मलेरिया निर्मूलनासाठी लसीकरण का शक्य नाही?

मलेरिया निर्मूलनासाठी लसीकरण का शक्य नाही?

जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार मलेरियामुळे दरवर्षी सुमारे 27 लाख लोक मृत्युमुखी पडतात. मलेरियाची लागण होणार्‍यांची संख्या 50 कोटी असून यातील बहुतेक 5 वर्षाखालील मुलं असतात. मलेरियाचा प्रभाव आफ्रिका, दक्षिण पूर्व एशिया, आणि मध्य व दक्षिण अमेरिकेत जास्त प्रमाणात जाणवतो. सर्वात जास्त मलेरियाग्रस्तांची संख्या आफ्रिकेतील ग्रामीण भागात आहे. पृथ्वीच्या पाठीवर आजपर्यंत मृत पावलेल्यांच्यामध्ये 50 टक्के मृत डासांच्या शरीरातील मलेरियास कारणीभूत ठरणा‍र्‍या परजीवीत जंतूंना (parasites) बळी पडलेले आहेत. काही काळ हा रोग आटोक्यात आला आहे असे वाटत असतानाच अलिकडे त्याची तीव्रता जास्तपणे जाणवत आहे. कुठल्याही डासनाशक औषधी फवार्‍यांना न जुमानता डासांची वंशवृद्धी होतच आहे. डासांच्या शरीराचा वापर करून मलेरियाची लागण करणार्‍या व रोग्यांचा जीव घेणार्‍या या पॅरासाइट्सवर कुठल्याही मलेरिया निरोधकांचा प्रभाव फार काळ टिकत नाही. जागतिक अरोग्य संघटना, जागतिक बँक, जगभरातील अनेक आरोग्यविषयक संशोधक संस्था, विद्यापीठ, इ.इ गेली 30-40 वर्षे प्रयत्न करूनही यश आले नाही. मिलिंडा व बिल गेट्स फौंडेशन फार मोठ्या प्रमाणात अनुदान देऊनही परिथितीत फार फरक पडला नाही.

माणूस चंद्रावर पाऊल ठेवू शकतो; मंगळ ग्रहावर शहरं वसवण्याची स्वप्नं बघतो; संपूर्ण मानव वंशाला हजारो वर्ष वेठीस धरलेल्या देवी, कॉलरा यासारख्या संसर्गजन्य रोगांचे मूळ शोधून यांचा एकही जीवाणू जगाच्या पाठीवर राहू नये याची काळजी घेतो; ट्रिपल डोससारख्या औषधांचा शोध लावून करोडो बालकांचा मृत्यु टाळू शकतो; पोलिओच्या लसीकरणाद्वारे अपंगत्वापासून वाचवू शकतो. परंतु डासांच्या शरीरातील पॅरासाइट्सचे पुनरुत्पादन रोखू शकणारा एखादा जालिम उपाय अजूनही त्याला सापडलेला नाही. ही बाब मानवी बुद्धीमत्तेला आव्हानात्मक असून आपले अपयश अत्यंत खेदजनक ठरत आहे. सर्व संशोधक हतबलपणे डासांची वंशवृद्धी उघड्या डोळ्यानी पहात आहेत. हे असे का होत आहे याचे कारण मानवाच्या बुद्धीच्या कुवतीच्या मर्यादा नसून मलेरियाला कारणीभूत ठरणार्‍या रोगजंतूंना उत्क्रांतीचे वरदान लाभले आहे. या क्षेत्रातील संशोधक व मलेरियाचे रोगजंतू यांच्यातील ही जीवघेणी शर्यत असून आजपर्यंत तरी या रोगजंतूंचीच सरशी झाल्यासारखे वाटते. मुळात मलेरिया रोग कसा होतो, त्याच्या रोगजंतूंची वाढ कशी होते, डासांचा त्यात कितपत सहभाग असतो, इत्यादी गोष्टी आपण समजून घेतल्यास मलेरियासाठी लसीकरण का शक्य नाही याचा उलगडा होईल.

