संस्कृत आणि संगणक

भारताची महती गाणारी जी ढकलपत्रे वारंवार जालावर फिरत असतात त्यांत "संस्कृत ही कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगसाठी सर्वात योग्य भाषा आहे" असे एक विधान असते.

बहुधा हे विधान परम संगणकावर काम केलेले डॉ विजय भटकर यांच्या नावे दिलेले असते.

डॉ. भटकर यांनी असे विधान केले असेल तर ते काय आधारावर केले असावे?
त्यांचे विधान योग्य असेल तर सध्या जगात कोणी ना कोणी संस्कृत भाषा वापरून संगणकाचे प्रोग्रॅमिंग करण्याचा प्रयत्न करीत असणार. त्याबाबत काही माहिती आहे का? स्वतः भटकर तसे काही काम करीत आहेत का?

भटकर यांनी असे विधान केले नसेल तर ते असेच ठोकून दिलेले विधान आहे असे म्हणावे का?

येथे संगणक, प्रोग्रॅमिंग क्षेत्रात काम करणारी खूप मंडळी आहेत. त्यांना काही माहिती असली तर त्याबद्दल प्रतिसादातून लिहावे.

Comments

उत्सुक

चांगला विषय. मी ही हे वाक्य जेव्हा जेव्हा ऐकतो तेव्हा असाच प्रश्न पडतो.. उत्तर जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

दुवे

खालील दुवे महत्वपूर्ण वाटतात-

१. पहिला
२. दुसरा
३. तिसरा
४. चौथा
५. पाचवा

काही लेख गो-या लोकांनी लिहीले आहेत त्यामुळे इकडे त्याची महती पटायला वेळ लागणार नाही असे वाटते.

आक्षेप

पहिला दुवा: भंकस.
दुसरा दुवा: पेप्रांची केवळ नावे आहेत, सारांशही नाही: पास.
तिसरा दुवा: बाय डिफॉल्ट असहमत.
चौथा दुवा: "Sanskrit is the most appropriate language for writing computer software." हा (फोर्ब्सच्या नावचा) दावा खोटा असल्याचे दिले आहे.
पाचवा दुवा: संस्कृत भाषा ही मुळातच संगणकाला समजण्यास सोपी आहे असा दावा आहे (१९८५) पण तो पेपर वाचून पटले नाही.

काही लेख गो-या लोकांनी लिहीले आहेत त्यामुळे इकडे त्याची महती पटायला वेळ लागणार नाही असे वाटते.

असे का वाटते? तशी मानसिकता 'येथे' कोणामध्ये दिसली?

भारत देशात

इकडे म्हणजे भारत देशात.

शंका

या निमित्ताने अवांतर शंका आहे.
परमचा उपयोग कुठे-कुठे केला जातो आहे? माझा एक मित्र टाटा सुपरकॉम्प्युटिंगमध्ये आहे. त्याला एकदा विचारले की हे महासंगणक कुठे वापरतात? तर म्हणाला उगीच भलत्या शंका काढू नकोस. आता तो विनोद करत होता का गंभीर होता माहित नाही.

--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै

परम कुठेच नाही

माझ्या माहितीत कुठेच नसावा. माझ्या एका मित्राच्या संस्थेत (सरकारी) हा संगणक बसवला होता. पण वापरला गेला अशी त्याची आठवण नाही.
प्रमोद

महासंगणक

परम हा आता महासंगणकांच्या दृष्टीने म्हातारा झाला. 'एका' हा टीसीएसचा संगणक आशिया खंडातील दुसरा सर्वात वेगवान महासंगणक आहे. त्याच्या वापराबद्दल कंपनीच्या अधिकार्‍यांनी दिलेली माहिती येथे आहे.दोन वर्षांपूर्वी मी ही बातमी केली होती. या बातमीत नसलेला आणखी एक उल्लेख म्हणजे बोईंगसाठी थर्मोडायनामिक्सची गणिते करण्यासाठी या महासंगणकांचा उपयोग होतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे आठवते.

भाषा प्रयोग.

मला वाटते की याचे मूळ तुम्ही लिहिता त्याहून जुने असावे. (भटकरांपेक्षा.)

