थेउरचे थेर!
चार पाच दिवसांपूर्वी, सगळ्या मराठी वृत्तवाहिन्यांवर, काहीतरी प्रचंड सनसनाटी बातमी असावी अशा अविर्भावाने, एक बातमी सतत दाखवली जात होती. ती बातमी सादर करण्याची पद्धत, वृत्त निवेदिकेचे हात वारे यावरून काहीतरी अफलातून घडले आहे असे दिसत होते. त्यामुळे मी मुद्दाम ती बातमी लक्ष देऊन ऐकली. पुण्याच्या जवळ थेऊर नावाचे एक गाव आहे. या गावात थोरले माधवराव पेशवे यांची समाधी असल्याने तसे ते प्रसिद्धच आहे. तर या थेउर गावातल्या एका मोठ्या फार्म हाऊस मधे पार्टी केली म्हणून पुण्याच्या एका कॉलेज मधल्या युवक-युवतींना पोलिसांनी अट्क केली होती. मुलींनी खूप तोकडे कपडे घातले होते. त्या नाचत होत्या वगैरे, वगैरे. बातमी तशी संताप व उद्वेगजनक होती यात शंकाच नाही. कॉलेजमधे शिक्षण घेण्याचे सोडून ही पोरे-पोरी हे उद्योग करायला थेऊरला कशाला गेली होती? अलीकडे कॉलेजमधे जाणार्या मुलांच्या जवळ एवढे पैसे कोठून येतात? यांना चांगली शिक्षा व्हायला पाहिजे वगैरे विचार मनात येऊन गेले. नंतर जरा बारकाईने बातमी ऐकली व बघितली.
ही मुले मुली, एकतर कॉलेजमधे शिकणारी असली तरी पदव्युत्तर एम.बी.ए. करणारी होती. म्हणजेच ही मुले मुली नसून सज्ञान युवक-युवती होते. ही माहिती कळल्यावर या बातमीतला दमच गेला. एकवीस, बावीस वर्षांच्या मुलांनी पार्टी करायची नाही तर काय आम्ही ज्येष्ठ नागरिकांनी करायची का? मग पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध कारवाई का केली? दुसर्या दिवशी वर्तमानपत्रात सगळी डिटेल्स नीट वाचली व मग वाटले की पोलिसांची ही कारवाई म्हणजे प्रसिद्धी मिळवण्याचे उद्योग दिसत होते.
काही वर्षांपूर्वी सिंहगड जवळ अशाच एका पार्टीवर पोलिसांनी छापा घालून अमाप प्रसिद्धी मिळवली होती. तो छापा घालणार्या पोलिस अधिक्षकाच्या मुलाखती, टी.व्ही. , वर्तमानपत्रे यात झळकल्या होत्या. परंतु ती पार्टी निराळ्या प्रकारची होती. अफू. चरस, गांजा वगैरेसारख्या मादक व आरोग्यास विघातक अशा पदार्थाचे सेवन त्या पार्टीत चालू होते. त्या पार्टीमधे चालू असलेले प्रकार पूर्णपणे बेकायदेशीर व अनैतिक होते यात शंकाच नव्हती. म्हणूनच सर्व लोकांनी, हे असले उद्योग बंद पाडल्याबद्दल पोलिसांचे कौतुक केले होते.
थेऊरच्या एका फार्म हाऊसमधे धांगडधिंगा चालू आहे अशी खबर आल्यावर, सिंहगडच्या पोलिसांना प्रसिद्धी मिळाली तशी आपल्यालाही मिळेल, असे बहुदा थेऊरच्या ग्रामीण विभागाच्या पोलिसांना व अधिक्षकांना वाटले असावे व त्यांनी ताबडतोब छापा घालण्याचे ठरवले असावे. तिथे गेल्यावर खरा प्रकार काय आहे? हे अर्थातच त्यांना समजले असणार. परंतु या युवक-युवतींना थोडी दरडावणी, थोडी समजूत घालून ती पार्टी पोलिसांनी सुनियंत्रित केली असती तर जास्त योग्य ठरले असते.
