खारीचा वाटा!

खारीचा वाटा!

तरुण संजय पर्यावरण रक्षणविषयक एका स्वयंसेवी संघटनेत पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. ही संघटना आता स्वस्त विमानप्रवासामुळे होणार्‍या पर्यावरणाच्या धोक्याविषयी जनजागृतीची मोहिम हाती घेतली होती. स्वस्त विमान प्रवासाचे जबरदस्त आकर्षण मध्यमवर्गात फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे बहुतेक सर्व विमान कंपन्या या स्पर्धेत उतरल्या होत्या. भरपूर कमाई करून घेत होत्या. आपापसातील कट्थ्रोट स्पर्धेमुळे विमानसेवा स्वस्त झाली होती. मध्यमवर्ग सहकुटुंब सहपरिवार (मित्र मैत्रिणीसह) विमानप्रवासांची बेत आखत होती. प्रवास स्वस्त म्हणून जास्त प्रवासी व जास्त प्रवासी म्हणून स्वस्त प्रवास या (दुष्ट!) चक्रामुळे विमानसेवेमुळे होणार्‍या पर्यावरण हानीविषयी विचार करायलासुद्धा कुणालाही फुरसत नव्हती. वाहत्या गंगेत सर्व जण हात धुवुन घेत होते. करापोटी भरपूर पैसा मिळत असल्यामुळे विमान प्रवासामुळे होणार्‍या प्रदूषणाविषयी शासनही बेफिकिर होते. म्हणूनच संजयची संघटना पुढाकार घेवून स्वस्त विमानसेवेच्या विरोधात आवाज उठवत होती.
संजय या विषयावर ठिकठिकाणी भाषणं देण्यासाठी देशभर फिरत होता. त्याच्या भाषणाचा एकंदर सूर प्रदूषणामुळे होणार्‍या हरित गृह (ग्रीन हौस) परिणामाबद्दल होता. विमान प्रवास हे मौजमजेचे साधन म्हणून न वापरता अत्यावश्यक सेवा म्हणून वापरल्यास प्रदूषणाला आळा बसेल, यावर त्याचा भर होता. यासाठी शासनावर दबाव आणणे किती गरजेचे आहे, स्वस्त विमानसेवेवर अंकुश कसे हवे, लोकानी स्वत:हूनच विमान प्रवास का नाकारावे, इ.इ प्रकारचे मुद्दे त्याच्या भाषणात असत.
संघटना छोटी व मोजकेच कार्यकर्ते. त्यामुळे संजयलाच एका शहरातील भाषण संपल्या संपल्या दुसर्‍या शहरात भाषण देण्यासाठी जावे लागत असे. संजयला आपले मुद्दे पटवून देण्यासाठी जास्तीत जास्त लोकापर्यंत लवकरात लवकर पोचण्याची गरज होती. सामान्यपणे विमानाने जोडलेल्या मोठमोठ्या शहरातच बहुतेक मध्यमवर्ग रहात असल्यामुळे संजयची भाषणं शहराशहरातच होत असत. जास्तीत जास्त शहरांना भेट देणे, तेथील संघटनांना याविषयी दबाव आणण्यास प्रवृत्त करणे, या गोष्टीसाठी विमानातून प्रवास केल्यामुळे वेळ वाचतो, वृथा श्रम वाचतात, व आपले म्हणणे सर्व दूर पोचण्यास मदत होते. म्हणूनच संजय या कामासाठी विमानानेच प्रवास करत असे. शिवाय याच्या एकट्याच्या विमान प्रवासामुळे प्रदूषणात अगदीच नगण्य भर पडेल, असा त्याचा विचार होता. परंतु त्यानी हाती घेतलेले कार्य अती महत्वाचे व जास्त मोलाचे आहे. यामुळे या कसोटीच्या क्षणी विमान प्रवास नाकारणे म्हणजे शुद्ध नैतिक अरेरावी ठरेल, असे त्याचे वैयक्तिक मत आहे.
पुढच्या शहरात भाषण देण्यासाठी तो आता विमानात बसूनच तयारी करत होता. भाषणाची उजळणी करत असतानाच हवाईसुंदरीने त्याला नाष्टा आणून दिला. आपल्या समोरील लॅप टॉप बंद करून विमानाच्या पडद्यावर दाखवत असलेल्या प्रदूषण विरोधातील एक उत्कृष्ट चित्रपट बघता बघता त्यानी नाष्टा संपवला.
आपले मुद्दे पटवून देण्यासाठी विमानानेच प्रवास करणे त्याचवेळी विमान प्रवासाच्या विरोधात लढा देणे यात विसंगती आहे हा विचार संजयच्या मनात आला नसेल का ?

