विलक्षण साम्य

इ.स.पूर्व 484 ते 425 या कालात हीरोडोटस (Herodotus) या नावाचा एक ग्रीक इतिहासकार होऊन गेला. या इतिहासकाराने इराण मधल्या अखिमिनेद (achaemenid) राजांचा इतिहास लिहून ठेवला आहे. या काळात इराणमधेही भारताप्रमाणेच अनेक छोटी छोटी राज्ये पसरलेली होती. पर्शिया हे या छोट्या राज्यांपैकीच एक होते. या पर्शियाच्या राजघराण्यातील राजांना अखिमिनेद हे नाव, नंतरच्या एका राजाच्या नावामुळे दिले गेले आहे. इ.स.पूर्व 557-530 या कालात या पर्शियन राजघराण्यात पहिला कौरुश (Cyrus) हा राजा होऊन गेला. या राजाने आजूबाजूच्या छोट्या राजांना तर मांडलिक बनवलेच पण या शिवाय त्याने भारतामधील गांधार( पाकिस्तानमधला खैबर खिंडीच्या आसपासचा भाग, आपण अफगाणिस्तानाला गांधार का म्हणतो ते मला तरी समजलेले नाही. अफगाणिस्तानचे त्या काळातले नाव बॅक्ट्रिया असे होते.) पासून ते सध्याच्या इराक मधल्या बॅबिलॉन पर्यंत आपल्या राज्याची सीमा वाढवली होती. चंद्रगुप्त मौर्य या राजाने जसे आपले साम्राज्य भारतात निर्माण केले तसेच काहिसे या पर्शियन राजाने इराणमधे केले होते. त्यामुळेच कौरुश राजाला पहिला खराखुरा सम्राट असेही संबोधले जाते.
हीरोडोटसने या पहिल्या कौरुश राजाचा इतिहास, आपल्या पुस्तकात दिलेला आहे. या कौरुश राजाच्या जन्मकथेचे, हीरोडोटसने केलेले वर्णन माझ्या नुकतेच वाचनात आले. ही दंतकथा व आपल्याकडच्या एका लोकनायकाच्या जन्माची दंतकथा यातील विलक्षण साम्य मला अतिशय रोचक वाटले. प्रथम आपण ही हीरोडोटसने सांगितलेली दंतकथा बघूया.
अस्त्यगेशAstyages) हा मेदेस (Medes) या अशाच एका छोट्या राज्याचा राजा. हे राज्य पर्शियाच्या साधारण वायव्येला होते. या अस्त्यगेश राजाला मंदाने(Mandane) या नावाची एक मुलगी होती. एका रात्री अस्त्यगेश राजाला एक स्वप्न पडले ज्यात त्याची मुलगी मंदाने हिच्या शरीरापासून प्रचंड प्रमाणात जल निर्माण होऊन त्यात त्याचे संपूर्ण राज्य वाहून गेलेले त्याने पाहिले. राजज्योतिषांनी या स्वप्नाचा अर्थ, मंदानेला जो मुलगा होईल तो तुझे राज्य हिसकावून घेणार आहे असा अस्त्यगेश राजाला सांगितला. यामुळे सचिंत होऊन त्याने मंदानेचा विवाह, कनिष्ठ दर्जाचा समजला जाणारा पर्शियाचा राजा कंबौश (Cambyses )याच्याशी लावून दिला. विवाहानंतर एका वर्षाने मंदाने गरोदर असताना, अस्त्यगेश राजाला परत एक स्वप्न पडले. या स्वप्नात त्याला मंदानेच्या गर्भाशयातून एक वेल निर्माण होऊन ती वेल अस्त्यगेशचे राज्य व सर्व एशिया खंड यावर पसरलेली दिसली. राजज्योतिषांनी या स्वप्नाचा अर्थ परत एकदा मंदानेचा मुलगा तुझे राज्य नष्ट करेल असे सांगितल्याने, अस्त्यगेश राजाने आपला एक विश्वासू सरदार सर्पगश (Harpagus) याच्यावर, मंदानेच्या होणार्‍या मुलाला जन्मताच मारून टाकण्याची जबाबदारी सोपवली. व हे करता यावे म्हणून मंदानेला माहेरी बोलावून घेतले.
काही काळाने मंदाने प्रसूत होऊन तिला मुलगा झाला. तिच्या आक्रोशाला न जुमानता सर्पगशने ते जन्मजात बालक हिसकावून घेतले व वध करण्यासमयी घालत असत ती वस्त्रे त्याच्या अंगावर चढवली. हे केल्यावर त्याचे हृदय द्रवले व त्या बालकाचा वध करणे त्याला काही जमले नाही. त्यामुळे हे काम त्याने शाही पागेचा अधिकारी मित्रदत (Mitradates) याच्याकडे सोपवले. मित्रदत ते बालक घेऊन आपल्या घरी गेला. योगायोगाने त्या वेळी मित्रदतची बायको क्यौनो(Kyno) ही गर्भवती होती. मित्रदत घरी पोचला तेंव्हा क्यौनो नुकतीच प्रसूत झाली होती व तिचे बालक मृत स्थितीत जन्मले होते. अतिशय दुखा:त असलेल्या क्यौनोने मित्रदतला मंदानेचे बालक आपल्याला देऊन मृत बालकाचा देह अस्त्यगेश राजाला परत देण्याची विनंती केली व मित्रदतने ती मान्य करून त्याप्रमाणे मृत बालकाचा देह राजाला परत केला. अस्त्यगेश राजा काळजीमुक्त झाला खरा परंतु त्याचा नातू मित्रदतच्या घरी वाढतो आहे याची त्याला कल्पना सुद्धा नव्हती. मित्रदतने मंदानेच्या मुलाचे नाव कौरुश असे ठेवले.
12 / 15 वर्षानी कौरूश मोठा झाल्यावर खरी गोष्ट अस्त्यगेश राजाला समजली व आपल्या आज्ञेचे पालन न केल्याबद्दल त्याने सर्पगशच्या त्याच वयाच्या मुलालाच मारून टाकले व कौरुशला त्याच्या खर्‍या आई-वडीलांकडे पाठवून दिले. कौरुश पर्शियाच्या गादीवर आल्यानंतर अस्त्यगेश राजाचा सूड घेण्याच्या इर्षेने पेटलेल्या सर्पगशच्या मदतीने त्याने अस्त्यगेश राजालाच पदच्युत केले.

