प्राचीन भारतातील बौद्ध धर्माच्या र्‍हासाची कारणे

विसूनाना यांनी सुरू केलेल्या एका चर्चा विषयामधे हा विषय उपस्थित झालेला मी बघितला. मला असे वाटले की हा विषय फारच विस्तृत असल्याने निराळा धागा सुरू केल्यास जास्त सखोल चर्चा होऊ शकते. म्हणून या धाग्याचे प्रयोजन.
भगवान बुद्धांचे महानिर्वाण झाल्यानंतर त्यांची धर्मविषयक सूत्रे, मठांमधील शिस्त व नियम या सगळ्या गोष्टी नीट टिकून रहाव्यात यासाठी पहिल्या बुद्ध महासभेचे आयोजन राजा अजातशत्रू याच्या कारकीर्दीमध्ये करण्यात आले होते. करण्यात आले होते. या वेळी बुद्ध शिष्य आनंद याच्याकडे सूत्रे जपण्याचे व दुसरा शिष्य उपाली याच्याकडे मठातील शिस्त व नियम याबद्दलचे विनया हे लिखाण जपून ठेवण्याचे काम देण्यात आले होते. यानंतर 100 ते 150 वर्षांनंतर दुसर्‍या महासभेचे आयोजन झाले होते. काही मठातील भिख्खू लोकांनी दिलेले द्रव्य घेत असल्याचे आढळून आल्याने ही महासभा घेतली गेली. होती.
तिसरी महासभा सम्राट अशोकाच्या कालात पाटलीपुत्र या राजधानीत झाली होती. या कालापर्यत बुद्धांच्या शिकवणीचे कोणत्या प्रकारे पालन करावयाचे याबद्दल मतभेद त्यांच्या अनुयायात होऊ लागले होते. बुद्धाचे अनुयायी निरनिराळ्या भूप्रदेशात पसरत चालले होते व त्यामुळे त्यांच्यात एकसूत्रता आणणे हे या महासभेचे कार्य होते. श्री लंकेला गेलेल्या व महिन्द्र या शिष्याने या कालापर्यंत स्वत;ला स्थविरवादी असे म्हणायला सुरवात केली होती. बुद्धांच्या मूळ सूत्रांचे त्यात सांगितल्याप्रमाणेच पालन केले पाहिजे असे स्थविरवाद्यांचे म्हणणे होते.

इ.स.नंतर पहिल्या शतकात कनिष्क या कुषाण राजाच्या कालात बौद्ध धर्मियांचा एक नवा पंथ उदयास आला. या पंथाने स्वत:ला महायान पंथ असे नाव घेतले. त्यांच्या मताप्रमाणे बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार हे सर्वात महत्वाचे होते. यासाठी बुद्धांनी सांगितलेल्या मूळ सूत्रांच्यात थोडेफार बदल केले तरी चालण्यासारखे होते. या पंथाने आपण स्वत: श्रेष्ठ आहोत हे दाखवण्यासाठी स्थविरवाद्यांना हीनयानी असे म्हणण्यास सुरवात केली.
भगवान बुद्धांनी सांगितलेली तत्वे व शिकवण ही जर मोठ्या प्रमाणात धर्मप्रसार करावयाचा असला तर अपालनीय व कडक आहेत हे महायानी पंथाचे म्हणणे सत्यच वाटते. महायानी पंथामुळेच बौद्ध धर्म संबंध एशियात पसरला यात शंकाच नाही.

मूळ बौद्ध धर्माचे महायानी व स्थविरवादी असे विभाजन होणे हे बौद्ध धर्माच्या र्‍हासाचे मूल कारण होते असे उपक्रमींना वाटते का?

लेखनविषय: दुवे:

Comments

मला असे वाटते

कारण नंबर एक : बौद्ध धर्माच्या र्‍हासास राजाश्रयाचा अभाव हे एक कारण वाटते. सम्राट अशोक,सम्राट कनिष्क, हर्षवर्धन यांनी जसा राजाश्रय दिला तसा पुढील काळातातील राजवटींनी शुंग,सातवाहन यांनी बौद्ध धर्मास राजाश्रय दिला नाही.

कारण नंबर दोन : हिनयान आणि महायान हे बौद्ध धर्मातील भेद हेही एक कारण वाटते. हिनयान पंथाचा विश्वास बूद्धाच्या तत्त्वाज्ञावर आधारीत होता तर महायान या पंथाचे धोरण सुधारकांसारखे होते. अशा रीतीने बौद्ध धर्माचे वैचारिक मतभेद निर्माण झाले. दोघांना एकत्र आणण्याचे काम फारसे झाले नाही.

कारण नंबर तीन : बौद्ध धर्माचा प्रचार प्रसाराच्या कामात मिळणार्‍या संपतीने विवाद उभे राहात गेले. भिक्षू-भि़क्षुणी पवित्र जीवन विसरत गेले. बौद्ध धर्म प्रसाराचे काम मागे पडत गेले.

कारण नंबर चार : वैदिक धर्माने पुन्हा मुसंडी मारली. कुमारील भट्ट, शंकराचार्य, आदि महान आचार्यांनी लोकांची मने हिंदू धर्माकडे आकर्षित केली. हिंदू धर्माने गौतम बुद्धाला विष्णूचा अवतार म्हणून स्वीकारले

कारण नंबर पाच : हुणांबरोबर मुसलमान राजवटीने भारतावर आक्रमणे करुन बौद्ध धर्मांचे विहार स्तुपे नष्ट केली शेकडो बौद्ध भिक्षूंना ठार केले. बौद्ध भिक्षूंची निवासस्थाने नष्ट केली.

याबरोबर अशी अनेक कारणे सांगण्यात येतात. संदर्भ हवे असतील तर वेळ मिळेल तेव्हा पुस्तके शोधून संदर्भ डकवतो.

मजकूर संपादित. चर्चेतील अनावश्यक प्रतिसाद काढून टाकले आहेत. सर्व सदस्यांनी विषयांतर न करता सदर चर्चेवरच प्रतिसाद द्यावे ही विनंती. - संपादन मंडळ

-दिलीप बिरुटे

महायान व हिनयान पंथ

कारण नंबर दोन : हिनयान आणि महायान हे बौद्ध धर्मातील भेद हेही एक कारण वाटते. हिनयान पंथाचा विश्वास बूद्धाच्या तत्त्वाज्ञावर आधारीत होता तर महायान या पंथाचे धोरण सुधारकांसारखे होते. अशा रीतीने बौद्ध धर्माचे वैचारिक मतभेद निर्माण झाले. दोघांना एकत्र आणण्याचे काम फारसे झाले
हे कारण जरी ग्राह्य वाटत असले तरी महायान पंथ निर्माण झाला नसता तर बौद्ध धर्म एवढ्या दूरपर्यंत पसरलाच नसता. हा पंथ चालू होईपर्यंत, बौद्ध धर्म स्वीकारणार्‍यांना सर्वसंगपरित्याग करून भिख्खू म्हणूनच आयुष्य जगावे लागत असावे असे वाटते. महायान पंथानेच एखाद्या व्यक्तीला बौद्ध धर्म स्वीकारल्यावरही एक गृहस्थाश्रमी व्यक्ती म्हणून जगण्याची परवानगी दिली असावी असे वाटते. या बाबतीत कोणी तज्ञ खुलासा करू शकेल का? असे असले तर महायान पंथ बौद्ध धर्माच्या र्‍हासाला कारण न होता प्रसाराला कारणीभूत ठरला असे म्हणता येणार नाही का?
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

पटले नाही..

>>>महायान पंथ निर्माण झाला नसता तर बौद्ध धर्म एवढ्या दूरपर्यंत पसरलाच नसता.
तज्ञ आणि उपक्रमावर अधिकार चालवणारी मंडळी वरील विषयाचा खुलासा करतील. पण, मला असे वाटते की, बौद्ध धर्माच्या परिषदा बौद्ध धर्माची प्रचार,प्रसार,संघटन करणे याबाबतीतल्याच होत्या. महायान पंथामुळेच बौद्ध धर्म पसरला हे पटण्यासारखे नाही. कारण वरील एका कारणात म्हटल्याप्रमाणे महायान पंथाचे धोरण जरा वैदिक संस्कृतीकडे झुकणारे होते असे वाटते जसे, भक्ती,मूर्तीपूजा,तीर्थक्षेत्रे,स्वर्गप्राप्ती,संस्कृत भाषा, संसारात राहून बौद्ध धर्माचे नियमन करणे वगैरे या कारणामुळे काही देशांमधे महायानाचे प्रस्थ होते तर काही देशांमधे हिनयानांचे.त्यामुळे महायानामुळेच बौद्ध धर्म दूरपर्यंत पोहचला याला फारसा आधार नाही, असे वाटते. असो, बाकी प्रतिसाद काय म्हणतात त्याच्या प्रतिक्षेत.

मजकूर संपादित.

-दिलीप बिरुटे

:-)

बौद्ध धर्माच्या र्‍हासास राजाश्रयाचा अभाव हे एक कारण वाटते. सम्राट अशोक,सम्राट कनिष्क, हर्षवर्धन यांनी जसा राजाश्रय दिला तसा पुढील काळातातील राजवटींनी शुंग,सातवाहन यांनी बौद्ध धर्मास राजाश्रय दिला नाही.

कनिष्कः राज्यकाळ - इसवी सनानंतर १२७ ते १५१
हर्षवर्धन: राज्यकाळ - इसवी सनानंतर ६०६ आणि पुढे

शुंगः राज्यकाळ - इसवीसनापूर्वी १८५आणि पुढे
सातवाहनः राज्यकाळ - इसवीसनापूर्वी २३० आणि पुढे.

बाकी चालू द्या.

मजकूर संपादित. प्रतिसादातील अनावश्यक भाग काढला आहे. -संपादन मंडळ

धन्यवाद...!

काळाच्या चुका सोडून शुंग, सातवाहन, यांनी बौद्ध धर्माला राजाश्रय दिला नाही असे वाचावे. सनावळ्यांची गडबड लक्षात आणून दिल्याबद्दल आभारी...!

