स्वीकारता का आव्हान ?

भारतात काय चांगलं आणि काय वाईट ह्याची चर्चा गेली अनेक वर्षे मी ऐकत आहे.
चला तर मग एक खेळ खेळू
मी वाईट बाबी नमूद करतो (मी वाईट तर वाईट सही), तुम्ही चांगल्या बाबी नमूद करा.

काही अटी,
१) कोणीही, कोणावरही वैयक्तिक चिखल फेक करायची नाही
२) भारत देश हा एक सर्व साधारण माणसाच्या डोळ्याने बघून बाबी नमूद करायच्या.
जसे कि ज्याला एक - दोन मुलं आहेत,
रोज दहा तास काम करून त्याचा महिन्याचा पगार ८-१० हजार रुपये आहे.
तो सध्या एक चाळीत २-३ रूमच्या खोलीत रहात आहे.
३) स्वताच्या आणि इतर मित्रांच्या समस्या देखील मांडू शकता.

तर आहे का कबूल ?
(जेव्हा कधी पुढे भारतात काय चांगले, काय वाईट हा प्रश्न विचारला जाईल,
तेव्हा मी ह्या धाग्याचा दुवा देईन, आपण हि द्यावा.)

प्रेरणा : गेली काही दिवस उपक्रम आणि इतर संकेत स्थळावर चाललेले द्वंद युद्ध.
काहींच्या मते भारतात अजून तरी काही इतके वाईट दिवस आलेले नाहीत.
आणि काहींच्या मते भारताच्या लोकशाहीने सर्व सीमा पार करून देश कसा नसावा ह्याचे अतिउत्तम उदाहरण जगासमोर ठेवले आहे.

(मी नेहमी मला स्वताला विचारात असतो कि, खरंच अजून काहीतरी चांगलं शिल्लक राहिला आहे काय ह्या भारतात,
का फक्त मलाच तसे भासत आहे.
का माझीच दृष्टी इतकी वाईट झाली आहे कि, मला जिकडे तिकडे वाईटच वाईट दिसत आहे.
आता मी जो पेपर सकाळ, मटा, Times of India माझ्या संगणकावर मला इतरांपेक्षा वेगळे दिसतात)

लेखनविषय: दुवे:

Comments

माझा भारत महान आहे

माझा भारत महान आहे.पण तो महान आजच्या 3 पेज वर चमकणाऱ्या क्रिकेट खेळाडू, फिल्मी नट-नट्या किंवा आपल्या राजकारणी नेत्या मुळे नव्हे, 100 स्रीया बरोबर लग्न करून प्रेमाचा आव आणणाऱ्या ताजमहल बांधणाऱ्या आणि काम झाल्यावर कारागिरांचे हात तोडणार्या राजा मुळे तर नव्हेच नव्हे .तर स्वर्गातून गंगा पृथ्वी वर आणणाऱ्या भगीरथ , अजिंठा , वेरूळ चे पहाड खोदून त्यावर नावाची साधी पाटी न लावता कर्म करणाऱ्या कारागीरा मुळे भारत महान आहे महात्मा फुले. बाबासाहेब आबेडकर,योगी विवेकानंद , बाबा आमटे , मेधा पाटकर, आणि इतर अनाम अज्ञात सामान्य माणसा मुळे माझा भारत महान आहे. आज अश्याच एका अवलियाची गोष्ट आहे .बिहारी भारतीयाने आपल्या पत्नीच्या प्रेमा करता एकट्याने आख्खा पहाड फक्त छाननी हातोड्याने फोडून गावकऱ्या साठी बोगदा ३५० फूट लांब १६ फूट रुंद आणि १२ फूट उंच अशा आकाराचा कल्पनाही करू शकत नाही असा तयार केला.
दशरथ मांझी हा बिहार प्रदेशाचा एक रहिवाशी. गया जील्हायातील गेहलोर-वजीरगंज हे खेडे ही त्याची जन्मभुमी आणि कर्मभूमी. या खेड्यात ना रस्ते ना इतर सोई -सुविधा ना दवाखाना . कोणतीही अडचण आली, सरकारी कामकाज असले तर 50 किलोमीटर दूर असलेल्या वजीरगंजला मोठी टेकडी पार करून जावे लागे.नवीन मार्ग तयार करून हे अंतर कमी करता येईल याची कोणी कल्पना ही केली नव्हती.भारतातील अनेक खेड्या सारखी याही खेड्याची दुरवस्था होती.
याच खेड्यात दशरथ मांझी हा सामान्य नागरिक ( common man ) राहत होता...........
अखेर तब्बल 24 वर्षानंतर1982 साली त्याचे स्वप्न पूर्ण झाले. दोन तप पूर्ण झाल्यावर टेकडीने पूर्ण शरणगती पत्करली मानवाने निसर्गावर परत एकदा मात केली. टेकडीतून आरपार जाणारा रस्ता पूर्ण झाला. हा बोगदा लहान साहन नव्हे तर तब्बल 350 फुट लांब , 16 फुट रुंद 12 फुट उंच या आकाराचा झाला. 50 किलोमीटरचे अंतर 40 किलोमीटर ने कमी झाले.आता तुम्हीच ठरावा सत्तेच्या पैश्याच्या जोरावर ताजमहाल बांधून खोट्या पेमाचा बाजार मांडणारा शहनशाह मोठा की पत्नीच्या प्रेमाखातर
स्वतःच्या बळावर गावाकरता डोंगर फोडणारा रस्ता बांधणारा दशरथ मोठा .
READ MORE ....http://thanthanpal.blogspot.com/2009/12/blog-post_4268.html
२) http://www.theindianblogger.com/interesting/remembering-a-man-who-moved-...

प्रयत्न

भारतातील वैद्यकीय सेवा प्रगत देशांच्या मानाने स्वस्त आहे आणि बहुतेक वेळा डॉक्टरांचा अनुभव चांगला येतो. (म्हणूनच हल्ली मेडिकल टूरिझमच्या नावाखाली परदेशातील लोक इथे येऊन दातांच्या उपचारापासून ओपन हार्ट सर्जरीपर्यंत सगळे काही करून जातात.

भारताचा सांस्कृतिक वारसा मोठा आहे. इथे व्हॅलेंटाइन डे साजरा केल्यामुळे संस्कृती बुडाली असा संस्कृतीचा भंपक अर्थ अपेक्षित नाही. विविध भाषा, त्यामधील साहित्य, आपली स्वतंत्र संगीत परंपरा ही आपली संस्कृती आहे. त्यात कामसूत्र आणि खजुराहो हे देखील येतात. याबद्दल शिवसेना आणि इतर संस्कृतीरक्षकांचे काय मत आहे हे जाणून घ्यायला आवडेल.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

जरूर

तुमचा खेळ थोडा धूसर वाटतोय.

