प्राचीन भारतातील बौद्ध धर्माच्या र्‍हासाची कारणे

विसूनाना यांनी सुरू केलेल्या एका चर्चा विषयामधे हा विषय उपस्थित झालेला मी बघितला. मला असे वाटले की हा विषय फारच विस्तृत असल्याने निराळा धागा सुरू केल्यास जास्त सखोल चर्चा होऊ शकते. म्हणून या धाग्याचे प्रयोजन.
भगवान बुद्धांचे महानिर्वाण झाल्यानंतर त्यांची धर्मविषयक सूत्रे, मठांमधील शिस्त व नियम या सगळ्या गोष्टी नीट टिकून रहाव्यात यासाठी पहिल्या बुद्ध महासभेचे आयोजन राजा अजातशत्रू याच्या कारकीर्दीमध्ये करण्यात आले होते. करण्यात आले होते. या वेळी बुद्ध शिष्य आनंद याच्याकडे सूत्रे जपण्याचे व दुसरा शिष्य उपाली याच्याकडे मठातील शिस्त व नियम याबद्दलचे विनया हे लिखाण जपून ठेवण्याचे काम देण्यात आले होते. यानंतर 100 ते 150 वर्षांनंतर दुसर्‍या महासभेचे आयोजन झाले होते. काही मठातील भिख्खू लोकांनी दिलेले द्रव्य घेत असल्याचे आढळून आल्याने ही महासभा घेतली गेली. होती.
तिसरी महासभा सम्राट अशोकाच्या कालात पाटलीपुत्र या राजधानीत झाली होती. या कालापर्यत बुद्धांच्या शिकवणीचे कोणत्या प्रकारे पालन करावयाचे याबद्दल मतभेद त्यांच्या अनुयायात होऊ लागले होते. बुद्धाचे अनुयायी निरनिराळ्या भूप्रदेशात पसरत चालले होते व त्यामुळे त्यांच्यात एकसूत्रता आणणे हे या महासभेचे कार्य होते. श्री लंकेला गेलेल्या व महिन्द्र या शिष्याने या कालापर्यंत स्वत;ला स्थविरवादी असे म्हणायला सुरवात केली होती. बुद्धांच्या मूळ सूत्रांचे त्यात सांगितल्याप्रमाणेच पालन केले पाहिजे असे स्थविरवाद्यांचे म्हणणे होते.

इ.स.नंतर पहिल्या शतकात कनिष्क या कुषाण राजाच्या कालात बौद्ध धर्मियांचा एक नवा पंथ उदयास आला. या पंथाने स्वत:ला महायान पंथ असे नाव घेतले. त्यांच्या मताप्रमाणे बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार हे सर्वात महत्वाचे होते. यासाठी बुद्धांनी सांगितलेल्या मूळ सूत्रांच्यात थोडेफार बदल केले तरी चालण्यासारखे होते. या पंथाने आपण स्वत: श्रेष्ठ आहोत हे दाखवण्यासाठी स्थविरवाद्यांना हीनयानी असे म्हणण्यास सुरवात केली.
भगवान बुद्धांनी सांगितलेली तत्वे व शिकवण ही जर मोठ्या प्रमाणात धर्मप्रसार करावयाचा असला तर अपालनीय व कडक आहेत हे महायानी पंथाचे म्हणणे सत्यच वाटते. महायानी पंथामुळेच बौद्ध धर्म संबंध एशियात पसरला यात शंकाच नाही.

मूळ बौद्ध धर्माचे महायानी व स्थविरवादी असे विभाजन होणे हे बौद्ध धर्माच्या र्‍हासाचे मूल कारण होते असे उपक्रमींना वाटते का?

लेखनविषय: दुवे:

Comments

अजून प्रश्न...

