एका हाताने द्यायचे आणि एक हाताने घ्यायचेच, नाहीतर वेगळेच बरे.
गेली काही दिवस अनेक संकेतस्थळांवर बायका, आयटी, स्वयंपाक, ह्या विषयावर बरीच चर्चा झाली, त्यातून बरेच काही शिकायला मिळाले. आजूबाजूचे वातावरण नव्याने दिसू लागले. मात्र त्यातून काही नवीन विचारांना काहूर फुटत गेले. त्यातूनच हा लेख लिहिण्याचे ठरविले.मागे झालेल्या सर्व चर्चेचा विराम झाला आहे असे समजून (म्हणजे कुटुंब हे दोघांचे आहे, दोघांनी प्रेमाने एकमेकांना सांभाळून घेऊनच सर्व निर्णय घ्यायचे असते. असाच काही तो शेवटचा निर्णय ) एक नवीन विषयाला हाथ घालत आहे. (माझी लेखन शैली थोडी ढिसाळ असेल. नवीन लिहित आहे ना, तरी सर्व वाचकांनी आशय समजून घेऊन आपापले अनुभव, विचार सादर करावेत हि विनंती.)
एक माझा खूप जवळचा मित्र, अगदी लहानपणा पासूनचा. गेली २५ वर्षे मी त्याला जवळून पाहत आहे. अत्यंत हुशार, चपलख, मनमिळाऊ, प्रामाणिक असे अनेक गुण ज्याला लागू पडतील असा तो. त्याच्या कुटुंबात आई, वडील, एक मोठा भाऊ, एक मोठी बहिण एवढेच. बहिणीचे लग्न साधारण १५ वर्षा पूर्वीच झाले आणि ती पुण्यातच असते. ८-१५ दिवसांतून माहेरी एक चक्कर एवढाच काय तो बहिणीचा घरच्यांशी संबंध.
साधारण ७ वर्षांपूर्वी त्याच्या मोठ्या भावाचे लग्न झाले. आम्ही सगळे मित्र अगदी जातीने हजर होतो त्या लग्नाला. एकदम धूम धडाक्यात झाले लग्न. मोठ्या वहिनी पुण्याच्या जवळच एक गावातील. सर्वसाधारण शिक्षण, प्रेमळ, मनमिळाऊ असा त्यांचा स्वभाव. लहान दिराला अगदी लहान भावाप्रमाणे समजून त्याचे सर्वकाही प्रेमाने करण्यात मोठ्या वाहिनी कायम गुंतलेल्या. सासू सासर्यांचे सुद्धा आपलेच आई वडील समजून त्यांची सेवा सुश्रुवा त्या करीत. आम्ही सुद्धा कधी घरी चक्कर मारली कि आमची देखील अगदी उत्तम तर्हेने विचारपूस व्ह्यायची. सगळे अगदी उत्तम चाललेले. (चेष्टेने आम्ही देखील मोठ्या वाहिनीच्या गुणांकडे बघून आपली भावी पत्नी अशीच असावी असे विचार करत असू. ह्यावरून आमची कित्येक वेळा घरामध्ये थट्टा मस्किरी देखील चालत असे. त्यांचे कुटुंब आणि माझे कुटुंब ह्यामध्ये घरातलेच वातावरण आहे. त्यांच्या लहान बहिणीशी पत्रिका मला आलेली होती पण ती न जुळल्याने पुढे काही पाऊल पडले नाही. असो ) तर सांगायचा मुद्दा असा कि पत्नी असावी तर कशी ह्याचे एक उत्तम उदाहरण म्हणून त्या सर्वांच्या समोर होत्या (आहेत) जवळ जवळ ३ वर्षे, दुष्ट लागावी असा संसार चालला होता त्या कुटुंबाचा.
आणि तो दिवस आलाच.
