ओझे फेका
"असल्या गोष्टी ठरवण्याच्या किंवा शोधून काढण्याच्या भानगडीत पडू नका बुवा! माहिती नसली तर असल्या जुनाट गोष्टी विसरून जा. त्याने आयुष्यात काहीही अडत नाही. मला माझी कुलदेवता किंवा दैवत (असल्यास) काय आहे? याची माहिती करून घेण्याची आयुष्यात कधीही गरज भासली नाही. व आता भासेल असे वाटत नाही. या असल्या कल्पनांचे ओझे आपण जितक्या लवकर खांद्यावरून फेकून देऊ तितके आयुष्यात हलके वाटेल. "
वरील मौलिक सल्ला वाचून काही विचार मनात आले.
(१) मला व माझ्या कुटुंबातील सर्वांना शास्त्रीय संगीतातले काही कळत नाही, त्यामुळे आमचे काही अडत नाही. संगिताची माहिती करून घेण्याची गरज भासली नाही व भासेल असे वाटत नाही. (सर्वांनी) संगिताचे ओझे खांद्यावरून फ़ेकून दिले की हलके वाटेल.
(२)मी, माझे कुटुंब, माझे मित्रमंडळ, व आजूबाजूला राहणारी हजार -दोन हजार कुटुंबे यांचे देशाच्या इतिहासाची माहिती नसल्याने काही अडत नाही, त्याची आयुष्यात कधी गरज भासली नाही व भासेल असे वाटत नाही. इतिहासाचे ओझे शाळेपासूनच मुलांच्या खांद्यावरून फेकून द्या.
(३) मी राहतो त्या शहरातील ३० लाख लोकांना अणुविज्ञान, अंतराळशास्त्र, नॅनो विज्ञान असल्या (नविन) गोष्टींवाचून अडत नाही, त्यांना त्याची माहिती करून घेण्याची गरज भासली नाही व पुढेही भासेल असे वाटत नाही. तेव्हा विश्वविद्यालये, राष्ट्रीय संशोधन संस्था यातून या गोष्टींची हकालपट्टी करा.
(४) मारुतीच्या शेपटीप्रमाणे यादीत भर घाला
(थोडक्यात मला जा गोष्टीत रस नाही, गम्य नाही, गरज नाही, त्या सर्व गोष्टी जालावरून बाद करा.)
शरद
Comments
आपल्याला एक (मौलिक) सल्ला,
तुम्हाला मौलिक सल्ले कोणी दिले ते माहित नाही पण जे तुम्ही जे टाकून द्यायला सांगत आहात ते नक्कीच ओझे ह्या गटात मोडत नाही (निदान माझ्यासाठी तरी).
आणि जर हे (जसे अंतराळ शास्त्र, उपग्रह सोडणे, नियंत्रण करणे ) सर्व टाकून दिले तर आपण लुळे, पांगळे, आंधळे, बहिरे आणि मुके होऊ.
आपल्याला एक (मौलिक) सल्ला,
इथे जालावर मतभेद हे होतातच, (ते धरूनच लिखाण करावे) म्हणून केवळ त्यासाठी नविन धागा काढणे उचित नव्हे.
हलके
हलके आणि जड वाटणे फार सापेक्ष आहे. तसेच एकला एक गोष्ट उपयुक्त वाटते तीच दुसर्याला निरूपयोगी वाटते. इथे सामान्यीकरण शक्य नाही.
हलके, जड, कालसापेक्ष.
एखादी गोष्ट सुरवातीला कठीण म्हणून जड ओझं वाटते. पण त्यात रस घेतला तर कालांतरानी ती जमू लागते व सोपी म्हणजे हलकी वाटू लागते. उदा. गणित विषय.
नवा धागा का?
संपादकांना विनंती की या धाग्याला त्या धाग्याचा एक उपधागा बनवावे.
नको
उपधागा नसलेला बरा असे वाटते. तिथे ५० च्या पुढे गेले की परत हुडकणे आले.
अवांतर शंका : दोन किंवा तीन पाने प्रतिसाद झाल्यावर त्यातील नवीन प्रतिसादांवर जाण्याचा सर्वात जलद मार्ग कुठला?
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
बास का?
"अवांतर शंका : दोन किंवा तीन पाने प्रतिसाद झाल्यावर त्यातील नवीन प्रतिसादांवर जाण्याचा सर्वात जलद मार्ग कुठला?"
हा!
हम्म
दुव्याबद्दल आभार.
वापरून पाहिले. माझे कनेक्शन १६-१७ केबीपीसच्या वर जात नाही त्यामुळे लोड व्हायला थोडा वेळ लागतो. मात्र वापरायला फारच सोपे आहे.