चांगले आहे, आणि चांगले होत आहे या दोन म्हणण्यामध्ये फरक आहे. तुम्हाला जर कॅल्क्युलस कळत असेल तर मी ते डेरिव्हेटिव्हच्या भाषेत समजावून सांगू शकेन. तुम्हाला ते कळत नाही असं गृहित धरून चालतो.

एखाद्या व्यक्तीला गेली वीस वर्षं त्याच्या वार्षिक उत्पन्नाच्या सहापट कर्ज आहे असं समजा. मात्र गेल्या तीन वर्षात त्याला अधिक पैसे मिळायला लागले, त्याने बरंच कर्ज फेडलं, आणि आता त्याला वार्षिक उत्पन्नाच्या फक्त तीनपट कर्ज आहे. या परिस्थितीला तुम्ही काय म्हणाल? (हे केवळ रूपक म्हणून घ्या, मला भारताच्या कर्जाची चर्चा करायची नाही) कर्ज कमी झालंय ही चांगली परिस्थिती का तिप्पट कर्ज अजून बाकी आहे ही वाईट परिस्थिती?

तुमची व्याख्या स्पष्ट करा, मग जरूर आव्हान स्वीकारू. तुमचा प्रश्न सध्या तरी खूपच अंधूक आहे त्यामुळे आत्ता काहीच बोलता येत नाही. जरा तुमच्या व्याख्या स्पष्ट करा, मग बोलू.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

चांगले की वाईट

लाइफ एक्स्पेक्टंसी ऍट बर्थ ३५ वर्षे वरून ६५ वर्षे झाली ही गोष्ट चांगली की वाईट ते बघा बुवा.

परंतु सर्वांना चांगले स्टॅण्डर्ड ऑफ लिव्हिंग आपण अजून देऊ शकलो नाही हे खरे. पण असलेले स्टॅण्डर्ड ऑफ लिव्हिंग ६० वर्षांपूर्वी असलेल्यापेक्षा चांगले आहे की वाईट हे पाहणे चांगले.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

अर्धा भरलेला का अर्धा रिकामा?

कोण्त्याही पेयाने अर्धवट भरलेल्या पेल्याला अर्धा भरलेला म्हणायचे का अर्धा रिकामा हे पुष्कळसे बघणार्‍याच्या दृष्टीकोनावर अवलंबून असते. त्याचप्रमाणे कोणतीही गोष्ट सांगताना संदर्भ बदलले की ती गोष्ट वाईटाची चांगली किंवा चांगल्याची वाईट होऊ शकते. आजच्या भारतात जो सर्वात मोठा बदल मला जाणवतो तो लोकांच्या भविष्याबद्दल असलेल्या आत्मविश्वासाबद्दल जाणवतो. अगदी पंधरा वीस वर्षांपूर्वी सुद्धा भारताचे भवितव्य एकूण निराशाजनकच आहे असाच सूर लोकांच्या बोलण्यातून निघत असे. लोकसंख्या वृद्धी, अन्नधान्य उत्पन्नात घट असे अनेक मुद्दे निघत. पण आता यातल्या बहुसंख्य अडचणी तशाच राहलेल्या असून सुद्धा भविष्याबद्दल सर्वसाधारण माणूस आशादायक आहे असेच चित्र दिसते. भारताची ही सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे असे मी मानतो.

चन्द्रशेखर

आशा

>>> भविष्याबद्दल सर्वसाधारण माणूस आशादायक आहे असेच चित्र दिसते. भारताची ही सगळ्यात मोठी अचिव्हमेंट आहे <<<

+ सहमत. तात्विकदृष्ट्या पाहिले असतासुद्धा मानवाचा जो काही उत्कर्ष झाला आहे तो "आशा" या रसायनामुळेच हे सर्वमान्य आहे. उद्या उगवणारा सुर्य आपणासाठी नवीन किरणे आणेल ही आशा आजची काळीकुट्ट रात्र सहन करायला पुरेशा असते, विशेषतः भारतीय संस्कृतीत वाढलेल्यांना.

प्रश्न-संधी

>>लोकसंख्या वृद्धी, अन्नधान्य उत्पन्नात घट असे अनेक मुद्दे निघत. पण आता यातल्या बहुसंख्य अडचणी तशाच राहलेल्या असून सुद्धा भविष्याबद्दल सर्वसाधारण माणूस आशादायक आहे असेच चित्र दिसते.

याचे कारण ते खरोखर आशादायी आहे असे नव्हे.

पूर्वी मीडियाचे नेतृत्व करणारे किंवा दिशादर्शन करणार्‍यांना कदाचितलोकसंख्यावाढ हा प्रश्न वाटत असे. सर्वांना अन्न मिळाले पाहिजे असा त्यांचा दृष्टीकोन होता.

आज मीडियाला दिशादर्शन करणारे अफाट लोकसंख्येला 'मार्केट आणि नफ्याची संधी' असे समजतात. त्यांच्या दृष्टीने लोकसंख्या ही धंद्याची आणि नफ्याची अधिक संधी आहे. त्यांच्यासाठी अन्नधान्य उत्पादनात घट ही सुद्धा नफ्याची संधी आहे.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

सुटलेले प्रश्न

>>लोकसंख्या वृद्धी, अन्नधान्य उत्पन्नात घट असे अनेक मुद्दे निघत. पण आता यातल्या बहुसंख्य अडचणी तशाच राहलेल्या असून सुद्धा भविष्याबद्दल सर्वसाधारण माणूस आशादायक आहे असेच चित्र दिसते.

याचे कारण ते खरोखर आशादायी आहे असे नव्हे.

हे दोन्ही पटत नाही. लोकसंख्यावाढ व तीसाठी लागणारं अन्नधान्य हा तितका अटीतटीचा प्रश्न राहिलेला नाही. माल्थसने जे दारूण चित्र मांडलं त्याचं कुटुंबनियोजनाने (पिल, निरोध इ.) पेकाट मोडलं. दुसऱ्या बाजूने अन्नधान्यात वाढ भरपूर होत राहिली. ७० च्या दशकात हा प्रश्न उपस्थित झाला होता तो तत्कालीन पाश्चिमात्य बागुलबुव्यामुळे - 'आपण सगळं व्यवस्थित करतोय पण हे इंडिया, चायना मधले लोकं पोरं काढत राहिले आहेत. लोकसंख्येचा स्फोट अटळ आहे.' लोकसंख्येला टिकिंग टाईमबॉंब वगैरे म्हणून झालं. पण त्यानंतर तो प्रश्न निवळला - नगण्य भूकबळी पडले - सरासरी आयुर्मान वाढलं वगैरे... [आता हुबेहुब त्याच प्रकारचा पर्यावरणाचा बागुलबोवा निर्माण होतोय असं दिसतंय.]