मलेरियास कारणीभूत ठरणा‍र्‍या रोगजंतू
मलेरियास कारणीभूत ठरणा‍र्‍या रोगजंतूंपैकी प्लास्मोडियम फाल्सिपारम (plasmodium falciparum) हा सर्वात जास्त घातक असून हा रोगजंतूच माणसांचा बळी घेतो, असा संशोधकांचा दावा आहे. हे रोगजंतू व्याख्येनुसार विषाणूही नव्हेत वा बॅक्टेरियाप्रमाणे एकपेशीय जिवाणूही नव्हेत. सामान्यपणे विषाणू हे न्यूक्लिक आम्लापासून तयार झालेले असतात; त्यांना आपल्या वाढीसाठी व वंशवृद्धीसाठी दुसर्‍या एखाद्या पेशीतील यंत्रणेची गरज भासते. बॅक्टेरिया एकपेशीय असल्यामुळे त्यांची वाढ व वंशवृद्धी स्वतंत्रपणे होवू शकते. प्लास्मोडियम हे एकपेशीय असूनसुद्धा त्याच्या आयुष्य काळात त्या वेगवेगळ्या स्वरूपात परिवर्तित होत असल्यामुळे मानवी शरीरातील रोगप्रतिरोधक यंत्रणा कुचकामी ठरत आहे. गेली 10 - 15 लाख वर्षे हे रोगजंतू उत्क्रात होत असून आपल्या शरीरातील रोगप्रतिरोधक यंत्रणेला कशाप्रकारे चकवणे शक्य आहे याचे 'ज्ञान' त्यांना प्राप्त झाले आहे, असे म्हणण्याची पाळी आली आहे. लाखो वर्षे मानवी शरीरातील वेगवेगळ्या भागात राहून त्यांची वाढ झालेली असल्यामुऴे शरीरातील घटकांवर ते सहजपणे मात करत आहेत. निसर्गाने उत्क्रांतीचे सर्व लाभ केवळ मानवी वंशालाच दिलेले नसून इतर प्राणीवंशानाही त्याचा लाभ मिळालेला आहे. याचे प्लास्मोडियम एक ठळक उदाहरण आहे.


प्लास्मोडियमचे जीवनचक्र डास व मानवी शरीर याभोवती गुंफले आहे. आपल्याला डास चावताना तो एक प्रकारचे चिवट पदार्थ शरीराच्या त्वचेत सोडून शरीरातील रक्त शोषून घेत असतो. त्याचवेळी डासाच्या शरीरातील मलेरियाचे रोगजंतू मानवी शरीरात प्रवेश करतात. यावेळच्या त्याच्या स्वरूपाला स्पोरोझॉइट्स (sporozoites) म्हणून ओळखले जाते. हे स्पोरोझॉइट्स पुढील अर्ध्या तासात शरीरातील रक्तप्रवाहात मिसळून वाहत जातात व यकृताच्या पेशीत रुतून बसतात. पुढील एका आठवड्यामध्ये त्यांच्यात अनेक पटीने वाढ होऊन यकृतातील अनेक पेशींचा नाश करतात. यानंतर त्यांचे स्वरूप बदलते. गोलाकारातील या स्वरूपाला मेरोझॉइट्स (merozoites) या नावाने ओळखतात. एका स्पोरोझॉइट्स मागे हजारो मेरोझॉइट्सची निर्मिती होते. असे लाखो मेरोझॉइट्स काही सेकंदात रक्तप्रवाहात मिसळून रक्तपेशीवर आक्रमण करू लागतात. पुढील 48 तासात त्याच्यात 20 पटीने वाढ होते. यावेळी पुन्हा एकदा त्यांच्यात परिवर्तन होऊन त्या रक्तपेशीवर जोमाने हल्ले करू लागतात. या स्वरूपाला वैज्ञानिक परिभाषेत गॅमेटोसाइट्स (gametocytes) असे म्हणतात. फक्त याच कालावधीत यांच्यात पुरुष व स्त्री गॅमेट्स असे दोन प्रकार आढळतात. त्यांच्या लैंगिक क्रियेतून वंशवृद्धी होऊ लागते, रक्तपेशीच्या आत-बाहेर करत असताना पुढील दोन तीन पिढ्यांमध्ये मेरोझॉइट्सची संख्या अनेक कोटीपर्यंत पोचू शकते व त्या रक्त पेशीत घर करून राहू लागतात. याचवेळी एखाद्या डासाने मानवी त्वचेचा चावा घेऊन रक्त शोषल्यास रक्तपेशीतील गॅमेटोसाइट्स डासाच्या शरीरात जातात. पुरुष व स्त्री गॅमेट्सपासून झायोट्स (zoites) व त्यातून स्पोरोझॉइट्स असे रूपांतर घडू लागते. मानवाच्या उष्म शरीराच्या तुलनेने थंड असलेल्या डासाच्या शरीरात दोन आठवडे राहिल्यानंतर हे रोगजंतू स्पोरोझॉइट्सच्या स्वरूपात वाढू लागतात. याच वेळी हे डास निरोगी माणसाला चावल्यास रोगजंतू मानवी शरीरात प्रवेश करून त्याला मलेरियाग्रस्त करतात. अशाप्रकारे हे चक्र सातत्याने डासापासून मानवी शरीर व मानवी शरीरापासून डास असे फिरत राहते.

