कातकरी: विकास की विस्थापन?

मराठी वाचक नक्की कुठली पुस्तकं वाचतात हा एक प्रश्न पडला आहे.

काही दिवसांपूर्वी "मराठी पुस्तकांना सुगीचे दिवस" अशी बातमी पेपरात वाचली तेव्हा एक लहानसा आनंद झाला होता. म्हणजे मराठीसाठी तळमळ वगैरे सध्याची "इन थिंग" असलेल्या भावना असल्या तरी काही वर्षांपूर्वी वाचलेली आणि आता मराठी पुस्तकांचे मराठी दुकानदार तुसडेपणाने "औट ऑफ प्रिंट आहे" असं वाक्य आपल्या तोंडावर नेहमी फेकत असलेली जीए, गौरी देशपांडे, नेमाडे यांची पुस्तके कुत्र्याच्या कानासारखी पाने दुमडलेल्या अवस्थेत नाही तर नवीन कोरा प्रसन्न वास असलेल्या अवस्थेत परत वाचायला मिळतील. वाचून झाल्यावर मस्तपैकी कपाटात ठेवून देता येतील आणि आपल्याकडे इतकी भारी (किंमतीनं सुद्धा!) पुस्तकं आहेत याचा अभिमान वाटण्याची एक दुर्मिळ संधी मिळेल असं वाटलं होतं. (त्या दिवशी सिग्नलवर हिरवा दिवा होईपर्यंत मी चक्क वाट पाहिली!)

पण कसलं काय?

रविवारी दुसरी बातमी वाचली. मिलिंद बोकील यांच्या "कातकरी: विकास की विस्थापन?" या पुस्तकाच्या गेल्या वर्षभरात १००० प्रतीसुद्धा विकल्या गेल्या नाहीत. मराठी वाचकांची चॉईस पाहून धन्य वाटलं! खरं तर हे पुस्तक मराठीतील भयानक सुंदर पुस्तकांपैकी एक म्हणावं असं आहे. एकदम आउटस्टॅंडिंग!

मराठीत सामाजिक विषयंवरचे लेखन कमी आहे असे नाही. अगदी मराठी ब्लॉग लिहिणार्‍यांचा सॅंपल डेटा घेतला तरी एखाद्या मस्त कात-तंबाखू टाकून जमवलेल्या पानाप्रमाणे जमलेल्या लेखावर जर सामाजिक जाणीवेच्या चुन्याची दांडी धरली नाही तर मायबाप वगैरे वाचकांच्या प्रतिसादाच्या पिचकार्‍या कमी पडतात हे कोणाच्याही लक्षात येईल!

मिलिंद बोकील त्यांच्या स्वत:च्या लेखनाची भूमिका मांडताना म्हणतात:


...अलीकडच्या काळात काही पत्रकारांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी अतिशय माहितीपूर्ण व वाचनीय लिखाण केलेले आहे. एरवी समाजासमोर न येणारे प्रश्न मांडून त्यांनी मोठीच सामाजिक कामगिरी बजावली आहे. मात्र एकदा तशी जाणीव-जागृती निर्माण झाली की मग त्याच्या पुढचा टप्पा आपण गाठायला हवा. केवळ प्रश्न वा समस्यांची मांडणी करुन पुरेसे नाही तर ते सामाजिक प्रश्न असल्याने त्यामागचे समाजशास्त्रही उलगडून दाखवणे आवश्यक आहे. कुठल्याही प्रकियेमागचे शास्त्रीय रूप का तपासायचे, तर त्यातून 'समानतत्त्व' काढता यावे म्हणून, तसेच इतरांना त्याचा पडताळा पाहता यावा म्हणून. जर असा तत्त्वबोध जर जिवंत माणसांच्या अभ्यासातून झाला तर तो अधिक स्मरणीय होतो....

शिवाय हे लेखन मराठीत करण्याचेही मोठे सुंदर कारण त्यांनी दिले आहे.

...कारण आपल्या समाजासाठी लिहितो तेव्हा ते त्याच्याच भाषेतून लिहिणे आवश्यक असते. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मातृभाषेचे पांग फेडणे हे कोणत्याही लेखकाचे कर्तव्य असते; मग त्या भाषेला मान्यता असो वा नसो, त्या भाषेत त्याची कदर होवो ना होवो. सुदैवाने असा तत्त्वविचार मांडण्याची ताकद मराठी भाषेमध्ये आहे. किंबहुना गंभीर तत्त्वविचार हेच मराठी भाषेचे वैशिष्ट्य आहे. व्यावसायिक आवश्यकतेपोटी ह्यातील बरेचसे लेखन मी इंग्रजीतही प्रसिद्ध केलेले आहे. मात्र त्या गोष्टीचे मल तेवढे अप्रूप वाटत नाही. हे ज्ञान फक्त मराठीतच आहे आणि म्हणून आपण मराठीकडेच गेले पाहिजे असे लोकांना जाणवले तरच मराठीचे महत्त्व वाढू शकेल....