एके काळी जीवघेणे वाटणारे प्रश्न सुटतात, व त्यांची जागा कमी जीवघेणे प्रश्न निर्माण होतात... हीच प्रगती.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

दृष्टीकोन

उपक्रमवर कोणत्याही सामाजिक किंवा राजकीय विषयावरच्या चर्चेत मला एक गोष्ट नेहमीच जाणवते. ती म्हणजे भारतात वास्तव्य असलेल्या लोकांचा दृष्टीकोन ब परदेशस्थ लोकांचा दृष्टीकोन यातील फरक. परदेशस्थ लोकांना प्रत्यक्ष जागेवरचा (ऑन साईट) अनुभव फार कमी असतो. माध्यमांच्या द्वारे किंवा त्यांच्या भारताला दिलेल्या अल्प मुदतीच्या भेटीत त्यांची जी काय मते तयार होतात ती मतेच ते येथे मांडताना दिसतात. जेंव्हा जेंव्हा मी परदेशात जातो, तेंव्हा तेंव्हा तेथील भारतीयांशी बोलताना मला हीच गोष्ट जाणवते. श्री राजेशघासकडबी यातील कोणत्या वर्गात मोडतात हे मला माहित नाही. परंतु त्यांची मते मला तरी परदेशस्थ वाटतात. ग्राऊंड रिऍलिटीजशी त्यांना फारशी माहिती नसावी असे त्यांचे प्रतिसाद वाचून वाटत राहते. भारतातील चित्र, निदान शहरांच्यातील तरी खूपच आशादायी दिसते. माझ्या निरिक्षणाप्रमाणे भारतातील सर्वसाधारण माणून भविष्याबद्दल अतिशय आशावादी आहे.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

ऑनसाईट

परदेशस्थ लोकांना प्रत्यक्ष जागेवरचा (ऑन साईट) अनुभव फार कमी असतो

आम्ही परदेशस्थ लोकांनाच ऑनसाईट म्हणतो.
(ह. घ्या.)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

वस्तुनिष्ठ ऑनसाईट वर्णन महत्त्वाचे

ऑनसाइट आणि वस्तुनिष्ठ वर्णन (म्हणजे योग्य मोजमाप जे काय असेल ते करून) येथे द्याल काय?

उदाहरणार्थ : ऑनसाईट राहून तुम्ही जर मोजून-मापून म्हणत असाल की आजकाल "पूर्वीपेक्षा बालमृत्यू आजकाल अधिक होतात" तर (ते खरे असल्यास) वस्तुनिष्ठ वर्णन म्हणून मी मान्य करेन.

मला आश्चर्य वाटेल खरे. शंकाच नाही. माझ्या (मध्यमवर्गीय) आजीची ८पैकी ३ मुले बाळपणी मृत्युमुखी पडली. तिच्या आठ नातवंडांपैकी एकही मूल दगावलेले नाही. (हे मोजमाप मी ऑनसाईट असताना केले.)

मी महाराष्ट्र सरकारचा नोकर असताना माझ्या गावातील जन्म वगैरे नोंदवून घेत असे. (ऑनसाईट). पण देशातील प्रत्येक गावातला प्रत्येक जन्म अर्थातच नोंदवलेला नाही. पण अनुभवामुळे "काहीतरी मोजले जाते" याबद्दल माझी चांगली खात्री आहे. बालमृत्यूंचा दर फक्त माझ्या आजीच्या वंशातच नव्हे, तर देशाभरात कमी होतो आहे, असे त्या आकड्यांमधून दिसत होते.

आता मी "ऑफसाईट" आहे. मी स्वतः फक्त "आजीच्या पंतवंडांपैकी कोणाचा मृत्यू झाला नाही" हे "याची डोळा" बघितलेले आहे. मात्र कुठल्याही गावात जन्ममृत्यूंची नोंदणी गेल्या दशकात मी केलेली नाही. जुन्या अनुभवावरून नोंदणीबद्दल अजून "ऑफसाईट" खात्री वाटते.

आता "ऑनसाईट" असलेल्यांनी मला सांगावे,
(१) "आजकाल जन्ममृत्यूंची नोंदणी खात्रीलायक नाही, खरे तर पूर्वीपेक्षा अधिक बाळे मरत आहेत".
किंवा
(२) "नात्यातली बाळे मरत असून नातेवाईक 'तुझ्या ऑफसाईटपणा'मुळे तुला सांगत नाहीत"

हे जर खरे असले, अर्थात मी त्यांचे आभार मानेन. परंतु असे काही भलतेच सांगणार असाल, तर पुरावा सबळ, वस्तुनिष्ठ हवा.

"ग्राउंड रियॅलिटीज"बद्दल माहिती असणे चांगलेच. पण "ग्राउंड प्रेज्युडिस"बद्दल माहिती नसली तरी चालेल. म्हणून वस्तुनिष्ठता बरी.

वस्तुनिष्ठ वर्णन

मला असे वाटते की जेंव्हा एखाद्या निरिक्षणाचा वस्तुनिष्ठ खुलासा करावयाचा असतो त्या वेळी ऑनसाईट आणि ऑफसाईट यांच्या वर्णनात फरक पडूच शकत नाही. परंतु जेंव्हा तुम्हाला काय वाटते किंवा काय फील येतो या प्रकारचे प्रतिसाद असतात त्या वेळी ऑनसाईट व ऑफसाईट प्रतिसाद खूप निराळे येतात. 1980 च्या दशकात, परदेशस्थ भारतीयांचे, भारताचा प्रत्येक प्रॉब्लेम हा लोकसंख्यावाढीमुळेच येतो असे ठाम मत होते. हरित क्रांती नंतर ते बदलले. मी आपल्याला "काय वाटते?" या स्वरूपाची एक दोन उदाहरणे देऊ इच्छितो. पहिले उदाहरण अर्थातच नवी भारतीय पिढी अत्यंत आशादायी आहे हे विधान. अशा विधानांना येणारा ऑनसाईट किंवा ऑफसाईट प्रतिसाद निराळा असतो. मी ऑनसाईट असल्याने हे विधान माझ्या फील प्रमाणे करतो. ऑफसाईट व्यक्ती असा फील नसल्याने करू शकत नाही. मात्र जेंव्हा एखादा सर्व्हे हेच सांगतो तेंव्हा ऑफसाईट व्यक्ती हे लगेच मान्य करते.
मी जर असे विधान केले की" भारतातली नवी पिढी लग्न झाल्यावर आपल्या पहिल्या अपत्याचा जन्म पुढे पुढे ढकलत आहे." तर मी हे विधान आजूबाजूला दिसणार्‍या अनेक उदाहरणांवरून करतो. ऑनसाईट असल्याने मला हे शक्य आहे. ऑफ साईट असलेल्याचा प्रतिसाद निराळा येण्याची पूर्ण शक्यता आहे.
येथे भारतस्थ किंवा परदेशस्थ यांच्यामधला वाद वगैरे काही नाही. त्याला तसा रंग देण्याचीही माझी इच्छा नाही. गैरसमज नको.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

निष्कर्ष

@ चंद्रशेखर - मी थत्ते यांच्या याचे कारण ते खरोखर आशादायी आहे असे नव्हे. या विधानाला पटलं नाही असं म्हटलं. तुम्ही त्यात एखादा नकार आणखी वाचलात का? असो. तुम्हाला चुकीची कारणपरंपरा लावून योग्य निष्कर्षापर्यंत पोचण्याची कला अवगत दिसते आहे.