प्रतिसाद बघण्याची उत्सुकता > ( तेव्हा चाललेली इतर पाने/कामे )
असे झाले तर वापरेन. :)
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
नवे लेखन
>>> नवीन प्रतिसादांवर जाण्याचा सर्वात जलद मार्ग कुठला? <<<
मी असे करण्यासाठी हा मार्ग वापरतो ::
"नवे लेखन" चे पृष्ठ समोर आल्यावर तिथे समजा "३ नवीन" अशी निळाईतील सूचना दिसली की, मुख्य धागा विषयावर उंदीरमामाला न नेता त्याला "३ नवीन" वर नेऊन तीवर टिचकी देतो. असे केल्याने थेट त्या ३ नव्या प्रतिसादापैकी पहिल्या प्रतिसादावर जाता येते. त्याचा थोडक्यात अर्थ असा की, उरलेले २ नवे प्रतिसाद "त्या" पुढे आहेत, मागे जाऊ नये.
(अर्थात हा ५०+ प्रतिसादासाठी योग्य समयबचत उपाय आहे.)
हे फेका
सध्या बातम्यांच्या वाहिन्यांवर ऑक्सिटोसिन वापरून पि़के आणि प्राणी आकाराने आणि लवकर वाढवण्याचे धंदे दाखवतात. त्या वाढवण्याचे आपल्याला काय ओझे घ्यायचे? आपले काम खाण्याचे. मग फेकून द्या ते ज्ञानाचे ओझे.
प
लय भारि शरदराव वितरोग सांगितला थोडक्यात
नवा धागा काढण्यासारखे काय आहे?
एखाद्याने अमुक गोष्टीची गरज नाही असे सांगितले म्हणून बिघडले कुठे? हे त्यांचे व्यक्तिगत मत झाले किंवा त्यांना त्या क्षणी वाटलेले मत झाले. जो पर्यंत ते मत धरून ते धांगडधिंगा करत नाहीत तो पर्यंत त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येते ना. ते जर त्रास देत असतील किंवा ही चर्चा संपादित करावी अशी मागणी करत असतील तर आक्षेप घेणे योग्य आहे अन्यथा यात नवा धागा काढण्यासारखे काय आहे? असो.
आता विचारले आहेच म्हणून,
मला कवितांमध्ये रस नाही. त्या कळतही नाहीत. उपक्रमावर त्या टाकू नयेत असे धोरण आहे म्हणून मला उपक्रम आवडते.
हाहाहा! आता मला मार पडणार, तेव्हा पळते.
वेलकम बॅक
शरदराव वेलकम बॅक
बर्याच दिवसांनी तुमचे लेखन दिसले.
चन्द्रशेखर्
अंधार
आपल्याला दिसत नसले कि अंधारच आहे असे माणूस समजतो, तुम्ही तसे समजा ना. दिवे लावणारे लावतात, बाद कशाला करताय.
पटत नाही
ओझे फेकून देणे याचा लेखकाने पहिल्या ओळींमध्ये मर्यादित अर्थ घेतला आहे, तर पुढे अतिशयोक्ती करता यावी यासाठी (सोयीस्करपणे) अधिक व्यापक अर्थ घेतलेला आहे.
यात सल्ला देणाऱ्याने एखाद्या संकल्पनेची व्यक्तीगत गरज अधोरेखित केलेली आहे. आणि समाजाने माझं अनुकरण केलं तर त्याचं भलंच होईल अशी खात्री मांडली आहे. कुलदैवतच का, आपण अनेक गोष्टींबाबत अशी विधानं करतो. हेच वाक्य विषय बदलून असंही लिहिता येईल
मला सिगरेट ओढण्यात काय मजा आहे? याची माहिती करून घेण्याची आयुष्यात कधीही गरज भासली नाही. व आता भासेल असे वाटत नाही.
असं म्हणून पुढे जर सल्ला देणाऱ्याने
हे सिगरेटच्या आकर्षणाचं ओझं आपण जितक्या लवकर खांद्यावरून फेकून देऊ तितके आयुष्यात हलके वाटेल.
असं म्हटलं असतं, तर तुमच्या मनात पुढचे विचार आले असते काय? हीच वाक्यं अनुक्रमे सतीची प्रथा, बलात्कार, खून वगैरे शब्दप्रयोग वापरून लिहिता येतील. अशा विधानांवर पुढच्या प्रतिक्रिया तितक्याच ठामपणे येतील काय?