बुद्ध विष्णूचा अवतार कधीपासून बनला? ....-हा प्रश्न खरोखरीच महत्त्वाचा आहे. त्याबाबत काही माहिती मिळू शकेल का?
'भगवान' हा शब्द भगवान महावीर/ भगवान बुद्ध यांच्यापासून वापरात आला असेल तर कृष्ण 'भगवान' नंतर बनला काय? ....तसे असेल तर 'भागवत' या शब्दाचा अर्थ बदलू शकतो (अशी एक शक्यता आहे).

अजून अनेक प्रश्न या संदर्भात पडतात...

  1. विष्णू, राम-कृष्ण देखील "हिंदू" कधी झाले?
  2. शंकराचार्यांच्या भाष्यात "हिंदू" हा शब्द होता का? का तो त्याही नंतर वापरात आलेला शब्द आहे?
  3. गौतम बुद्धाने स्वतःचे विचार आणि आचार सांगत असताना त्याने मी वैदीक धर्माचा नाही असे म्हणले होते का?
  4. गौतम बुद्धाने स्वतः आपण "बुद्ध धर्म" म्हणून नवीन धर्म सुरू करत आहोत असे म्हणले होते का?
  5. जेंव्हा एखादी व्यक्ती संन्यासी होण्याची दिक्षा घेते तेंव्हा तो धर्माचा परीत्याग असतो का धर्मात सांगितलेल्या प्रापंचिकाच्या आचरणपद्धतीचा परीत्याग असतो? जर प्रापंचिक आचरणपद्धतीचा परीत्याग असेल तर...(पुढचा प्रश्न)
  6. गौतम बुद्धाने जेंव्हा आपल्या अनुयायांना दिक्षा दिली तेंव्हा ते धर्मांतर होते का केवळ बौद्ध आचारपद्धतीचे आचरण करण्याचे वचन घेतले होते?

अजून प्रश्न...

1. विष्णू, राम-कृष्ण देखील "हिंदू" कधी झाले?
उत्तर : कधीही नाही. मात्र सामान्य माणूस वैदिक आणी हिंदू हे शब्द समानार्थी म्हणूनच वापरतो.

2. शंकराचार्यांच्या भाष्यात "हिंदू" हा शब्द होता का? का तो त्याही नंतर वापरात आलेला शब्द आहे?
उत्तर : नाही. त्यांनी मुख्यतः वैदिक धर्माचे पुनरुत्थान केले असे म्हटले जाते.

3. गौतम बुद्धाने स्वतःचे विचार आणि आचार सांगत असताना त्याने मी वैदीक धर्माचा नाही असे म्हणले होते का?
उत्तर : नाही.

4. गौतम बुद्धाने स्वतः आपण "बुद्ध धर्म" म्हणून नवीन धर्म सुरू करत आहोत असे म्हणले होते का?
उत्तर : नाही. मात्र त्याने मला जे ज्ञान प्राप्त झाले आहे ते मी तुम्हाला सांगत आहे असे म्हटले आहे.

5. जेंव्हा एखादी व्यक्ती संन्यासी होण्याची दिक्षा घेते तेंव्हा तो धर्माचा परीत्याग असतो का धर्मात सांगितलेल्या प्रापंचिकाच्या आचरणपद्धतीचा परीत्याग असतो? जर प्रापंचिक आचरणपद्धतीचा परीत्याग असेल तर...(पुढचा प्रश्न)
उत्तर : धर्मात सांगितलेल्या प्रापंचिंकाच्या आचरणपद्धतीचा परीत्याग असतो.

6. गौतम बुद्धाने जेंव्हा आपल्या अनुयायांना दिक्षा दिली तेंव्हा ते धर्मांतर होते का केवळ बौद्ध आचारपद्धतीचे आचरण करण्याचे वचन घेतले होते?
उत्तर : त्याला ढोबळमानाने बौद्ध आचारपद्धतीचे होते असे म्हणता येते.

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

तर मग...