मी परदेशस्थ आहे. मी आशावादी आहे.

परदेशवासी भारतीयांविषयीची, व त्यांच्या विचारपद्धतीविषयीची इतर मौलिक निरीक्षणं जाणून घेण्यास उत्सुक आहे.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

आशादायी

या विषयाला परदेशस्थ आणि स्थानिक असा फाटा फुटू नये अशी इच्छा.

मी चित्र आशादायी आहेच असे नाही असे मत मांडले होते. त्याचा मतितार्थ ८० च्या दशकात चित्र जितपत आशादायी होते तितकेच आज आहे. परंतु मीडियात मात्र त्याकाळी काळेकुट्ट भविष्य असे चित्र मांडले जाई. अन्नधान्याची उत्पादकता गेल्या दशकात भारतात बहुधा कमीच झाली आहे आणि लोकसंख्या वाढतच आहे. पण आज लोकसंख्या हा प्रश्न आहे हे मीडियाला वाटत नाही. याचे संभाव्य कारण म्हणुन मीडिया मालकांचा दृष्टीकोण सांगितला होता.

चित्र आशादायी आहेच आणि तसे ते पूर्वीही होतेच. ८०च्या दशकापर्यंत सुद्धा भली मोठी लोकसंख्या हे संभाव्य मार्केट असले तरी परमिटराज च्या जमान्यात ती आंबट द्राक्षे होती. त्यामुळेही ती नको अशी कोल्हेगिरी असू शकेल.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

निष्कर्ष

>>लोकसंख्या वृद्धी, अन्नधान्य उत्पन्नात घट असे अनेक मुद्दे निघत. पण आता यातल्या बहुसंख्य अडचणी तशाच राहलेल्या असून सुद्धा भविष्याबद्दल सर्वसाधारण माणूस आशादायक आहे असेच चित्र दिसते.

याचे कारण ते खरोखर आशादायी आहे असे नव्हे.

हे दोन्ही पटत नाही.
श्री. राजेशघासकडबी यांच्या प्रतिसादात वरील दोन्ही गोष्टी पटत नाहीत असे विधान आहे. त्यावरून मी काढलेला निष्कर्ष कसा चुकीचा आहे हे मला समजू शकले नाही.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

खुलासा

माझा आक्षेप

यातल्या बहुसंख्य अडचणी तशाच राहलेल्या

या पूर्वगृहितकाला होता.

'राजेश घासकडवींना ग्राउंड रियालिटी माहीत असूनही ते अनिवासी आहेत' या विधानाला तुम्ही आक्षेप घ्यालच, कारण तुम्ही म्हणाल की राजेश घासकडवींना ग्राउंड रियालिटी माहीतच नाही. हा आक्षेप निवासीपणाला नसेल. तसंच काहीसं.

तसंच थत्त्यांच्या विधानातील 'चित्रं खरोखरच आशादायी नसल्याच्या' विधानाला होता.
चुकीच्या कारणपरंपरेने योग्य निष्कर्ष हे मी निवासी/अनिवासी यांच्या आशावादी/निराशावादी अशा ढोबळ कोरीलेशनला म्हटलं होतं.

माझे इतर लेखांवरचे प्रतिसाद काळजीपूर्वक वाचलेत तर गैरसमज कमी होतील. निवासी/अनिवासी यांबाबत सरसकट विधानं आली नाहीत तर बरं.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

आहे की वाटते?

भारतात काय चांगलं आणि काय वाईट आहे ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाहि.. मात्र काय चांगले / वाईट वाटते हे कदाचित सांगू शकेन पण मुड झाला की/तर लिहीन

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

गुंडांनी समाजसेवकाचे रूप धरण करत राजकारणाचा ताबा घेतला

माझा भारत महान आहे... पण अकबर बिरबलाच्या गोष्टी प्रमाणे घोडा का अडला , भाकरी का करपली या प्रश्न ला जसे एकच उत्तर होते न फिरवल्या मुळे तसे भारताचे झाले आहे. प्राचीन काळात सर्वात प्रसिद्ध असलेली ही संस्कृती आज झाकोळल्या गेली आहे. १००-१२५ वर्षाच्या स्वातंत्र्य लढ्या नंतर आणि हजारो ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यवीरांच्या बलिदाना नंतर १९४७ साली भारतास स्वातंत्र्य मिळाले.पण त्या नंतर आलेल्या लोकशाहीत जनते कडून निवडून आलेल्या राजकारणी नेत्यांनी हा इतिहास लपवून ठेवत स्वातंत्र्य फक्त गांधी आणि नेहरू यांच्या कॉंग्रेस मुळेच मिळाले असा खोटा मतलबी प्रचार सुरु केला आणि त्या प्रमाणे इतिहास लिहिला गेला. स्वतंत्र्य मिळवून दिलेलेया भावनेचा मतान साठी दुरुपयोग करून घेतला. त्याच बरोबर प्रबळ विरोधी पक्ष निर्माण होवू नये म्हणून निवडणूक कायद्यात अनेक पळवाटा ठेवल्या , भ्रष्ट्राचारा च्या कायद्याचे ही तसेच केले . यामुळे भारतीय राजकारणात पक्षा पेक्षा वयक्तिक स्वार्था जास्त महत्व प्राप्त झाले, आयाराम गयाराम वृतीने रात्रीतून पक्ष बदलण्याची वृत्ती वाढली. सुरवातीस पक्ष नेते गुंड, भ्रष्ट्राचारी यांची अंधारात मदत घेत होते. या नेत्यांच्या दुप्पटी वागण्याचा कावा जेंव्हा या लोकांच्या नजरेत आला ,तेंव्हा गुंडांनी समाजसेवकाचे रूप धरण करत राजकारणाचा ताबा घेतला आज राजकारणात ५०% नेते गुंड आहेत हे मी नाही मध्यप्रदेश विधानसभेत सरकारने आकडेवारी देवून सांगितले. गुंडांचा मता साठी साम ,दाम ,भेद दंड अत्यंत उपयोग सिद्ध झाल्याने सर्वच पक्षांनी त्यांना उदार आश्रय दिला. आज नेत्या पेक्षा पक्षावर गुंडांचेच वर्चस्व निर्माण झाले.त्यात या नेत्यांनी जातीचे धर्माचे राजकारण मतांसाठी राबविले त्याचा भस्मासुर आज त्यांनाच आव्हान देत आहे. क्षणिक लाभासाठी राज्याराज्यात प्रांतवाद जाणूनबुजून निर्माण केला याचा परिणाम राज्याराज्यात पाक-भारत सारखे दुष्मन संबंध निर्माण झाले. मतांच्या लाचारी साठी संसदेवर हल्ला करणाऱ्या अतिरेकी दहाषदवाद्याला गुन्हा सिद्ध होवून सुद्धा फाशी दिली जात नाही party with different BJP चा नारा लावणारी पार्टी सुद्धा कॉंग्रेसची duplicate आवृत्ती झाली. त्यामुळे भारताचे राजकारण पूर्णपणे भ्रष्ट्राचारी नोकरशहा , गुंड, धर्मवेडे, जातीय नेते यांच्या हातात गेले. नेते फक्त मुखवटे झाले.
भ्रष्ट्राचार लपविण्यासाठी राष्ट्रीय भावनेला हात घातला जात आहे. राष्ट्रकुल खेळाचा भ्रष्ट्राचार लपविण्यासाठी आता देशाच्या इज्जतीचा प्रश्न आहे गप्प बसा असे सांगण्या इतपत या भ्रष्ट्राचारी राजकारण्याची हिम्मत वाढली आहे. आणि जनताही या भावनेत हरवत चालली आहे. हेच या देशाचे दुर्देव आहे.