या गोष्टीत अस्त्यगेशच्या ऐवजी कंस, मंदानेच्या ऐवजी देवकी, मुलीच्या ऐवजी बहिण, मित्रदतच्या ऐवजी नंद आणि क्यौनो च्या ऐवजी यशोदा ही नावे घातली आणि इतर काही बारीक सारीक बदल केले तर ही गोष्ट भारतीय होईल की नाही? आता ही दंतकथा भारतातून पर्शिया मधे गेली का पर्शिया मधून भारतात आली का दुसर्‍याच कोणत्या तरी दंतकथेवरून दोन्ही कथा रचल्या गेल्या हे सांगणे अशक्यप्रायच असल्याने दोन्ही गोष्टींमधले विलक्षण साम्य मोठे रोचक आहे एवढेच आपण म्हणू शकतो.
कौरुश व त्याच्या वंशातील इतर अखिमिनेद राजे हे अग्नीपूजक होते. अव्हेस्ता हा त्यांचा धर्मग्रंथ व झरत्रुष्ट हा त्यांचा प्रेषित होता व असुर माझदा या देवाची ते भक्ती करत असत. अव्हेस्ता आणि ऋग्वेद याच्यातील साम्यस्थळे बहुतेकांना ज्ञात आहेतच. त्यामुळेच या दंतकथेचे कृष्ण जन्माच्या दंतकथेशी असलेले विलक्षण साम्य मला खूप रोचक वाटले एवढे मात्र खरे.