मुळात लेखकाला या सल्ल्याबाबत खटकलेली गोष्ट अशी वाटते की 'हे सल्लागारा, कुलदेवता तुला ओझ्यासारख्या वाटत असल्या तरी मला त्या प्रिय आहेत, तेव्हा तुझा त्याग तू इतरांवर लादणे चांगले नाही'. पण लादणं आणि ओढवून घेणं या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. 'हे सल्लागारा, हीच विधानं तू सिगरेट अगर बलात्काराविषयी केली असतीस तर मी होकार दिला असता, पण माझ्या प्रिय विषयाबद्दल तू बोललास - हे मला अप्रिय आहे - त्यामुळे मी तिरकस भाषेत निषेध दर्शवतो.' अप्रिय गोष्टी काय याविषयी असहमती असणं योग्य आहे की नाही, तसेच आपल्याला अप्रिय गोष्टींचा निषेध आपल्याशिवाय इतरांनी करावा की नाही याबाबत लेखकाचा संभ्रम जाणवतो.
आता पुढच्या विधानांविषयी.
जर शास्त्रीय संगीत आवडत नसेल तर जरूर ते ओझं फेकून द्या. इतरांना जे हवं ते करू द्यात. असा मर्यादित अर्थ सल्ल्यातून घेता येतो. हेच इतर बाबतीतही म्हणता येतं. प्रियालींच्या मोजक्या शब्दातल्या प्रतिसादांत त्यांनी हेच सांगण्याचा प्रयत्न केलेला दिसतो.
मात्र मी क्ष करतो. - या विधानावरून
तेच इतर सर्वांनी केलं तर सर्वांचं भलं होईल याची मला खात्री आहे. - या विधानावर नेहेमीच उडी मारता येते असं सल्लागाराच्या विधानात नसलेलं गृहितक तुम्ही वापरत आहात. ते अन्याय्य वाटतं.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
चंद्रशेखर यांचे बरोबर आहे.
विस्थापित माणसाला/ समूहांना स्वतःची मुळे कुठे रुजली होती, हे जाणून घेण्याची सुप्त आकांक्षा असतेच. ऍलेक्स हॅलीची 'द रुट्स्' ही कादंबरी वाचल्यानंतर ती मनोवस्था समजून येते. पण ही शोधयात्रा संपल्यावर किंवा मधले दुवे नष्ट झाल्याने एका टप्प्यावर थबकल्यावर मग नक्कीच प्रश्न उभा राहतो. आता पुढे काय? मला वाटते, की चंद्रशेखरजींचे उत्तर इथे लागू पडते. जर तुम्ही माघारी वळून तुमच्या आद्य वास्तव्यस्थानाकडे जाणार नसाल आणि जिप्सींप्रमाणे तुमची पुढची वाटचाल होणार असेल तर कुलदैवत, कुलाचार, मूळगाव, घराणे, वंश, रुढी या बाबींना फारसे महत्त्व उरत नाही. तुमच्या जगण्याची, आचार-विचारांची पद्धत तुम्हीच ठरवून घ्यावी लागते आणि देशकालमान बघून त्यात वेळोवेळी बदल घडवून आणावा लागतो.
दुसरा मुद्दा हा आहे, की संततीच नसेल किंवा वारस म्हणून मुलगा नसेल अशांची कुलपरंपरा त्यांच्याबरोबरच संपणार असते. अशा गटाला परंपरांचे काटेकोर पालन हे ओझे वाटू शकेल. जे लोक धर्म ही स्वतःची ओळख व्यक्त करण्यापुरता मानतात आणि त्यापलिकडे धर्माला त्यांच्यालेखी फार महत्त्व नसते अशांनाही कुळ, वंश, जातीचा अभिमान या गोष्टी ओझेच वाटू शकतात. एखाद्याला भविष्यकाळ घडवण्यासाठी भूतकाळाकडे बघण्याचीच गरज वाटत नसेल तर तो हे ओझे फेकून नाही का देणार?
ओझे हे ही-
फेकुन देण्याच्या त्या यादीत हे ही भ्रम असले तर ?-
१. पुणे ही एके काळी सायकलींचे शहर होते. (खरं म्हणजे सध्या पुण्यात पुर्वीपेक्षा १० पटीनं जास्त सायकलवाले आहेत. फक्त ते आता पुर्वीच्या मध्यमवर्गीय पुणेकरांना दिसत नाहीत)
२. मराठी माणूस नाटकवेडा आहे. (मग मराठी नाटके चालत नाहीत अशी ओरड का करतात?)
३. पुणे तेथे काय उणे (बरेच आहे. हत्तीवरुन मिरवणूक काढता येईल असे किती खेळाडू आहेत/होते पुण्यात?) (पुण्यात सांडपाणी स्वच्छता न करताच नदीत सोडून देतात)
ओझे - कुणाच्या खांद्यावर कुणाचे ?
शरदसाहेब,
`ओझे फेका` हा तुमचा धागा वाचला.