----- ------ --------

प्रत्येकाने आपापला (खारीचा) वाटा उचलल्यास भरपूर काही करता येईल हे कितपत खरे आहे? उदाहरणार्थ एका सामाजिक कार्यासाठी - समजा, एक सुसज्ज, उत्कृष्ट मराठी संदर्भ ग्रंथालयासाठी - पुण्यासारख्या शहरातील प्रत्येक कमावत्या व्यक्तीने शंभर रुपये देणगीच्या स्वरूपात द्यायचे ठरवल्यास बघता बघता 10 कोटी रुपये सहज जमू शकतील. 10 कोटी रुपये ही काही लहान रकम नाही. या दहा लाख देणगीदारापैकी एका दोघाने जरी शंभर रुपये नाही दिली तरी फार बिघडणार नाही. कारण तरीसुद्धा 9 कोटी 99 लाख, 99 हजार, 800 रुपये जमलेले असतील, हेही नसे थोडके. त्यामुळे एखाद्याने खारीचा वाटा उचलला नाही तरी बिघडले कुठे? मी देणगी दिल्यामुळे वा न दिल्यामुळे तसा काही फरक पडणार नाही हा कदाचित तर्कशुद्ध विचार असू शकेल. परंतु प्रत्येक (वा बहुतेक!) होतकरू देणगीदार असाच विचार करू लागल्यास प्रकल्पाला बासनात गुंडाळून ठेवावे लागेल. (गोमटेश्वरला दुधाच्या अभिषेकाऐवजी पाण्याच्याच अभिषेकावर समाधान मानून घ्यावे लागेल.) कदाचित आपण वीस कोटी रुपये गोळा करण्याचे लक्ष्य ठेवल्यास - पन्नास टक्के लोकांनी देणगी नाही दिली तरी - अपेक्षित रक्कम गोळा होऊ शकेल. परंतु हा डाव उलटण्याची शक्यता नाकारता येत नाही! इच्छित रकम पूर्णपणे गोळा न झाल्यास संदर्भ ग्रंथालय प्रकल्प कागदावरच राहील. हा तिढा सुटणार कसा?
संजयला मात्र हा तिढा सुटेल याची खात्री आहे. संजयसारखे समर्पित कार्यकर्त्यानी प्रत्येक जण देणगी दिल्यामुळे समाजस्थितीत कसा फरक पडेल हे पटवून दिल्यास मोठी रकम सहजपणे उभी करता येईल असा त्याला विश्वास आहे. मग यात संजयने खुद्द पैसे दिले नाही तरी चालेल. समूहाने पुढाकार घेतल्यास कार्य सिद्धीस नेता येईल. (आठवा - पैसा फंड कारखाना!) परंतु सुटे सुटे व्यक्तिगत प्रयत्नामुळे तसा फरक पडणार नाही, हेच त्याला सुचवायचे असेल. सर्वानी आपल्या व्यक्तीश: सहभागातून काम होऊ शकते असा दृढ विश्वास बाळगून कृती करत राहिल्यास मोठ- मोठी कामं झटपट होऊ शकतात हेही तितकेच खरे.
परंतु संजयचेच उदाहरण म्हणून विचार करू लागल्यास येथे विसंगती आहे हे जाणवू लागते. विमान प्रवासाचा आनंद व त्यासाठी समाजाचा स्वस्त प्रवासाचा हाव पर्यावरणास धोकादायक ठरू शकते. प्रदूषणाचा धोका लहान सहान प्रदूषणातूनच होत असतो, हे वेगळे सांगायची गरज नाही. कधीतरी एखाद्या विमान प्रवासामुळे झालेले प्रदूषण नगण्य (वा क्षम्य!) वाटत असले तरी तत्व म्हणून विमान प्रवाल अस्वीकारार्ह आहे. काही अपवाद वगळता प्रदूषणास आळा घालणे व पर्यावरण रक्षण करणे हेच आपले धोरण असल्यास आपण स्वत:चा अपवाद करू शकत नाही, त्यातून स्वत:ला वगळू शकत नाही. संजयच्या विमान प्रवासामुळे कदाचित प्रदूषणात भर पडत नसेलही. परंतु इतरास आग्रह करून सांगत असलेले नीती नियम स्वत:च पाळत नाही यासाठी मात्र तो नक्कीच दोषी ठरेल.

कदाचित मी करतो ते करू नको; मी सांगतो तेच करत जा हेच तत्व मान्य असेल तर मात्र ती गोष्टच निराळी!

लेखनविषय: दुवे:

Comments

पटला तुमचा मुद्दा

लेखातील विचार पटले.

विसंगत

विमान प्रवास हे मौजमजेचे साधन म्हणून न वापरता अत्यावश्यक सेवा म्हणून वापरल्यास प्रदूषणाला आळा बसेल, यावर त्याचा भर होता.

कधीतरी एखाद्या विमान प्रवासामुळे झालेले प्रदूषण नगण्य (वा क्षम्य!) वाटत असले तरी तत्व म्हणून विमान प्रवाल अस्वीकारार्ह आहे. काही अपवाद वगळता प्रदूषणास आळा घालणे व पर्यावरण रक्षण करणे हेच आपले धोरण असल्यास आपण स्वत:चा अपवाद करू शकत नाही, त्यातून स्वत:ला वगळू शकत नाही.

ही विधाने एकमेकांना विरोध करतात. स्वतःचा अपवाद तो का करू शकत नाही?

परंतु इतरास आग्रह करून सांगत असलेले नीती नियम स्वत:च पाळत नाही यासाठी मात्र तो नक्कीच दोषी ठरेल.

तो सांगतो की "अत्यावश्यक सेवा म्हणून" विमान वापरा. मग त्याची कृती अनैतिक कशी ठरते?