व्यक्तिगत रोखाच्या संवादांसाठी खरडवही किंवा निरोप सुविधेचा वापर करावा. चर्चेतील अनावश्यक प्रतिसाद काढून टाकले आहेत. - संपादन मंडळ

बौद्ध धर्माला राजाश्रय भरपूर मिळाला आहे

बौद्ध धर्माला भरपूर राजाश्रय मिळाला आहे. बुद्धाच्या हयातीतच त्याचे शाक्य कुल बौद्ध झाले होते. त्यावेळी वैशालीचा अजातशत्रू हा राजा बुद्ध धर्माचे पालन करत होता. नौर्य घराण्यातील राजे जैन होते तसेच बौद्ध होते. सम्राट अशोक, सम्राट ब्रुहद्रथ हे बौद्ध होते. महेंद्र आणि संघमित्रेच्या प्रयत्नातून बौद्ध धर्म श्रीलंका, जावा, सुमात्रा या भागात पसरला होता. तेथील राजांनी त्याला आश्रय दिला होता. गांधार भागात बौद्धांचा लक्षणीय प्रभाव होता. ग्रीक क्षत्रपांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. शक, कुशाण राजांपैकी अनेकजण बौद्ध होते. कनिष्काचा उल्लेख आलाच आहे. अगदी आदि शंकराचार्यांच्या काळापर्यंत बौद्ध धर्म प्रभाव गाजवत होता.

मला एक फरक असा जाणवतो, की भारतात वैदिक आणि बौद्ध किंवा जैन या धर्मातील संघर्ष हा स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्यापुरता मर्यादित होता. मिहीरगुलसारख्या राजांचा अपवाद वगळता पुष्यमित्र किंवा सातवाहनांसारख्या ब्राह्मण राजांनी बौद्धांचा नृशंस संहार करण्याचे पाऊल उचललेले दिसत नाही. मुस्लिम आक्रमणकाळात मात्र सामूहिक हत्यासत्र कमालीच्या हीन पातळीवर पोचलेले आढळते. तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठांचा विध्वंस, मंदिरे, स्तूप उखडून तेथे मशिदी उभारणे, ब्राह्मण आणि भिक्षुंची हत्या (एका सुलतानाने सत्तेवर येताच केवळ ब्राह्मण निवडून त्यांची जाहीर हत्या केली तर जमा केलेल्या जानव्यांचे वजन काही मण भरले, असा उल्लेख वाचला आहे.)

शुंग राज्यकाळ

>>>शुंगः राज्यकाळ - इसवीसनापूर्वी १८५आणि पुढे

इतिहासाचे पुस्तक चाळले तेव्हा शुंग राज्यकाळ इ.स.पूर्व १००-७५ असा आहे, असे इतिहासातील विद्वान सांगतात, आणि तेच बरोबर असावे.

-दिलीप बिरुटे

म्हणजेच

इतिहासाचे पुस्तक चाळले तेव्हा शुंग राज्यकाळ इ.स.पूर्व १००-७५ असा आहे

म्हणजेच तज्ज्ञांच्या मतेही शुंगकाळ हर्षवर्धनापूर्वीच येत असावा ना! :-)

इतिहासातील विद्वान सांगतात, आणि तेच बरोबर असावे.

हो ना! म्हणूनच सामान्यांनी उगीच आकांडतांडव करू नये. ८०-८५ वर्षांचा फरक मला मान्य आहे.

एक उत्तम पुस्तक

या विषयावर एक उत्तम पुस्तक सापडले. त्यातील मते पटोत- ना पटोत , संदर्भासाठी त्यात मम. पां.वा. काणे, आंबेडकर यांच्यासारख्या दिग्गजांची मते आहेत. तीही संदर्भासह.
बौद्धांच्या दृष्टीकोनातून या प्रश्नाकडे पहाण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त तर आहेच, शिवाय काही मूळ अवतरणे उपलब्ध असल्याने विविध संशोधकांची या विषयावरील मतेही समजतात. त्याचे लेखकाने केलेले विवेचन आपण मान्य केलेच पाहिजे असे नाही हे वे.सां. न. ल.

अर्थात् तिरुमला हे बौद्धस्थान होते हे मान्य केलेच पाहिजे असे नाही. कारण त्याबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. (श्री. रा.चिं.ढेरे यांचे मत असे की ते एक लोकदैवत आहे.)
(या पुस्तकाबद्दल उपक्रमाचे एक ज्येष्ठ सदस्य प्रा. पद्माकर यांचे आभार.)

तॄष्णा

आपले अभ्यासक मित्र अधिक समर्पक प्रतिक्रिया देतीलच, पण मला वाटते, की 'मानवी दु:खांच्या मागे तृष्णा हे मूळ कारण आहे,' हे बुद्धाचे सूत्र त्याचेच अनुयायी त्याच्या निधनानंतर फार लवकर विसरले. धनाचा संग्रह, शरीराचे भोग या गोष्टींचे संयमन फारसे सोपे नसते. सर्वसामान्य माणसे किंवा नवे साधक या निसरड्या मार्गावर लवकर पडू शकतात. दुसरी गोष्ट बौद्ध धर्म जनतेत लोकप्रिय होत होता तेव्हा त्याच्याकडे सर्वजण कुतुहलाने पाहात होते. एक पटणारा पंथ म्हणून त्याचा प्रसार होत होता. पण जेव्हा राजसत्तेने हा धर्म अनुसरला आणि त्याच्या प्रसाराचे काम हाती घेतले तेव्हा शासकांचा जुना वैदिक धर्म आणि नवा बौद्ध धर्म यात संघर्ष निर्माण होणे अपरिहार्य होते. साम, दाम, दंड, भेद ही राजकीय संघर्षाची हत्यारे आहेत आणि वैदिक धर्माने त्यांचा वापर बौद्ध धर्माचा प्रभाव पुसण्यासाठी केलेला आहे.

र्‍हासाची कारणे

अव्यवस्थेच्या नियमानुसार, बाह्य मदत मिळाली नाही तर एकदा सुरू केलेली कोणतीही व्यवस्था खराबच होत जाते. व्यवस्था जितकी अधिक चांगली असते तितकी तिला अधिक संरक्षणाची आवश्यकता असते. या रूपकाच्या आधारे माझी पुढील मते आहेत.
बौद्ध धर्म हा मुळात प्रस्थापित रूढींच्या विरोधात, सुधारणावादी म्हणून आला होता. त्याची तुलना भारतातील तिसर्‍या आघाडीशी करता येईल. तिसर्‍या आघाडीची तुलना कोठेतरी सतत शकले होणार्‍या अमिबाशी केली गेली होती. बौद्ध धर्माने जी स्वप्ने दिली ती पूर्ण करणे त्यांना जमले नसावे. प्रस्थापित धर्म मात्र शोषणाच्याच उद्दिष्टाने प्रेरित असल्यामुळे टिकू शकले असावेत.

बौद्ध धर्माचा उत्कर्ष आणि र्‍हास्...

गरुडध्वज शिलालेख, विष्णू आणि वासुदेव भाग-२ या चर्चेतील बौद्ध धर्माशी संबंधित काही प्रतिसाद येथे हलवले आहेत याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी. - संपादन मंडळ.

सम्राट अशोकाचा काळ हा बौद्ध धर्माचा सुवर्णकाळ होता. अर्थात राजा आणि अनेक नागरिक बौद्ध धर्माचे पालन करत असले तरी वैदिक धर्म टिकून होताच. फक्त त्याचा प्रभाव काहीसा क्षीण झाला होता. गंमत बघा, वैयक्तिक आचरणात अहिंसेचा पुरस्कार करणार्‍या राजांनी सैन्ये मात्र सुसज्ज राखली होती. हे सैनिक काही बौद्ध झालेले नव्हते. ते वैदिक धर्माचे आणि क्षत्रियत्वाचे पालन करणारे होते. त्या काळात योद्ध्यांचे अनेक संघ असेही होते ज्यांचा उपजिविकेचा मार्ग लढाई होता. अशी भाडोत्री सैन्ये प्रत्येक राजा जवळ बाळगून असे (मराठेशाही-मोगल काळातही पठाण, रोहिले, गारदी, अरब, राजपूत, हबशी, अशा अनेक जमाती रोजमुरा देईल त्याच्याकडे चाकरीला असत. नाना फडणिसाकडेच १००० अरबांचे कडवे सैन्य चाकरीला होते) आता पोटापाण्यासाठी लढाई करणारे लोक अहिंसा आणि बौद्ध तत्त्त्वांचा पुरस्कार करणे शक्यच नव्हते. पण त्या काळात बौद्ध धर्माला राजाश्रय असल्याने कुणी उघडपणे विरोधात गेले नाही. सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांना बौद्ध धर्माच्या प्रसारार्थ इतर देशांत पाठवले. अशा रीतीने बौद्ध धर्म दक्षिण भारत व श्रीलंकेत विस्तारला.

पुढे बौद्ध धर्माला उतरती कळा लागली. कोणत्याही चळवळीचे अपयश हे नेत्याच्या आणि कार्यकर्त्यांच्या वर्तनावर ठरते. शेवटचा मौर्य सम्राट ब्रुहद्रथ याच्या काळात बौद्ध धर्माचा नाटकी अतिरेक झाला होता. ब्रुहद्रथ हा स्वतः विलासी आणि दारु व सुंदर स्त्रियांमध्ये आकंठ बुडालेला होता. वरकरणी बौद्ध धर्माची उदात्त तत्त्वे पोपटासारखी बोलायची आणि प्रत्यक्षात मात्र सगळे अनाचार करायचे. 'यथा राजा तथा प्रजा' या न्यायाने हा स्वैराचार प्रजेत आणि बौद्ध संघातही पसरला होता. बौद्ध संघात तर हेरांचा सुळसुळाट झाला होता. त्याचा फायदा ग्रीकांनी करुन घेतला. हेर, लाच, घातपात आणि व्यभिचार यांचा वापर कूटनीतीच्या राजकारणासाठी कसा करायचा, हे चाणक्याने अर्थशास्त्रात नोंदवून ठेवले आहे.

