वार्षिक करभरणा संबंधी एक विचार.....

आपण सगळे नुकतेच होत असलेले CWG च्या नावानी खडे फोडून दमलो, पण हे सर्व करीत असताना एक तीव्र जाणीव झाली कि आपणा हे सर्व कितीही प्रयत्न केले तरी नियंत्रित करू शकत नाही कारण आपण आपले मत दर पाच वर्षांनी देऊन ते नियंत्रण गमावलेले असते. एकदा का आपले मत पेटीमध्ये गेले कि आपण परत लोकशाहीचे गुलाम होतो. नंतरची पाच वर्षे सरकार विरुद्ध आपण काहीच करू शकत नाही. फार फार तर आपण आंदोलने, चर्चा सत्रे, जनहित याचिका दाखल करू शकतो. पण परिणाम सर्वांना माहित असतात. पैसा कुठे, कसा व किती खर्च करायचा हे आपण सरकारला ठामपणे सांगू शकत नाही. त्यामुळेच CWG ला 1 हजार करोड काय नि १५ हजार कोरड काय, पैसा द्यायचा का नाही हे आपण ठरवू शकतच नाही. आपला वर्षाआखेर जमा होणार कर एकदा कर एकदा सरकारच्या घशात गेला कि सरकार म्हणेल तीच पूर्व दिशा. आपण फक्त घाम गाळून कर भरायचा पण खर्च ठरविण्याच्या बाबतीत आपले मत शून्य, असे का ?

ह्यावरून एक विचार मनात आला
कि दर पाच वर्षांनी सरकार जसे आपले धोरण जाहीर करते तसे सरकाने एक यादी सुद्धा प्रसिद्ध करावी. जसे कि,
खेळ विभाग, रस्ते विभाग, धरणे विभाग, संरक्षण विभाग, अन्य (आणि जे काही अन्य विभाग जिथे सरकार पैसे खर्च करते वा करणार आहे असे सगळे विभाग)
आणि दर वर्षी कर भरताना मला एक सवलत देऊ केली कि मी माझा कर भरताना वर सर्व दिलेले विभाग यांचा विचार करून माझा कर कुठे खर्च व्हावा ह्याची टक्केवारी मी त्यासोबत द्यावी.
म्हणजे जर मला वाटत असेल कि सरकारने खेळ विभागात पैसा खर्च करू नये तर त्या विभागासाठी मी कमीत कमी (शून्य) टक्केवारी माझा कर भरतेवेळी नमूद करीन, कदाचित क्रीडाप्रेमी आपले कर भरताना खेळ विभागासाठी १०० % नमूद करतील. आणि जेणे करून सरकारकडे खेळ विभागासाठी लोकांनी ह्या प्रकारे नमूद केलेलीच रक्कम खर्च करण्याचा अधिकार असेल. अश्या प्रकारे सरकारकडे प्रत्येक विभागासाठी ठराविक रक्कमच हाथी राहील. त्यामुळे सरकार अवाजवी खर्च करण्यास (कदाचित) परावृत्त होऊ शकेल.
आणि मला माझा कररुपी पैसा कसा खर्च व्हावा ह्याचा निर्णय तरी घेता येईल.
मग देऊ दे क्रीडाप्रेमींना हवा तेवढा कर क्रीडेसाठी आणि भरवू द्यात हजारो करोडोचे खेळ. काय म्हणताय ?

लेखनविषय: दुवे:

Comments

असे कांही झाले तर कालचा गोंधळ बरा होता

असे कांही झाले तर कालचा गोंधळ बरा होता असे म्हणण्याची वेळ येईल जात,पात,धर्म,प्रांत, भाषा , उद्योगपती,कामगार, उच्च , मध्यम वर्ग, यात विभागलेला आपला देश .प्रत्येकाचे हितसंबंध वेगळे. यामुळे अत्त्यावाशक जनहित संबंधी कामे जसे दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती ,युद्ध दंगल या आकस्मित कामा करता रक्कम कशी उभी करणार. या सर्व वादा मुळे रक्कम कोठे, कशी खर्च करायची याची गुंतागुंत निर्माण होईल.भारतातील क्रिकेट प्रेम पाहता इतर खेळांना पैसाच मिळणार नाही.एखाद्या राज्यात दंगल झाली नाही तर तो पैसा प्रांतवादा मुळे दुसऱ्या राज्यात खर्च करता येईल का? असे अनेक प्रश्न आहेत.

