पाण्याच्या बदलत्या रचनेची भाकडकथा ?

नळाला येणारे पाणी, तळ्यातून येणारे पाणी यातील रचना त्यातील प्रचंड दबावामूळे बदलते (म्हणजे H2O चे 2OH किंवा O2H )आणि मग हे पाणी शरीरात शोषण्यालायक फारच कमी प्रमाणात राहते. म्हणजे योग्यप्रकारे रचना असलेले पाणी शरीरात शंभर टक्के शोषले जात असेल तर असे कल्चर्ड किंवा संस्कारीत पाणी १०० टक्के शोषले जाते. अशा संस्कारीत पाण्याच्या नेहमी प्राशनामुळे बहिरेपणा, गुढगेदूखी, मानसिक ताणतणाव आदी प्रश्न चुटकीसरशी सुटतात.

हे संस्कारीत पाणी मिळवायचे कुठून? सोपे आहे. पंधरा हजाराच्या आसपास एक काचेची डिस्क (साधीसुधी नाही तर नासा आपल्या अंतराळात जो काच वापरते त्या काचेपासून बनलेली ) विकत घ्यायची आणि त्यावरून आपले कुठलेही पाणी पसार केले (?) की झाले त्याचे संस्कारीत पाणी तयार..

असे हे संस्कारीत पाणी सामान्य पाण्यापेक्षा दाहा ते पंधरा मिनिटे लवकर तापते. याची ऑक्सिजन धरून ठेवण्याची क्षमता साध्या पाण्यापेक्षा जास्त असते. फार पूर्वी ही विशिष्ट झऱ्याचे पाणी वापरून असाध्य रोग बरे झाल्याची उदाहरणे वानगीदाखल आहेतच. आज मात्र या संस्कारीत पाण्याचे स्प्रे सुद्धा मिळतात. कुणाला पाहीजे असतील तर अमुक अमुक क्रमांकावर संपर्क करा.

मंडळी ही कुठली जाहिरात नाही. (नजर रक्षा कवच किंवा महालक्ष्मी टाईप यंत्राची ) हा आहे आपल्या लाडक्या पूरोगामी चित्रलेखातल्या चालू ;) अंकातला मुखपृष्ठ लेख. असू द्या. एवढे अक्षरशः पाण्यासारखे पैसे खर्च करून मानवकल्याणाच्या योजना, आरोग्य सुविधा सरकार करते आहे. त्यापेक्षा पाण्यानेच तेही एका काचेच्या चकतीवरून पसार झालेल्या (की केलेल्या) जर इतके प्रश्न सुटत असतील तर त्याची जाहिरात ही व्हायलाच हवी.

पण या सारांशावरून तुमच्या मनात काही प्रश्नांचे काहूर माजले का? मग त्या प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत. ती या संस्कारीत पाण्याच्या समर्थकांनी द्यायला हवीत. पण या लेखात एक मजेशीर वाक्य आहे.

आम्ही या पाण्याची कुणावरही सक्ती करत नाही. कारण मनोभावे वापरले तरच या पाण्याचा उपयोग होतो. शंकाखोरांच्या पदरी फारसे काही पडत नाही.

म्हणजे हे झाले मारुतीच्या बेंबीतल्या गार वाटणाऱ्या विंचवासारखेच.

लेखनविषय: दुवे:

Comments

चित्रलेखा ???

हा लेख चित्रलेखातील "तो" लेख वाचून सुचलाय का ? मी ही त्यावरच लिहिणार होतो पण तुम्ही सुरुवात केली आहे तर पुन्हा नको.

मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com

तोच लेख

हो तोच लेख वाचून मनाचा उद्वेग झाला. असो असे पाणी खरेच असले तर निदान थोडे बरे वाटेल. म्हटले कुणीतरी याचा समर्थक भेटेल. असो. चित्रलेखातल्या पूरोगामी व सामाजिक विषयांवरच्या आस्थापूर्ण व सडेतोड लेखनामूळे हे साप्ताहिक वाचकप्रिय आहे. हा लेख मी बसमध्ये उसना घेऊन वाचला होता. आजच (दि. १६ ऑगस्ट) पूढचा अंक प्रसिद्ध झाला आहे (अंकाचा दिनांक २३ऑगस्ट). आपण वाचलेला अंक मिळवून पून्हा सविस्तर विचार करु. पण चार स्टॉल पालथे घालूनही मिळाला नाही. पून्हा चित्रलेखाचे अंक कधीच उरत नाही हे ही कळले. विशेष म्हणजे नव्या अंकात वाचक प्रतिक्रिया कुठलीच नाही याचेही आश्चर्य वाटले.

दुवा मिळेल का?

जालावर थोडीफार शोधाशोध केली. याचा दुवा मिळाला नाही.
गमतीदार विषय दिसतो.
नुकतेच वाचले की चित्रलेखा हे मराठीतले सर्वाधिक खपाचे नियतकालिक आहे.

प्रमोद

प्रश्न?

पण या सारांशावरून तुमच्या मनात काही प्रश्नांचे काहूर माजले का?

आम्ही या पाण्याची कुणावरही सक्ती करत नाही. कारण मनोभावे वापरले तरच या पाण्याचा उपयोग होतो. शंकाखोरांच्या पदरी फारसे काही पडत नाही.

लेखकाने विचारल्यामुळे मनात उठलेले(काहुर? छे!) इथे लिहीत् आहे, "दैव-वाद, ज्योतिष इ. चा यशस्वी फॉर्म्युला(अधोरेखित) बरोबर उचललेला दिसतो". :-)

-Nile

कुठे आहे?

मी नेटावर चित्रलेखाचा चालू :-) अंक चाळला पण मुखपृष्ठावर आपले सर्वांचे लाडके कलमाडी (मुकुटासहित) ;-) दिसतात. पाण्यावरला हा लेख कुठे आहे?

ऑनलाईन कुठे

मी सांगितलेला लेख चित्रलेखाच्या ९ ऑगस्ट रोजी प्रकाशित झालेल्या (अंकाची तारीख १६ ऑगस्ट) अंकातला आहे.

असो
चित्रलेखा नेटावर सुद्धा वाचायला मिळतो हे नव्याने कळले. कृपया दूवा द्याल का.

प्रतिसाद

चित्रलेखा मधल्या या मूळ लेखाला प्रतिसाद देण्याची माझी तरी कुवत नाही. डोक्याला हात लावून बसलो आहे झाले.
चन्द्रशेखर

पाण्याचे प्रकार

सगळे शुद्ध पाणी सारखे नसते

शुद्ध पाणी म्हणजे H2O हे सगळ्यांना माहित आहे. यात जर तर इतर काही पदार्थ मिसळले गेले तर निरनिराळ्या प्रकारचे पाणी मिळेल हे ही सर्वांना माहित असते. उदा. मिनरल वॉटर मध्ये अनेक क्षार असतात. तरीही शुद्ध पाणी सारखेच असावे असा आता पर्यंतचा विश्वास होता. पण आता ही समजुत चुकीची आहे असे आढळून आले आहे.

शुद्ध पाण्यात H2O या अणूंचे क्लस्टर असतात. म्हणजे २ अणु, ४ अणु, ५ किंवा १० वगैरे अणूंचे एक कडबोळे तयार झालेले असते व अशी कडबॊळी पाण्यात तरंगत असतात. कोणत्या प्रकारची किती कडबोळी आहेत त्या प्रमाणे पाण्याचे काही गुणधर्म बदलू शकतात. आणि असे पाणी शरीराला उपकारक किंवा अपकारक असू शकते.

मी चंद्रलेखा वाचलेले नाही व या माहितीचा त्या लेखाशी संबंध नाही.