तीन वर्षापूर्वी माझ्या मित्राचे देखील लग्न झाले. त्यावेळेस मी बाहेर असल्याने लग्नाला जाने जमले नाही. त्यानंतर मी बाहेरच असल्या कारणाने मित्राशी तसेच त्याच्या कुटुंबाशी जास्त संबंध आला नाही. लग्न झाल्यानंतर साधारण एक वर्षांनी मी पुण्यात परत आलो. मित्राची चौकशी केली तर समजले कि परिस्थिती बदललेली होती. दोन्ही भाऊ वेगळे झाले होते. मित्राला ह्या बाबतीती जास्त काही विचारणे चांगले वाटले नाही. पण लवकरच माझ्या आणखी एक मित्राकडून मला माहिती मिळाली कि लग्न झाल्यानंतर काहीच दिवसांत दोन्ही जावेंमध्ये वितुष्ट इतके वाढले होते कि त्यांना आता एकत्र राहणे अशक्य झाले होते. मग माझ्या मित्रानेच पुण्यात एक घर भाड्याने घेऊन तो त्यात पत्नीसह राहू लागला. आता ते एकमेकांच्या घरी पाहुण्यासारखे ये जा करीत असतात. मित्राचं पत्नीचे शिक्षण जास्त (म्हणजे मोठ्या जावेपेक्षा) झालेलं होते. त्यामुळे ती स्वतःला जास्त हुशार समजत होती. आणि त्यामुळे तिने बर्याच वेळा मोठ्या जावेच अपमान देखील केला. मित्राची पत्नी एक श्रीमंत घरातून आलेली असल्याने माहेरी घरात नोकर चाकर होते त्यामुळे घराच्या जबाबदारीची जाणीव तोडकीच आणि लाडात वाढलेल्या त्यामुळे त्यांना कोठेही कमीपणा घेणे म्हणजे अपमानकारक वाटत असे. तसेच तिला स्वताच्या कुटुंबाची ( तिच्या मते तिचे कुटुंब म्हणजे, ती आणि तिचा नवरा बस्स) एकांततेची जास्त चिंता असे. तिला लवकरच एकत्र कुटुंबात राहणे कठीण जाऊ लागले आणि तिने हळूहळू काहीतरी कुरापात्या काढून भांडणे करायला सुरुवात केली. सुरुवातीला सर्वांनी प्रेमाने समजावून (अगदी तिच्या घरच्यांनी देखील) सांगितले, पण पालथ्या घड्यावर पाणी. लवकरच मोठ्या जावेने सुद्धा आपला नमतेपणा बाजूला ठेऊन तोंडस तोंड दयायला सुरुवात केली. घरातून रोज भांडणाचा आवाज ऐकू यायला लागला. हे सर्व आजूबाजूला पसरू लागले. सर्व मित्रांनी त्याच्या घरी येणे जाने बंद केले.
आता ते दोघे पुण्यातच दुसरीकडे एक घर भाड्याने घेऊन राहत आहेत. त्यांनी घर देखील अश्या ठिकाणी घेतले आहे कि त्याच्या आई वडिलांना तेथे जाने खूप अवघड होते. त्या दोघांना आता भरपूर एकांत मिळतो आणि ते आता प्रेमाने राहतात. मित्राच्या आई वडिलांच्या नशिबाने त्यांची मोठी सून त्यांची अजूनही तितक्याच प्रेमाने त्यांचा सांभाळ करते. आणि माझा मित्र दर महिन्याला एक ठराविक रक्कम पाठवून देतो व अधूनमधून घरी एक चक्कर मारतो. (माझ्या मित्राचे आई वडील सध्या त्याच्या मोठ्या मुलाकडेच राहतात.)
सध्या सर्व काही सुरळीत नाही पण ठीक आहे. आता सध्या माझ्या मित्राच्या घरात भले ते दोघे जण एकत्र मिळून स्वयंपाक करीत असतील, अगदी प्रेमाने राहत असतील पण तो कथेचा गोड शेवट आहे काय ? दोन जावा एकत्र राहूच शकत नाही काय ? सासू सासर्यांनी सहा महिने इकडे, सहा महिने तिकडे हे असंच करायचे काय ? जर सासू सासर्यांना काही गरज पडली तर दोघांकडे अर्धी अर्धी मागायची काय ? त्यातून सुद्धा एक जाऊ विचार करणार कि दुसरी किती देणार आहे, तिला अगोदर देऊ दे, मग आपण देऊ.मागे आपण थोडे जास्त दिले होते ना आता थोडे कमी देऊ, त्यांची जबाबदारी मीच का म्हणून घ्यायची.