लेखनविषय: दुवे:

Comments

:-)

इतिहासकार व कथालेखक यात एक धूसर रेषा आहे असे मला वाटते. मधे स्टोरीज फ्रॉम कुराण असे एक बालकथांचे पुस्तक वाचत असताना त्यातील बर्‍याच गोष्टी अलेक्झांडर, नोहा (ज्याने बोटीतुन विविध प्राणी नेउन महाप्रलयात जीवसृष्टी वाचवली) कथा पण अरेबीक नावाच्या व्यक्तीच्या नावे होत्या.

समांतर कथा

मध्यंतरी एक झाइटगीस्ट नावाचा सिनेमा अर्धा पाहिला. त्यात सगळ्या धर्मांमधली मायथॉलॉजी सिमिलर आहे असे प्रतिपादन आहे. त्याची उदाहरणे दिली आहेत. उदा कुमारीमाता, तीन तार्‍यांनी दिशा दाखवणे, मृत्यू आणि तीन दिवसांनी पुनरुत्थान ही कथा कोणत्या वेगवेगळ्या संस्कृतीतली आहे असे सांगितले होते.

त्यात समांतर कथा म्हणून कृष्णाची कथा आहे असे म्हटले होते. वर सांगितलेले कुठलेच कथावैशिष्ट्य कृष्णाच्या कथेत नाही. तेव्हा सगळीकडच्या कथा समान असे कुणी सांगू लागला तर लगेच विश्वास ठेवू नये.

सर्व अब्राहमिक धर्मातल्या कथा समान असणार यात शंका नाही. पण त्या सहसा त्याच व्यक्तींच्या असतात.

[इथे सावरकरांची आठवण येते. त्यांच्या साधुसंतांचे बोलपट कसे पहावे या निबंधात अशीच समांतर कथांची उदाहरणे दिली आहेत. नानकांना मशिदीत जाऊ दिले नाही म्हणून नानक मशिदीच्या पाठीशी गेले असता मशीद फिरून मशिदिचे दार नानकांच्या समोर आल्याची कथा आहे. अगदी तशीच कथा नामदेवांच्याही चरित्रात सांगितली आहे.]

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

हम्म

झाइटगाईस्टवाल्यांविषयी कोणीतरी लिहिले होते हे लोक वाईट आहेत कारण ते महत्वाच्या सत्यांसोबतच गंभीर असत्ये कुशलपणे घुसवीत आहेत. झाइटगाईस्ट१ चित्रपटाचा पहिला भागच चांगला आहे. झाइटगाईस्ट२ हा पूर्ण चित्रपट तर कल्टचाच प्रकार वाटतो.
याच विषयावर, द गॉड हू वॉजंट देअर हा माहितीपट मात्र पूर्णपणे चांगला आहे.
डॉगॉन लोकांच्या एका 'ज्ञाना'चा उगमही रोचक आहे.
इलियड आणि रामायण यांतही साम्ये आहेत ना?

परवा

परवा तिकडे दिलेला दुवा परत देतो आहे. या पुस्तकात अशी शेकडो उदाहरणे आहेत. या सर्व उदाहरणांच्या मुळाशी एकच थीम सापडते. यांचा संबंध माणसाच्या आदिम संवेदना, मानसशास्त्र यांच्याशी घातला आहे. वाचनीय पुस्तक.

--
रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्
वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिमिरे इल्लै

महाभारताची पार्श्वभूमी : पश्चिम आशिया

अ. ज. करंदीकर यांचे `महाभारताची पार्श्वभूमी : पश्चिम आशिया` हे (अतिदुर्मिळ!) पुस्तक जिज्ञासूंनी अवश्य वाचावे.
मजा येईल !

गब्बरभी बसंतीको उठा ले गया था (ठणूश्टाईल)

माणसाच्या आदिम संवेदना/ भावना एकच असतात याचीच प्रचीती अनेक पौराणिक कथांतून येते. फक्त नावे, स्थळे आणि इतर काही फेरबदल होऊन मूळ गाभा तसाच राहतो. मग तो कुरुश असो, कृष्ण असो, क्रिस्त असो, मोझेस असो किंवा हर्क्युलिस.