माझ्या आठवणीत १९८०-५ साली यावर चर्चा होत असावी. (पीसी पूर्वी)

भाषा विषयाचा एक मोठा प्रश्न आहे. आपण जे लिहितो/बोलतो ते एकमेकाला शब्द-वाक्य अशी तोड केली तरी समजते. हेच संगणकाला समजू (?) शकते का? असा काहीसा प्रश्न त्याकाळी विचारला जायचा. (आता कदाचित यावर खूप पाणी वाहून गेले असेल.) येथे समजणे शब्दाचा अर्थ मर्यादित घ्यायचा. म्हणजे भाषांतर करता येणे. विधानानुसार समीकरण वा माहिती जमवणे (प्रमोदची उंची अमुक आहे. त्याचे वजन तमुक आहे. असे लिहिले तर त्याचे याचा अर्थ प्रमोदचे हे माहिती संकलनात कळणे.). इंग्रजी भाषेत काही विशिष्ट रचनेनुसार वाक्यात शब्द येतात. याचे कारण विभक्तिप्रत्यय खूप कमी आहेत. या उलट विभक्तिप्रत्यय लावल्याने शब्द उलटसुलट झाले तरी वाक्याचा अर्थ बदलत नाही. (मला कुत्रा चावला, कुत्रा मला चावला, चावला मला कुत्रा इत्यादी). हा संस्कृतचा एक गुण (आणि भारतीय भाषांचा). संगणकीय प्रणाली त्यामुळे संस्कृत बाबतीत थोडी कमी किचकटीची झाली असती. याशिवाय शब्दांचे चालणे याबाबतचे काटेकोर नियम देखील संगणकीय प्रणालीला थोडीफार सुखद.

अशा कारणाने कोणीतरी त्याबाबतीत काही उद्गार काढले असावे. मात्र संगणकासाठी (यंत्रासाठी) संस्कृत चांगली असा काहीसा प्रवाद त्यानंतर एका गटाने मांडल्याचा आठवतो. मग त्यात ती फोनेटिक असणे, अक्षर योजना वैज्ञानिक असणे ही कारणे पण जोडली गेली. या काळी संगणकाविषयी (तो चालवणार्‍याविषयी) अति आदर असे. म्हणून संगणकाशी तिला जास्त जोडण्यात
खूप रस असे. प्रोग्रॅमिंग साठी वगैरे त्यानंतरची उडी. ('वैदिक गणित' हे आधुनिक आहे. वेदांशी त्याचा काडीमात्र सबंध नाही असे खुद्द पुस्तककर्ते शंकराचार्यांच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत आहे. त्यानंतर त्याला वेदांशी जोडण्याचा प्रकार आजही अनिर्बंध चालू आहे. त्यातलाच हा प्रकार.)

प्रमोद

व्याकरणाचे संगणकीकृत रूप करण्यास पाणिनीमुळे सोय

(अन्यत्र याच विषयावर लिहिलेला प्रतिसाद येथे चिकटवत आहे.

"संस्कृत ही कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगसाठी सर्वात योग्य भाषा आहे"

हे वाक्य संदिग्ध आहे.
अर्थ १ : प्रोग्रॅम लिहायची भाषा म्हणून सर्वात योग्य.
हे ठीक नसावे. मराठी, इंग्रजी, या कुठल्याही भाषेपेक्षा सोयीची नाही. संगणकाच्या आज्ञावलीची भाषा कृत्रिम आणि मर्यादित असते. त्या कृत्रिम भाषेसाठी ध्वनी वाटेल त्या भाषेतून घेतले तरी फरक पडत नाही. सध्या ध्वनी इंग्रजीतल्या काही शब्दांशी जुळतात. मात्र पुढील लेखन "इंग्रजी" आहे असे म्हणण्याचे धाडस मला तरी होत नाही
- - -

#include
class vehicle
{
int wheels;
float weight;
public:
virtual void message(void) {cout << "Vehicle message\n";}
};
class car : public vehicle
{
int passenger_load;
public:
void message(void) {cout << "Car message\n";}
};

...
- - - (स्रोत : http://sundog97.tripod.com/tutorial_cpp/VIRTUAL4.CPP)

