प्राण्यांची बुद्धिमत्ता
प्राण्यांची बुद्धिमत्ता.
आपण अवती भोवती बर्याच प्राण्यांना पाहतो. घरातील मांजर, कुत्रा त्याच बरोबर जंगलातील हरणं, वानरं, माकडं,साप, खेकडे, बिबळ्या, पट्टेरी वाघ इत्यादी. मग मनात सहज प्रश्न येतो. या प्राण्यांना सुद्धा मनुष्यासारख्याच भावना असाव्यात काय? प्राणी कदचित आपल्या एवढ्या नसले तरी काही प्रमाणात तरी विचार करत असावेत काय?
यावरील शास्त्रीय लेखन मी वाचलेले नाही. पण प्राणी जीवनावरील मारुती चितमपल्ली, व्यंकटेश माडगुळकर आणि जिम कॉर्बेट यांचं लिखाण भरपूर वाचलं आहे.
डिस्कवरी चॅनल वरील एका कार्यक्रमात एका वन्यजीव शास्त्रज्ञाने सांगितलं होतं कि, वन्यप्राण्यांमधे बुद्धीमत्ता, विचार करण्याची क्षमता वगैरे काही नसते. असते ती त्यांची नैसर्गिक प्रवृत्ती. एखादा सिंह एखाद्या हरणामागे लपत छपत जातो. सावज झडपेच्या टप्प्यात येइपर्यंत इंचा इंचाने सरकत राहतो. आणि सावज टप्प्यात येताच त्यावर झडप घालतो. पण हे करण्यामागे त्या सावजाला आपलं अस्तित्व समजू नये हा हेतु नसतो. एखादं मेलेलं जनावर असेल तरी सिंह याच पद्धतीने त्याच्यावर झडप घालतो. प्राण्यांची वागणुक म्हणजे एक यांत्रिक प्रतिक्रियाच असते असं त्या शास्त्रज्ञाचं मत होतं. अशा परिस्थितीत असंच म्हणावं लगेल कि प्राण्यांना बुद्धी नसावी. काही वेळा असंही वाटतं कि, शिकारीतला, आणि मारला जाण्यातला क्रूर पणा कमी करण्यासाठी निर्सगानेही काही व्यवस्था केली असावी. त्यासाठी प्राण्यांमधून प्रेम, वेदना, दुख:, या भावनाच काढून टाकल्या असाव्यात. एकूणच विचार करण्याची क्षमता नाहीशी केल्यावर हे सर्व आपसूकच साधू शकेल.
पण आमचे अनुभव मात्र निराळेच आहेत!
स्वयंपाक घरात कोणीही नसताना एका कोपर्यात ठेवलेल्या भांड्यातील नेमक्या दुधावर ताव मारण्याच्या मांजराच्या प्रवृत्तीला विचार न करता केलेली नैसर्गिक प्रवृत्ती कसे म्हणावे?
कोळिणीच्या डोक्यावरील टोपलीतून अलगद मासे उचलून नेणारा कावळा पिंड शिवताना मात्र तासनतास आपल्याला तिष्ठत ठेवतो. याला त्याची नैसर्गिक प्रवृत्ती कसे म्हणावे?
काही पक्षी सुद्धा एखादा कठीण कवचाचा प्राणी खाताना तो उंचावर नेऊन खाली टाकतात जेणेकरुन त्याचं कवच फुटावं आणि आतील प्राण्याला खाता यावं.
असे भरपुर अनुभव प्रत्येकाच्या गाठीला असतील. पण चितमपल्ली, व्यंकटेश माडगूळकर आणि कॉर्बेट यांच्या अनुभवावरून तर पुरताच गोंधळ उडतो. हे अनुभव वाचल्यानंतर तर वन्य प्राणी निर्बुद्ध आहेत हा विचार कुठल्या कुठे पळून जातो!