>>> या धाग्यातील विचार तुम्ही तिरकसपणे व्यक्त केले आहेत की अगदी रोखठोक अर्थाने, हे लेखनाच्या शैलीवरून कळत नाही. (निदान मला तरी समजले नाही.) तुम्ही हे तिरकस शैलीत लिहिले असेल तर मग काही हरकत नाही़. तसे लिहिले असेल तर तुमची या विचारांना (कदाचित) मान्यता नाही, असे समजायला वाव आहे. पण गंभीरपणे लिहिले असेल तर मात्र मग ते `गंभीर` आहे ! :)
पहिल्या `मौलिक सल्ल्या`पासूनच सुरवात करू या :
`मौलिक सल्ल्या`चा कुलदैवताविषयीचा पहिला भाग :
>>> `कुलदैवता`बाबत अनेकांचे असे होते. व्यक्तिगत पातळीवरून सांगायचे तर मीही अद्याप कधी आमच्या कुलदैवताच्या दर्शनाला गेलेलो नाही. आमचे कुलदैवत मला माहीत आहे. ते गावही माहीत आहे. एका दिवसात जाऊन येण्यासारखेही आहे....पण मी अद्याप गेलेलो नाही, हे खरे. याचे कारण, तेवढी उत्कटता, तीव्रताच मला आजवर कधी वाटली नाही. हां, मी आमच्या कुलदैवताचा फोटो (काळा-पांढरा हां ! रंगीत, कळाहीन नव्हे ! ) अनेकदा डोळे भरून पाहिलेला आहे. पाहत असतो. एवढ्यापुरतीच कुलदैवताबाबतची माझी भक्ती. भक्ती हा शब्दही मी इथे सवयीने वापरून गेलो. तो फोटो पाहताना मनात भक्तीचा भावही अभावानेच असतो. कुलदैवताचे ते रूपडे मला आवडते. फोटो काळे-पांढरे निघत असतानाच्या काळाचा स्पर्श, त्या काळाचा श्वास मी अनुभवतो. इतकेच. रोजच्या धबडग्याच्या आयुष्यात आपले कुलदैवत अमूक-तमूक आहे, हे तरी कुठे कुणाच्या लक्षात राहते...? मग त्या कुलदैवताच्या दर्शनाला जाणे वगैरे गोष्टी तर दूरच. [आणि कुणी एकदाही (किंवा कधीच) कुलदैवताच्या दर्शनाला गेले नाही तर ते कोपेल, शाप देईल आणि आयुष्य जगणे अशक्य करून टाकेल, इतके काही कुणाचे कुलदैवत सवंग, सस्ते असेल, असे वाटत नाही ! अहो, कुलदैवताला काय देणे-घेणे पडले आहे ? या नाहीतर येऊ नका ! आपल्याच मनाचे सारे खेळ ...!! ]
इथे `कुलदैवत` प्रतीकात्मकरीत्या घेतले तरी चालेल. इतरही अनेक बाबतींत आपली गत `कुलदैवता`सारखीच असते ! आयुष्यात आपण अनेक गोष्टी केल्या तरी काही फरक पडत नाही आणि केल्या नाहीत, तरी खूप काही फरक पडतो, असेही नाही. (पण आपण करायच्या गोष्टी कधी करत नाही नि न करायच्या गोष्टी करतो. करत राहतो. असो. माणसाच्या जगण्याची हीच तर खरी गंमत आहे. )
`मौलिक सल्ल्या`चा दुसरा भाग :
या असल्या कल्पनांचे ओझे आपण जितक्या लवकर खांद्यावरून फेकून देऊ तितके आयुष्यात हलके वाटेल.
>>> बरोबर आहे. पण कोणती कल्पना कुणाला ओझ्यासारखी वाटेल आणि कुणाला अगदी हलकीफुलकी वाटेल, हे ठरवणार कोण ? हे ज्याचा-तोच ठरवणार. एखाद्याला वाटलेले `ओझे` ही दुसऱया एखाद्याची गरज - मानसिक गरज- असू शकते. यावर बरेच काही लिहिता येईल.
................
आता तुमचे विचार :
(१)मला व माझ्या कुटुंबातील सर्वांना शास्त्रीय संगीतातले काही कळत नाही, त्यामुळे आमचे काही अडत नाही. संगिताची माहिती करून घेण्याची गरज भासली नाही व भासेल असे वाटत नाही. (सर्वांनी) संगिताचे ओझे खांद्यावरून फ़ेकून दिले की हलके वाटेल.
>>> तुमच्या आणि तुमच्या कुटुंबीयांच्या आयुष्यावर असलेल्या अनेक ओझ्यांपैकी एक ओझे म्हणजे शास्त्रीय संगीत. मान्य आहे. तुमच्या या मताचा आदर. तुम्हाला शास्त्रीय संगीत कळलेच पाहिजे आणि त्याविना तुमचे काही अडलेच पाहिजे, असे कुणीही म्हणणार नाही. (म्हणू शकत नाही!)...पण असेही अनेकजण असतात की, ज्यांचा दिवस शास्त्रीय संगीत ऐकल्याशिवाय ढळत नाही आणि रात्र पुढे सरत नाही. त्यांच्यासाठी ते ओझे नसते; तर ओझे हलके करण्याचा एक उपाय असतो !