त्याऐवजी

{#स्वीकार <येजाप्रवाह.मू>
वर्ग वाहन
पूर्णांक चाके
बिंदुअंक वजन
सार्वजनिक :
...
}


असे लिहिले तरी कम्पाइलरला समजावून देणे सहज शक्य आहे. मात्र याला तरी "मराठी" म्हणता येईल काय? तर नव्हे. संस्कृत चिह्ने वापरली तरी चालेल. मात्र ती संस्कृत भाषा नव्हे.
--------------------------------------------------------

अर्थ २: ज्या भाषेचे वर्णन संगणकाच्या प्रणालीत लिहायला सोयीस्कर आहे.
अंततोगत्वा असे काही नाही. मराठी भाषेचे वर्णनही संगणकीय प्रणालीत लिहिता येईल. पण त्यासाठी पहिली पायरी अशी : मराठी भाषेतील सर्व शब्दप्रयोगांचे अ‍ॅल्गोरिद्मिक वर्णन केले पाहिजे. दुसरी पायरी : अ‍ॅल्गोरिदमची संगणक प्रणाली बनवायला पाहिजे.

संस्कृतात पहिली पायरी जवळजवळ पूर्ण झालेली आहे. पाणिनीची अष्टाध्यायी अशा प्रकारचे अ‍ॅल्गोरिद्मिक वर्णन आहे. त्यात काही बारीकसारीक चुका होत्या. बारीक नजरेने कात्यायन आणि पतंजली यांनी त्या चुका शोधून काढल्या आहेत. बगफिक्सेस सुचवलेले आहेत.

त्यावरून संगणकीय प्रणाली बरेच लोक लिहीत आहेत. जेरार युए या फ्रेंच-राष्ट्रीय संस्कृत-पंडिताने पाणिनीचा अ‍ॅल्गोरिदम बर्‍यापैकी पूर्ण लिहिलेला आहे. त्या प्रणालीचे दृश्य रूप येथे बघता येईल :
http://sanskrit.inria.fr/
(हे फक्त उदाहरण. अन्य लोक सुद्धा आहेत, भारतातसुद्धा आहेत, हे सांगणे नलगे. येथे श्री असा मी असामी यांनी सीडॅक-पुणेचा दुवा दिलेलाच आहे.)

--------------------------------------

भटकर वगैरे प्रश्नांबद्दल मला काही माहीत नाही.

इंग्रजीचा त्याग करून संस्कृत चे धडे गिरवावे लागतील

जुन्या बापजाद्यांच्या जगातल्या मोठेपणाच्या बाता मारून आम्ही कसे मोठे आहोत हे सांगणारे आणि संस्कृतच संगणक करता प्रोग्रॅमिंगसाठी सर्वात योग्य भाषा आहे हे सांगणारे एकच जातीतील आहेत. आणि संस्कृत योग्य भाषा असली तरी यांच्या ज्ञान लपवण्याच्या अपप्रवृत्ती मुळे संस्कृत भाषेत मोठ्या प्रमाणात लिखित साहित्य चे ज्ञान भांडार आज उपलब्ध नाही. आज संगणकावर काम करणारे बहुतेकजण जुन्या जमान्याच्या काळात वावरत असतात. आणि मग आम्हीच जगात कसे शहाणे आहोत होतो असे मेल फिरवत असतात. संस्कृत ला जर संगणकाची भाषा प्रणाली करावयाची असेल तर आधी अश्या मेल करणाऱ्यांना आणि त्यांच्या पुढच्या पिढीस प्रथम इंग्रजीचा त्याग करून संस्कृत चे धडे गिरवावे लागतील , पण हे होणे नाही,या सगळ्या रीकामपणाच्या गोष्टी आहेत.

thanthanpal.blogspot.com

यु मेड माय डे!

--आज संगणकावर काम करणारे बहुतेकजण जुन्या जमान्याच्या काळात वावरत असतात.--

यु मेड माय डे! :-)

व्याकरण, तर्कशास्त्र, ध्वनीशास्त्र व गणित

भाशा ही प्रतीकांची व त्यातून व्यक्त होणार्‍या प्रतिमांद्वारे घडत गेलेली असते.
प्रतीक म्हणजे 'चिन्हं'. प्रतिमा म्हणजे 'त्या प्रतीकांचा व त्या अनुशंगे येणार्‍या सगळ्या गोश्टींचा अर्थ'.