शरद

वॉटर क्लस्टर

तुम्ही म्हणता ते क्लस्टर हेच का?

अवांतर - चित्रलेखात लिहिणार्‍यांच्या अनेक समविचारींची माहिती येथे सापडेल.

शिपाईगडी

संदर्भ

"कोणत्या प्रकारची किती कडबोळी आहेत त्या प्रमाणे पाण्याचे काही गुणधर्म बदलू शकतात"
काही दुवा आहे काय? काहीही ऍडिटिव न घालतासुद्धा कडबोळी बदलता येतात काय? मला वाटले की पाण्यात ही कडबोळी विशिष्ट प्रमाणात असतात आणि त्यांचे प्रमाण बदलता येत नाही.

"असे पाणी शरीराला उपकारक किंवा अपकारक असू शकते."
काही दुवा आहे काय?

"हिस्टेरेसिस" असावे

काही प्रमाणात हिस्टेरेसिस असावे. म्हणजे वितळलेला बर्फ हळूहळू गरम करत नेला, तर २५ डिग्री तापमानात ज्या प्रमाणात कडबोळी असतात, त्यापेक्षा वेगळ्या प्रमाणात उकळते पाणी थंड् करताना २५ डिग्री तापमानात असावी.
असे वाचल्याचे अंधुक स्मरते.
ही अतिशय अवांतर अंधुक आठवण देण्याचा मोह टाळता आला नाही.

मनाची शांती देणार्‍या अशा मालाच्या विक्रीबद्दल मला विरोध का करावासा वाटतो, याबद्दल विचार करत आहे. या मालाने मला मनःशांतीही मिळत नाही, हे आहेच. पण बाजारातल्या या वरकड, सहज गोळा करण्यासारख्या पैशांपैकी मला भाग मिळत नाहीत याबद्दल बहुधा असूया वाटत असावी.

प्लॅसिबो?

मनाची शांती खरीच मिळते का? ती कॉस्ट इफेक्टिव असते का?

नसली कॉस्ट-इफेक्टिव्ह तरी

नसली कॉस्ट-इफेक्टिव्ह तरी... बाजारात खळखळणार्‍या या वरकड पैशांच्या गंगेत माझे हात कसे धुवून घ्यावेत, असा (असूयायुक्त) विचार करतो आहे.

वॉटर क्लस्टर्स

वॉटर क्लस्टर्स संबंधी जालावर शोध करत असताना पाण्यासंबंधी माहिती देणारा हा दुवा सापडला. फारच छान माहिती दिली आहे. जरूर बघावा

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

असेल

7 वर्ष रसायनशास्त्र शिकतोय पण मला हि माहिति नविनच आहे बहुधा भारताला आणखी एक नोबेल मिळणार!