"कातकरी: विकास की विस्थापन?" या पुस्तकात बोकीलांनी गेल्या काही वर्षात कोकणात आलेल्या औद्योगिकीकरणाच्या - आधुनिकीकरणाच्या लाटेचे होणारे सामाजिक आणि आर्थिक परिणाम. आणि या परिणामांचा कातकर्‍यांसारख्या दुर्लक्षित समाजावर पडणारा प्रभाव या विषयावर केलेल्या संशोधन प्रक्रियेबाबत समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून लेखन केले आहे.

पुण्या-मुंबईतच नव्हे तर राज्याच्या कोणत्याही शहरी-निमशहरी भागात राहणार्‍या माणसाला कातकरी हे आदिवासी लोक एवढेच ऐकून माहिती असते. मात्र हे कातकरी नक्की कोण आहेत? "आपला" आणि "त्यांचा" संबंध समाजशास्त्रीय दृष्टीने कितपत जवळचा आहे, कातकर्‍यांच्या गुलामगिरीची सुरुवात, कातकरी ते कोळसाकरी ते वीटमजूर असा त्यांचा प्रवास, जमिनीचा प्रश्न, कातकरी संस्कृती या सर्व मुद्द्यांना पुस्तकात अतिशय विस्ताराने स्पर्श केला आहे.

कातकर्‍यांसारख्या उपेक्षित समूहाला काही भवितव्य आहे का? त्यांच्या सभोवतालचे जग इतके वेगवान, स्पर्धेचे, स्वकेंद्रित होत असताना या आदिवासी समूहाला त्यात काही स्थान राहिले आहे का? कातकर्‍यांशी समांतर म्हणाव्यात अशा महादेव कोळी व ठाकर जमातींमध्ये शिक्षणाचा (तुलनेने) चांगला प्रसार झाला असताना गरीब-अल्पसंख्य अशा कातकरी समाजाला विकासाच्या समान संधी खरंच उपलब्ध होत आहेत का? असे अनेक प्रश्न आपल्या मनात उपस्थित करतानाच औद्योगिकीकरणामुळे पारंपारिक उपजीविकेवर परिणाम होत असला तरी कातकर्‍यांच्या आजूबाजूच्या वातावरणात आधुनिकतेचे वारे खेळू लागल्यामुळे पारंपारिक अन्यायाचे प्रमाणही तुलनेने कमी होत आहे. वातावरणातील खुलेपणामुळे या वर्षानुवर्षे दबून राहिलेल्या समाजाला मोकळेपणाने श्वास घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आश्वासक वाटाव्यात अशा या गोष्टीही बोकील अधोरेखित करतात.

कातकरी समाजाच्या लाभलेल्या सहवासाचे ऋण व्यक्त करताना बोकील म्हणतात,

...आपण शहरी, मध्यमवर्गीय माणसे स्वत:ला प्रगत म्हणवतो आणि कातकर्‍यांसारखे समूह आपल्यापेक्षा मागास आहेत असे समजतो. भौतिक बाबतीत ते खरे असेलही, पण इतर अनेक बाबतीत शंकेला जागा आहे. एकेकाळी आपण सगळेच आदिवासी होतो. तथाकथित प्रगतीची कास धरुन शहरी, औद्योगिक व्यवस्थेत अग्रभागी आलो. ह्या प्रवासात आपण पुष्कळ काही कमावले, पण पुष्कळ काही गमावलेसुद्धा.