बौद्ध धर्माचा भारतातील र्‍हास हळूहळू सुरु होता. त्यात महायान आणि हीनयान असे पंथ होऊन जातीयतेची फूट पडली. सम्राट कनिष्काच्या काळात महायान पंथियांची मोठी परिषद झाली आणि हीनयान पंथ बाजूला फेकला गेला.

पुढे पुढे तर बौद्ध धर्म हा केवळ तात्त्विक चर्चेचे एक व्यासपीठ झाले. त्यावर निर्णायक आघात करण्याचे काम शंकराचार्यांनी केले. त्यांनी वादविवादात विशेषतः बौद्ध बनलेल्या ब्राह्मण विद्वानांचा पराभव केला आणि वैदिक धर्माचेही पुनरुज्जीवन केले. म्हणजे बघा. वैदिक व बौद्ध धर्मातील हा संघर्ष हा शतकानुशतके सुरु होता. बौद्ध धर्माचा र्‍हास कुणा एका राजाच्या काळात घडला नाही. पडझडीची ही प्रक्रिया प्रदीर्घ काळ आणि मुक्तपणे सुरु राहिली. त्याअर्थाने मी आपोआप असा शब्द वापरला आहे. पुष्यमित्रावर बौद्ध साहित्याचा राग असणे स्वाभाविक आहे कारण त्याच्या क्रांतीमुळेच वैदिक धर्म पुन्हा प्रबळ झाला.

मला इतकेच म्हणायचे होते, की मगधाच्या सार्वभौमत्वाचे संरक्षण, हे पुष्यमित्राचे ध्येय होते. वैदिक धर्माला शक्ती देणे, हे त्यात सुप्त होतेच. आणि हेही खरेच की क्रांतीनंतर पुष्यमित्राने एक क्षणही न दवडता वैदिक परंपरांचा पुरस्कार लगेच सुरु केला. त्याने नातू वसुमित्राला गादीवर बसवून त्याच्याकडून अश्वमेध यज्ञ करुन घेतला आणि खारवेल व शातकर्णी यांचा युद्धात पराभव केला. मला हा वसुमित्राचा पुढचा इतिहास वाचायचा आहे. तो काळही तितकाच रोचक आहे.

माहितीप्रद

पुन्हा एकदा उत्तम प्रतिसाद.
योगप्रभू यांनी संदर्भासाठी काही पुस्तकांची यादी दिली तर त्यांच्या वाचनाचा लाभ घेता येईल.
'वसुमित्राचा पुढचा इतिहास' -या बद्दलही उत्सुक.

हा अधिकार प्रियाली यांचा...

विसुनाना,
या इतिहासाबद्दल प्रियाली अधिकारवाणीने भाष्य करु शकतील त्यामुळे पुस्तकांची यादी व संदर्भ त्यांना विचारणे इष्ट राहील.

माझ्यापुरते विचाराल तर मला भूतकाळाचे दुवे गुंफून लिहिलेल्या कादंबर्‍या आवडतात. मी त्यांना प्रमाण मानणार नाही, पण इतिहासाचा तो विशिष्ट काळ डोळ्यापुढे उभा राहण्यासाठी निव्वळ जंत्रीवजा आणि सैद्धांतिक ग्रंथांपेक्षा अशा ललित शैलीतील कादंबर्‍याच चांगल्या वाटतात. (शेवटी इतिहास म्हणजे तरी काय इति+ह+आस = हे असं असं घडलं होतं, हेच सांगणे)

तर मी आपल्याला सांगेन की आपण पुष्यमित्राच्या राजकीय संघर्षावरील एक कादंबरी आवर्जून वाचावी. तिचे नाव 'उषःकाल' की 'राज्यक्रांती' यापैकी आहे (लेखक : भाऊ धर्माधिकारी) आता ही कादंबरी मिळेल का हे सांगणेही मुश्किल आहे कारण खूप जुनी आहे. माझी प्रत कुणीतरी लंपास केली. तर मुद्दा असा, की ही जरी कादंबरी असली आणि लेखकाने काही ठिकाणी कल्पनेचे स्वातंत्र्य घेतले असले तरी त्यात पुष्यमित्रकालीन इतिहासाचे दुवे खूपसे बरोबर सांधले गेले आहेत आणि तो काळही जिवंत केला आहे. फार पूर्वी मी ही कादंबरी वाचून काही टिपणे काढली होती आणि नंतर एकदा माझ्याकडे असलेल्या चाणक्याच्या 'अर्थशास्त्र' ग्रंथातील संज्ञांशी ते पडताळून पाहिले तेव्हा भाऊ धर्माधिकारींच्या तर्ककौशल्याचे कौतुक वाटले. त्याखेरीज विशाखादत्ताचे 'मुद्राराक्षस' हे नाटकही वाचण्यास उपयुक्त ठरते. पुष्यमित्राचा काळ खूप पुढचा असला तरी मौर्यकालीन संबोधने, रीतीरिवाज, भाषा व संस्कृती याचे ठसे मुद्राराक्षसमधून पाहायला मिळतात.

बाकी इतिहासाची पुस्तके म्हणाल तर रोमिला थापरपासून कोसंबींपर्यंत खूपजणांचे लेखन वाचता येईल.

नाही हं!

या इतिहासाबद्दल प्रियाली अधिकारवाणीने भाष्य करु शकतील त्यामुळे पुस्तकांची यादी व संदर्भ त्यांना विचारणे इष्ट राहील.

:-(
माझ्याकडे इथे अमेरिकेत काहीच डेटा नाही. कोणा इतराने ही जबाबदारी उचलावी आणि सर्वांना खरेच माहिती द्यावी. चर्चेत मोलाची भर पडेल.

बौद्ध धर्माचा ऱहास

>>> बौद्ध धर्माचा भारतातील र्‍हास हळूहळू सुरु होता. त्यात महायान आणि हीनयान असे पंथ होऊन जातीयतेची फूट पडली. ...

- महामहोपाध्याय भारतरत्न पां. वा. काणे यांनी यासंदर्भात अतिशय माहितीपूर्ण लेखन केलेले आहे. (पुस्तकाचे नाव नेमके आठवत नाही़; कारण पुस्तक वाचल्याला बरीच वर्षे झाली आहेत. काणे यांचीच अनेक पुस्तके मी त्या काळात सलगपणे वाचली. त्यामुळे नेमके नाव आठवेना; परंतु `धर्मशास्त्राचा विचार` हे ते पुस्तक असावे, असे वाटते.)

भारतात बौद्ध धर्माला रसातळाला नेण्यात हीनयान पंथाचा वाटा सर्वाधिक आहे. हीनयान पंथ हा असा एक पंथ होता की, ज्यात `विधी` आणि `निषेध` असे काही नव्हतेच. म्हणजे असे की, बहीण-भावाचा संभोग त्यांना चालू शके. मद्यसेवन, मांसभक्षण या तर काय, रोजच्याच गोष्टी होत्या. चोरी करणे, लूटमार करणे यात काहीच वावगे नव्हते, खोटे बोलणेही सर्रास चाले... ही अशी विधिनिषेधशून्यता बोकाळलेली होती. हे असे असल्यावर एखादा `धर्म` बुडायला कितीसा काळ लागणार ?
बुद्धाच्या महानिर्वाणानंतर पाचशेच वर्षांनंतर बौद्ध धर्माच्या चिरफळ्या - त्या धर्माच्या जन्मदेशातच; म्हणजे भारतातच - उडाल्या आणि अन्य देशांत हा धर्म एखाद्या सागरासारखा फैलावत गेला !!!

बुद्धत्वाला पोचलेला एक कुणातरी महानेता असतो आणि बाकीचे अनुयायी (काही जवळचे निवडक अपवाद वगळता) महाबुद्धू असतात, हे ठळठळीतपणे सांगणारा एक किस्सा बौद्ध भिक्खूच्या संदर्भात वाचलेला आठवतो.

कधीही कुणाला कुठलीच भिक्षा मागू नका. न मागता पात्रात जी भिक्षा पडेल, तेवढीच सेवन करा, असे गौतम बुद्धाचे भिक्खूंना सांगणे होते. मांसभक्षण तर वर्ज्य होतेच.
एकदा असे झाले की, एका भिक्खूच्या पात्रात मांसाचा तुकडा पडला. उडणाऱया कावळ्याच्या चोचीत हा तुकडा होता. कर्मधर्मसंयोगाने चोचीतून तो निसटला आणि भिक्खूच्या पात्रात पडला. आता आली मोठीच पंचाईत. भिक्षा तर न मागता मिळाली आहे. एक नियम पूर्ण झाला. पण ती मांसाची आहे. हे निमयात बसणारे नाही. आता काय करायचे ?
भिक्खूंचा संघ बुद्धाकडे गेला. संबंधित भिक्खूने बुद्धाला हकीकत सांगितली. बुद्धाने तेवढ्यापुरता म्हणजे अगदी तेवढ्यापुरताच अपवाद केला आणि ते अभक्ष्यभक्षण करण्यास संबंधित भिक्खूला परवानगी दिली. झाले. प्रश्न तिथेच आणि तेवढ्यापुरताच मिटला; पण...
या एकाच अपवादामुळे आज चीन आणि जपानमधील बौद्धधर्मीय सर्रास मांसाहारी झालेले आहेत !!!
अनुयायी हे असे असतात. अपवादालाच नियम कऱणारे. आपल्या धर्मनेत्याकडे असलेले प्रखर व्रताचरण, त्याची निष्ठा, पोटतिडीक, ध्यास या गोष्टी अनुयायाकडे असतीलच असे नाही. किंबहुना नसतातच. आणि धर्माच्या नावेत अशाच तर अनुयायांचा सुळसुळाट असतो. त्यांच्यामुळेच धर्म बुडतो आणि हेच `उंदीर` नाव बुडू लागली की स्रर्वात प्रथम बाहेर उड्या मारतात आणि `भवसागरा`त गटांगळ्या खातात !!!
.......
दुसरी गोष्ट : मूर्तिपूजेला बुद्ध अजिबात मानत नसे. मूर्ती हा प्रकारच त्याला मान्य नव्हता. आज उर्दूमध्ये मूर्तीसाठी, पुतळ्यासाठी `बुत` हा जो शब्द वापरला जातो, तो बुद्ध याच शब्दावरून आलेला आहे. चीन-जपानमध्ये आज बुद्धाच्या बुतांचा नुसता `बुतबुताट` झालेला आहे !
चुकूनमाकून या पृथ्वीतलावर बुद्ध पुन्हा एकदा अवतीर्ण झाला तर तो `हेचि `बुत` काय मम तपाला ?` असे म्हटल्याशिवाय राहणार नाही!!!
ज्याने मूर्तिपूजा नाकारली, त्याच्याच मूर्ती करून सद्गुरूच्या शिकवणुकीला हरताळ फासणारे असे हे अनुयायी... मग धर्माचा ऱहास होणारच !
.......

