मुतार्यांच्या दुर्गंधीपासून सुटका
मुतार्यांची दुरवस्था
कुठल्याही शहराचे बसस्थानक, रेल्वे स्टेशन वा सार्वजनिक ठिकाण असो, तेथील मुतार्यांचा वापर करण्याचे ठरवल्यास नाक बंद करून, घाण तुडवत व दुर्गंधी सहन करतच लघ्वी उरकावे लागते. बहुतेक शहरांतील सर्वसामाऩ्यांचा हा एक अत्यंत कटु अनुभव आहे. सार्वजनिक मुतार्या व मुतार्याबरोबरचा घाण वास हे समीकरण ठरले असून मुतार्यांच्या उपयोग करणार्यांचे व अशा मुतार्यांच्या जवळ पास राहणार्यांचे जगणे असह्य करण्यात लघ्वीचे नि:सारण करण्यासाठी वापरात असलेल्या सदोष यंत्रणेचा मोठा वाटा आहे.
महागड्या टाइल्सचा वापर व वाहत्या पाण्याची सुविधा असूनसुद्धा नवीन मुतारी बांधल्यानंतरच्या 2-3 महिन्यात मुतारीच्या अवती भोवती घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसू लागते. लोकांच्या थुंकण्याच्या वाईट सवयीमुळे लघ्वीचे सिरॅमिक भांडे कायम तुडुंब भरून वाहत असते. त्याची निगा राखणारी कुठलीच व्यवस्था नसल्यामुळे काही दिवसातच मुतारीभोवती घाण पाणी साठू लागते. टाइल्स तुटतात. नळ गंजतात. त्यामुळे कुठलाही संवेदनशील माणूस मुतारींचा उपयोग करण्याच्या भानगडीत पडत नाही. या समस्येला उत्तर म्हणून आजकाल खासगी-सार्वजनिक सहभाग (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) या गोंडस नावाची भर पडली आहे. या कंत्राटदारांच्या मुतार्यांच्या देखभालीची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट दर्जाची असून त्यावर कुणाचेच नियंत्रण नसते. या व इतर अनेक भेडसावणार्या समस्येमुळे तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन केल्याशिवाय जगूच शकत नाही अशी परिस्थितीशरणता आपल्या सर्वांच्या नसनसात भिनत आहे. अशा असहाय स्थितीत फक्त एखादे नवीन तंत्रज्ञानच यावर तोडगा काढू शकेल की काय अशी एक अंधुकशी आशा मनात उमटत आहे.
दिल्ली येथे पुढील काही महिन्यात कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. या निमित्ताने शहर सुशोभित करण्याचा सपाटा तेथील महापालिकेने लावलेला आहे. त्या अनुषंगाने गर्दीच्या ठिकाणच्या मुतार्यांची सुधारणा करण्याचे त्याने मनावर घेतले आहे. याचाच एक भाग म्हणून अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून हजारेक मुतार्या बांधता येतील का याचा अंदाज घेतला जात आहे. (आता या प्रस्तावात भ्रष्टाचार होत आहे की नाही हे फक्त आमच्या पुण्याचे ’भाई’च स्पष्ट करू शकतील!)
पाणीविरहित मुतार्या
आधुनिक तंत्रज्ञानात मुतारीतील लघ्वीसाठी वाहत्या पाण्याची वा फ्लशची गरज पडत नाही व त्याचप्रमाणे या आधुनिक पाणीविरहित मुतार्यामुळे घाण वासही येत नाही, असा दावा केला जात आहे. मुतार्यातील पाण्याचा वापर मुळातच लघ्वीचे डाग, व घाण वास यावर उपाय म्हणून केला जातो. परंतु हेच पाणी दुर्गंध पसरवण्याचा मूळ श्रोत आहे. खरे पाहता लघ्वी हे वासविरहित द्रव आहे. बाहेरच्या पाण्याच्या वापरामुळे मूत्रातील युरियाबरोबरच्या जलीय विच्छेदन (hydrolysis) प्रक्रियेमुळे दुर्गंधी पसरविणारे वायू बाहेर निघतात व घाण वास पसरत जातो. याचबरोबर जेव्हा मूत्र ट्रॅपमध्ये साठत जातो तेव्हा काही दुर्गंधी पसरविणारे सूक्ष्म जंतू मूत्राचे विभाजन करतात. त्यामुळेसुद्धा दुर्गंधी पसरते.