अनेकदा आपण ठरवून टाकत असतो की, मला या गोष्टीतले काही कळत नाही, त्या गोष्टीतले काही कळत नाही. एखाद्या रागाची एखादी लकेर ऐकण्यासाठी शास्त्रीय संगीतातील असे काय कळावे लागते ? तुम्हाला थोडेच कुणी त्या लकेरीची शास्त्रीय परिभाषा विचारायला बसलंय ? पण पुन्हा ही तुमची खासगी बाब झाली. शास्त्रीय संगीतातील तुम्ही काही `कळून` घ्या किंवा त्यावाचून तुमचे काही `अडू` देऊ नका, असे मी म्हणू शकत नाही. अशा अनेक गोष्टी अनेकांना कळत नसतात...पण म्हणून त्या अनेकांचे काही त्यामुळे अडत नाही आणि त्या बिचाऱया गोष्टींचे तर काही म्हणता काहीच अडत नाही ! आपापल्या ठिकाणी दोघे सुखात असतात !!
...
(२) मी, माझे कुटुंब, माझे मित्रमंडळ, व आजूबाजूला राहणारी हजार -दोन हजार कुटुंबे यांचे देशाच्या इतिहासाची माहिती नसल्याने काही अडत नाही, त्याची आयुष्यात कधी गरज भासली नाही व भासेल असे वाटत नाही. इतिहासाचे ओझे शाळेपासूनच मुलांच्या खांद्यावरून फेकून द्या.
>>> अहो, देशच कशाला ? आपल्या खापरपणजोबांचे नाव आपल्याला माहीत नसले तरी आपले काही अडत नाही !!! इथे कितीजणांना आपापल्या या पूर्वजाचे नाव माहीत असेल ? (देशाची खूप दूरची गोष्ट केलीत तुम्ही !) स्वतःच्या खापरपणजोबांचे नाव जाणून घेण्याची गरज कधी आपल्याला भासत नाही. बाकीचे राहू द्या. पुन्हा व्यक्तिगत सांगायचे तर माझीही धाव फक्त माझ्या पणजोबांपर्यंतच आहे. माझ्या खापरपणजोबांचे नाव मला माहीत नाही. (आमच्या घरी आमच्या आजोबांनी अगदी नीटपणे करून ठेवलेली पूर्वजावळ आहे. अनेकानेक पिढ्यांपर्यंतची. भरपूर लांबलचक, ऐसपैस आहे ती. उलगडायला गेलो तर दोन्ही हातांत मावत नाही. मी ती दोन-तीन वेळा वाचलेली आहे. पण माझ्याच रक्ताच्या नात्यातील त्या सगळ्यांची नावे माझ्या लक्षात राहत नाहीत. आवर्जून लक्षात ठेवावीत, असेही तीव्रतेने कधी वाटले नाही. ते शक्यही नाही.). पण नात्यातील वडीलधाऱयांकडून त्या पूर्वजांच्या काही प्रेरक गोष्टी कानावर पडत असत़; पडत असतात आणि त्या ऐकणे, ऐकल्यानंतर प्रसंगपरत्वे त्यांचे स्मरण करणे ही माझी मानसिक गरज असते. स्मरणांचे, आठवणींचे हे ओझे फेकून द्यावेसे वाटत नाही. उलट हवेहवेसे वाटते ! वर्तमानकाळाच्या रणरणत्या उन्हात गतकाळातील त्या सावल्याच कधीकधी गारवा देऊन जातात. गतकाळाशी, भवतालाशी निगडित आपल्या काही मानसिक गरजा असतात आणि हे मान्य करायला मला (तरी) कसलीही लाज वाटत नाही. माणूस अधांतरी जगू शकत नाही !
...
(३) मी राहतो त्या शहरातील ३० लाख लोकांना अणुविज्ञान, अंतराळशास्त्र, नॅनो विज्ञान असल्या (नविन) गोष्टींवाचून अडत नाही, त्यांना त्याची माहिती करून घेण्याची गरज भासली नाही व पुढेही भासेल असे वाटत नाही. तेव्हा विश्वविद्यालये, राष्ट्रीय संशोधन संस्था यातून या गोष्टींची हकालपट्टी करा.
>>> एखाद्या गोष्टीची किमान एखाद्याला जरी आवश्यकता असेल तर ती गोष्ट टाकाऊ किंवा तुमच्या भाषेत `हकालपट्टीयोग्य` ठरू शकत नाही.