आता या युवक-युवतींनी गुन्हे तरी काय केले असावेत? एक तर त्यांच्या पार्टीत मोठमोठ्याने गाणी बजावणी चालू असल्याने शांततेचा भंग झाला होता. दीड एक महिन्यापूर्वी माझ्या घराजवळ 3 तास प्रचंड आवाज करणारी एक मिरवणूक व त्या समोर काही टारगट टाळकी यांचा धसका भरणारा नाच कार्यक्रम श्रवण करण्याचे महाभाग्य मला लाभले होते. त्या वेळी चार वेळा पोलिस कंट्रोल रूमला (100 नंबर) दूरध्वनी करून सुद्धा पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याची आठवण माझ्या मनात अजूनही ताजी असल्याने, पोलिसांना शांततेच्या भंगाचे सोयर सुतक किती असते याची मला पूर्ण कल्पना आहे. कदाचित माझ्या घरासमोर झालेला तो शांतता भंग कोणत्यातरी बड्या असामीच्या सहकारी मंडळींनी केला असल्याने तो क्षमेस पात्र ठरला असावा व या थेऊरच्या मंडळीत कोणीच बड्यांचे राजपुत्र किंवा राजकन्या नसल्याने त्यांचा दंगा अक्षम्य असावा. अर्थात माझ्या घराजवळच्या शांतताभंगाकडे पोलिसांनी केलेले दुर्लक्ष हे काही थेऊरच्या या प्रकाराचे जस्टीफिकेशन होऊ शकत नाही. शांतताभंग कोठीही झाला तरी तो निंद्यच आहे. परंतु या ठिकाणी पोलिसांनी फक्त या मंडळींना सांगून समजावून आवाज कमी करायला लावला असता तरी चालले असते.
आता या पार्टीमधे काय चालले होते? फ्रेन्डशिप डे ची ही पार्टी असल्यामुळे नाच गाणी आणि थोड्या फार प्रमाणात मदिरा सेवन तेथे चालू होते. म्हणजे आजकाल पुण्यामधे लब्धप्रतिष्ठित समाजातल्या पार्ट्यांमधे जे चालू असते तेच चालू होते. मी टी.व्ही. वर जी दृष्ये बघितली त्यात बहुतेक मुलींनी स्कर्ट किंवा फ्रॉक घातलेले मी बघितले. हे दोन्ही ड्रेस कमीत कमी पन्नास वर्षे तरी पुण्यातल्या प्रतिष्ठित समाजातल्या मुली सर्रास वापरतात. टी.व्ही. वाहिन्यांच्यावर जे कार्यक्रम चालू असतात त्यातल्या मुलींच्या अंगावर तर असे कपडे नेहमीच दिसतात. पोलिसांनी असेही शोधून काढले की या युवक-युवतींच्याकडे मद्यप्राशन करण्याचे परवाने नसल्याने त्यांनी गुन्हे केले आहेत. आता तांत्रिक दृष्ट्या हा गुन्हा आहे हे मला पूर्ण मान्य आहे. परंतु आज पुण्यात जी परिस्थिती आहे त्याप्रमाणे छोट्या, मोठ्या सर्व पार्ट्यांमधे मदिरा ही ठेवलेलीच असते. या एकूण सामाजिक परिस्थितीचे प्रतिबिंब अशा युवक-युवतींच्या पार्ट्यांच्यामधे पडणे साहजिकच आहे.
या पार्टीत सहभाग घेतलेले बहुतक युवक-युवती, पुण्याच्या बाहेरून शिक्षणासाठी आलेले आहेत हे ही लक्षात घेतले पाहिजे. त्यांना येथले कायदेकानू काय आहेत? याची माहिती कितपत होती? हे पोलिसांनी बघितले होते का? या पार्टीचे आयोजन ज्या काही मुलांनी केले होते त्या मुलांनी महाराष्ट्रात मदिरा प्राशन करण्यासाठी परवाना लागतो याची कल्पना बाकीच्या मुलांना दिली होती का? वगैरे गोष्टींची शहानिशा पोलिसांनी करावयास पाहिजे होती.