जेव्हा एखादी व्यक्ती सम्राट होते तेव्हा तिला सर्वप्रथम भीती वाटते ती ते पद हिसकावले जाण्याची. असे होऊ नये म्हणून तो आपल्या मार्गातील इतर सर्व प्रबळ काटे दूर करतो. म्हणून भीती नाहीशी होते का तर तसे होत नाही; भीती वेगळ्या कोंबातून फुटते. प्रबळ शत्रू तर संपले पण असा कोणी शत्रू निर्माण होईल की ज्याची कल्पनाही करू शकत नाही. आपल्याच जिव्हाळ्याच्या एखाद्या दुर्बळ बाळाचा जन्म होतो. त्याच्याकडे दैवी शक्ती असतात. तो आपला विनाश करेल ही कल्पना स्वप्नावाटे, आकाशवाणी, भविष्यवेत्त्याद्वारे, चेटक्यांद्वारे वगैरे राजापर्यंत पोहोचते आणि त्याला आपले राज्य राखण्याचा एक हेतू (मकसद ;-)) मिळतो आणि कथेचा जन्म होतो. यानंतर सम्राट (राजपुत्र/ प्रधान/ राणी) अधिक क्रूर होतो. प्रजेवर अत्याचार करतो. लोकांना तारणहाराची गरज भासते. यापेक्षा थोड्याशा वेगळ्या कथेत दुर्बळ घटकांपैकी एखादे मूल राजाच्याच अधिपत्याखाली किंवा कुटुंबात वाढवले जाते. त्याला न्यायव्यवस्था, राज्यकारभाराचे बाळकडू मिळते आणि पुढे तोच राज्यसत्ता उलथवतो.

सर्व कथांचे फॉर्म्युले इथून तिथून सारखेच असतात. त्यांच्यामागची प्रेरणाही सारखीच असते. इलियडमध्ये फक्त अकिलिसची टाच भेद्य असते, महाभारतात दुर्योधनाची मांडी. शोलेतही गब्बर बसंतीला पळवून नेतो आणि जय-विरू अगदी राम-लक्ष्मणासारखे तिची सुटका करण्यास जातात. हल्ली चित्रपटाच्या शेवटी एअरपोर्टवर धावाधावी करण्याची हॉलिवूडमध्येही साथ आली आहे. (संदर्भः शी'ज आउट ऑफ माय लीग) नेमका कोणत्या बॉलिवूड चित्रपटाचा शेवट ढापला ते जाणकार शोधून काढतीलच. ;-)

गांधार म्हणजे अफगाणिस्तान असे कोणी म्हणत असेल तर त्यात चूक नाही. गांधार अफगाणिस्तानच्या पूर्व सीमेत पोहोचत होता असे मला वाटते पण गांधार = अफगाणिस्तान नव्हे हेही खरे. बॅक्ट्रिया हे राज्यही अफगाणिस्तान नव्हे. अफगाणिस्तानाचा उत्तर भाग, उझबेकिस्तान, तजाकिस्तान आणि किर्गिस्तान या मध्य आशियातील देशांत बॅक्ट्रिया वसलेले होते.

बाकी, कुरुशची कथा आवडली.

अवांतर-१:

ग्रीकांना नावांचे अंत "स" या अक्षराने करण्याची सवय आहे. उदा. अलेक्झांद्रोस, ऑलिम्पियास आणि सँडोकस. याचा अर्थ प्रत्येक नावात स असेलच असे नाही. काही नावांबद्दल शंका उत्पन्न होते. अस्त्यगेश (Astyages), मेदेस (Medes) ही त्यापैकी काही.

अवांतर-२:

नेहमी शोलेचेच उदाहरण का? असा प्रश्न मागे शरदकाकांनी विचारला होता. याचे कारण रामायण महाभारताप्रमाणे बहुसंख्यांना शोलेचेच कथानक माहित असते.