अशा प्रकारच्या पाणीविरहित मुतार्या नव्वदीच्या दशकात ऑस्ट्रेलिया, अमेरिका येथे विकसित झाल्या. या तंत्रज्ञानामध्ये लघ्वीतील डबर (debris) पकडण्यासाठी स्टेनर वापरला असून त्यानंतर मूत्र झिरपरोधन द्रवामधून (sealant liquid) खालच्या पाइपमध्ये साठवले जाते. हे झिरपरोधन द्रव तेल वा तेलाचे मिश्रण असते. लघ्वीची घनता (1.023 g/mm3) तेल मिश्रणाच्या घनतेपेक्षा (0.928 g/mm3) जास्त असल्यामुळे लघ्वीवर तेल तरंगते. त्यामुळे मूत्रातील दुर्गंधी वायूंना तेलाच्याखाली पकडून ठेवल्यामुळे आसपास लघ्वीचा वास येत नाही. काही विकासकांनी सीलंट लिक्विडऐवजी अतीसूक्ष्म छिद्र असलेले पटल (membrene) वापरले आहे. मेंब्रेन वा सीलंट लिक्विड यांना काही निर्दिष्ट अवधीनंतर बदलावे लागते. त्यामुळे पाणीविरहित मुतार्यासाठीच्या देखभालीच्या खर्चात वाढ होते. यावर उपाय म्हणून चीनमधील संशोधकानी मुतारीच्या भांड्याला नॅनोसिल्व्हरचा लेप दिल्यामुळे दुर्गंधी पसरविणारे सूक्ष्म जंतू वाढत नाहीत. व लेप केलेली पूर्ण भांडी जलनिरोधक (water repellent) म्हणून काम करते.
नेहमीच्या वापरातील युरिनल पॅनची किंमत साधारणपणे 500 रुपये वा अधिक आहे. परंतु पाणीविरहित युरिनल पॅनसाठी 6000 रुपयापेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात. (तक्ता पहा).
शिवाय देखभालीचा खर्च वेगळा. या कंपनींच्या वितरकांच्या मते भांडवली किंमत आता जास्त वाटत असली तरी पाण्याची बचत, पाणी वाहते ठेवण्यासाठीचा अतिरिक्त खर्च, फ्लश, वाल्व, नळाची तोटी इत्यादीवरील खर्च इत्यादी गोष्टी टाळता येत असल्यामुळे काही वर्षातच सर्व पैसे वसूल होतात.
कमी खर्चाचे झीरोडोर तंत्रज्ञान
कुठल्याही सार्वजनिक प्रशासनाला या किंमती परवडणार्या नाहीत. कमी किंमतीतील पॅन विकसित करणे शक्य आहे का याचा विचार आयआयटी दिल्ली येथील संशोधन गट, युनिसेफ व स्टॉकहोम येथील पर्यावरण संस्था करत आहेत. हा गट झीरोडोर नावाची यंत्रणा विकसित करत आहे. या यंत्रणेत युरिनल पॅनमध्ये लघ्वीला trap करण्यासाठी एक चेंडू वापरला जातो. पॅनच्या तोंडाला झाकण्याएवढ्या आकाराचा चेंडू पॅनच्या खालच्या पाईपमध्ये ठेवलेला असतो. लघ्वी पॅनमधून पाईपमध्ये साठत असताना चेंडू तरंगत वर येऊन पॅनचे तोंड बंद करतो. त्यामुळे घाण वास बाहेर येऊ शकत नाही. लघ्वीचे पाणी प्लंबिंग पाईपमधून खाली गेल्यानंतर चेंडू आपोआप खाली जातो. याप्रकारे खालच्या पाईपमधून निघणार्या वासालासुद्धा चेंडू प्रतिबंध करतो. पूर्ण विकासांती झीरोडोरची किंमत सुमारे 250 रुपये राहील असा अंदाज आहे. याच प्रमाणे जैव तंत्रज्ञान वापरून जलीय विच्छेदनाला मदत करणार्या सूक्ष्म जंतूंचा वापर करून दुर्गंधी दूर करण्याचे प्रयत्न काही संशोधक करत आहेत.