थेऊरच्या या एकूण पार्टी प्रकाराला माझा पाठिंबा आहे असा कोणी अर्थ काढू बघेल तर मात्र तो चुकीचा ठरेल. फ्रेन्डशिप डे च्या या पार्टीची माहिती या युवक-युवतींच्या कॉलेज अधिकार्यांना आधी देऊन त्यांची परवानगी घेऊनच ही पार्टी आयोजित करणे आवश्यक होते. तसेच पार्टीमधे मदिरा उपलब्ध करण्याचा प्रकारही योग्य म्हणता येणार नाही. विशी-बावीशी मधल्या या तरूण तरूणींचा आयुष्याबद्दलचा उत्साहच एवढा ओसंडून वाहत असतो की त्यांना मदिरा प्राशनाची गरजच काय आहे? तसेच ही पार्टी पुण्यामधेच कोठेतरी आयोजित केली गेली असती तर या मुला मुलींना समाजकंटकांपासून उपद्रव होण्याची भिती फारशी राहिली नसती.
असो! झाले ते झाले. आता या प्रकरणातून धडा घेऊन कॉलेजच्या अधिकार्यांनी योग्य ते नियम ठरवून द्यावेत म्हणजे असे प्रकार परत होणार नाहीत. तसेच पोलिस अधिकार्यांनी या मुला मुलींना समज देऊन सोडून द्यावे व या प्रकरणावर पडदा टाकावा हेच उत्तम ठरेल.
Comments
अद्दल
बाकी सगळे मान्य आहे पण भारतभर हेल्मेटसक्ती (=केवळ तांत्रिक गुन्ह्याला शिक्षा) करणार्या सिंबायोसिसबद्दल माझ्या मनात आकसच आहे. झाले ते बरेच झाले.
शिवाय, या प्रिसिडंटमुळे "आपल्याला ध्वनिप्रदूषण करायला मिळणार नाही" अशी असुरक्षिततेची भावना पार्टीप्रिय लोकांच्या मनात निर्माण झाली तर धार्मिक कारणांनी ध्वनिप्रदूषण करणार्यांविषयी त्यांना असूया वाटण्याची शक्यता आहे. त्यामुळे, ध्वनिप्रदूषणाविरुद्ध 'आवाज' उठविणार्यांची संख्या वाढेल अशीही शक्यता आहे. पोलिसांवर ध्वनिप्रदूषणाविरुद्ध कारवाई करण्यासाठी त्यातून दडपण येऊ शकेल.
100 टक्के सहमत
100 टक्के सहमत. त्यांना आता काही दिवस सक्तीची समाजसेवा करायला लावणार म्हणे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
आव
बातमीची चित्रफीत पाहिली. हल्लीच्या तरूण पिढीचे किती नैतिक अधःपतन झाले आहे, असा बातमीदाराचा अविर्भाव होता!
ज्या काही बेकायदा गोष्टी झाल्या असतील त्याची शिक्षा संबंधितांना मिळाली पाहिजे, हे खरेच. पण हे तथाकथित नैतिक अधःपतन आणि आपण ते शोधून काढून फार मोठे काम केल्याचा आव आणण्याची गरज नव्हती.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
'धडपडणारी मुले'...
(चंद्रशेखरजी, आणि मित्रांनो पुढील मजकूर टाईमपास आहे. सगळ्यांनी हसावे म्हणून टाकला आहे. उपरोध न समजत मिश्किली मानावी . कृपया हलके फुलके घ्यावे.)
नमस्ते,
आज मी तुमच्यासमोर 'धडपडणारी मुले' ही नाट्यछटा सादर करुन दाखवणार आहे.