३० च्या ३० लाख लोकांच्या वतीने तुम्ही एकटेच कसे काय बोलू शकता ? त्यांना काय हवे-काय नको, हे कसे काय ठरवू शकता ? २९ लाख ९९ हजार ९९९ लोकांचे (यातून तुम्हाला वगळले आहे !) वरील गोष्टींपासून अडत नाही, या गोष्टी माहीत करून घेण्याची गरज (त्यांना) भासली नाही व पुढेही भासेल असे वाटत नाही, हे तुम्ही कोणत्या आधारे ठरवले ?
...
(४) मारुतीच्या शेपटीप्रमाणे यादीत भर घाला
(थोडक्यात मला जा गोष्टीत रस नाही, गम्य नाही, गरज नाही, त्या सर्व गोष्टी जालावरून बाद करा.)
>>> माझ्याकडून माझी ही भर :
- जालावरील हा धागा मला आवडला नाही. (पण जालावरून तो काढून टाकला जायला, बाद करून टाकला जायला हवा, या धाग्याची `हकालपट्टी` करायला हवी, असा विचारही माझ्या मनात कधी येणार नाही.)
ओझे नाही.
श्री.प्रदीप् कुलकर्णी यांच्या या अभ्यासपूर्ण आणि सविस्तर प्रतिसादाशी पूर्णतः सहमत आहे. श्री.चंद्रशेखर यांच्या ज्या मतावर आधारित श्री.शरद यांनी या धाग्याचे प्रयोजन केले, त्या मताला मी वाचताक्षणीच पाठिंबा दिला होता, कारण सध्याच्या या आधुनिक काळात काही गोष्टींना किती महत्व द्यावे आणि पुराणकाळातले खड्डे खणण्याचे काही प्रयोजन आहे का हा विचार त्या मतामागे होता. याचा अर्थ त्या मताचे लिंपण जीवनातल्या सर्वच घटकांना लावत जावे अस सूर त्यातून प्रकट होत नाही.
मी देवळात क्वचितच जातो म्हणून जे जातात त्यांना अडविण्याचे किंवा त्यांच्यावर टीका करण्याचा मला नैतिक वा घटनात्मक हक्क पोहोचत नाही. त्या धाग्यावर इथल्याच एका सदस्याने काही हिंदू देवतांचा "क्षुद्र" देवता असा उल्लेख केला आहे. मला देवतांचा 'तसा' उल्लेख खटकला होता, पण तसे मत व्यक्त करण्याचा वा त्यावर भाष्य करण्याचा त्या सदस्यांचा अधिकार आहे हे मी मान्य करीत असल्याने त्यांचे तसे मत का आहे याची माहिती करून घेण्याची मला गरज भासली नाही.
(१) संगीत, (२) इतिहास व (३) विज्ञान याबाबतीत श्री.प्रदीप कुलकर्णी यांच्या विचाराशी १००% सहमत आहे.
समाजात राहायचे तर काही गोष्टींना सामोरे जावेच लागते, अन् ते ओझे म्हणून टाकून देता येत नाही ~~ अगदी वैयक्तिक पातळीवरसुद्धा.
औपरोधिक असेल तर?
हा धागा औपरोधिक असल्याची शक्यता प्रदीप कुलकर्णी यांनी खुली सोडलेली आहे (आणि तीच खरी आहे असे मला वाटते). त्या परिस्थितीत ते शरद यांच्याशी सहमती दाखवितील असे मला वाटते. तुम्ही प्रदीप कुलकर्णी यांच्याशी पूर्णतः सहमत आहात असे नोंदविले आहे आणि चंद्रशेखर यांच्या प्रतिसादाशीसुद्धा सहमती दाखविली आहे. परंतु "(१) संगीत, (२) इतिहास व (३) विज्ञान" यांच्याबाबतीत 'टाकू नये' असे म्हणणारे प्रदीप कुलकर्णी कुलदैवताच्याही बाबतीत "ज्याचे त्याने ठरवावे" असे म्हणतात. "पुराणकाळातले खड्डे खणू नये" आणि "त्या मताचे लिंपण जीवनातल्या सर्वच घटकांना लावत जावे" या दोन्ही वाक्यांशी प्रदीप कुलकर्णी असहमत आहेत (मीसुद्धा असहमत आहे) असे मला वाटते.
ते सदस्य शरद हेच आहेत.
बरोबर
हा ही उल्लेख जाणीवपुर्वक आहे. देवदेवतांमधील उच्चनीचता ही भक्तांच्या मानसिकतेतुन प्रतिबिंबिय होत असते. राम कृष्ण विष्णु शंकर वगैरे देव आणी म्हसोबा बिरोबा जखाई तुकाई वगैरे देवदेवता यांच्यातील फरक अधोरेखित करण्यासाठी हा उल्लेख आहे. शैव वैष्णव यांच्या मारामार्या या उच्च नीचतेतुनच आहेत. एकमेकांची उणी दुणी काढताना श्रद्धास्थानांची देखील हायरार्कि भक्तजन मांडत असतात.