झीरोडोर तंत्रज्ञान केवळ दुर्गंध घालवण्यासाठी असून येथे पाण्याचा वापर अनिवार्य आहे. मुळातच आपल्या येथील प्लंबिंग व निचरा व्यवस्था पूर्णपणे वाहत्या पाण्यावर अवलंबून आहेत. या व्यवस्थेत काही कालावधीनंतर मूत्रद्रव स्फटिकात रूपांतर होऊन पाईप choke होण्याची शक्यता आहे. परंतु तज्ञांच्या मते वेळोवेळी जास्त दाबाने पाणी सोडल्यास मूत्रस्फटिक सांडपाण्यात वाहून जातील व पाईप मोकळे राहतील. हे तंत्रज्ञान आता उपलब्ध असलेल्या यंत्रणेचा वापर करत असल्यामुळे जास्त खर्च येणार नाही. जरी हे तंत्रज्ञान स्वस्त असले तरी त्याचे संशोधन अत्यंत प्राथमिक पातळीवर आहे. पूर्णपणे विकसित होऊन वापरण्यायोग्य होण्यासाठी त्याला फार लांबचा पल्ला गाठावा लागेल. तरीसुद्धा आता उपलब्ध असलेले तंत्रज्ञान खासगी उद्योग-संस्थाना परवडण्यासारखे आहे. मोठमोठे कारखाने, उद्योग, शाळा, कॉलेजेस, पर्यटन स्थळ, मंदिर - प्रार्थनास्थळ, इत्यादी ठिकाणी पाणीविरहित व दुर्गंधीविरहित मुतार्यांचा वापर करणे अनिवार्य करण्याची गरज आहे. नगरपालिका वा संबंधित प्रशासनाने अशा आधुनिक तंत्रज्ञानाला उत्तेजन दिल्यास सामान्यांचे आयुष्य थोडे फार तरी सुसह्य होऊ शकेल.
Comments
प्रभाकरजी छान लेखन!
असेच भविष्यवेधी लेखन अधिक प्रमाणात आपण आणि इतर उपक्रमींकडून यावे, ही प्रार्थना.
व्वा.......!
व्वा.....! पुन्हा एक माहितीपूर्ण लेख आवडला. मागच्या महिन्यात दिल्लीत होतो तेव्हा मला चांगली आठवण आहे [अर्जंट शोधाशोध चाललेली होती] तेव्हा लाल किल्ल्याच्या समोरील रोडवर अशा मुतारीचा वापर करता आला होता. पाणीविरहीत मुतारी अशा आशयाचा फलक तिथे वाचला होता. मला त्या फलकावरील सुचनेचा तेव्हा काही अर्थ कळला नाही. पण् आपला लेख वाचून आता डोक्यात लख्ख प्रकाश पडला. थँक्स..........!
मोठमोठे कारखाने, उद्योग, शाळा, कॉलेजेस, पर्यटन स्थळ, मंदिर - प्रार्थनास्थळ, इत्यादी ठिकाणी पाणीविरहित व दुर्गंधीविरहित मुतार्यांचा वापर करणे अनिवार्य करण्याची गरज आहे. नगरपालिका वा संबंधित प्रशासनाने अशा आधुनिक तंत्रज्ञानाला उत्तेजन दिल्यास सामान्यांचे आयुष्य थोडे फार तरी सुसह्य होऊ शकेल.
मनातले बोललात.
अवांतर : परदेशात मुता-यांची काय परिस्थिती आहे हो ?
-दिलीप बिरुटे
येथे
इतर देशातले माहिती नाही परंतु ऑस्ट्रेलियामध्ये परिस्थिती चांगली आहे.
अगदी दुर्गम भागात कँपींगला गेलो तरी मुतारी ची सोय आहेच शिवाय बहुतेक ठिकाणी पावसाचे पाणी वापरून केलेली पाण्याची सोयही आहे.
वर दिलेल्या पाणी विरहित मुतार्या येथे शहरात आहेत. पण त्यातही काही प्रश्न तयार होऊ शकतात. जसे भांड्याव्यतिरिक्त ठिकाणी उडालेले मुत्र स्वच्छ करावेच लागते. पण त्याची यंत्रणा जागेवर आहे असे जाणवते.
आमच्या हपिसात इतक्यातच याचे पुनः:निर्माण केले गेले. आधीच्या मुतार्या उत्तम होत्या. पण त्यात पाणी फ्लश करावे लागे. आता पाणी विरहित बसवल्या आहेत.
