धर्म, संप्रदाय, सांप्रदायिकता- अंतिम भाग

सांप्रदायांची विविधता-

धर्म हा विश्वाकडे एकात्मतेने पहावयास सांगतो. आणि मनुष्याकडे समग्रतेने पहावयास शिकवतो. तर हे जोडून घेण्याचे प्रकार किती राहतील? अनेक असंख्य प्रकार असतील. जोडणारे सूत्र एकच असले पाहिजे. एकाच प्रकारचा पूल असला पाहिजे याची काही जरुरी नाही. अनेक प्रकार आहेत्. एखादा महापुरुष असतो त्याला सत्य शोधायचे असते. सत्याचे दर्शन घ्यायचे असते. तो त्यासाठी तपस्या करतो. त्याला एक विशिष्ठ् प्रकारच्या सत्याचे दर्शन होते. तो ते शब्दांमध्ये प्रकट करतो. त्याचे हे सत्याचे दर्शन जे लोक मानतात ते त्याचे अनुयायी बनतात. त्या अनुयायांना सत्याचे दर्शन करुन देण्यासाठी तो एक प्रकारचा विधी सांगतो. उपचार सांगतो. ते कर्मकांड तयार होते. कर्मकांड वाईट नसते. अनुशासनासाठी ते कर्मकांड आवश्यक असते. आपल्या संसदेमध्ये एक कर्मकांड असते. विधानसभेमध्ये एक कर्मकांड असते. हे एक डिसिप्लिन आहे. पण ते कर्मकांड आहे. "तत्व" नव्हे. हे समजले पाहिजे. कपडे म्हणजे माणूस नव्हे पण कपड्यांशिवाय माणूस नको.

तर कितीतरी अशी कर्मकांडे आहेत. भगवान बुध्दाला असे वाटले की, आपल्याला सत्यज्ञान झालेले आहे. त्याने त्याचा उपदेश केला. आचरणाचे नियम सांगितले. आचरणाचा व्यवहार सांगितला. तो बुध्द धर्म झाला. महाविराने सत्य सांगितले. मग त्याचा जैन धर्म झाला. तर असे अनेक पूल करायला आपल्याला इथे परवानगी आहे. असे अनेक पुल वेगवेगळे आकार घेणारच. आणि वेगळा आकार घेतला की त्याला वेगळे नाव मिळतेच.

आपण लाकडाच्या खुर्च्या करतो. एक विशिष्ट आकार असला की त्याला खुर्चीच म्हणायचे. आणखी वेगळा आकार दिला की टेबल म्हणायचे, आणखी वेगळा आकार दिला की स्टूल होईल. चवथा वेगळा आकार दिला की कपाट होईल पाचवा वेगळा आकार दिला की दरवाजा होईल. म्हणजे वेगवेगळा आकार झालाकी त्याला वेगवेगळे नांव मिळते पण लाकूड मुख्य.

तसा धर्म मुख्य आणि बाकी संप्रदाय. खुर्ची संप्रदाय, टेबल संप्रदाय, स्टूल संप्रदाय, कपाट संप्रदाय आणि एका संप्रदायाचे ही प्रकार कमी असतात का? खुर्ची काय एक प्रकारची असते? डॉक्टरची खुर्ची, विद्यार्थ्याची खुर्ची. टेबलही अनेक प्रकारची असतात. डायनिंग टेबल, ड्रेसींग टेबल, ऑपरेशन टेबल. वगैरे. आणि कोणी म्हटले की आमचे डायनिंग टेबल बरोबर आहे. तर डायनिंग टेबल करा. तुमचा संप्रदाय आहे तो. प्रत्येकाने लाकडाचे डायनिंग टेबल बनविले पाहिजे, कुणीही ऑपरेशन टेबल बनविता कामा नये, तर असे म्हणून चालणार नाही. तर हे सगळे संप्रदाय झाले. अनेक संप्रदाय असणे हे स्वाभाविक आहे. आणि त्यामुळे सांप्रदायिक असणे यात काही चूक नाही. उपासना करावयाची म्हणजे, स्वतःला कोणत्या ना कोणत्या संप्रदायाशी जोडावेच लागते. अशा रितीने आपण कोठल्या ना कोठल्या संप्रदायाशी जोडलेले असतो. जसे आपण कुठल्या ना कुठल्या पोलिटीकल पार्टीशी जोडलेलो असतो. यात काही चूक नाही.