अजून एक साम्य

ग्रीकांना नावांचे अंत "स" या अक्षराने करण्याची सवय आहे. उदा. अलेक्झांद्रोस, ऑलिम्पियास आणि सँडोकस.

याचा अर्थ माझे नाव ग्रीक आहे! ;)

आत्तापर्यंतचे इतर अनुभवः आडनावाच्या शेवटी एनडीइ अशी अक्षरे असल्याने मला न बघता फोनवर, काही जण ते इटालीयन उच्चाराने म्हणत तर काही जण फ्रेंच! (आणि बघणारे अरबी भाषेत बोलत. :( )

अवांतरः चंद्रशेखर

चंद्रगुप्ताला सँड्रोकोटस म्हणत म्हणजे चंद्रशेखर यांना सँड्रोशोकस् म्हणतील की काय असे वाटते. ;-)

ह. घ्या.

उपक्रमावर फारसे अवांतर प्रतिसाद देऊ नयेत म्हणून प्रायश्चित्त -

अमेरिकन साहित्यातील अतिमानवी प्रकार पाहिले (सुपरम्यानपासून इतर सर्व परग्रहवासियांपर्यंत) की आपल्याला प्रबळ दावेदार या पृथ्वीवर उरलेला नाही त्यामुळे बाहेरून/ काहीही कल्पना नसता/ अचानक आपल्यावर हल्ला होतो आणि आम्ही आमचे राज्य वाचवण्यास जीव पणाला लावतो किंवा तिकडचा एक सुपरम्यान आमचा तारणहार ठरतो असे दाखवण्याची उर्मी निर्माण झाल्याचा भास मला होतो.

या इतिहासकाराने इराण मधल्या अखिमिनेद (achaemenid) राजांचा इतिहास लिहून ठेवला आहे.

अकेमेनियन राजघराण्याला फारशीत हखमनशाह असे ओळखले जाते असे वाटते.

ग्रीक् इतिहासकाराने दिलेली नावे

या गोष्टीतल्या व्यक्तीरेखांच्या नावांच्या देवनागरीमधल्या उच्चाराची संपूर्ण जबाबदारी माझी. ग्रीक इतिहासकारांनी मूळ पर्शियन नावांची जेवढी तोडफोड केली आहे तेवढीच मी ही केली आहे. मी देवनागरीमधे माझ्या कानाला गोड लागतील अशी नावे दिली आहेत. ती चुकीची असण्याचीच शक्यता आहे. सायरस या नावाचा उच्चार कुरुश असाही मला एके ठिकाणी सापडला मला कुरुश पेक्षा कौरुश जास्त गोड वाटले म्हणून ते नाव दिले. ग्रीक उच्चारापेक्षा हे जास्त पर्शियन असावे असे मला तरी वाटले. मित्त्राडेट्स पेक्षा मित्रदत मला ऐकायला जास्त गोड वाटले.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

गांधार बॅक्ट्रिया व अफगाणिस्तान

माझ्या कडे असलेल्या संदर्भ नकाशाप्रमाणे खैबर खिंडीच्या पूर्वेला असलेल्या भागाला गांधार म्हणत असत. उत्तर अफगाणिस्तानला बॅक्ट्रिया हे नाव होते तर दक्षिण अफगाणिस्ताला एराकोशिया (Arachosia) असे नाव दिलेले आहे. चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

गांधार : कौरवांचे आजोळ

महाभारतात गांधार देशाचा उल्लेख विविध कारणांसाठी झालेला आढळून येतो.

धृतराष्ट्राची पत्नी गांधारी ही गांधार देशाची राजकन्या. गांधार आणि आर्यावर्तात रोटी-बेटी संबंध होते. गांधाराचा युवराज शकुनि हा गांधारीचा भाऊ आणि कौरवांचा मामा. गांधार देश दोन कारणांसाठी प्रसिद्ध होता. एक म्हणजे तेथील शूर व कडवे सैन्य आणि दुसरे म्हणजे उत्तम घोड्यांची पैदास. राजरथांचे आणि महावीर योद्ध्यांचे अश्व हे गांधारातून मागवले जात.

