वरुणयंत्र
डॉ.राजा मराठे यांनी तयार केलेल्या वरुणयंत्राचे प्रयोग सध्या महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात सुरू आहे. सकाळ या वृत्तपत्राने या प्रयोगाच्या प्रचार व प्रसाराल अग्रक्रम दिल्याचेही दिसून येते आहे. (इतर वृत्तपत्रांना मात्र याचे वावडे असल्यासारखे वाटते). आयआयटी चे पदवीधर असलेले मराठे यांनी हे यंत्र विकसित केले आहे. हवेची विशिष्ट आर्द्रता, आकाशातील ढगांचे प्रमाण यांचा मेळ जुळला की या वरुण यंत्राच्या साहाय्याने हवेतील पाण्याच्या वाफेचे (ढगांचे) सांद्रीभवन होण्यासाठी आवश्यक असलेल्या उत्प्रेरकाचा पूरवठा झाला की चोवीस तासात पाऊस पडतो असा मराठे यांचा दावा आहे. उत्प्रेरक म्हणून मिठाचे कण हवेत पोचवण्यासाठी भूस्सा, लाकडे, कचरा यांची होळी करून त्यात मीठ टाकले की ते ढगांपर्यंत पोहोचते अशी या प्रयोगाची संकल्पना आहे. अधिक सविस्तर माहिती येथे आहे. असो.
या प्रयोगाबद्दल जिज्ञासू व विज्ञानाबद्दल, पर्यावरणशास्र, हवामानशास्र यांतील तज्ज्ञ लोकांनी अजूनपर्यंत अनुकूल किंवा प्रतिकूल अशी कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही. सकाळने मात्र वरुणयंत्राच्या प्रयोगानंतर (किंवा प्रयोग सुरू असतांच) पाऊस . (हा पाऊस चोवीस तासांनी पडतो की चोवीस तासात या बद्दल स्पष्टीकरण सापडत नाही ) अशा आकर्षक जाहिरात वजा बातम्यांचा मारा सुरू ठेवला आहे. अर्थात चांगल्या गोष्टीची जाहिरात व्हायला हवीच. पण सततच्या जाहिरातींनी एखादी गोष्ट चांगली वाटायला लागते हे ही लक्षात घेतले पाहिजे.
मिठाचा असा उत्प्रेरक म्हणून वापर करुन खरेच ढगातील वाफेचे पावसाच्या थेंबात रुपांतर होण्यचा वेग वाढवता येतो का? माझ्या माहिती प्रमाणे तर वाफेचे पाण्यात रुपांतर होण्याची क्रिया ही भौतिक क्रिया आहे. अशा भौतिक क्रियांमध्ये उत्प्रेरक वगैरे असते का याबद्दल मी जरा अज्ञानीच आहे.
वर सांगितल्या प्रमाणे हवेतील आर्द्रता आणि ढगांचे प्रमाण यांचा अपेक्षित मेळ जमला की हा प्रयोग करता येतो. आणि मग चोवीस तासात पाऊस पडतो. पण असा मेळ जमणे हे निव्वळ नैसर्गिकरित्याच फक्त होऊ शकते. आणि असे घडून आल्यावर आपसूकच पाऊस पडत नाही काय. किंवा पाऊस पडण्याच्या शक्यतेची टक्केवारी वाढत नाही काय.
कुठल्याही कामामागे कोणाचा हातभार व सहभाग आहे या वरुन कामाची किंमत कमी किंवा जास्त मानन्याची एक जून खोड काही जणांना असते. खरे तर ह्या कामाच्या उपयोगितेतली व यशातली वैश्विकता हा निकष कामाची प्रत ठरवण्यासाठी वापरला जावा. वरुण यंत्रावरची एक मजेशीर प्रतिक्रीया वाचनात आल्याने हे लिहीले आहे.