धर्म जीवनाचा आधार

पण सांप्रदायिकता म्हणजे काय? माझा जो संप्रदाय आहे. मला जे सत्याचे दर्शन झालेले आहे. तेच फक्त खरे आहे. बाकीचे खोटे आहेत. असे म्हटले की सांप्रदायिकता उत्पन्न होते. काही जण तर एवढे म्हणून थांबत नाहीत तर बाकी सर्व नष्ट झाले पाहिजे, माझेच फक्त राहिले पाहिजे असे म्हणतात. ही सांप्रदायिकता होय. ही सांप्रदायिकता वाईट असते. ती असहिष्णुता निर्माण करते. या सांप्रदायिकतेने इतिहासात अत्याचार व विध्वंस यांना जन्म दिलेला आहे. तेव्हा 'धर्म' वेगळा आणि 'संप्रदाय' वेगळा. 'धर्म' हे मूलतत्व आहे. आधारशिला आहे. व्यक्ती, समाज, सृष्टी आणि परमेष्टी यांना जोडणार्‍या तत्वांची आधारशिला .

असे असल्यामुळे आमचे राज्यच काय आमच्या सगळ्या संस्था धर्म सापेक्ष आहेत. सगळी जी रचना आहे, ती धर्म सापेक्षच असली पाहिजे तरच ती चांगली रहाते. मनुष्य म्हटला की तो पशुसारखाच आहे. त्याच्यात अर्थ प्रवृत्ति आहे, म्हणजे काही तरी घ्यावे असे त्याला वाटते. तर ही प्रवृत्ति आहे. प्रकृति आहे. 'काम' ही त्याची प्रवृत्ति आहे. स्वभाव आहे. काही वासना आहेत. स्वाभाविक आहेत त्या. पण या धर्म नियंत्रित पाहिजेत. म्हणजे नदीचा प्रवाह ज्या दोन तटांच्या मधून वहातो तेव्हा तो उपयुक्त असतो. तो प्रवाह पिण्याच्या पाण्यालाही वापरता येतो व् पिकाला सुध्दा. पण् जेव्हा पूर येतो व बांध सोडून नदी वहाते, तेव्हा ती विध्वंसक असते. पिकेही घेऊन जाते व पाणी इतके गढूळ असते की आपण पिऊ शकत नाही.

तसेच समाजाचे किंवा व्यक्तीचे अर्थ प्रवाह आणि काम प्रवाह हे सुध्दा जेव्हा धर्मांच्या तटांमधुन वहात असतात्, तेव्हा ते उपयुक्त असतात. त्यांनी धर्मांचे तट ओलांडले की ते विनाशकारी होतात. हे धर्मांचे तट त्यांनी सांभाळावेत यासाठीच हे शिक्षण असते. सगळे संस्कार असतात्. मनुष्य संस्काराने बदलतो. बदलू शकतो. म्हणुन आपण संस्कार करतो. सामान्यतः पशू हे प्रकृतीने चालतात. मनुष्य विकृतीने चालु शकतो आणि संस्कृतीनेही चालू शकतो. तो संस्कृतीने चालावा, प्रकृतीच्या वर उठावा, निदान विकृतीकडे जाउ नये यासाठी सर्व प्रकारच्या सामाजिक संस्थांची रचना आहे.

दोन बैल आहेत. त्याच्या मध्ये हिरवा चारा ठेवला आणि एकाच वेळेला दोन बैल तिथे आले त्यातला एक बैल धष्टपुष्ट आहे व दुसरा रोडका आहे. तर धष्टपुष्ट बैल रोडक्या बैलाला असे म्हणणार नाही की "तू बर्‍याच दिवसात खाल्लेले दिसत नाही. तर तू पहिल्यांदा खा मी नंतर खाइन." समोर चारा आहे आणि पोटात भुक आहे त्यामुळे तो बैल् चार्‍यावर तुटून पडणार आणि रोडका बैल् आल्यास त्याला शिंगाने दूर करणार. ही बैलाची प्रकृती आहे.