मध्ययुगीन काळात गांधार चित्रशैली आणि शिल्पकलाही प्रसिद्ध होती.

(रामायणात रामाची सावत्र आई कैकेयी ही केकय देशाची राजकन्या होती. केकय देश हा भरताचे आजोळ. हा देश म्हणजे गांधार होता, की जवळचा आणखी एखादा प्रदेश होता, हे कृपया कुणी सांगेल का? कैकेयी ही अश्वविद्यानिपुण, युद्धात भाग घेणारी होती. गांधार स्त्रियांचे तेही एक वैशिष्ट्य होते.)

गांधार आणि केकेय

गांधार आणि केकेय हे शेजारी राज्य असावेत. अर्थात हे खात्रीने सांगता येणार नाही कारण यासाठी मी 'चाणक्य' या मालिकेचा संदर्भ घेतला आहे.

गांधार, केकय आणि मद्र

केकय देश हा भरताचे आजोळ. हा देश म्हणजे गांधार होता, की जवळचा आणखी एखादा प्रदेश होता, हे कृपया कुणी सांगेल का?

केकय, मद्र आणि गांधार ही भारतवर्षाच्या वायव्येकडील राज्ये होती. पैकी केकय आणि मद्र ही राज्ये आताच्या पूर्व-पश्चिम पंजाब आणि सिंध दरम्यान वसलेली असून गांधार त्यांच्याही पश्चिमेला किंवा वायव्येला होते.

अधिक माहितीसाठी येथील नकाशे पाहावेत.

धन्यवाद स्मिता १ व प्रियाली...

स्मिता १ व प्रियाली धन्यवाद.
आपल्या माहितीमुळे संदर्भांची संगती लागली.

चांगली माहिती

प्रतिक्रियाही माहितीपूर्ण आहेत.

बॅक्ट्रियाबद्दल माझीही अशीच माहिती आहे. बॅक्ट्रियातील दोन कुबडांचा उंट प्रसिद्ध असावा. http://en.wikipedia.org/wiki/Bactrian_Camel

गमतीदार कथा

कथा वाचताना गंमत वाटली. धन्यवाद.

मस्त

कथा गमतीदार आहेच, शिवाय कृष्णाच्या कथेबरोबरचं साधर्म्य इतके ठसठशीत आहे की लेखातील शेवटच्या परिच्छेदाची गरज न भासावी.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

त्यात काय विशेष?

कथा रचताना फारच मर्यादित सामग्री असते.

राजा, त्याच्या राज्याला धोका, तो धोका स्वकीयांकडूनच होणं, त्या धोक्याची राजाला पूर्वकल्पना असणं, आणि शेवटी त्याच्या प्रयत्नांनंतरही तो धोका सत्य ठरणं.
हा मूलभूत ढाचा ठेवून जर शेकडो कथा लिहिल्या गेल्या तर कुठच्यातरी दोन कथांमध्ये अभूतपूर्व वाटणारं साम्य असणारच. याला समांतर उदाहरण म्हणजे तीस लोकांचा समूह घेतला तर त्यांच्यात किमान दोघांचा वाढदिवस एकाच तारखेला असण्याची शक्यता १/२ असते.

