चिरीमिरी - अरुण कोलटकरांच्या कविता - रसग्रहण भाग ३

डिस्क्लेमर
या कवितांमध्ये कवीने काही भडक लैंगिक शब्द, रूपकं वापरली आहेत. त्यांबद्दल चर्चा करताना ते व तसे इतर शब्द टाळणं अशक्य आहे . अशा शब्दांची ज्यांना अॅलर्जी आहे त्यांनी हे परीक्षण वाचू नये. विठ्ठलाबद्दल, रखुमाईबद्दल काही ओळी आलेल्या आहेत. ही नावं रूपकं म्हणून आलेली आहेत एवढं समजून घेण्याची परिपक्वता नाही, किंवा अशा विधानांनी दुखावण्याइतक्या ज्यांच्या भावना कोमल आहेत अशांनीही हे परीक्षण वाचू नये. आधी एकदा 'डिस्क्लेमर कशाला?' असाही प्रश्न आला होता, पण सध्या काही संस्थळांवर त्याची गरज आहे असं मला वाटतं. ज्यांना डिस्क्लेमरची गरज वाटत नसेल त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करावे

चिरीमिरी - पंढरीच्या वारीच्या कविता

'मदिरालय जानेको घर से चलता है पीनेवाला' प्रमाणे मधुशाला शोधण्याचा हा प्रवास. पण मधुशालेचं रूपक व विठ्ठलाचं रूपक यात एक फरक आहे. मधुशाला ही पवित्र आहे, अंतिम आहे. तिच्या खरेपणाची कोणी भडवेगिरी करत नाही. ती खरीच. किंबहुना जे काही सत्य, अंतिम ती म्हणजे मधुशाला. याउलट या विठ्ठलाचं तसं नाही. तोदेखील रांडांचा चहाता आहे. (हे विधानही काळ्या दगडावरची रेघ नाही. निदान एका कवितेत तरी विठ्ठलाचं रूपक आत्म्याशी मीलन करणाऱ्या परमात्म्याचं म्हणून वापरलेलं आहे...) त्याच्याकडे बळवंतबुवा आपला माल घेऊन येतो हे आवडत नाही ते रख्माईला. 'निरोप' कवितेत बळवंतबुवा निघालाय हा निरोप विठ्ठलाला सांगायचा असतो, पण रख्माईपासून दूर घेऊन, कानात हळूच सांगायचा असतो.

कळता कामा नये
यातलं रख्माईला अक्षर
नाहीतर ती लष्कर
बोलवील बया

हा भडवेगिरीचा प्रकार तिच्यापासून लपवून ठेवावा अशी रख्माई कोण आहे? ती लष्कर बोलवणार म्हणजे नक्की काय करणार? या प्रश्नाचं शंभर टक्के समाधानकारक उत्तर मला सापडलेलं नाही. परमात्म्याच्या मीलनासाठी, अशा मोक्षाच्या आंतरिक ओढीसाठी अशी देवघेव, असे हिशोब करणं चांगलं नाही या तत्त्वाचं ती प्रातिनिधित्व करत असावी इतकंच म्हणता येतं. मोक्ष मिळण्यासाठी मोक्षाचीही हाव सोडावी लागते. द्रोणमध्ये रामाच्या मागे उभी असलेली सीतामाई, निसर्गाचं रूपक म्हणून येते. तिचा भास या रख्माईत देखील होतो. सत् व पवित्रता यांचं रख्माई प्रातिनिधित्व करते असं वाटतं. रख्माईच्या स्त्रीपणातच स्त्रीची माया, पावित्र्य व मातृत्वाचे गुण दडलेले असावे. 'वामांगी' कवितेत पंढरीच्या देवळातून रख्माईच्या शेजारून विठोबा गायब झालेला दिसतो. त्या पुढच्याच 'प्रश्न' कवितेत हरवलेल्या, वाट चुकलेल्या, जातपात करणाऱ्या देवाला तुझी जात सांग म्हणून कवी खडसावतो. त्यावरून देखील देवाने पावित्र्य रख्माईबरोबरच मंदिरात सोडलं असं म्हणता येतं.

