भारतातले इंजिनिअरिंग क्षेत्र

नुकतीच एका ठिकाणी जी चर्चा झाली त्या निमित्ताने भारतातल्या इंजिनिअरांची गुणवत्ता वगैरे गोष्टींची चर्चा झाली. त्या चर्चेत भारतीय इंजिनिअर फारसे फंडामेंटल/ब्रेकथ्रू काम करीत नाहीत असे म्हटले गेले.

त्यानिमित्ताने इंजिनिअरिंगच्या व्यवसायाविषयी आणि शिक्षणा*विषयीचे माझ्या मनात आलेले फुटकळ विचार.

इंजिनिअरिंग हे क्षेत्र डॉक्टरी, अकाउंटन्सी, वकिली यांसारखेच व्यावसायिक क्षेत्र समजले जाते. परंतु या इतर व्यवसायांमध्ये आणि इंजिनिअरिंगच्या व्यवसायामध्ये मुख्य फरक हा की या इतर व्यावसायिकांची एक अ‍ॅपेक्स संघटना असते. आणि ती त्या त्या व्यावसायिकांचे आणि व्यवसायांचे नियंत्रण करते. इंजिनिअरांची अशी संघटना नाही. इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स ही संस्था आहे पण ती इंजिनिअरांचे नियंत्रण करीत नाही. डॉक्टर, सीए, सीडब्लूए यांची व्यावसायिक नीतिमत्तेची नियमावली असते. तशी इंजिनिअरांची नसते.**

इंजिनिअरिंग व इतर क्षेत्रांतल्या शिक्षणातला एक महत्त्वाचा फरक म्हणजे त्या कोर्सेस मध्ये फील्डवर्क चे प्रमाण खूप जास्त असते. डॉक्टरांना दुसर्‍या वर्षापासून प्रत्यक्ष वॉर्डांमध्ये रुग्ण तपासणी वगैरे करावी लागते. सीएंना ३ वर्षे आर्टिकलशिप करावी लागते. शिवाय डॉक्टरांना एक वर्षाची इंटर्नशिप केल्यावरच प्रॅक्टिस करता येते. सीएंना पास झाल्यावर ३-४ वर्षे दुसर्‍या सीएच्या हाताखाली काम केल्यावरच सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस मिळते. वकीलालाही असेच काहीसे असते.

इंजिनिअरिंगच्या शिक्षणात हे फिल्डवर्क फार फार कमी असते. कॉलेजमधील लॅबमधील आणि वर्कशॉपमधील काम हे काही फील्डवर्क म्हणता येणार नाही. अगदी शेवटच्या वर्षीचे प्रॉजेक्ट हे सुद्धा फील्डवर्क म्हणायला मी धजावणार नाही. येऊनजाऊन तिसर्‍या वर्षाच्या उन्हाळी सुट्टीत महिनाभर एखाद्या कंपनीत काम केले तर तेवढेच. पण ते सुद्धा कंपल्सरी नसते.

त्यामुळे इतर व्यवसायाचे शिक्षण घेतलेला विद्यार्थी जेव्हा बाहेर पडतो तेव्हा तो 'मार्केट रेडी' असतो. इंजिनिअर तसा नसतो. त्याला बहुधा वर्षभराचे कंपनी ट्रेनिंग करायला लागते. ते तो पहिला जॉब ज्या कंपनीत करतो तिथेच मिळते. म्हणजे त्याचे फील्डवर्कचे क्षेत्र एकदम लिमिटेड होते.

शिक्षणातला दुसरा मोठा फरक म्हणजे शिकवणारे शिक्षक. डॉक्टरांना शिकवणारे शिक्षक प्रॅक्टिसिंग डॉक्टर असतात. ते दररोज रुग्णोपचार आणि शस्त्रक्रिया करीत असतात. सीएंना शिकवणारे प्रॅक्टिसिंग अकाउंटंट असतात. वकीलांना शिकवणारे प्रॅक्टिसिंग वकील असतात (चूभूदेघे). पण इंजिनिअरिंग कॉलेजात शिकवणारे शिक्षक मात्र प्रॅक्टिसिंग इंजिनिअर नसतात. ते केवळ प्राध्यापक असतात. क्वचित प्रसंगी काही व्हिजिटिंग प्राध्यापक इंडस्ट्रीमधून येतात. मी सीओईपीला होतो तेव्हा अनेक प्राध्यापक तिथूनच इंजिनिअरिंग शिकलेले आणि इंजिनिअर होताच एकीकडे एम् ई करीत प्राध्यापक म्हणून लागलेले होते. म्हणजे त्यांनी इंडस्ट्रीचे तोंडही कधी पाहिले नव्हते.
[काही हुन्नरी प्राध्यापक बाहेर इंडस्ट्रीशी कोलॅबोरेशन करीत असत आणि इंडस्ट्रीचा अनुभव मिळवीत + स्वतःचा काही फायदा करून घेत असावेत . कारण इतर प्राध्यापकांमध्ये ते 'वरकमाई' करीत असल्याची चर्चा असे ]. दुसर्‍या शब्दात इंजिनिअरिंग कॉलेजेस ही व्यावसायिकांची कॉलेज असल्यासारखी न चालवली जाता ती आर्टस किंवा कॉमर्स कॉलेजासारखीच चालवली जातात.

अशा वातावरणामुळे परीक्षार्थीपणा वाढीस लागून क्रिएटिव्हिटी आणि व्यावसायिकता कमी होत असावी का?

अजून एक विचार म्हनजे इंजिनिअरिंगचे क्षेत्र एवढे व्हास्ट आहे की इंजिनिअरिंगचे अजून विभाजन व्हायला हवे. प्रॉडक्शन इंजिनिअरिंगचे - फाऊंड्री आणि डायकास्टिंग, मेटल फॉर्मिंग, प्लॅस्टिक & रबर टेक्नॉलॉजी वगैरे इलेक्ट्रिकलचे पॉवर जनरेशन & ट्रान्समिशन, इलेक्ट्रिकल मशीनरी वगैरे.

*टीप : बरीचशी माहिती मी २६ वर्षांपूर्वी अनुभवलेल्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिक्षणावर आधारली आहे. सीओईपीच नव्हे तर व्हीजेटीआय आणि सरदार पटेल कॉलेजात सुद्धा अशीच परिस्थिती होती. पण यात आजही फार फरक झाला असेल असे वाटत नाही. तसेच आय आय टी मधल्या शिक्षणप्रणालीविषयी माहिती नाही. कदाचित परकीय देशांच्या सहकार्याने उभारलेल्या असल्यामुळे सिस्टिम वेगळीही असू शकेल.

** इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सच्या संकेतस्थळावर १९३२ मध्ये रॉयल चार्टर मिळाल्याचा उल्लेख आहे पण स्वातंत्र्यानंतर भारत सरकारकडून तशी चार्टर मिळाली नसावी. शिवाय भारतात व्यवसाय करण्यासाठी त्यांची मान्यता हवी असेही काही नाही. कोड ऑफ एथिक्स मात्र आहे.

इथे सदस्य असलेल्या आणि हल्ली किंवा पूर्वी इंजिनिअर झालेल्यांकडून भर घातली जावी अशी अपेक्षा. (इथे दुहेरी क्वालिफिकेशन-इंजिनिअरिंग+अजून काहीतरी) असलेलेही लोक असावेत. त्यांची तुलनात्मक मते पण जाणून घ्यायला आवडतील.

लेखनविषय: दुवे:

Comments

शंका

भारतातील डॉक्टर मार्केट रेडी असतात हा दावा मला धाडसी वाटतो. एक वर्षाच्या आंतरवासित (इंटर्नशिप) कार्यक्रमात बहुतेकजण केवळ पाट्या टाकतात किंवा पदव्युत्तर कार्यक्रमांच्या प्रवेश परीक्षांमध्ये अपेक्षित प्रश्नांची उत्तरे पाठ करतात. मला अशीही उदाहरणे माहिती आहेत की आंतरवासित प्रशिक्षण २-३ महिने 'बंक' करून त्यांनी पदव्युत्तर कार्यक्रमांच्या प्रवेश परीक्षांचा अभ्यास केला आणि परीक्षा झाल्यावर निकाल लागून प्रवेश मिळेपर्यंत जो रिकामा काळ असतो तेव्हा आंतरवासित प्रशिक्षण 'उरकले'.
व्यावसायिक शिक्षण हे नाव असले तरी शिक्षणाचा थेट व्यावसायिक कौशल्यांशी संबंध जोडू नये असे मला वाटते.

क्लोरोफॉर्म्

ह्यावरुन थोडेसे अवांतरः डॉ. अरुण लिमयेंचे क्लोरोफॉर्म वाचनीय आहे. (सुरुवातीचे डॉक्टरकीचे दिवस वगैरे)

-Nile

मोकळे रान

इंटर्नशिप करतांना सिव्हील हॉस्पिटल मधील गरीब पेशंट डॉक्टरांना वाटेल तशा शस्त्रक्रिया करायला जे मोकळे रान देतात त्यामुळे डॉक्टर शिकतात, असा माझा प्रामाणिक समज आहे. ह्यात चूक काय् आणि बरोबर काय हे मी ठरवत नाही आहे.

लेक्चरर

आयटी इंजिनीयरींग कोर्सेस साठी नुकतीच ग्र्याड झालेले मुले-मुली लेक्चरर म्हणून उभे करतात- का? तर त्यांना त्या प्रोग्र्यामिंग मधे भरपूर मार्क पडलेले असतात.

शिकण्याची इच्छा

इंजिनीयरांना शिकायला मिळेल ह्या उद्देशाने त्यांना जो प्रोजेक्ट दिला जातो तो, ते बाहेरील व्यक्तिंकडून १५- २० हजार देऊन करुन घेतात. उदा इलेक्ट्रॉनीक इंजि पदवी धारकांचे प्रोजेक्ट. शिकण्यासाठी आणलेल्या त्या-त्या कॉलेजमधल्या वर्कशॉपमधे कोट्यावधींची मशिनरी धूळ खात पडलेली असते. शिकण्याची इच्छा नसलेली मुले जागोजागी आढळतात.

प्रोजेक्ट

मी २००५ मध्ये पुणे विद्यापीठातून बीई इलेक्ट्रॉनिक्स पूर्ण केले. शेवटच्या वर्षाचा प्रोजेक्ट रु. १८००० ना विकत घेतला होता.अंदाजे २००० छपाईला खर्च झाले होते. पण मला अजूनही इलेक्ट्रॉनिक्सचा 'इ'ही येत नाही.
विकत घेण्याचे कारणः मी डिजिटल सिग्नल प्रोसेसिंगसंबंधित प्रोजेक्ट करण्याचे ठरवले होते. त्या विषयाच्या प्राध्यापकांना भेटलो, तर त्यांनी आमच्या ग्रूपला एका 'गाईड'चा संदर्भ देऊन त्यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला होता. नंतर कळले की सर्वच विषयांच्या प्राध्यापकांनी आपआपल्या ग्रूप्सना असे सल्ले दिले होते.

आमच्या वर्गातील एकही विद्यार्थी आता शुद्ध इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात नाही. ८०% सॉफ्टवेअर व २०% हार्डवेअर-नेटवर्किंग मध्ये आहेत.

||वाछितो विजयी होईबा||

इंजिनियर बुजबुजले

गुणवत्ता खाली येण्याचे कारण गुणवत्ताहीन विद्यार्थी, शिक्षणसंस्था आणि शिक्षक हे आहे.
पूर्वी बी.ए. पास होणे , ऑनर्स मिळणे हे खरोखरीच ऑनरेबल होते. बॅरिस्टर होणारे खरोखर त्या लायकीचे असत.
कारण शिक्षण घेणे खरोखरच अवघड होते.
आज पी.एच्डी मिळवणारे सर्वच त्या लायकीचे असतील असे वाटत नाही.

केवळ इंजिनियर्सच नव्हे तर बाकी क्षेत्रातही गुणवत्ता खाली येत आहे.
शिक्षण घेणे सोपे झाले हे वाईट नाही. पण 'सोप्या पद्धतीने' शिक्षण घेणे सुरू झाले हे वाईट आहे.
शिक्षकांचा खालावलेला दर्जा, स्वतंत्र बुद्धीमत्तेला वाव न देणारा अभ्यासक्रम यांबरोबरच ठराविक साच्यातील प्रश्नपत्रिका, गाईड्स, अपेक्षित प्रश्नसंच, फोडलेले पेपर, परीक्षेत कॉपी, परीक्षेनंतर पैसा देऊन पास होणे हे सारे 'शॉर्टकट' उपलब्ध झाले. पैसा हा घटक शिक्षणात महत्त्वाचा ठरला.

चायनीज माल मोठ्या प्रमाणावर आणि स्वस्तात निर्माण होतो म्हणून त्याला गुणवत्ता नसते असा सर्वसाधारण समज आहे. भारतीय शिक्षणव्यवस्थाही आता चायनीज उत्पादकाप्रमाणे झालेली आहे. 'माल' मोठ्या प्रमाणावर तयार होत असला तरी त्याची गुणवत्ता कमी होत आहे.

या प्रतिसादावर 'नकारात्मक' असा शिक्का बसण्याची शक्यता आहे.

सहमत

आज पी.एच्डी मिळवणारे सर्वच त्या लायकीचे असतील असे वाटत नाही.