प्रचार

एखाद्या गोष्टीचा विरोध करताना तीच गोष्ट नाईलाजाने स्वीकारावी का? यातील नाईलाजाची तीव्रता वेगवेगळी असेल. आणि वेगवेगळ्या व्यक्ति त्या तीव्रतेनुसार आपला निर्णय घेतील.
अशा प्रश्नाला वरील लेखाने वाचा फोडली आहे. प्रश्न आवडला.

पहिल्यांदा प्रश्नाबाबत म्हणजे स्वतः एक तिकीट काढले म्हणून १० (वा इतर काही आकडा) तिकिटे निघायची थांबत असतील तर या प्रश्नाबाबतचा विचार करावा असे मला वाटते.
(विमानप्रवास हा मौज म्हणून करू नये वा अत्यावश्यक म्हणूनच करावा या विषयावरची ही मांडणी नाही.)

भाषण हा प्रचाराचा एक चांगला मार्ग आहे हे आता हळूहळू भूतकाळात जायला लागले आहे. मुळात भाषणाला उत्स्फूर्त येणार्‍यांची संख्या अगदी कमी होत चालली आहे. अगदी पट्टीच्या राजकीय वक्त्यांना माणसे पैसे देऊन आणावी लागतात.

प्रमोद

टेलीपोर्टींग टेक्नॉलजी

(सिस्कोची) टेलीपोर्टींग टेक्नॉलजी प्रगत झाली की, अनेक लोक विमानप्रवास टाळू शकतील.

मुलगा असो वा मुलगी - शून्य म्हणजे शून्य बस

मागे भारताच्या कुटुंबकल्याण मंत्रायलाची घोषणा असे :
"मुलगा असो वा मुलगी, एक किंवा दोन फक्त"

आता खारीचा वाटा म्हणून कुटुंबकल्याण कार्यकर्त्याने स्वतः ० म्हणजे ० मुले असे पाळायला पाहिजे. नाही का?

- - -
वरच्या कथेतील कार्यकर्त्याचा "आवश्यक प्रवास विरुद्ध अनावश्यक प्रवास" असा काही मुद्दा आहे ना? त्याच्या "आवश्यक"च्या व्याख्येत (किंवा यादीत) त्याचा प्रचारकी प्रवास बसतो की नाही? बसत असेल, तर (त्याच्यासाठी) मुद्दा खतम.

(उद्या कोणी म्हणेल, कर्ब-वायू कमी करू इच्छिणार्‍या लोकांनी उच्छ्वासात कर्ब-वायू सोडू नये. "ते खरे बोलत असतील, तर श्वास घेता येणार नाही = ते स्वतः श्वास घेतात म्हणजे ते खोटे बोलत आहेत" अशा मथितार्थाची वीज कंपनीची जाहिरात मी बघितलेली आहे. अतिरेकी टोकाचा "श्वास घेऊ नये" हा आरोपच वेडगळ आहे.)

हा प्रश्न

आपण विमान वापरायचे का या पेक्षा आपण किती विमान वापरायचे, हा नैतिक प्रश्न अनेक पर्यावरणवादी चळवळीतील लोकांना याच कारणास्तव पडतो. पण त्यामुळेच कार्बन न्युट्रल विमानसेवांचा वापर देखील करणारे आहेतच. तसे काही हा कथानायक करतो का? किमान त्यामुळे लोकांसमोर लेक्चर झोडताना, "आधी केले मग सांगितले" अशी भुमिका घेणे शक्य होईल.

मग यात संजयने खुद्द पैसे दिले नाही तरी चालेल.
हा भोंदूपणा आहे. ऑल आर इक्वल, सम आर मोर इक्वल असाच प्रकार झाला. अशांच्या मुळेच सामान्य माणसांचा समाजकार्य आणि पैसा म्हणले की विश्वास उडतो...

समूहाने पुढाकार घेतल्यास कार्य सिद्धीस नेता येईल. (आठवा - पैसा फंड कारखाना!)

अंताजीपंत काळ्यांनी एक पैसा मागत पैसा फंड चालू करताना, स्वत:च्या खिशातला एक पैसा घातला नाही असे ऐकलेले तरी नाही. शिवाय फार मोठे नाही पण त्यातून किमान ओगलेवाडीचा काच कारखाना तरी चालू झाला...

@ धनंजयः आता खारीचा वाटा म्हणून कुटुंबकल्याण कार्यकर्त्याने स्वतः ० म्हणजे ० मुले असे पाळायला पाहिजे. नाही का?

यावरून मला (आधी देखील येथे अथवा इतरत्र सांगितलेले) उदाहरण आठवले: भारताच्या माजी राष्ट्रपती व्हि.व्हि. गिरींना ११ का त्याहूनही अधिक मुले होती. त्यांची बायको कुटूंब नियोजनाचे काम करत असे. (अर्थात असे देखील म्हणू शकू की अशाच बाईस कुटूंब नियोजनाचे महत्व पटणार!)