विचारून खर्च

विसाव्या शतकाच्या मध्यावर आपण एक घटनासमिती निवडून दिली. आपल्या वतीने घटना बनवण्याचे काम आपण या घटना समितीवर सोपविले. त्यांनी बनवलेली संसदीय आणि फेडरल लोकशाही पद्धत स्वीकारून आपण ती २६ जानेवारी १९५० पासून लागू केली.

या घटनेनुसार आपण आपला प्रतिनिधी निवडतो आणि आपल्या वतीने संसदेत बोलण्याचे काम (दुसर्‍या भाषेत अधिकार) आपण त्या प्रतिनिधीवर सोपवतो.

हे प्रतिनिधी त्यांच्यातून एकाला पंतप्रधान म्हणून निवडतात आणि त्याच्या मार्फत (आणि त्याने निवडलेल्या मंत्रीमंडळामार्फत) देशाचा कारभार करावा असे अधिकार या मंत्रीमंडळाला सुपूर्त करतो.

हे मंत्रीमंडळ संसदेला म्हणजेच आपल्या प्रतिनिधींना जवाबदार असते. आपल्या प्रतिनिधींच्या परवानगीशिवाय ते कोणताही खर्च करू शकत नाहीत. त्यानुसार दरवर्षी काय खर्च करणार याचे अंदाजपत्रक आपल्या प्रतिनिधींसमोर ठेवले जाते. अर्थमंत्री ठळक बाबींविषयी संसदेत सुमारे एक तासाचे भाषण करतात पण त्याबरोबरच अंदाजपत्रकाचे सर्व तपशील संसद सदस्यांना (म्हणजेच आपल्या प्रतिनिधींना) पुरवले जातात. त्यावर चर्चा होऊन सदस्यांच्या सूचना लक्षात घेऊन काही बदल होऊन अंतिम अंदाजपत्रक संमत केले जाते.
[या साईटवर] राष्ट्रकुल सामन्यांवर होणार्‍या खर्चाचे तपशील आहेत. असे तपशील प्रत्येक मंत्रालयाच्या वेबसाईटवर आहेत.
म्हणजे धागाप्रवर्तकाच्या म्हणण्यानुसार सरकारतर्फे त्यांचा प्रत्येक बाबींवरचा प्रस्तावित खर्च जाहीर केला जातोच.

धागाप्रस्तावकाला जे वाटत आहे की "सरकार सगळा खर्च आपल्याला न विचारता करते" ते चुकीचे आहे. हां... गांधीवादी या व्यक्तीला सरकार/अर्थमंत्री येऊन विचारत नाहीत ही गोष्ट खरी आहे. पण गांधीवादी यांच्या मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणजेच गांधीवादी असे समीकरण लोकशाहीत मानले जाते.

अजून पुढे जाऊन म्हणायचे तर अप्रत्यक्षपणे गांधीवादी यांनाही विचारले जातच असते. अंदाजपत्रक फेब्रुवारीत मांडले जाते. त्यावरील चर्चा/प्रश्नोत्तरे/सूचना वगैरे होऊन ते मंजूर व्हायला मे महिना उजाडतो. फेब्रुवारीत अर्थमंत्र्यांचे भाषण होताक्षणीच या प्रस्तावित खर्चाचा पूर्ण तपशील जालावर उपलब्ध असतो. गांधीवादी तो वाचून त्यांना चुकीचे वाटणारे खर्च करू नयेत असे आपल्या प्रतिनिधीला सांगू शकतात. असे हजारो लोकांनी शंभर दीडशे प्रतिनिधींना कळवले तर ते प्रतिनिधी नक्कीच संसदेत विरोध करतील. पण आपण असे काही करीत नाही. मीही करीत नाही.

साधारण अशीच पद्धत लोकशाहीत सर्व देशांत अवलंबली जाते.