हीच उत्तरे जर असली तर मग असे म्हणण्यात काय चूक आहे? :

गौतम बुद्ध आणि बौद्ध विचारसरणी हा त्याच सांस्कृतिक विचारसरणीचा भाग होतो ज्याला बर्‍याच नंतरच्या काळात परकीयांकडून प्रामुख्याने "हिंदू" संबोधिले गेले आणि त्याहीनंतरच्या काळात आचरणपद्धतीतील फरकांनुसार धर्मविभाजन करत हिंदू-बौद्ध असे म्हणले गेले. (आणि जे केवळ परकीय म्हणतात तेच खरे समजत एत्तदेशीय एकमेकांना वेगळे समजू लागले).

बाकी चर्चेच्या शिर्षक प्रश्नाविषयी: आज आंबेडकरांपासून ते अनेकांनी बौद्धदिक्षा घेतली असता, बौद्ध धर्माचा भूतकाळातील र्‍हास असे फार तर म्हणणे योग्य ठरेल. बौद्ध धर्माचा सरसकट र्‍हास म्हणणे म्हणजे आजचे नवबौद्ध हे खरे बौद्धधर्मीयच नाहीत असे म्हणत नकळत परत एकदा वर्गविभागणी होऊ शकेल असे वाटते.

आजचे धर्म

भारतामध्ये धर्मस्वातंत्र्य आहे, धर्मांना स्वातंत्र्य नाही. स्वतःचा धर्म कोणता ते जाहीर करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळे, काहीही प्रथा पाळून/न पाळूनही प्रचलित समाजात लोकांना स्वतःला बौद्ध म्हणविण्याचा अधिकार आहे. तरीही, "ते गौतमाच्या शिकवणीचे अनुयायी नाहीत" असे म्हणण्याचे अभ्यासकांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य अबाधितच राहते. र्‍हास हा उल्लेख "गौतमाच्या शिकवणीचा र्‍हास" असा करता येईल.

शिकवण..

र्‍हास हा उल्लेख "गौतमाच्या शिकवणीचा र्‍हास" असा करता येईल.

हे मान्य आहेच. म्हणूनच म्हणले देखील की मूळ इतिहासात "बौद्ध" हा वेगळा धर्म नसून भारतीय संस्कृतीत ज्या अनेक विचार/आचारपद्धती आहेत त्यातील एक होती आणि आहे.

माझा प्रश्न हा लेखचर्चेच्या शेवटच्या वाक्यासंदर्भात होता जे खाली लिहीले आहे:

मूळ बौद्ध धर्माचे महायानी व स्थविरवादी असे विभाजन होणे हे बौद्ध धर्माच्या र्‍हासाचे मूल कारण होते असे उपक्रमींना वाटते का?

असो.

जुना वाद

धर्म, संस्कृती आणि विचार/आचारपद्धती या संज्ञांच्या व्याख्यांचा एकदाचा सोक्षमोक्ष लावून टाका (किंवा जुन्या चर्चेचा दुवा द्या) ही विनंती.

उत्तरे

धर्म, संस्कृती आणि विचार/आचारपद्धती या संज्ञांच्या व्याख्यांचा एकदाचा सोक्षमोक्ष लावून टाका (किंवा जुन्या चर्चेचा दुवा द्या) ही विनंती.

नक्की कुणाला ही विनंती?

वरच्या एका प्रतिसादात विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिल्यास अनेक उलगडे होतील असे वाटते.

खुलासा

विनंती तुम्हाला.
त्या प्रश्नांमध्ये धर्म, आचार विचार, हिंदू, हे शब्द आहेत, त्यांच्या व्याख्या स्पष्ट केल्यात तरच प्रश्नांना अर्थ प्राप्त होईल.

वेगळी चर्चा

विनंती तुम्हाला. त्या प्रश्नांमध्ये धर्म, आचार विचार, हिंदू, हे शब्द आहेत, त्यांच्या व्याख्या स्पष्ट केल्यात तरच प्रश्नांना अर्थ प्राप्त होईल.