शिवाय आधीचे भरपूर प्रकाश देणारे दिवे काढून मिणमिणता प्रकाश देणारे दिवे बसवले आहेत. पुनर्निर्माण का केले याचे उत्तर मला मिळाले नाही. बहुदा टॅक्स मधून फायदा आणि ऑपरेशनल हेल्थ अँड सेफ्टी ची जबाबदारी झटकणे या दोन कारणामुळे असावे असे मानतो आहे.
आमची इमारत १० मजली आहे प्रत्येक मजल्यावर हे पुन:निर्माण केले जाते आहे. म्हणजे प्रत्येक मजल्यावर किमान उत्तम प्रतिचे छत ते जमीन असे मोठे आरसे + साबण यंत्रणा + आधीच्या ग्रॅनाईट फिनिशच्या टाईल्स + भांडी + हात धुवायची भांडी + दिवे + इतर इंटिरियर डिझायनींग वगैरे वगैरे जवळपास नवे (मागचे पुन:निर्माण होऊन दोनच वर्षे झाली आहेत) वगैरे लँड फिल मध्ये गेलेले पाहून वाईट वाटले.
-निनाद
शाळेतील मुतारी
लेख आवडला. लघवीतील वासाचे कारण पाणी असते हे वाचून नवल वाटले.
आमच्या शाळेतील मुतारी मला आठवली. इथे सरळ सरळ जमीनीवर डबर टाकले होते. याला आपण सोकपिट म्हणू शकू. माझ्या आठवणीत त्या मुतारीत कधीच पाणी घातले गेले नव्हते. तरी वास यायचा नाही. अगदी स्वस्तातली मुतारी होती ती.
एक शंका. मुतारीत जे भांडे दाखवले आहे त्याला स्वच्छ करावे लागते का? यावेळी पाणी वापरले तर चालते का? तसेच आसपासच्या उडालेल्या डागांचे काय केले जाते?
देखभाल नेहमीच्या पद्धतीने केली, आणि त्यामुळे दुर्गंधी पसरली तर भारतात त्याला नापास केले जाते.
दुसरे असे वाटले की ही परदेशी बनावटीची असल्याने एवढी महाग असेल का? यातील उपकरणे तर महाग वाटत नाहीत.
प्रमोद
खर्च
हे पटले. आपल्या येथे बनले तर प्रवडणार्या किमतीत होईल अशी आशा वाटते.
||वाछितो विजयी होईबा||
हम्म!
एका चांगल्या तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. तंत्रज्ञानाबरोबर वस्तूंची काळजी घेणेही महत्त्वाचे असते. मुतारीत पिंक टाकणे, इतर विधी उरकणे वगैरेंमुळे ही भांडीही तुंबू शकतील काय?
कारस्थान
साउथपार्कची आठवण आली.
उत्तम
>>> मुतारीत पिंक टाकणे, इतर विधी उरकणे वगैरेंमुळे ही भांडीही तुंबू शकतील काय?
"इतर विधी उरकणे" हा प्रकार काळजाला भिडला =)) एकाची लग्नापुर्वीची परिस्थिती आठवली .. लग्नानंतर त्यांनी म्युच्युअल अंडरस्टँडिंग ने तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला असे त्यांच्याकडुनंच कळते. आणि ज्यांचे बोळेच तुंबलेले आहेत ते भांडीही तुंबवू शकतात . :)
बाकी ह्या ही विषयावर इतके उत्तम लिखाण होऊ शकते ? ह्यावर सुखद आश्चर्यकारक प्रतिक्रीया आहे.
विषयाची छाण हाताळणी केली आहे.
-(आय.टी. कंपण्यांच्या चकाचक मुतार्यांमधे केवळ मुत्रविधी उरकणारा) टारझन
सहमत
सहमत. नानावटींनी अतिशय सुरेख मांडले आहे.
हे उपक्रम आहे सार्वजनिक मुतारी नाही हा फरक लक्षात आला की सकस लेखन होत असावे.
छान लेख
विमानात जी हवेच्या झोतावर व खेचण्याच्या शक्तीवर चालणारी कुपे देखील हा कामी उपयोगाची वाटतात. तिथेही वास येत नाहि. त्या कुपांचा खर्च बराच जास्त असतो का?