धागाप्रवर्तक प्रस्तावित करीत असलेली प्रत्येक खर्चाच्या आयटमला थेट जनतेकडून स्वतंत्र मान्यता घेण्याची पद्धत कुठेही अवलंबिली जात नाही कारण ती चुकीचीच आहे. एक म्हणजे ती खर्चिक आहे. दुसरे म्हणजे काही सरकारी योजनांची कल्पनाच काही विशिष्ट गटांसाठी फोकस्ड खर्च करण्याची आहे. ज्याला जनतेची थेट मान्यता मिळेलच असे नाही आणि मग कदाचित ती योजना राबवताच येणार नाही असे होईल. उदा शाळेत मुलांना मोफत जेवण देण्याची योजना घ्या. कर भरणारे (म्हणजे खाऊनपिऊन सुखी असलेले) लोक कदाचित या योजनेची गरज नाही* असे सुचवतील कारण त्यांचे काही जळत नसते.
[*याचे एक ताजे उदाहरण नुकतेच पाहिले आहे. आमच्या सोसायटीत टॉप फ्लोअरला राहणार्‍यांची गच्चीवर पत्रे घालण्याची मागणी आहे. कारण दर पावसाळ्यात होणारी गळती. सोसायटी वॉटरप्रूफिंगवर दरवर्षी खर्च करते पण तरीही गळती राहतेच. पत्रे घालण्यामुळे इमारतीचे आयुष्य वाढेल असेही आर्किटेक्ट व इंजिनिअर लोक म्हणत आहेत. पण वार्षिक सभेत या खर्चाला मंजूरी मिळाली नाही. कारण खाली राहणार्‍या सर्व सदस्यांनी एऽऽऽऽवढ्या खर्चाला अनावश्यक म्हणून विरोध केला]

काही खूप कमी लोकसंख्या असलेल्या देशांत महत्त्वाच्या प्रश्नांवर रेफरंडम घेण्याची पद्धत आहे. पण खर्चाच्या बाबतीत नाही.

सरकारने खरेच मला अंदाजपत्रकाचे बाड पाठवून त्यावर अ‍ॅप्रूवल द्यायला सांगितली तर मी काही मीनिंगफुल काँट्रिब्यूशन करेन या बाबत साशंक आहे. ते बाड वाचेन तरी की नाही याबाबतही साशंक आहे.

सध्या एवढेच पुरे.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

ह्म्म्म्

श्रीयुत नीतिन थत्ते यांचा (नेहमीप्रमाणेच ) अतिशय विचारपूर्वक मांडलेला, सुटसुटीत प्रतिसाद. चर्चाप्रस्तावातील प्रत्येक मुद्द्याचे योग्य असे निराकरण केले आहे.

|सध्या एवढेच पुरे.

अहो, अजून येऊ द्या की.

||वाछितो विजयी होईबा||

असे कसे?

अ-कल्याणकारी समाजात तर स्वतःसाठी स्मशानात स्लॉटसुद्धा स्वतःच विकत घ्यावा लागतो. तुमच्या युक्तिवादात कल्याणकारी सरकारचे अस्तित्व गृहीत आहे.

आपल्या सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

पण काही मला शंका आहेत. कृपया जर आपण दूर करू शकला तर मला नक्कीच आनंद होईन.
>> घटनेनुसार आपण आपला प्रतिनिधी निवडतो आणि आपल्या वतीने संसदेत बोलण्याचे काम (दुसर्‍या भाषेत अधिकार) आपण त्या प्रतिनिधीवर सोपवतो
सहमत
पण एकदा का निवडून दिल्यानंतर भले त्याने आश्वासन दिले असेल त्याच्या विपरीत प्रतिनिधी वागत असेल तर ५ वर्षे का होईन त्याला सहन करावेच लागते. ह्यासाठी काही उपाय आहे का ?