त्यावर चर्चा करणे म्हणजे आहे ती चर्चा हायजॅक करण्यासारखे झाले. ;) तेंव्हा अवांतर होऊ नये म्हणून तो विषय हवा असल्यास वेगळ्या चर्चेत टाकावात ही विनंती. मूळ चर्चा ही केवळ बौद्ध धर्मातील दोन पंथातील विभाजन वगैरेचा तत्कालीन बौद्ध धर्माचा र्‍हास या संदर्भात असताना, अचानक शंकराचार्य, हिंदू धर्माने/वैदीक धर्माने काय केले वगैरेवर घसरू लागली. त्यासंदर्भात मी प्रश्न विचारले होते आणि आहेत. कारण त्यांच्या उत्तरांवर ग्राउंडरूल्स ठरू शकतात. राजकुमार यांनी त्यांना काय वाटते ते सांगितले त्यावर आधारीत मी निष्कर्ष देखील सांगितला आहे.

धन्यवाद.

पिपाणी

त्यावर चर्चा करणे म्हणजे आहे ती चर्चा हायजॅक करण्यासारखे झाले. ;) तेंव्हा अवांतर होऊ नये म्हणून तो विषय हवा असल्यास वेगळ्या चर्चेत टाकावात ही विनंती.

नाही, या धाग्यात धर्म या शब्दाचा अर्थ आचारविचारपद्धत असाच असताना तुम्हीच वेगळ्या अर्थाचा वापर (=हायजॅक) सुरू केलात.

त्यासंदर्भात मी प्रश्न विचारले होते आणि आहेत. कारण त्यांच्या उत्तरांवर ग्राउंडरूल्स ठरू शकतात.

तुमच्या प्रश्नांत काही गृहीतके आहेत आणि त्या गृहीतकांना तुम्ही शब्दबद्ध करावे अशी माझी विनंती आहे.

प्रतिसाद

पिपाणी

आपल्या प्रतिसादाच्या शिर्षकावरूनच त्यात काय वाजवत आहात ह्याची पूर्वकल्पना दिल्याबद्दल आभारी आहे.

या धाग्यात धर्म या शब्दाचा अर्थ आचारविचारपद्धत असाच असताना...

हे कधी आणि कोणी ठरवले?

...तुम्हीच वेगळ्या अर्थाचा वापर (=हायजॅक) सुरू केलात.

नक्की का? त्या आधीच्या इतरांच्या प्रतिसादांमध्ये तसे काही वाटले नाही का? शिवाय जर मी हायजॅक केला असे आपले म्हणणे आहे तर आपण त्याला थांबवण्याऐवजी भर कशाला घालत आहात?

तुमच्या प्रश्नांत काही गृहीतके आहेत आणि त्या गृहीतकांना तुम्ही शब्दबद्ध करावे अशी माझी विनंती आहे.

माझ्या प्रश्नांमधे एकच गृहीतक आहे - उत्तरे देणारी व्यक्ती त्या व्यक्तीस जे काही वाटत असेल ते लिहील, जसे राजकुमार यांनी लिहीले. तुम्ही राजकुमार यांनी लिहीले तसेच लिहीले पाहीजे असे नाही. पण आपल्यास जे वाटत असेल ती उत्तरे द्यावीत. प्रश्न तसे सोपे आहेत. :-)

प्रतिसाद

आपल्या प्रतिसादाच्या शिर्षकावरूनच त्यात काय वाजवत आहात ह्याची पूर्वकल्पना दिल्याबद्दल आभारी आहे.

तुमचा गैरसमज झाला आहे. ते जुना मुद्दा घुसविण्याच्या तुमच्या प्रयत्नाचे वर्णन आहे.

हे कधी आणि कोणी ठरवले?

'(श्रद्धेवर आधारित*) आचारविचार पद्धत' याव्यतिरिक्त अर्थाने धर्म हा शब्द इतर कोणीही येथे वापरलेला नाही.

नक्की का? त्या आधीच्या इतरांच्या प्रतिसादांमध्ये तसे काही वाटले नाही का?

इतरांच्या प्रतिसादांत धर्म शब्दाचा अर्थ बदलला गेल्याचे वाटले नाही.

