कुटुंब आणि व्यक्ती

दुसर्‍या एका धाग्याला प्रतिसाद म्हणून प्रथम हे लिहिण्यास सुरवात केली. परंतु नंतर असे वाटले की हा फारच गुंतागुंतीचा विषय असल्याने नवीन धागाच सुरू करावा.
भारतीय समाजात तीस चाळीस वर्षांपूर्वी असलेली एकत्र कुटुंब पद्धती व गेली काही वर्षे जास्त प्रचलित झालेली विभक्त कुटुंब पद्धती या बद्दल दुसर्‍या धाग्यांवर लिहिले गेले आहेच. या दोन्ही पद्धतीतले गुण दोष, फायदे, तोटे हे आपण सर्व अनुभवतो आहेच. परंतु यापुढे जाऊन पुढच्या पाच दहा वर्षात कुटुंब पद्धतीमधे काय बदल होतील असे दिसते आहे याचा विचार मी येथे करणार आहे. कोणत्याही कुटुंब पद्धतीत कुटुंब हे समाजाचा सर्वात लहान घटक असते. त्या कुटुंबातील सर्व व्यक्ती एकत्रितपणे आपले प्रश्न सोडवताना दिसतात. आपल्या देशातील कुटुंब पद्धती ही पुरुष प्रधान असल्याने लग्न होऊन त्या कुटुंबात आलेली स्त्री, त्या कुटुंबाचा भाग बनते. या साठी आपल्या आई-वडीलांच्या घराचा त्याग ती करतेच व त्याच बरोबर नवीन घराच्या रुढी परंपरा यांचे तिने पालन कराव्या अशी तिच्याकडून अपेक्षा असते.
पुढे येणार्‍या समाज रचनेत ही कुटुंब पद्धती हळू हळू नष्ट होऊन त्या जागी व्यक्ती प्रधान पद्धती येणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. सध्याच्या समाज रचनेतील सर्वात लहान घटक किंवा एकक, कुटुंब हे असते. त्या ऐवजी व्यक्ती हे एकक राहणार आहे. त्यामुळे एकत्र राहणार्‍या स्त्री-पुरुष किंवा समलिंगी जोडप्यातील (विवाह झालेली किंवा न झालेली) दोन्ही व्यक्ती या पूर्णपणे स्वतंत्र असणार आहेत. शारिरीक किंवा मानसिक गरज म्हणून त्या दोन व्यक्ती एकत्र राहतील एवढेच. मोठ्या शहरांच्यात लिव्ह-इन रिलेशनशिप्स सुरू झालेल्या दिसत आहेतच. सध्या त्यांचा प्रसार मुख्यत्वे समाजातील वरच्या घटकात असला तरी तो मध्यमवर्गापर्यंत पुढच्या काही वर्षात निश्चित पोचेल असे मला वाटते. अशी व्यक्तीनिष्ठ समाजरचना प्रचलित झाल्यावर जर मुले झाली किंवा दत्तक घेतली गेली तर त्यांचे भावनिक प्रश्न, व्यक्तीवर अवलंबून कोणी इतर व्यक्ती असल्या तर त्यांचे प्रश्न या सारख्या अनेक समस्या समाजासमोर उभ्या रहाणार आहेत. उपक्रमवर अनेक परदेशवासी व्यक्ती लिहित असतात. त्या समाजात ही व्यक्तीनिष्ठ पद्धत बर्‍याच जास्त प्रमाणात रुढ होते आहे असे मला वाटते. त्या दृष्टीने या मंडळींचे तिथले अनुभव काय आहेत हे ही मला जाणून घेणे आवडेल. तसेच भारतात असलेल्या उपक्रमवासियांचे या विषयाबद्दल काय मत आहे हेही रोचक ठरावे.
एक गोष्ट नक्की की हॅ! असे काही होणार नाहीये! असे म्हणून दुर्लक्ष करण्यासारखा हा बदल नाही.
चंद्रशेखर

लेखनविषय: दुवे:

Comments

छान विषय आणि मांडणी

परदेशस्थ उपक्रमींचे अनुभव वाचायला उत्सूक आहे

(मायदेशस्थ) ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

एकाच माणसाचे कुटुंब !

सुरेख विषय...

`एकाच माणसाचे कुटुंब` असे चित्र उद्या दिसल्यास नवल नाही. नव्हे; तसे ते दिसणारच आहे.

आजच्या एवढी व्यामिश्रता रोजच्या जगण्यात नसतानाच्या काळातील माणसाचे व्यक्तिमत्त्व दुभंगलेपणापुरतेच (split) मर्य़ादित होते. आजचा माणूस शतभंग होऊ घातला आहे. तो स्वतःच तसा बनू पाहत आहे.

आयुष्य साठवावे एका क्षणात सारे
जगणे जगून घ्यावे एका क्षणात सारे

अशी त्याची अवस्था झाली आहे.

सविस्तर प्रतिसाद नंतर नक्कीच देईन.

त्या समाजा आधी...

परदेशी समाजाकडे वळण्याऐवजी परदेशी जाणार्‍या आपल्याच समाजाचे उदाहरण देते.

हल्ली आयटी नोकर्‍यांच्या निमित्ताने किंवा पुढील शिक्षणाच्या निमित्ताने अमेरिकेत नवरा आणि बायको सर्रास विभक्त राहताना दिसतात. उदा. आयटीतील मुलीशी लग्न करून नवरा तिला अमेरिकेत बोलावतो. तिथे बोलावल्यावर तिचा एच-१ विसा मंजूर करून घेतो आणि नंतर नोकरी शोधली जाते. नोकरी नवर्‍याच्या गावात मिळाली नाही तर इतरत्र शोधावी लागते. त्यातून वेगळे घर, भाडे, इतर खर्च वगैरे येते. माझ्या ऑफिसातील एकाची बायको टेक्सासला राहते आणि तीन-तीन महिने नवरा बायकोची भेटही होत नाही. या दांपत्याला एक मूल आहे ते त्यांनी आपल्या आईवडिलांकडे भारतात ठेवले आहे.

अमेरिकेत असणारी भारतीय दांपत्ये सर्रास असे करताना आढळतात.

हा अपवाद आहे का सर्रास प्रकार आहे?

>>अमेरिकेत असणारी भारतीय दांपत्ये सर्रास असे करताना आढळतात.

हा अपवाद आहे का सर्रास प्रकार आहे? मी गेली ४ वर्षे अमेरिकेत आहे आणि तुम्ही म्हणता तशी काहीच दाम्पत्ये माहित आहेत. मात्र एकूण अशा भारतीय अमेरिकेन लोकसंख्येच्या मानाने हे प्रमाण अतिशय कमी असावे असे वाटते. (अशा याचा अर्थ दोघेही नोकरी करणारे कुटुंब). माझ्या पाहण्यात दोघेही नोकरी करत असतानाही एकत्र राहणारी दाम्पत्येच जास्त आहेत हा योगायोग आहे का काय हे माहित नाही.