ती प्रतिक्रिया अशी -श्री. मराठेसाहेब नमस्कार, आपण एकप्रकारे होम करून पाऊस पाडण्याचा प्रयोग केला आहे. हेचकाम आपण वीज निर्मिती केंद्रात चिमणी मध्ये ढगाळ वातावरण असताना मीठ टाकून कमी खर्चात आणि जास्त प्रमाणात करू शकतो असे मला वाटते. हा प्रयोग सरकारी मदत घेऊन करावा लागेल. कितपत जमेल याबद्दल शंका आहे. आपण सर्व प्रयोगकर्ते चित्पावन ब्राम्हण आहात याचे मला कौतुक वाटते .
असो वरुणयंत्राचा मंत्रालयातही प्रयोग झाल्याचे वाचनात आले आहे. जर हे प्रकरण खरेच मानवजातीच्या इतक्या उपयोगाचे असेल तर यावर लगेच सरकारने पाडताळणीसाठी तज्ज्ञांची समिती नेमायला हवी. या समितीआगोदर उपक्रमवरही साधक बाधक चर्चा होईलच.
Comments
जुना विषय
पूर्वी या विषयावर चर्चा झाली आहे.
सैद्धांतिक पायाला मी अनुभवापेक्षा अधिक महत्व देतो कारण अनुभव अजूनतरी तुटपुंजाच वाटतो. त्यामुळे मी याविषयात अजूनही साशंकच आहे. पूर्वी साशंक भाषा करणारे मराठे आता आत्मविश्वासाने बोलत असल्याचे ऐकले आहे. सकाळ हे वृत्तपत्र (आणि त्यांची दू.चि.वा.) गेली काही वर्षे खूपच फालतू होत आहेत असे मला वाटते.
अवस्था (फेज) बदलण्यासाठी बीज (सीड) आवश्यक असते. पाठ्यपुस्तकांत एक प्रयोग असतो की मोरचूदाचे अतिसंपृक्त द्रावण शांत ठेवले तर स्फटिकीभवन होत नाही. त्यात धूळ किंवा मोरचुदाचे कण टाकले तर मात्र त्यांच्याभोवती स्फटिक वाढू लागतात. शीतपेयांमध्ये मिठाचे किंवा इतर काही कण टाकले की त्यांतून कर्बद्विप्राणिल वायू सुटण्याचा वेग वाढतो. ज्यूल्स वर्न ने एका अशा काल्पनिक तळ्याचे वर्णन केले आहे ज्याचे तापमान ०° से. पेक्षा कमी होऊनही ते गोठत नाही.
अजून माहिती मिळेल काय ?
दै.सकाळ वरुणयंत्राला खूप प्रसिद्धी देत आहे. आता तर खेड्या-पाड्यात असे प्रयोग केल्याने पाऊस पडल्याचे बातम्या येत आहे. वरील विषयाबद्दल अधिक माहिती वाचायला आवडेल.
-दिलीप बिरुटे
अरे बापरे
हा प्रयोग होण्यापूर्वी आगीत मीठ टाकले तर त्याचा धूर होऊन कुठपर्यंत पोचते याचा शोध घ्यायला हवा होता. हा प्रयोग हल्लीच्या उंच इमारतींमूळे सहज शक्य आहे. (त्याचा परिणाम होतो का ही दूरची बाब.) माझ्या मते हे मीठ ढगांपर्यंत पोचे पर्यंत त्याचे होमिओपॅथीचे औषध झाले असेल. माझ्यामते सैधांतिक पाया हा खूप कमकुवत आहे. वरुण यंत्र हवेत आर्द्रता वाढल्यावर आणि पुरेसे ढग असल्यावर चालू करा असे सांगितले आहे. मला वाटते पावसाचे एवढे कारण पुरेसे आहे. त्यात वरूण यंत्राची भ्रर कशाला? किती यंत्रे लावली की किती पाऊस पडतो केवढ्या क्षेत्रात पडतो?