अहो! धडपडणारी मुले म्हणजे कोण? म्हणून काय विचारता? तीच ती साने गुरुजींच्या कल्पनेतील काहीतरी करण्यासाठी धडपडणारी निरागस लेकरे. काय वेळ आली हो त्या अजाण लेकरांवर? पोलिस, मिडिया आणि पुण्याच्या संस्कृतीचा पुळका आलेले लोक अगदी हात धुऊन मागे लागलेत. बदनामी तरी किती करायची ती? छे! छे! छे! अगदी कहरच झालाय.
आता बघा. त्या दिवशी थेऊर इथे मुलांनी जमून सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले होते. त्यात काही चुकलं का? ज्युनियर मुलामुलींचा सिनियर मुलामुलींशी घनिष्ट परिचय व्हावा, एवढाच हेतू. दिवसभर मुले अभ्यासात गर्क असतात म्हणून रात्री हा कार्यक्रम ठेवला. काय म्हणता? थेऊरच का निवडले? अहो. थेऊर हे अष्टविनायकातले महत्त्वाचे गाव. विद्येची उपासना करायची ती त्या गणरायाच्या साक्षीने. चिंतामणीचे दर्शन घेऊन त्याला आवडणारे संगीत-नृत्य-नाट्य आणि इतर कला सादर करणार होती मुले-मुली. जमलंच तर रात्रीच जाऊन पेशव्यांची समाधी आणि सती रमाबाईंचे तुळशी वृंदावनही पाहायचे होते त्यांना. खाण्यापिण्याचे कार्यक्रम रात्री उशिरा का ठेवले म्हणून काय विचारता? अहो, मंगळागौरीला नाही का मध्यरात्रीनंतर खेळ खेळत? कोजागिरीला तर दूध पिऊन रात्र जागवायची असते. मग ते चालते आणि हे चालत नाही का? आजूबाजूच्या लोकांचे काही सांगू नका. गणपती-नवरात्रात खुशाल लाऊडस्पीकर लाऊन रात्रभर धिंगाणा घालतात. आमच्या मुलांची बालगीते तेवढी खुपतात त्यांना.
दारु काय? तोकडे कपडे काय? काय वाटेल ते आरोप करताहेत. मला तर काल आयबीएन लोकमतवर निखिल वागळे पुन्हापुन्हा सांगत होते ते अगदी पटलं. प्रत्येकजणच आपल्या तरुणपणात गंमतजंमत करत असतो आणि दुसर्यांना मात्र नैतिकतेचे धडे देत असतो. आता हीच बातमी बघा ना. आंबोली घाटात धबधब्याखाली परवा आठजणांच्या टोळक्याने धिंगाणा घातला. त्यातले चारजण तर सगळे कपडे काढून नाचत होते. कुटूंबवत्सल लोकांनी लाजेने माना खाली घातल्या. तिथे नाही पोलिसांनी त्या मवाल्यांना धरले. पण आमची लहान मुले नुसती नाचायला लागली तर आले काठ्या घेऊन. अशाने मुले बुजली आणि त्यांनी अभ्यास करणेच सोडून दिले तर जबाबदारी कुणाची? सांगा ना. आता का गप्प झालात?
बरं तुमच्याशी काय बोलत बसलोय मी. आमची शेफाली (मी लाडाने तिला शेफारली म्हणतो) अजून आली नाही घरी. रात्रीचे दहा वाजून गेले. ही पोरं म्हणजे अगदी खोडकर झालीयंत नुसती. जातो मी.
पीत पत्रकारिता
काही घरगुती कारणांमुळे पुनश्च हिंदी वाहिन्यांशी संबंध आला आहे. आज तक, समय वगैरे अशा वाहिन्या पाहण्यात आल्या. तद्दन टाकाऊ आणि बाजारू वाहिन्या आहेत. अशा वाहिन्या आणि त्यावर बातम्या गोळा करणारे त्यांचे वार्ताहर यांच्याकडून अधिक अपेक्षा ती काय करणार?
बायदवे, अशा ठिकाणी पोलीस आधी पोहोचतात आणि वार्ताहर नंतर की वार्ताहर आधी, पोलीस नंतर की दोघे एकत्र हे कळलेले नाही.