मात्र चंद्रशेखर यांच्या मताशी सहमती दर्शवतो. भारतातील समाजव्यवस्था दिवसेंदिवस कुटुंबकेंद्रित न राहता व्यक्तीकेंद्रित होत जाणार हे निश्चित! अर्थात हा बदल ज्या वेगाने मोठ्या शहरांमध्ये होईल/दिसून येईल तितक्या वेगाने तो छोट्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये पसरेल का याबाबत साशंक आहे. भारतातील विवाहसंस्था विशेषतः अशा छोट्या शहरांमध्ये आणि गावांमध्ये येत्या अनेक वर्षांपर्यंत सुधृढच राहील असे वाटते.

अपवाद नाही

अमेरिकेत असणारी भारतीय दांपत्ये सर्रास असे करताना आढळतात.

असे म्हटल्याने जनरलायझेशन झाल्यासारखे वाटत असेल तर तो माझ्या लिखाणाचा दोष.

पण,

ज्या दांपत्यांचे मी वर्णन केले (आयटी, स्वतःचा आणि जोडीदाराचा एच-१ आणि लहान मूल) त्यांच्यात हा प्रकार सर्रास आहे. अपवाद नक्कीच नाही. माझ्या गेल्या प्रोजेक्टमध्ये माझ्यासकट कुटुंब असणारे ९ भारतीय होते. त्यापैकी ७ जणांची स्थिती वर दिल्याप्रमाणे होती. आठवा स्वतः ५ दिवस बाहेर राहून सप्ताहाखेरीस घरी जात असे. त्याची बायको नोकरी आणि मुले सांभाळत असे आणि ९वी मी. (सध्या अशी परिस्थिती नाही. एच-१ ही नाही)
याव्यतिरिक्तही, अशी अनेक कुटुंबे पाहण्यात आहेत. प्रत्यक्षात आणि नेटावरही.

माझ्या पाहण्यात दोघेही नोकरी करत असतानाही एकत्र राहणारी दाम्पत्येच जास्त आहेत हा योगायोग आहे का काय हे माहित नाही.

हे तुम्ही अमेरिकेत कोठे राहता यावर अवलंबून आहे. दोघांना नोकरीची संधी एकाच शहरात नसेल तेव्हा हे होणे साहजिक आहे.

रोचक विषय

नक्कीच रोचक व स्वतंत्र चर्चा विषय आहे.

वाचतो आहे.

प्रयत्न

त्यामुळे एकत्र राहणार्‍या स्त्री-पुरुष किंवा समलिंगी जोडप्यातील (विवाह झालेली किंवा न झालेली) दोन्ही व्यक्ती या पूर्णपणे स्वतंत्र असणार आहेत. शारिरीक किंवा मानसिक गरज म्हणून त्या दोन व्यक्ती एकत्र राहतील एवढेच. मोठ्या शहरांच्यात लिव्ह-इन रिलेशनशिप्स सुरू झालेल्या दिसत आहेतच. सध्या त्यांचा प्रसार मुख्यत्वे समाजातील वरच्या घटकात असला तरी तो मध्यमवर्गापर्यंत पुढच्या काही वर्षात निश्चित पोचेल असे मला वाटते. अशी व्यक्तीनिष्ठ समाजरचना प्रचलित झाल्यावर जर मुले झाली किंवा दत्तक घेतली गेली तर त्यांचे भावनिक प्रश्न, व्यक्तीवर अवलंबून कोणी इतर व्यक्ती असल्या तर त्यांचे प्रश्न या सारख्या अनेक समस्या समाजासमोर उभ्या रहाणार आहेत. उपक्रमवर अनेक परदेशवासी व्यक्ती लिहित असतात. त्या समाजात ही व्यक्तीनिष्ठ पद्धत बर्‍याच जास्त प्रमाणात रुढ होते आहे असे मला वाटते. त्या दृष्टीने या मंडळींचे तिथले अनुभव काय आहेत हे ही मला जाणून घेणे आवडेल.

व्यक्तीनिष्ठ म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप्स किंवा दोन व्यक्तींनी एकत्र लग्नाखेरीज राहणे एवढेच म्हणायचे असल्यास त्याचे स्वरूप आपल्याला वाटते तेवढे सरळ सोपे नसते - बाहेरून पाहिल्यास अशा व्यक्ती अतिशय स्वतंत्र दिसतात, असतातही. पण घरातील व्यक्तींची काळजी घेणे, आणि आजारपणे काढणे हे जसे आपल्याकडे करावे लागते तसेच येथेही लोक आपापले व्यवसाय सांभाळून करताना दिसतात.

तुम्ही चर्चेला घेतले आहे म्हणून समलिंगी जोडप्याचे पाहिलेले उदाहरण देते -आम्ही पूर्वी भाड्याच्या घरात तळमजल्यावर राहत होतो, त्या घराची मालकीण ही समलिंगी जोडप्यातील एक होती. तिची पार्टनर आणि ती एका घरात राहून तिच्या वृद्ध (८५+) वडिलांकडे लक्ष ठेवून होत्या. वडील तिच्याच घरात खालच्या मजल्यावर राहत आणि ती वर ऍटिकमध्ये. वडील स्वतःला सांभाळून होते. वीकएंडला बाहेर जाताना त्या शेजार्‍यांना सांगून जात पण त्याखेरीज वडिलांना ग्रोसरी करताना, त्यासाठी गाडी घेऊन बाहेर पडताना मी पाहिले नाही, त्या बहुतेक त्यांची सर्व व्यवस्था करून मग बाहेर जात. त्या जाण्याला वडिलांनी आडकाठी आणली नसावी, कारण सर्वांचे संबंध अतिशय प्रेमळ उत्तम होते. वडील ऐकू येत नाही, म्हणून अतिशय मोठ्याने टीव्ही लावत. इतके, की आमच्याही मजल्यावर तो ऐकू येई. पण त्या (तिची पार्टनरही) कधी बोलत नसत. समारंभांमध्ये वडिलांना सामील करून घेत, कधी तिच्या भाच्या/भाचरे येत. तिच्या पार्टनरच्या कुटुंबाला पाहिले नाही, पण ज्या पद्धतीने त्या शेजार्‍यांशी बोलत वागत ते पाहिले तर पार्टनरच्या कुटुंबातील व्यक्तींशीही त्यांचे वागणे चांगले असावे असे वाटते.

हे एक उदाहरण झाले. दुसरे उदाहरण एका एकुलत्या एक मुलीचे. ती स्वतः ५० वर्षांची आहे, आणि आजारी आईला घरीच सांभाळते.

याचा अर्थ हे सर्व उत्तम आहे असा नाही. जेव्हा परिस्थिती चांगली नसते तेव्हा कुरबुरी असतात. घटस्फोट झालेल्या घरांमध्ये मुलांना आईवडिलांचे नवीन बॉयफ्रेंड/गर्लफ्रेंड या कल्पनांचा स्विकार करावा लागत असावा. शिवाय एकट्याने सर्व संसार करणे, मुलांचे संगोपन करणे हे अतिशय कठीण आहे. मित्र/शेजारी/बॉयफ्रेंड/नातेवाईक लागतातच. शिवाय मुलांना शिकवायचे, त्यांना मोठे करायचे, तेही कोणाच्या आधाराशिवाय, घराला लागणारे पैसे एकट्याने मिळवायचे हे करण्यासाठी कोठूनतरी ओढूनताणून धैर्य आणावे लागते असे वाटते. जड जातच असावे.