मर्यादित विचार

श्री ठणठणपाळ हे चांगले लिहितात. अगदी लक्षावर घाव घालतात या बद्दल दुमत असण्याचे काही कारण नाही. परंतु मला असे वाटते की कोणत्याही प्रश्नाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोन (फील्ड ऑफ व्हिजन) हा फार मर्यादित असतो.

राजकारणी मंडळी गुंडांचा सत्ता टिकवण्यासाठी व त्यातून जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी वापर करतात हे सत्यच आहे. परंतु लोकशाही येण्याच्या आधी दुसरे काय होते? राजकारण्यांच्या ऐवजी जमीनदार किंवा सावकार गुंडांना पदरी पोसत असत. त्यांना पाळण्याच्या हेतूमधे काहीच फरक पडलेला नाही. एखाद्या वृक्षाला बांडगुळे लागलेली असावी असे हे गुंड आहेत. त्यांचा समूळ नायनाट होणे कोणतीही राज्यपद्धती आली तरी शक्य नाही. त्यांचा परिणाम कमीत कमी असा होईल अशा व्यवस्थापन प्रणाली निर्माण करणे(उदा. राईट् टू इन्फरमेशन ऍक्ट) ही खरी काळाची आवशकता आहे
चन्द्रशेखर

मत्

कर्ज कमी झालंय ही चांगली परिस्थिती का तिप्पट कर्ज अजून बाकी आहे ही वाईट परिस्थिती?............
कर्ज् कशासाठी घेतले हे पण् बघायला हवे..जर् असेट् बिल्डिंग साठी असेल तर् काळजी नाहि...असेट्स् अप्रेसि एट् होतात्..

कीस

मर्यादित रूपकाचा कीस काढू नये. कर्ज वाईट हे गृहितक आहे. कर्ज शून्यावर आणणं ही आदर्श परिस्थिती असंही गृहित धरलेलं आहे.

मुद्दा सध्याच्या कर्जाकडे बघायचं की कर्ज कमी झालंय या परिस्थितीकडे बघायचं हा आहे. या दोन दृष्टीकोनातून दोन वेगवेगळी 'सत्यं' दिसू शकतात.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

मीच तो

तुम्ही सामान्य माणसाची भूमिका मांडलीये खरी, पण हा माणूस जो तुम्ही सांगताय तो म्हणजे भारत नाहीये, आणि तो म्हणजे भारत हे समीकरण आहे हा खूपच दुर्दैवी भाग आहे.

हा माणूस factory systemcha अपत्य आहे, ज्याला आयुष्यच नाहीये, काम आणि घर हे म्हणजेच जीवन असे तो समजतो, आणि स्वतः घेतलेले निर्णय हे नशीब आणि परिस्थितीच्या माथ्यावर मारून आपल्यासारखाच रोगी मनाचा अजून एक/अनेक पैदा करत असतो.

आज जे चित्र आहे ते फार सुंदर आहे असा मुळीच नाही, जो जे करतोय ते का करतोय? आणि त्यात सुख आहे का? हे न समजून घेताच करतोय, निदान बहुसंख्य लोकांची हीच मनस्थिती आहे, कुठल्या एका लेखात एक अचूक असा विश्लेषण आहे, ते असे -

americans are capitalists, europeans(some of them) are socialists and indians are ultra capitalists. Socialists are ready to wait for good things..though its bit painful...American wants things today..now..quick.......but indian says - I wanted this yesterday, i dont have it today, i am already late in the race, i need it badly...

आपल्याला प्रत्येक गोष्ट काल हवी होती, वर्तमान काळात ती नाही म्हणून फक्त दुखः आहे, सगळा असून सुखी आहे कि नाही हे माहित नाही.

आणि हो, मी काही वेगळा नाही, किवा हे सगळा आत्म-परीक्षणातून आलंय असा समजा.

सगळच वाईट आहे असा नाही, काही गोष्टी खूप बदलतायत, अभियांत्रिकी महाविद्यालयातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येकालाच आता संगणक अभियंता नाही व्हायचय, शेतीमध्ये अभिनव प्रयोग होत आहेत, नागरी infrastructure सुधारत आहे (वेग कमी असला तरी positive आहे), किवा हे सगळा आहे असा म्हणून सुखावण्याचा प्रयत्न आहे.

नाही! नाही स्विकारू शकत 'आव्हान'

चर्चेचा प्रस्ताव अगदीच पोरकट पद्धतीने ठेवण्यात आलेला आहे.

खेळ खेळायला बोलवता, मग 'आव्हान' कसले देता? 'आव्हान' देणार्‍याने स्वत:ची क्शमता आपल्या लेखन शैलीतून दाखवायला हवी होती. उलट आव्हान देणाराच प्रस्तावात - 'मी बुवा आधीच पाठ लावतो हं जमिनीला, आता तुम्ही मला हरवून दाखवा बघू?'