एकच गोष्ट मी गांधीजींच्या आणि रामकृष्ण परमहंसांच्या नावाने ऐकली आहे. पहील्या गोष्टीत साखर तर दुसर्‍या गोष्टीत गूळ खाऊ नको असे आपल्या मुलाला सांगा म्हणत आई-वडील गांधीजी/रामकृष्णांना विनंती करतात. दोघे (आई-वडील)आठ दिवसांनी येतात. गांधीजी/रामकृष्ण मुलाला सांगतात, "बाळा साखर/गूळ खाऊ नकोस". आईवडील विचारतात, हे काय आठ दिवस आधी पण सांगता आले असते! त्यावर ह्या विभुती म्हणाल्या की पण त्यावेळेस आम्हीपण खूप खात होतो ना! आधी आम्ही खाणे कमी केले आणि मग आता त्या मुलाला सांगत आहे!

अनुभवामुळे हक्क

मला वाटते ऍल गोर यांच्याविरुद्ध विमान वापरल्याचा आरोप करतात. हा "कार्बन न्यूट्रल" प्रकार म्हणजे "एके ठिकाणी जितके पाप करतो त्यापेक्षा अधिक पुण्य अन्य ठिकाणी करतो" असाच प्रकार आहे. (यात काही चूक नाही.) "पुण्य = पुण्य करायला पैसे पुरवतो" असेच आहे.

त्याच प्रमाणे वरील कथेतल्या कार्यकर्त्याने जितके विमान-तेल जाळले, त्यापेक्षा अधिक तेल वाचवायचे प्रशिक्षण तो वेगवेगळ्या गावात पुरवत असला, तर झालाच की त्याचा प्रवास "कार्बन न्यूट्रल".

(तिकीट विकत घेताना विमान कंपन्या "प्रवास कार्बन न्यूट्रल करा" म्हणून जोडीने हिरवा अधिभार विकायचा प्रयत्न करत असतात. मी याबाबत थोडसा विचार केलेला आहे. मी होरवा अधिभार आजवर कधीही विकत घेतलेला नाही. तितकेच पैसे मी वेगळ्या कुठल्या संस्थेला देतो. कार्बन कमी करण्यासाठी कायदा नाही, त्याकरिता कर नाही, तोवर या हिरव्या अधिभाराला काही अर्थ आहे, असे मला वाटत नाही.)

- - -

श्रीमती व्ही व्ही गिरींच्या बायकोला अनुभवामुळे हक्क असावा, हेच खरे :-)
आता त्या एक आठवडा वाट बघून म्हणणार असत्या : "मागच्या आठवड्यात मागची ९ मुले पुन्हा पोटात घेतली" तर कठिण प्रकार झाला असता. त्यांच्या पोटात तेवढी जागा नसणार. आणि मुलांनीही पोटात परत जाण्याबद्दल कुरकुर केली असती. जर म्हणायचे "मागच्या आठवड्यात मी एकही नव्या मुलाला जन्म दिला नाही" तर ते श्रीमती गिरींसाठी सोपेच होते.

ठेच लागल्यानंतर लोकांना धोका सांगितल्याचा अनुभव तर आपणा सगळ्यांनाच आलेला आहे. "ठेच टाळा" हे सांगितलेले करण्यासाठी भूतकाळात जाऊन ठेच टाळण्याचे कालयंत्र आपल्याकडे नसते. त्यामुळे "आधी ठेच टाळली, मग ठेच टाळण्याबद्दल सांगितले" असे या बाबतीत शक्य नाही.

- - -

"आधी केले मग सांगितले" ही कल्पना चांगली आहे, पण मर्यादित ठिकाणीच लागू होते. मागे आपली चर्चा झाली होती, की धोंडो केशव कर्व्यांनी विधवेशी विवाह स्वतः करून दाखवला. हे चांगले. पण त्याआधी काही वर्षांपूर्वी त्यांची पहिली पत्नी वारली होती. पहिल्या लग्नाच्या वेळेला पहिली पत्नी विधवा नव्हती. कर्वे दुसर्‍या विवाहाच्या आधीसुद्धा विधवा विवाहाचे समर्थन करत. आधी सांगितले - मग केले - मग सांगितले.

पहिली पत्नी वारली नसती, तर धोंडो केशवांना "केले ते करायचा" अवसर मिळाला नसता. कर्व्यांची हिंगण्याची संस्था "केले-सांगितले-परीक्षे"त उत्तीर्ण व्हावी, म्हणून कर्व्यांच्या पहिल्या बायकोचा अकालमृत्यू महाराष्ट्रासाठी "सुदैवी" म्हणावा की काय ;-) {स्पष्टीकरण : कोणाच्याही मृत्यूला सुदैव म्हणू नये, असे माझे मत आहे.}

तर मग विधवाविवाहाचे समर्थन असणार्‍या बिगर-विधुर पुरुषाचे काय? समर्थन करण्यापूर्वी स्वतः विधवाविवाह करून घ्यायची सोय करणे महाकठिण : बायको मरायची वाट बघायची, मग विधवेशी विवाह करायचा, मग समर्थन सांगायचे - हे ठीक वाटत नाही. बायकोआधी तो पुरुषच मेला तर समर्थन केले नाहीच, उलट दुसर्‍या कोणाला लग्न करण्यासाठी आपली विधवा सोडली, असे व्हायचे. मला वाटते, अशा लोकांनी केले-सांगितले ते पुरेसे होते. म्हणजे विधवा-विवाहांसाठी आर्थिक मदत करणे, वाळीत टाकलेल्यांना पुन्हा समाजात घेणे... इतके केले तर स्वतःहून विधवाविवाह केला नाही तरी चालतो.