प्रकाश घाटपांडे
मानसिकतेचा मुद्दा
>>> देवदेवतांमधील उच्चनीचता ही भक्तांच्या मानसिकतेतुन प्रतिबिंबिय होत असते. <<<
मान्य. पण म्हणून ती उच्चनीचता प्रतिबिंबीत करताना किमान चांगल्या (तसेच भावना न दुखावणार्या) शब्दात करता येत नाही का? "क्षुद्र" या शब्दाला "त्याज्य" असा शिवीचा भास आहे आणि त्यातही एका (किंवा अनेक) देवदेवतांना संबोधून त्याचा वापर केला आहे. प्रतिसाद देणारे सदस्य हे अभ्यासू, उच्चशिक्षित आहे असे मी समजतो (कारण त्यांची विवेचनाची धाटणी ते तसे असल्याचे दर्शविते); पण त्यामुळेच भाषा वापराचा तो निष्काळजीपणा स्वीकारणीय होत नाही. पुढे उपप्रतिसादात दुसर्या एका सदस्याने "क्षुद्र" ऐवजी "दुय्यम वा उपदेवता" असा बदल सुचविला तो योग्य आहे असे मानले गेले असे क्षणभर गृहीत धरले तर संपादन करून् मूळ संबोधन काढून टाकता आले असते.
देवतांचा जर असा उल्लेख होतो तर उद्या इथे "रामास लक्ष्मण हा एक आदर्श असा भाऊ होता. त्याचप्रमाणे त्याला भरत आणि शत्रुघ्न असे आणखीन दोन क्षुद्र भाऊ होते" असा उल्लेख केला गेला तर तो आपण ही लेखकाची मानसिकता म्हणून स्वीकारावी का?
ज्याचे त्याने ठरवावे
>>> हा धागा औपरोधिक असल्याची शक्यता प्रदीप कुलकर्णी यांनी खुली सोडलेली आहे (आणि तीच खरी आहे असे मला वाटते). <<<
तसेही असेल (किंवा आहे असे म्हणू या !) पण त्यामुळे चंद्रशेखर यांचे मत दुय्यम ठरत नाही कारण (मला वाटते) त्याना असे सूचित करायचे होते की, ब्राह्मण जातीचे देव वेगळे, मग बहुजन समाजाचे कसे वेगळे (म्हणून् उच्चवर्णियांना त्याज्य), नंतर लिंगायतामध्ये शैव-वैष्णव उपगटात आजही फार तीव्र असलेले भेद, पुढे साहजिकच मुसलमान्, इसाई...इ. इ. अशी जंत्री लागणार आणि एकीकडे चंद्रमंगळावर मानव वस्ती करायच्या गोष्टी करीत आहे आणि इथे आम्ही घाटावर परतपरत तीच धुणी आपटत बसलो आहे; त्यामुळे त्या धाग्यावर जास्त चर्चा नको. सबब त्या अनुषंगाने त्या विषयाचे "ओझे" लवकरात लवकर टाकून द्यावे हा अर्थ मी माझ्यापुरता घेतला आणि मग त्या धाग्याकडे पुन्हा जाणे मला प्रशस्त वाटले नाही. मात्र श्री.शरदरावांनी त्या विशिष्ट निर्णयाची केमिस्ट्री समाज जडणघडणीतील सर्वच पिसांना लावल्याने पुनःश्च् तो विषय चर्चेला आलाच. असो.
शेवटी तुम्ही आणि श्री.कुलकर्णी म्हणता तसे "ज्याचे त्याने ठरवावे" हेच सार उपयुक्त ठरेल.
जाऊ द्या मित्रांनो... कूल
प्रतिकजी,
शरदजींनी वापरलेला क्षुद्र देवता हा शब्द हा जाणीवपूर्वक (सहेतुक) वापरलेला नसावा, असे मला वाटते. त्यामुळे आपण तेवढेच धरुन बसायला नको. अगदी संत साहित्यातही किंवा संस्कृती कोशातही क्षुद्र देवता असाच उल्लेख आढळतो. लक्षात घ्या, की शिव व पार्वती या मूळ आणि उच्चतर देवता आहेत, परंतु त्यांच्याइतके महत्त्व त्यांच्या कनिष्ठ भूतगणांना नाही. त्यातून समाजाचा प्रवास कनिष्ठ स्तराकडून उच्च स्तराकडे व्हावा, असे तत्कालीन संतांपासून सुधारकांपर्यंत सर्वांनाच अभिप्रेत होते. दगडा-धोंड्यांना शेंदूर लावला तरी तो देव असतो. आपला आत्माही देव असतो. आपल्या महाकाव्यांतील श्रेष्ठ व्यक्तीरेखाही देवाचा अवतारच असतात. या सगळ्या उपासनेतून (सगुणातून) माणसाने 'देव म्हणजे विश्वातील चैतन्यशक्ती आणि जे उत्तम ते तत्त्व' (निर्गुण) याकडे प्रवास करावा, हाच संदेश दिला गेला आहे.