प्रदीपजी मला एक शंका आहे.

बौद्ध धर्मात मांसभक्षणाला परवानगी नव्हती, असे वाटत नाही. भिक्षुने स्वतः हत्या करुन मांस खाऊ नये व हिंसेच्या मार्गाला जाऊ नये, अशी बुद्धाची शिकवण होती. दुसर्‍याने शिजवलेले मांस भिक्षेत मिळाले तर ते खाण्यास बुद्धाची हरकत नव्हती. स्वतः बुद्धाचे महानिर्वाण होण्यास शिळे मांस खाण्यातून झालेला अतिसार कारणीभूत असल्याचे मी कुठेतरी वाचले होते. (खरे खोटे माहीत नाही)

बुत हा शब्द बुद्धवरुन आला आहे, हे पटते. इस्लामी आक्रमणाच्या पहिल्या टप्प्यात खैबर खिंड परिसरात ही बुद्धपूजा चांगलीच प्रसारित होती. त्याला बुद्ध प्रशस्ती म्हणत. त्यावरुनच 'बुतपरस्ती' हा अपभ्रंश प्रचलित झाला असावा.

बुद्ध आणि मांसाहार !

बुद्ध आणि मांसाहार यांविषयी मी पूर्वी वाचलेले मला पुसटसे आठवत आहे.

एका आजारी भिक्खूला मांस खायची इच्छा झाली असता त्याची सेवा करण्यासाठी नेमलेल्या एका भिक्खिणीने (प्राणिहत्या करावी लागू नये म्हणून) स्वतःच्याच शरीराचे मांस कापून त्याला खायला दिले. ही गोष्ट बुद्धाला कळली आणि मग त्याने आपल्या शिष्यसंघाला बजावले की, यापुढे कोणीही कोणत्याही प्रकारचे मांस खाता कामा नये आणि तेव्हापासून मांसाहार वर्ज्य झाला. (या गोष्टीची सत्यासत्यता जिज्ञासूंनी पडताळून पाहावी.)

आपल्या शिष्यांनी मांसाहार करू नये असे सांगणारा बुद्धही-तसे शिष्यांना सांगितल्यानंतर- स्वतः मांसाहार करीत होता किंवा कसे, हे तपासले पाहिजे !

आताच वाचली

एका आजारी भिक्खूला मांस खायची इच्छा झाली असता त्याची सेवा करण्यासाठी नेमलेल्या एका भिक्खिणीने (प्राणिहत्या करावी लागू नये म्हणून) स्वतःच्याच शरीराचे मांस कापून त्याला खायला दिले. ही गोष्ट बुद्धाला कळली आणि मग त्याने आपल्या शिष्यसंघाला बजावले की, यापुढे कोणीही कोणत्याही प्रकारचे मांस खाता कामा नये आणि तेव्हापासून मांसाहार वर्ज्य झाला. (या गोष्टीची सत्यासत्यता जिज्ञासूंनी पडताळून पाहावी.)

ही गोष्ट मी आताच वाचली. या भिक्खिणिचे नाव सुप्रिया. त्या आजारी भिक्खूला आपण मनुष्य मांस खातो आहोत ही कल्पना नव्हती. परंतु, ही बुद्ध कथा आहे कारण त्यात पुढे बुद्धाने सुप्रियेच्या मांडीवरून हात का दृष्टी फिरवली (चू.भू.द्या.घ्या) आणि तिची जखम भरून आली असे सांगितले आहे. हा इतिहास नाही. बुद्धानंतर अनेक वर्षांनी बुद्धकथा/जातककथा रचल्या गेल्या त्यामुळे त्यात सत्यांश किती ते कळणे कठिण आहे.

बुद्ध स्वतः मांसाहारी होता असेच आजवरच्या वाचनातून वाटते.

भगवान बुद्ध आणि सू(सु)करमद्दव !

भगवान बुद्ध आणि सू(सु)करमद्दव !

भगवान बुद्ध, मांसाहार आणि भिक्खूसंघाच्या भोजनाविषयीच्या नियमांबाबत मला जी माहिती मिळाली, ती पुढे देत आहे.

अ)

भगवान बुद्धाने जी तत्त्वे सांगितली आहेत व जे उपदेश केले आहेत, त्यांमध्ये `पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामि` याशिवाय : पंचशीलातील तत्त्वाप्रमाणेच मदिरेच्या सेवनाविषयी ते अत्यंत कडक नियमांचेच बंधन घालतात.
भगवान बुद्ध किंवा त्यावेळचे भिक्खूसंघ मांसाहारसेवन करीत असत की नसत, याला पुरावे म्हणून जे सापडतात, त्यात प्रामुख्याने `विनयपिटक` आणि इतर पाली भाषेतील ग्रंथ आणि अशोक राजाचे शिलालेख हे प्रमुख आहेत.
आपल्या शिकवणुकीतून भगवान बुद्धाने पशूहत्येविरुद्ध प्रचार केलेला आढळतो. बौद्ध धर्माचे मूलभूत तत्त्व म्हणूनच अहिंसा आहे. त्या ठिकाणी प्राण्यांची हिंसा ही निषिद्धच मानली आहे. कोणत्याही सजीव प्राण्याची हत्या करू नये, असाच त्या अहिंसेतून उपदेश केलेला आहे.
भगवान बुद्धाचे जे उपासक व श्रद्धा असलेले जे निरनिराळे राजे होते व नंतरही झाले तेही बुद्धाचा हा प्राणिहत्येसंबंधीचा व मांसभक्षणासंबंधीचा उपदेश आचरणात आणीत होते, हे त्यांच्या आचरणावरून दिसते.
भगवान बुद्ध व त्यांचा भिक्‍खूसंघ मांसाहारी होता की नाही, या गोष्टीसंबंधीही उलट-सुलट प्रतिपादन करणारे विचारप्रवाह आहेत. कोणाच्या मते भगवान बुद्धाने व त्यांच्या संघाने मांसाहार कधीच घेतला नाही, तर काहींच्या मते भिक्षा देताना लोक मांसरूपी अन्नदान करीत असत व ते भगवान बुद्ध, त्यांचे शिष्य व संघातील भिक्‍खूगण या सर्वांना मांसाहार करावाच लागे.
काही सूत्रांवरून असे आढळते की, आपल्या दान देणाऱ्या दात्यांचा अपमान होऊ नये म्हणून भगवान बुद्धाने मांसान्न स्वीकारले; पण त्याचबरोबर अहिंसेच्या तत्त्वात त्यांनी जे सांगितले आहे, त्याविरुद्ध ते आचरण करतील, असा सबळ पुरावा त्या सूत्रांत कोठेही नाही; पण जर खास भिक्‍खूंकरिताच पशूवध नसेल तर त्यांना मांससेवनाची अनुज्ञा आहे, असे "विनयपिटका'तही उल्लेख आहेतच.
भगवान बुद्धाने परिनिर्वाणाच्या दिवशी चुंद लोहाराच्या (हा बुद्धाच्या जवळच्या शिष्यांपैकी एक होता) घरी डुकराचे मांस खाल्ले ही गोष्ट अनेक विद्वानांमध्ये मतैक्‍य नसलेली आहे. अश्‍वघोषाने वरील मांससेवन केल्याचा उल्लेख केला आहे, तर काही विद्वानांच्या मते ते अन्न पंचगोरसाने तयार केलेल्या अन्नाचे होते. त्या मृदू अन्नाचे नाव होते "सू(सु)करमद्दव'. या शब्दाचे आणखीही अर्थ संभवतात, ते म्हणजे रसायन वगैरे. तेव्हा ही घटनाही इतिहासाच्या आधारे फोल आहे.
बुद्धाच्या मते अहिंसा आणि शाकाहार ही महान तत्त्वे होती; कारण प्रत्येक सजीवाला जीवन जगण्याचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो स्वतंत्रपणे जगू शकतो, अशा मताचा गौतमबुद्ध होता, हेच त्याच्या सर्व शिकवणुकीवरून सिद्ध होते.

(संदर्भ ः बौद्ध धर्म मार्गदीप. संपादक ः हरिभाऊ पगारे)

* * *

ब)

सू(सु)करमद्दव : सू(सु)करमद्दव म्हणजे डुकराचे मांस असा अर्थ काहींनी केला आहे; परंतु मद्दव या स्वतंत्र शब्दाचा अर्थ मांस असा होत नाही. त्यामुळे डुकरांना आवडणारा एक प्रकारचा मऊ कंद असा त्याचा अर्थ पाली टीकाकारांनी दिला आहे. कावळ्याची छत्री किंवा कुत्तरवेल या नावाच्या वनस्पतीत जसा कावळा किंवा कुत्रा यांचा संबंध नाही, तसा सू(सु)करमद्दव कंदात डुकराचा संबंध नाही, असे काहीजणांचे म्हणणे आहे.