>> दरवर्षी काय खर्च करणार याचे अंदाजपत्रक आपल्या प्रतिनिधींसमोर ठेवले जाते.
पण हायत पुढे जाऊन किती तफावत होईल ह्याकॅहा पण अंदाज घेतलं जातो का ?
जसे CWG साठी सुरुवातीला १ हजार करोड लागतील असे सांगितले गेले होते. पण आता चा खर्च बघता १५ हजार करोड लागत आहेत. मग वाढलेल्या १४ हजार करोडची जबाबदारी कोणाची ? (अर्थात ती आता आपलीच आहे )

>> प्रत्येक खर्चाच्या आयटमला थेट जनतेकडून स्वतंत्र मान्यता घेण्याची पद्धत कुठेही अवलंबिली जात नाही कारण ती चुकीचीच आहे. एक म्हणजे ती खर्चिक आहे.
कदाचित अवलंबलेली जात नसेलही (आपला अभ्यास माझ्या पेक्षा नक्कीच जास्त आहे) पण ती चुकीची कशी काय ? आणि खर्चिक तरी कशी काय ?
कदाचित अवघड अईल. त्यामुळे सरकारवर बरीच बंधने येतील हे मान्य. आपण नमूद केलेले शाळेत मुलांना मोफत जेवण देण्याची योजना घ्या हे उदाहरण खरच अस होईल असे मनाला पटत नाही.

आपले जे एक दुसरे व्यक्तिगत उदाहरन दिलेले आहे त्याबद्दल (कृपया हलके घ्यावे)
असेच आमच्या सोसायटीत सुद्धा झाले होते, पण मुद्दा वेगळा होता. तळ मजला आणि पहिल्या मजल्यावरील लोक लिफ्ट चे देखभाल खर्च उचलण्यास तयार होत नव्हती.
त्यांचे म्हणणे असे कि आम्ही लिफ्ट वापरताच नाही तर मग आम्ही का द्यावा हा देखभालीचा खर्च. पण काही सुज्ञाकडून समजून सागीतल्यानंतर ते तयार झाले.
पण हे उदाहरन तितके पटले नाही.
सोसायटीला पत्रे किव्वा लिफ्ट असावी हि मनुष्याला जितकी निकडीची गरज असते तितकी नक्कीच पाण्यासारखा पैसा ओतून खेळ भरविण्याची गरज भारताला नाही.
भले ते दहा वर्षे अगोदर का होईना मंजूर झालेले असेल.
खेळण्यासाठी १५ हजार करोड, आणि लेह मधील पिडीतांसाठी मात्र १२५ करोड. हाच का खरा न्याय ? (जाऊ द्या हा मुद्दा पूर्णपणे वेगळा आहे.)
असो, हे माझे वयक्तिक मत आहे.

>> सरकारने खरेच मला अंदाजपत्रकाचे बाड पाठवून त्यावर अ‍ॅप्रूवल द्यायला सांगितली तर मी काही मीनिंगफुल काँट्रिब्यूशन करेन या बाबत साशंक आहे. ते बाड वाचेन तरी की नाही याबाबतही साशंक आहे.
आपण कदाचित साशंक असाल पण सगळेच असतील असे नव्हे.

>> शाळेत मुलांना मोफत जेवण देण्याची योजना घ्या. कर भरणारे (म्हणजे खाऊनपिऊन सुखी असलेले) लोक कदाचित या योजनेची गरज नाही* असे सुचवतील कारण त्यांचे काही जळत नसते.
आपले जळत नाही ना मग देश गेला *ड्ड्यात, कदाचित असं विचार करणारी अशी लोक भारतात आहे हि किमान शक्यता तरी मान्य केल्याबद्दल आभारी आहे.

माझ्या मनात एक विचार आला आणि मी तो सर्वांना सांगितला. त्यावर आपण विचारपूर्वक प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
पण काही जणांना माझे विचार आवडले नाहीत असे दिसते, जर त्यांच्या भावना दुखविल्या गेल्या असतील तर क्षमस्व:

काही उत्तरे

>>पण एकदा का निवडून दिल्यानंतर भले त्याने आश्वासन दिले असेल त्याच्या विपरीत प्रतिनिधी वागत असेल तर ५ वर्षे का होईन त्याला सहन करावेच लागते. ह्यासाठी काही उपाय आहे का ?

परत निवडून न देणे हा उपाय आहे. माझ्या एकट्याच्या वाटण्याने काय होणार या म्हणण्याला काही अर्थ नाही. तुमच्या सारखे तुमच्या मतदारसंघातल्या लोकांना वाटत नाही असे समजावे. नाहीतर मतदारसंघातल्या बहुसंख्यांना पटवून द्यावे.