त्यामुळे माझी आपणा सर्वांना विनंती आहे, की जर उपदैवत हा शब्दप्रयोग मान्य होत असेल तर तो स्वीकारुन पुढे चलावे. वैयक्तिक पातळीवर येऊन प्रक्षुब्ध होऊ नये. क्षुद्र या शब्दाला अलिकडे अपमानास्पद छटा आहे म्हणून तो टाळला जावा, इतकेच म्हणणे.
कालानुसार बदल
>>> क्षुद्र या शब्दाला अलिकडे अपमानास्पद छटा आहे म्हणून तो टाळला जावा <<<
हेच म्हणतो; आणि म्हणूनच किमान आपण "उपक्रमीं" नी तशा छटा आपल्या लेखनात येऊ न दिल्यास धाग्यावर आनंदाने (जरी मतभेद असले तरी...) सहभाग घेता/देता येतो. माझे हिंदुच काय पण इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माविषयी (बर्यापैकी) वाचन आहे, त्यामुळे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे "तसे" उल्लेख पहिल्या काही शतकातील काही लिखाणात सापडत असले म्हणून त्यांचा आज जशाच्या तसा वापर करावा हे धर्मभावना राखणे आणि परस्पर सामंजस्याच्या दृष्टीने योग्य नाही.
काळाच्या ओघात काही संज्ञा बदलल्या जातात. उदा. राज्य शासनाच्या १९५५ ते ६२ या कालावधीतल्या शालेय क्रमिक पुस्तकात "प्रेषित महंमद पैगंबरांनी त्यामुळे मक्केहून मदिनेला पळ काढला." असे त्यांच्या पराभवाचे वर्णन होते. (आणि ते ऐतिहासिक सत्य होतेच होते). १९६२ च्या चिनी आक्रमणानंतर परराष्ट्र व्यवहाराची काही समीकरणे बदलली. तसेच भारत सरकारला आपल्या देशात हिंदु-मुस्लिमात कोणत्याही दिशेने/कारणाने तेढ नको होती. साहजिकच शिक्षण खात्यालाही त्या संदर्भात मध्यवर्ती सरकारकडून श्वेतपत्रिका प्राप्त झाली. त्यानुसार क्रमिक पुस्तकात इतिहासाला "सौम्य" करणारी भाषा वापरण्याचे ठरले व १९६४ पासून प्रेषिताच्या त्या "पळा"ला "प्रयाण" असे अभिनाम प्राप्त झाले (जे आजही आहे). हा बदल अमान्य करण्याचे कोणासही काही कारण नव्हते. घटना सत्यच होती, फक्त तिचा "सूर" बदलला आणि उभयधर्मियांना मान्यही झाला.
तुम्ही हे कबूल कराल की, आजकाल काही राजकीय पक्ष "अशा" बाबतीत फारच भावुक झाल्येत. त्यामुळे "जरतर" ची भाषा वापरून मी असे म्हणालो की, तो "क्षुद्र देवतां" चा उल्लेख चुकून एका मुस्लिम सदस्याकडून (धागा प्रतिसाद संदर्भात) इथे झाला असता तर आपल्या हिंदू मनाला थोड्या तरी यातना झाल्या असत्याच ना ?
>>> शरदजींनी वापरलेला क्षुद्र देवता हा शब्द हा जाणीवपूर्वक (सहेतुक) वापरलेला नसावा, असे मला वाटते. <<<
चला हे मी मान्य करतो. पण त्यावर तुम्ही अन् इतरांनी सुचविलेल्या पर्यायावर त्यांनी "हरकत नाही" अशी प्रतिक्रिया दिली असती तर ते अभिनंदनीयच झाले असते. असो.
प्रतीक
क्षुद्रान्वेषण
प्रतीकराव, क्षुद्र ह्या शब्दावर एवढे क्षुद्रान्वेषण कशाला ;) बाय द वे, क्षुद्रऐवजी क्षुल्लक हा शब्दही चालून जावा. तसेच क्षुद्र आणि शूद्र ह्यो दोहोंत अनेक जण गल्लत करतात.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
नो मोअर् क्षुद्रान्वेषण
ठीक आहे, तुमचे आणि मोल्सवर्थचे म्हणणे मान्य. थांबतो.