शिवाय जर मी हायजॅक केला असे आपले म्हणणे आहे तर आपण त्याला थांबवण्याऐवजी भर कशाला घालत आहात?

तुम्ही सांगणार आहात तसाच धर्म या शब्दाचा प्रचलित अर्थ असेल तर येथील चर्चेमध्ये होणारे शब्दप्रयोग चुकीचे ठरतील. हायजॅक झाले तरी चालेल.

पण आपल्यास जे वाटत असेल ती उत्तरे द्यावीत. प्रश्न तसे सोपे आहेत. :-)

प्रश्न लोडेड आहेत, धर्म आणि (श्रद्धेवर आधारित*) आचारविचार पद्धत यांत फरक अध्याहृत आहे. तसे असेल तर कृपया त्या दोन्हींच्या व्याख्या द्या, 'धर्म' हा शब्द केवळ 'आचारविचार पद्धत' याच अर्थाने मला माहिती आहे.

*: 'श्रद्धेवर आधारित' हा शब्द अध्याहृत आहे; त्यामु़ळे इहवादाचा निधर्मीपणा स्पष्ट करता येईल.

चर्चेचे शीर्षक

विकास आपले म्हणणे अगदी योग्य आहे. या धाग्याचे शीर्षक खरे म्हणजे प्राचीन भारतातील बौद्ध धर्माच्या र्‍हासाची कारणे असे ठेवणे गरजेचे होते. संपादकांना विनंति की सध्याचे शीर्षक बदलावे.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

असेच वाचनात आहे

>>>>'भगवान' हा शब्द भगवान महावीर/ भगवान बुद्ध यांच्यापासून वापरात आला असेल
भगवान शब्द भगवान गौतमबुद्ध यांच्यापासूनच वापरात आला आहे, असे वाचलेले आहे.
>>>कृष्ण 'भगवान' नंतर बनला काय?
कृष्णं 'देवं' अगोदर होता. भगवान हा शब्द त्याला जोडलेला नसावा, असे वाटते.

-दिलीप बिरुटे

कारणे पटली नाहीत

या लेखात काही प्रतिसादकांनी व्यक्त केलेली कारणे पटली नाहीत. धर्माच्या नावावर स्वतःच्या तुंबड्या भरणे, इतरांवर अन्याय करणे, संपत्ती जमा करणे वगैरे प्रकार सर्वच धर्मांत होत आले आहेत म्हणून ते धर्म लयाला गेले असे दिसत नाही.

असो.

उपक्रमावर होणार्‍या चर्चांमध्ये भावनाप्रधान कादंबर्‍या, कथा किंवा चित्रपटांचा उल्लेख जितका कमी येईल तितके बरे होईल असे वाटते.

क्षमस्व

>>उपक्रमावर होणार्‍या चर्चांमध्ये भावनाप्रधान कादंबर्‍या, कथा किंवा चित्रपटाचा उल्लेख जितका कमी येईल तितके बरे होईल असे वाटते. <<

कादंबरी आणि चित्रपट यांचा उल्लेख माझ्याकडून झाला होता. त्यामुळे रुढ चौकटीला धक्का लागला असल्यास क्षमस्व.

अर्थात कोणतीही चर्चा ही मुक्त प्रवाही असावी, त्यात विषयाचा साकल्याने (सर्व पैलूंनी) विचार व्हावा, माणसे दुखावतील व दुरावतील इतके थेट आरोप, उथळ विधाने आणि मर्माघाती शेरे असू नयेत एवढेच सोपे नियम मला पटतात. त्या अर्थाने मी लिंबूटिंबूच.

उपक्रम आणि उपक्रमींना माझ्या अनेक शुभेच्छा.

गैरसमज नसावा

उपक्रमावर होणार्‍या चर्चांमध्ये भावनाप्रधान कादंबर्‍या, कथा किंवा चित्रपटाचा उल्लेख जितका कमी येईल तितके बरे होईल असे वाटते.