मग त्याच ढंगाने जाणाऱ्या दोन कथांमध्ये तीनचार साधर्म्य दिसली तर त्यात एवढं काय विशेष? हे स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी लेखकाची आहे.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

लेखाचा उद्देश

रस्त्याने जाताना एखाद्या अनोळखी व्यक्तीची ढब, चाल किंवा चेहरा आपल्या एखाद्या परिचित व्यक्तीसारखा दिसतो, त्यावेळी या दोन्ही व्यक्तींमधे असलेल्या साम्याबद्दल आपण आश्चर्य व्यक्त करतो की नाही? मी राजेशघासकडबी यांना प्रत्यक्ष बघितलेले नाही, पण समजा बघितले आणि उद्या मला एखादी त्यांच्यासारखीच दिसणारी व्यक्ती दिसली तर मी म्हणीनच की हा माणूस राजेशघासकडबी यांच्यासारखा दिसतो आहे. यात संख्याशास्त्राच्या दृष्टीने महत्वाचे वगैरे काही नाही किंवा काही सिद्ध करण्याचा उद्देशही नाही. प्रत्येक गोष्टीतून काहीतरी सिद्ध करण्याची आवश्यकता असतेच असे नाही. दोन गोष्टीतील साधर्म्य दाखवल्याने विशेष काही बिघडते असे मला वाटत नाही. श्री. राजेशघासकडबी यांना जर माझ्या या वायफळ उद्योगाने मानसिक किंवा बौद्धिक क्लेश झाले असले तर त्याबद्दल मी त्यांची क्षमा मागतो.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

साम्यं, नाती, यदृच्छा

नाही, नाही, साधर्म्य दाखवल्याने मानसिक, बौद्धिक क्लेष वगैरे काही झाले नाहीत. त्यामुळे क्षमेचा प्रश्नच येत नाही.

अतर्क्य वाटणारं साम्य दोन गोष्टींमध्ये दिसून येणं यामागे खरोखरच काही कारणपरंपरा असू शकते (उदाहरणार्थ - गोफण फिरवल्यावर गोल फिरणारा दगड व सूर्याभोवती फिरणारी पृथ्वी). अशा साम्यामधून काही महत्त्वाचे शोध लागू शकतात. किंवा काही साम्यं फसवी असू शकतात (पॅनकेकवर उमटलेली जीझसची आकृती - कोट्यवधी पॅनकेक भाजले गेले तर कुठेतरी जीझसच्या आकृतीसदृश डाग पडणारच). एखादं साम्य या दोनपैकी कुठच्या जातीचं आहे हे तपासून पाहाणं आवश्यक असतं. मूळ लेखातच दंतकथा एका संस्कृतीतून दुसरीकडे गेल्याची शक्यता उद्धृत केली आहे. त्यामुळे मी दुसरी, निरर्थक (योगायोगाने उत्पन्न झालेली) साम्याची शक्यता अधोरेखित केली इतकंच.

आपला उद्योग वायफळ असल्याचं बिलकुल म्हणायचं नव्हतं. जर मुळात साम्यं शोधली नाहीत तर ती समान तत्त्वाने उद्भवलेली आहेत की यदृच्छेने आली आहेत हे तपासून तरी कसं बघणार.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

प्रश्न

जर मुळात साम्यं शोधली नाहीत तर ती समान तत्त्वाने उद्भवलेली आहेत की यदृच्छेने आली आहेत हे तपासून तरी कसं बघणार.

हा प्रश्न भाकिते ज्योतिषातील ग्रहयोगाने/अंतस्फुर्तीने खरी आली कि तर्काने हे कसे तपासुन पहाणार असा आम्हाला ही पडतो.
प्रकाश घाटपांडे

हजार टक्के सहमत !

प्रत्येक गोष्टीतून काहीतरी सिद्ध करण्याची आवश्यकता असतेच असे नाही. दोन गोष्टीतील साधर्म्य दाखवल्याने विशेष काही बिघडते असे मला वाटत नाही.

>>> हजार टक्के सहमत !

१) प्रत्येक गोष्टीतून काहीतरी सिद्ध करण्याची (किंवा सिद्ध व्हावे, अशी अपेक्षा बाळगण्याची) खरोखरच काही आवश्यकता नसते. वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या (किंवा न घडताही केवळ प्रचलित असलेल्या) कथांमधील साम्य वाचून कुणीही आश्चर्यचकित व्हावे...आणि वाटलेले आश्चर्य इतरांनाही वाटण्यात (आणि वाटू देण्यातही !) एक वेगळाच आनंद असतो. तोच आनंद तुम्ही
उपक्रम-सदस्यांबरोबर वाटून घेतलेला आहे. ही कथा वाचून मी तरी आश्चर्यानंदित झालो !!! बाकीच्यांचे ते बाकीचेच जाणोत.