रोगप्रतिकारक यंत्रणेवर मात
प्लास्मोडियम हे रोगजंतू लाखो वर्षे उत्क्रांत होत आलेले असून मानवी शरीरातील रोग प्रतिकारक यंत्रणेला न जुमानता आपली वंशवृद्धी करत आहेत. मानवी शरीरातील रोगप्रतिकारक यंत्रणेत दोन प्रकारच्या व्यवस्था आहेत. एका व्यवस्थेत शरीरातील प्रतिरक्षक द्रव्य शरीरात प्रवेश करणार्‍या अपरिचित विषाणूंना ओळखून त्यांचा नायनाट करते. दुसऱ्या संरक्षणव्यवस्थेत टी-पेशी शरीरातील आक्रमणग्रस्त पेशींना मारून त्यांची वाढ थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. मलेरिया रोगजंतू मात्र या दोन्ही यंत्रणाना फसवण्यात यशस्वी झालेले आहेत.

डास चावल्यानंतर मलेरियाचे रोगजंतू रक्तप्रवाहात केवळ अर्धा तास रहात असल्यामुळे प्रतिरक्षक द्रव्याला त्याची नोंद घेऊन मारून टाकण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. प्रतिरक्षक द्रव्य कार्यप्रवण व्हायच्या आतच हे रोगजंतू यकृतात घर करून राहू लागतात. यकृतातसुद्धा केवळ एकच आठवडा त्या रहात असल्यामुळे टी-पेशींना आक्रमणग्रस्त पेशींचा नायनाट करण्याइतपत वेळ मिळत नाही. टी-पेशींना किमान 10-12 दिवसांचा कालावधी या कामासाठी लागतो. टी-पेशी आक्रमण करण्याअगोदरच हे रोगजंतू रक्तपेशीवर आक्रमण करून रक्तपेशीत वाढू लागतात. टी-पेशीत आक्रमणग्रस्त रक्तपेशींना बाहेर काढण्याची क्षमता नसते. त्यासाठी प्लीहामध्येच अशुद्ध पेशींना बाहेर घालवण्याची व्यवस्था आहे. मलेरियाचे रोगजंतू तांबड्या रक्तपेशीत वाढत असताना रक्तपेशीच्या बाहेरच्या कवचावर एक बारीकसा टेंगुळ तयार करतात व रक्तवाहिन्यांच्या आतल्या बाजूस चिकटून बसतात. त्यामुळे ते रक्तप्रवाहातून प्लीहापर्यंत मुळात पोचतच नाहीत. अशा प्रकारे तांबड्या रक्तपेशी मारून हे रोगजंतू आपली वंशवृद्धी सहजपणे करू शकतात. एखाद्या मुरलेल्या चोराप्रमाणे संरक्षण यंत्रणेलाच त्या फसवत राहतात. परंतु हा चतुरपणा रोगजंतूंचा नसून उत्क्रांतीतून तो त्यांना मिळालेला आहे.

माणूस मलेरियाग्रस्त आहे याचे निदान मलेरिया रोगजंतू रक्तपेशीत वाढत असतानाच होऊ शकते. आक्रमणग्रस्त पेशीतून ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे अशक्तपणा जाणवू लागतो. रक्तप्रवाहातील 70 टक्के पेशी या रोगजंतूंची शिकार होत असल्यामुळे त्याच प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. याचाच परिणाम रक्तक्षयात होतो. मेंदूलाच ऑक्सिजनचा पुरवठा थांबवण्याची शक्यता असते. यामुळे सेरेब्रल मलेरिया होऊन माणूस दगावतो.

