भारतातले इंजिनिअरिंग क्षेत्र
नुकतीच एका ठिकाणी जी चर्चा झाली त्या निमित्ताने भारतातल्या इंजिनिअरांची गुणवत्ता वगैरे गोष्टींची चर्चा झाली. त्या चर्चेत भारतीय इंजिनिअर फारसे फंडामेंटल/ब्रेकथ्रू काम करीत नाहीत असे म्हटले गेले.
त्यानिमित्ताने इंजिनिअरिंगच्या व्यवसायाविषयी आणि शिक्षणा*विषयीचे माझ्या मनात आलेले फुटकळ विचार.
इंजिनिअरिंग हे क्षेत्र डॉक्टरी, अकाउंटन्सी, वकिली यांसारखेच व्यावसायिक क्षेत्र समजले जाते. परंतु या इतर व्यवसायांमध्ये आणि इंजिनिअरिंगच्या व्यवसायामध्ये मुख्य फरक हा की या इतर व्यावसायिकांची एक अॅपेक्स संघटना असते. आणि ती त्या त्या व्यावसायिकांचे आणि व्यवसायांचे नियंत्रण करते. इंजिनिअरांची अशी संघटना नाही. इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स ही संस्था आहे पण ती इंजिनिअरांचे नियंत्रण करीत नाही. डॉक्टर, सीए, सीडब्लूए यांची व्यावसायिक नीतिमत्तेची नियमावली असते. तशी इंजिनिअरांची नसते.**
इंजिनिअरिंग व इतर क्षेत्रांतल्या शिक्षणातला एक महत्त्वाचा फरक म्हणजे त्या कोर्सेस मध्ये फील्डवर्क चे प्रमाण खूप जास्त असते. डॉक्टरांना दुसर्या वर्षापासून प्रत्यक्ष वॉर्डांमध्ये रुग्ण तपासणी वगैरे करावी लागते. सीएंना ३ वर्षे आर्टिकलशिप करावी लागते. शिवाय डॉक्टरांना एक वर्षाची इंटर्नशिप केल्यावरच प्रॅक्टिस करता येते. सीएंना पास झाल्यावर ३-४ वर्षे दुसर्या सीएच्या हाताखाली काम केल्यावरच सर्टिफिकेट ऑफ प्रॅक्टिस मिळते. वकीलालाही असेच काहीसे असते.
इंजिनिअरिंगच्या शिक्षणात हे फिल्डवर्क फार फार कमी असते. कॉलेजमधील लॅबमधील आणि वर्कशॉपमधील काम हे काही फील्डवर्क म्हणता येणार नाही. अगदी शेवटच्या वर्षीचे प्रॉजेक्ट हे सुद्धा फील्डवर्क म्हणायला मी धजावणार नाही. येऊनजाऊन तिसर्या वर्षाच्या उन्हाळी सुट्टीत महिनाभर एखाद्या कंपनीत काम केले तर तेवढेच. पण ते सुद्धा कंपल्सरी नसते.
त्यामुळे इतर व्यवसायाचे शिक्षण घेतलेला विद्यार्थी जेव्हा बाहेर पडतो तेव्हा तो 'मार्केट रेडी' असतो. इंजिनिअर तसा नसतो. त्याला बहुधा वर्षभराचे कंपनी ट्रेनिंग करायला लागते. ते तो पहिला जॉब ज्या कंपनीत करतो तिथेच मिळते. म्हणजे त्याचे फील्डवर्कचे क्षेत्र एकदम लिमिटेड होते.
शिक्षणातला दुसरा मोठा फरक म्हणजे शिकवणारे शिक्षक. डॉक्टरांना शिकवणारे शिक्षक प्रॅक्टिसिंग डॉक्टर असतात. ते दररोज रुग्णोपचार आणि शस्त्रक्रिया करीत असतात. सीएंना शिकवणारे प्रॅक्टिसिंग अकाउंटंट असतात. वकीलांना शिकवणारे प्रॅक्टिसिंग वकील असतात (चूभूदेघे). पण इंजिनिअरिंग कॉलेजात शिकवणारे शिक्षक मात्र प्रॅक्टिसिंग इंजिनिअर नसतात. ते केवळ प्राध्यापक असतात. क्वचित प्रसंगी काही व्हिजिटिंग प्राध्यापक इंडस्ट्रीमधून येतात. मी सीओईपीला होतो तेव्हा अनेक प्राध्यापक तिथूनच इंजिनिअरिंग शिकलेले आणि इंजिनिअर होताच एकीकडे एम् ई करीत प्राध्यापक म्हणून लागलेले होते. म्हणजे त्यांनी इंडस्ट्रीचे तोंडही कधी पाहिले नव्हते.