सहमत आहे. ह्युमॅनिटीज मध्ये घोस्ट ऑथरशिपच्या सहाय्याने पीएचडी मिळाल्याची उदाहरणेही ऐकली आहेत.
--
अनुदिनी : शब्द
http://rbk137.blogspot.com/

आज पी.एच्डी मिळवणारे सर्वच त्या लायकीचे असतील असे वाटत नाही.

आज पी.एच्डी मिळवणारे सर्वच त्या लायकीचे असतील असे वाटत नाही.

सहमत आहे. :-))

पहाड

पहाड (पीएच्डी) पोखरुन काय मिळणार?

सर्वच क्षेत्रांचे सुमारीकरण

सर्वच क्षेत्रांचे सुमारीकरण हा चर्चाप्रस्ताव या निमित्ताने मी सुरू केला आहे. त्यात भर घालावी.

दुवा

नितीनजींशी सहमत...

नितीनजी,
मी आपल्या मताशी सहमत आहे. मीसुद्धा २० वर्षांपूर्वी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदविका पूर्ण केली. शासकीय तंत्रनिकेतनातून बाहेर पडल्यावर मला आपल्याकडच्या परिस्थितीची लाज वाटली. साधे उदाहरण बघा. आमच्या वर्कशॉपमध्ये आम्ही म्हैसूर किर्लोस्करच्या १९५० मधल्या लेथ मशिनवर जॉब करायचो. कंपन्यांमध्ये इंटरव्ह्यूला जायचो तेव्हा तेथे सीएनसी लेथ आणि मिलिंग मशिन्सवर काम चाललेले दिसायचे. ही यंत्रे आम्हाला कधीच हाताळायला मिळाली नव्हती. उलट ही यंत्रे चालवणार्‍या कामगारांनाच आमच्यापेक्षा जास्त सखोल माहिती असायची. जग ऑटोमेशनकडे जात असताना इंजिनिआरिंगच्या शिक्षणाची सुरवात आजही सुतारकाम, लोहारकाम आणि कास्तकारीने व्हावी, हे हास्यास्पद आहे. (वर्कशॉप टेक्नॉलॉजीचे महत्त्व मी नाकारत नाही, पण इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचे सुरवातीचे वर्ष रंधा घासण्यात आणि झोतभट्टीपुढे जावे का?) काळानुसार आपण बदलायला नको का? पुण्याचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय भाग्यवान आहे, की त्यांना काहीतरी आधुनिक तंत्रज्ञान मिळाले, पण बाकी ठिकाणच्या अभियांत्रिकी महाविद्यालयांत आणि तंत्रनिकेतनात दिव्य परिस्थिती आहे. इंजिनिअर खरे कुठे शिकत असतील तर ते नोकरीला लागल्यावर थेट शॉप फ्लोअरवर आणि तेसुद्धा कामगारांकडून.

भारतातील शिक्षणपद्धती सदोष आणि निरुपयोगी आहे, यात शंकाच नाही.

(आपल्या शेवटच्या आवाहनाविषयी : मी अभियांत्रिकी शिक्षण प्रथम श्रेणीत पूर्ण केल्यानंतर चक्क ते क्षेत्र सोडून दिले आणि मानव्यविद्यांकडे वळलो. त्यात मी खूप लवकर पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. सांगण्यासारखे खूप काही आहे. पण नंतर कधीतरी.)

भारतीय इंजिनियरिंग कॉलेजातील विद्यार्थी

माझी विधाने बर्‍याच लोकांना अतिरंजित व अतिशयोक्तीपूर्ण वाटण्याची शक्यता आहे. परंतु ही विधाने माझ्या 35 वर्षाच्या या क्षेत्रातील अनुभवातून आलेली आहेत.

1. आय.आय.टी व आय.आय.एस.सी मधून(आता हा अभ्यासक्रम बंद झाला आहे.) उत्तीर्ण झालेले पदवीधर सोडले तर भारतीय पदवीधर इंजिनीयरांना त्यांच्या विषयांचे ज्ञान शून्य असते.विद्युत अभियांत्रिकी पदवीधरांना ओह्म्सचा नियम सुद्धा सांगता येत नाही.

2. हाताने कधीच काम केलेले नसल्याने नोकरीत जेंव्हा हाताखालचे लोक अडचणी घेऊन येतात तेंव्हा त्यांचे प्रत्यक्ष निराकरण करणे या पदवीधरांना शक्यच नसते.
3. इंजिनीअर म्हणून कष्टाचे काम करण्याला ही मुले लायक नसल्याने आय. टी. उद्योगाकडे ती साहजिकच आकर्षिली जातात. तेथे सायबर कुली म्हणून काम करण्यात त्यांना धन्यता वाटते.

4. यापैकी जी मुले खरोखरच हुशार असतात ती त्यांच्या नोकरी धंद्याच्या ठिकाणी पटकन गोष्टी शिकतात व पुढे प्रगती करतात. बाकी मंडळींचा उजेडच असतो.अलीकडे बर्‍याच कंपन्या सी.एन.सी. यंत्रसामुग्री चालवण्यासाठी या पदवीधरांचा वापर करताना दिसतात. विषयाचे ज्ञान अगाध असल्याने विक्री मार्केटिंग याकडे बरीच मुले वळतात व इंजिनीयरिंगशी या गोष्टींचा संबंध नसल्याने बर्‍यापैकी यशस्वी होतात.

5. विषयाचे ज्ञान असलेले इंज़िनीयर मिळत नसल्याने इंजिनीयरिंग संशोधन संस्थांना नेहमीच मनुष्यबळाची चणचण भासत असते.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

आक्षेप नोंदवावासा वाटतो.

इंजिनीअर म्हणून कष्टाचे काम करण्याला ही मुले लायक नसल्याने आय. टी. उद्योगाकडे ती साहजिकच आकर्षिली जातात. तेथे सायबर कुली म्हणून काम करण्यात त्यांना धन्यता वाटते.

या प्रतिसादातून आयटी हा काहीतरी खालच्या दर्जाचा व्यवसाय आहे असे सूचित होत आहे. लेखकाला तसे वाटत असल्यास आक्षेप नोंदवावासा वाटतो. आयटी उद्योगात कष्टाची कामे नसतात असे म्हणायचे आहे का?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

आर एंड डी

इतर क्षेत्रात जी कामे करतात ती कुली छाप नसुन उच्च दर्जाची आर एंड डी टाइप असतात.

हॅ हॅ हॅ

विनोद आवडला.

पोटात खूप दुखते.

आयटीवाल्यांच्या पगारामुळे पोटात खूप दुखते. एका "मोठ्या" व्यक्तिने आयटीवाल्यांना सायबर कुली संबोधल्यानंतर सगळेच तसे म्हणू लागले आहेत.