डायबेटीस झालेल्या मित्राची साखरेची खाय-खाय कमी होण्यासाठी मदत केली, तर बिगरडयबेटीसवाल्या मित्राने स्वतः साखर खाल्लेली चालते. आपण साखर सोडावी लागत नाही.

"सम आर मोर ईक्वल दॅन अदर्स" साउंडबाईट मला बहुतेक संदर्भांत कळतच नाही. मूळ पुस्तकात राज्यकर्त्यांनी जनतेचे हक्क कमी केले, असा संदर्भ आहे. तो अर्थ येथे लागू होत नाही, हे तर आलेच.

- - -

कर्वे

पण त्याआधी काही वर्षांपूर्वी त्यांची पहिली पत्नी वारली होती. पहिल्या लग्नाच्या वेळेला पहिली पत्नी विधवा नव्हती. कर्वे दुसर्‍या विवाहाच्या आधीसुद्धा विधवा विवाहाचे समर्थन करत. आधी सांगितले - मग केले - मग सांगितले.

येथे मला "ए टाईम टू कील" मधल्या आरोपीच्या बाजूच्या डॉक्टरला अंडरएज मुलीशी संबंध आले होते म्हणून फिर्यादीचा वकील लाज आणतो, पण हे सांगत नाही की ते झाले तेंव्हा ती मुलगी १७ वर्षाची आणि तो (डॉक्टर) १८ वर्षाचा म्हणजे नुकताच सज्ञान झालेला असतो. असेच काहीसे येथे होत आहे. असे म्हणायचे कारण की संदर्भ न देता आपल्या विधानांचा विचार केला तर आत्ताच्या संदर्भात वाटेल की ~२५+ वयाच्या कर्व्यांचेच लग्न झाले होते/असावे. वास्तव असे आहे की त्यांचे पहीले लग्न झाले तेंव्हा त्यांचे वय १४ तर त्यांच्या (पहील्या बायकोचे) वय ८ होते... अर्थातच त्यांचे लग्न हे तेंव्हाच्या पद्धतीने आई-वडीलांनी लावून दिले होते. तेंव्हा त्यांनी काहीच सांगितले नसावे कारण समाजाचे वास्तव त्यांना कशाला कळणारे १४ व्या वर्षी.

असेच उदाहरण देयचे असेल तर सुधारक न्या. महादेव गोविंद रानड्यांचे आहे. ते देखील विधवा विवाहाचे पुरस्कर्ते होते. जरठबाला विवाहाचे विरोधक होते. त्यांची ही मते झालेली असताना त्यांच्या सज्ञानपणी त्यांच्या प्रथम पत्नीचे निधन झाले तेंव्हा, वडील हट्ट करत आहेत असे म्हणत लहान कुमारिकेशीच परत विवाह केला होता. आणि रानडे आहेत तेंव्हा तत्व माफ असे झाले. असेच कुठल्याही तत्वज्ञानातील कुठल्याही समाजसुधारकासंदर्भात होऊ शकते, म्हणून बोलण्यातील नैतिक बळ हे केवळ आचरण करणार्‍यालाच मिळू शकते असे वाटते.

बाकी मी देखील हिरवा कर भरत नाही. मी ऍल गोअर बद्दलच नाही अगदी ग्रासरूटलेव्हलच्या कार्यकर्त्यांसंदर्भात पण बोलत होतो....

मूळ मुद्दा

"बोलण्यातील नैतिक बळ हे केवळ आचरण करणार्‍यालाच मिळू शकते असे वाटते."
ते मान्य आहे, तरीही, खूप मोठे सदाचरण-छोटे दुराचरण= मोठे सदाचरण अशी पापक्षालने शक्य आहेत काय, किंवा दीर्घ मुदतीच्या फायद्यासाठी तत्त्वांना अल्प मुदतीची मुरड घालावी काय, हा मुद्दा चर्चिणे शक्य आहे. "विमान प्रवास हे मौजमजेचे साधन म्हणून न वापरता अत्यावश्यक सेवा म्हणून वापरल्यास प्रदूषणाला आळा बसेल, यावर त्याचा भर होता." असे कथेत सांगितले गेल्या असल्यामुळे संजयचे वागणे 'विसंगत' उरत नाही.