[काही हुन्नरी प्राध्यापक बाहेर इंडस्ट्रीशी कोलॅबोरेशन करीत असत आणि इंडस्ट्रीचा अनुभव मिळवीत + स्वतःचा काही फायदा करून घेत असावेत . कारण इतर प्राध्यापकांमध्ये ते 'वरकमाई' करीत असल्याची चर्चा असे ]. दुसर्या शब्दात इंजिनिअरिंग कॉलेजेस ही व्यावसायिकांची कॉलेज असल्यासारखी न चालवली जाता ती आर्टस किंवा कॉमर्स कॉलेजासारखीच चालवली जातात.
अशा वातावरणामुळे परीक्षार्थीपणा वाढीस लागून क्रिएटिव्हिटी आणि व्यावसायिकता कमी होत असावी का?
अजून एक विचार म्हनजे इंजिनिअरिंगचे क्षेत्र एवढे व्हास्ट आहे की इंजिनिअरिंगचे अजून विभाजन व्हायला हवे. प्रॉडक्शन इंजिनिअरिंगचे - फाऊंड्री आणि डायकास्टिंग, मेटल फॉर्मिंग, प्लॅस्टिक & रबर टेक्नॉलॉजी वगैरे इलेक्ट्रिकलचे पॉवर जनरेशन & ट्रान्समिशन, इलेक्ट्रिकल मशीनरी वगैरे.
*टीप : बरीचशी माहिती मी २६ वर्षांपूर्वी अनुभवलेल्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिक्षणावर आधारली आहे. सीओईपीच नव्हे तर व्हीजेटीआय आणि सरदार पटेल कॉलेजात सुद्धा अशीच परिस्थिती होती. पण यात आजही फार फरक झाला असेल असे वाटत नाही. तसेच आय आय टी मधल्या शिक्षणप्रणालीविषयी माहिती नाही. कदाचित परकीय देशांच्या सहकार्याने उभारलेल्या असल्यामुळे सिस्टिम वेगळीही असू शकेल.
** इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सच्या संकेतस्थळावर १९३२ मध्ये रॉयल चार्टर मिळाल्याचा उल्लेख आहे पण स्वातंत्र्यानंतर भारत सरकारकडून तशी चार्टर मिळाली नसावी. शिवाय भारतात व्यवसाय करण्यासाठी त्यांची मान्यता हवी असेही काही नाही. कोड ऑफ एथिक्स मात्र आहे.
इथे सदस्य असलेल्या आणि हल्ली किंवा पूर्वी इंजिनिअर झालेल्यांकडून भर घातली जावी अशी अपेक्षा. (इथे दुहेरी क्वालिफिकेशन-इंजिनिअरिंग+अजून काहीतरी) असलेलेही लोक असावेत. त्यांची तुलनात्मक मते पण जाणून घ्यायला आवडतील.
Comments
हमाल म्हणजे काय?
आपण एखादे काम का करतो आहोत याची केवळ नीड टु नो तत्त्वावरच माहिती असणे, काम कसे करावे त्याचे निर्णय इतरांनी घेणे, इ. वैशिष्ट्ये असलेल्या कामाला कूली म्हणता येईल. केवळ एखाद्या कंपनीच्या आत विचार केला तर असे कूली असतातच, आर्किटेक्टसुद्धा कंपनीच्या आत असतील तर त्या कंपनीला कूली म्हटले जात नाही. पण जर कंपनीला एक युनिट बनविण्यास दिले आणि त्या युनिटपलिकडे कंपनीला काही माहिती नसेल तर पूर्ण कंपनीलाच कूली म्हणता येईल. अर्थात, हमाली हे वर्णन एक वर्णपट आहे, एखाद्या रुग्णाला बरे करणार डॉक्टरही त्या रुग्णाला वाचवून होणार्या राजकीय परिणामांविषयी अनभिज्ञच असतो, उपचार कसे करावे ते ठरविण्यासाठी तो शास्त्रीय निष्कर्षांना बद्धच असतो.