>>कदाचित अवलंबलेली जात नसेलही (आपला अभ्यास माझ्या पेक्षा नक्कीच जास्त आहे) पण ती चुकीची कशी काय ? आणि खर्चिक तरी कशी काय ? कदाचित अवघड अईल. त्यामुळे सरकारवर बरीच बंधने येतील हे मान्य. आपण नमूद केलेले शाळेत मुलांना मोफत जेवण देण्याची योजना घ्या हे उदाहरण खरच अस होईल असे मनाला पटत नाही.

खरेच होईल. माझ्या मुलीच्या अनुदानित शाळेने प्रत्येक पालकाकडून दुपारचे जेवण देऊ नये असे पत्र लिहून घेतले आहे. आणि सर्व पालकांनी ते आनंदाने दिले आहे.
"प्रत्यक खर्चाला मान्यता घेणे खर्चिक कसे" असा प्रश्न का विचारला ते कळत नाही. बजेटच्या कागदांबरोबरच सपोर्टिंग पेपर्स आणि मत देण्याचे फॉर्म अस्लेले बाड प्रत्येक नागरिकाला द्यायला नको काय? ते परत गोळा करून ऍनालाइज करून निष्कर्ष काढण्याची यंत्रणा उभारायला नको काय?
इथे एक कौल टाकला आहे. त्यावर काय ऍप्रूवल आपण द्याल ते सांगावे.

>>आपले जळत नाही ना मग देश गेला *ड्ड्यात, कदाचित असं विचार करणारी अशी लोक भारतात आहे हि किमान शक्यता तरी मान्य केल्याबद्दल आभारी आहे.
असे लोक भारतातच नाही तर सर्वत्र आहेत हे सत्य सर्व उपक्रमींना माहिती आहे. आणि ते कोणी नाकारल्याचे मी तरी अजून पाहिले नाही.
(फक्त असाच विचार करणारी लोकं आहेत हे बहुधा कोणी मान्य करणार नाही)

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

चांदनी ओ मेरी चांदनी

*ड्ड्यात

या शब्दात ख ला मास्क का केले आहे? खड्ड्यात या शब्दात झाकण्यासारखे काय आहे?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

आपला कौल बघितला,

आपला कौल बघितला,
प्रामाणिकपणे नमूद करतो कि आज तुमच्या कौलावर प्रतिक्रिया देण्यासाठी आज माझ्याकडे पुरेशी माहिती उपलब्ध नाही.
(पण ह्याचा अर्थ, उद्या पण नसेल असा नव्हे)

खूप विचारांती एकंच प्रश्न
खरच का खेळ इतके का महत्वाचे आहेत ?
(मान्य कि त्यातून आपण देशाला उत्पन्न मिळवून देऊ शकतो. पण खर्च करण्यात आणि उत्पन्न मिळविण्यात सुद्धा भ्रष्टाचार.
खरच फायद्याचा सौदा असेल का ?)
का नाही देऊ शकत आपण ते १५ हजार करोड त्या गरीब पीडितांना ? कित्येक खेडी तरी सुधारतील त्यातून.
१०-१५ खेडी जरी सुधारली तरी तो खरा फायदा नसेल का ?

फूल आणि भाकरी

पोट भरण्यासाठी दोन भाकरी आवश्यक असतील तर लोक एकच भाकरी खाऊन फूल विकत घेतात म्हणे!

सनातन प्रश्न

>>का नाही देऊ शकत आपण ते १५ हजार करोड त्या गरीब पीडितांना ?

हा सनातन प्रश्न आहे. पण तो तेव्हा उद्भवतो जेव्हा गरीब पीडितांना द्यायला १५ हजार करोड नाहीत असे सांगितले जाते. असे सरकार कधीच सांगत नाही.

दुसरे म्हणजे हे १५ हजार करोड रुपये ७५ करोड गरीबांना वाटले तर दर डोई २०० रु येतील.
१५ हजार करोड खर्च केले (खाल्ले) तरी त्यातले काही रुपये अप्रत्यक्षपणे गरीबांकडे जातात असे 'ट्रिकल डाऊन थिअरी' सांगते.