जिम कॉर्बेट हा नावाजलेला खरखुरा शिकारी. नरभक्षक वाघांच्या शिकारी साठी रात्र रात्र जागवणारा. रुद्रप्रयागचा नरभक्षक बिबळ्या काही केल्या शिकार्यांच्या बंदुकीच्या टप्प्यात येइना. अक्षरशः नऊ वर्षं रुद्रप्रयाग परिसरात त्याने दहशत माजवली. जिमच्या भाषेत सांगायचं तर त्याने संध्याकाळ नंतर संचारबंदीच लागू केली होती. लेकरा बाळांना सहज ओढून नेणार्या बिबळ्याचा त्याचा प्रतिकार सोडाच पण मृतदेहाचा शोधही दुसर्या दिवशी सकाळीच इतर गावकर्यांबरोबर व्हायचा. दर काही दिवसांनी जवळपासच्या गावात हमखास शिकार करणारा बिबट्या जिमच्या मात्र वाटेला जात नसे. जिमलाही त्याने बरेच झुलवले. शेवटी जिमने गावकर्यांच्या वेशात शिकार करण्याचे ठरवले. आता असा प्राणी विचार करत नाही असे म्हणावे काय?
याविषयीचे चितमपल्लींचे अनुभव फारच आश्चर्यकारक आहेत! "वानरांची शेकोटी" या लेखात चितमल्लींच्या एका परिचितांचा अनुभव सांगीतला आहे. या परिचितांनी एकदा रानात वानरांचा एक कळप जंगलात काटक्यांच्या ढिगाभोवती बसलेला पाहीला. त्यांच्या सहाय्यकाने सांगितले की ती वानरांची शेकोटी आहे. दिवस थंडीचे होते. मुळातच वन्यजीव आगीला घाबरतात. शिवाय शेकोटी पेटलेली नसताना वानरांना उब कशी मिळते या प्रश्नांची उत्तरे सहकार्याला देता येईनात. पण त्याने सांगितले की या काटक्या आता पुन्हा पेटणार नाहीत. आणि तापासुन पाहता झालेही तसेच! आता वानरांच्या या कृतीमागे काहीतरी विचार असावाच की! यात कसली आली आहे नैसर्गि़क प्रवृत्ती?
हुदाळा (पाणकुत्रा, किंवा ऑटर) हा एक लहानसा दगड पोटावर घेउन पाण्यात पाठीवर तरंगत असतो. त्याच्या खाद्यापैकी ज्या वस्तु फोडाव्या लागतात त्या तो पोटवरील दगडवर आपटून खातो. दगडाचा अवजारासारखाचा उपयोग करणे ही बुद्धिमत्ताच नव्हे काय?
चितमपल्लींच्या अनुभावानुसार शाकाहारी वाटणारी हरणं सुद्धा कधी कधी मांसाहार करतात! एका हरणाने कासवाला खाताना त्यांनी पाहीलं होतं. कवचामध्ये पाय आणि डोकं लपवून बसलेल्या कासवाला बाहेर काढण्यासाठी हरणाने एक युक्ती केली. आपले पुढचे दोन्ही पाय कवचावर ठेऊन दाब दिला. त्याबरोबर आतील कासवाने डोकं बाहेर काढलं आणि हरणाने त्याला बाहेर खेचून खाल्लं.
एकदा तर चितमपल्लींनी काळ्या आणि लाल मुंग्यांची चक्क लढाई पाहीली! या लढाइत व्यवस्थित विचार करून आखलेल्या रणनीतीनुसार लाल मुंग्यांनी काळ्या मुंग्यांवर हल्ला केला. मनुष्य प्राण्याच्या युद्धात रक्ताचा आणि मृतदेहाचा सडा पडावा तसा काळ्या आणि लाल मुंग्यांच्या डोक्यांचा आणि धडांचा सडा पडला. लाल मुंग्या तावडीत सापडलेल्या काळ्या मुंग्याचं डोकं धडावेगळं करुन समाचार घेत होत्या. हे सर्व कशासाठी तर काळ्या मुंग्यांच्या वारुळातील अंड्यांसाठी! या अंड्यातील निघणार्या काळ्या मुंग्यांचा वापर लाल मुंग्या गुलाम म्हणुन करत असल्याचं चितमल्लींचं निरीक्षण आहे! आता या मुंग्यांना निर्बुद्ध कसे म्हणावे?
हे आणि इतर अनुभव तर असेच सांगतात की वन्यप्राण्यांकडे मनुष्यापेक्षा एक वेगळी शक्ती असावी!
Comments
सोनाली
सुरेख लेख. डिस्कवरी आणि एन्.जी.सी. बघून असे अधिक माहितीपूर्ण लेख यावयास हवेत असे वाटते.