ही चिन्हं ध्वनींची देखील असू शकतात, चित्रांची देखील असू शकतात.
ह्या चिन्हांची आपआपसातील सांगड कशी करायची?, कशी करू नये?, ह्याचे देखील शास्त्र असते.
ध्वनींची सांगड ज्या शास्त्रातून समजावली जाते ते शास्त्र म्हणजे 'भाशेचे व्याकरण'
(प्रमाणित)चित्रांची सांगड ज्या शास्त्रातून समजावली जाते ते शास्त्र म्हणजे 'भाशेची लिपी'

माणसाला संगणकाशी संवाद साधायचा असेल तर आधि आपण त्याला 'प्रतीक' म्हणजे काय? त्यांचे प्रकार किती? इथपासूंन शिकवाला सुरवात करावे लागेल/लागते. प्रतीकांचा आपआपसातील संबंध कसा जोडायचा? वा कसा जोडायचा नाही? ह्याचे 'तार्किक गणित'हे देखील शिकवावे लागेल/लागते.

संस्कृत भाशेचे महत्व - 'त्या भाशेतून त्या भाशेच्या व्याकरणाचा केलेला सखोल विचार व त्याची पद्धतशीर मांडणी' ह्यामुळेच जगविख्यात आहे.
परंतु जे चिंतन संस्कृतामध्ये संस्कृतच्या व्याकरणातून व्यक्त झालेले आहे ते खूप प्राचिन आहे. संस्कृतचे व्याकरण व त्यावरील चिंतने शब्दबद्ध झाल्यापासून बराच काळ लोटलेला आहे. आतापर्यंत विचार करण्यामध्ये व तो व्यक्त करण्यामध्ये बरेच बदल झालेले आहेत.

इंग्रजी ही (आतापर्यँतची) जग जिंकणारी भाशा आहे. इंग्रजीचे व्याकरण व त्या व्याकरणाची पद्धत वेगळी आहे, भारतीयांसाठी ती अगदीच हटके होती/ अजूनही आहे.
इंग्रजांकडूनच इंग्रजी अमेरीकेत पोहचलेली. संगणकाच्या प्राथमिक टप्प्यात ह्या अमेरीकेतच संगणक ह्या विशयावर बरेच संशोधन होत होते.

संगणकाच्या शोधाचा मुख्य उद्देश संशोधकांसाठी 'उत्तम प्रकारे, जलदपणे गणित सोडवणारे'असे एक यंत्र एवढाच होता. परंतु अमेरीकेच्या सरकारने ह्या संगणकयंत्राच्या शोध प्रकल्पाचा 'सुरक्शे'(डिफेंस) च्या द्र्श्टीकोनातून विचार करतच त्यास वित्तिय पुरवठा केला. परंतु नियतीच्या ईच्छेमुळे संगणकयंत्र शोध प्रकल्पाच्या दिशेला वेगळीच कलाटणी मिळत या यंत्राचा वापर लिखाणासाठी म्हणून होवू लागला. संगणक हे यंत्र युनिकोड डाटा एनकोडींग तंत्र येण्याअगोदरपर्यँत 'गणिती पद्धतीने शिकलेल्या एका यंत्राचा 'एका भाशेसाठी' वापर' असाच होत होता.
युनिकोडनंतरही मात्र अजून ही (डाटा एनकोडींग च्या स्तरावर) 'गणिती पद्धतीने शिकलेल्या एका यंत्राचा 'अनेक भाशांसाठी' वापर' असाच होत आहे.

जेव्हा 'संगणक' 'संभाशक' होईल म्हणजे '' भाशेचे तत्वद्न्यान, ध्वनीशास्त्र, तर्कशास्त्र, गणित हे सर्व विशय शिकलेल्या एका यंत्राचा 'एका वा अनेक भाशांसाठी' वापर' होईल तेंव्हा वरील चर्चा म्हणजे 'संस्कृत भाशा संगणकाच्या/ संभाशकाच्या वापरासाठी योग्य' संपुश्टात येईल.

संस्कृत विषयी मला कल्पना नाही, पण मराठीवर आम्ही काम करत आहोत.

हा प्रतिसाद आवांतर वाटल्यास संपादित केला तरी चालेल.