बाकी हा प्रश्न भारतातीलच नाहि तर जागतिक असावा. एकदा न्यूयॉर्क व एकदा शिकागो येथे निसर्गाच्या अत्यंत तातडीच्या हाकेला ओ देताना सार्वजनिक मुतार्यांचा आश्रय घ्यावा लागला होता. तिथेही प्रकार फारसा सुखावह नव्हता.
बाकी सार्वजनिक स्वछता हा भारतातील सर्वात दुर्लक्षित विषय आहे यावर दुमत नसावे
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
लेख आवडला
माहितीबद्दल धन्यवाद.
अमेरिकेत काही ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकिन डिस्पोजलसाठी (वास येऊ न देण्यासाठी) अशाच प्रकारच्या तेलाचा वापर करतात असे आठवते. अर्थात ती यंत्रणा काय आहे हे माहिती नाही. पण बहुदा असेच काही असावे असे आता वाटते आहे.
उत्तम माहितीपूर्ण लेख
उत्तम माहितीपूर्ण लेख.
एक बारीकशा मुद्द्याबद्दल अधिक माहिती हवी आहे. "जलविरहित मुतार्या" संस्थळांवर माहिती कळते, की
मात्र अन्यत्र कुठे या माहितीला दुजोरा मिळत नाही.
(विसर्जित होता-होता मूत्र वास-विरहित नसते. मात्र दुर्गंधयुक्तही नसते, हे खरे.)
शिळ्या-उघड्या मूत्राची घाण ही "अमोनिया" वायूचा घाण वास होय. मूत्रातील यूरिया हा पदार्थ जल-विविच्छेदन ("हायड्रोलाइझ") होतो, तेव्हा अमोनिया तयार होतो. त्यासाठी पुरेसे पाणी मूत्रात उपलब्ध असते. अधिक पाणी घातल्याने काय फरक पडेल हे कळत नाही.
मात्र यूरिया स्वतःहून (किंवा नुसत्या पाण्यामध्ये) जलविच्छिन्न होत नाही. जीवाणूजन्य "यूरिएझ" हे एन्झाइम असले, तरच हे विघटन होते. असे मला आजवर तरी वाटत होते. (अजूनही बहुतेक संकेतस्थळांवर माहिती अशीच आहे.)
मग "मूत्रात पाणी मिसळल्यामुळे दुर्गंधयुक्त विघटन होते" ही माहिती पटत नाही. कोणी अधिक माहिती देऊ शकेल काय?
भारतातील उच्चशिक्षीत
चला इतरांनी शोध लावायचा आणि आपण त्याचा उपभोग घ्यायचा- हेच मस्त! भारतातील उच्चशिक्षीत असे शोध कधी लावतील?
दुरावस्था
सार्वजनिक स्वच्छतागृह व सार्वजनिक मुतार्या यांच्या दुरावस्थची कारणे मला वाटतात ती अशी
१) वापरणार्यांची मानसिकता
२) देखभाल दुरुस्ती बाबत प्रशासकीय उदासीनता
३) तंत्रज्ञानाच्या मर्यादा
वरील चित्रात दाखवलेली मुतारी ही मला (तुलनात्मक)स्वच्छ दिसते. मुतारीच्या भांड्यापर्यंत माणुस पोचु तरी शकतो. इथे माणसे मुतारीच्या कडेलाच मुत्रविसर्जन करणे पसंत करतात. इतकी अस्वच्छता जाण्याच्या मार्गात असते. वीज टेलीफोन यांचे डीपी बॉक्सेस या जरा आडोसा तयार करतात त्याचा वापर मुतारी सारखा होतो. कारण मुतार्यांची उपलब्धताच नसते.
प्रथम लोकसंख्येची घनता ज्या ठिकाणी अधिक असते अशा ठिकाणी उदा. मार्केट रेल्वेस्टेशन,गर्दीचे रस्ते अशा ठिकाणी सुद्धा स्वच्छतागृहे व मुतार्या यांचे प्रमाण तुटपुंजे दिसते त्यामुळे अशा पर्यायी व्यवस्था तयार होताना दिसतात.
मुतारीच्या भांड्यात मुत्र विसर्जन करता करताच अनेक गोष्टी लोक सर्रास करताना दिसतात.
१)तोंडात गुटख्याची पुडी रिकामी करुन ती मुतारीच्या भांड्यात टाकणे.