'आव्हान' शब्दाचा अर्थ न समजणार्‍या व्यक्तीला 'आमंत्रण' म्हणायचं आहे असं समजून जरी प्रस्ताव वाचला तरी, 'चर्चा प्रस्ताव कसा नसावा' याचाच हा नमुना दिसत आहे.

ज्यांना गांधींची विचारपद्धती* च समजली नाही तरीदेखील 'गांधीवादी' हे टोपणनाव घेतलेल्या या महाशयांवर थंनथनपाल यांच्या 'निर्वस्त्र होवून थयथयाट करणार्‍या शैलीचा' चांगलाच प्रभाव पडल्यामुळे असे झाले असावे असे वाटते.

* क्रिया करताना -------'सकारात्मक प्रोऍक्टीवपणा' पण,
(समोरून झालेल्या क्रियेला)
प्रतिक्रिया व्यक्त करताना-- 'धाडसाने अहिंसेचा अवलंब'.

काळजीपूर्वक वाचीत आहे.

प्रत्येक प्रतिक्रिया काळजीपूर्वक वाचीत आहे.
आणि त्यातून चांगले काय आणि वाईट काय (गुण आणि दोष ) ह्या दोन्हींची नोंद घेत आहे.
परंतु ५०० अधिक वाचणे होऊन सुद्धा न एकही ठाम चांगला गुण, न एकही दोष हाती लागला आहे.
असो, दोष दाखविण्याची जबाबदारी माझी आहे असे मी नमूद केलेलं असल्यानी मी चागंल्या बाबींच्या (गुणांच्या) प्रतीक्षेत आहे.

आमचीही प्रतीक्षा

गांधीवादी भाऊ,

तुम्हाला खेळाच्या नियमांविषयी प्रश्न विचारले, त्याची तुम्ही काही उत्तरं दिली नाहीत - आमची पण प्रतीक्षा चालूच आहे. आणि तुम्ही वाचनं व वाचक यांचा गोंधळ करत आहात. वाचक नक्की किती हे नीट समजावून घेण्यासाठी हा लेख वाचा.

बरं ही चाळ किती जुनी आहे? दहाबारा वर्षांपूर्वीच बांधलेली नवीन कोरी करकरीत आहे की आहे चांगली पन्नास साठ वर्षं जुनी?

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

सापेक्षता

चांगले-वाईट ही तुलना करण्यासाठी मुळात आधी दुसरा पर्याय (६३ वर्षांपूर्वीचा भारत हिंदुस्तान की हजार/दोन/पाच वर्षांपूर्वीचे भरतवर्ष की स्वातंत्र्यानंतर ६३ वर्षांनंतरची अमेरिका की आजची अमेरिका की वल्कन?) तर सांगा! तुमच्या दिवास्वप्नात रामराज्य संकल्पना असेल तर तुम्हाला काहीच चांगले वाटणार नाही.
बशिवला रिक्शात =))

मुद्दा समजू घ्या. बस्स.

रिकामटेकडा साहेब, असे नका समजू
नमूद केलेला भारत देश हा आजचा, कालचा, फार फार एखाद वर्षे पुढे मागे एवढाच धरावा.

>>रोज दहा तास काम करून त्याचा महिन्याचा पगार ८-१० हजार रुपये आहे.
ह्यावरून कोणता भारत आणि कोणती लोक हे समजण्यास सोपे होईल.
(मराठी, मुसलमान, बिहारी, कन्नड, तेलगु, मारवाडी, मुद्दा गौण)

>>तुमच्या दिवास्वप्नात रामराज्य संकल्पना असेल तर तुम्हाला काहीच चांगले वाटणार नाही.
रोज दहा-बारा तास करून पूर्ण कुटुंबाला पोटभर व्यवस्थित खायला मिळाले, दोन मुलांना चांगले (मराठी कि इंग्रजी, मुद्दा गौण) शिक्षण मिळाले,
दर महिने अंदाजे १०-२० टक्के भविष्यासाठी बचत झाली. डोक्यावर कायमचे छत्र असेल तर तेच मी रामराज्य समजतो.
पण आजकाल ह्याच्यासाठी सुद्धा वन वन भटकावे लागते एक सामान्य माणसाला.
मी पहिले आहे आणि पाहतो आहे रोज,
१४ तास काबाड कष्ट करून सुद्धा ज्याला महिनाखेर ४५०० (overtime धरून) रुपडे मिळतात तो काय खात असेल आणि कसा राहत असेल ह्याचा विचार करवत नाही.
(प्रत्येक सामान्य माणूस इथे येऊन त्याचे म्हणणे नाही मांडू शकत, त्याला ते शक्य नाही. हे आपणच समजून घेणे)

मुद्दा समजू घ्या. बस्स.

तुम्हीच प्रश्न नीट वाचा

"नमूद केलेला भारत देश हा आजचा, कालचा, फार फार एखाद वर्षे पुढे मागे एवढाच धरावा."
"रोज दहा तास काम करून त्याचा महिन्याचा पगार ८-१० हजार रुपये आहे."
"ह्यावरून कोणता भारत आणि कोणती लोक हे समजण्यास सोपे होईल."

कशाची तुलना करावयाची ते सर्वांनाच समजलेले आहे. पण त्याची तुलना कशाशी करणे अपेक्षित आहे ते तर सांगा!

मला कोणतीही तुलना अपेक्षित नाही.

>>पण त्याची तुलना कशाशी करणे अपेक्षित आहे ते तर सांगा!
मला कोणतीही तुलना अपेक्षित नाही.
एक उदाहरण देतो, मला माझे पोट भरण्यासाठी किती खायला लागते ह्याची मी दुसर्याशी तुलना करून माझे पोट भरणार नाही.
मला पोट भरायला जेवढे लागणार आहे तेवढेच लागणार. तुलना करा कि नका करू
मी (पक्षी : सामान्य माणूस )सुखाने समाधाने जगण्यासाठी काय हवे आहे आणि ते कसे योग्य मार्गाने मिळू शकते आणि त्या मार्गात किती अडथळे आहेत.
मला फक्त त्या सामान्य माणसाला जगण्यासाठी काय काय हाल अपेष्ट सहन कराव्या लागतील
आणि कुठे कुठे त्याला कुठून कुठून काही मदत मिळू शकेल ह्याची संपूर्ण यादी करायची आहे.
त्यासाठी ह्या भारतात काय काय चांगला आहे आणि काय काय वाईट आहे याची यादी करू पाहत आहे मी.

अवांतर :
अजून एक मुद्दा माझ्या हाती लागत आहे कि तो म्हणजे विचारवंत लोक एखाद्या सामान्य माणसाचे म्हणणे/गाऱ्हाणे हे त्याच्या लेखनाच्या शैलीवरून अभ्यासतात.
त्यांना खरच प्रश्न सोडविण्यात रस असतो कि नसतो, हा मुद्दा अलहिदा.