येथे डॉ. पूर्णपात्र्यांच्या सोनाली या सिंहीणीचे वर्णनही यावयास हवे होते. :)
तिला दूधभातावर आणि कापून तुकडे करून दिलेल्या मांसावर वाढवले तरी शेळी दिसल्यावर तिच्यामागे दबकत जाण्याची नैसर्गिक प्रवृत्ती गेलेली दिसत नाही किंवा रोजचे अन्न देण्यास उशीर झाल्यावर आपल्या तीक्ष्ण दातांनी धातूच्या थाळीची चाळण करणे.
मांजर तसेही संपूर्ण माणसाळत नाही म्हणतात. बरेचदा पोटभर खायला मिळाल्यावरही बाहेर जाऊन पक्ष्याच्या, सरड्यांच्या, उंदरांच्या मागे दबकत जाण्याची आणि शिकार करण्याची प्रवृत्ती मांजरात दिसते.
बहुधा प्राण्यांच्या बुद्धीमत्तेवर त्यांच्यातील नैसर्गिक प्रवृत्ती वरचढ ठरत असावी असे वाटते. परंतु कुत्र्यासारखे प्राणी आपल्या मालकाचे इमानेइतबारे ऐकतात तेव्हा खरंच आश्चर्य वाटते.
एक उदा. म्हणून, माझ्या शेजारच्या कुत्र्याला माझ्या मुलीचे विशेष प्रेम आहे आणि तो घराबाहेर आला आणि त्याचवेळेस माझी मुलगी दिसली की तो मोठ्या प्रेमाने शेपटी हलवत तिच्याकडे धावतो. अर्थात, प्रत्येक वेळेस तिला त्याच्याशी खेळणे शक्य नसते. अशावेळेस जेव्हा आमचा शेजारी त्याला परत बोलावतो तेव्हा तो थोड्या नाराजीने परत जातो असे स्पष्ट दिसते (शेपटी हलवणे साफ थांबलेले असते.) पण जातो हे निश्चित.
तरीही कुत्र्यांच्या काही खास जाती जसे पिट्-बुल्स यांच्यातील नैसर्गिक हिंस्त्र प्रवृत्ती बरेचदा त्यांच्या पाळीव प्रवृत्तीपेक्षा वरचढ ठरते आणि हे कुत्रे न पाळण्याबद्दल सल्ला दिला जातो.
असो.
शाकाहारी हरणे मांसाहार करतात हे वाचून आश्चर्य वाटले. वानरांची शेकोटी, मुंग्यांची लढाईही आश्चर्यकारक.
छान
वेगळ्या विषयावरचा आणि विचार करायला प्रवृत्त करणारा लेख आहे. मागच्या महिन्याच्या नॅशनल जिओग्राफिकमध्ये एका बिबटीची* कहाणी होती. तिने एका माकडाची शिकार केली, पण माकडाचे पिल्लू तिला आई समजून बिलगले. मग ती त्याला सुरक्षित स्थळी घेउन गेली आणि कुशीत घेउन झोपली. ह्याचा व्हीडीओ बघण्यासारखा आहे. (दुव्यामध्ये अनलाइकली सरोगेटवर टिचकी मारावी.)
बरेच प्राणी बर्याच वेळा बुद्धीमत्ता दाखवतात. कोको ही गोरील्ला खुणांची भाषा बोलू शकते. कदाचित माणसातही बुद्धीमत्तेचा उगम अश्याच छोट्या छोट्या गोष्टीमधून झाला असावा. अशी एक थिअरी आहे की आपण द्विपाद बनल्यानंतर आपले हात रिकामे झाले. हातांनी आपण निरनिराळी कामे करायला लागल्यावर मेंदू अधिक कार्यक्षम बनला. मेंदूचे वजन आणि शरीराचे वजन यांचा सर्व प्राण्यांसाठी आलेख काढला तर माणसाच्या खालोखाल डॉल्फिनचा क्रमांक येतो. (हा आलेख सरळ रेषेत आहे हे अजून विशेष.) कदाचित माणसाप्रमाणेच डॉल्फिनही विकसित होण्याच्या उंबरठ्यावर असतील का?