पण भारतातही वेगळे अपेक्षांचे ओझे असते. आपल्या अपेक्षांमध्ये बर्‍याचदा सर्वच अपेक्षांची सरमिसळ असते. म्हणजे (विशेषतः) संसारातील स्त्रीने रोज दोन वेळा सकस (आपल्या पद्धतीचा) स्वैपाक केला पाहिजे. पोळ्या तर करायला बाई आहे, मग घरात आल्यावर काय एक भाजी, किंवा रस्सा, भात/आमटी तर करायचे असते असे बरेच लोक म्हणताना दिसतात. बाहेरचे ८ तास काम करून आल्यावर मन प्रसन्न ठवून परत घरगुती वातावरणात पटकन शिरले पाहिजे. पण मुळात हे दोन चेहरे ठेवणे कठीण होत जाते. असे बरेच काही अपेक्षांमध्ये असल्याने कुरबुरी सुरू होतात असे दिसते. इथे अजून काही विचार व्यक्त केले आहेत http://mr.upakram.org/node/2724#comment-44027

भारतातील लोकांची मतेही कळावीत :)

'सगळेच सारखे असतात' हे गृहितक पटले नाही.

सध्याच्या समाज रचनेतील सर्वात लहान घटक किंवा एकक, कुटुंब हे असते. त्या ऐवजी व्यक्ती हे एकक राहणार आहे.
'सगळेच सारखे असतात' हे गृहितक वरील वाक्यातून व्यक्त होत आहे. ते पटले नाही.

'कुटुंब आणि व्यक्ती' ह्या विशयावरील या चर्चेत एक गोश्ट गृहित धरली गेलेली आहे ती म्हणजे या जगात सगळ्यांच व्यक्तींची शाररीक क्शमता, बौद्धिक क्शमता, मानसिक क्शमता, आर्थिक क्शमता सारखिच असणार/ होणार. मुळात म्हणजे ह्या क्शमतांमधील तफावत असणं वा नसणंच एखादे कुटुंब एकत्र ठेवण्याचे वा त्याला तडा जावून त्यातून स्वतंत्र होवून नवीन एकापेक्शा जास्त कुटुंब होणाचे ठरविले जाते.
एकत्र कुटुंब हे मुलतः लहान मुलं, वृद्ध स्त्री-पूरूश, अपंग-आजारी सदस्य यांच्यासाठीच सोयीचे असते. ही मंडळी पहिल्या वलयात येतात. वयात येणार्‍या/आलेल्या तरुणांना विद्यार्जनासाठी घरापासून गरज भासल्यास जावेच लागणार/ जायलाच हवे. जी मंडळी शरीराने प्रौढ असून वृत्तीने बालिश, पोरकट, जबाबदारी न घेणारे हे दुसर्‍या वलयात येतात. (हि मंडळी कमीत कमी वा नसतील तितके ते कुटुंबासाठी चांगले असते.) वरच्या व सगळ्यात शेवटच्या वलयात जबाबदारी घेणारे, जबाबदारीची जाणिव बाळगणारे प्रौढ स्त्री-पुरूश येतात.
ह्या शेवटच्या वलयातील स्त्री किती सोशिक व पुरुश किती कणखर मनोवृत्तीचे असतात, त्यावर ते कुटुंब किती काळ एकत्र राहून त्या वृक्शाचा वटवृक्श होवू शकतो हे बेतलेले असते.

एकत्र राहण्याचा दुसरा प्रकार असतो, 'जवळपासच घर घेवून राहणं' याचा. एकाच छताखाली परीवार जसा मोठा होत जातो, तसतसा तो एकाच घरात राहू शकत नाही. तेव्हा जवळपास घर घेवून संबंध टिकवले जातात/ जात आहेत. जुन्या पद्धती प्रमाणे एकाच मोठ्या घरात सगळ्यांनी एकत्र राहणं हे मोठ्या शहरात शक्य होत नाही. मनाने ती मंडळी एकत्रच असतात.

सगळे सारखे कसे?

सध्याच्या समाज रचनेतील सर्वात लहान घटक किंवा एकक, कुटुंब हे असते. त्या ऐवजी व्यक्ती हे एकक राहणार आहे.
या वाक्यातून सगळेच सारखे असतात हे गृहितक कसे व्यक्त होते? ते समजले नाही. या वाक्याचा अर्थ एवढाच आहे की अशा घटकात ज्या व्यक्ती एकत्र राहिलेल्या असतील त्यापैकी कोणत्याही व्यक्तीच्या जीवनातील समस्या किंवा आनंद हा फक्त त्या व्यक्तीचा असणार आहे. एकत्र राहणार्‍या सर्वांनी मिळून तो शेअर करावा अशी अपेक्षा राहणार नाही.
श्री. रावले तुम्ही अजून एकत्र कुटुंब पद्धतीचे पुरस्कर्ते आहात असे दिसते. त्यामुळे तुमचा वैचारिक गोंधळ उडाला असावा असे तुमच्या प्रतिसादावरून मला वाटते. या चर्चेत तुम्हाला, मला कोणती कुटुंब पद्धती आवडते हा मुद्दा नाही. पुढच्या कालात जी समाज रचना येऊ घातली आहे असे मला वाटते त्यात जे प्रश्न निर्माण होणार आहेत त्याला तोंड कसे द्यायचे? हा या चर्चेतला मुख्य मुद्दा आहे.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

'एकत्र रहायचं कशासाठी?' हे आधी स्पश्ट केलेले बरे!

चंद्रशेखर साहेब,
माझा वैचारिक गोंधळ उडाला असता, तर मी प्रतिसाद दिलाच नसता. मी देखील चर्चाच करीत आहे. मी समस्येवर उत्तर दिलेले नाही.

मी 'एकत्र कुटुंब म्हणजे काय?' व 'ते कशावर आधारलेले असते?' ह्या विशयाचे स्वरूप स्पश्ट केले होते.
तुम्ही काळानुसार भावनेने संकुचित होवून जगणे कसे होत जाईल हे सांगत आहात. पण ते सांगताना एकत्र राहयचं कशासाठी? गरज काय? ह्या प्रश्नांकडे तुम्ही डोळेझाक करीत आहात. आपण एकच लॉजिक मांडत आहात.

येत्या काळात, काळ परीस्थितीच्या अनुशंगे प्रत्येकाला स्वतःबाबत परीपूर्ण न होता स्वतःचे सुख पाहता-पाहता दुसर्‍यावर अवलंबून राहण्यास भाग पाडणार आहे. हे मी जाणून आहे. इथे काही मंडळी एखाद्या काल्पनिक एकत्र कुटुंबाबाबत म्हणत आहेत, जसे कि, सगळे एकत्र बसून, ठरवून निर्णय घेतले जायचे, एकत्रच सगळ्या गोष्टीचा आनंद घेतला जायचा वैगरे-वैगरे. हे ललित कथा-कादंबर्‍यांमधली वाक्ये आहेत. प्रत्यक्शात तसे नसते.