तुलना आवश्यक

एक उदाहरण देतो, मला माझे पोट भरण्यासाठी किती खायला लागते ह्याची मी दुसर्याशी तुलना करून माझे पोट भरणार नाही.
मला पोट भरायला जेवढे लागणार आहे तेवढेच लागणार. तुलना करा कि नका करू
मी (पक्षी : सामान्य माणूस )सुखाने समाधाने जगण्यासाठी काय हवे आहे आणि ते कसे योग्य मार्गाने मिळू शकते आणि त्या मार्गात किती अडथळे आहेत.
मला फक्त त्या सामान्य माणसाला जगण्यासाठी काय काय हाल अपेष्ट सहन कराव्या लागतील
आणि कुठे कुठे त्याला कुठून कुठून काही मदत मिळू शकेल ह्याची संपूर्ण यादी करायची आहे.
त्यासाठी ह्या भारतात काय काय चांगला आहे आणि काय काय वाईट आहे याची यादी करू पाहत आहे मी.

पोट भरण्याचे उदाहरण दिलेत म्हणून विचारतो की आज भारतात किती भूकबळी होतात?
दू.चि.वा. मिळणे या अटीचा समावेश साठ वर्षांपूर्वी सुखासमाधानाने जगण्याच्या व्याख्येत नव्हता. त्यामुळे चांगले, हालअपेष्टा, यांची व्याख्याच सापेक्ष आहे. माधवराव पेशव्यांचा राजयक्ष्मा किंवा लोकमान्यांचा मधुमेह हे रोग आज दुर्धर नाहीत. अंथरूण वाढते त्याप्रमाणे लोक पाय पसरत आहेत.

अवांतरः येथील एक जुने सदस्य गुंडोपंत यांच्या शैलीत तुम्ही लिहिता आहात असे वाटते.

मुद्दा अमान्य

>> तुलना आवश्यक
मुद्दा अमान्य

पोट भरण्याचे केवळ एक उदाहरण दिले आहे, कोण किती भूकबळीने मरतो ह्याची मला तूर्तास कल्पनांना नाही.

एखाद्या संस्थेचे balance-sheet घ्या, त्यात फक्त एकाच वर्षाचे पुंजी (assets) आणि ऋण(liabilities ) नमूद केलेल्या असतात.
मागील वर्षाची कोणतीही तुलना नसते त्यात. ढोबळमानाने भारताचे balance-sheet तयार करायचे आहे असा समजा हवा तर.

आपण जी उदाहरणे दिलीत ती नक्कीच आपली प्रगती आहे. त्या सगळ्या बाबी मी चांगल्या बाबी म्हणून नमूद केलेल्या आहेत.
त्याच अनुषंगाने अजून १०-१५ वर्षांनी कदाचित स्वायीनफ्लू ,एड्स, आणि अजून बर्याच रोगांवर फक्त एकच औषधाची गोळी इलाज म्हणून असेल.
ती नक्किच आपली प्रगती असेल पण तो मुद्दा वेगळा.

>>अंथरूण वाढते त्याप्रमाणे लोक पाय पसरत आहेत.
हे सगळ्यांच्याच बाबतीती खरे नाही.
परदेशी प्रवास हा नक्कीच सोयीस्कर झाला आहे, पण किती सामान्य माणसे त्याचा लाभ घेऊ शकतात ?
जो शेतकरी ५०००० हजाराचे कर्ज असह्य होतो म्हणून आत्महत्या करतो त्याच्या वाट्याला किती अंथरून येते हा सुद्धा विचार कराना राव. उलटे मी असे म्हणेन कि बर्याच जणांचे पाय कापून टाकले गेलेले आहेत.
अंथरून वाढले आहे हे नक्की पण किती तरी लोकांच्या नशिबाला आभाळाचीच चादर येते.
पेला अर्धा भरलेला आहे आणि अर्धा रिकामा मानल्यास,
भरलेला आहे तो का भरलेला आहे आणि रिकामा आहे तो का रिकामा आहे ह्याचीच तर यादी करायची आहे.

बाकी आपल्याशी संवाद साधता साधता बरेचसे शिकत आहे.

मी एक सामान्य माणूस आहे, आणि त्यामुळे माझी शैली शेकडो जणांसारखी असू शकते.
तीच माझी खरी ओळख आहे.

चुकीचे रूपक

बॅलन्स शीटमध्ये ऋण या सदरामध्ये टाकण्याच्या गोष्टी मर्यादित आहेत. तुमच्या रूपकामध्ये तुम्ही मनाला येईल त्या सुविधा (उपलब्ध/कल्पित) 'नाहीरे' सदरात टाकू शकाल. वातानुकूलन यंत्रणा, भ्रमणध्वनी, एलसीडी, ऊर्ध्ववाहक, स्वयंचलित चारचाकी/वायुयान, प्रत्येका कुटुंबियास वेगळी खोली, अशा अमर्यादित 'गरजा' देता येतील.

हे सगळ्यांच्याच बाबतीती खरे नाही.
परदेशी प्रवास हा नक्कीच सोयीस्कर झाला आहे, पण किती सामान्य माणसे त्याचा लाभ घेऊ शकतात ?

त्यांना गरीबरथ तरी परवडण्याजोगाच झाला आहे, पूर्वीपेक्षा प्रगती हा एकच निकष लावता येईल.

जो शेतकरी ५०००० हजाराचे कर्ज असह्य होतो म्हणून आत्महत्या करतो त्याच्या वाट्याला किती अंथरून येते हा सुद्धा विचार कराना राव. उलटे मी असे म्हणेन कि बर्याच जणांचे पाय कापून टाकले गेलेले आहेत.
अंथरून वाढले आहे हे नक्की पण किती तरी लोकांच्या नशिबाला आभाळाचीच चादर येते.

उपक्रमवर ललितलेखनास बंदी आहे बरं!
काही आत्त? आत्महत्या करण्याचे प्रमाण सगळ्याच लोकांमध्ये १०००० पैकी १ हून अधिक असते. शेतकरी 'प्रचंड' प्रमाणात आत्महत्या करतात हा बागुलबुवा उभारण्यात साईनाथ यांचा प्रमुख सहभाग आहे. विदर्भाच्या सहा जिल्ह्यातील कापसाच्या नाजुक प्रजातींची लागवड करण्याचा जुगार खेळणार्‍या बर्‍याच शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या हे मान्य पण भूमिहीन मजूर कुठे तेवढ्या आत्महत्या करतात?

बाकी आपल्याशी संवाद साधता साधता बरेचसे शिकत आहे.

बास का?

अजून मुद्दे येउद्यात.