संस्कृत विषयी मला कल्पना नाही, पण मराठीवर आम्ही काम करत आहोत.
माहितीचा वापर सामान्य मराठी भाषिक माणसाला करता यावा म्हणून मी व माझा मित्र सुमेध या संदर्भात SQL वर काम करत आहोत.

आम्ही एक सुरुवात केली आहे. माहिती ही बहुदा विदागार किंवा डेटाबेस स्वरूपात असल्याने, मराठी विदा मराठीतच एस क्यु एल द्वारे शोधता येईल अशी प्रणाली विकसित केली आहे.

म्हणजे समजा विद्यार्थी शोधण्यासाठी एक एस क्यु एल विधान लिहिले जाईल जसे select * from students हे बर्‍यापैकी तसेच निवडा * यामधून विद्यार्थी असे लिहिता येते आहे.
यावर 'आपण नेहमी बोलतो तशा मराठी मधूनच हे लिहिता यावे यासाठी सुमेध प्रयत्नशील आहे. म्हणजे ते असे होऊ शकेल "* यामधून विद्यार्थी निवडा"

या प्रणालीचा उपयोग जेथे प्रामुख्याने काम मराठीतून होते तेथे उत्तम प्रकारे होऊ शकेल.

  • जसे पोलिस स्टेशन - बहुदा मराठीचा वापर होतो - व्यक्तीच्या नावाचा विदा मध्ये शोध मराठीत घेता येईल.
  • मराठी वाचनालये - मराठी पुस्तके सहजतेने मराठीतून शोधता येतील.

इतरही अनेक उपयोग होऊ शकतील... मात्र सध्या याचे स्वरूप 'शैक्षणिक' इतकेच मर्यादीत आहे, याची मला कल्पना आहे.
तसेच हा प्रकल्प म्हणजे बॅकएंड आहे. फ्रंट एंड बनवणे तसे सोपे आहे असे आम्ही मानतो आहोत.

यात इतर भाषाही यात अंतर्भूत करणे शक्य आहे, किंवा त्यावर कामही करत आहोत पण वेळे अभावी ते रखडले आहे.

रस असल्यास http://www.vibhasha.com/index.html येथे भेट देऊन पाहा. तुम्हालाही मराठी मधून विधान लिहिता येईल.
या प्रयोगात तुम्ही एका SQL सर्व्हरला मराठी मध्ये एक छोटी आज्ञा द्याल आणि ती आज्ञा वापरून तुम्ही मराठी मध्ये उत्तर मिळवाल.

हा विभाषा प्रकल्प पूर्णपणे विकी किंवा फायरफॉक्स धर्तीवर लोकांचा लोकांसाठी करण्याचा प्रयत्न आहे.

तुम्हाला एखाद्या शाळेत प्रकल्प 'एस क्यु एल शिकवण्यासाठी' वापरायचा असेल तर स्वागत आहे!
आम्ही सर्व तांत्रीक मदत करू!

आपल्याला काही सूचना असतील तर अवश्य कळवा.

आमचा प्रकल्प संपर्क - vidabhasha@gmail.com

सध्या तेथे कॉपीराईटची नोटीस आहे, कारण साईट उभी केल्यावर लगेच हॅक करण्याचा प्रयत्न झाला होता. मग कॉशन म्हणून मी जे सुचेल ते टाकून ठेवले आहे! :) या प्रकल्पावर आम्ही एका कालखंडात जोरदार काम केले. पण सध्या वैयक्तीक आजारपणे व जॉब यातून वेळ मिळेनासा झाल्याने रखडले आहे. आपला उत्साही उपक्रमी ऋषिकेशने यात रस घेतला आहे, पण मीच त्याच्या संपर्कात कमी पडलो आहे. या प्रकल्पात पोटँशियल खुप मोठे आहे. यावर स्वतंत्र लेख लिहायचा आहे, पण जमेल तसे...

-निनाद

प्रकल्पासाठी खूप शुभेच्छा.

तुम्हाला ह्या प्रकल्पासाठी खूप शुभेच्छा.

ठण्ठणपाळ ह्यांची प्रतिक्रिया ह्यावर काय असेल ह्याचा विचार करतोय. त्यांच्या दृष्टीने आयटीवाले ....