पण माणूस स्वत: भुकेला राहून दुसर्‍यास खाऊ घालील. आई मुलाला प्रथम खाऊ घालते. आपण उपाशि राहू शकतो, दुसर्‍याला देऊ शकतो. माणसांमध्ये अशी संस्कृती येऊ शकते. पण विकृतीही येऊ शकते. बैलामध्ये विकृती येत नाही. बैलाचे पोट भरले आणि चारा उरला तर त्याचे गाठोडे बांधून बैल घरी घेऊन जात नाही. माणसांचे काही सांगता येत् नाही. माणुस विकृतिकडे जाउ शकतो. तो प्रकृतीने चालू शकतो आणि संस्कृतीनेही चालू शकतो. मनुष्याला संस्कृति संपन्न बनविण्यासाठी धर्माचा मोठा आधार आहे. धर्म हा आधारभूत आहे. म्हणुन मनुष्याने समाजाकडे असे बघावे की, ज्यातून संस्कृती उत्पन्न व्हावी. आपले सर्व जीवनच धर्म सापेक्ष असले पाहिजे. विवाह धार्मिक संस्कार आहे. विवाह म्हणजे लैंगिक आवश्यकता पूर्ण करणारा व्यवहार एवढीच कल्पना राहिली असती तर विवाह संस्थाच उत्पन्न झाली नसती. म्हणून तेथे धर्म आलेला आहे. अर्थ प्रवाह आहे. काम प्रवाह आहे. हे सगळे धर्माच्या नियंत्रणाकाली पाहिजे. यामुळे सगळ्या समाजाचे कल्याण साधले जाते. सृष्टी चे कल्याण झाले पाहिजे आणि सगळ्या विश्वामध्ये जे चैतन्य आहे त्याच्यामुळे माझ्या ठिकाणी जी एकात्मता निर्माण झालेली आहे याला बाधा येता कामा नये अशा प्रकारे सगळ्या रचना व्हायला पाहिजेत.

राज्यही याच साठी आहे. आता 'धर्मराज्य' याचे आपण जर भाषांतर केले तर गडबड होते. काही शब्दांचे भाषांतर करताच येत् नाही. 'परमहंस' शब्दांचे भाषांतर 'द ग्रेट गूज्' असे केले तर काही कळणारच नाही. कारण त्या शब्दामागे एक प्ररंपरा आहे. तसा धर्म शब्द हा अनट्रान्सलेटेबल आहे. याचं ट्रान्सलेशन आपण करु शकत नाही. म्हणून 'धर्मराज्य' असेच म्हटले पाहिजे. हे धर्म राज्य ऐहिकच राहील. कारण राज्याचा संबंध ऐहिकाशी आहे. ऐहिक कल्याण हा सुध्दा धर्माचाच भाग आहे. म्हणुन धर्माची परिभाषा आहे. "यतः अभ्युदय नि:श्रेयस सिध्दि: स धर्म:" ज्याच्यामुळे 'अभ्युदय' आणि 'नि:श्रेयस' साध्य होते त्याचे नाव 'धर्म'. 'अभ्युदय' आणि 'नि:श्रेयस' वेगवेगळे नाही. हे दोन आहेत. पण मुळात एकच आहेत्. अभ्युदयाची चिंता हा राज्याचा विषय आहे म्हणुन राज्य ऐहिकच असणार. द स्टेट मस्ट बी सेक्युलर. इट इज टू बी सेक्युलर.