'एकत्र कुटुंबातील घरातला कर्ता पुरुशच निर्णय घेतो/घ्यायचा/घेणार.'
'एकत्र कुटुंब' ह्या व्याख्येत बसण्यासाठी (पुरुश) पती- (स्त्री) पत्नी दोघेही जीवंत असले पाहिजे, त्यांमध्ये सुसंवाद असला पाहिजे.
त्या घरातील कर्त्या पुरुशाची पत्नी वा कर्ता पुरूश यांना वृद्धत्व/आजारपण/वा त्यांचा मृत्यू झाला कि ते कुटुंब संपले. म्हणजे त्या कुटुंबाला 'एकत्र कुटुंब' ह्या (आदर्श)संकल्पनेत धरता येणार नाही.

उदाहरणः
श्री. बाळ ठाकरे, श्री. शरद पवार सद्द्याच्या काळातले हे दोन पुरुश कर्तुत्ववान आहेत.
श्री. बाळ ठाकरे यांच्या पत्नी हयात होत्या तोपर्यंत ते त्यांच्या कुटुंबातील कर्ता पुरुश होते. वृक्शाचा वटवृक्श होणे म्हणजे काय? ह्या प्रश्नाचे उत्तर श्री. पवार व ठाकरे यांच्या मानवी संबंध कसे हाताळायचे? हे यांच्याकडून शिकता येईल. पुरुशाचे कुटुंबातील कर्तेपण त्याची पत्नी त्याच्या सोबत असेपर्यंतच अवलंबून असते. श्री. ठाकरे यांना त्यांच्या पत्नीनिधनानंतर त्यांना यश हुलकावणी देवू लागले.

श्री. पवार यांची घौडदौड अजून ही चालूच आहे. फरक एवढाच कि त्यांना तीयनिच्या चालीमुळे देशाचा पंतप्रधान होण्या एवजी आय.सी.सी. च्या चेअरमनशीपवर त्यांना समाधान मानावे लागत आहे....जाना था जापान पहुंच गये चीन समझ गये ना?

येत्या काळात, व्यक्तिमत्वात दुभंगलेपणा येत जाण्याने बर्‍याच जणांना, 'नातेसंबंध कसे टिकवायचे?', 'का टिकवायचे?' ह्या विशयाचा पेपर देणं जड जाईल. हे मला अधोरेखीत करायचे आहे.

समलैगिंकाचा विचार मी केलेले नाही. समलैगिंकाचे 'एकत्र कुटुंब' होवूच शकत नाही. जिथे बीज नाही, धरणी नाही तिथे वृक्श कसा उभा राहिल?

बीज

"बीज हे जनुकीयच असावे" हे बंधन मानवांच्यात शिथिल झाले आहे असे वाटते.
काही लोक पोटच्या मुलांना वारसाहक्कातून बेदखल करून इतरांना मालमत्ता देऊन टाकतात. वैचारिक मतभेद, उदा. धर्म/राजकीय मते बदलणे, हे त्याचे एक कारण असू शकते. (सत्यरंजन साठे यांनी लिहिलेल्या समान नागरी कायद्याच्या मसुद्यातही अशी सोय होती असे स्मरते.)
काही भिन्नलिंगी जोडपी दत्तक स्वीकारून त्याच्यावर प्रेम करतात. हे दत्तक मूल मूळ पालकांचे घराणे सोडून नव्या पालकांचे घराणे चालविते. यालाही, 'मीम चे सातत्य' असे संबोधिता येईल.
ग्रीक समलैंगिकतेमध्ये गुरू-शिष्य नाते अपेक्षित होते. असा शिष्य मोठा झाल्यावर गुरूची भूमिका वठवीत असे. यात जनुकीय सातत्य नसले तरी त्याला मानसिक सातत्य म्हणता येते.

व्यक्तिप्रधान पद्धत

पुढे येणार्‍या समाज रचनेत ही कुटुंब पद्धती हळू हळू नष्ट होऊन त्या जागी व्यक्ती प्रधान पद्धती येणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

व्यक्तीप्रधान पद्धत म्हणजे नेमकी कशी यावर अधिक उहापोह हवा असे वाटते. म्हणजे पूर्वी एखादा निर्णय घ्यायचा झालास कुटुंब ते मिळून घेत असे (सहसा असे होत असे का ते माहित नाही कारण कुटुंबात एक प्रमुख असतो), अडचणींचे निराकरण, आनंद-दु:ख यांची वाटणी होई. व्यक्तिप्रधान पद्धतीत हे सर्व होणार नाही किंवा इतरांवर अवलंबून राहणे शून्यवत होईल. या व्यतिरिक्तही इतर काही होईल का?

परंतु, व्यक्ती एकटी राहण्याची आणि एकट्याने प्रपंच सांभाळण्याची, संसार करण्याची उदाहरणे याआधीही दिसतातच.

गुंतागुंत राहील

एकक कुटुंब न राहाता व्यक्ती असेल, या विचाराचा वेध उपयुक्त आहे. मात्र उत्तर शोधता शोधता प्रश्नच बदलेल असे मला वाटते.

सकृद्दर्शनी पुढील दोन वाक्यांत काही अंतर्गत विरोध वाटत नाही

"दोन्ही व्यक्ती या पूर्णपणे स्वतंत्र असणार आहेत. शारिरीक किंवा मानसिक गरज म्हणून त्या दोन व्यक्ती एकत्र राहतील एवढेच."

थोडा अधिक विचार करता असे वाटते की वरील "पूर्णपणे" आणि "गरज" हे शब्द एकमेकांच्या विरोधात आहेत, असे जाणवते, आणि त्यातून नवीन विचार स्फुरतो. गरज आहे आणि एकमेकांना गरज पुरवली जाते, म्हणजे परस्परावलंबन. हे पूर्ण-स्वातंत्र्यापेक्षा वेगळे आहे.

आता "गरज" मध्ये दीर्घकालीन पराकोटीच्या विश्वासार्ह ओळखीमुळे मिळणारी मानसिक शांती ही भावनिक गरज असेल, तर हे सहकार्य टिकाऊ असू शकेल. व्यक्तीचेच गणित न होता परस्पर-विश्वासाच्या-गरजेचे गणित होईल. आणि या गणिताला भविष्यात "कुटुंबसंस्थेचे एकक" मानता येईल.

मुले जन्मता किंवा दत्तक घेता आणखी एक कंगोरा लक्षात घ्यावा लागतो. एक तरी पालक आणि मूल/मुले हे प्रौढ-बालक-समूहाचे एकक पुढील बरीच दशके तरी राहीलच.

काही समस्या जातील आणि अन्य समस्या उभ्या राहातील, हे खरेच. एक जोडीदार दुष्ट आहे, तरी दुसरा जोडीदार बद्ध राहातो, भरडला जातो, ही समस्या थोडी कमी होईल.

मात्र एक जोडीदार एकत्र राहाण्यासाठी अधिक आर्थिक/भावनिक गुंतवणूक करतो, तरी दुसरा जोडीदार एकतर्फा सोडवणूक करून घेतो, ही समस्या वाढेल.

समस्या जशीजशी स्पष्ट होईल, तसे ती समस्या सोडवण्यासाठी सामाजिक रिवाज किंवा कायदे बनतील. पण समस्येचे स्वरूप आणि तपशील स्पष्ट होईस्तोवर हे इलाज काय असतील, हे सांगताच येणार नाही.