सुदावाने मी एकटाच आहे. मला कोणी भाऊ नाही. त्यामुळे मला ह्या असल्या भानगडीला सामोरे जावे लागणार नाही हे निश्चित, आजकाल स्त्रिया कमवित्या झाल्या असल्या कारणाने त्यांच्या हातात थोडा पैसा खेळू लागला आहे त्यामुळे त्यांना बाहेरचे विश्व खुणावत असते. कोणाचेही बंधन नकोसे वाटते. एकांत जास्त महत्वाचा वाटू लागतो. त्यामुळे प्रसंगी त्यांना आपले सासू सासरे देखील जड वाटू लागतात. दोन जावेंचे एकमेकांशी पटत नाही पण त्यामुळे सासू सासर्यांची जी भरकट होते त्यास जबाबदार कोण ?
एकदा आमच्या सौ बरोबर ह्या बाबतीत सहज बोलणे चालले होते, आमच्या सौ उत्तरल्या कि,. एकत्र कुटुंब म्हणजे एका हाताने द्यायचे आणि एक हाताने घ्यायचेच (ह्यातला च हा प्रमाणाच्या बाहेर ठाम होता) , नाहीतर वेगळेच बरे.
disclaimer : केवळ सर्वांचे मते ह्याबाबतीत जाणून घेण्यास हा अनुभव कथन केलेला आहे. कोणासही दुखावणे व त्यांच्या विचारांचा अपमान करणे हा उद्देश अजिबात नाही.
जे काही मी नमूद केलेले आहे ते केवळ माझे विचार आहेत. ते बरोबरच आहेत असे मला अजिबात म्हणावयाचे नाही. मात्र अधिक चर्चा करूनच मला माझे विचार ठाम करता येतील.
Comments
विसंगत
"दोन जावा एकत्र राहूच शकत नाही काय ?" हा प्रश्न केवळ पुरुषप्रधान व्यवस्थेत येतो. अन्यथा दोन साडू एकत्र राहू शकतात की नाही त्याचीही तपासणी करावी लागेल. पुरुषप्रधान व्यवस्था मान्य केली तर "त्यातून सुद्धा एक जाऊ विचार करणार कि दुसरी किती देणार आहे, तिला अगोदर देऊ दे, मग आपण देऊ.मागे आपण थोडे जास्त दिले होते ना आता थोडे कमी देऊ, त्यांची जबाबदारी मीच का म्हणून घ्यायची." असा विचार स्त्री कशी करेल? दोन्ही भाऊ मिळून निर्णय घेतील. जर भाऊबंदकीच असेल तर पुन्हा वेगळा विषय होईल.
कोणच्या जगात आहात्?
अहो गांधीवादी तुमचा लेख वाचून तुम्ही कोणच्या कालात आहेत असा संभ्रम मला पडतो आहे. तुम्ही, जावांचे पटले पाहिजे. भावांनी एकत्र रहायला काय हरकत आहे? असले मुद्दे उपस्थित करता आहात. सद्यस्थितीत हे मुद्दे फार जुने झाले. एकदा मुलाचे लग्न लावून दिले की नवीन सून व सासू-सासरे यांचे सौख्यपूर्ण संबंध राहणार की नाही? किंवा नणंद, सासू, सून, दीर व सासरा हे नातेसंबंध पुढच्या कालात अस्तित्वात रहाणार का? हे प्रश्न जास्त रिलेव्ह न्ट झाले आहेत. एकत्र राहणे वगैरे तर दूरची गोष्ट झाली पण सणासमारंभाला सासू सासर्यांच्याकडे कशासाठी जायचे असा प्रश्न नवीन लग्न झालेल्या मुली विचारू लागल्या आहेत. याच्या पुढे जाऊन तुम्हाला एक महिन्यापूर्वी पुण्यात झालेल्या एका परिसंवादा बद्दल सांगतो. या परिसंवादाचा विषय होता की नवजात अर्भकाच्या संगोपनासाठी त्याला सासूकडे (म्हणजे त्या अर्भकाची आजी)दे णे कितपत योग्य आहे? या संबंधीचे माझे आणखी काही विचार येथे वाचा.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
प्रपंच
मुळातच एकत्र राहण्याचा एवढा अट्टाहास का? रोज भांडण्यापेक्षा वेगळं राहणं काय वाईट?