भारतातील खर्या अडचणी
हा विषय फारच व्यापक आहे.
भारतातील शिक्षणपद्धतीच नव्हे तर अवघे व्यावसायिक वातावरण नव्या 'भारतीय' उत्पादनांना मारक आहे.
भारतीयांची मानसिकता नव्या शोधांना आणि उत्पादनांना बळ देण्याऐवजी अशा धडपडीला नष्ट करणारी आहे.
उदाहरणार्थ, 'क्ष' या भारतीय इंजिनियरने स्वतः शोध लावून समजा 'य' हे नवे उत्पादन केले-
(हे उत्पादन लोकांच्या भल्यासाठी आहे, त्याचा खरोखरीच उपयोग आहे आणि किंमतही वाजवी आहे असे सर्व
गृहित धरूया.)
तर ते विकताना त्याला कोणत्या अडचणींना/प्रश्नांना तोंड द्यावे लागते ?
१. हे उत्पादन परकीय तंत्रज्ञानावर आधारीत आहे काय?
२. नसेल तर मग तुम्ही हे उत्पादन चांगले आणि उपयुक्त आहे असे कसे सिद्ध करू शकता?
३. त्याला कोणती आंतरराष्ट्रीय गुणवत्ता मानचिन्हे मिळालेली आहेत? आय.एस.आय.? भारतीय मानक? ते तर कुणीही मिळवू शकतो.
४. बरे, त्याची किंमत किती आहे? (अशा प्रकारचे काम करणारी परंतु वेगळ्या तंत्रज्ञानाची जी परकीय उत्पादने उपलब्ध आहेत त्यांच्या
एक चतुर्थांश किमतीस ते मिळाले पाहिजे. कारण भारतातली उत्पादने स्वस्त बनतात. खरे तर त्यांची लायकी तेवढीच असते.)
५. एक चतुर्थांश किंमत आहे म्हणता? बरे, मग त्याला तुम्ही किती वॉरंटी देता? एक वर्ष? नाही, ते उत्पादन भारतीय असल्याने (आमचा तुमच्या उत्पादनाच्या गुणवत्तेवर
विश्वास नसल्याने) किमान तीन वर्षे वॉरंटी पाहिजे.
६. नवे तंत्रज्ञान आहे म्हणता? मग जरा समजावून सांगा ना. नाही म्हणजे ते बरोबर आहे की नाही ते तरी समजले पाहिजे.
७. अरे बापरे. फारच क्लिष्ट विषय आहे. जाऊ दे. तुम्ही असे का करत नाही? त्या अमक्या-तमक्या परकीय कंपनीने निर्माण केलेले 'ज्ञ' हे उत्पादन ज्या तंत्रावर चालते तसेच एखादे उत्पादन का तयार करत नाही? तुमचे तंत्र आम्हाला कळत नाही /समजावून घेण्याची गरज नाही/आमच्याकडे तेवढा वेळ नाही/(आमच्याकडे तेवढे डोके नाही.). पण ज्याअर्थी 'ज्ञ' हे उत्पादन परदेशात आधीच मोठ्या प्रमाणावर वापरले जाते, त्याअर्थी त्या तंत्रज्ञानावर आम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो.
८. ठीक आहे.(तुम्ही इतके मागे लागला आहात तर तुमच्यावर उपकार करतो.-) तुम्ही ते उत्पादन तीन-चार महिने आम्हाला वापरायला द्या. मग आम्ही ठरवू की ते घ्यायचे की नाही.
९. (सहा महिने वापरानंतर-) ठीक आहे. बरे चालते ते उत्पादन. उपयुक्त आहेसे वाटते. तुम्ही मासिक हप्त्यावर का देत नाही? २४ हप्ते? ते मोबाईल/टीव्ही वाले देतात ना - तसे.