कोण

ही मोठी व्यक्ती कोण म्हणे?

सहमत

प्रतिसादाशी सहमत.

(सायबर कुली) टाईमपास

आयटी उद्योग

आयटी उद्योग हा खालच्या दर्जाचा उद्योग नाही. परंतु त्यातले कोड रायटर ,सिस्टीम आर्किटेक्ट्स व आणखी थोडीफार मंडळी सोडली तर बाकीची बहुतांशी कामे लेबर इंटेंसिव्ह असतात. त्या कामाना एक किमान बुद्धिमत्ता असली की पुरेसे होते. कोणत्याही प्रकारच्या विशेष विषयातले प्राविण्य अपेक्षित नसते. त्यामुळे इंजिनीयर. कॉमर्स किंवा साय न्स पदवीधर चालू शकतात. इंजिनीयरच भरपूर मिळत आहेत हे म्हटल्यावर कोणीही त्याना कामावर घेणारच. या शिवाय कॉल सेंटर्समधे तर 10 वी 12 वी एवढेही शिक्षण पुरेसे होते. ही सर्व कामे करणार्‍या मंडळींना सायबर कूली म्हणण्याची प्रथा आहे व त्यात काही फारसे चुकीचे आहे असे मी म्हणणार नाही. माझ्या ओळखीतल्या 10 वी 12 वी मधे शिक्षण झेपत नाही म्हणून सोडून दिलेल्या मंडळींनी ही लाईन पकडली आहे व आज 25ते 30 हजार रुपये मासिक प्राप्ती करत आहेत. या मुलांना चांगली संधी मिळाली याबाबत कोणालाच वाईट वाटण्याचे कारण नाही. परंतु ती जे काम करत आहेत त्याला काही फारसे उच्च दर्जाचे काम म्हणता येणार नाही.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

अनेक गैरसमज

--त्या कामाना एक किमान बुद्धिमत्ता असली की पुरेसे होते. --
आयटीबद्दल अनेक गैरसमज आहेत.
--या शिवाय कॉल सेंटर्समधे तर 10 वी 12 वी एवढेही शिक्षण पुरेसे होते. --
कुठे ते कॉलसेंटर आणि कुठे प्रॉडक्ट इंजि.चे आयटी!
--त्यामुळे इंजिनीयर. कॉमर्स किंवा साय न्स पदवीधर चालू शकतात--
यु मेड माय डे. :-)
--माझ्या ओळखीतल्या 10 वी 12 वी मधे शिक्षण झेपत नाही म्हणून सोडून दिलेल्या मंडळींनी ही लाईन पकडली आहे व आज 25ते 30 हजार रुपये मासिक प्राप्ती करत आहेत. --
त्यांना आणखी २ वर्षांनी ते कुठे आहेत ते विचारा.

दुरुन डोंगर साजरे.

'सायबर कुली' शब्द पटतो...

चंद्रशेखरजी,
आपला मुद्दा रास्त आहे. इथे आयटी पब्लिकच्या पगारावर जळण्याचा मुद्दा नाही. जळायचेच झाले तर महिन्याला एक लाख रुपये पगार घेऊन काहीही न करणार्‍या प्राचार्य/प्राध्यापकांचा जास्त हेवा वाटला पाहिजे. आपण घेतो किती आणि देतो काय, याचा विचार त्यांनी केला पाहिजे.

त्यातून आयटी मधले लोक सोन्याच्या पिंजर्‍यातले पोपट झाल्याची खंत नारायण मूर्तींनीच व्यक्त केली होती. ते म्हणाले, की मी इन्फोसिसची स्थापना पत्नीने दिलेल्या १०००० रुपये भांडवलावर आणि भाड्याच्या खोलीत कंपनी थाटून केली. आज या कंपनीत अगदी फ्रेशर्सनाही ५० हजार रुपये पगारापासून सुरवात होते. दहा-पंधरा वर्षे काम केले आहेत ते लोक तर वेतन आणि एसॉप (एम्प्लॉईज स्टॉक ऑप्शन) जमेस धरता आज काही कोटी रुपयांचे मालक झाले आहेत, पण तरीही त्यांना स्वतंत्र कल्पना राबवून एखादी नवी कंपनी काढावी आणि १०-१५ लोकांना रोजगार द्यावा, असे वाटत नाही.

मला वाटते यापेक्षा मारवाड्यांची मनोवृत्ती बरी. ते देशात कुठेतरी धंदा काढतात. आपल्या मुलखातून नोकर आणतात किंवा नात्यातील माणसांना दुकानात कामाची संधी देतात. अनुभव मिळाला, की त्या लोकांना नोकरी सोडून धंदा काढायला प्रोत्साहन देतात. बर्‍याचदा मालकाने सांगण्यापेक्षा नोकरच आपणहून विचारतो, 'मला दुकान टाकायचे आहे. मी नोकरी सोडू का?'

हमाली कामात रमण्याची ही सुस्त मनोवृत्ती बघितली, की 'सायबर कुली' हा शब्द फारसा चुकीचा नाही, असे वाटते.

गंमत वाटली

तुमचा प्रतिसाद वाचून गंमत वाटली.
सायबर कुली म्हणजे काय हे चंद्रशेखर काकांनी सांगितले तर पुढे बोलता येईल. तसेच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उत्पादन बनविण्याचे काम किती भारतीयांने केले आहे हे शोधता आले तर आनंदच आहे.
दुसरा मुद्दा, (येथे मी सायबर कुली मुद्दा मान्य केला असे समजा.) भारतात जेंव्हा पासून अभियांत्रीकीचे शिक्षण सुरु झाले तेंव्हा पासून आजवर आणि खास करुन आयटी सोडून किती उत्पादने संशोधना करुन भारतीयांच्या गरजांना अनुसरुन बनवली आहेत? खास करुन साठी पार केलेल्या सर्व लोकांना अभियंत्यांना ज्यांना आजचे हे सायबर कुली वाटतात त्यांना माझा प्रश्न आहे की तुम्ही अथवा तुमच्या सहकार्‍यांनी अशी उत्पादने का नाही बनवली? आज सुद्धा भारतीय उत्पादने म्हणले की आम्हाला नावेच आठवत नाहीत. अहो आमच्या शेती प्रधान देशात आज सुद्धा शेतकर्‍यांची औजारे तीच जुनी आहेत.


+१

अंशतः सहमत आहे.

पारंपरिक इंजिनिअर्सनी काही केले नाही हे मान्यच आहे. खरेतर माझा लेख पारंपरिक इंजिनिअर्स विषयीच मुख्यतः आहे. पण आयटी बाबत कदाचित अधिक अपेक्षा आणि चिकित्सा असावी कारण आम्ही भारतीय सगळ्या जगात पुढे (आयटीतले बॉस) आहोत असे सध्या समजले/बिंबवले जात आहे.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

स्वतः चंद्रशेखर यांचेच उदाहरण अनुकरणीय...

