जोडावे की तर्कशास्त्राशी या बद्दल जास्त विस्ताराने कुणी लिहिल्यास मला नक्कीच आवडेल.

प्रकाशचे झपाटणे, बरळणे, व्यक्ती/स्थळ बदलणे काही क्षणात न होता दीर्घ काळानंतर होत गेल्यास आपल्याला तो schizophrenic आहे का, की तत्वज्ञ (?) आहे का, किंवा परिस्थितीने गंजलेला आहे का की त्याच्यात वयोमानापरत्वे बदल घडत गेला आहे का हे कधी कळलेही नसते. म्हणूनच त्याचे अस्तित्व ज्याप्रकारे तो विचार करतो त्याप्रमाणे बदलत जाते हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हे कितपत जमले आहे ते वाचक ठरवू शकतील.

चांगला परिचय

मन-जग ड्युऍलिस्म, द्वैतवादाचा (?) चांगला परिचय घडला. आता मूळ पुस्तक वाचावेसे वाटते.

लेखाचा गाभा त्यातून कळला. धन्यवाद.

प्रमोद

मि हजार ......

खरे काकांची याबाबत एक सुंदर कविता................मी हजार चिंतानी डोके खाजवतो, तो..........
आपल्यात दोन मी लपलेले असतात या अर्थाची!!

मरण

>>>आपले विचार येत असताना त्या विचारपरिघाच्या बाहेर चुकून जरी एखादे पाऊल बाहेर पडले तरी आपले अस्तित्व शून्यवत होईल, हे मात्र खरे.
तुकारामांनीच म्हटलय... आपुले मरण पाहिले म्या डोळा...

विचार म्हणजेच अस्तित्व !

आपला भूतकाळ म्हणजे बव्हंशी आपल्या आठवणीच. जेव्हा त्या सभोवतालच्या वास्तवाशी जुळतात, तेव्हा भूतकाळ सिद्ध होतो. जसे मी केलेल्या अनेक गोष्टींची स्मृती नष्ट झाल्याने 'माझ्या लेखी' त्या घडल्याच नाहीत. तसेच उपरोक्त लेखाविषयी. जसे विचार तसा मी.... अस्तित्व आहे की नाही.. विचारच ठरवतील.

 
^ वर