ढग असतील तर पाऊस पडेल. आणि इथे पाऊस पडला तर कुठेतरी पलिकडचा पाऊस कमी होईल. अशा परिस्थितीत कृत्रिम पावसाचे काय प्रयोजन हे कळत नाही. फक्त रेनशॅडो क्षेत्रात (पुणे नगर जिल्हा) जिथे ढग असतात पण पाऊस कमी असतो अशा काहीशा ठिकाणी कृत्रिम पाऊस काहीसा उपयोगी होईल. मात्र विमानातून फवारणी काही कणांची फवारणी करणे असे प्रयोग झाल्याचे माहित आहेत. पण ते पंपाने पाणी आणण्यापेक्षा जास्त खर्चिका आहेत असे ऐकले होते.
प्रमोद
लेखकाशी सहमत आहे.
वरुणयंत्राच्या सहाय्याने कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगात बर्याच अडचणी आहेत.
यासंबधीच्या अनेक प्रश्न व शंकांवर आधारित ब्लॉग पोस्ट लिहीत आहे, पुर्ण झाल्यावर येथे देईन.
शिपाईगडी
सह्याद्रीच्या कड्यांवर केले तर लागलीच धपाधपा पाऊस पडेल
हे प्रयोग सह्याद्रीच्या कड्यांवर केले तर लागलीच धपाधपा पाऊस पडेल कारण ढगांमधे लगेचच (इन्सटंट) मीठ जाईल. (त्याने ती शेकोटी वि़झेल असेही वाटते). मग धरणे भरुन, त्यातुन ३ -४ वेळा उपसर्ग करायला लागुन आपसुकच सगळ्या महाराष्ट्राचा कायापालट व्हायला वेळ लागणार नाही. (पुण्यातील नद्यातील घाणेरडे पाणी उजनीत जाईल व् तेथे ३- ४ वेळा भरपुर पाणी गेल्यामुळे ते डायल्युट होऊन प्रदुषण आपोआपच कमी होईल).
गावागावात हे प्रयोग करण्याचा तोटा असा की, एका गावातील प्रयोगामुळे दुस-या कोणत्या गावात पाऊस पडेल ते सांगता येणार नाही, कारण ढगांची ऊंची, वा-याचा वेग ह्यामुळे ते बदलेल. हे सगळे गावक-यांना समजुन घेऊन त्याप्रमाणे ती मीठाची शेकोटी कुठे लावावी ते ठरवावे लागेल.
अन्यत्र मी लिहिलेला प्रतिसाद
अन्यत्र मी या विषयावर प्रतिसाद लिहिलेला होता (दुवा)
- - -
आंतरजालावर हा दुवा सापडला :
http://www3.interscience.wiley.com/journal/116316045/abstract?CRETRY=1&S...
मोठ्या प्रमाणात अति-उष्ण तापमानाचे मिठाचे अतिसूक्ष्म कण जमिनीवर तयार केले, तर वारा नसल्यास जमिनीपासून क्युम्युलोनिंबस ढगांच्या उंचीपर्यंत उष्णतेचा स्तंभ पोचू शकेल - कदाचित.
९/१० वेळा प्रयोग यशस्वी झाला, त्याबरोबर हा दुसरा आकडासुद्धा महत्त्वाचा. प्रयोगस्थिती योग्य असताना वरुणयंत्राचा वापर केला नाही तर साधारण किती वेळा पाऊस पडतो?
जर सामान्यपणे यंत्रविरहित पावसाची ५०% वि. ५०% संभवनीयता असेल, आणि वरुणयंत्राने संभवनीयता ९०% वि. १०% इतकी अधिक होणार असेल, समजा. तेवढ्या मोठ्या फरकाबद्दलही संख्याशास्त्रीय आधार (८०% संख्याशास्त्रीय "पावर" इतका) बळकट होण्यासाठी २५ (यंत्रासहित) + २५ (यंत्र चालू न करता) = ५० वेळा प्रयोग व्यावा
असे माझे ढोबळ गणित आहे.