पूर्वीचा काळ बरा होता ;-)
पूर्वी सर्व कसे बरे होते.
राजाला दोन पुत्र असत तेव्हा तो आपल्या राज्याचे दोन भाग करे आणि ते पुत्रांना वाटून देई आणि नंतर गृहस्थाश्रमातून वानप्रस्थाश्रमाकडे प्रयाण करे. एकत्र कुटुंब, आईवडिलांचा सांभाळ, खस्ता खाणे, सासू-सुना, जावा-जावा भांडणेच नाही. असलीच तर फक्त भाऊबंदकी. ;-)
गेले ते दिवस. महान होते आमचे पूर्वज. ती वानप्रस्थाला जाण्याची सोय गेली आणि सास्वांना नातवंडे सांभाळणे, जावांपैकी नेमका कोणी सासूसासर्यांच्या सांभाळ करायचा, लग्नानंतर सासू-सासर्यांचे तोंडही पाहायचे नाही वगैरे वगैरे नसते प्रश्न उद्भवले. ;-)
हा विषय
इतर काही विषयांसारखाच फार "हॉट" विषय आहे! भल्याभल्यांची भंबेरी उडवणारे प्रश्न आहेत.
खरे तर हे प्रश्न प्रत्येक कुटुंबाने आपले सोडवायचे असतात असे मला वाटते. त्यात काही अपमान/अपेक्षाभंग असतात. कधी गुण्यागोविंदाने काम होते. एकत्र राहण्याचे काही फायदे आहेत, मुख्यत्वे मुलांचा सांभाळ सर्वांच्या सहाय्याने होऊ शकतो, इ. इ. पण त्यात काही विचारांची गळचेपी होते, हेही खरे आहे. आपल्यापुरते बघावे की: कधीकधी दुसर्यांचा विचार करून स्वत:च्या भावनांना मुरड घालणे, पण एकत्र असण्याचे फायदे (आर्थिक/सामाजिक) तसेच तोटे (उदा. घरातल्यांची आजारपणे काढणे) स्विकारण्यासारखे आहे, का संसार, घरातले/मुलांचे बघणे, मुलांची ने-आण, अशी तारेवरची कसरत (+ घरातल्यांची आजारपणे काढणे) आपल्याला चालणार आहे? (हे प्रश्न काही अंशी अगदी एका कुटुंबाचे, एका डेटापॉईंटपुरते मर्यादित आहेत; त्यांना ग्लोबल, सब घोडे बारा टके असे एक सोल्युशन असणार नाही. )
कधीकधी लोकांना प्रश्न पडतात - स्त्रियांनी घरात रहावे का? नोकरीची आवश्यकता नसताना नोकरी करावी का? खरे तर कुठच्याही सज्ञान, सक्षम व्यक्तीने स्वतःचे असे नियमितपणे १०० रूपये तरी कमवावे असे मला वाटते. पण हेही प्रत्येकाने आपले आपणच ठरवायला हवे की आपल्याला (नवर्याने आणि बायकोने वेगवेगळे, मग त्यांनी एकत्र आणि मग त्यांच्या परिघातील लोकांना एकत्र मिळून) नक्की काय हवे आहे. ह्यात भविष्याचा विचार करायला हवा. इ. इ.
उगाच लोकांकडे बघून त्यांनी एकत्र रहायला हवे असे वाटून घेण्याने काही होत नाही. एकत्र राहून कटकट करीत बसण्यापेक्षा वेगळे आहेत ते बरे. तुमच्या पत्नीचे म्हणणे देखील हेच असावे असे वाटते.
दुसरे एक बहुदा सगळे विसरतात ते असे की सासू-सासर्यांचा विचार करताना तो पुरूषाच्या आईवडिलांचा होतो. पण बरीच घरे अशी असतात जेथे केवळ मुलीच असतात, अशांच्या आईवडिलांनी कसे रहायचे, हा विचार होताना दिसत नाही.
विरोधाभास
आपला समाज अजुनहि संक्रमन अवस्थेत आहे या गोष्टि स्विकारायला वेळ लागेल आम्हि आमच्या बहिणिला वेगळे निकष लावतो व बायकोला वेगळे पण बदल होइल हळहळू