१०. चेक बाऊन्स झाला? अजून पंधरा दिवसांनी टाका. तोवर बॅलन्स असेल.
११. तीन महिन्यांचे हप्ते थांबलेत? सहा महिन्यांनी सगळेच पैसे एकदम देतो.
१२. आम्ही ते परकीय 'ज्ञ' हे उत्पादनच घ्यायचा विचार करत आहोत. तुमचे उत्पादन परत घ्या आणि आतापर्यंत दिलेले पैसे परत द्या.
असा अनुभव पाच-सहा ठिकाणी आल्यावर नवे तंत्रज्ञान शोधणारा इंजिनियर गाशा गुंडाळतो आणि 'ज्ञ' उत्पादन तयार करणार्या अथवा तत्सम परकीय कंपनीत नोकरी बघतो. त्याचा भांडवली जीव तितकाच असतो. यातूनही वाचलेला एखादा विरळा इंजिनियर मनोभावे परक्या तंत्रज्ञानाच्या कच्छपी लागतो. स्वतः तंत्रज्ञान विकसित करण्यापेक्षा परकीय उत्पादने /परकीय तंत्रज्ञाने वापरून केलेली उत्पादने/परक्या दिसणार्या (चिनी-जपानी-गोर्या वंशाच्या) विक्रेत्यांनी विकायला आणलेली उत्पादने भारतात विकायला सोपी आहेत हे लक्षात येईपर्यंत त्याची ऊर्मी मेलेली असते.
(यावर भारतातील आयटीची उदाहरणे (इन्फोसिस,टाटा कंन्सल्टन्सी इ.) येतील. पण त्यांनी कोणते 'नवे उत्पादन' केले आहे तेही सांगावे. भारतातील नवे तंत्रज्ञ स्वतःचे तंत्रज्ञानच परकीयांना विकता येईल का? (टेक ट्रान्सफर) याचा विचार करतात.)
बरोबरी?
--(यावर भारतातील आयटीची उदाहरणे (इन्फोसिस,टाटा कंन्सल्टन्सी इ.) येतील. पण त्यांनी कोणते 'नवे उत्पादन' केले आहे तेही सांगावे. ---
नसेलही केलेले म्हणून लगेच सायबर कुली? इतरांनी जे दिवे लावलेत त्यापेक्षा कमी लावले असतील कारण आपली आयटी २० वर्षे जुनी असेल, इतर इंडस्ट्री १०० वर्षे जुनी असावी. मग आपली बरोबरी का होइल?
एकूण जगातलीच
एकूण जगातलीच आयटी इंडस्ट्री फारफार तर ३५-४० वर्षे जुनी असेल.१९७५ साली मायक्रोसॉफ्ट तयार झाली. जगाच्या एकूण चाळीस वर्षातली आपली २० वर्षे हा मोठाच कालखंड म्हणायला पाहिजे.
प्रश्न तो नाही ,(किंवा आयटीवाल्यांनाही धोपटत नाहीये मी) प्रश्न हा आहे की सिव्हिल किंवा मेक्यानिकल किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा आयटी यांपैकी कुणीही इंजिनियरिंगमध्ये खरेखुरे 'नवे' तंत्रज्ञान विकसित केलेले नाही. आयटी मध्ये भारताने जगाच्या मानाने लक्षणीय प्रगती केली पण नवे तंत्रज्ञान विकसित केले नाही असे म्हणायचे आहे. (आयबीएम् चे प्रोसेसर्स भारतात डिझाईन होतात पण त्याचा पाया अगोदरच इतरत्र घातला गेला होता.)
आयायटी
१००% सहमत.
ह्यात मला आपल्या आयायटीवाल्यांनाही धरावेसे वाटते.
तुलना
इथल्या चर्चेचा हेतू वेगवेगळ्या व्यावसायिक क्षेत्रांची तुलना हा होता. [आय टी आणि इतर इंजिनिअर एकाच क्षेत्रातले असल्याने त्यांची स्थिती साधारन सारखीच असणार. त्यामुळे या दोन्हीतली तुलना करणेच अयोग्य ठरेल].