(अर्थात ५० पैकी कुठल्या २५ प्रयोगांमध्ये यंत्र बंद ठेवले जाईल, ते नाणेफेकीने-यदृच्छेने ठरवणे महत्त्वाचे आहे.)
जर यंत्राविना पावसाची संभवनीयता ७५% असेल तर संख्याशास्त्रीय बळकटीसाठी खूप अधिक वेळा प्रयोग करावा लागेल. ११३+११३ = २२६ वेळा.
वरुणयंत्राचा प्रभाव किती क्षेत्रफळापर्यंत जातो? याबद्दल कल्पना असल्यास एकाच दिवशी एके ठिकाणी यंत्र चालू करून, तर एके ठिकाणी यंत्र चालू न करता प्रयोग केलेला बरा.
अर्थातच या क्षणी कुठल्या ग्रामपंचायतीने या यंत्रावर खर्च करणे योग्य नाही.
- - -
वरुण यंत्र - चिमणीतील धूर
तुमचा दुवा पाहिला. यात छान ऍनलिसिस आणि निष्कर्ष आहे. मूळ निबंध (मला तो सबस्क्रिप्रशन शिवाय पाहता येत नाही.) वाचायला बरे वाटले असते.
एके काळी कारखान्यांच्या चिमणीतून धूर यायचा. दररोज ५००-१००० टन कोळसा जाळला जायचा. रविवारी मात्र कारखाने बंद असायचे. मग रविवारी कमी पाऊस पडायचा का?
१९१८ ते १९२७ (ही वर्षे का निवडलीत ते माहित नाही. कदाचित मोटारगाड्यातील धूर त्यावेळी बराच कमी असेल म्हणून निवडली असतील) दरम्यान रॉचडेल या गावी रविवारी एकदंरीत (सगळ्या रविवारी मिळून) ६.०७ इंच पाऊस पडला तर एकंदर सरासरी ६.९२ इंच होती. दुसर्या गावातला ह्याच विदा ६.६६ आणि ७.११ अशा होत्या. याचा अर्थ रविवारी कमी पडलेला पाऊस हा हवेतील प्रदूषणाशी संबंधित असला पाहिजे असा तो निष्कर्ष. अर्थात या विदा वेगवेगळ्या काळासाठी/ठिकाणांसाठी तपासून घेतल्या पाहिजेत. मुंबईच्या विदा मिळणे काहीच कठीण नसावे.
यात मिठाचा कुठेही संबध नाही. दुसरे म्हणजे जाळणे भरपूर असणे महत्वाचे आहे. पावसातील फरक हा ८ ते १५ टक्के आढळला. तिसरे म्हणजे वर्षभ्रराचा पाऊस वाढला का हे कळत नाही. वरुणयंत्रात किती इंधन जाळले जाते. ५००-१००० टनाच्या इंधनाच्या तुलनेत ते किती आहे?
प्रमोद
माझा प्रयोग
डॉ. मराठे यांच्या वरुण यंत्राचा पहिला उल्लेख वर्तमानपत्रात आला तेव्हापासून मी जालावर Atificail Rain वरील माहिती गोळा करावयास सुरवात केले. भरपूर माहिती मिळते. ढगांमध्ये न्युक्लिएशन करता सोडिअम आयोडाइड चे कण फवारून पाउस पाडणे याला बर्यापैकी यश मिळाले. आपण महाराष्ट्रातही प्रयोग केला. याला फार खर्च येतो म्हणून विकल्प शोधले पाहिजेत हे खरे. वरूणयंत्र हा त्यातील एक.
माझ्या मते वरुणयंत्र ही एक भ्रामक कल्पना आहे. का? (१) लाकूड-गवत-साधा कोळसा जाळला तर अधिकतम तापमान ७००- ८०० डि., से. असू शकते. (२) मीठ ८०१ डि.से. ला वितळते. (३) मीठाची वाफ करावयाची असेल तर १४३० डि.से. तापमान पाहिजे. याचा साधा अर्थ मीठाची वाफ होऊन ते ढगांपर्यंत पोचणे शक्य नाही. त्याने न्युक्लिएशन होणार नाही.