संयुक्त राज्यांत (अमेरिकेत) एक समस्या अशा रीतीने स्पष्ट झाली. लग्नाच्या किंवा बिनलग्नाच्या जोडीचे विभाजन झाले, आणि जोडीला मुले असली, तर काय? मुलांची भावनिक फरफट होईल, त्याबद्दल समाज फार करू शकत नाही. मात्र ज्या जोडीदाराकडे मुले राहातात, त्या कुटुंबाला दर मुलामागे आर्थिक पुरवठा सोडणार्‍या जोडीदाराला करावा लागतो. (मग लग्न नसेलका झालेले.)

माझ्या ओळखीतली एक (तितकी दु:खी नाही) अशी कथा सांगावीशी वाटते. माझा एक तरुण मित्र आता साधारण २२ वर्षांचा आहे. त्याचे लग्न जेमतेम १८व्या वर्षी झाले होते. आणि लगेच तो सेनेत भरती होऊन इराक युद्धात गेला. वियोगकाळात दोघांची एकमेकांविषयीची जोडीदार-भावना कोरडी पडली. मात्र सद्भावना राहिली. पत्नीला अन्य प्रियकरासोबत मूल झाले. माझा मित्र परत आलेला आहे, आणि त्याच्यापुढे थोडासा कठिण प्रश्न आहे. मूल त्याचे नाही याबद्दल कोणाला शंकाच नाही. मात्र सरकारदरबारी डीएनए चाचणी लागते. त्यामुळे राज्य सरकार त्याच्या पगारातला भाग परस्पर कापून घेते आहे. माझ्या मित्राला सध्या तरी "पत्नी"बद्दल सद्भावना आहेच. आणि सैन्याच्या इस्पितळात पत्नी आणि पत्नीचे मूल इलाज घेऊ शकतात, याबद्दल त्याला चांगलेच वाटते. पत्नीची आर्थिक स्थिती स्थिर होईपर्यंत घटस्फोट घेण्यादेण्याचा विचार नाही. मात्र जमल्यास पगारातली कपात नको आहे!

ही झाली अपवादात्मक समस्या. राज्य सरकार पगार छाटून घेते, त्यातील जवळजवळ सगळे लोक जनुकीय आई-बापच असतात.

- - -

आणखी एका आप्ताची बहीण पुढच्या आठवड्यात लग्न करणार आहे. नवरदेव तिच्या ४ वर्षांच्या मुलाचा (जनुकीय) बाप आहे. मात्र तिच्या ८-वर्षाच्या मुलीचा बाप नाही. जमेल तितका काळजीपूर्वक विचार करून नवरा-नवरीने लग्नाचा निर्णय घेतला. येथेसुद्धा "मेडिकल इन्श्युरन्स" एक महत्त्वाचा मुद्दा होता, असे माझ्या आप्ताकडून कळले.

- - -
माझी एक सहयोगी एका युरोपियन देशाची नागरिक आहे, तिचा प्रियकर एका आशियाई देशाचा नागरिक आहे. त्यांची गोड मूलगी दीड वर्षांची आहे. दोघांनी प्रेमाने एकत्र राहून मुलीचे संगोपन करायचे ठरवलेले आहे. (मुलाचे संगोपन करण्यात स्वार्थत्याग येतोच.) मात्र आता ते लग्नाचा विचार करत आहेत. कारण तिला युरोपात परत जायचे आहे, आणि त्याला वर्क-व्हिसा मिळण्यासाठी रीतसर कागदोपत्रीचे लग्न आवश्यक आहे.

- - -
रीतसर लग्न होऊन मग मुले होणारी जोडपीसुद्धा मला पुष्कळ माहीत आहेत :-) बहुसंख्येतच आहेत. मात्र अन्य चौकटीतली कुटुंबे अल्पसंख्येत असली तरी आता अगदी "अपवाद" वगैरे मुळीच नाहीत.

कुटुंब आणि व्यक्ती-आणखी काही विचार

या चर्चा विषयाला आलेले प्रतिसाद बघून मनातले आणखी काही विचार येथे लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे.
कुटुंबकेंद्रित समाजव्यवस्थेकडून व्यक्तीकेंद्रित समाजव्यवस्थेकडे होत जाणार्‍या या व्यवस्थेला, जगभरच्या स्त्रियांच्या परिस्थितीत होणारी सतत उत्क्रांती किंवा सुधारणा ही मुख्यत्वे कारणाभूत आहे असे मी मानतो. मागच्या शतकात अणासाहेब कर्व्यांनी जेंव्हा स्त्रियांसाठी विद्यापीठ सुरू केले तेंव्हा या विद्यापीठातून पदवीधर होणार्‍या स्त्रिया उत्तम गृहिणी व्हाव्यात अशीच अपेक्षा होती. ती सुद्धा त्या वेळच्या काळाच्या पुढेच होत्ती ही गोष्ट अलाहिदा. समाजाची स्त्रियांबद्दलची हीच अपेक्षा अगदी या शतकाच्या सुरवातीपर्यंत थोड्याफार प्रमाणात का होईना कायम होती. स्त्रियांच्या पुढे गृहिणी हेच ध्येय असल्याने साहजिकच त्यांना दुय्यम दर्जा स्वीकारावा लागत असे. त्यामुळे एकत्र असो किंवा विभक्त, कुटुंब प्रमुख हा पुरुषच असे. गेल्या 10 वर्षात कुटुंबातील मुलगा आणि मुलगी यांना देण्यात येणारे शिक्षण व त्त्यांच्याकडून कुटुंबाच्या असलेल्या अपेक्षा यातील फरक झपाट्याने कमी होत जात आहे. याशिवाय संख्याशास्त्राच्या नियमाप्रमाणे 25 % कुटुंबात फक्त मुलीच असल्याने त्यांना देण्यात येणारे शिक्षण व पालकांच्या अपेक्षा या मुलाकडून असतात तशाच आहेत. अशा कुटुंबातील मुली जेंव्हा सज्ञान होतात तेंव्हा साहजिकच आयुष्यात पुढे दुय्यम दर्जा स्वीकारण्याची त्यांची तयारी असणे शक्य नाही. त्यामुळे सध्याची पुरुषप्रधान कुटुंब व्यवस्था टिकणे कठिण दिसते.
नवीन व्यक्तीकेंद्रित समाजरचनेत दोन व्यक्ती शारिरीक व मानसिक गरज म्हणून एकत्र राहणारच आहेत यात शंकाच नाही. परंतु त्या विवाह करूनच राहतील असे सांगता येत नाही. तसेच त्या भिन्नलिंगी असतील असेही सांगता येत नाही. त्या स्वतंत्र असतील असे मी म्हटले आहे ते अशा अर्थाने की स्वतंच्या जबाबदार्‍या (वृद्ध आई-वडील, आर्थिक देणी) या त्या व्यक्तीपुरत्याच राहतील. त्याच्या बरोबर राहणारी दुसरी व्यक्ती त्यात सहभाग घेणार नाही. अर्थातच या दोन्ही व्यक्तींना अर्थार्जन हे करावेच लागेल. त्यामुळे मुले झाल्यास त्यांच्या संगोपनासाठी डे-केअर सेंटर्स सारख्या संस्थांची मदत घ्यावी लागेल.
या नवीन समाजरचनेमुळे आभाळ कोसळेल असे मानण्याचे काहीच कारण दिसत नाही. परदेशस्थ उपक्रमींनी कथन केलेले अनुभव बघता ही पद्धती फारसे प्रश्न निर्माण न करता प्रचलित होते आहे असे दिसते. अडचण पुढच्या 15,20 वर्षानंतर जी पिढी वृद्धत्वाकडे झुकणार आहे त्यांची होणार आहे कारण ती संक्रमणकालीन पिढी असणार आहे.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