मुंग्यामध्ये अत्यंत रिजीड अशी समाजरचना असते. राणी मुंगी, कामकरी मुंग्या, लढाउ मुंग्या इत्यादी. असे म्हटले जाते माणसाच्या खालोखाल विकसित असे सोशल स्ट्रक्चर मुंग्यांमध्ये सापडते. (चिपांझी, गोरील्ला यांच्यातही कळपात कसे वागायचे याचे बरेच कायदे असतात.) शेती मुंग्यांनी माणसाच्याही आधी सुरु केली. काही जातींच्या मुंग्या झाडांची पाने तोडतात, त्यांचे तुकडे करून बिळात ओलसर जागी ठेवतात. त्यावर येणारी बुरशी हे त्यांचे अन्न असते.
शाकाहारी हरणांचा मांसाहार वाचून नवल वाटले. वानरांची शेकोटी का पेटली नसावी कळत नाही.
*बिबट्याचे स्त्रीलिंग काय? :)
फारच छान
व्हिडिओ पाहिला, खूपच टचिंग, माकडाचे पिल्लू शिकार झालेल्या आईला सुद्धा चिकटून राहिले हा भाग जास्तच !!
धन्यवाद
चित्रफित
..व्हिडिओ पाहिला, खूपच टचिंग
अगदी असेच.
आपला लेख आवडला,हरणांचे मांसभक्षण ... ही नवी माहिती!
स्वाती
छान
वेगळ्या विषयावरचा रंजक लेख आवडला. प्राण्यांमध्ये बुद्धिमत्ता असावी, मात्र त्यांची नैसर्गिक प्रवृत्ती बुद्धिमत्तेपेक्षा वरचढ ठरत असावी असे वाटते.
काही वेळा! ;)
मात्र त्यांची नैसर्गिक प्रवृत्ती बुद्धिमत्तेपेक्षा वरचढ ठरत असावी असे वाटते.
आमच्या बाबतीतही असे काही वेळा होते! ;)
आपला,
(मनुष्यप्राणी!) तात्या.
बुद्धिमत्ता व सहजप्रेरणा
बुद्धिमत्ता व सहजप्रेरणा (इन्स्टिंक्ट) या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हातातल्या चमच्याने गुलाबजाम खाणे, दगडाने फोडून बदाम खाणे, चोचीने गोगलगाईला दगडावर आपटून फोडून खाणे ही सगळी कामे वेगवेगळ्या प्राण्यांच्या मेंदूत होतात हे खरे पण त्यातले बुद्धिमत्तेचे सूत्र समानच आहे. तसेच माणसाचे प्रेमात पडणे व पक्ष्यांचे जोड्या जमवणे या सहजप्रेरणा आहेत. कुठले काम बुद्धीने व कुठले प्रेरणेने (मला असं करावंसं वाटलं म्हणून) होते हे ठरवणे तसे अवघडच. तसे बघितले तर बुद्धी ही एकप्रकारची सहजप्रेरणाच म्हणता येईल. (सगळी शास्त्रे भौतिकशास्त्राचाच् भाग आहेत तसे.)
आफ्रिकेतल्या बिबट्यांच्या बाबतीत जेन गुडालने लिहिले आहे की ते सहसा पुरुषांवर हल्ला करीत नाहीत, लेकुरवाळ्या बाईवर करतात. शिकारी प्राण्याला कोणत्या सावजाच्या मागे जाण्याचा उपयोग होईल हे शिकावे लागते, किंवा 'जाणवावे' लागते. जर प्राणी शिकत असेल तर तो बुद्धिमान, जर आतून येत असेल तर मात्र ढ(!) असे काहीसे समजले जाते. शिकण्यासाठी मोठी स्मृती असणे आवश्यक, म्हणजे मोठा मेंदू. मेंदू हा सगळ्यात महाग अवयव आहे. आपल्या शरिराचे निम्म्याहून अधिक खाद्य या एका अवयवाला पोसण्यात खर्च होते. त्यामुळे जितक्या कमीत कमी मेंदूत काम भागेल तितके बरे अश्या नियमाने उत्क्रांती घडत जाते. त्यामुळे सगळ्या प्राण्यांना त्यांच्या भोवतालातल्या कोनाड्यात (= जगायला+ यशस्वीरित्या पुनरुत्पादनाला) जितका गरजेचा आहे तितकाच मेंदू, म्हणजे तितकीच बुद्धिमत्ता आहे.