आता समुद्राशेजारील घरातील/कारखान्यातील लोखंडी सामान गंजते. तेथे समुद्रातील मीठ कसे पोचते ? १४०० डि.सें. चा प्रश्नच नाही. तेथे मीठ पाण्यात विरघळलेले असते. ते पाणी वार्याबरोबर उडते व लोखंड गंजते. येथे न्युक्लिएशन झालेले नाही. पण असे पाणी उंचावर पोचत नाही व तिथे तुम्ही ते शिंपडलेत तरीही न्युक्लिएशन होणार नाही.
मी आमच्या शेतावर शेगडीत मीठ टाकून पाहिले. प्रयोग लहान प्रमाणावर होता. उद्देश पाउस पडतो का हे पाहण्याचा नव्हता. मीठ राखेत सापडते हे पहावयाचे होते. ते तसे सापडले. हा प्रयोग करतांना मीठ टाकले तेवढे मिळाले असे मोजले नाही.त्याची गरज वाटली नाही. रसायनशास्त्र सांगते मीठ मिळेल, ते मिळाले.
पुढचा प्रयोग असा करावयाचा होता. दिवाळीतले बाण, आकाशात रोषणाईला वापरतात ते,आणून उघडावयाचे, त्यात मीठाची बारीक भुकटी (microcised salt) भरावयाची व परत बंद करून ते उडवावयाचे. ५०-१०० फूटापर्यंत मीठ फवारता येईल. पाऊस पडेल का ? माहित नाही. पण फार खर्च नाही व उंची वाढवावयाची असेल तर तसे बाणही मिळवता येतील. मी प्रयोग केले नाहित कारण वयोमान. जर एखादा उत्साही समाजसेवक तरुण याला तयार असेल तर सर्व खर्च करावयास मी तयार आहे.
या प्रयोगाची पुढची पायरी म्हणून पुढील बातमी वाचली. मध्य प्रदेशात रॉकेटाचा वापर करून मीथ फवारायचा प्रयोग करणार आहेत. यश मिळण्याची शक्यता भरपूर. माझ्या शुभेच्छा.
शरद
चांगला दृष्टिकोन
वैज्ञानिक दृष्टिकोन भावला. धन्यवाद.
लाकडात मूळचे NaCl असतेच. (लाखो चुली, तसेच कित्येक औष्णिक विद्युत केंद्रांत लाकूड आणि कोळसा जाळले जातातच.) थोडे अधिक मीठ तापवून काय होणार आहे?
पूर्वी डॉ. मराठे टायर जाळायचे. त्यात मात्र २०००°C तापमान मिळू शकेल.
वरूण यंत्र - तांत्रिक की मांत्रिक?
या यंत्राबद्दलच्या आजपर्यंतच्या वाचनातून हे यंत्र "लक्ष्मीयंत्र","रुद्रयंत्र" अथवा तत्सम 'यंत्रां'प्रमाणे वाटते.
त्यात 'तांत्रिक' बाबीपेक्षा 'मांत्रिक' बाबी जास्त आहेत असे वाटते.
यापेक्षा शरद यांनी सुचवल्याप्रमाणे उंच उडणार्या स्फोटक अग्नीबाणांना भुकटी मिठाची पुरचुंडी बांधली तर तो जास्त तांत्रिक प्रयोग ठरेल.
शरद यांच्याशी सहमत.
अवांतर-
मूळ लेखाच्या प्रतिक्रियेतील चित्पावन ब्राह्मणांच्या उल्लेखाबाबत आश्चर्यमिश्रीत कुतुहल वाटले.
वरुण यंत्राचा प्रयोग चित्पावन ब्राह्मणांनी केल्यासच वरुण देवता प्रसन्न होते असे ध्वनित होते काय?