(संदर्भ - अविनाश सहस्रबुद्धे यांनी लिहिलेला `भगवान बुद्धांचा जनवादी धर्म` हा ग्रंथ. प्रकरण : भगवान बुद्धांचा धर्मसंचार. त्यातील शेवटची तळटीप)

* * *
क)

बुद्धाने आपल्या भिक्खूसंघाला घालून दिलेले भोजनविषयक ३० नेम

१) लक्षपूर्वक पिंडपात (भिक्षा) ग्रहण करीन, असा नेम करावा.
२) पात्रावर लक्ष ठेवून पिंडपात ग्रहण करीन, असा नेम करावा.
३) भाताला लागेल एवढेच वरण घेईन, असा नेम करावा.
४) पात्र भरून न जाईल, अशा प्रमाणे पिंडपात ग्रहण करीन, असा नेम करावा.
५) लक्षपूर्वक भोजन करीन, असा नेम करावा.
६) पात्रावर लक्ष ठेवून भोजन करीन, असा नेम करावा.
७) अनुक्रमे एका बाजूने जेवत जाईन, असा नेम करावा.
८) भाताला लागेल एवढेच वरण घेऊन जेवीन, असा नेम करावा.
९) मधलाच भात घेऊन जेवणार नाही, असा नेम करावा.
१०) जास्त मिळवण्याच्या इच्छेने वरण किंवा भाजी भाताने झाकून ठेवणार नाही, असा नेम करावा.
११) आजारी नसता वरण किंवा भात आपल्यासाठी करवून जेवणार नाही, असा नेम करावा.
१२) टीका करण्याच्या हेतूने दुसऱायच्या पात्राकडे पाहणार नाही, असा नेम करावा.
१३) मोठा घास करणार नाही, असा नेम करावा.
१४) बेताचा घास करीन, असा नेम करावा.
१५) घास तोंडाजवळ आणण्यापूर्वी तोंड उघडणार नाही, असा नेम करावा.
१६) जेवताना तळहात तोंडात घालणार नाही, असा नेम करावा.
१७) तोंडात घास असता बोलणार नाही, असा नेम करावा.
१८) हातातील घास तोंडात फेकून जेवणार नाही, असा नेम करावा.
१९) घासाचा भाग तोंडाने तोडून जेवणार नाही, असा नेम करावा.
२०) गालात अन्न भरून जेवणार नाही, असा नेम करावा.
२१) हात झाडीत झाडीत जेवणार नाही, असा नेम करावा.
२२) भात इकडे-तिकडे शिंपडून जेवणार नाही, असा नेम करावा.
२३) जीभ इकडे-तिकडे हलवत जेवणार नाही, असा नेम करावा.
२४) चपु चपु शब्द करत जेवणार नाही, असा नेम करावा.
२५) सुरूसुरू शब्द करत जेवणार नाही, असा नेम करावा.
२६) हात चाटत जेवणार नाही, असा नेम करावा.
२७) पात्र चाटत जेवणार नाही, असा नेम करावा.
२८) ओठ चाटत जेवणार नाही असा नेम करावा.
२९) उष्टया हाताने पाण्याचे भांडे घेणार नाही, असा नेम करावा.
३०) भाताची शिते असलेले पात्र धुऊन ते पाणी गावात टाकणार नाही, असा नियम करावा.

(संदर्भ : धर्मानंद कोसंबी यांचे बुद्ध (बौद्ध) धर्मावर चार निबंध )

बिचारा बुद्ध

बिचारा बुद्ध.
इतक्या सगळ्या वयाने मोठ्या भिक्षूंना नव्याने वळण लावणे केवढे कठीण काम.

अगदी अगदी

अगदी अगदी
तुम्ही डोळ्यांपुढे चित्र तर आणून पाहा. वर दिलेले सर्व नियम न पाळता भिक्खू जेवत आहेत...आणि (हत)बुद्ध त्यांना सांगून सांगून थकला आहे !
:) :) :)

हे वाचून

हे वाचून गौतम बुद्ध पुण्यात रहात असत का असे वाटू लागले आहे...

बाकी पुण्यातील रेस्टॉरंट मध्ये / खानावळीत ह्या सुचना जबरा शोभतील.

तुम्हीही पुण्याचेच का ?

>>> हे वाचून गौतम बुद्ध पुण्यात रहात असत का असे वाटू लागले आहे...

- शक्य आहे. या शाक्यमुनींचा एखादा जन्म याही नगरीत कधीकाळी झालेला असू शकेल ! (तुम्ही पुण्याचेच का ? तसे असेल तर मग आपण दोघेही कदाचित भिक्खू असू शकू त्या वेळी !!) :)

>>> बाकी पुण्यातील रेस्टॉरंट मध्ये / खानावळीत ह्या सुचना जबरा शोभतील.

- खरे आहे. पैसे देऊन विकत घेतलेले अन्न कसे खावे, याबाबत दुसऱयाला एवढ्या बारीकसारीक सूचना करणारे दुसरे कोणते शहर असू शकेल ? :)

लॅमिंग्टन रोड

जेव्हा फूड इन्फ्लेशन विषयी रोज बातम्या येत तेव्हा मुंबई येथे, लॅमिंग्टन रोडवर एका मराठी रेस्टॉरंटमध्ये एक पाटी पाहिली होती असे स्मरते: "अन्न टाकले तर ५ रुपये दंड होईल".

भोजनविषयक नेम पाहता

बौद्ध धर्माच्या र्‍हासाच्या कारणात भोजनविषयक नेम हेही एक कारण असले पाहिजे असे वाटते. :)

-दिलीप बिरुटे

मांसाहार आणि मूर्तीपूजा

मांसभक्षण तर वर्ज्य होतेच.

नव्हे. स्वतः हिंसा करणे वर्ज्य होते. बुद्ध स्वतःही मांसाहार करत असून आपल्या अन्नाविषयी चोख होता. आपण मूळचे क्षत्रिय आहोत हे तो कधीच विसरला नाही आणि शरीराची काळजी घेणे महत्त्वाचे असते हे त्याचे मत होते असे वाटते. येथे योगप्रभूंशी सहमत आहे.

या एकाच अपवादामुळे आज चीन आणि जपानमधील बौद्धधर्मीय सर्रास मांसाहारी झालेले आहेत !!!

नाही तसे काही नाही. ही एक आख्यायिका आहे.

मूर्तिपूजेला बुद्ध अजिबात मानत नसे. मूर्ती हा प्रकारच त्याला मान्य नव्हता. आज उर्दूमध्ये मूर्तीसाठी, पुतळ्यासाठी `बुत` हा जो शब्द वापरला जातो, तो बुद्ध याच शब्दावरून आलेला आहे. चीन-जपानमध्ये आज बुद्धाच्या बुतांचा नुसता `बुतबुताट` झालेला आहे !

मूर्तीपूजेला बुद्ध मानत नव्हता हे ठीक पण बुद्धाच्या मूर्ती इसवी सनापूर्वीच गांधारात निर्माण झाल्या. उलट सुबक ग्रीक शिल्पकलेने भारतातसुद्धा सुबक शिल्पकलेचे प्रस्थ वाढले असे मला वाटते.

बौद्धांच्या र्‍हासाचे कारण केवळ त्यांचा भ्रष्टाचार असे देता येत नाही. तसे असते तर जगातील सर्वच धर्म आतापर्यंत र्‍हास पावले असते. बौद्ध धर्माच्या र्‍हासाची कारणे यापेक्षा वेगळी असावीत. मी काल थोडेफार वाचन केले असता -

शुंग राजवटीने वैदिक धर्माची मरगळ जाऊन बौद्ध धर्म थोडा पिछाडीस गेला हे खरे आहे. यातच वैदिक धर्माने बौद्ध धर्माच्या अनेक गोष्टी लिलया उचलल्या. आज आपल्या ध्वजावरही जे अशोकचक्र आहे ते मूळ बौद्ध संस्कृतीतील आहे. शुंग, सातवाहन वगैरेंनंतर इसविसनातही कनिष्क आणि हर्षासारखे अनेक पराक्रमी राजे झाले. त्यानंतर हुणांनी बौद्ध धर्माला क्षिती पोहोचवली. यात मिहिरकुल या अतिशय क्रूर राजाचे वर्णन वाचले. हुण हे शिवाचे परमभक्त होते. मिहिरकुलाने आपला राज्यविस्तार करून उत्तर भारतातील अनेक चैत्य आणि विहारातील बौद्ध धर्मगुरूंची हत्या केली. यानंतर दिशा दाखवणारे गुरूच बौद्धांकडे राहीले नाहीत असे सांगितले जाते.

वैदिक धर्म जसजसा कर्मठ होत गेला तसतसा तो इतर धर्मांबाबत अधिक अहिष्णू झाला आणि हे ही एक कारण बौद्ध धर्माच्या र्‍हासाचे आहे. पुढे मुसलमानी संस्कृतीने उरला सुरला बौद्धधर्मही संपुष्टात आणला.

बौद्धांच्या र्‍हासाची कारणे

मुख्यत्वे संपत्तीसंग्रह आणि त्यामुळे शिरलेला भ्रष्टाचार ही असावीत. याला बौद्ध मठही अपवाद नव्हते. किंबहुना अपरिग्रह करणे ही बुद्धाची शिकवण दुर्लक्षित करून बौद्ध संघ अर्थसंचय करू लागले. बौद्ध लेण्यांच्या जमिनी मठांना दान म्हणून मिळू लागल्या. यामुळे हळूहळू वाईट प्रवृत्ती शिरल्या आणि मठांबद्दल असलेला आदर नाहीसा झाला.

बुद्धाच्या मूर्ती इसवी सनापूर्वीच गांधारात निर्माण झाल्या.

याचे कारण अशोकाने बौद्ध धर्माला दिलेले स्थान आणि प्रसार.

बहुतेक जुन्या स्तूपामध्ये बुद्धाचे चित्रीकरण बोधी वृक्ष, त्याचे आसन, पादत्राणे (खडावा) आणि पावले अशा प्रकारे केलेले असते.

http://en.wikipedia.org/wiki/File:MaraAssault.jpg

संपत्तीपायीच

मुख्यत्वे संपत्तीसंग्रह आणि त्यामुळे शिरलेला भ्रष्टाचार ही असावीत. याला बौद्ध मठही अपवाद नव्हते. किंबहुना अपरिग्रह करणे ही बुद्धाची शिकवण दुर्लक्षित करून बौद्ध संघ अर्थसंचय करू लागले.

या संपत्तीपायीच हुणांनी बौद्ध मठांचा विनाश केला आणि भिख्खूंचे शिरकाण केले असे कळते.

वैदिक धर्माने बौद्ध धर्माच्या अनेक गोष्टी उचलल्या.