व्यक्तिप्राधान्य

पुढे येणार्‍या समाज रचनेत ही कुटुंब पद्धती हळू हळू नष्ट होऊन त्या जागी व्यक्ती प्रधान पद्धती येणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

पुण्यात सुद्धा हल्ली नेबरलेस होम्स ची जाहिरात काही बिल्डर्स लोकांनी चालू केली आहे. काही कुटुंबांना शेजारी हा आपल्या व्यक्तिस्वातंत्र्यात अडथळा वाटतो. सहअस्तित्व सुद्धा नकोस वाटत. येता जाता शेजार्‍याचे तोंड पहावे लागते. त्या पेक्षा प्रत्येकाचे प्रवेश मार्गच वेगळे ठेवले तर तीही कटकट होणार नाही म्हणुन ही आयडिया काढलेली दिसते. इथे कुटुंब केंद्रित विचार दिसतो.
आता या पुढे जाउन कुटुंबातल्या सदस्यांचे एकजिनसी समुह व सहअस्तित्वाचा मुद्दा. अशा कुटुंबात एखादा पाहुणा गेला तर कुटुंबातला दुसरा सदस्याच्या कपाळावर नकळत आठ्या पडतात. कारण त्याच्या काही काळ का होईना असणार्‍या सहअस्तित्वामुळे दुसर्‍याच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच होत असतो. म्हणजे आलेला पाहुणा हा त्या कुटुंबाचा पाहुणा नसतो. तो त्या कुटुंबातल्या व्यक्तिचा पाहुणा असतो. त्याचा पाहुणचार हा संबंधित व्यक्तिने करायचा असतो. काही कारणामुळे यजमान व्यक्ती कुटुंबात नसेल तर पाहुणी व्यक्ती ही आगंतुक वा त्रयस्थ ठरत असते. कुटुंबातल्या इतर व्यक्तिंना जर त्याचे उपयुक्तता मुल्य जाणवले तरच तो इतरांच्या दृष्टीने दखलपात्र होतो.
व्यक्तिस्वातंत्र्याच्या एक टप्प्यात तुमचे तुम्ही मोठे असाल तर तुमच्या जागी असे इतर समुहाकडून प्रतिक्रिया प्रतिबिंबित व्हायला लागते. एखाद्या बेटावर तुम्हाला सोडले आणि सर्व सुविधा जरी पुरवल्या तरी सामुहिक जीवन जगण्याची त्याची उर्मी त्यालाच त्रास द्यायला लागते. जन समान्यांपासुन स्वतःला दूर ठेवणारे व समाजाशी फटकून वागणारे विद्वज्जन एकाकी पडतात. जालीय कुटुंबात देखील व्यक्तिस्वातंत्र्याची आखलेली एक चौकट असते. आपुलकी, संवाद या हेतुनी केलेली 'जवळीक' काहींना आपल्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला वाटतो. कधी अनुल्लेखाने, कधी अप्रत्यक्ष तर कधी प्रत्यक्षपणे 'इशारा' देउन त्याला त्याची 'जागा' दाखवुन देण्याचे प्रकार जालीय कुटुंबात घडतात. आपापली वैचारिक खाज भागवण्याच्या हेतुनी एकत्र आलेले हे सहजीवन असते. त्यात भावनिक ओलावा असेलच असे नाही.
व्यक्तिवाद ते समुहजीवन हा उलट सुलट प्रवास हा धरल तर चावतय सोडल तर पळतय असा काहीसा असतो.

प्रकाश घाटपांडे

उलटही होऊ शकते.

>>पुढे येणार्‍या समाज रचनेत ही कुटुंब पद्धती हळू हळू नष्ट होऊन त्या जागी व्यक्ती प्रधान पद्धती येणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

एका उंच टोकावर ही व्यक्तीप्रधान पद्धती गेली की, पुन्हा एकत्र कुटुंब पद्धती कशी उपयोगाची आहे असेही सुरु होईल असे वाटते.

-दिलीप बिरुटे

कुटुंब

एक गोष्ट नक्की की हॅ! असे काही होणार नाहीये! असे म्हणून दुर्लक्ष करण्यासारखा हा बदल नाही.

हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे.