जगातील सुमारे 200 कोटी लोक मलेरियाग्रस्त भूभागात राहतात. आफ्रिका खंडातील 30 टक्के लोकांच्यामध्ये रक्तहीनता (anaemia) आढळते. त्यातील बहुतांश लोक सेरेब्रल मलेरियामुळे मृत्युमुखी पडतात. दर 48 तासाला रक्तपेशींवर या रोगजंतूंचा हल्ला होत असल्यामुळे रोग उल्बणावस्थेत पोचू शकतो. या क्रॉनिक ऍनिमियामुळे रुग्णामधील रोगप्रतिकारक शक्ती क्षीण होत जाते. साध्या सर्दी पडश्यामुळेसुद्धा ऍनिमिक माणूस मरू शकतो. ऍनिमियाग्रस्त स्त्रीचे मुल कमी वजनाचे असू शकते. गर्भपात होण्याची शक्यता वाढते किंवा गर्भातील मूल मृतावस्थेत जन्म घेते.

लसीकरणाबाबतीतील अडचणी
मलेरियाच्या लसीकरणाबाबतीत अनेक वैज्ञानिक अडचणी आहेत. देवी, क्षय, कॉलरा यांसारख्या रोगांसाठी उपलब्ध असलेल्या लशीसारखी मलेरियाची लस करणे शक्य नाही. कारण हे रोगजंतू आयुष्यभरात चार वेळा आपले स्वरूप बदलतात. स्पोरोझॉइट्ससाठी शोधलेली लस मेरोझॉइट्ससाठी निरुपयोगी ठरते किंवा गॅमेटोसाइट्ससाठी ती अजिबात चालणार नाही. एखादा जरी स्पोरोझॉइट्स चुकून शरीरात राहिल्यास त्यापासून 30 हजार मेरोझॉइट्स बघता बघता तयार होऊन रक्तपेशी पोखरू शकतात. यकृतातील रोगग्रस्त पेशीवर टी-पेशींचे यशस्वी आक्रमण व्हावे, यासाठी लसीकरणाचा शोध शक्य आहे. परंतु तेथेही एखादा रोगजंतू राहिल्यास काही क्षणातच त्यांची संख्या वाढत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लसीकरणाच्या मूळ उद्देशालाच तडा बसण्याची शक्यता आहे.

डासांच्यातील परजीवित रोगजंतूंची वाढ थांबवणे शक्य आहे का, याचाही विचार केला जात आहे. तेथेही भरपूर अडचणी आहेत. डासांच्या शरीरातच या रोगजंतूंची वाढ होत असल्यामुळे डासांच्या शरीरातील रोगप्रतिकारक यंत्रणा सक्षम करण्याचा प्रयत्न संशोधक करत आहेत. किंवा डासांची वाढच पूर्णपणे थांबवून मलेरिया निर्मूलन करता येईल का याचाही विचार चालू आहे. डीडीटीसारख्या प्रभावी क्रिमीनाशक फवा‍र्‍याने डासांचा नायनाट न झाल्यामुळे संशेधक आता डासांवर विकीरण प्रक्रियेचा विचार करत आहेत. विकीरणामुळे डासांचे शरीर स्पोरोझॉइट्ससाठी निरुपयोगी ठरेल. परंतु मानवी शरीरातील प्रतिकारक यंत्रणेला कार्यप्रवण करण्यासाठी विकीरण केलेले डास किमान हजार वेळा तरी चावायला हवेत, असे निष्कर्ष काढण्यात आला. त्यामुळे शंभर कोटी लोकांना हजार वेळा चावतील एवढे विकीरण केलेल्या डासांची प्रचंड प्रमाणात पैदास करणे जवळ जवळ अशक्यप्राय गोष्ट आहे. विकीरण प्रक्रियेऐवजी अत्याधुनिक जनुकीय तंत्रज्ञानाचा वापर करून स्पोरोझॉइट्सचा मुकाबला करू शकणारे सक्षम जनुक निर्माण करण्याचा घाट संशोधकांनी घातला आहे.