ठण्ठणपाळ ह्यांची प्रतिक्रिया ह्यावर काय असेल ह्याचा विचार करतोय.

http://www.vibhasha.com/index.htm या साईट ला भेट दिली .या पेक्षा जी मेल वर युनिकोड च्या साह्याने भारतीय हिंदी संस्कृत पासून उर्दू, दक्षिण भारतीय अश्या १९ भाषा चांगल्या प्रकारे टाईप करता येतात.

thanthanpal.blogspot.com

हेतु

गल्लत होते आहे.

'मराठी टायपींग' या प्रयोगाचा आणि स्थळाचा हेतु नाही!

येथे गमभन वापरता आले असते, परंतु एस क्यु एल ची विधाने लिहितांना बॅकस्पेसने परत जाता येणे महत्त्वाचे ठरले. म्हणून अन्य सोय वापरली आहे.
गमभनचे जुने वर्जन कदाचित वापरता येईल. जी मेलची सुवीधा वापरून पाहिली नाही, पण त्यावर सध्या वेळ घालवण्याची तयारी नाही.

सध्या या साधनाचा रोजच्या व्यवहारात वापर करण्यासाठी 'पॅकेज स्वरूप कसे आणता येईल' विषयी मंथन सुरु आहे.

-निनाद

छानच

याचा वेगळा लेख बनवा :)






+१

सहमत आहे.
जितके वर्णन आहे त्यावरून फायदा समजला नाही.

* जसे पोलिस स्टेशन - बहुदा मराठीचा वापर होतो - व्यक्तीच्या नावाचा विदा मध्ये शोध मराठीत घेता येईल.
* मराठी वाचनालये - मराठी पुस्तके सहजतेने मराठीतून शोधता येतील.

या दोन्ही उदाहरणांमध्ये, थेट विदागाराशी वापरकर्त्यांचा संबंध येत नाही/येऊ नये, अन्यथा 'अपघात' होण्याची शक्यता वाढते. दर्शनी मजकुराला स्थानिक (लोकलाइज्ड) करणे अधिक सोपे ठरेल.

धनंजय यांनी म्हटल्याप्रमाणेच, यास मराठी म्हणता येणार नाही. हे लिप्यांतर(ट्रान्स्क्रिप्शन) आणि शब्दांचे भाषांतर आहे. पर्यायी शब्द वापरणे आणि भाषांतर यांत फरक असतो.

मला वाटते की रोमन कळफलक वापरणार्‍यांसाठी देवनागरी ही कायमच दुय्यम लिपी राहील.

A deputation that included an American Senator was proudly led to a demonstration of a translation program. The Senator suggested a phrase to be translated, "Out of sight, out of mind". The machine printed Chinese characters and these were then entered into the machine to be translated back to English. The visitors were all astonished when the machine printed the phrase "invisible idiot" on the paper. -- कार्ल सगान (ड्रॅगन्स ऑफ ईडन)
क्ष्

सहमत पण

मला वाटते की रोमन कळफलक वापरणार्‍यांसाठी देवनागरी ही कायमच दुय्यम लिपी राहील.

सहमत. पण ज्यांना रोमन कळते तरिसुद्धा मराठीमध्ये तंत्रज्ञान वापरायचे आहे त्यांच्यासाठी विभाषा एक चांगला पर्याय आहे. किंबहुना विभाषामुळे एक नवे दालन उघडेल असे वाटते. त्यासाठीच ज्यांना इंग्रजीपेक्षा मराठी जास्त सोपी वाटते त्यांच्यासाठी कळफलक देवनागरी असला तरी भाषा महत्वाची आहे. मग ते लिप्यांतर असले तरीही. इंग्रजीचा दुराग्रह न बाळगता मराठीला नव्या पातळीवर नेण्यासाठी हे यशस्वी प्रयोग नक्कीच स्तुत्य आहेत.






हो

थेट विदागाराशी वापरकर्त्यांचा संबंध येत नाही/येऊ नये, अन्यथा 'अपघात' होण्याची शक्यता वाढते.

हो, सहमत आहे.
अजून स्वरूप प्रायोगिक आहे, म्हणूनच शैक्षणिक उपयोग गृहीत धरला आहे अन्य शक्यता आहेत. अजून काम बाकी आहे.