>> उपक्रमवर ललितलेखनास बंदी आहे बरं!
चूक झाली माहित नव्हते. माफ करा.

रूपक जरी तुम्हाला चुकीचे वाटत असले तरी मुद्दा मात्र तुम्हाला समजलेला दिसत आहे.
तुमच्याच दाहरणाप्रमाणे.
>> त्यांना गरीबरथ तरी परवडण्याजोगाच झाला आहे
मुद्दा एकदम मान्य
ह्या अर्थी लोकांना गरीबरथ परवडतो हा मुद्दा भारतात जमेच्या बाजूस धरत आहे.
वरील एका प्रतिसादामधून आलेलं मुद्दा : भारतातील वैद्यकीय सेवा प्रगत देशांच्या मानाने स्वस्त आहे आणि बहुतेक वेळा डॉक्टरांचा अनुभव चांगला येतो.
तसाच एक मुद्दा मला व्यनी मधून आला, तो म्हणजे भारतात संपर्क माध्यमे जसे कि फोन, मोबायील, इंटरनेट, हे स्वस्त दरात उपलब्ध आहे.
ह्या सर्व बाबी भारताच्या जमेस मी धरत आहे. तसेच अजून मुद्दे येऊ द्यात.
भारतात खूप काही चांगलं आहे, तसेच बर्याच ठिकाणी सुधारण्यास खूप वाव आहे. त्याचीच तर यादी करायची आहे.

>>पूर्वीपेक्षा प्रगती हा एकच निकष लावता येईल
पूर्वीपेक्षा प्रगती हे मान्य. मात्र ती प्रगती कोणकोणत्या क्षेत्रात झालेली आहे आणि त्याहून महत्वाचे म्हणजे ती किती लोकांपर्यंत पोहोचली आहे तोच खरा निकष असायला पाहिजे.
मात्र ह्यावर चर्चा मला अपेक्षित नाही.

>>तुमच्या रूपकामध्ये तुम्ही मनाला येईल त्या सुविधा (उपलब्ध/कल्पित) 'नाहीरे' सदरात टाकू शकाल.
मी मनाला येईल ते टाकीन हो, पण इथे ते सर्वांना पटले तर पाहिजे ना भाऊ.
वातानुकूलन यंत्रणा या ऐवजी सर्वांना उन्हाळ्यात निदान पंखा असावा आणि त्यासाठी वीज असावी हि तरी अपेक्षा आपण करू शकतो कि नाही,
वर मी नमूद केकेल्या सामान्य माणसाची २ पंखे घेण्याची आर्थिक क्षमता नक्कीच असू शकेल हि झाली जमेची बाजू.
पण त्यासाठी लागणारी पुरेशी वीज उपलब्ध नसेल (विशेषतः उन्हाळ्यात) तर हे मात्र नाहीरे सदरात मोडेल.
संपर्क करण्यासाठी कुटुंबात निदान एकाकडे तरी मोबायील असावा, सध्या भारतात भ्रमणध्वनी असणे हि नक्कीच सामान्य माणसाच्या आवाक्यातले आहे त्यामुळे हे सुद्धा जमेच्या बाजूस आहे.
एलसीडी च्या ऐवजी साधा रंगीत TV नक्कीच सामान्य माणसाच्या आवकातला आहे हि अजून एक जमेची बाजू ,
ऊर्ध्ववाहक, स्वयंचलित चारचाकी/वायुयान, प्रत्येका कुटुंबियास वेगळी खोली
ह्या ऐवजी, सध्या सामान्य माणसाला घरगुती Gas, एखादी दुचाकी, निदान एक स्वयंपाकाची खोली, एक hall आणि एक बेडरूम परवडणार्या भावात मिळू शकते कि नाही त्यावरून ते आहेरे कि नाहीरे ह्या सदरात मोडेल.

अजून मुद्दे येउद्यात.

पटले नाही

>> चूक झाली माहित नव्हते. माफ करा.
गंमत हो!

गरीबरथ ही वातानुकूलित गाडी आहे हेही कृपया नोंदवा. पेशवाईतही असले थाट नव्हते.

तुम्ही नाहीरे यादीत काय टाकणार त्याचा मला अंदाज घ्यायचा आहे. (कौटिल्यानेही भ्रष्टाचाराचा उल्लेख केलाच आहे. दीडदोनशे वर्षांपूर्वी अमेरिकेत आणि इग्लंडमध्ये भारतासारखाच भ्रष्टाचार होता.) तुम्हीसुद्धा कृपया यादी सुरू करा, ही चर्चा तुम्हाला कुठे न्यायची आहे ते मला अजून समजले नाही. तो ८-१० हजार पगारवाला माणूस सुखी जीवन जगू शकेल काय आणि कोणत्या मार्गाने? इतकाच तुमचा प्रश्न असेल तर माझा मुख्य मुद्दा असा आहे की गरज आणि चैन यांच्यात ठाम रेषा शक्य नाही. त्यामुळे चांगले आणि वाईट हेही मानीवच आहे. सुस्थितीतील मध्यमवर्गाला "किती जमीन लागते?" या विषयावर येथे चर्चा झाल्या आहेत. तुम्हाला मात्र 'उपक्रम येण्यासाठी वेळ/पैसे/बौद्धिक क्षमता नसलेला सामान्य माणूस' अभिप्रेत आहे त्यामुळे त्याला कमीच सुखे मिळणार हे तुम्ही गृहीत धरलेच असेल अशी आशा आहे.

अवांतर: आजच बातमी आली आहे की सिडकोच्या कंत्राटी सफाई कर्मचार्‍यांनासुद्धा ९ हजार पगार ठरला आहे.

दमलात?

ताबूत थंड झाले का हो?

भली मोठी लिस्ट होत आहे.

नाही हो,
भली मोठी लिस्ट होत आहे.
गुगल वर एक document करायच्या विचारात आहे, त्यात सगळे टाकून लिंक देईन

स्मरणपत्र

अजून काम चालूच?

चांगले वाईट निकष

सहसा दारिद्र्य रेषेखाली असलेले लोक आणि कुपोषित लोक एकच असतात. दारिद्र्य रेषेचा निकषच देवसभर लागणार्‍या पुरेशा कॅलरीज न मिळू शकणे हा असतो. त्यामुळे २० कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली (पक्षी=कुपोषित) आहेत ही सर्वोच्च न्यायालयाने दिलेली नवी माहिती नाही.

चांगल्या गोष्टींची यादी करताना या वीस कोटींचा पूर्ण विसर पडू नये हे तर बरोबरच आहे. पण स्वातंत्र्यानंतरच्या काळात ही संख्या/टक्केवारी घटत असेल तर ती चांगली गोष्ट म्हणूनच करायला हवी.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

 
^ वर