माझ्या मूळ वाक्यात त्रुटी आहे. ते उपक्रमावर होणार्‍या आणि ऐतिहासिक संदर्भ मागणार्‍या चर्चांमध्ये भावनाप्रधान कादंबर्‍या, कथा किंवा चित्रपटाचा उल्लेख जितका कमी येईल तितके बरे होईल असे वाटते. चंद्रशेखर यांची चर्चा या धर्तीवरील आहे त्यामुळे दंतकथा, जातककथा, चित्रपट, कादंबर्‍यांवरून एखाद्या धर्माविषयी चर्चा चालू लागली तर त्यात कसा भाग घ्यावा हे कळत नाही.

कादंबरी आणि चित्रपट यांचा उल्लेख माझ्याकडून झाला होता. त्यामुळे रुढ चौकटीला धक्का लागला असल्यास क्षमस्व.

नव्हे आपण निमित्त आहात. हे कोणा व्यक्तीला उद्देशून नाही. इतर जातक कथांचे संदर्भही चर्चेत आहेत.

अर्थातच हे झाले माझे वैयक्तिक मत.

उपक्रम आणि उपक्रमींना माझ्या अनेक शुभेच्छा.

यामुळे चर्चेत भाग घेणार नाही का काय अशी शंका आली. त्यापेक्षा अधिक संदर्भ शोधून चर्चा करूया.

प्रियाली तुमचं चुकतंय..

प्रियाली,
आपल्या अभ्यासपूर्ण आणि रास्त मतांशी मी अनेकदा सहमती दाखवली आहे, परंतु कदाचित प्रथमच म्हणतो 'तुमचं इथं थोडसं चुकतंय'.
माझ्या प्रतिसादातून आपल्याला जाणवलेला अर्थ मला अभिप्रेत नव्हता. 'तृष्णा हे दु:खाचे मूळ, हे बुद्धाचे तत्त्व अनुयायी लवकर विसरले' हे सांगताना ओघानेच त्या चित्रपटाची कथा आठवली. विषय जर सर्वच धर्मांचा असता तर वैदिक, हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती या धर्मातील गैरव्यवहाराचीही उदाहरणे दिली असती. असो.
माझा गैरसमज नाही, पण आपल्याप्रमाणे इतर कुणाचा गैरसमज होऊ नये म्हणून माझे प्रतिसाद संपादित करत आहे.

या चर्चेत माझ्याकडे सांगण्यासारखे काही न उरल्याने मी थांबलो आहे.

सुयोग्य मार्गाने चर्चा पुढे सुरु राहू देत, यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

हरकत नाही

माझ्या प्रतिसादातून आपल्याला जाणवलेला अर्थ मला अभिप्रेत नव्हता. 'तृष्णा हे दु:खाचे मूळ, हे बुद्धाचे तत्त्व अनुयायी लवकर विसरले' हे सांगताना ओघानेच त्या चित्रपटाची कथा आठवली. विषय जर सर्वच धर्मांचा असता तर वैदिक, हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती या धर्मातील गैरव्यवहाराचीही उदाहरणे दिली असती.

शक्य आहे. मलाही एखादी गोष्ट लिहिताना दुसर्‍या गोष्टी आठवतात. त्यामुळे तुमचे स्पष्टीकरण खरे असावे.

माझा गैरसमज नाही, पण आपल्याप्रमाणे इतर कुणाचा गैरसमज होऊ नये म्हणून माझे प्रतिसाद संपादित करत आहे.

असू द्या. उगीच लिहिलेले काढू नका. त्यात आक्षेपार्ह काही नव्हते. जे ते वाचतील ते हे ही वाचतील.