-निनाद

+१ ... मात्र

मला वाटते की रोमन कळफलक वापरणार्‍यांसाठी देवनागरी ही कायमच दुय्यम लिपी राहील

+१
मात्र लिपी दुय्यम वाटली तरी मराठी ही भाषा दुय्यम वाटणार नाही. मराठीत समजणे एखाद्याला सोपे जात असेल तर तो पर्याय येथे उपलब्ध आहे. अर्थातच हा पर्याय आहे सक्ती नव्हे

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

धन्यवाद

धनंजय, निनाद व इतरांच्या अभ्यासपूर्ण प्रतिसादांबद्दल धन्यवाद.

मूळ वाक्य वाचल्यावर मनात आलेला अर्थ हा धनंजय यांनी अर्थ१ म्हणून जो सांगितला तसाच काहीसा होता. म्हणजे फोर्ट्रान, कोबोल, सी++ वगैरे कृत्रिम भाषा निर्माण करून प्रोग्रॅमिंग करण्या ऐवजी "सरळ संस्कृत भाषा वापरून प्रोग्रॅम लिहिणे" असाच आला.

भाषांचे संगणकीकरण करायचे झाल्यास संस्कृतचे करणे सगळ्यात(?) सोपे जाईल कारण त्या दिशेने कराव्या लागणार्‍या कामापैकी बरेच काम आधीच पाणिनी वगैरेंनी केले आहे असा अर्थच घेणे योग्य वाटते. पण संस्कृत ही रोजवापरातली भाषा नसल्याने तिचे संगणकीकरण करण्याची गरज कदाचित भासणार नाही.

निनाद यांच्या अत्यंत उपयुक्त प्रकल्पासाठी सदिच्छा.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

धन्यवाद...!

>>>>संस्कृत ही रोजवापरातली भाषा नसल्याने तिचे संगणकीकरण करण्याची गरज कदाचित भासणार नाही.

माहितीबद्दल आभारी.....!

-दिलीप बिरुटे

चाचणीसाठी उदाहरण म्हणून उत्तम

नैसर्गिक भाषांचे संगणकीय वर्णन करण्यात बर्‍याच लोकांना रस वाटतो. (नॅचरल लँगवेज प्रोसेसिंग.)

एका भाषेच्या व्याकरणाचे संगणकीकरण झाले, तर तो अनुभव दुसर्‍या कुठल्या भाषेसाठी सुद्धा वापरता येईल, अशी एक विचारधारा पटण्यासारखी आहे.

(दृष्टांतासाठी : एखादी संगणकीय क्रमिक प्रक्रिया [ऍल्गोरिदम] पद्धत तपासण्यासाठी "ट्रॅव्हलिंग सेल्समन" समस्या पुष्कळदा वापरतात. अंततोगत्वा उपयोग वेगळेच कुठले गणित सोडवण्यासाठी करायचा असतो. मात्र "ट्रॅव्हलिंग सेल्समन" बद्दल समस्येची चौकट नेटकी आहे, सुस्पष्ट आहे, आणि सर्वांना उपलब्ध आहे. वेगवेगळ्या संशोधकांनी समस्येसाठी सुचवलेली समाधाने तुलनात्मक रीत्या तपासून बघण्यासाठी उपयोगी आहे.)

इंग्रजीच्या किंवा अन्य रोजव्यवहारातल्या भाषेच्या व्याकरणाचे ऍल्गोरिद्मिक वर्णन करण्याची पायरी काही संशोधक करत आहेत, ते आहेतच. परंतु ते वर्णन पूर्ण झाले नसतानाही दुसर्‍या पायरीबद्दल संशोधन करण्यात काही संशोधकांना रस असतो. त्या लोकांसाठी संस्कृत भाषा ही चाचणीसाठी उपलब्ध आहे. म्हणून संस्कृत भाषेच्या व्याकरणाचे संगणकीकरण करणारे बरेच लोक आहेत. हे संगणकीकरण करताना काही गुंतागुंतीचे प्रश्न सुटले, तर त्या समस्या-समाधानाचा उपयोग अन्य भाषांच्या संगणकीकरणाच्या वेळेला करून घेता येईल.

चर्चा

चर्चेवरून हा दुवा आठवला.