इथूनः
http://www.loksatta.com/lokprabha/20100924/samiksha.htm

बौद्ध तत्त्वज्ञानाचा अमीट ठसा
हिंदू धर्मात स्वत:चे म्हणावे असे महान, उच्च, उदात्त काहीही नाही. जे उच्च-उदात्त दाखविले जाते ते प्रत्यक्षात मुख्यत: बौद्धांचे आणि अंशत: अन्य प्रवाहांचे आहे.
आज निसर्गाशी संबंधित अनेक सणवार आपण साजरे करतो, त्यापैकी जवळपास सगळे सण बौद्ध परंपरेतून आलेले आहेत. अनेक अर्थपूर्ण प्रतिकंही याच संस्कृतीने समाजमनात रुजविलेली आहेत. खरेतर बौद्ध धर्म हाच भारतीय मातीतला पहिला आणि खरा मानवधर्म होय. हाच धर्म भारतीय संस्कृतीवरचा आद्य आणि सखोल ठसा आहे!
बौद्धधर्माचे चेहरे तरी किती लपवणार? ज्या पुरी, शंृगेरी, बद्रीनाथ, द्वारका या ठिकाणी शंकराचार्यानी चार हिंदूधर्मपीठे स्थापन केली, ती ठिकाणे मूळची बौद्ध चळवळीचीच महान केंद्रे होती! पुरीचे जगन्नाथाचे मंदिर हे पूर्वीचे बौद्धमंदिर होते! (इति. स्वामी विवेकानंद!) शंृगेरीचा शंकराचार्याचा मठच बौद्धस्तुपाच्या जागेवर झालेला आहे! श्रीशैलमचे मंदिरही पूर्वीचे बौद्धशिल्प होते! तिरुपतीचा बालाजी, बद्रीनाथचा बद्रीकेश्वर ही सध्या हिंदूंची म्हणवली जाणारी धार्मिक क्षेत्रे पूर्वीची बौद्धधर्माची महत्त्वाची स्थाने होती (तिरुपती बालाजी आणि तिथला परिसर नीट न्याहाळला तरी हे लक्षात येते! मुंडन पद्धत ही मूळची बौद्धपरंपरेची!)
बौद्ध धर्माची जी चार प्रमुख सेंटर्स होती त्या ठिकाणी चारधाम यात्रा बौद्ध मंडळींनी सुरू केली. या चार धामांचे यथावकाश अपहरण करण्यात आले. देशातल्या बहुतांश देवदेवता, त्यांच्या मूर्ती आणि मंदिरे मूळची बुद्धिस्टांची आहेत. अगदी कोल्हापूरची महालक्ष्मीची मूर्तीही आणि तिचे मंदिरही! (उत्खननाची गरज इथे आहे!) अशी असंख्य ठिकाणे हिंदू-वैदिक संस्कृतीने हडप केली आणि तिथे ‘..अशी आख्यायिका आहे..’ टाइप पौराणिक कथांचा व वैदिक कर्मकांडांचा बाजार मांडला!
बौद्धधर्म सबंध भारतभर व भारताबाहेर विस्तारला होताच, परंतु महाराष्ट्राच्या अणूरेणूत तो अक्षरश: भिनला होता. लोकसेवेच्या, समतेच्या, ज्ञानविज्ञानाच्या चळवळी महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातून आणि डोंगरपर्वतातून निनादल्या होत्या! यातूनच महाराष्ट्राचे परमवैभव असलेली बौद्ध लेणी निर्माण झाली आणि महाराष्ट्राच्या भूगोलावर बौद्ध इतिहासाच्या सर्जनशीलतेचा अप्रतिम ठसा कायमचा कोरला गेला! नंतरच्या काळात या लेण्यांबाहेर कुठल्यातरी चमत्कृतीपूर्ण शिवाची, देवाची किंवा देवीची उभारणी करून बौद्धलेण्यांना हायजॅक करण्यात आले! त्यासाठी काल्पनिक देवदेवतांच्या सुरस कहाण्यांना ऊत आणला गेला!
प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, ‘फार दूर नको, लोणावळ्याजवळची कार्ला लेणी पाहा. ही वास्तविक बौद्धांची! तेथल्या त्या ओटय़ा, ते दिवाणखाने, ते स्तूप, साऱ्या बौद्धांच्या स्वाध्यायश्रमाच्या जागा! तेथे बाहेर एक देवी अचानक प्रगट झाली! तिचे नाव एकविरा! हिला वेहेरीची देवी असेही म्हणतात. ही पांडवांची बहीण. हिच्यासाठी भीमाने एका रात्रीत ही लेणी कोरून काढली!’
किती उदाहरणे सांगायची? आज शाळा-कॉलेजांमधून आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. परंतु हा ‘गुरू’ कोण हे कुणाला माहीत नाही! हा गुरू आहे, गौतम बुद्ध! त्याने पाच शिष्यांना केलेल्या पहिल्या उपदेशामुळे पहिली गुरुपौर्णिमा साजरी झाली आणि तिथून तो पायंडा पडला! (पण आज गुरुपौर्णिमा बिनबोभाटपणे व्यासमहाशयांच्या नावावर खपविली जातेय!) मंगळसूत्र, मंगलाष्टका असे अगणित शब्द बौद्धपरंपरेतूनच आलेले आहेत. थोडक्यात, आपल्या लोकसंस्कृतीवर असलेला बौद्धधर्माचा, बौद्ध प्रतिकांचा, बौद्धविचारतत्त्वांचा ठसाच इतका अमीट आहे की, त्यापासून बाजूला होऊ म्हटले तरी होता येत नाही, अशी परिस्थिती आहे.
भारताच्या राष्ट्रध्वजावरचे अशोकचक्र हे बौद्धधम्मचक्रप्रवर्तनाचेच प्रतिक आहे! भारताची अधिकृत शासकीय राजमुद्रा ही बौद्धपरंपरेचीच खूण आहे. राष्ट्रपतीभवनात राष्ट्रपतीच्या आसनामागे दर्शनी जागी ठळक अक्षरात ‘धर्मचक्रप्रवर्तन’ असे कोरलेले आहे.

ही सरसकट

हिंदू धर्मात स्वत:चे म्हणावे असे महान, उच्च, उदात्त काहीही नाही. जे उच्च-उदात्त दाखविले जाते ते प्रत्यक्षात मुख्यत: बौद्धांचे आणि अंशत: अन्य प्रवाहांचे आहे.

सरसकट विधाने शक्यतो करू नयेत.
हिंदू धर्म बाहेरून उसना आलेला धर्म नाही. बौद्ध, जैन हेही बाहेरचे नाहीत. एतद्देशीय आहेत. त्याचबरोबर स्थानिक धर्म/कल्ट/दैवते ही एतद्देशीयच आहेत.
या धर्मांकडून एकमेकांकडे सरमिसळ झाली यात गैर काही नाही. मुळात बुद्धाने आपले विचार हे अनेक श्रमण, आणि ब्राह्मणांकडे जाऊन वेगवेगळे गुरू करून घेत शेवटी त्याला कठोर परिश्रमाअंती ज्ञान प्राप्त झाले अशी कथा आहे. बुद्धाचे मूळ विचार आणि त्यात नंतर जातककथांनी पडलेली भर ह्याबद्दल अभ्यासक सांगू शकतील.

ही वास्तविक बौद्धांची! तेथल्या त्या ओटय़ा, ते दिवाणखाने, ते स्तूप, साऱ्या बौद्धांच्या स्वाध्यायश्रमाच्या जागा! तेथे बाहेर एक देवी अचानक प्रगट झाली! तिचे नाव एकविरा!

अगदी खरे. पण कोळी आणि प्रबोधनकार ठाकरे ज्या चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजातले आहेत, हे समाज मुख्यत्वे ही देवी पूजतात. आता कोळी लोक समुद्रापासून इतक्या दूरवरून कार्ल्याला का येतात हे मला एक मोठे कोडे पडलेले आहे. तेच चांद्रसेनीयांचे. याचे कारण माझ्या मते कोणी स्थानिक राजे (कदाचित कोकणातील) तेथवर आले असतील, आणि देवी स्थापन केली असेल. नंतर कथा आली असेल. हे होण्याचे कारण वरून कुठून बौद्ध स्थाने नष्ट करा, असा फतवा आला नसावा, तर जी बौद्ध स्थाने आता वर्दळीची नाहीत, निगा घेणारे कोणी नाही तेथे नवीन दैवते स्थापन होणे शक्य होते. एकवीरेला कोंबड्या वगैरे बळी चढवतात, मुंबईत शीतलादेवीला तिच्या नाकाची नथ वर उचलून मद्य चाखवतात असे ऐकले आहे. ती हिंदू धर्मानंतर आलेली पद्धत नाही. अनेक स्थानिक पंथ हे अनादी काळापासून बळी चढवत आले आहेत. किंबहुना यज्ञात बळी देण्याची प्रथा जुनी होती, म्हणूनच तर सम्राट अशोकाला ती कमी करण्याची गरज भासली.

बाकी बौद्धविचार बरेचसे प्रगतीशील असावेत, परंतु कदाचित ते न रुजण्याचे, टिकण्याचे कारण हे मुळातील बौद्धांनी इतर परंपरांचा स्विकार करून स्वतःच्या मूळ विचारांशी फारकत घेतली, त्यामुळे त्यांना मिळणारा पाठिंबा कमी झाला. बौद्धांच्या काही मठाधिपतींनी आजूबाजूच्या खेडुतांकडून काही पैसे (कदाचित हक्काच्या दक्षिणेच्या स्वरूपात) घेणे सुरू केले, जे अन्यायकारक होते, असेही कुठेतरी वाचल्याचे स्मरते आहे, पण नक्की संदर्भ शोधून सांगेन.

आपल्या लोकसंस्कृतीवर असलेला बौद्धधर्माचा, बौद्ध प्रतिकांचा, बौद्धविचारतत्त्वांचा ठसाच इतका अमीट आहे की, त्यापासून बाजूला होऊ म्हटले तरी होता येत नाही, अशी परिस्थिती आहे.
हे खरे असावे. आता ही कसली थेरं सुचली तुला, असे म्हणतात ते मला कधीकधी थेरवादाशी संबंधित आहे का असे वाटते.

थेर...थेरगाथा...