सर्व प्रथम आपण कशाला कुटुंब म्हणतो अथवा सामान्यतः कुटुंब कसे असते (मग ते भारतात असो वा भारता बाहेर) हे समजणे गरजेचे आहे. जर कुटुंब व्यवस्था म्हणून आपण फक्त एका वयाच्या लोकांचा अथवा एकाच ठराविक पिढीचा विचार करुन चालणार नाही. भारतात सर्वसाधारण शहरात/गावात सध्या कुटुंब म्हणजे ३ पिढ्या एकत्र राहणारे असे ढोबळ मानाने म्हणता येईल. आता इथेच अनेक जण हॅ करतील आणि इथेच महत्वाचा मुद्दा सुरु होइल.
आपण पहिली पिढी घेऊ जे सर्वसाधारण आता वयाच्या ६० अथवा पुढे मागे असतील, म्हणजे हे झाले आजी - आजोबा (जर दोघे हयात असले तर), यांचे स्वतःचे घर स्वतःच्या गावात (समजा कोल्हापूर/सांगली/औरंगाबाद/नाशिक/इतर) असते जिथे ते वास्तव्य करत असतीलच असे नाही. यांना शक्यतो २ अथवा ३ अपत्ये असतात. समजा २ मुले अथवा २ मुली अथवा १ मुलगा १ मुलगी.
समजा आपण दोन मुले आहोत असे पकडले (इतर दोन शक्यता बाबत सुज्ञ उपक्रमी विचार करतीलच) तर हि मुले सध्या लग्न झालेली आणि मुंबई पुण्यासारख्या शहरात स्थायिक झालेली असतील, कदाचित भारता बाहेर सुद्धा. कदाचित धाकट्याने लिव्ह ईन अथवा गे पद्धतीचा स्विकार केला हि असेल. सध्या नसेल असे समजू. जर मुले पुण्या मुंबईला स्थायिक असतील तर मनात सर्वांनी एकत्र राहायचे असेल तरी आर्थिक दृष्ट्या शक्य नाही. असलेच तर सगळ्यांमध्ये समंजस पणा असेलच असे नाही. आणि सगळे एकाच कुवतीचे असतील असे नाही. मग दोन मुलांची दोन घरे, त्या घरात त्यांची कुटुंबे म्हणजेच पत्नी आणि अपत्ये. एकदा या राहणीमानाची सवय लागली की माणसांची गरज लागेलच असे नाही. जर मुलगा सुन दोघे ही कमावते असले (अनेकदा हि गरज असते - डबल इंजिन नाही) तर मग मुलांना सांभाळायला एकतर पाळणा घर नाहीतर मग बिन पगारी पुर्ण हक्काचे आजी आजोबा (असेच होते असे नाही) येतात आणि मग नकळत एकत्र कुटुंब बनतात. नातवंडांचे आणि आजी आजोबांचे बंध घट्ट होतात आणि कुटुंब एकत्र बांधलेले राहते. समजा हे मुलासाठी जमले आणि दुसर्‍यासाठी नाही तर मग संगोपनातला फरक जाणवतो. तो योग्य का अयोग्य हा वेगळा विषय आहे.
असे रहात असताना जिथे स्वभावदोष/ईगो आडवे येतात तिथे कुटुंब हे या कुटुंबा प्रमाणे न राहता व्यक्ति केंद्रित बनत जाते.
तसेच जर हि मुले वयाच्या १८ व्या वर्षाला शिक्षणासाठी घराबाहेर पडली असतील आणि स्वातंत्र्य = स्वैराचार हे त्यांचे मत असेल तर ते कुटुंब आत्ताच व्यक्ति केंद्रीत आहे.
सध्या एका घरात नात्यांचे बंध कसे आहेत याचा विचार केल्यास पुढे ते घर एक कुटुंब असेल कि व्यक्ति असेल हा विचार करता येईल.
आता विचार करु, लिव्ह ईनचा - येथे शक्यतो पुर्णवेळ जबाबदारी न घेता बेरजेचे आणि गरजेचे राहणीमान स्विकारले जाते. त्यात त्याग प्रेम असेलच असे नाही. येथे स्वातंत्र्य = स्वैराचार हे दोघांनाही मान्य असण्याची शक्यता जास्त. यांनी एकटेपणाचा तात्पुरता मार्ग शोधलेला असतो. कदाचित जबाबदारी न घेता तात्पुरते मार्ग काढायची यांनी मानसिकता असते.
कुटुंब व्यवस्था कशी असेल या बद्दल आत्ता भाष्य करणे थोडे अवघड आहे. १५-२५ वर्षा पुर्वीचा विचार केला तर आत्ता एवढी संपर्क साधने नव्हती. भारतात आणि भारता बाहेर सुद्धा. आता मोबाईल फोन ते ही ३जी घेउन फिरायचे दिवस आहेत. एकटेपणाची भावना कमी करण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहे. त्यामुळे कदाचित एकटे राहून एकटेच हवे ते करायची शक्यता कमी असेल. कदाचित याचे दुसरे टोक सुद्धा असेल. मला वाटते की माणसांच्या वैयक्तिक विचार आणि गरजांवर ठरेल. हा पण जर प्रत्येक गोष्टीला तात्पुरते मार्ग शोधायची मानसिकता वाढत गेली तर व्यक्ति हेच कुटुंब जास्त असेल.

जाता जाता, एकदा विमान प्रवासात बेहर या कंपनीचा जर्मन उच्च पदस्थ शेजारी बसला होता. गप्पा इतक्या रंगल्या की मला तुम्हा लोकांसारख एकत्र कुटुंब पद्धतीत रहायचं आहे आणि आम्ही त्या दृष्टीनेच मुलांना घडवतो आहे तो सांगून रिकामा झाला. तर सध्याच्या कंपनी मधला एक मराठी हिंदू कर्मचारी कामासाठी स्वीडनला राहतो आणि त्याची कर्नाटकीय मुसलमान पत्नी स्वित्झरलंडला राहाते. जमेल तसे ते कधी तरी काही महिन्यातुन स्वीडन अथवा स्वित्झरलंडमध्ये भेटतात. पुण्यात चांगले मोठे घर आहे, घर मिळाल्यावर त्यावर लाखो रुपये खर्च केला आहे. पण तेथे राहात नाहीत. हि उदारहणे बोलकी आहेत असे मला वाटते. अनेकदा वाटते की पश्चिमेचा प्रवाह पुर्वेला वाहतो आणि पुर्वेचा पश्चिमेला. थोडक्यात पुढच्या काही दशकात नक्की काय स्थिती असेल ते नेमकेपणाने सांगणे खरच अवघड आहे.






मुळ निष्कर्ष बरोबर पण एकांगी तर्कावर

मुळ निष्कर्ष मराठी उच्चमध्यमवर्गीय व्यक्तींसाठी बरोबर पण मला तो एकांगी तर्कावर आधारीत. एकांगी अशासाठी की यात मुलांना वेगळं रहायचं असतं किंवा वेगळ रहायला आवडतं हे गृहित धरलं आहे आणि हे गृहितक सध्याच्या परिस्थितीत मला "सर्रास" भारतात दिसत नाहि

माझ्या मित्रमंडळींपैकी आपल्या आईवडिलांपेक्षा लांब रहाणार्‍यांची कारणे बघितली तर सर्वात मुख्य कारण नोकरी हे आहे. त्यातील बर्‍याच जणांना जर आपल्या आईवडीलांच्या गावत नोकरी मिळाली तर परत जायची तयारी आहे. आता प्रश्न येतो की त्यांच्या बायकांची ती तयारी आहे का? याचे उत्तर मात्र बायको नोकरी करते की नाहि यावर बर्‍याचदा अवलंबून दिसते. जर बायको नोकरी करणारी असेल तर तिला शक्यतो सासु-सासर्‍यांसोबत रहायला हवे असते (अन्यथा असा थंब रुल सांगता येणार नाही) आणि याचे कारण अर्थातच डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क! मात्र अश्या वेळी बर्‍याच ठिकाणी असे दिसते की सासु-सासर्‍यांना स्वतःचा स्वतंत्र संसार हवा असतो. त्यांना खर्‍या अर्थाने सर्व जबाबदार्‍यांतून "रिटायर्ड" व्हायचे असते. तेव्हा केवळ मुलांना स्वातंत्र्य हवे असते वगैरे न समजता प्रत्येकाला स्वातंत्र्य हवे आहे म्हणून मराठी उच्चमध्यमवर्गात व्यक्तीप्रधान पद्धत येत चालली आहे असे नक्कीच दिसते.