समजा, एखाद्या संस्थेला स्वतः पैसे गुंतवून किंवा देणग्या जमवून शाकाहाराच्या प्रचाराचे समाजकार्य करायचे आहे. आता, अशा संस्थेचे सदस्य स्वतः भित्तीपत्रके लावत नाहीत हे सामान्य निरीक्षण आहे. म्हणजेच, कोणत्यातरी कंत्राटदाराला, त्याच्या वैयक्तिक लाभासाठी पैसे देऊन संस्था कार्य करवून घेते. हा कंत्राटदार स्वतः मांसाहारी असला तरी संस्थेच्या तत्त्वांना काळीमा लागत नाही असे लोकांना वाटते असे मला वाटते. जर नियमितपणे कंत्राटे देण्याऐवजी संस्थेने पत्रके चिकटविणारे मजूर पगारावर ठेवले तरी संस्थेची ध्येये अबाधित राहतात असे लोकांना वाटते असे मला वाटते. अशाच प्रकारे, एखादा उत्कृष्ट वक्ता जर संस्थेने पगार देऊन स्वतःच्या सीईओपदी नेमला आणि त्याने समाजातील 'एकूण' मांसाहार घटविला तर संस्थेचे नैतिक अधिष्ठान डळमळणार नाही असे लोकांना वाटते असे मला वाटते. या परिस्थितींमध्ये, कंत्राटदाराला, मजुराला किंवा वक्त्याला नैतिक अधिष्ठान नाहीच पण संस्थेला मात्र व्यक्तींच्या नैतिकतेची बेरीज (spatial sum) केली तर नैतिक बळ राहतेच ना? त्याच न्यायाने, संजयच्या बाबतीत दीर्घ मुदतीच्या काळाची (temporal sum) बेरीज केली की नैतिकता टिकूनच असल्याचे दिसते.

विसंगती आणि नैतिकता

"विमान प्रवास हे मौजमजेचे साधन म्हणून न वापरता अत्यावश्यक सेवा म्हणून वापरल्यास प्रदूषणाला आळा बसेल, यावर त्याचा भर होता." असे कथेत सांगितले गेल्या असल्यामुळे संजयचे वागणे 'विसंगत' उरत नाही.

मला देखील त्याचे वागणे 'विसंगत' वाटले असे म्हणायचे नव्हते. मात्र याच क्षेत्रातील "कार्यकर्त्यां"ना काय वाटत असते (guilty conscience) हे थोडेफार जवळून पाहीले असल्याने त्यावर भाष्य केले होते. त्याशिवाय अशा व्यक्ती जेंव्हा लोकांना उपदेश करतात तेंव्हा त्यात असे विचारणारे असतातच की तुम्ही काय करताहात म्हणून... हा प्रश्न ऍल गोअरला सतावला होता पण त्याचे उत्तर होते की माझे घर मोठे असले तरी कार्बन न्युट्रल आहे. अशा चळवळीतील सामान्य कार्यकर्त्यांना देखील सतावतोच. म्हणून त्यावर उपाय हा कार्बन क्रेडीट्स घेणे अथवा इतर ऍक्टीव्हीटिज् नी कार्बन न्युट्रल बनणे आणि तसे जाहीर सांगणे हा असू शकतो असे वाटते.

...त्याच न्यायाने, संजयच्या बाबतीत दीर्घ मुदतीच्या काळाची (temporal sum) बेरीज केली की नैतिकता टिकूनच असल्याचे दिसते.

हा मुद्दा देखील मान्यच आहे. हे विशेष करून सत्य कधी आहे तर जेंव्हा पैसा हा स्वतः चालू केलेल्या प्रकल्पासाठी असतो. (अगदी एखाद्या उद्योगाप्रमाणे पण सामाजीक कार्यासंदर्भात). पण या कथेत सांगितल्याप्रमाणे जर पैसे गोळा करताना सर्व कमवत्या नागरीकांकडून समाजकार्यासाठी पैसा गोळा करायचे ठरवले असले तर त्यात इतरांना प्रोत्साहन देताना जर स्वत:चा अगदी १०० नाही तरी १० रुपये (उरलेले कष्टाच्या रुपाने) दाखवले तर फरक पडू शकतो.

या संदर्भात थोडे वेगळे उदाहरणः आमच्याकडे मराठी मंडळाच्या कार्यकारीणीचे सदस्य (किमान मी असताना) कार्यक्रम ठरवायचे, हमाली करायचे, नंतर फुकाच्या शिव्या खायचे ;) आणि तरी देखील कार्यक्रमाच्या वेळेस तिकीट काढायचे. मी तर एकदाही कार्यक्रम बघू शकलो नव्हतो कारण इतर व्यवस्थेतच वेळ जायचा. तेच माझ्या इतर काही सदस्य मित्रांचे आणि/अथवा त्यांच्या बायकांचे. टाय (The Indus Entrepreneurs) मधे देखील कार्यक्रम आणि कॉन्फरन्सेसच्या संयोजनात भाग घेतला आहे. तेथे पैसेच खूप लागतात म्हणून डिसकाउंट देयचे/देतात पण फुकट नसते. असे इतरत्र इतरांचे देखील माहीत आहे.