>>खास करुन साठी पार केलेल्या सर्व लोकांना अभियंत्यांना ज्यांना आजचे हे सायबर कुली वाटतात त्यांना माझा प्रश्न आहे की तुम्ही अथवा तुमच्या सहकार्‍यांनी अशी उत्पादने का नाही बनवली? <<

मला इथे एक संदर्भ नमूद करु द्या. ज्यांना रस असेल त्यांनी चंद्रशेखर यांच्या अनुदिनीतील जुने लेख वाचावेत. त्यांनी त्यांच्या उद्योजकीय वाटचालीविषयी चार भागांत लेख लिहिले आहेत. त्यात त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स भारतात नवे क्षेत्र असतानाच्या काळात आव्हाने अंगावर घेऊन नवी उत्पादने तयार केली आहेत. त्यातील एक उत्पादन भारतीय संरक्षण खात्यानेही वाखाणले आहे. त्यामुळे तुम्ही काय केलेत, हा प्रश्न गैरलागू ठरावा.

प्रश्न

प्रश्न एका माणसा पर्यंत मर्यादित नाही. भारतीय समाजात आजच्या घडीला एकूण अभियंते किती आणि त्यांनी आजवर भारतीय गरजांसाठी खरोखर काय केले? अशी उदाहरणे देऊ नका ज्याचा उपयोग फक्त प्रश्न थोपवण्या करता होऊ शकतो. ज्यांनी असे काही केले आहे त्यांचा आम्हाला अभिमान आहेच. पण भारतातल्या गरजांचा आवाका मोठा आहे. डास मारायची चिनी रॅकेट घेताना मला नेहमी प्रश्न पडतो की अशा प्रकारची उत्पादने/उपकरणे बनवायला आम्हा भारतीय अभियंत्यांना कोणी अडवले होते.

थत्ते काकांच्या लेखातले मुद्दे चांगले आहेत. मला एक मुद्दा सुचतो. असे मानले जाते की शास्त्रज्ञ आणि अभियंता यांच्यात फरक आहे तो म्हणजे अभियंत्याला काळ आणि पैसा यांच्या मर्यादा ठरवून दिलेल्या असतात. काही अभियंते या मर्यादांमध्ये पण यशस्वी होणारे आहेत. पण एकूणच नवे काही करण्यासाठी लागणारे पाठबळ अभियंत्यांना भारतात मिळणे जरा अवघडच. नाहीतर भारतातले इंजिनिअरिंग क्षेत्र नक्कीच बहरले असते. कधी काळी इंजिनीअर म्हणजे सिव्हिल इंजिनीअर असेच मत अनेकांचे असायचे.

जाता जाता, स्वातंत्र्यपुर्व काळात अनेकांना बॅरिस्टरच का व्हायचे असायचे?


१००% सहमत.

चाणक्य ह्यांना पडलेला प्रश्न अतिशय योग्य आहे. १००% सहमत.

५०के प्लस

तसे पाहीले तर ५०के प्लस आयायटीवाल्यांनी फार मोठे शोध लावले आहेत असेही म्हणता येणार नाही.

भारतात उत्पादन करण्यातल्या अडचणी

डास मारायची चिनी रॅकेट घेताना मला नेहमी प्रश्न पडतो की अशा प्रकारची उत्पादने/उपकरणे बनवायला आम्हा भारतीय अभियंत्यांना कोणी अडवले होते.
फार उत्तम प्रश्न आहे. माझ्या कुवतीप्रमाणे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.

समजा मी एक उद्योजक आहे. ही रॅकेट मी बघितली व त्याप्रमाणे मी मनात घेऊन एक प्रोटोटाईप तयार केला. त्याची चाचणी घेतल्यावर तो व्यवस्थित काम करत आहे असे माझ्या लक्षात आले. या पायरी पर्यंत सगळे सोपेच असते. आता या पुढे बघूया.

प्रथम मी या रॅकेटचे मार्केटिंग कोण करते व एकूण मार्केट किती आहे याचा अंदाज घे ईन. अर्थातच मार्केट लाखो रॅकेट्स विकली जातील एवढे आहे. मी किती बनवू शकतो? समजा माझ्या आर्थिक कुवतीप्रमाणे मी या धंद्यात 5 लाख रुपये घालू शकत असलो तर निदान 25 लाख रुपयाची वार्षिक उलाढाल होणे आवश्यक असेल. बाजारात ज्या रॅकेट्स मिळतात त्या आयात करणारा समजा 40 रुपयाला होलसेलरला देतो आहे. म्हणजे पूर्ण अनिश्चित अश्या स्थानिक उत्पादकाकडून तो 35 रुपयापेक्षा जास्त किंमत देणार नाही. म्हणजेच मला 75000 तरी अशा रॅकेट्सचे उत्पादन केले तरच हा धंदा परवडण्यासारखा आहे. 75000 रॅकेट्स बनवण्यासाठी जी उत्पादनक्षमता लागेल ती स्वत: तयार करत बसणे म्हणजे मूर्खपणा ठरेल व सर्व व्यवहार आतबट्याचा होईल म्हणून मी माझ्या उत्पादनासाठी प्लॅस्टिक मोल्डर्स, पीसीबी उत्पादक शोधीन. कोणताही मोठा उत्पादक माझे काम घेणार नाही व मला छोटे उत्पादक शोधावे लागतील. या मंडळींच्या कडे असणारी यंत्रसामुग्री अर्थातच जुनी असेल व त्यावरच्या उत्पादनाची गुणवत्ता आयात उत्पादनांच्या तोडीस येणार नाही. स्गळा हिशोब लक्षात घेतल्यावर माझ्या असे लक्षात ये ईल की या उत्पादनातून मला फार तर एखादा रुपया सुटेल व रिजेक्शन झाले तर घाटा येण्याचीच शक्यता अधिक आहे.

मग मी तयार केलेला प्रोटोटाईप कचर्‍यात फेकून दे ईन व माझ्या घरात वापरण्यासाठी आयात केलेली रॅकेट विकत आणीन.

(वर दिलेले आकडे एक उदाहरण म्हणून दिलेले आहेत. प्रत्यक्षात मला या उत्पादनासंबंधी माहिती नाही.)

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

चीनी उत्पादक

वरील प्रश्न चीनी उत्पादकांना का नव्हते हे समजुन घेणे आवडेल्.