सैद्धांतिक पातळीवरील वा प्रयोगांच्या प्राथमिक अवस्थेतील जनुकीय वा विकीरणाशी निगडित विचार व जैव तंत्रज्ञान प्रत्यक्षात उतरून व्यापारी तत्वावर लशींचे उत्पादन होऊन खेडोपाडी लस (परवडणार्‍या किमतीत) उपलब्ध होण्यास किमान 10 -15 वर्ष लागतील. त्यामुळे आज तरी डासांपासून चार हात दूर राहणे हाच एकमेव उपाय आपल्या हातात आहे. कुठलाही ताप आल्यास तो मलेरियामुळेच आला आहे असे गृहित धरून औषधोपचार करणे गरजेचे आहे. मच्छरदाणींचा वापर, दारे-खिडक्यांना जाळी, मॅट वा विशिष्ट अगरबत्ती यांचा उपयोग इत्यादी उपाय करण्याची जरूरी आहे.

डासांच्या 2000 हून जास्त जाती आहेत. त्यापैकी बहुसंख्य जाती खेडी व शहरापासून दूर असलेल्या घनदाट जंगलात व पाणथळ हिरवळीसारख्या भागात वाढत असतात. काही मात्र माणसांच्या निकट सानिध्यात राहून मलेरिया, हत्ती रोग, डेंग्यू सारख्या घातक विकारास कारणीभूत ठरतात. डासांच्या काही जाती कुठल्याही व कसल्याही जलाशयात वाढू शकतात. नदी - नाले, नागझर्‍या, डबकी, गटारं, खाचखळग्यात - खड्ड्यात साठलेले पाणी, मोर्‍या, संडास, गोठे, ही त्यांची आवडते ठिकाणं आहेत. त्यामुळे गटारे बुजवणे, गोठे स्वच्छ ठेवणे व घाणेरड्या पाणथळीवर वाढणा‍र्‍या अळ्यांचा व अंड्यांचा नाश करणे हेच मलेरियापासून रक्षण करून घेण्यास प्रभावी उपाय ठरू शकतात.

Comments

निर्मुलन

निर्मुलन म्हटले कि आमच्या डोक्यात अंधश्रद्धा निर्मुलन हाच शब्द घट्ट बसला आहे.
बाकी डास या कीटकाचे पौराणिक अस्तित्व हा देखील चांगला विषय आहे.
लेख अर्थातच माहितीपुर्ण
प्रकाश घाटपांडे

माहीतीपूर्ण

लेख खूप माहीतीपूर्ण, आवडला.

डासांच्या प्रजोत्पादनावरच अंकुश ठेवेल असा एखादा विषाणू सापडला पाहीजे. तो जर रक्तात असेल तर चावलेल्या डासाला त्याचे परीणाम भोगावे लागतील कारण चावणारा डास म्हणजे मादी असते व् तीला अंडी तयार करण्यासाठी रक्ताची गरज असते.

धन्यु...!

>>>लेख खूप माहीतीपूर्ण, आवडला.
असेच म्हणतो.

-दिलीप बिरुटे

चांगली माहिती

चांगली माहिती.

प्लास्मोडियम जंतूच्या ज्या नर-मादी-पेशी (गॅमेटोसाईट) असतात, त्या बराच काळ रक्तात संचार करत असतात. त्यांच्याविरुद्ध लस उत्पन्न करण्याचे प्रयत्नही चालू आहेत. मात्र या लशीचा फायदा खुद्द रोग्याला होणार नाही. त्या रोग्याकडून प्रसार होणार नाही, हे विशेष. (मात्र अशी लसही अजून उपलब्ध नाही.)

मच्छरदाण्या वाप्रणे, सांडपाण्याचा निचरा करणे वगैरे महत्त्वाचे आहे. नि:शंक.

(हे लक्षात ठेवावे, की मलेरिया पसरवणार्‍या ऍनोफेलीस डासाची अंडी आणि अळ्या स्वच्छ प्रदूषणमुक्त पाण्यातच तगतात. प्रदूषित सांडपाण्यात दिसतात त्या डासांच्या अळ्या वेगळ्या. म्हणून "स्वच्छता"+"निचरा" दोन्ही महत्त्वाचे. स्वच्छ तळी, टाक्या यांचा निचरा करता येत नाही, कारण पाणी साठवणे हाच हेतू असतो. त्यात अळ्या आनंदाने वाढू नये, म्हणून डासाच्या अळ्या खाणारे मासे वगैरे वाढवावेत.)

 
^ वर