लेकुरे उदंड जाहली -डिस्क्वालिफाय

'लेकुरे उदंड जाहली -तो ते लक्ष्मी निघोन गेली' असे सांगणार्‍या रामदासांना डिस्क्वालिफाय केले पाहिजे. :)
कारण तो अधिकार ते दुहेरी घालवून बसले होते - एक तर ब्रह्मचर्यामुळे त्यांना मुले असणे शक्य नव्हते आणि दुसरे लेकुरे नसूनही (संन्यस्त असल्याने) त्यांच्याकडे लक्ष्मी नव्हती. ;)

मोजमापाची एककं

मला वाटतं हा गोंधळ मोजमापांच्या एककांमुळे येतो.
'चांगल्या कार्याला हातभार लावावा' हे सर्वमान्य तत्त्व धरूया. त्यात प्रत्येकाने किमान विशिष्ट मर्यादेपलिकडे, आपापल्या क्षमतेनुसार हातभार लावावा हे अधिक काटेकोर तत्त्व झालं. आता 'हातभार' कुठच्या एककांत मोजायचा? फक्त ढोबळ पैसे, विमानाने केलेल्या प्रवासाचे मैल या एककांत मोजला तर पंचाईत येते. दुर्दैवाने मनुष्यात अशा ढोबळ एककांनी दिसणारी पंचाईत दाखवून देण्याची यंत्रणा अत्यंत सक्षम आहे. त्यामुळे संजयवर टीका झाली तर नवल वाटत नाही. पण त्याच्या संदेशामुळे हजार लोकांनी आपला प्रवास एक टक्का कमी केला, तर संजय स्वतः इतरांच्या पाचपट प्रवास करूनही शेवटी हिशोब फायद्याचाच होतो. संजयने लावलेला हातभार हा अप्रत्यक्ष आहे म्हणून तो मोजू नये असं नाही.

पर्यावरणाच्या प्रश्नाच्या बाबतीत हीच विचारसरणी कामी येते. वरील उदाहरणापेक्षा ती अधिकच अप्रत्यक्ष आहे. समजा आज विजेचा एक युनिट अधिक खर्च केल्याने पर्यावरणाची हानि क्ष इतकी होते. किंवा एक युनिट कमी खर्च केल्याने क्ष इतकी हानि कमी होईल. वरवर पाहाता वीज कमी खर्च करावी असंच वाटेल. पण जर ती वीज खर्च केल्यामुळे भविष्यात पर्यावरणाचा चार क्ष फायदा होणार असेल, तर आज तोटा सहन करून उद्याच्या फायद्यासाठी गुंतवणुक करायला हवी. (हे आकडे निरर्थक आहेत, केवळ उदाहरणासाठी घेतले आहेत) संजयचा प्रश्न व आधी विकास, व त्यातून पर्यावरणाची अधिक सक्षम काळजी असं म्हणू धजणाऱ्याचा प्रश्न एकच आहे. दुर्दैवाने विचारवंतांमध्ये तो पक्ष ठासून घेणारे कमी दिसतात (मी फार पाहिलेले नाहीत). सुदैवाने प्रगतीशील देशांची सरकारं तो पक्ष उचलून धरतात.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

विसंगती

आचार व विचार यात विसंगती असु नये असे बर्‍याच जणांना वाटते.
समजा मी भ्रष्टाचारी, लाचखाउ आहे. पण भ्रष्टाचार व लाच ही राष्ट्रहितास हानीकारक आहे असे माझे प्रामाणीक मत आहे. ते मी जाहीरपणे सांगत असतो. माझे विचार व आचार यात विसंगती आहे हे देखील मला माहित आहे. परंतु माझा विचार मला आचरणात आणता येत नाही म्हणुन मी तो मांडुच नये का?
एखाद्याने आपल्या मनात आलेले विचार बोलून दाखवले नाहीत म्हणजे ते त्याच्या मनात आलेच नाहीत असे मानायचे का? मनात आलेले विचार हे समाजमान्य नसतील तर मला विकृत असा शिक्का बसण्याची भीती आहे म्हणुन मी ते बोलून दाखवत नाही इतकेच. त्यातुनही लोक काय म्हणतील हा विचार बाजुला ठेउन मी माझ्या मनात आलेले ते विकृत विचार बोलून दाखवले परंतु ते आचरणात आणले नाहीत तर लोक या बद्दल काय म्हणतील?
उपक्रमावर एखाद्या लिखाणात xxx लिहावे असे मला वाटले पण उपक्रमींना काय वाटेल? ते संपादित होईल का? म्हणुन मी ते लिहित नाही. याचाच अर्थ माझ्या आचार व विचार यात तफावत आहे. त्याला माझी उपक्रमाप्रति असलेली प्रतिमा जपण्यासाठी केलेली तडजोड म्हणेन.
म्हणजे योग्य काय व क्षम्य काय हे माझीच सदसद विवेकबुद्धीच ठरवत असते. मी माझे बुद्धिचातुर्य व वजन वापरुन ते समाजाच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करीत असतो.
एक अवांतर प्रसंग आठवला. अंनिसत एका मिटिंग मधे मी असा प्रश्न विचारला कि क्ष ही व्यक्ती कुप्रसिद्ध आहे. तिला कायद्याने गुन्हेगार म्हणुन अद्यापपर्यंत शिक्षा केलेली नाही. पण त्या व्यक्तिला तुम्ही करत असलेले अंधश्रद्धा निर्मुलन हे समाजासाठी चांगले काम आहे असे वाटते. अशा व्यक्तीने कुठलीही पुर्व अट न घालता तुम्हाला जाहीरपणे स्वतःहुन देणगी देण्याची इच्छा व्यक्त केली तर काय करावे? रक्कम अगदी घसघशीत आहे. त्यामुळे आपल्याला चमत्कारासाठी असलेली जाहीर आव्हानाची रक्कम दुप्पट करता येईल. रक्कम स्वीकारावी कि नाकारावी?
बहुतांशी लोकांनी नाकारावी असे मत दिले होते. मी मात्र स्वीकारावी असे मत दिले होते.
प्रकाश घाटपांडे

+१

"जाहीरपणे स्वतःहुन देणगी देण्याची इच्छा व्यक्त केली तर काय करावे?" "मी मात्र स्वीकारावी असे मत दिले होते."
सहमत आहे.