चिनी उत्पादक

चिनी उत्पादकांना हे प्रश्न का येत नाहीत हे सांगणे उपक्रमच्या माध्यमातून शक्य नाही. त्यासाठी व्याख्यानमालिका घ्यावी लागेल. चीनमधले सध्याचे खाजगी उद्योग कसे विकसित होत गेले त्यासंबंधी प्रचंड माहिती आंतरजालावर उपलब्ध आहे. ती आपण वाचू शकता.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

विषयांतर आहे पण

या विवेचनात दोन चुका आहेत.

१. ही एका प्रकारची चूक आहे. यात ती चिनी रॅकेट पाहिल्यानंतर मी पण ती बनवू शकतो आणि तिला मार्केट आहे असा विचार आला आहे.

२. धंद्याचा विचार बॉटम अप पद्धतीने केला आहे.

अ. मी फारतर ५ लाख रुपये घालू शकतो.
ब. किमान ७५००० रॅकेट बनवायला हव्यात.
म्हणजे इथून सुरुवात करून धंदा वाढवायचा असा विचार आहे.

खरे तर अशा नॉव्हेल्टी उत्पादनात तुम्ही लवकरात लवकर जेवढा माल बनवून विकाल तेवढे चांगले असते. कारण ...
अ. २-३ महिन्यांत दुसरा प्रतिस्पर्धी उभा राहू शकतो
ब. असल्या नॉव्हेल्टी उत्पादनांची युटिलिटी तेवढीशी नसल्याचे लवकरच लक्षात येते. आणि मागणी कमी होते. आपापल्या घरात आणलेल्या अशा प्रथमदर्शनी नॉव्हेल वाटणार्‍या किती गोष्टी आज वापरात आहेत? (माझ्या घरी- काच धुवायचे उपकरण, कॉम्प्यूटर आणि टीव्हीचा स्क्रीन साफ करण्याचा गोंड्याचा ब्रश, मोबाईल चार्ज करायला ठेवण्याचा बूट, हाताने चार्ज करण्याची टॉर्च आदि अनेक गोष्टी पडून आहेत. या वस्तू आता बाजारातही हॉट सेलिंग नाहीत.

म्हणून विचार मला १० लाख रॅकेट बनवून सहा महिन्यात विकायची आहेत असा करायला हवा. [अर्थात असा विचार करून मग कारखाना उभारता येणार नाही]. ही ऑनगोईंग प्रोसेस असायला हवी.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

चुका

माझा या क्षेत्रातला उणापुरा अनुभव व मर्यादा या नुसार मी हा प्रतिसाद दिला आहे. आपण म्हणता तशा चुका माझ्या विचारात असणे शक्य आहे पण त्या माझ्या उणिवा आहेत असे मी मानतो. कोणताही उद्योजक नवीन उत्पादन करताना ज्या विचारप्रक्रियेतून जातो ती अशीच असते एवढी मात्र माझी खात्री आहे.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

विचारप्रक्रिया

प्रतिसाद चंद्रशेखर या व्यक्तीला नसून विचारप्रक्रियेला होता.

अशीच विचारप्रक्रिया असते हे बरोबर आहे. पण तशी असू नये. नाहीतर ब्रेकथ्रू होत नाही.

माझा एक मित्र उद्योजक आहे. तो लो व्हॉल्यूम पण काहीशी निश् प्रॉडक्ट बनवतो आणि विकतो.

त्याला त्याच प्रॉडक्टरेंजमधले सामान्य प्रॉडक्ट मोठ्या प्रमाणात बनवून विकणे सहज शक्य आहे.
पण त्याचे म्हणणे एखादी गोष्ट सतत मोठ्याप्रमाणात करणे त्याला आवडत नाही. मला तसे करायचे नव्हते म्हणून तर मी उद्योजक बनलो. नाहीतर मी कुठेतरी नोकरी केली असती.

प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

सायबर कूली

खालील कामे करणार्‍या मंडळींना सायबर कूली म्हणता येणे शक्य आहे. ही यादी सर्वसमावेशक नाही. आणखी काही कामे या यादीत घालता येणे शक्य आहे.

1. कॉल सेंटरवर काम करणारी मंडळी

2. लिहिलेल्या नवीन सॉफ्टवेअरची चाचणी (टेस्टींग) करणारी मंडळी.
3. वैद्यकीय, ऑटोकॅड वापरून वापरून ड्रॉइंग्ज किंवा विधी (कायदा) संबंधी कागदपत्र तयार करणारी मंडळी

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

रामबाण उपाय

यादी-
४. स्वतःच्या मुलाला संगणक इंजि मधे घालून त्याला सायबर कुली होण्यास मदत करणारे
५. सॉफ्टवेअर डेव्हलपर
६. प्रोजेक्ट म्यानेजर
७. प्रोग्र्याम म्यानेजर

आता कशी यादी भरलेली दिसत आहे. आयटी वाल्यांच्या पगारावर जळाणा-यांसाठी तर खूप मोठी पोटदुखी थांबेल असा हा रामबाण उपाय आहे.

कामगार

आयटी वाल्यांना सायबर कुली म्हणून हिणवणा-यां इतर नोकरीतील लोकांना एखादा शब्द शोधत आहे

आयटीवाले

आयटीवाल्यांना हिणवण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. तुम्ही सर्व तरूण मंडळींनी एवढ्या तरूण वयात एवढे आर्थिक यश प्राप्त केले आहे याचे कौतुकच आहे. प्रश्न जॉब डिस्क्रिप्शनचा आहे

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

भंगार

भंगार म्हणून भारतात आयात केलेल्या सेकंड ह्यांड मशिनरीवर उत्पादन काढणे हे जास्त उंचीचे लक्षण कसे असु शकते ह्याचे उत्तर मला सापडले नाही.

फरकाची एक शक्यता

डॉक्टर, सी.ए. किंवा वकील यांच्याशी इंजिनियरांची तुलना करता येणार नाही. डॉ, सी.ए. आणि वकील हे 'शक्यतो' स्वतंत्र व्यवसाय सुरु करण्यास उत्सुक असतात किंवा त्यांचे यश त्या तुलनेत मोजले जाते. याउलट प्रत्येक इंजिनियर हा स्वतःची फ्याक्ट्री किंवा कन्सल्टिंग फर्म काढणार नाही. बहुतेक इंजिनियर हे कुणाच्या तरी हाताखालीच काम करणार असतात. त्यामुळे त्यांची एखादी संस्था नसावी असे वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