असो. याचा अर्थ नियम, कायदा-सुव्यवस्था धाब्यावर बसवून पार्ट्या करणार्यांची भलावण करणे असा नाही.
अवांतरः
आपण "कूल" आहोत हे दाखवण्यासाठी माणसांना कोणकोणते मार्ग घ्यावे/ स्वीकारावे लागतात यावर वेगळी चर्चा करता येईल असा मोठा विषय आहे.
सहमत
सहमत आहे. जे वाचले त्यावरून गुन्हे म्हणजे मद्यवितरणाचा परवाना नव्हता आणि शांततेचा भंग. दोन्हीही ज्या प्रमाणात प्रसिद्धी दिली गेली तितके गंभीर नव्हते. इतकी शांतताभंगाची काळजी आहे तर सगळे उत्सव, लग्नाच्या वराती (+ १०००० फटाक्यांची माळ क्ष वेळा, क्ष पैसे आणि उत्साह यावर अवलंबून), जयंत्या, नेत्यांचे वाढदिवस या वेळी हीच तत्परता का दाखवत नाहीत?
बाकी मद्यधुंद तरूणाईचा स्वैराचार वगैरे भंपकपणा आहे. जे असे म्हणतात त्यांनी स्वतः कितव्या वर्षी प्यायला सुरूवात केली होती ते आठवून बघावे. बिअर पिणे आज आपल्या समाजात इतके निषिद्ध झाले आहे का? हे म्हणजे मिडल इस्टच्या वर झाले.
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
सहमत
आरागॉर्न यांच्याशी सहमत -
हा म्हणजे केवळ येन-केन-प्रसिद्धी चा प्रकार आहे, थेऊर मधील लोकांना त्रास होणे साहजिक असू शकते, पण चंद्रशेखर ह्यांनी म्हंटल्याप्रमाणे समजावणी/दरडावणी हे प्रकार केले जाऊ शकेल असते. समाजसेवा शिक्षा वा दंड देखिल ठीक आहे.
किवा हा केवळ वर्तमान पत्रांचा प्रकार असू शकतो, पोलीस त्यांचे काम करत असतात, काही बातम्या प्रसिद्ध होत असतात, काही होत नाहीत.
पण एक प्रश्न असा आहे - कि - तिथे सापडलेल्या 'विना-परवाना' मद्याचे पोलीस नंतर काय करतात? - पितात/विकतात/ओतून देतात?
हम्म
पार्टीविरूद्ध आणि पार्टी करणार्यांच्या बाजूने दोन्हीप्रकारे बोलता येईल.
माझ्यामते पोलिसांनी या मुलांना पकडले ते चांगले केले का वाईट केले असा मुद्दा नाही. स्थानिक पोलिस वेगळे असू शकतात, स्थानिक (थेऊरला) लोकांची सहन करण्याची, सीमा वेगळी असू शकते. आपल्या गावात बाहेरच्या मुलांनी येऊन दारू पिणे, आणि पार्टी करणे ( मला वाटते प्रत्येकाला आवडते असे नाही). पार्टीत गांजा,अफू मिळाली नाही, हे खरे असेल, पण बाहेरून बघणार्यांना आत काय चालले आहे त्यात गांजा, अफूही असावेत असे वाटले तर आश्चर्य वाटायला नको. येणार्यांनी परिसरातील लोकांना त्रास होऊ नये याचा विचार करायला हवा होता. बर्याचदा बाहेरगावाहून येणार्या लोकांना स्थानिक लोकांची पद्धती विशेष माहिती नसते, गैरसमज वाढत जातात.
खरा मुद्दा
माझ्या मते, भारत विरुद्ध इंडिया हे द्वंद्वच या 'समस्ये'चे कारण आहे.