२) दोन गोष्टींमधील साधर्म्य दाखविल्याने विशेष काही बिघडत नाही, हेही अगदी खरे. उलट, त्या साधर्म्याचा आनंद लुटता येतो. मजा घेता येते. झालंच तर, ज्या वाचकांमध्ये संशोधनवृत्ती असते, त्यांच्या विचारांना चालनाही मिळते.

हा अतिशय वेगळा धागा तुम्ही इथे दिलात, त्याबद्दल तुमचे अभिनंदन आणि मनापासून आभारही !

लेख आवडला.

फार माहितीपूर्ण लेख आहे. आवडलाच. एक शंका! कृष्णाची व आपण सांगीतलीत ती, या दोन्ही गोष्टी काल्पनिक असण्याची शक्यता आहे काय? की कंस - कृष्ण यांच्या कथेला (व आपण वाचलेल्या कथेला) दुजोरा देणारे काही पुरावे आहेत? हे केवळ कुतुहल आहे.

हे विचारण्याचे कारण 'कृष्ण' नावाच्या एका पुस्तकात स्वतः कृष्णच म्हणताना लिहीले आहे की:

"कालियाला मी मारलेच नाही, लोक उगाचच अंधश्रद्धेने वागतात."

अर्थात, त्याने फरक काहीच पडत नाही. कारण गीता या ग्रंथाचे महत्व वादातीत आहेच.

धन्यवाद!

उपक्रम जिंदाबाद

लोकनायक्

कृष्णाची व आपण सांगीतलीत ती, या दोन्ही गोष्टी काल्पनिक असण्याची शक्यता आहे काय? की कंस - कृष्ण यांच्या कथेला (व आपण वाचलेल्या कथेला) दुजोरा देणारे काही पुरावे आहेत?
कौरुश राजाची कथा हीरोडोटस या इतिहासकाराने या राजाच्या मृत्युनंतर दोन तीनशे वर्षानंतरच लिहिलेली असल्याने या कथेत थोडा फार तरी सत्याचा अंश असला पाहिजे असे माझे तरी मत आहे. कृष्ण कधी हो ऊन गेला? या बाबतच एकमत नाही तर त्याच्या जन्मकथेबद्दल काय लिहिणार?
कृष्ण किंवा राम हे भारतीय लोकांचे खरेखुरे लोकनायक (हीरो) आहेत. त्यामुळे ते प्रत्यक्षात हो ऊन गेले किंवा नाही? त्यांनी आयुष्य कहाणी काय होती? त्यांच्या आयुष्यात अमूक प्रसंग खरोखरच घडला का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात खरे म्हणजे काही अर्थच नाही असे मला वाटते. त्यांच्याबद्दल लेखन किंवा काव्य करणार्‍या व्यक्तीला या व्यक्तीरेखा जशा भावल्या तसे त्यांचे वर्णन ती व्यक्ती आपल्या साहित्यात करत गेली. यापैकी रामाची व्यक्तीरेखा तशी सरळ आहे. परंतु कृष्णाच्या व्यक्तीरेखेबरोबर एक प्रकारचा रोमॅंटिसिझम आहे. त्यामुळे ही व्यक्तीरेखा अनेक पद्धतीने रंगवली गेलेली आहे. हरे कृष्ण सारखा पंथ त्यामुळेच तयार झालेला आहे व कृष्णाला संपूर्ण अनोळखी अशा पाश्चात्य मनाला सुद्धा तो त्यामुळेच भावतो आहे.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

अवांतर

हुश्श्... बोसॉन् फर्मियॉन् साय(दुधावरची नाहि) यापेक्षा हि चर्चा सहनेबल वाटतेय्..

 
^ वर