फुगे
शरद यांचा प्रयोगशील दृष्टीकोन आवडला.
न्यूक्लिएशनसाठी मीठच हवे असे आहे का?
फटाक्यातील रॉकेट ऐवजी फुगे चालतील का? ते ढगांपर्यंत पोहोचतील का? फुग्याच्या बाहेरून मीठ चिकटवून ठेवता येईल किंवा मिठाची पुरचुंडी बांधून ठेवता येईल.
नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)
प्रयोग
वरुण यंत्राचा प्रयोग वर उदाहरणे दिल्या प्रमाणे १००% पटत नाहीच.
असेच प्रयोग कमी खर्चात करायचे असतील तर वर लिहिल्या प्रमाणे फटाके अथवा फुगे वापरता येतील. अथवा ज्या शहर/गावांवरुन सध्या विमाने उडतात त्यांचा वापर असे फुगे अथवा फटाके या प्रयोगांसाठी वापरल्यास यशाची शक्यता जास्त. :)
दुसरी बाब
पाऊस नेमका कसा पडतो याबाबत मला फारसे माहित नाही. पण पडायच्या सुरुवातीला तो ढगांच्या वरच्या भागात तयार व्हायला हवा असे वाटते. म्हणजे खाली पडणार्या थेंबाला ढगातील थेंब (ढग हे बाष्पीकृत अवस्स्थेत नसतात) मिळतील व ते मोठे बनत अधिक वेगाने पडतील. म्हणजे सीडींग वरती व्हायला पाहिजे असे मला वाटते. म्हणून विमानाचा फवारणीसाठी वापर सयुक्तिक वाटतो. अर्थात धनंजय यांनी दिलेले चिमणीचे उदाहरण खालून घडणार्या सीडींगला थोडीफार मान्यता देते.
माझ्या आठवणीत पूर्वी सिल्वर आयोडाईड यासारखे महागडे सॉल्टस वापरले गेले होते. मुंबई महानगर पालिकेने एक स्वस्त पर्याय म्हणून अशा सॉल्टची होळी केली होती. (महानगरपालिकेची ख्याती बघून चांदी करण्याची शक्यता जास्त.). या प्रयोगाचा खर्च फार म्हणून आता वरुण यंत्रात मिठाची योजना केली असे दिसते. पहिल्यांदा खालून सीडींग वरती पोचते की नाही याला पुरावा नाही, त्यानंतर कसले सीडींग करावे यावरचे फारसे संशोधन दिसत नाही. सीडींग खालून करता येते की नाही याची तपासणी नाही. जास्तीत जास्त संशय यज्ञात भवती पर्जन्यः या वचनावरचा विश्वास यात दिसतो.
शरद यांनी फार उत्तम उदाहरण दिले आहे. मिठ वितळले/बाष्पीभवन झाले नाही तरी त्याचे बारीक कण (पण त्यासाठी उत्तम दळलेले मीठ वापरले पाहिजे.) हवेबरोबर उडू शकतात. समुद्रातील पाण्याचे तुषार उडतात त्यांचे हवेत बाष्पीभवन होते आणि वातावरणात मीठ कण रुपाने येऊ शकते.
विकी मधील दुव्यात चीन रॉकेटस चा वापर करताना दिसतो. उंच ठिकाणी उदा. महाबळेश्वर ढग अगदी जवळ असतात ति़कडे मीठ दिवाळीतल्या रॉकेटस द्वारे सहज पोचवता येईल. (पण काय उपयोग तिकडे पाऊस चांगलाच पडतो.) येवढ्याशा मिठाचा काही उपयोग होतो का (होण्याची शक्यता नाकारता येणार नाही . जर ते कॅटलिसिस सारखे असेल तर.) हे कदाचित तिथे तपासता येणे जास्त सोपे आहे.
प्रमोद
बातमी
‘शिवामृत’चा गिरवावा असा कित्ता