थोडक्यात सार
रिकामटेकडा यांच्याशी शंभर टक्के सहमत. इंडियाचे रहिवासी (यप्पी, उच्चशिक्षित, कॉस्मोपोलिटन, त्यात एम.बी.ए. करणारे, तरुण मुलं व मुली, फॅशनेबल, पाश्चिमात्य कपडे घालणारे इ. इ.) भारतातल्या एका गावात (अष्टविनायक, गरीब बिच्चारे ग्रामस्थ, वगैरे वगैरे) गेले व तिकडे जाऊन दंगा (ढाण ढाण संगीत लावून पार्टी, दारू, आणि आणखीन काय काय, कल्पनाच करवत नाही बाई इ इ) केला. त्यात बातमीला परप्रांतीय, मोठ्या प्रमाणावर विद्यार्थिनी वगैरे मसालाही घालता आला.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
समर्पक
अगदी समर्पक सार मांडले आहे. अगदी सहमत आहे.
प्रकाश घाटपांडे
हम्म...
भारत वि. इंडिया हे थेऊरमधील लोकांच्या नाराजीचे कारण असू शकते.
मात्र दुसर्या दिवशी सकाळ, लोकमतमध्ये अर्धा पान बातमी आणि बटबटीत हेडलाइन याला पीत पत्रकारीता म्हणण्यावाचून पर्याय नाही.
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
आयोजन
पार्टी ही काहि आज चालु नाहि. गेल्या अनेक पिढ्या आधीच्या पिढीपेक्षा वेगळ्या व अधिक मोकळ्या प्रकारे "पार्टी" करत आहेत. तेव्हा ती व्हावी की नाहि हा मुद्दाच मला मान्य नाही.
सार्वजनिक नुकसान न होणे / स्थानिकांना त्रास न होणे वगैरे गोष्टी ह्या पार्टी करणार्यांपेक्षा त्याचे आयोजन करणार्यांची जबाबदारी असावी असे वाटते.
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
???
काही प्रतिसादांमुळे आणि लेखावरुनही मुलांचे काही चुकले नाही असा अर्थ निघत आहे. कालपरवा मी चिपळूणला जाऊन आलो. जाताना येताना अर्थातच ताम्हिणी घाटातून जावे लागले. शनिवारी सकाळी लवकर जाताना काही त्रास झाला नाही मात्र येताना रविवारी संध्याकाळी वाहतुकीची भलीमोठी कोंडी झालेली होती. कालेजातल्या पोरापोरींचे बरेच घोळके होते. गाड्यांमधले टेप लावून कपडे काढून घोळक्याने नाचगाणे चालू होते, कित्येकांच्या हातात बियरच्या बाटल्या होत्या, मक्याच्या कणसाचा, गुटख्यांच्या पुड्यांचा भरपूर कचरा झालेला होता. या वर्तनाला काय म्हणता येईल? का इथेही या मुलांना सज्ञान आहेत, करु द्या एंजॉय असे म्हणून त्याबद्दल काहीच वाटू देऊ नये?
दुसरे असे की पार्टीत पोलिस आले, कॅमेरेवाले आले की तोंड का लपवले जाते? करतानाचे धाडस नंतर कुठे जाते? एवढे प्यायचे आहे तर सरळ परवाना काढून का ठेवत नाही? याचा अर्थ आम्हाला दारु प्यायची तर आहे पण परवाना काढायला लागणारे धाडस आमच्यात नाही असाच होतो ना?
-सौरभ.
==================
फायरफॉक्ससाठी एकपर्सोना.
प्रायवसी
कुणी आंघोळ करताना पोलिस आले, कॅमेरेवाले आले तर तोंड (किंवा इतर शरीर) लपवले जाईलच ना? करतानाचे धाडस नंतर कुठे जाईल?
कोणता प्रतिसाद?