--
अनुदिनी : शब्द
http://rbk137.blogspot.com/

महासंगणक

जगातील सध्याचा सर्वात वेगवान महासंगणक नुकताच चीनने तयार केला असल्याची बातमी वाचली.

--
अनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स
http://rbk137.blogspot.com/

पर्ल् व लॅटीन

संस्कृत व संगणक या विषयी लिहिण्यासारखे अजुन थोडे आहे, पण ते नंतर. सध्या हा थोडा दुरुन संबंधीत असलेला दुवा पहा.

गमतीदार विचार आणि प्रयोग

गमतीदार विचार आणि निबंध आहे. हल्लीच्या प्रणालींमध्ये (प्रोग्रॅमांमध्ये) जे चल अवयव (व्हेरिएबले किंवा आर्ग्युमेंटे) असतात, ते अवयव विवक्षित क्रमाने यावे लागतात, आणि क्रम-स्थानावर अवलंबून त्या चलांचा उपयोग होतो.

(साध्या गणिततल्या लिपीचे/व्याकरणाचे उदाहरण घेऊया :
फलन "क्ष^य" मध्ये चल अवयव "क्ष" आणि "य" आहेत. "क्ष"चा स्वतःशी गुणाकार "य" वेळा करायचा त्यातून फलनाचे फळ मिळते.
उदाहरण : ५^७ असे आहे.
५*...*५ (७ वेळा गुणाकार करा)
मात्र आर्ग्युमेंटांचा क्रम बदलला, तर फळ वेगळे मिळते : ७^५ याचे फळ वेगळे असते.)

निबंधलेखक प्रस्ताव मांडतो, की फलन-अवयवांना प्रत्यय लावले, तर त्यांच्या क्रमाने फरक पडणार नाही. म्हणजे "^-फलनात ५-गुणित ७-दा" असे म्हटले काय, आणि "^-फलनात ७-दा ५-गुणित" असे म्हटले काय, फळ एकच मिळते.

निबंधलेखक लॅटिनमधील प्रत्यय वापरतो, हे निबंधाचे वैशिष्ट्य.

मात्र हे समजले नाही - स्थाननिष्ठ पदान्वय (पोझिशनल सिन्टॅक्स) या प्रकारात मध्ये काय दारिद्र्य आहे, की त्याचे पूरण प्रत्ययनिष्ठ पदान्वयाने (इन्फ्लेक्शनल सिन्टॅक्सने) होते?

कालगत संदर्भनिष्ठता तर वापरावी लागणारच आहे. म्हणजे फलनांचे (फंक्शनांचे) चल अवयव (आर्ग्युमेन्ट) हे नाहीतरी एकमेकांच्या थोडेफार जवळ असावेच लागणार आहेत. म्हणजे हाताशी असलेल्या फलनाचे चल अवयव प्रणालीमध्ये एकमेकांच्या जवळ असतील, आणि वेगळ्याच कुठल्या फलनातले चल अवयव दूर कुठेतरी (आणि त्या वेगळ्याच ठिकाणी त्यांच्या-त्यांच्या आसपास) असतील. म्हणजे क्रम महत्त्वाचा राहातोच.

प्रणाली लिहिताना प्रत्यय वापरल्यामुळे क्रम पुरता नाहिसा होत असता, तर काही फायदा होता. इथे क्रम महत्त्वाचा राहातो, आणि शिवाय प्रत्ययही आवश्यक आहेत.

(प्रत्ययांमुळे नैसर्गिक भाषांमध्ये माहिती कधीकधी दोन-दोनदा सांगितली जाते. आणि त्यामुळे अस्पष्ट बोलणे, वाक्य अर्धवट राहाणे, वगैरे प्रसंगांत माहिती तरीही पोचते. मात्र हा फायदा निबंधलेखकाने मुळीच लक्षात घेतलेला नाही. प्रत्यय न-वापरणार्‍या भाषांमध्ये माहितीचे द्वित्व वेगळ्या प्रकारे होते, पुष्कळदा संदर्भाने होते. म्हणून हाय-फिडेलिटी-रिडंडन्सीकरिता प्रत्यय लागतातच असे काही नाही.)

निबंधाचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद. छान आहे.

 
^ वर