इतर व्यावसायिक क्षेत्रात उदाहरणार्थ वैद्यक क्षेत्रात - जेथे फील्ड वर्क जास्त आहे आणि शिकवणारे अधिक प्रोफेशनल आहेत तेथे- नवनिर्मिती झाल्याची काही उदाहरणे आहेत का? म्हणजे एखादी उपचारपद्धती भारतात विकसित झाली आणि मग ती जगभरात वापरली जाऊ लागली असे काही घडले आहे का?
(आयुर्वेद-योग वगैरेची चर्चा इथे नको. आधुनिक काळात झाले आहे का?)
नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)
वेगळी चर्चा
वैद्यक आणि अभियांत्रिकी यांची सांगड ही एक वेगळीच चर्चा ठरू शकते. याबाबत माझ्याकडे चक्षुर्वैसत्यम् माहिती आहे.
व्यापारी : एक गुंतागुंतीची चीज...
माझे एक उद्योजक मित्र आहेत. अभिनव आणि टिकाऊ उत्पादने बाजारात आणण्यात ते मग्न असतात. ते गेली १५-२० वर्षे गृहोपयोगी उत्पादने बनवून विकतात. त्यांचा अनुभव येथे देतो. त्यांनी एक सुंदर आणि टिकाऊ अशी तवे-कढया, मोठी भांडी घासायची घासणी बनवली आहे. त्याचे मटेरियल उत्तम आणि दणकट असावे असा आग्रह ठेऊन रचना केली आहे. आता घासणी हे काही इनोव्हेटिव्ह उत्पादन नाही, पण बाजारात मिळणार्या घासण्या वारंवार वापरामुळे चार महिन्यातच टाकून देण्याची वेळ येते. नायलॉन धागे तुटल्याने घासणी हातात घेतल्यावर त्याचा गोळा लोंबायला लागतो. तर आमच्या मित्राची घासणी इतकी दणकट आहे, की दोन वर्षे तिला काहीही होत नाही. (युसेज टाईम पाचपटीने अधिक).
आता उत्तम क्वालिटीच्या मटेरियलमुळे घासणीची किंमत आपोआप वाढली. ते ही घासणी बाजारात घेऊन गेले तेव्हा व्यापार्यांनी प्रारंभीच त्यांच्या उत्साहावर पाणी टाकले. तुमचे प्रॉडक्ट चालणार नाही कारण स्थानिक उत्पादकांची घासणी आणि चीनमधून आलेली घासणी जर कवडीमोल भावाने मिळत असेल तर तुमचे महाग उत्पादन कोण घेणार, असा त्या व्यापार्यांचा युक्तिवाद होता. मग हळूच त्या व्यापार्यांनी सुचवायला सुरवात केले, की कमीतकमी मार्जिनमध्ये धंदा करा. याला अर्थातच माझे मित्र तयार झाले नाहीत. ते म्हणाले, की ठीक आहे. माझे उत्पादन चालणार नसेल तर मी बंद करेन, पण निदान हा पहिला लॉट तुम्ही विका. त्यातही व्यापार्यांनी उत्साह दाखवला नाही. अखेर त्यांनी हे उत्पादन मोठ्या प्रमाणावर बनवण्याच्या योजना गुंडाळल्या.
काही काळाने त्यांना यातील रहस्य एका मुरब्बी व्यापार्याकडूनच कळले. तो म्हणाला, 'अहो शेठ. ते टिकाऊ आणि दर्जेदार हे सगळे ग्राहकाच्या बाजूने ठीक आहे हो, पण व्यापार्याचे काय? तुमची घासणी घेतल्यानंतर गिर्हाईक दोन वर्षे दुकानात येणारच नसेल तर फायदा काय? त्याऐवजी दर चार महिन्यांनी नवी घासणी घ्यायला ते येणार असतील तर व्यापार्याचाही फायदा नाही का? म्हणूनच चीनच्या स्वस्त हलक्या दर्जाच्या वस्तू भरभर खपतात.
या व्यापार्यांचेही अनेक किस्से आहेत. कुणी स्वतंत्र धागा काढला तर तिथे चर्चा करू.