व्यक्तीवरील गुन्हा सिद्ध झाला तरी काही फरक पडू नये, अटीचा परिणाम फायद्यात असेल तर अटीचे पैसेही घ्यावेत असे वाटते.

तडजोड

मुद्दा विचारप्रवर्तक आहे. रोजच्या जगण्यामध्ये आपल्या तत्वांना मुरड घालावी का, उत्तर हो असल्यास कशी, किती, कुठल्या मर्यादेपर्यंत?
यावर प्रत्येकाचे विचार आणि नियम वेगवेगळे असणार त्यामुळे याचे सामान्यीकरण करता येईल असे वाटत नाही. हो किंवा नाही अशी काळी-पांढरी उत्तरे न मिळता याची उत्तरे राखाडी (ग्रे) विभागात आहेत असे वाटते.

पैसे गोळा करण्याच्या मुद्याबाबत संजयने पैसे नाही दिले तरी चालेल हे पटत नाही. कारण मग त्याला इतरांकडे पैसे मागण्याचा नैतिक हक्क उरत नाही.

--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै

वेळ

पैसे गोळा करण्याच्या मुद्याबाबत संजयने पैसे नाही दिले तरी चालेल हे पटत नाही. कारण मग त्याला इतरांकडे पैसे मागण्याचा नैतिक हक्क उरत नाही.

संजय त्याच्याकडचा वेळ संघटनेच्या कार्यासाठी देत आहे. वेळ ही देईल व पैसाही देईल अशा परिस्थितीत संजय कदाचित नसेल. केवळ पैसे नाही दिले म्हणुन इतरांकडे पैस मागण्याचा नैतिक हक्क उरत नाही असे म्हणणे मला व्यक्तिशः योग्य वाटत नाही. (यात संजय तळमळीने कार्य करणारा कार्यकर्ता आहे असे गृहित धरले आहे)

प्रकाश घाटपांडे

पैसे

संजयने पैसे दिले नाहीत तर त्याचे कारण काय हे लेखात स्पष्ट केलेले नाही. जर त्याची परिस्थिती नसेल तर ठीक आहे. मात्र शक्य असूनही पैसे दिले नाहीत तर ठीक नाही असे वाटते.

इथे एक समान उदाहरण आठवते. नुकतीच बिल गेट्स आणि वॉरेन बफे या अब्जाधीशांनी जगभरातील अब्जाधीशांना त्यांची जास्तीत जास्त संपत्ती समाजासाठी दान करण्याची विनंती केली. इथे जर बिल गेट्स/बफे यांनी स्वत: काहीही दिले नाही तर त्यांना इतरांना दान करा म्हणण्याचा नैतिक हक्क उरत नाही. मात्र गेट्स यांनी २८०० कोटी तर बफे यांनी त्यांच्या संपत्तीच्या ९९% संपत्ती दान केल्याची बातमी आहे.

--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै

आपली ती गरज आणि दुसर्‍याची ती चंगळ...

आपल्या उपदेशाला/कार्याला काही ना काही नैतिक अधिष्ठान असायलाच पाहिजे, हा गांधीवादी विचार मला पटतो. त्यामुळे स्वतः विमानातून आलेल्या संजयचा विमानप्रवास टाळण्याचा उपदेश (अर्थात, तो विमानाने आला आहे- हे मला कळले तर) मी तरी फारसा गंभीरपणे घेणार नाही.
ढीगभर भाषणांनी आणि उपदेशांनी साधला जाणार नाही, एवढा सकारात्मक परिणाम एका छोट्याश्या कृतीने साधला जाऊ शकतो.

वरील उदाहरणात "लोक चंगळ करतात, लोक मौजेखातर विमानात बसतात, मी मात्र लोकांना शहाणे करतो" असा काहीसा एक 'हस्तिदंती मनोरा' भाव आहे- जो (निदान भारतात तरी) समाजकार्याला फारसा पोषक नाही. इथे विजय मल्ल्या किंवा रोटरीवाल्यांनी कितीही साधेपणाचे उपदेश केले तर कोणीही मनावर घेणार नाहीत. त्यासाठी बंग/आमटेच पाहिजेत. :-)
("पब्लिक है, ये सब जानती है" हा एक कुठेही चालणारा थंबरूल वापरावासा वाटतो आहे.)

तर्काचा आधार घेऊन कदाचित संजयला क्लीन चिट देता येईल- पण व्यवहारात त्याच्या कार्याला स्वीकृती मिळण्यास त्याचा विमानप्रवास हा मोठाच अडथळा आहे, हे नक्की.
(इथे बाकी कुणीही नसले, तरी ठणठणपाळ यावर माझ्याशी नक्कीच सहमत होतील, अशी आशा आहे. ;-))

सहमत.

बोले तैसा चाले त्याची(च) वंदावी पाऊले.
सहमत.

 
^ वर