२) बिडी / सिगारेटचा शेवटचा झुरका मारुन थोटक भांड्यात टाकणे
३) तंबाखुचा किंवा चघळलेला पानाचा विडा भांड्यात टाकणे
४) विटकरीचा तुकडा उर्वरित मुत्राचे थेंब शोषुन घेण्यासाठी वापरणे व तो कार्यभाग झाल्यावर भांड्यात टाकणे
( ही बाब विशेषतः मुस्लिम लोकात दिसुन येते)
देखभाल दुरुस्ती बाबत बोलायचे झाले तर मुतारीचे आउटलेट पाईप हे गळुन पडलेले दिसतात इनलेटचे जोड तुटलेले असतात. पाण्याच्या पाईपची तोटी तुटलेली वा गळकी असते. देखभाल वेळच्यावेळी झाली तर दुरुस्तीचे प्रमाण कमी होते पण हा वेग इतका कमी असतो कि मुतार्यांची अवस्था वेगाने ढासाळत जाते.गांजाडी,बेवडे,भणंग लोकांची आश्रयस्थाने बनतात.
तंत्रज्ञानाच्या मर्यादा या पाण्याच्या उपलब्धतेशी निगडीत आहेच. शिवाय त्यात अर्थकारणाचाही विचार आहे. पुरेसे उपलब्ध पाहिजे, उत्तम पाहिजे व कमी खर्चातही पाहिजे अशी कसरत करावी लागते.
या सर्वाचा विचार करता लोकशिक्षण सातत्याने प्रबोधन या गोष्टी काही अंशी का होईना परिणाम कारक आहेत.
सरकारी कार्यालयात स्वच्छतागृहांची साफसफाई ही किमान १५ ऑगस्ट, २६ जाने. १ मे वा एखादा व्हीआयपी येणार असेल तर होते.( इतर वेळी आनंदी आनंद असतो) एकदा स्वच्छतागृहातील मुतारी तुंबण्याची प्रक्रिया चालू झाली होती. मी विचार केला कि १ मे चा झेंडावंदना च्या वेळी तरी ती साफ होईल म्हणून काय होते ते बघायचे ठरवले. बघतो तर काय त्या दिवशी पण मुतारी तुंबलेलीच होती. सगळे तसेच . त्या दिवशी अक्षरशः एक काठी व हात घालून मला साफ करावीशी वाटली. मी ती केली. ( नंतर रिन साबणाने हात धुतला)मंथनातून काय निघाले?
१) गुटक्याची पाउचे
२) सिगारेटची थोटके
३) विटकरीचे तुकडे
४) तंबाखूचे विडे
योगायोगाने एकाने कॅमेरा आणला होता. त्यामुळे तो प्रसंग कॅमेरात बंदिस्त केला हा बघा
प्रकाश घाटपांडे
आयआयटी
उच्च तंत्रज्ञान, सुशिक्षित लोक आणि मुबलक पैशाचे पाठबळ असलेल्या जागेतील एका मुतारीविषयीची माहिती या दुव्यावर आहे.
गालब्रेथ यांची आठवण
जॉन एफ केनेडी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना जे के गालब्रेथ अमेरिकेचे राजदूत म्हणून आपल्या येथे होते. त्यांनी आपल्या येथील भव्य दिव्य अशा इमारतीसंबंधी एक मार्मिक टिप्पणी केलेली आठवते. आपल्यासारख्या गरीब देशाला परवडत नसतानासुद्धा करोडो रुपये खर्च करून प्रशासकीय इमारती बांधल्या जातात. परंतु काही वर्षातच त्यांची दुर्दशा बघवत नाही. याचे एकमेव कारण म्हणजे इमारतीच्या दुरुस्ती व देखभालीसाठी खर्चाची तरतूद नसणे! त्यांच्या मते इमारतीच्या एकूण बांधकाम खर्चाच्या किमान 1-2 टक्के जरी दर वर्षी दुरुस्ती - देखभालीसाठी खर्च केल्यास त्या इमारती दर्शनीय राहतील व त्यांची उपयुक्तता वास्तुविशारदांच्या अंदाजाप्रमाणे राहील!
हाच निकष आपण आपल्या राहत्या घरासाठीसुद्धा लावण्याची गरज आहे असे मला वाटते!