विठोबाच्या कानात
सांगितली गोष्ट
ऐकू गेली स्पष्ट
रख्माईला

ही विठ्ठलाची व त्याच्या भडव्यांची लांडीलबाडी, पुण्याची लाच मागण्याची पद्धत सत्प्रवृत्तीपासून लपवण्याचा प्रयत्न केला जातो. पण ते ओपन सीक्रेट आहे असं कोलटकर म्हणताना दिसतात. देवाचा बाजार झाला, महार आत शिरून विटाळू नये म्हणून देव शास्त्र्यांनी लपवून ठेवला, चातुर्वर्ण्याचं मढं मेलं तरी अजून कुजत पंढरीच्या वाटेवर घाण पसरवतं आहे - या सगळ्यातून कोलटकरांना विठ्ठल हे भ्रष्ट देवाचं, खोट्या मोक्षाचं प्रतीक म्हणून वापरायचं आहे असं वाटतं. पंढरीच्या वारीचं पावित्र्य आहे ते बहुधा रख्माईच्या दर्शनात. असं असलं तरी विठ्ठल व रख्माई ही काळी पांढरी रूपकं नाहीत. म्हणजे रख्माईबाबत शंका नसली तरी विठ्ठलाचं रूपक काहीसं लवचीकपणे वापरलं आहे असं वाटतं.

निरोप मधला विठ्ठल एखाद्या राजकीय पुढाऱ्यासारखा देखील वाटतो. बुवा वाटेत जिथे उतरतील तिथे

च्यावाल्यांना सगळ्या
आत्ताच सांगून ठेव
मंडळींना शेव
गाठ्या फुकट

यांना सगळं फुकट
शेव गाठ्या पुरी भाजी
विठ्ठल म्हणतो माझी
माणसं आहेत

जोपर्यंत तुम्ही प्रस्थापित विठ्ठलप्राप्तीच्या मार्गाने, जगरहाटीबरोबर जात आहात तोवर तुमची चांगली सरबराई होईल. पुण्यं कमवा, देव तुमचं सहाय्य करेल असं धर्मव्यवस्थेकडून सांगितलं जातं. तोच संदेश कोलटकरांनी या रूपकांत मांडून त्याची खिल्ली उडवलेली दिसते. जो पुण्याची लाच मागतो, असा देव खरा का? पंढरीच्या वारीला असं राजकीय पुढाऱ्याच्या जथ्याची उपमा देऊन कोलटकर त्यातला खोटेपणा दाखवत आहेत असंही वाटतं. मोक्षाची हाव ठेवून त्यासाठी पुण्याचा सौदा करणं हे बळवंतबुवाचं काम. असली कृत्य केल्यामुळे देव भ्रष्ट झाला. ती उचलून धरणाऱ्या धर्म, कर्मकांड व्यवस्थेमुळे ही भडवेगिरी सुरू झाली असं कोलटकरांना सांगायचं आहे.

'तंबू' कवितेत

विठू म्हणाला ठोक म्हणून इथं ठोकला तंबू
व्हैवाटीचा हक्क तुमचा मला नका सांगू

असं उद्दामपणे बळवंतबुवा म्हणतो.

पंढरपूरला जातोय सगळा विठूसाठी घेऊन माल
विठोबाचा भडवा झाला बळवंतबुवा मस्तवाल

विठोबा म्हणजे भ्रष्ट धर्मव्यवस्थेने तयार केलेल्या अंतिम ध्येयाचा प्रतिनिधी. त्याच्यासाठी कार्य करताना, कर्मठ सनातनी मंडळींना असंच एक निष्ठेचं बळ प्राप्त होतं. माझ्या कृत्यांना प्रत्यक्ष विठ्ठलाचं पाठबळ आहे. वहिवाटीच्या, मानवी कायद्याविषयी मला काय सांगता, असा अरेरावीपणा येतो.

दुसरी जागा शोधा मी सांगून ठेवतो अगोदर
सगळ्या बाया काढून घेतील एकेकाचं धोतर

जर तुम्ही याविरुद्ध आवाज उठवला तर तुमची लाज जाईल, अपमान होईल. तुम्ही इथेच नागडे राहाल. मग तुमची दिंडी चुकेल, जाईल तुमच्याशिवायच पंढरपुरापर्यंत. परंपरेला एक शक्ती असते. ती शक्ती त्या परंपरांच्या पाईकांना मिळते. आधी म्हटल्याप्रमाणे बळवंतबुवा हे सुपरइगोचं रूप आहे. परंपरेच्या 'जनी निंद्य ते सर्व सोडोनि द्यावे, जनी वंद्य ते सर्व भावे करावे' या महावाक्याचा पुरस्कर्ता.

वाट्टेल तिथं ठोकीन तंबू वाट्टेल तिथं भरीन गडवा
तुम्ही कोण मला विचारणार मी विठ्ठलाचा भडवा
त्याचा हुकूम दाखवा आणि मगच मला अडवा

असं तो ठासून म्हणू शकतो. ताठ मानेने, गुर्मीत. त्याला उभं राहाण्यासाठी कणा मिळतो तो व्यवस्थेच्या पाठिंब्याचा.