वाईट अनुभव

मी अभियांत्रिकीची पदविका शिकत असताना, वर आलेल्यांपैकी अनेक मुद्दे अनुभवले आहेत. अभ्यासक्रमाला सुरवात झाली तेव्हाच आधी आम्हाला सुतारकाम, लोहारकाम आणि नंतर प्लंबिंगसारख्या कामाला जुंपले, ज्याचा आम्हाला पुढे (तीन वर्षांच्या अभ्यासक्रमात) कुठेही उपयोग झाल्याचे जाणवले नाही. हे सगळं शिकण्याची तार्किक संगतीही आम्हाला कोणी समजावून सांगण्याची तसदी घेतली नाही. मुकी बिचारी मेंढरे हाका, असाच तो प्रकार होता. दुसऱ्या वर्षाला शिकत असताना, तर कुठल्या तरी प्रश्नावर प्राध्यापकांनी आम्हाला सांगितलं, “जेवढं सांगितलं तेवढं करा. आगाऊ प्रश्न विचारू नका.”
त्या जुन्या पुराण्या मोटारी, जनरेटर आणि एकूणच तुसडेपणानं, जीवावर आल्यासारखं प्राध्यापकांचं शिकवणं, यामुळे अभियांत्रिकी शिक्षणाबद्दल घृणाच निर्माण झाली. माझ्या ओळखीतील अनेक लोकांची अशीच अवस्था आहे. मित्र आणि नातेवाईकांपैकी 90 टक्के जण आपण इतरांना अभियांत्रिकी शिकण्यापासून परावृत करू, असं मत व्यक्त करतात. कारण केवळ कंपन्या मोठ्या प्रमाणावर निघत असल्याने अभियंत्यांना नोकरी मिळेल, या आशेवर लोकं पाल्याला अभियांत्रिकी शिक्षण घेण्याचा आग्रह करतात. त्यात त्या शाखेबद्दल ओढ असणारे फार कमी लोकं! त्यामुळं शेवटी कंटाळून मी तो अभ्यासक्रमच सोडून दिला. भोसरीतील एका कारखान्यात मी जॉब टेस्टिंगचं काम करत असताना, बेळगावचा यांत्रिकी पदवीधारक अभियंता 12 तास काम करून 5000 रुपये कमवितानाही पाहिले (2000 साली). तेव्हा तर नाराजीत आणखी भर पडली.
त्यानंतर पाच वर्षांनी शिवाजीनगरला राहत होतो त्यावेळी किमान सात-आठ पदवीधारक मी पाहिले ज्यांनी सीओईपीतील शिक्षणानंतर सॉफ्टवेअर क्वालिटी टेस्टिंगचे छोटे अभ्यासक्रम केले. (त्यातील एकाने चेन्नईला सहा महिने मार्केटिंगमध्ये काढले!) आज ते बऱ्यापैकी स्थिर आहेत आणि त्यांच्या तोंडून आपल्या शिक्षणाबद्दल आपुलकीचे शब्द मी आजपर्यंत ऐकलेले नाहीत. या अनुभवांवरून अभियांत्रिकी शिक्षणाबाबतची नावड बहुतेकानांच असते, असा निष्कर्ष मी काढला.

अन् हो, आम्हाला शिकविणारे जे त्यातल्या त्यात चांगले प्राध्यापक होते ते नुकतेच एम ई झाल्यानंतर राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आले होते. त्यामुळे त्यांचा बाहेरच्या उद्योग जगताशी संबंध नव्हताच. तिसऱ्या वर्षाच्या शेवटी मोठ्या कंपन्या येऊन काही विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी घेतात. पण लहान शहरातील विद्यार्थ्यांपर्यंत त्या पोचत नाहीत आणि त्यातूनही केवळ ‘चांगले गुण’ असलेले विद्यार्थीच त्या निवडतात.
संपूर्ण तीन वर्षांच्या काळात विद्यार्थ्यांची शालेय सहलीप्रमाणे कारखान्यांची केवळ भेट घडविली तरी विद्यार्थ्यांना पुढील (कारखान्याचे वातावरण, तेथील माणसे पाहून) भविष्यासाठी शिकण्याचा हुरूप येऊ शकतो. पण तेही घडत नाही.

लाइनमधे येऊ नका

--संपूर्ण तीन वर्षांच्या काळात विद्यार्थ्यांची शालेय सहलीप्रमाणे कारखान्यांची केवळ भेट घडविली तरी विद्यार्थ्यांना पुढील (कारखान्याचे वातावरण, तेथील माणसे पाहून) भविष्यासाठी शिकण्याचा हुरूप येऊ शकतो. पण तेही घडत नाही.--

अशा कमीतकमी ३ सहली घडवल्या पाहीजेत असा नियम आहे. तेथे सहल गेल्यावर तेथील सुपरवायजर इंजि हळूच कानात कुजबुजतात की, काहीही करा पण ह्या लाइनमधे येऊ नका.

नियम आहे?

असेल तर आमच्याबाबत तो पाळला गेला नाही, एवढेच सांगू शकतो. बाकी, सुपरवायजरच्या नामक रेड्यांच्या तोंडून ती वेदवाणी ऐकणारे भावी अभियंते भाग्यवानच म्हणायचे. पुढील अनर्थ तरी टळू शकतो.

चांगले मुद्दे

इंजिनियरिंग क्षेत्रातील दूरवस्थेबद्दल चांगले मुद्दे मांडले आहेत. सर्व पटण्यासारखे आहेत. माझा शिक्षणाचा अनुभव वरील व्यक्त केलेल्या प्रतिसादांशी काही अंशी जुळतो. माझा प्रतिसाद शिक्षणासंबंधी आहे.

इंजिनियरिंग शिक्षणाचे तीन स्तर मांडले तर आय.आय.टी. दुसरीत सरकारी शिक्षण संस्था (या दोहोंमधे एन आय टी आणि विजेटीआय सारख्या नावाजलेल्या संस्था असू शकतात.) तिसरीत खाजगी शिक्षण संस्था. या तीनही ठिकाणी पुरेशा संख्येने पुरेशा दर्जाचे शिक्षक मिळणे अवघड आहे. सर्वात वाईट परिस्थिती खाजगी संस्थांची आहे. जिथे कित्येकदा काही विषयांचे शिक्षकच नसतात. याचे मुख्य कारण शिकवण्याचा व्यवसाय हा इतर मार्गांपेक्षा पुरेसा लाभदायी नाही. हा लाभदायी करण्यासाठी सरकारकडे वा खाजगी संस्थांकडे फारशी योजना नाही.