सेक्युलर राज्य

राज्य सेक्युलर म्हणजे ऐहिक असणे हे स्वभावतःच मान्य असल्यामुळे राज्याला 'सेक्युलर' हे विशेषण आपल्याकडे लागले नाही. युरोपात असे घडले नाही. पोप हा धर्मगुरु बनला. चर्चचा म्हणजे धर्मसंस्थेचा तो प्रमुख बनला. ईश्वराच्या पुत्राचा पृथ्वीवरील प्रतिनिधी बनला. सर्व जग ही ईश्वराची निर्मिती, ही मान्यता आहे त्याची. जगाच्या रक्षणाची आणि पोषणाची जी ईश्वराची जवाबदारी, ती त्याच्या या प्रतिनिधिकडे आली. आणि तो जिवनाची सर्व क्षेत्रे नियंत्रित करु लागला. सर्व अधिकार त्याच्या ठिकाणी केन्द्रीत झाले. जेथे अधिकारांचे केन्द्रीकरण होते, तेथे विकृती आणि अनाचार उत्पन्न होणे सहाजिकच आहे. आणि मग त्याच्या विरुध्द् प्रतिक्रिया उत्पन्न होणेही तेवढेच स्वाभाविक आहे. एका पोपने पासेस विकायला काढले होते. त्याचा मग निषेध झाला. प्रोटेस्ट म्हणजे निषेध करणे. जे निषेध करणारे ते 'प्रोटेस्टंट' बनले पोपची अधिसत्ता न मानणारे.

अधिकाराच्या लालसेपायी पोप ऐहिक राज्यकारभारातही हस्तक्षेप करु लागले. त्याचीही प्रतिक्रिया उमटली. जे राजे बलवान होते, त्यांनी पोपचा अधिकार धुडकावुन लावला. आणि स्वतःचे चर्च स्थापन केले. तर कोणी सांगितले आमचे राज्य सेक्युलर आहे. चर्चचे क्षेत्र वेगळे आहे. ते रिलिजस क्षेत्र आहे. आमचे क्षेत्र वेगळे आहे. ते सेक्युलर क्षेत्र आहे. त्यामुळे राज्येही दोन प्रकारची झाली. एक झाले 'सेक्युलर स्टेट' दुसरे झाले 'थिओक्राटिक स्टेट'

तेव्हा 'सेक्युलर स्टेट' चा अर्थे 'ऐहिक राज्य' हा होतो. शब्दकोषात हाच् अर्थ दिला आहे. आम्ही सेक्युलरचा अर्थ 'सर्वधर्म समभाव' असा करतो. करा. पण तो शब्दकोषात दिलेला नाही. तथापी शब्दाचे अर्थ व्यापक होत असतात्. काही शब्दांचे अर्थ संकुचित होत असतात. असे भाषेमध्ये नेहमीच चालते. 'कुशल' शब्द आहे. 'कुशल' शब्दाचा मूळ् अर्थ काय आहे? श्राध्दात वापरले जाणारे जे दर्भ असते त्याला कुश म्हणतात. त्याला जरा धार असते. ओले असतांना, ते तोडतांना हात कापू शकतो. जो चांगल्या पध्द्तीने ते कुश गवत भरभर तोडू शकतो त्याला कुशल म्हणतात. आता धावण्यात कुशल, असे म्हणतो आपण. म्हणजे कुशल शब्दाचा जो मूळ अर्थ होता तो व्यवहारात व्यापक बनला. 'प्रविण' शब्दाचा अर्थ आहे ' जो वीणा चांगली वाजवतो तो प्रवीण'. आता धावण्यात प्रविण आहे असे आपण म्हणतो तेव्हा वीणेशी त्याचा काही संबंध उरलेला नाही. काही शब्दांमध्ये संकुचितता येते. हाताला 'पाणि' म्हणतात हे सगळ्यांना माहित आहे आणि मी अनंतरावांचा हात धरला आणि म्हटले की अनंतरावांचे मी 'पाणिग्रहण' केले तर हसायला येईल. कारण इथे पाणिग्रहणचा वेगळा अर्थ आहे. अर्थाचा संकोच झाला आहे.