अजब अर्थ
लेखावरुनही मुलांचे काही चुकले नाही असा अर्थ निघत आहे
श्री सौरभदा यांनी माझ्या लेखाचा हा अजब अर्थ कोठून काढला हे कळत नाही. माझ्या लेखात मी असे म्हटले आहे की
थेऊरच्या या एकूण पार्टी प्रकाराला माझा पाठिंबा आहे असा कोणी अर्थ काढू बघेल तर मात्र तो चुकीचा ठरेल. फ्रेन्डशिप डे च्या या पार्टीची माहिती या युवक-युवतींच्या कॉलेज अधिकार्यांना आधी देऊन त्यांची परवानगी घेऊनच ही पार्टी आयोजित करणे आवश्यक होते. तसेच पार्टीमधे मदिरा उपलब्ध करण्याचा प्रकारही योग्य म्हणता येणार नाही. विशी-बावीशी मधल्या या तरूण तरूणींचा आयुष्याबद्दलचा उत्साहच एवढा ओसंडून वाहत असतो की त्यांना मदिरा प्राशनाची गरजच काय आहे? तसेच ही पार्टी पुण्यामधेच कोठेतरी आयोजित केली गेली असती तर या मुला मुलींना समाजकंटकांपासून उपद्रव होण्याची भिती फारशी राहिली नसती.
चन्द्रशेखर
क्षमस्व!
या वाक्यामुळे मुलांचे काही चुकले नाही असे तुम्हाला वाटते असा घाईने अर्थ मी काढला. लेखाच्या शेवटची, वर सांगितलेली भूमिका पटण्यासारखी आहे.
==================
फायरफॉक्ससाठी एक पर्सोना.
गैरसमज
घडले त्यात विद्यार्थ्यांची चूक होतीच त्याबाबत दुमत नसावे. पण चुका वेगवेगळ्या पातळीच्या असतात. लायसन नसताना गाडी चालवणे आणि दरोडा घालणे दोन्ही गुन्हेच आहेत पण त्यांच्यातील एक गंभीर गुन्हा आहे. ही पार्टी ज्या विद्यार्थ्यांनी आयोजित केली होती त्यांनी परवाना घ्यायला हवा होता हे नक्कीच चुकले. शांतताभंग ही दुसरी चूक. मात्र या दोन्ही चुका ज्या तर्हेने प्रसिद्धी दिली गेली तेवढ्या गंभीर नव्हत्या. आणि नैतिक अधःपतन वगैरे शुद्ध भंपकपणा आहे.
तोंड लपवण्याची क्रिया नैसर्गिक आहे असे वाटते. पोलिसांनी पकडले ही गोष्ट बहुतेक विद्यार्थ्यांना लज्जास्पद वाटली असावी.
--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com
ह्म..
हेच म्हणतो आहे.
हे लज्जास्पद का वाटावे? परवाना नसताना दारु पिणे गुन्हा असल्याचे बहुतेकांना माहित असावेच. नंतर तोंड झाकायला बघणे बाळबोध वाटते.
==================
फायरफॉक्ससाठी एक पर्सोना.
ऑरवेल...
लहानपणी मी राहायचो त्या चाळीत दसरा कोजागिरी उत्सव असायचा. ते पाचही दिवस ठणाणा आवाज करणारा कर्णा आसमंतात गोंगाट करायचा. चाळीतला फक्त एकच माणूस पोलिसांत तक्रार करायचा. पोलिस यायचे व प्रेमळ दम भरून जायचे. मग थोड्या वेळाने पुन्हा ते सुरू. त्या माणसाला चाळकऱ्यांनी खूप छळलं - त्यांच्या कुलपात डिंक भरून ठेवणे वगैरे सारखे क्षुद्र प्रकार करून. शेवटी बऱ्याच वर्षांनी ती गाणी मर्यादेत आली. आसपासच्या वाड्या देखील गणपतीउत्सव, लग्न वगैरे प्रचंड आवाज करून साजरे करायच्या. आणि कुठल्यातरी बुद्रुक थेऊरपेक्षा किमान वीसपट लोकसंख्या-घनता तिथे होती. तरीही मी कुठच्याही वर्तमानपत्रात 'गणेशोत्सवात ध्वनि प्रदूषणाबद्दल अटक' अशी बातमी वाचलेली ऩाही.