पण याच कवितेचे अधिक व्यापक अर्थही काढता येतात. मुखवटे थोडे बदलता येतात. प्रकाश वेगळ्या दिशेने आला तर हसरा, रडका किंवा गंभीर दिसणाऱ्या बुद्धाच्या चित्रासारखी, थोडा दृष्टीकोन बदलला की ही कविता भाव बदलते. इथे पुन्हा एकदा विठ्ठलाच्या रूपकाची लवचीकता दिसते. मस्तवालपणा हा पाहाणाऱ्याच्या नजरेवर ठरतो. विठ्ठलाला जर शुद्ध, पवित्र स्वरूप आहे हे मानलं तर आपल्या अंतरीचा आवाज व्हैवाटीविरुद्ध ठामपणे मांडणारे अनेक बळवंतबुवा दिसतात. बळवंतराव टिळकच घ्या. स्वातंत्र्याची जनमनातली आस हा त्यांचा विठ्ठल होता. जनतेकडून स्वातंत्र्य हिसकावून घेऊन व्हैवाट सांगणाऱ्या इंग्रजांना त्यांनी तितक्याच निर्भिडपणे सांगितलं की या कोर्टाने मला शिक्षा दिली असली तरी उपरवाल्याच्या कोर्टात मी निर्दोष आहे याची मला खात्री आहे. सत्य माझ्या पाठीशी आहे. गांधीजीदेखील त्यांच्या आतल्या आवाजाबाबत तसेच ठाम असत. (चिरीमिरीत इतरही कवितांत बुवा स्वातंत्र्यसैनिकांचे, जनतेच्या नेतृत्वाचे प्रतिनिधी म्हणून येतात) विठ्ठल पवित्र असला की बळवंतबुवा सद्सदविवेकबुद्धी बनतो. त्याच्या पावलात काळी चप्पल आहे की गोरी यावरून त्याचा मस्तवालपणा रास्त की मुजोरी हे ठरतं.

क्रमशः

Comments

बळवंत

इथे पुन्हा एकदा विठ्ठलाच्या रूपकाची लवचीकता दिसते. मस्तवालपणा हा पाहाणाऱ्याच्या नजरेवर ठरतो. विठ्ठलाला जर शुद्ध, पवित्र स्वरूप आहे हे मानलं तर आपल्या अंतरीचा आवाज व्हैवाटीविरुद्ध ठामपणे मांडणारे अनेक बळवंतबुवा दिसतात.

अशा अनेक बळवंतबुवांनी आपल्याही मनात घर केलेल असत.

प्रकाश घाटपांडे

हरवतो आहे

एखादी कविता पूर्ण वाचायला हवी, संग्रह पूर्ण वाचायला हवा, असे वाटते आहे.

लेखातील तपशील आत नीट समजू येत नाहीत.

परंतु लिहिले छान आहे.

+१

असेच म्हणतो

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

चिरीमिरी

या पूर्वीचे द्रोण कवितेचे रसग्रहण वाचल्यावर अरुण कोलटकर वाचायची उत्सुकता होती. चिरीमिरीचे रसग्रहण आल्यावर ती दुणावली. मग मी त्यांचे कविता संग्रह घेऊन आलो. पहिल्यांदा द्रोण वाचली आणि आता चिरीमिरी. द्रोण कविता जशी एकसंध आहे तशी चिरीमिरी (कविता संग्रह का एकच विस्कळीत कविता?) नाही.

एक डिस्क्लेमर: कविता वाचण्याचा अनुभव माझा फारसा नाही. जे गवसले ते लिहितो.

चिरीमिरी मात्र नेमाड्यांच्या हिंदू प्रमाणे प्रेजेंट फ्लॅशबॅक अशा तंत्रातून विस्कळीत पणे धावताना वाटली. बळवंतबुवाची कहाणी असे तिचे नामकरण करु शकतो. बळवंतबुवाची गोष्ट 'गुरु' (सध्याचा एक चित्रपट) सारखी आहे. बदमाश पण लवेबल. लहानपणी वडीलांबरोबर फळ/भाजी विकताना (कुलाब्याची फेरी)

.... बापासंग असायची कुलाब्याची फेरी.

दोघात मिळून होत्या दोन चांगल्या चपला
बापाच्याच मापाच्या दोन्ही तोच घालायचा आपला.

कुणी गोरे सोजिर त्यांना लुटतात. त्याबद्दल बळवंत इरसालपणा करून पैसे परत मिळवतो.
घरी वहिनीचे पैसे चोरतो (गार्‍हाणे). 'अनाजी फदालेसला विनंती'त तो लगट करू पाहणार्‍या मालकाच्या बायकोबद्दल तक्रार करतो.