इंजिनियरिंग कम्युनिटी!
या इंजिनियरिंग कम्युनिटीविषयींचे प्रतिसाद वाचताना आपण यांच्यावर वृथा चिखलफेक करत आहोत असे वाटत आहे.
इंजिनियरिंग शिक्षण - प्रशिक्षण विषयीच्या व त्या शैक्षणिक काळातील सोई- सुविधा, अडचणी, परीक्षा पास होण्यासाठी वापरलेले shortcuts याविषयी कमेंट्स न केलेले बरे! कारण बहुतेक सर्व क्षेत्रात ही रडारड आहे.
डॉक्टर वा वकील यांच्याप्रमाणे काही तुरळक अपवाद वगळता इंजिनियरची अशी युनिक आयडेंटिटी नसते. कारण यांच्या कामाचे स्वरूप सांघिकरित्या (टीमवर्क) होत असते. त्यामुळे त्यांच्या नावाचा वा प्रोफेशनचा गवगवा होत नसावा. आपल्या येथील नवरत्न कंपन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील BEML, BHEL, BEL, ONGC, सारख्या कंपन्यांना उर्जीतावस्थेत नेण्यासाठी हजारो इंजिनियर्सचा योगदान आहे. TELCO, TCS, L&T, भारत फोर्ज, महिंद्रा सारखे बृहत उद्योग, इंजिनियर्सच्या विशेष कर्तृत्वाविना या स्टेजपर्यंत पोचल्या नसत्या. गेल्या 60 वर्षातील विकास प्रकल्पांचा आढावा घेतल्यास हजारो धरणं, राष्ट्रीय महामार्ग, आण्विक-रासायनिक-विद्युत उद्योगांचे व लघु-पूरक उद्योगांचे जाळे, रेल्वे - विमान वाहतूक तंत्रज्ञान व्यवस्था, शहरातील उत्तुंग इमारती, इत्यादीसाठी इंजिनियर्सचाच हातभार आहे, हे (काही प्रमाणात गलथानपणा असला तरी!) आपण नाकारू शकत नाही. इंजिनियर्स (व तंत्रज्ञांच्या) परिश्रमातूनच आपण आधुनिक सोई- सुविधा उपभोगत आहोत हे विसरता येत नाही.
अकौंटंट्स बीनकौंटर्स असल्यामुळे पैशाच्या नाड्या त्यांच्या हातात असतात म्हणून आपल्याला त्यांची भीती वाटते. डॉक्टर्स (आपला खिसा रिकामा करत!) आपले जीव वाचवतात म्हणून आपण त्यांना उपकृत असतो. वकील, जज या मंडळीमुळे कोर्टाची पायरी चढाविशी वाटत नाही. त्यामुळे या लोकांचा कायम दबदबा असतो. परंतु इंजिनियर कुणाचेही नाक दाबून 'आ' करायला लावू शकत नसल्यामुळे त्याची कदर केली जात नसावी.
आपल्या देशाच्या अग्रक्रमात बदल झाल्यामुळे माहिती तंत्रज्ञान व सेवाक्षेत्राच्या तुलनेत उत्पादन क्षेत्राला वाईट दिवस आल्यासारखे वाटत आहे. चीनमध्ये मात्र उत्पादन क्षेत्राला अग्रक्रम असून अत्यंत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन होत असल्यामुळे (व कामगार 12-14 तास तुटपुंज्या पगारात काम करत असल्यामुळे) इतर देशात त्यांच्या वस्तूंचे डंपिंग होत आहे ही वस्तुस्थिती नाकारू शकत नाही. अग्रक्रमातील बदलामुळे माहिती क्षेत्रातील इंजिनियर्स 'सायबर कूलीं'ना इतर क्षेत्रातील इंजिनियर्सपेक्षा जास्त सन्मानाने वागविले जात असावे. परंतु ही स्थिती अशीच राहील याची शाश्वती नाही. मुळात उत्पादन (व त्याचप्रमाणे बांधकाम, खाण, तेल या ) क्षेत्रातील किचकट व कष्टाच्या कामापेक्षा माहिती क्षेत्रातील 'उच्च वर्णी'य काम (वातानुकूलित ऑफिस, कुणाचेही तोंड न बघण्याची गरज नसणे, भरपूर पगार!) नवीन पिढीला भुरळ पाडत आहे. परंतु घी देखा लेकिन बडगा नही देखा अशी अवस्था होऊ नये म्हणजे मिळवली!