माणसाचा मेंदू इतका मोठा का, याविषयी 'पुन्हा कधीतरी'.
आवडले
या विषयावर इथे झालेले सर्व लिखाण - मूळ लेख आणि प्रतिसाद - अतिशय आवडले. निसर्ग, प्राणीजीवन हा आवडीचा विषय असल्यामुळे असेल कदाचित.
अवांतर: डिस्कव्हरी, नॅटजिओ, ऍनिमल प्लॅनेट या माझ्या तीन व्यसनांमुळे कुटुंब त्रस्त आहे!
सन्जोप राव
छान
लेख आवडला. प्रतिसादांतूनही बरीच माहिती मिळाली. प्राण्यांमध्ये विचार करण्याची क्षमता असते असे अनुभवांवरून वाटते. बदललेल्या परिस्थितीशी/वातावरणाशी जुळवून घेणे हे अश्या विचारशक्तीमुळेच शक्य असावे. शिवाय उपजत/नैसर्गिक ज्ञानाबरोबरच आई/वडिलांच्या किंवा कळपातील इतर मोठ्या प्राण्यांच्या निरीक्षणातून लहानग्यांचे शिक्षण होत असते. आपल्या पिलांना शिकारीचे/बचावाचे शिक्षण देणार्या सिंहिणींचे आणि ध्रुवीय अस्वलांचे कार्यक्रम ऍ॰प्लॅ॰/नॅ॰जि॰ वर बरेचदा लागतात. विचारशक्ती नसेल तर अशी नवी कौशल्ये शिकणे शक्य झाले नसते असे वाटते.
लेख आवडला!
रम्या, लेख आवडला.
मला बर्याच दिवसांपासून अशाच प्रकारची माहिती वाचायची होती.
राजेंद्र,
आपल्या प्रतिसादातूनही काही माहितीपूर्ण दुवे मिळाले ,धन्यवाद!
साती.
छान
लेख आणि प्रतिसाद आवडले.
माणसाचा मेंदू इतका मोठा का, याविषयी 'पुन्हा कधीतरी'.
मृदुला,
हा लेख लवकरच लिहावा. वाचण्यास उत्सुक आहे.
-- लिखाळ.
मुंगूस
एकदा असे मठात बसलो असता एक अभूतपूर्व दृश्य पाहिलं. आभाळात उडणार्या 'मोरघारीचा ' आवाज येत होता. इतक्यात झुडपातून एक मुंगूस बाहेर पडलं. मागोमाग तीन पिलं. मोठी खेळकर होती ती. त्यांना उघड्या रानातून पुन: जंगलात प्रवेश करावयाचा होता. मुंगसाच्या आईला माहीत होतं की आभाळात त्यांचा शत्रू उडत आहे. दिसताक्षणीच मोरघारीनं त्यांच्यावर झडप घातली अस्ती. तिनं गोजिरवाण्या पिलांजवळ तोंड नेऊन काहीतरी हितगूज केलं. ते सारे रानातला रस्ता ओलांडण्याच्या तयारीत होते. तिच्या लांब शेपटीचं टोक एका पिलानं तोंडात धरलं. नंतर त्या पिलाची शेपटी दुसर्यानं. दुसर्याची तिसर्यानं. आणि क्षणातच तिथं एक अजब लांबच्या लांब जनावर रस्ता ओलांडताना दिसलं. गरुड त्या विचित्र दिसणार्या जनावराला भ्याला असावा. म्हणून त्यानं त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं असेल. रस्ता ओलांडून झुडपात जाताक्षणीच त्या लबाडांनी एकमेकांच्या शेपट्या सोडून् दिल्या. अन् पुनः नाचत बागडत ती पिलं आईबरोबर हिंडू-फिरू लागली. जंगलातील उघड्यावर वाटा ओलांडताना रानबदकं, हुदाळे आणि रानउंदीर मुंगसाप्रमाणे वागतात.
-- रानवाटा : मारुती चितमपल्ली.
सही
सही, अमेझिंग !!
रानवाटा
मारुती चितमपल्लींचं 'रानवाटा' हे एक अतिशय सुंदर पुस्तक.
संधी मिळाल्यास जरुर वाचा.
(निसर्गप्रेमी) रम्या.