आपण काय गमावले याचे भान कातकर्‍यांसारख्या समूहाशी संबंध येतो तेव्हा येते. शहरी, मध्यमवर्गीय जीवन पुढारले तेव्हा त्यात क्षुद्रपणाची, संकुचितपणाची आणि असंस्कृतपणाची वाढ झाली. स्पर्धा, स्वार्थ, हेवेदावे वाढले. लहानसहान गोष्टींतूनही आपला क्षुद्रपणा समोर येत राहतो. आपण रांगेत घुसाघुशी करतो. दुसर्‍याशी उर्मटपणे वागतो. सदैव आपलंच खरं मानतो आणि स्वार्थ साधायची एकही संधी सोडत नाही. आपल्या सगळ्या जीवनात उच्च - नीचता, धूर्तपणा, असभ्यपणा काठोकाठ भरुन राहिला आहे. अशा प्रकारची उर्मट, हिणकस, असभ्य वृत्ती मला कातकरी समाजात कधीही दिसली नाही. कातकरी समाज अज्ञानी, अशिक्षित असला तरी शहरी, मध्यमवर्गीय जीवनात जी दांभिकता, कर्कशता, चढाओढ आहे तिचा त्यांच्यामध्ये मागमूसही नाही. हे सगळे लोक एका अबोल सोशिकतेने, अलिप्तपणाने, शांतपणाने जीवन जगतात. वैयक्तिक लोभ, मत्सर कुणालाही सुटलेले नाहीत. स्वार्थ प्रत्येक माणसामध्ये असतो. पण कातकर्‍यांच्या वागण्या-बोलण्यात एक अबोल सभ्यता आहे. दुसर्‍याला लुबाडून आपली तुंबडी भरावी, धूर्तपणाने दुसर्‍याचा काटा काढावा, मिळेल तेवढे फुकटात लाटावे ह्या प्रवृत्ती त्यांच्यामध्ये दिसत नाहीत. त्यांच्या वाड्यावर हिंडताना हे सतत जाणवत राहायचे. या जाणिवेतून जो विश्राम मनाला यायचा, तो फार आल्हाददायक असायचा...

कातकर्‍यांची ही अबोल सभ्यता समजून घेता आली तर निश्चितच आपले जीवन अधिक चांगले होईल असा विश्वास व्यक्त करणारे हे पुस्तक गेल्या वर्षामध्ये इतर मराठी वाचकांना फारसे आवडले नसले तरी मला मात्र खूप आवडले.अवांतर: मिलिंद बोकील यांच्याबद्दल माझे आवडते ब्लॉगर सन्जोप सरांनी लिहिलेला लेखही जरुर वाचागमभन वापरुन लिहिलेल्या या लेखाची मूळ प्रत http://www.punekar.net येथे पहा.

Comments

वेगळ्या विषयावरील लेखन

आवडले. वाचून कातकर्‍यांवर अधिक वाचायची इच्छाही झाली. असो.

कोळसाकरी म्हणजे काय?

कातकर्‍यांबद्दल आणि त्यांना सहाय्य करणार्‍या संस्थेविषयी अधिक येथे वाचता येईल.

कोळसाकरी/धन्यवाद

खैराच्या झाडापासून कात करणारे ते कातकरी.
झाडे जाळून त्याचा कोळसा तयार करणारे ते कोळसाकरी.

दुव्याबद्दल धन्यवाद.मराठी टंकलेखनासाठी वापरा.

योगेश

"विषयंवरचे" हा शब्द जर "विषयांवरचे" असा लिहिला असतास तर मी प्रतिक्रिया दिली असती कदाचित.

शिक्षक?

"विषयंवरचे" हा शब्द जर "विषयांवरचे" असा लिहिला असतास तर मी प्रतिक्रिया दिली असती कदाचित

काय हो छोटे सर्कीट काका, तुम्ही मनोगतावरचे "शिक्षक" तर नाही ना? पूर्वी मनोगतावर "शिक्षक" या नावाने एक सद्गृहस्थ वावरायचे. तेही असेच इतरांच्या शुद्धलेखनाच्या आणि व्याकरणाच्या चुका काढत गावभर हिंडायचे!! ;))

आपला,
(विद्यार्थी!) तात्या.

संत तात्याबा गमभन वापरतात!

धन्यवाद

नजरचुकीने हा शब्द चुकीचा टंकला गेला असावा. दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद मित्रा.मराठी टंकलेखनासाठी वापरा.

लिहुन दे ना भो लिव्हना-याला.

फॉल्ट सर्कीट साहेब,
लिहुन दे ना भो लिव्हना-याला. कशाला या भानगडीत पडतु राव.एक राह्यलं तोह्या प्रतिसादाबद्दल.मह्या मनात काही चांगलं लिव्हशीन,असं होतं. त्वा लिव्हलं सुध्दलेखनाबा-यात,मी बी असाच अडानी गडी हाय भो कांम्पुटरवर, सुधरु रे लिहु लिहु. तु कह्याला ध्यान देतो तिकडं.तोह्या प्रतिसादाबदुल मह्या गावाकडं एक म्हण हाय. नाचता येयना अन् ढुंगन वाकडं.(इथं पह्यलं अंगन होतं म्हणं रे )

आपला
गावाकडचा मास्तुर.