निरनिराळ्या प्रकारचे पाणी

रसायनशास्त्र हा माझा विषय नव्हे तरीही राहवत नाही म्हणून थोडा खुलासा करतो.
पाणी हे संयुग हायड्रोजन वायूचे दोन अणू व ऑक्सीजन वायूचा एक अणू यांच्या संयोगाने तयार झालेले असते.(H2O). हायड्रोजन वायूच्या अणूच्या न्यूक्लियसमधे एक प्रोटॉन व न्यूक्लियसच्या बाहेर एक इलेक्ट्रॉन यांची जोडी असते. आणखी दोन प्रकारचे हायड्रोजन अणू नैसर्गिक रित्या आढळतात. यातील दुसर्‍या प्रकारच्या हायड्रोजन मधल्या न्यूक्लियस मधे प्रोटॉन बरोबर एक न्यूट्रॉन असतो. य़ा प्रकारच्या हायड्रोजनला ड्यूटेरियम असे नाव आहे. अशा ड्यूटेरियम वायूच्या ऑक्सीजनबरोबर झालेल्या संयोगामुळे जे पाणी तयार होते त्याला जड पाणी (D2O)असे म्हणतात. तिसर्‍या प्रकारच्या हायड्रोजनमधल्या न्यूक्लियसमधे एका प्रोटॉन बरोबर दोन न्यूट्रॉन असतात. या हायड्रोजनला ट्रायटियम असे म्हणतात. ट्रायटियम वायू किरणोत्सर्गी असतो. फ्यूजन प्रकारच्या अणूबॉम्बमधे(हायड्रोजन बॉम्ब) ट्रायटियम व ड्यूटेरियम यांचा वापर केला जातो. ट्रायटियम वायू आण्विक पातळीवर अस्थिर असल्याने त्याचे ऑक्सीजन बरोबर स्थिर संयुग हो ऊ शकत नाही. O2H, 2OH अशा सांकेतिक खुणेने ओळखली जातील अशी कोणतीही संयुगे किंवा आयसोटोप्स अस्तित्वात नाहीत.
नैसर्गिक रित्या आढळणार्‍या पाण्यात २ टक्क्यापर्यंत जड पाणी आढळते. जड पाण्याची घनता साध्या पाण्यापेक्षा ११% जास्त असते. जड पाण्याचे गुणधर्म निराळे असले तरी नैसर्गिक रित्या आढळण्यात येणार्‍या प्रमाणात ते विषारी नाही.मात्र शुद्ध जड पाण्यात प्राणी जिवंत राहू शकत नाहीत. कोणत्याही व कसल्याही प्रकारच्या बशीमधे ते ठेवल्याने त्याचे साध्या पाण्यात रुपांतर होत नाही. शरदराव म्हणतात ती वॉटर क्लस्टर्स म्हणजे जड पाणी नव्हे.
साध्या पाण्यात कॅलशियमचे क्षार मिसळले गेले असल्यास ते कठिण होते. त्याचा जड पाण्याशी काही संबंध नाही. ती केवळ पाण्यातील अशुद्धता आहे.
चंद्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

वॉटर क्लस्टर्स म्हणजे जड पाणी नव्हे - सहमत

चित्रलेखात लेख लिहिणार्‍यांना हायड्रोजनचे आयसोटोप (डयुटेरियम व ट्रिटीयम) अभिप्रेत नसावेत. त्यांचे उपकरण हे हायड्रोजन ऑक्साईड (H2O) च्या रेणुंतील इंटरमोलेक्युलर फोर्स मुळे होणार्‍या मोलेक्युलर क्लस्टरशी संबंधीत आहे (हा त्यांचा दावा आहे, अचूक माहितीसाठी मुळ लेख / माहिती पुस्तक वाचावे लागेल).

शिपाईगडी

ह्यावरून आठवले.

कोणे एकेकाळी हरयाणाच्या कुठल्या तरी लालाने "हरयाणाच्या शेतकऱ्यांना शेतीसाठी जे पाणी मिळते ते शेतीसाठी फारसे उपयुक्त राहिलेले नाही. कारण त्यातली पावर सरकारने वीजनिर्मिती करून आधीच काढून घेतली आहे" अशा आशयाचे काहीसे विधान केले होते. त्याची आठवण झाली.

चर्चा मजेदार.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

पाणी

मूळ लेख अजून वाचायला मिळाला नाही. मात्र पाणी या विषयावर बरीच माहिती जमा होत आहे तेंव्हा अजून काही.

सोवियत रशिया असताना ते अगदी स्वस्त पुस्तके काढत असत. त्यात पाणी या विषयावर एक पूर्ण पुस्तक वाचले होते. पुस्तक गमतीदार होते आणि मला कधीच त्यातील माहिती तपासून पाहता आली नाही. (ही पुस्तके अधिकृत विज्ञान सांगतात असे नाही.) या पुस्तकानुसार जिवंत पाणी आणि मृत पाणी असे दोन प्रकार असतात. पाण्यात विरघळलेले वायु आणि खनिजे काढली तर पाणी मृत होते असे एक म्हणणे होते. पाण्याचे क्लस्टर असे असते की ज्यामधे बॅक्टेरिया सहज राहू शकतो. मात्र हेच क्लस्टर मोडले तर त्यात तो राहू शकत नाही. असे पाणी प्यायले तरी ते शरीरात ते शरीरात शोषले जात नाही.