>>> आपल्या लोकसंस्कृतीवर असलेला बौद्धधर्माचा, बौद्ध प्रतिकांचा, बौद्धविचारतत्त्वांचा ठसाच इतका अमीट आहे की, त्यापासून बाजूला होऊ म्हटले तरी होता येत नाही, अशी परिस्थिती आहे.

>>> हे खरे असावे. आता ही कसली थेरं सुचली तुला, असे म्हणतात ते मला कधीकधी थेरवादाशी संबंधित आहे का असे वाटते.

बौद्धधर्मीयांच्या त्रिपिटक या ग्रंथातील पहिल्या पिटकाचे नाव आहे
सूत्तपिटक. ( पिटक म्हणजे पूड [सात पुडांचा डबा, दोन पुडांची पोळी इत्यादीमधील पूड... पूड म्हणजे भाग-विभाग. ])

{उर्वरित दोन पिटक(के) अशी आहेत : २) विनयपिटक आणि ३) अभिधम्मपिटक. }

या पहिल्या सूत्तपिटकात पुन्हा पाच पोटविभाग आहेत. त्यातील पाचवा पोटविभाग आहे खुद्दकनिकाय (क्षुद्रनिकाय). या पाचव्या पोटविभागातही पुन्हा १५ पोट-पोटविभाग आहेत. या १५ पैकी आठवा पोट-पोटविभाग आहे थेरगाथा आणि नववा पोट-पोटविभाग आहे थेरी गाथा.

थेर म्हणजे स्थविर अथवा वृद्ध (वडील) पुरुष आणि थेरी म्हणजे वडीलस्त्री. बुद्धाचे उपदेश, पद्यमय कवने या दोन्ही पोट-पोटविभागात वाचायला मिळतात. भगवान बुद्धाचे जीवन व बुद्धकालीन स्त्री-पुरुषांची दिनचर्या कशी होती, याची वर्णने या गाथांमध्ये आहेत.

त्यामुळे मराठीतील थेरचा या थेरवादाशी संबंध असेल, असे वाटत नाही.

उलट मला एक गमतीशीर संबंध जोडावासा वाटतो. आपण मराठीत अनेकदा रागा-वैतागाने म्हाताऱ्या माणसाला थेरडा असे म्हणतो. त्या `थेर`चा आणि या `थेरडा`चा काही संबंध आहे का, ते तपासायला हवे. कारण त्या थेरचा अर्थ वृद्ध असा आहे आणि आपणही अतिवृद्ध माणसालाच थेरडा असे म्हणतो. शब्दांचा हा प्रवास कसकसा झाला, हे पाहणे मनोरंजक ठरेल.

हाहा

काळ बदलला की एकाच शब्दातून काय भन्नाट अर्थ निघतात. विचारांची पूड करायची हे कठीण आहे!
असो.

माहिती खूपच गंमतीदार आहे.

विचारांची पूड ???

>>> विचारांची पूड ???

क्षमा असावी....तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे, ते कळले नाही. :(

क्षमा असावी

पीटक- पूड असे शब्द वाचले, म्हणून मराठीतली "ती" पूड करून आधीच्या शब्दांना चिकटवली तर अर्थ विचित्र होतो असली अवांतर टिपणी करण्याचा मोह आवरला नाही. तुमच्या लिहीण्याशी याचा काही संबंध नाही. क्षमा असावी.
तुमच्या लिहीण्यातून खरोखरच खूप मनोरंजक माहिती मिळाली. थेरडा हा कुत्सित अर्थाने वापरला जाणारा शब्द तुम्ही म्हणता तसा असू शकतो असे पटले.
धन्यवाद.

असे आहे होय !

अच्छा. असे आहे होय ! बरं बरं...

तुम्ही कशाला मागितली बरं क्षमा ?

हे `पहले आप`, `पहले आप`सारखे झाले. :)

चोप्य् पस्ते

हा प्रतिसाद उपक्रमच्या नियमांत बसतो काय याची खात्री करण्याची संपादकांना विनंती करतो.

चार भाग खपवायचे म्हणजे नेमाने डोकेदुखी येत राहणार असे दिसते.

वैदिक धर्माने बौद्ध धर्माच्या अनेक गोष्टी उचलल्या.

हे वाक्य म्हणजे ठासून खोटे कसे बोलावे याचा उत्तम नमुना आहे.
वैदिक धर्म हा बौद्ध धर्माच्या कितीतरी आधीपासून अस्तित्वात होता. कालांतराने त्यात कर्मकांडाचे आणी पुरोहित वर्गाचे प्रस्थ वाढल्यामुळे सामान्य जनतेची दैनंदिन धार्मिक कार्ये करतांना फरफट होऊ लागली व वैदिक धर्माला पर्याय म्हणून बौद्ध धर्माचा उदय झाला. अगोदर वैदिक धर्म पाळणारे कित्येक पुरोहित, ब्राह्मण, राजे महाराजे यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला.काही वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे (बहुधा थायलंडहून प्रकाशित) वाचण्यात आले. त्यात पुनर्जन्म कुणाचा ? कशाचा ? यावर एक स्वतंत्र प्रकरणच आहे. वैदिक धर्मानुसार आत्मा पुन्हा पुन्हा नवीन शरीर धारण करीत असतो तर बौद्ध तत्वज्ञानानुसार शरीरातील सर्व तत्त्वे निसर्गात विलीन होतात व त्याच तत्त्वामधून पुन्हा नवीन शरीर जन्माला येते.
दोन्ही धर्मांची विचारसरणी वेगवेगळी असली तरी पुनर्जन्म हा दोघांनाही मान्य आहे असेच दिसते. (आठवा ते विज्ञानातील प्रसिद्ध वाक्य : उर्जा निर्माण होत नाही आणी नष्ट पावत नाही. ती फक्त एका स्वरुपातून दुसर्‍या स्वरुपात रुपांतरीत होते.)

त्यांच्या मूर्ती आणि मंदिरे मूळची बुद्धिस्टांची आहेत: याला पुरावा देता येईल काय ? मुळात बौद्ध धर्मात मुर्तीपुजा ग्राह्य मानली नाहिये. मग धर्माचा आदेश डावलून इतक्या प्रचंड प्रमाणात मंदिरे बांधली गेली असे आपणांस म्हणायचे आहे काय ?

बौद्धलेण्यांना हायजॅक करण्यात आले! अजूनही बौद्धलेण्यांना त्याच नावाने ओळखले जाते.

परंतु हा ‘गुरू’ कोण हे कुणाला माहीत नाही! बाबासाहेबांनी लिहिलेल्या पुस्तकांत असा कोठेच उल्लेख नाही. बर मग वैदिक धर्मात "गुरु: ब्रह्मा........" असा जो श्लोक आहे तसा मुळचा बौद्ध श्लोक सांगता येईल काय ?

भारताच्या राष्ट्रध्वजावरचे अशोकचक्र हे बौद्धधम्मचक्रप्रवर्तनाचेच प्रतिक आहे! मान्य आहे. पण मुळात भारत हे हिंदूराष्ट्र आहे असे घटनेत म्हटले आहे काय ? भारतीय घटनेने जे जे चांगले ते ते घ्यायचा प्रयत्न केला आहे. यात कोण्या एका धर्माचा काहिही संबंध नाही.

हिंदू धर्मात स्वत:चे म्हणावे असे महान, उच्च, उदात्त काहीही नाही. जे उच्च-उदात्त दाखविले जाते ते प्रत्यक्षात मुख्यत: बौद्धांचे आणि अंशत: अन्य प्रवाहांचे आहे. मग आता तर हिंदू धर्म तर परीपूर्ण झालेला असेल नाही काय ?

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

महायानी पंथामुळेच बौद्ध धर्म संबंध एशियात पसरला यात शंकाच नाही.

मग यात बौद्ध धर्माचा र्‍हास कुठे झाला ? वैदिक धर्माचा देखील र्‍हास झाला आहे असे आपणांस वाटते काय ?

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

विष्णूचा अवतार

बुद्धाला चतुरपणे विष्णूचा अवतार बनवणे याचा बुद्ध धर्माच्या र्‍हासाला कितपत हातभार लागला असेल? विष्णूच्या दशावतारात बुद्धाला कोणी बसवला? कधी? यामुळे बुद्ध धर्माची "वेगळी" अशी ओळखच नष्ट झाल्याने र्‍हास सुरू झाला असेल का?

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

विचार करण्यासारखा मुद्दा

सर्वप्रथम बौद्ध किंवा जैन हे स्वतंत्र धर्म नव्हते. मूळ वैदिक धर्मातूनच उगम पावलेले आणि नव्या विचारावर आधारित असे ते पंथ होते. म्हणजे त्यांना शैव, वैष्णव, कापालिक, शाक्त अशा अन्य पंथांच्या मांडणीत बसवावे लागते. नवा पंथ निर्माण झाला तरी त्याच्या प्रवर्तकाच्या आणि अनुयायांच्या जीवनपद्धतीवरील आणि पंथाच्या साहित्यात जुन्या धर्माच्या संस्कारांचा ठसा पुसला जात नाही. म्हणूनच बुद्धानेही आपले क्षत्रियत्व कधी नाकारले नव्हते. जातक कथांत येणारे पुनर्जन्म, यक्ष-गंधर्व, वैदिक देवतां व दैत्यांचे उल्लेख (जैनांच्या पुराणातही इंद्र, लक्ष्मी आहेतच) यावरुन हे स्पष्ट होते.

आता मुद्दा हा आहे, की बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, हे कुणी घुसडले असावे? इथे स्पष्ट पुरावा नाही त्यामुळे आपल्याला तर्काचा आधार घेऊन उपपत्ती मांडावी लागेल. त्यात प्रश्न निर्माण होतो, की अशी गरज जास्त कुणाला असते? मूळ धर्माला, की त्यातून उदय झालेल्या नव्या पंथाला? असेही असू शकेल, की पंथाचा प्रसार व्यापक व्हावा, जुन्या धर्मातील लोक आकर्षित व्हावेत म्हणून बौद्ध विद्वानांनीच हे पिल्लू सोडून दिले असेल. वैदिक धर्म कालांतराने बौद्ध धर्माशी संघर्षाच्या पवित्र्यात उभा ठाकला असेल तर त्याला काय गरज पडलीय की त्यांनी ओढून ताणून बुद्धाला आपले म्हणावे. याउलट एखाद्या नव्या समुदायाला स्वतःचा प्रसार आणि प्रभाव वाढवायचा असेल तर असा शिरकाव सोईचा ठरतो. शक आणि कुशाण या भारताबाहेरच्या टोळ्या, पण येथे आल्यावर भारतीय संस्कृतीशी नाळ जोडण्यासाठी त्यांनी वैदिक धर्मातील पंथांचा स्वीकार केला. (शक राजा रुद्रदमन हा कट्टर शैव होता.)