ऱ्हासाची कारणे

१. बौद्ध धर्माला असलेला राजाश्रय आणि लोकाश्रय कमी होत गेला आणि बौद्ध धर्माचा र्‍हास झाला. केंद्रीभूत मौर्य साम्राज्यात बौद्ध धर्माची फार झपाट्याने वाढ झाली. मध्ययुगीन सरंजामशाहीचा निजाम बौद्ध धर्माच्या वाढीसाठी अनुकूल नव्हता.
२. बौद्ध धर्माच्या वाढीत श्रेणींनी(गिल्ड) दिलेल्या आश्रय(पेट्रनेज)चा फार मोठा वाटा आहे. व्यापार वाढला तसा बौद्ध धर्मही भारताबाहेर गेला. जसजसा व्यापार कमी होत गेला श्रेणींकडून मिळणारा आश्रय कमी होत गेला.
३. बौद्ध संघ, भिख्खू सामान्यजनांपासून, बौद्धांपासून कटलेले होते.
४. संघ भ्रष्ट, भोगवादी, चंगळवादी होत गेला. आणि बौद्ध धर्माचा ऱ्हास होत गेला.
५. परकीयांची आक्रमणे. मुस्लिमांच्या आक्रमणापूर्वीही बौद्ध धर्माची अवस्था काही चांगली नव्हती. मुस्लिम आक्रमणांनी शेवटचा घाला घातला.
६. ब्राह्मणधर्माने (ब्राह्मिनिकल रिलिजन) केलेला कडवा विरोध. ( बौद्ध धर्माचा विनाश होईल ह्या आशेने शशांकाने बोधिवृक्ष नष्ट केला होता हे आठवले.)

चूभूद्याघ्या.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

शशांक

वरील विधानांवर विस्तृत चर्चा आवडेल.

पुरवणी

बौद्ध धर्माचा विनाश होईल ह्या आशेने शशांकाने बोधिवृक्ष नष्ट केला होता हे आठवले.

शशांक म्हणजे हर्षवर्धनाचा मोठा भाऊ राज्यवर्धन याचा खून करणारा बंगालातील राजा असावा.

अशीच आपली पुरवणी... शशांक जोशींवर बालंट येऊ नये म्हणून. ह. घ्या.

४. संघ भ्रष्ट, भोगवादी, चंगळवादी होत गेला.

४. संघ भ्रष्ट, भोगवादी, चंगळवादी होत गेला.

ह्या विधानावर वेगळ्या धाग्यात विस्ताराने चर्चा करायला आवडेल. प्रमोद महाजन वगैरे नावे या अनुषंगाने आठवतात.

हॅहॅ

मला संशय आहे की ते वाक्य त्यासाठीच होते.

एलिटिस्ट धर्म

२. बौद्ध धर्माच्या वाढीत श्रेणींनी(गिल्ड) दिलेल्या आश्रय(पेट्रनेज)चा फार मोठा वाटा आहे. व्यापाराचा वाढला तसा बौद्ध धर्मही भारताबाहेर गेला. जसजसा व्यापार कमी होत गेला श्रेणींकडून मिळणारा आश्रय कमी होत गेला.
३. बौद्ध संघ, भिख्खू सामान्यजनांपासून, बौद्धांपासून कटलेले होते.