विद्यार्थ्यांच्या बाबतीत एक वेगळी परिस्थिती आहे. बहुतांशांना घरातील टोचणी आणि पीअर प्रेशरमुळे इकडे वळावेसे वाटते. त्यामुळे इंजिनियरिंग म्हणजे त्यांच्या आवडीचा अभ्यासक्रम नसतो. आय आय टी, सी.ई.टी (एकेकाळी बारावी) सारख्या प्रवेश परिक्षेचा अभ्यास करताना हा विद्यार्थी बर्न्ट आऊट होतो. (असे काही शिक्षकांनी मला सांगितले.) याशिवाय पदवी/पदवीका घेत असलेल्यांमधे आय.टी. व्यवस्थापन (बिजिनेस मॅनेजमेंट) आणि परदेशात शिक्षण यातील एक ध्येय जवळपास सर्वांचे (९० टक्के) असते. आय.आय.टीत तर विद्यार्थी मोठ्या संख्येने त्यांच्या शाखेला त्यागतात. या कारणाने शिकताना शिक्षणाकडे ओढा नसतो. तर पूर्वी आलेल्या

इंजिनियरिंग क्षेत्रात व्यवसाय करणार्‍यांचे प्रमाण उत्पादक/मेन्टेनन्स वगैरेत सहभागी असणार्‍यांपेक्षा अगदी कमी आहे. (कदाचित ते दोन तीन टक्के असावे.) त्यामुळे व्यावसायिक संघटना इंजिनियरिंग क्षेत्रात जवळपास नाहीत. इन्स्टीट्युशन ऑफ इंजिनियर्स ही संघटना प्रामुख्याने सरकारी नोकरीत असणार्‍यांनी काबीज केली असावी. हेच प्रमाण डॉक्टर्स, आर्किटेक्ट, चार्टर्ड अकाउंटंट यात कदाचित (व्यवसाय करणारे/ एकंदर पास झालेले.) ५० टक्याच्या आसपास असू शकते. व्यावसायिकांचे प्रमाण शिक्षणक्षेत्रात कमी असणे हे त्यामुळे घडत असावे.

याशिवाय एक अडचणीचा मुद्दा आहे. इंजिनियरिंग क्षेत्रातील ज्ञानक्षेत्र हे इतर व्यावसायिकांपेक्षा फार मोठे आहे. त्यामुळे अगदी पदव्युत्तर शिक्षण घेणारे देखील व्यावसायिक बनण्यास पात्र होत नाहीत. आर्किटेक्ट आणि अकाउंटंट वा इतर व्यावसायिकक्षेत्रात असे नाही. आज डॉक्टरी क्षेत्रा थोडेफार असे घडत असावे. म्हणून प्राथमिक पदवी बरोबर पदव्युत्तर शिक्षणाची मागणी मोठी आहे.

हे असेच राहायला नको हे अगदी मान्य आहे. त्यातील काही जबाबदारी व्यावसायिकांची आहे असे (माझ्यासारख्यांची आहे) हे मी मान्य करतो.

विषय काढला याबद्दल नितिन यांचे आभार.

एक राहिले: हल्ली तरुण वर्गात लोकप्रिय असलेली फाईव पॉईंट समवन आणि तीन इडीयट हे देखील यावर भाष्य करतात. दोन्हीतील भाष्य मला न पटलेले आहेत. त्यातील दिशाहीनतेवर विचार व्हायला हवा.

प्रमोद

शिक-शट

--हल्ली तरुण वर्गात लोकप्रिय असलेली फाईव पॉईंट समवन आणि तीन इडीयट हे देखील यावर भाष्य करतात. दोन्हीतील भाष्य मला न पटलेले आहेत. त्यातील दिशाहीनतेवर विचार व्हायला हवा.---

ह्यातील दिशाहीनता शिक्षकक्षेत्रातील लोकांना जास्तीकरुन जाणवते. इतरांनी हा विषया आपला मानला आहे. समाजात शिक्षक लगेच ओळखू येतो- त्याच्या बोलण्याच्या, इतरांना हिणवण्याच्व्या, ढबींवरुन. मी १००/१०० वेळा शिक्षक ओळखू शकेल. ज्याला स्वतःला शिकायला आवडत नाही तो - शिक-शट.

+१

हल्ली तरुण वर्गात लोकप्रिय असलेली फाईव पॉईंट समवन आणि तीन इडीयट हे देखील यावर भाष्य करतात. दोन्हीतील भाष्य मला न पटलेले आहेत. त्यातील दिशाहीनतेवर विचार व्हायला हवा.

सहमत आहे. जुगाड या संकल्पनेचेही उदात्तीकरण केले जाते आहे. मला तो आधुनिकोत्तरवादाचाच एक आविष्कार वाटतो.

पण घरच्यांचे दडपण ही नवी बाब नसेल असे वाटते. पूर्वी तर लग्नेसुद्धा घरचेच परभारे ठरवीत असत त्यामुळे शिक्षणाच्या बाबतीत स्वातंत्र्य मिळत असेल असे वाटत नाही.

विषय चांगला

चांगला विषय.. हे असे आहेच, यावर दुमत नाही. तेव्हा यावर फार चर्चा करण्यासारखे काहि वाटत नाही.. मात्र ह्यावर उपाय काय? यावर चर्चा घडाविशी वाटते.
सरकारी उपाययोजना होतील तेव्हा होतील (किंवा होणारच नाहीत) पण मग तोपर्यत एखाद्याला व्यावसायिक प्रात्यक्षिकाभिमुख शिक्षण हवे असेल तर काय करता तेईल? यावर उहापोह होणे गरजेचे आहे. सरकार काहि करणार नाही हे गृहित धरून(केले तर उत्तम आहे) कंपन्यांनीच उमेदवार निवडीच्या वेळी स्वतःच अशी प्रात्यक्षिकाधारित परिक्षा सुरू केली तर मुले आपोआप त्या दिशेने प्रयत्न करतीलसे वाटते.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

+१

मात्र ह्यावर उपाय काय? यावर चर्चा घडाविशी वाटते.
सहमत

कंपन्यांनीच उमेदवार निवडीच्या वेळी स्वतःच अशी प्रात्यक्षिकाधारित परिक्षा सुरू केली तर मुले आपोआप त्या दिशेने प्रयत्न करतीलसे वाटते.

अंशतः सहमत. परीक्षेच्या जंजाळ्यातून बाहेर काढले पाहीजे असे वाटते. चाकोरीबद्ध विचार आणि मर्यादा ह्या त्यामुळेच येतात असे वाटते. अर्थात उपाय काय हा अवघडच प्रश्न आहे....

सहमत.... मात्र...

परीक्षेच्या जंजाळ्यातून बाहेर काढले पाहीजे असे वाटते

असे काहि झाले तर उत्तमच आहे. मात्र ते होण्यासाठी विद्यापिठाची तशी तयारी हवी व त्यात पुन्हा शिक्षणक्षेत्राची मानसिकता आली. सरकार, विद्यापिठे वगैरेंनी काहि करण्याची वाट बघण्यापेक्षा इतरांना काय करता येईल त्यादृष्टीकोनातून हा उपाय सुचवला होता.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

चांगली चर्चा

वेगवेगळ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांची तुलना विचार करण्यालायक आहे.

 
^ वर