सहमत
+१ सहमत.
प्रमोद
सहमत
अभियांत्रिकी क्षेत्राचे यश हे सांघिक असते. त्यामुळे एखादाच इंजिनिअरच्या शोधाला सांघिक स्वरूप आले की ते उपयोगी होते. जेम्स वॅटने वाफेच्या शक्तीचा शोध लावला, पण त्या शक्तीचा उपयोग करून रेल्वे धाववायची यासाठी इतर अनेकांचा सहभाग आहे.
भारताचे अवकाश क्षेत्रातले प्रभुत्व हे आपल्या अभियांत्रिकी क्षेत्राचे यश आहे. 'चांद्रयान' मोहिम हा अभियांत्रिकी क्षेत्रातील एक मानबिंदू आहे.
अभियांत्रिकी शिक्षणाचे स्वरूप आता पुस्तकी असेल, पण त्यात फिल्डवर्क आणले तर तयार होणारे इंजिनीअर 'टेंडर-इर' बनतील अशी रास्त भीती वाटते. बांधकामातील सिमेंट व रेतीचे प्रमाण पुस्तकी असलेले परवडले, फिल्डवर्क मध्ये शिकून तयार होणार्या इंजिनीअरची फौज तयार झाली तर परिस्थीती काय होइल.
दुसरे एक, फिल्डवर्क शिक्षित अभियंते 'आऊट ऑफ बॉक्स' विचार करून फंडामेंटल शोध लावतील ह्याची खात्री काय? ते फक्त बाहेरील जगाच्या अभियांत्रिकी अर्थव्यवस्थेचे घटक बनण्यासाठी पात्र होतील.
सहमत.
इंजिनीयर!
भारतीय इंजिनीयर काही मुळ-शोध लावतील ही आशा व्यक्त करणे एक बाजुला पण दुसरीकडे खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे सर्वसाधारण भारतीयाला (इंजि अणि इतर) कल्पकताही नसणे हे मात्र जरा काळजीपुर्ण वाटते.
ही बघा ताजी बातमी
स्टेट बँक ऑफ इंडियाने कारकुनांच्या २७००० जागा भरण्यासाठी जाहिरात दिली होती. त्यासाठी ३८ लाख जणांनी ऑनलाईन अर्ज केले आणि २७ लाख जण लेखी परीक्षेला बसले. निवड झालेल्या २७ हजार उमेद्वारांत ३८०० जण इंजिनिआरिंगचे पदवीधर असून २०० जण तर इंजिनिरिंगचे पदव्युत्तर पदवीधर आहेत. रिसेशनमुळे सध्या इंडस्ट्रीत जॉब नसल्याने किंवा जॉब कधीही जाण्याच्या भीतीने सुरक्षित पगाराची नोकरी म्हणून हे लोक बँकेत कारकून म्हणून काम करायला तयार झाले आहेत. स्टेट बँकेच्या मनुष्यबळ विभागाला या बदलत्या ट्रेंडचे आश्चर्य वाटत आहे, पण टेक्निकल ज्ञान असलेले कर्मचारी मिळाले म्हणून ते खूशही आहेत.
-मेरा भारत महान-
ह्म्म्म
ह्म्म्म.
इंजिनिअर्सनी बँकेत काम करणे हे काही नवे नाही. अनेक बँका आणि फायनान्शिअल इन्स्टिट्यूशनना, प्रकल्पांना कर्ज वाटप करताना प्रकल्पाची तांत्रिक बाजू तपासण्यासाठी इंजिनिअर लागतातच.
अर्थात या इंजिनिअर्सनी कोणत्या पदांशाथी अर्ज केले आहेत हे माहिती नाही.
नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)
अद्ञानात सुख!
"टेक्निकल ज्ञान असलेले कर्मचारी मिळाले "... अद्ञानात सुख!