शिवाय हे झाले मराठी उच्चमध्यमवर्गाबद्दल! मात्र हे विधान संपूर्ण भारताबद्दल करणे मी सध्यातरी धाडसाचे समजतो. इतरत्र कुटुंबव्यवस्था संपत चालली आहे हे काहि अनुभवांवरून तरी तितकंस खरं वाटत नाही.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

सध्याची परिस्थिती

ऋषिकेश
कुटुंबप्रधान समाजरचनेकडून व्यक्तीनिष्ठ समाजरचनेकडचा हा प्रवास पुढच्या कालात होणार आहे. तो सध्या सर्रास दिसतो आहे असे मी अजिबात म्हटलेले नाही हे लक्षात ध्यावे. सध्या शहरांच्यात विभक्त कुटुंब पद्धती व खेडेगावात एकत्र कुटुंब पद्धतीच अजून दिसते आहे. समाजातील कोणतेही बदल बहुदा उच्च्मध्यमवर्गीयांपासूनच सुरू होतात व हळू हळू ते समाजाच्या खालच्या स्तरा पर्यंत पोचतात. उच्चमध्यमवर्गियात मुलींना शिक्षण देऊन आर्थिक स्वतंत्रता मिळवण्याची कुवत निर्माण करून देण्याचे प्रथा 50 वर्षापूर्वी सुरू झाली होती. ती आता समाजाच्या अगदी खालच्या स्तरापर्यंत पोहोचू पाहते आहे. त्याचप्रमाणे व्यक्तीनिष्ठ समाजरचना आज जरी उच्चमध्यमवर्गियांतच मुख्यत्वे दिसत असली तरी तिचा प्रसार निरनिराळ्या कंपल्श न्स मुळे समाजाच्या खालच्या स्तरांपर्यंत पुढच्या काही दशकात पोहोचणार असे मला वाटते. तेंव्हा सध्याची परिस्थिती काय आहे याचा विचार करण्यापेक्षा पुढे काय घडू शकते याचा विचार करणे गरजेचे वाटते.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

कुटुंब - एकत्र/विभक्त/व्यक्तिनिष्ठ

माझ्या मते एकत्र कुटुंब ही एका विशिष्ट समाजरचनेची आर्थिक गरज होती आणि म्हणून ती अस्तित्वात आली.

जुन्या काळात जातिनिहाय व्यवसाय असल्यावर एकत्रित पणे व्यवसाय करणे फायद्याचे असे. त्यामुळे एकत्र कुटुंबांची पद्धत रुळली असावी.

आज देखील जे लोक कौटुंबिक व्यवसायात असतात त्यांच्यात एकत्र कुटुंबांचे प्रमाण जास्त दिसेल. एकच व्यवसाय न करणार्‍यांची कुटुंबे क्वचितच एकत्र असतात.
अगदी जुन्या काळातली (विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातली) वर्णने पाहिली तरी जेथे व्यक्ती वडिलोपार्जित व्यवसाय करीत नव्हते त्या सर्वांची विभक्त कुटुंबेच असायची.

शहरामध्ये (विशेषतः जुन्या चाळींमध्ये) काही एकत्र कुटुंबे दिसायची ती एकत्र असण्याचे कारण आर्थिक दृष्ट्या विभक्त कुटुंब परवडत नसे हे असावे. आज काही वर्गात शहरात वेगळे कुटुंब करणे सहज जमत असले तरी बर्‍याच वर्गात ते अशक्यप्राय झाले आहे. त्यामुळे काही प्रमाणात एकत्र कुटुंबे टिकून राहण्याची शक्यता वाढली आहे.

मी लहानपणापासून पहात असलेली बहुतांश कुटुंबे विभक्तच होती. माझ्या आजोबांच्या पिढीतही विभक्तच कुटुंबे मी पाहिलेली आहेत. त्यांच्याही पिढीत त्यांचे भाऊ वगैरे पारंपरिक शेतीव्यवसायात नव्हती.

यापुढचे विभक्तीकरण होईल असे मला वाटत नाही. हां. पूर्वीच्या कुटुंबातल्यासारखे सर्वस्व अर्पण होण्याचे प्रकार कमी होतील असे मात्र वाटते. ते बरेच आहे.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

सहमत आहे

नितिन थत्तेंशी सहमत आहे.
मराठीत मातीच्या चुली हा सिनेमा यावर उत्तम भाष्य करणारा आहे.
प्रकाश घाटपांडे

चांगली चर्चा

चर्चा चांगली आहे. काठावर उभे राहून चर्चेचा आनंद लुटतो आहे. भारतातील प्रस्थापित विवाहसंस्थेचे स्वरुप खूप लवकर मोडकळीस येऊन समाजव्यवस्थेत मूलभूत बदल होतील याची चिन्हे शहरात स्पष्ट दिसत आहेत. वृद्धांची आताचीच स्थिती पुरेशी शोचनीय आहे. त्यामुळे 25 - 30 वर्षांनी वृद्धांची स्थिती अधिक शोचनीय असेल असे वाटत नाही. स्वावलंबनाची मानसिकता तयार होऊन आलीया भोगासी असावे सादर अशी वृत्ती भविष्यकालीन वृद्ध बाळगतील असे वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

मधला वर्ग चिंता करत राहतो.

आदीवासी, रस्त्यावर भिका मागणारे, लमाणांचा तांडा असतो त्याप्रकारचे तांडे घेऊन काहीतरी विकणारे (उदाहरणार्थ- पीओपीच्या मुर्त्या), झोपडपट्ट्यात राहणारे, शेतीवर कामं करणा-या बिगा-यांच्या वस्त्या, आपल्या घरात येणा-या कामवाल्या, कनिष्ठ मध्यमवर्गी कुटूंबे- रीक्षावाले, व इतर वाले लोक, मध्यमवर्गी, उच्चमध्यमवर्गी, व वरचे वर्ग. ह्यांच्यात सगळ्यात तुम्हाला कुटूंबे दिसतील.

मुळात स्त्री-पुरुष एकत्र का राहतात? वरील वर्गातील कित्येक स्तरांतील लोकांना मध्यमवर्गातील "विवाहीत कुटूंब" कल्पनेतील कुटूंब असणे परवडणे शक्य नसते. त्यांचे असे कुटूंब असावे असे वाटते का? की त्यांनी त्यांच्या पद्ध्तीतील कुटूंब स्वीकारलेले असते? लग्न न करताच? लिव्ह-इन रिलेशनशिप असा गरीब कुटूंबात गेली कित्येक शतके अस्तित्वात आहेत मग हा कॉन्सेप्ट मॉडर्न आहे असे का म्हणले जाते?

मला वाटते मध्यमवर्ग आणि त्यांची ती तत्वे जोपर्यंत ह्याजगात अस्तित्वात असतील तो पर्यंत "विवाहीत कुटूंब" आणि त्याभोवतीचे अर्थकारण टिकून राहील. मध्यमवर्गातील समाज मात्र खालून वर येत राहील, त्यांना हे "विवाहीत कुटूंब" खूळ वापरुन पहायला आवडेल. तो पर्यंत आताचा मध्यमवर्ग खूळाला कंटाळून नवे काहीतरी फ्याड शोधत फिरेल. (जे जुनेच असेल). एकदम वरच्या समाज स्तरात आणि एकदम खालच्या समाजस्तरात ज्या चालीरीती पहावयास मिळतात त्या सारख्याच असतात. आदीवासींमधे स्त्रीला जे अधिकार आणि मोकळीक असते, तेच वरही पहायला मिळते. आदीवासी स्त्री सहजतेने मोहाची दारु, विड्या ओढतांना दिसेल, वयात आलेल्या मुलींना त्यांच्यात (काही जातीत) त्यांच्या वयाच्या मुलांबरोबर शरीर संबंध ठेवायला परवानगी देतात व त्यांच्यातुनच एकाला निवडायला सांगतात (नशीब तेथे पोलिस चौक्या नाहीत) व असेच प्रकार वरच्या वर्गातही दिसतात. मधला वर्ग मात्र नक्की काय करावे, कसे वागावे, कसे बदल होतील, वगैरे चिंता करत राहतो.

खी खी खी

मस्त प्रतिसाद...

-टाईमपास

 
^ वर