दुसरी एक गमतीदार आठवण. एक दोन वर्षांपूर्वी एक जण चुंबकीय पाणी खपवायसाठी माझ्या कडे आला होता. एका पाईपलाईन च्या मार्गात त्याने दोन चुंबके बसवली होती. त्यामधून जाणारे पाण्याने शेती केली की त्यातून पीक जास्ती मिळते असा त्याचा दावा होता. फार मोठा व्यवसाय करणारा हा माणूस नव्हता. स्वतःच्या शेतात त्याने गंमत म्हणून बसवले (स्वतःच तयार करून) आणि त्याला लक्षात आले की पीक जास्ती येते. मग त्याची बातमी इतर शेतकर्‍यांकडे गेली व त्यांनाही त्याचा फायदा झाला. याचा फायदा होतो असे त्याला दाखवायचे होते म्हणून त्याने औरंगाबादेतील (किंवा जवळपास) एका कृषीमहाविद्यालयास याची चाचणी घ्यायला सांगितले. त्या लोकांनी दोन वाफे लाऊन त्याची चाचणी घेतली. आणि खरोखर पीक वाढते असा त्यांचा निष्कर्ष आला! ही सर्व माहिती त्याने दाखवायला आणली होती. त्यानंतर त्याच्या डोक्यात आले की जर सिमेंटमधे ते पाणी वापरले. तर होणार्‍या कॉन्क्रीटची स्ट्रेन्थ वाढते. त्याने तसा घरगूती प्रयोग केला होता. मग ती सर्व माहिती घेऊन तो माझ्या माहितीच्या बांधकामव्यावसायिकाकडे आला. (त्याने त्याला माझ्याकडे पाठवले.) मी फक्त त्याला सांगितले की 'तू इथल्या इंजिनियरिंग कॉलेज मधे जाऊन याची शहानिशा करू शकतोस. आणि त्यांनी शहानिशा केली की मी माझ्या मित्रांना तसे कळवीन. यानंतर तो मला भेटलेला नाही.

प्रमोद

सुरुवात

इसापनीतीतील, गुंजा फुंकणार्‍या माकडांची गोष्ट आहे आठविली.
डॉ. मराठे यांनी वरुणयंत्र अशाच 'नम्र वैज्ञानिक दृष्टिकोना'तून सुरू केले असावे. पाया मजबूत नसला की, आधी स्वतःच फसणे आणि मग त्यातील चूक समजली तरी इतरांना फसविणे, या पुढच्या पायर्‍या अपरिहार्य वाटतात.

शेतीला चुंबकीय पाणी

हे पहा अजुन एक चुंबकीय पाणी वाले.

शिपाईगडी

आमचे चाराणे...

कालच्या रविवारी लोकसत्तात वाचले. "गृहस्वामिनी गरोदर असताना चुकूनही घराचे बांधकाम सुरु करु नये."

त्याआधीच्या अंकात - "घरात बेडरुममध्ये कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेऊ नयेत. अशा वस्तूंमधून सतत घातक किरणे बाहेर पडत असतात जी शरीरावर परिणाम करतात."

आता याचा या लेखाशी, त्यातल्या पाण्याशी काही संबंध नाही. पण इतर उपक्रमींचा संभाव्य धोक्यांपासून बचाव करण्यासाठी जनहितार्थ माहिती दिली आहे.

==================

डुंबा हो रे डुंबा हो रे डुंबा हो रे!

नक्कीच

केकता आणि इंडिया टीवी यांची किरणे घातक असतात अशी माझी खात्री आहे.

 
^ वर