'टोमॅटो' आणि 'आंबा' मधे भाजी/फळ विक्रेत्याकडे नोकरी करताना गल्यातले पैसे भाजीत घालून पळवतो.
भोपळ्या मिरच्याची भाजी आणि त्यात भरलेले पैसे असे कविता संग्रहाचे मुखपृष्ट आहे. (ते अरुण कोलटकरांचेच आहे.) याचा अर्थ मी असा धरला की हा कवितासंग्रहाचा केंद्र बिंदू आहे. (वारी हे एक निमित्त आहे.)

घेवडा उथळ क्षुल्लक मटर
राहिल चिल्लर किती त्यात.

हळुहळु तो भडवा बनतो. याचा प्रवास पण मजेदार आहे. पण त्यात तो 'रांडां'चा 'देवरुस' पण आहे. निरनिरळ्या संकटांवर तो कुठलेसे उपाय करीत असतो.

आजकाल माझा शेट येत नाही इकडे
काय झाले कोण जाणे झाले तीन आठवडे.

या प्रश्नावर
...

तोंडाला येईल तो म्हणायचा मंत्र
डोक्याला येईल ते सांगायचा तंत्र.

कुणाकडे कुणी म्हातारा येत असला तर तो नीट समजावून त्याची इस्टेट तुलाच मिळेल असे आमिष दाखवतो. (सामान)

असा हा बळवंतबुवा वारी हे एक धंद्याचे निमित्त बघून १०७ रांडा घेऊन चालला तर नाहीना असा संशय येतो. तत्पूर्वी आळंदीला वीणा वाजवणारी गजरा धुमाकूळ घालते.

आता विठ्ठल आणि रखुमाई हे मला वारकर्‍याचे रूपक वाटले !

बघा जमते का?

प्रमोद

बळवंतबुवा

@प्रमोद सहस्रबुद्धे
इरसालपणा हा बळवंतबुवाच्या रक्तातच भिनलेला आहे. लव्हेबल स्काउंड्रल हे तुम्ही म्हटलेलं तंतोतंत जुळतं. या सर्व कवितांकडे असलं मिष्किल, खोचक, उचापत्या माणसाचं व्यक्तीचित्रण म्हणून बघता येईलच. पण केवळ तितकाच विचार केला तर त्याआत दडलेल्या अनेक गोष्टींना आपण मुकू असं वाटतं.

भोपळ्या मिरच्याची भाजी आणि त्यात भरलेले पैसे असे कविता संग्रहाचे मुखपृष्ट आहे. (ते अरुण कोलटकरांचेच आहे.) याचा अर्थ मी असा धरला की हा कवितासंग्रहाचा केंद्र बिंदू आहे.

ते आहेच. या भाज्या म्हणजे फॉर्म व त्यातले पैसे म्हणजे कंटेंट. (ते चित्र कोलटकरांचंच आहे हे मला माहीत नव्हतं). या फॉर्म-कंटेंट नात्या विषयी देखील त्यात अनेक कविता आहेत. (रांडेच्या हाती वीणा दिली - त्या कविता)

तुम्ही भाजीच्या कवितेचा उल्लेख केला आहे. तेच उदाहरण घ्यायचं झालं तर बळवंतबुवा हा या कवितांसाठी असलेला थोडासा सडका टोमॅटो आहे. कवितांचा अर्थ भरण्यासाठी वापरलेलं ते रूपक आहे. त्यात कवीने नाणी भरून ठेवलेली आहेत. टोमॅटोचे दोन घास खायचे, पण बाजाराबाहेर पडल्यानंतर त्यातली नाणी काढून घ्यायची आणि टोमॅटो फेकून द्यायचा. तसंच बळवंतबुवाच्या व्यक्तिरेखेची गंमत वाटून घ्यायची, पण त्यातला अर्थ खरा महत्त्वाचा.

चिरीमिरीतल्या इतर अनेक कवितांत अर्थ इतका ठासून भरला आहे, की त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. गोऱ्या सोजिरांच्या कवितेत या सगळ्याच खोट्या दुनियेत खरा चोर कुठून आणायचा, हा खरा प्रश्न आहे. वर्णद्वेषी अन्यायाला जवळपास तसल्याच वर्णद्वेषी अन्यायाने उत्तर दिलं जातं, अशासारख्या गोष्टी अधोरेखित करायच्या आहेत.

बळवंतबुवा हा नुसता भडवा नसून तो विठ्ठलाचा भडवा आहे, यामुळे सर्वच पंढरीच्या कवितांना एक खोली प्राप्त होते.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

 
^ वर