हा बनेलपणा नक्की कोण करते हे सांगणे कठीण आहे. विजापूरचा इब्राहिम आदिलशहा हा पूर्वजन्मीचा हिंदू धोबी होता आणि गुरुंनी त्याला आशीर्वाद दिला, की पुढच्या जन्मी तू म्लेंच्छ होऊन राजवैभव उपभोगशील, अशी कथा गुरुचरित्रात आहे. आता गंमत बघा. या सगळ्या शाह्या (आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा) निर्माण करणारा मूळ पुरुष म्हणजे हसन गंगू नावाचा बाटलेला ब्राह्मण. आता हे धर्मांतरित झालेले लोक आपली रुट्स् विसरु शकत नाहीत आणि हरप्रयत्नाने मूळ धर्माशी नाळ जोडून ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात. मग संशय येतो, की आदिलशहानेच आपल्या ब्राह्मण मुळाचा हवाला देऊन म्हणा किंवा प्रभावशाली ब्राह्मणांना द्रव्य, जमिनी देऊन मिंधे करुन म्हणा त्यांच्याकडून हे करवून घेतले असेल का? आपल्या सत्तेला स्थानिक प्रजेची मान्यता मिळावी, त्यांनी आपल्याला परकी आक्रमक म्हणून न बघता त्यांच्यातीलच एक म्हणून स्वीकारावे, यासाठी केलेली ही घुसखोरीसुद्धा असू शकते.

औरंगजेबाच्या बाबतीत पण अशा दंतकथा वाचल्या आहेत (पुरावा नाही त्यामूळे विश्वसनीय म्हणणार नाही). बाल शाहू औरंगजेबाच्या कैदेत असताना त्याने आपल्याबाबत सूडबुद्धी बाळगू नये (कारण त्याचे वडील संभाजीराजांना आलमगीराने हाल हाल करुन मारले होते) म्हणून औरंगजेब शाहूला एक गोष्ट सांगत असे, की 'तुझे आजोबा शिवाजी आणि मी आम्ही पूर्वीच्या जन्मीचे नर-नारायण तपस्वी होतो. अघोरी तपाचा मार्ग पत्करल्याने मी मुसलमान झालो आणि सात्विक तप केल्याने तुझे आजोबा हिंदू क्षत्रिय झाले.' आता याला चक्क बुद्धिभ्रम म्हणतात. याचा फायदा औरंगजेबाला नक्कीच झाला. शाहूच्या मनात मुघलांबद्दल नेहमीच सॉफ्ट कॉर्नर राहिला.

ख्रिस्ती मिशनर्‍यांनीही बाटवाबाटवी करताना येथील भोळ्या जनतेला अनेक कथा रचून सांगितल्या आहेत. येशू हा कृष्णाचा अवतार आहे, ही त्यातलीच एक पुंगळी. फादर स्टीफन्स यांनी तर आपल्या ग्रंथाला 'ख्रिस्तपुराण' असेच नाव दिले आहे.

बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, हे कुणी घुसडले असावे?

हे आद्य शंकराचार्यांनी केले, असा सार्वत्रिक समज आहे!

तुमच्याकडे काही त्याच्या विरुद्ध् पुरावा आहे का?

बरं!

जातक कथांमध्ये राम हा गौतमाचा पूर्वीचा अवतार असल्याचा दावा आहे. तेही आदि शंकराचार्यांनीच घुसविले असेल ना?

जातक कथांमध्ये राम हा गौतमाचा

नाही हो. राम तर तथाकथीत बौद्ध विचारांनुसार निंदनीय माणूस आहे.

विकिपांडित्य :)

The Buddhist Dasharatha Jataka (Jataka Atthakatha 461) represents Rama as a previous incarnation of the Buddha as a Bodhisattva and supreme Dharma King of great wisdom. दुवा
क्ष्

समज

हे आद्य शंकराचार्यांनी केले, असा सार्वत्रिक समज आहे!

मी देखील शंकराचार्यांच्या नावानेच ऐकलेले आहे पण, संदर्भ कधीच पाहीलेला नाही. समज असणे म्हणजे पुरावा ठरतो का? नसल्यास विरुद्ध बाजूसच पुरावा मागणे हे योग्य आहे का?

ह्म्म्म्

आपण एक वेगळा दृष्टीकोन मांडला आहे. मात्र याची मला यासाठी कमी शक्यता वाटते कारण हा समज बौद्ध धर्मापेक्षा हिंदुंमधेही प्रचलित आहे. जर बौद्धांचे प्रस्थ असा हिंदुंचा आधार घेऊन वाढताना दिसले असते तर हिंदुधर्ममार्तंडांनी त्यास तेव्हाच विरोध केला असता असे वाटते. उलट राजाश्रय मिळालेल्या बौद्धधर्माचे स्थान व प्रभाव डळमळीत करण्यासाठी बुद्धालाच हिंदु देव बनवणे सोयीचे वाटते.
भारताबाहेरचे उदा. द्यायचे तर जसे मेक्सिकोतील ग्वादालुपेला ख्रिस्त अवतारात घेतले / संतपद दिले व अख्खा मेक्सिको स्पॅनिशांनी ख्रिस्ती करवला साधारण तसे हिंदु धर्माबाहेर गेलेल्या बौद्धांना पुन्हा हिंदु छत्रीचा (अंब्रेला) भाग बनविण्याचे हे राजकारण असेल का?

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

म्हणूनच तर म्हटले की 'विचार करण्यासारखा मुद्दा'

ऋषिकेशजी,
हे इंटरप्रिटेशन दोन्ही बाजूंनी करण्यास वाव आहे म्हणूनच तर मी 'विचार करण्यासारखा मुद्दा' म्हटले आहे. आपण आपल्या बाजूंनी मेक्सिकोसारखी आणखी उदाहरणे दिली असतीत तर मजा आली असती.

इतिहासाचे दुवे लुप्त झालेले असतात आणि स्पष्ट पुरावे नसतात त्यावेळी तर्क हाच मार्ग असतो. त्यात मतविभाजनालाही पुष्कळ वाव असतो.

असो. माझे निरीक्षण अवांतर वाचनातून केलेले संकलन असल्याने मी त्याची मर्यादा जाणतो आणि म्हणूनच अधिक सांगण्यासारखे काही नसल्याने या धाग्यावर येथेच थांबतो.

सर्व मित्रांना धन्यवाद.

कोंबडी आधी की अंडे आधी?!

बुद्धाला चतुरपणे विष्णूचा अवतार बनवणे याचा बुद्ध धर्माच्या र्‍हासाला कितपत हातभार लागला असेल? विष्णूच्या दशावतारात बुद्धाला कोणी बसवला? कधी? यामुळे बुद्ध धर्माची "वेगळी" अशी ओळखच नष्ट झाल्याने र्‍हास सुरू झाला असेल का?

चतुरपणे विष्णूचा अवतार बनवणे झाले असले तर त्याचे कारण बौद्ध धर्माची वेगळी ओळख राहिली नाही असे असावे. विष्णूचा अवतार केले म्हणून वेगळेपण राहिले नाही, असे म्हणणे म्हणजे बौद्ध विचार पूर्वीच्या विचारांहून वेगळे नव्हते आणि इतक्या साध्या गोष्टीमुळे लुप्त झाले, असे म्हणण्यासारखे आहे.

बौद्ध धर्मातील विचारांत मुख्य आहे ते म्हणजे निर्वाण. बाकी हे सोडले तर उरलेली आहे ते आचारसंहिता. (उदा. यज्ञात बळी देऊ नयेत). इ.

निर्वाण ही संकल्पना बुद्धाआधीही होती असे आंबेडकर म्हणतात. बुद्धाचे त्याविषयीचे विचार हे वेगळे होते ते म्हणजे त्याने आत्मा आणि मृत्युनंतर आत्म्याचे काय होते याविषयी उदासिनता दाखवली आहे असे म्हणतात. तरी बौद्धांमध्ये एकाच व्यक्तीचे अनेक जन्म मान्य आहेत हे लक्षात ठेवण्यासारखे आहे, पण असे अनेक जन्म मान्य असताना आत्म्याविषयी ते उदासीन आहेत असे काही अर्धवट धरल्यामुळे, आणि बुद्धाच्या मृत्युनंतर बौद्ध भिक्षूंनी त्यात जी बरीवाईट भर घातली ,त्याचा परिणाम म्हणून बौद्ध शिकवण वेगळी राहिली नाही. (कदाचित बुद्धाला पूर्ण भौतिक विचार स्विकारणे अवघड गेले असावे). निर्वाण ही संकल्पना अभ्यासकांना आधीच माहिती होती.
यज्ञातही बळी देण्याऐवजी नारळ, सुपारी असे वापरू लागल्याने यज्ञाला होणारा विरोध कमी झाला असावा. असो.

त्यानंतर वेगळी ओळख राहण्याचा प्रश्नच आला नसावा.

बुद्ध विष्णूचा अवतार कधीपासून बनला?

बुद्ध विष्णूचा अवतार कधीपासून बनला?
-हा प्रश्न खरोखरीच महत्त्वाचा आहे. त्याबाबत काही माहिती मिळू शकेल का?
'भगवान' हा शब्द भगवान महावीर/ भगवान बुद्ध यांच्यापासून वापरात आला असेल तर कृष्ण 'भगवान' नंतर बनला काय?
तसे असेल तर 'भागवत' या शब्दाचा अर्थ बदलू शकतो (अशी एक शक्यता आहे).

 
^ वर