मुद्दा चूक आहे की नाही हा नाहीच. एका चुकीला पोलिसांकडून कानाडोळा व तशाच दुसऱ्या चुकीला धडाक्याने प्रसिद्धी याला आक्षेप आहे. रिकामटेकडा यांनी म्हटल्याप्रमाणे इंडिया हे सॉफ्ट टारगेट आहे.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
परत...
नैतिक अधःपतन झाले, आता भारताचे कसे होणार वगैरे मला म्हणायचे नव्हते. ज्याच्या त्याच्या एंजॉय करण्याच्या पद्धती वेगळ्या असू शकतात आणि मला हे आवडत नाही म्हणून इतरांनी तसेच वागण्याची अपेक्षा करावी हा निव्वळ मूर्खपणा आहे हे मान्य. पण या मुलांचे तोंड लपवणे मला जास्त विचित्र वाटले. मला जर असे काही करायचे असते तर मी सरळ परवाना काढून मनसोक्त धांगडधिंगा घातला असता. शिवाय पोलिस, कॅमेरे आले असते तर तोंड लपवण्याचे कष्ट घेतले नसते. जेव्हा तुम्ही परवानगी नसताना दारु वगैरे पिता, परवानगी नसताना एवढ्या मोठ्या पार्ट्या आयोजित करता, त्यात सहभागी होता मग नंतर जे काय होऊ शकतील त्या परिणामांना पण तसेच सामोरे जा. म्हणजे पिताना वगैरे स्टाईल मारणार, कुल आहे असे दाखवणार आणि मग पोलिस आले की हाताने तोंड लपवायचा (केविलवाणा) प्रयत्न करणे हे हास्यास्पद वाटते. हे असले ढोंग बघितले की कसे तरी व्हायला लागते. आणि भारतीयांचे हे असले ढोंग तर सगळीकडेच दिसते. (पोलिसांचेही दिसते तसे, एकीकडे कानाडोळा आणि दुसर्याला प्रसिद्धी)
दुसरे म्हणजे तुम्हाला जे करायचे आहे ते केले तरी त्याचा त्रास इतरांना कशाला? असल्या पार्ट्यांपासून ते सणसमारंभापर्यंत साजरे करताना तुमच्या आनंदापायी इतरांची डोकेदुखी का वाढवावी? धबधब्यांच्या पार कचराकुंड्या करणे, वाहतुकीचे तीन तेरा, ध्वनिप्रदूषणे हे तुमच्यामुळे इतरांनी का सहन करत राहायचे? हा सेन्स भारतातल्या लोकांना कधी येणार?
==================
फायरफॉक्ससाठी एक पर्सोना.
तुलना चुकीची
रस्त्यावर दारु पिऊन गोंधळ घालणारे सार्वजनिक कार्यकर्ते आणि ही मुले यांची तुलना चुकीची आहे. रस्त्यावर गोंधळ घालणारे लोक हे 'तसेच वागणार' म्हणून समाजाने मोकाट सोडून दिलेले असतात. कदाचित त्यांना त्यांचा आनंद व्यक्त करण्यासाठी व शारीरिक ऊर्जेचे दमन करण्यासाठी दुसरे सोपे पर्याय उपलब्ध नसतात. याऊलट पुणेकरांवर कायदेशीरपणाच्या नावाखाली सक्तीच्या हेल्मेटसक्तीचा जुलूम लादणाऱ्या सिंबायोसिसच्या विद्यार्थ्यांकडूनही कायदेशीर वर्तन अपेक्षित आहे. परवाना नसताना दारु पिणे हे हेल्मेट न घालता वाहन चालविण्यापेक्षा क्षम्य आहे का?
इंडिया सॉफ्ट टारगेट बिरगेट काही नाही. इंडियातील लोक भारतातल्या लोकांच्या वागणुकीला नेहमी शिव्या देत असतात तेव्हा भारतातल्या लोकांनीही त्यांना त्यांच्या औषधाचा एकदा डोस दिला इतकाच याचा अर्थ आहे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