सध्या धान्य साठवायला गोदामे नाहीत म्हणून ते सडू दिले जात आहे. पण रेशनवर जास्त धान्य दिले जात नाही.

आता माझा एक प्रश्न. कलमाडी कंपनीने मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार केला ही बातमी सध्या मीडियात नसती तर कॉमनवेल्थ गेम्सची गरज नव्हती असे आपल्यापैकी किती जण म्हणाले असते?

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

हे वाचा

कृपया, टायेम्स ऑफ इंडिया मधील हि बातमी वाचा
How fair is it?

तुलना योग्य की अस्थानी

प्रथमदर्शनी तुलना मोठी विरोधाभासाची दिसते.

नेहरूस्टेडिअमसाठी १००० कोटी आणि लेह साठी १२५ कोटी.

पण ही तुलना योग्य आहे की नाही हे काही कळले नाही.

१२५ कोटी लेहच्या मदत कार्यासाठी पुरेसे पडले नाहीत अशा स्वरूपाची माहिती पुढे आल्याशिवाय ही तुलना अस्थानी होईल.
(पूर्वी २६ नोव्हेंबरच्या हल्ल्यात की कुठेसे मृत्यू पावलेल्याला ५ लाख आणि नेमबाजीत पदक मिळवलेल्याला २५ लाख अशी तुलनापण झाल्याचे आठवते).

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

पाप?

आपले जळत नाही ना मग देश गेला *ड्ड्यात, कदाचित असं विचार करणारी अशी लोक भारतात आहे हि किमान शक्यता तरी मान्य केल्याबद्दल आभारी आहे.

'इंटेलिजंट सेल्फिश पर्सन' या व्यक्तीला गेम थिअरीमध्ये सन्मानाचे स्थान आहे. (दीर्घ मुदतीचा स्वार्थ आणि 'घी देखा लेकिन बडगा नही देखा' प्रकारचा स्वार्थ, असे दोन प्रकारचे स्वार्थ असू शकतात.)

मस्त

प्रथमच ऐवढा चपखल प्रतिसाद वाचतोय ,फार मोठ्या गोष्टी एवढ्या सोप्या भाषेत सांगितल्याबद्दल धन्यवाद थत्तेसाहेब

लोकशाहीचे गुलाम

लोकशाहीचे गुलाम हा शब्दप्रयोग काळजाला भिडला. हुकुमशाहीत कसं मोकळं आणि सुटसुटीत असतं. सरकारवरच मुळात काही उत्तरदायीत्व नसतं. जनतेवर ती उत्तरं मागण्याची जबाबदारीच येत नाही. जनतेला काही अधिकारच नसले, आणि ते सर्वांना माहीत असलं की असल्या भंपक अपेक्षाच निर्माण होत नाहीत. दर पाच वर्षांनी साठ टक्के लोकांनी पिकनिकला वगैरे न जाता मतदान करायचं हे ओझं देखील नसतंच. बरं असले काही सरकारसुधारी विचार आले तर ते मांडण्याचीही जबाबदारी नसते. रवींद्रनाथ ठाकुरांनी तुमचे विचार वाचले असते तर 'लोकशाहीची गुलामगिरी नसणाऱ्या अशाच भारत देशात मला जागं कर' असं म्हटलं असतं.

थत्त्यांना बहुतेक लोकशाही व्यवस्थेचा फायदा होत असल्यामुळे त्यांनी जी तिची निरर्गल भलावणी केली आहे तिचा निषेध.

थत्ते नव्हे, पित्ते (लोकशाहीचे)

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

त्रिवार निषेध !

थत्त्यांना बहुतेक लोकशाही व्यवस्थेचा फायदा होत असल्यामुळे त्यांनी जी तिची निरर्गल भलावणी केली आहे तिचा निषेध.
त्रिवार निषेध !

  1. निषेध !
  2. निषेध !
  3. निषेध !

थत्ते नव्हे, पित्ते (लोकशाहीचे)
अगदी सहमत. थत्त्यांचा प्रतिसाद वाचून काहींची पित्ते खवळल्यास नवल नाही. लोकशाहीच्या चण्याफुटाण्यांपेक्षा हुकुमशाहीचे पिस्तेच प्रिय असतात.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

 
^ वर