गोडवा भावला!

बिरुटेदादा,

आपल्या प्रतिसादात वापरलेल्या बोलीभाषेचा गोडवा आणि निखळ/निरलसपणा मनाला भावून गेला! ;)

क्या बात है, जियो..

ज्या दिवशी यातली गोडी अन् भाव समस्त सुदलेखन आणि व्याकरणवाल्यांना समजतील त्या दिवशी महाराष्ट्र खर्‍या अर्थाने सुसंस्कृत झाला असं निदान मी तरी म्हणेन. इतरांचं माहीत मले माहीत नही! ;))

बाय द वे बिरुटेसाहेब, अहिराणी बोली म्हणतात ती हीच का? की ती अजून वेगळी? बहिणाबाईंची बोली हीच, की यापेक्षा वेगळी?

आपला,
(बोलीभाषेवर मनापासून पिरेम करणारा!) तात्या.

संत तात्याबा गमभन वापरतात!

निर्दोष लेखन

श्रीमान शॉर्ट सर्किट, लेखन निर्दोष असावे हा तुमचा आग्रह नि:संशय चांगला आहे. पण फक्त तिथेच न थांबता लेखाविषयी आपले मत, आपले विचारही व्यक्त करावेत.
- अमृतांशु

छान माहिती.

कातकर्‍यांसारख्या दुर्लक्षित समाजावरची माहिती आवडली. अनिल अवचटांचे बहुतेक "माणसं "या पुस्तकात विविध दुर्लक्षित समाजाची चित्रणे वाचावयास मिळतात.

सुंदर

मुख्य प्रवाहाने उपेक्षलेल्या या पुस्तकाची ओळख तुम्ही सुंदर रीतीने करून दिली आहे. बोकीलांचे लेखन विचारप्रवर्तक आहे यात शंकाच नाही पण या लेखाच्या निमित्ताने आपण मांडलेले इतर मुद्देही विचार करायला प्रवृत्त करणारे आहेत.
- अमृतांशु

आवडले

वेगळ्या विषयांवरील मराठी पुस्तकांकडे होणारे दुर्लक्ष खरेच धक्कादायक आहे. 'मराठीत का लिहावे' आणि 'काय कमावले काय गमावले' हे उतारे फारच आवडले. अश्या लेखांमुळे वेगळ्या विषयांवरील पुस्तकांच्या प्रचाराला थोडाफार का होईना हातभार लागेल त्यामुळे अश्या पुस्तकांवरील लेख मोलाचे आहेत.

संजोपरावांच्या लेखाच्या दुव्याबद्दल धन्यवाद!

धन्यवाद

परीक्षण आवडले. पुस्तक मिळवण्याचा प्रयत्न करेन.

आवडले

पुस्तक-परीक्षण आवडले. "वाचणे आहे" यादीमध्ये सदर पुस्तकाची नोंद केली आहे. मिळवून वाचण्याचा प्रयत्न करेन. चांगल्या पुस्तकाबद्दल माहिती दिल्यबद्दल धन्यवाद.

आभार

या पुस्तकाबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद योगेश. परीक्षण उत्तम झाले आहे. अशा वेगळ्या विषयांवरची पुस्तके मराठीत येत आहेत, हे एक चांगले चिन्ह म्हणता येईल. काही काळाने का होईना, पण अशा पुस्तकांचा वाचकवर्ग वाढेल, अशी आशा वाटते.

'एकम्' वाचली आहे काय?

नमस्कार. आपल्या याच लेखावर प्रतिक्रिया देताना मी मिलिंद बोकील यांच्या 'एकम्' या कथेबद्दल विचारणा केली होती. इथे पुन्हा एकदा सर्व वाचकांना प्रश्न - कुणी 'मौजे'च्या दिवाळी अंकात आलेली 'एकम्' (बहुतेक) नावाची दीर्घकथा वाचली आहे का? ती उघड उघड गौरी देशपांडे यांच्या आयुष्यावर बेतली आहे असे माझे मत आहे. बोकीलांचे इतर लिखाण खूप आवडत असूनही ही असली कथा वाचून मात्र मला जरा त्रासच झाला.
सई परांजपेचा 'साझ' कुणी पाहिला आहे का? त्या प्रकारची ही कथा वाटते.
कुणी ही कथा वाचली आहे का? माझ्या मताशी सहमत / असहमत असलेल्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत.

 
^ वर