-चित्तरंजन यांच्या या दोन विधानांशी अतिशय म्हणजे अत्यंत सहमत.. :)
नव्हे, आणखी पुढे जाऊन असे म्हणतो की 'सामान्य' जनतेला बौद्ध धर्म नीटसा कळला तरी होता का? याची शंका वाटते.
स्पष्टीकरण असे की -
सामान्य जनता म्हणजे वैदिक तत्वज्ञानाशी तोंडओळखही नसलेले जनसमूह. जसे - सप्तमातृका, लिंग, ग्रामदैवत, वीर इ.इ.ची पूजा करणारे लोक. वैदिक धर्मात 'मूर्तीपूजा' म्हणजे हिरण्यगर्भाची पूजा अशा स्वरुपात अस्तित्वात असली तरी नाक-तोंड-हात-पाय असलेले देव पुजणे हे त्या परंपरेत बसत नव्हते. परंतु बौद्ध धर्माच्या उदयापर्यंत ही पूर्वीची मूर्तीपूजक जनता आणि वैदिक धर्म यांचा संकर होऊन एक नवाच धर्म अस्तित्वात आला होती. त्यात वेद होते, यज्ञ होते,बळी होते आणि त्याबरोबरच मूर्तीपूजाही होती. परंतु बुद्धाच्या तत्त्वज्ञानाने देवच नाकारले + मूर्तीपूजा नाकारली. अचानक निर्माण झालेले हे नवे तत्त्वज्ञान मूर्तीपूजक सामान्यांना कळण्यास अवघड ठरले असणार. बुद्धाचे तत्त्वज्ञान महान धर्मप्रसारक अशोकालाही कितपत कळले होते याचीही शंका वाटते. कारण तो बौद्ध झाल्यावरही स्वतःला "देवानाम् प्रियः" म्हणवून घेतो. त्याला ते तत्त्वज्ञान कळले असावे असे गृहित धरले तरी जनतेवर प्रभाव टाकण्यासाठी 'देवांचा प्रिय' हे अभिधान त्याला धारण करावे लागले.
म्हणजे बौद्ध धर्म मुळात 'एलिटिस्ट' होता. नव्या तत्त्वज्ञानाचे नेहमीच असे असते. उदा. ब्राह्मो समाज, आर्य समाज, सावरकरांचे जातिविषयक विचार, आंबेडकरांचे धर्मचक्रपरिवर्तन इ.
त्याचे गम्य ज्यांना कळते ते अगोदरच त्या विचारांशी सहमत असतात. त्यातून ज्यांचा फायदा होणार असतो ते (सामान्य जन) त्यापासून अनभिज्ञ असतात.त्यांच्यापर्यंत ते तत्त्वज्ञान झिरपायला वेळ लागतो आणि ते आत्मसात करेपर्यंत त्याचे बरेचसे कंगोरे घासून गुळगुळीत होतात.
भारतातील बरेचसे मुसलमानही पीर,दर्गे, औलिया यांचे पूजन करताना दिसतात. याचे कारण तेच आहे.

आजही आंबेडकरांबरोबर जी जनता बौद्ध झाली तिच्यावरही मूर्तीपूजेचा पगडा आहे. म्हणूनच बुद्धाच्या मूर्तीबरोबरच आंबेडकरांच्या मूर्ती/पुतळे यांची पूजा होताना दिसते.
आंबेडकरांनाही दुसरे अशोक म्हणता येईल. त्यांनाही बौद्ध तत्त्वज्ञान नीटसे कळले नव्हते असे आरोप त्यांच्यावर पौर्वात्य भिक्खुसंघांकडून झाले. (-डॉ. धनंजय कीर)

बौद्ध धर्माच्या उत्कर्ष-र्‍हासानंतर शुद्ध निराकार ब्रह्म, आत्मानुभूती, यज्ञ आणि त्याबरोबरच मूर्तीपूजा अशा संकरीत स्वरूपात वैदिक/ब्राह्मणधर्म फोफावला. त्याचे कारण म्हणजे दमनाबरोबरच सामान्य जनतेचे तुष्टीकरण हेच होते. सामान्य जनता आपल्या पूर्वापार समजूती सहजी सोडत नाही. आंबेडकरांना धर्मपरिवर्तनासाठी (त्यावेळच्या अस्पृश्य) दलित बांधवांकडूनही विरोध झाला होता ही वस्तुस्थिती आहे. कारण नेहमीचे देव - विठोबा, भवानी, राम-कृष्ण इ. - मूर्ती पूजा सोडायला जनता तयार नव्हती.
पुढे कदाचित डॉ. आंबेडकरांचेही 'हिंदूकरण' होणे शक्य आहे.

सहमत

पटले. नास्तिकांच्या संघटनांसाठी मांजरींची संघटना (हर्डिंग कॅटस्) हे वर्णन केले जाते तेही आठविले. स्वतः विचार करा हा संदेश सांगणार्‍याला अनुयायी कसे मिळणार?

 
^ वर