या रितीने 'सेक्युलर' शब्दाचा अर्थाचा विस्तार होऊ शकतो. सेक्युलर शब्दाच अर्थ कुठेही 'सर्वधर्मसमभाव' म्हणजे रिस्पेक्ट फॉर ऑल रिलिजन्स, असा अर्थ दिलेला नाही. पण आपल्या देशात नवीन शब्दकोष निघाला तर तो येईल. परतु सध्या तरी नाही. सेक्युलर चा अर्थ ऐहिक आहे. आमचे राज्य ऐहिक आहे असे म्हणतांना आपल्याला असे सुचवायचे असते की, राज्य सर्वसंप्रदायांकडे समान दृष्टिने बघेल. कोणयाही एका संप्रदायाशी बांधलेले आणि इतर संप्रदायाचा द्वेष करणारे ते रहाणार नाही. म्हणुन 'सर्वधर्मसमभाव' याच्या ऐवजी 'सर्वसंप्रदाय समभाव' म्हणा. धर्म एक आहे हे आपल्याला मुळी मान्यच आहे. कारण आम्हीच मार्गांची जी विविधता आहे ती मान्य केलेली आहे. तेव्हा राज्य 'सेक्युलर' असले पाहिजे आणि ते 'धर्मराज्य' असले पाहिजे. कारण सर्व जीवनच धर्म सापेक्ष असले पाहिजे. आमचा संप्रदाय आम्हाला पाळता आला पाहिजे. त्याचे स्वातंत्र्य् असले पाहिजे पण या स्वातंत्र्याला मर्यादा आहेत. मला हात हलवायला स्वतंत्र्य आहे पण कुठपर्यंत? तर अनंतरावांचे नाक आहे तिथपर्यंत. तिथे मी आवरायला पाहिजे. नाहीतर त्यांच्या स्वातंत्र्यावर घाला येईल. तर या ज्या मर्यादा आहेत. त्या संप्रदायाच्या मर्यादा आहेत. हिंदुस्थानामध्ये जी सगळी राज्ये झालेली आहेत, ती सगळी राज्ये साधाराणतः सेक्युलर झालेली आहेत. आपण लोकशाही मानली असल्यामुळे या ठीकाणी जे बहुसंख्य लोक आहेत त्यांचा प्रभाव पडणे स्वाभाविकच आहे. अमेरिकेत लोकशाही आहे. अमेरिकेमध्ये 'थिओक्राटिक' स्टेट नाही. तिथे प्रेसिडेंट, काही कोणी 'डिफेंडर ऑफ द स्टेट' नाही. तरी देखिल अमेरिकेच्या २०० वर्षांच्या इतिहासामध्ये फक्त एक रोमन कैथॉलिक अमेरिकेचा अध्यक्ष होऊ शकला. तो म्हणजे 'जॉन केनेडी' आणि तोही चार वर्षे टिकला नाही. सगळे प्रोटेस्टंट अध्यक्ष झालेत. कारण ते बहुसंख्य आहेत.१६ टक्के ज्यू अमेरिकेत आहेत.(आपल्याकडील मुसलमानांपेक्षा ही संख्या जास्त आहे.) पण एकही ज्यू आत्तापर्यंत अमेरिकेचा अध्यक्ष झालेला नाही. किंवा आपला सेक्युलैरिझम सिध्द करण्याकरिता, अमेरिकन जनतेला असे वाटले नाही की सर्वजण आपल्याला नॉन सेक्युलर म्हणतील म्हणून केव्हा तरी एका ज्यू ला आपण अध्यक्ष करावे. इथे जे बहुसंख्य लोक आहेत त्यांचा प्रभाव राहणार. त्यांच्या संस्कृतीच्या आधारावरच राष्ट्र बनते. त्या संस्कृतीला मानणारे जे लोक आहेत त्यांचा प्रभाव, त्यांची जीवनमुल्ये, त्याचे बर्‍या वाईटाचे मापदंड यांचा प्रभाव रहाणार आहे.

अस्पसंख्यकांचे अधिकार

संप्रदायाच्या आधारावर काही लोक बहुसंख्य राहणार, कोणी अल्पसंख्यक राहणार. हे सगळ्या समाजामध्ये आहे. पण या अल्पसंख्यत्वाचा जो आधार आहे त्या आधारापुरताच, त्याची संरक्षणे, त्यांच्या सवलती मर्यादित असल्या पाहिजेत. आपल्या घटनेने रिलिजीअस् मायऑरिटी च नाही मानल्या तर आर्टिकल २९ किंवा ३० मध्ये लिंग्विस्टिक मायनॉरिटी ही मानलेली आहे. मुंबईमध्ये गुजराथी किंवा हिंदी भाषिक लोक आहेत. उत्तर प्रदेशाचेही पुष्कळ लोक मुंबईत आहेत. त्याचे भाषिक अल्पसंख्यत्व आहे. त्या भाषिक अल्प संख्यत्वाचे काय अधिकार आहेत? तर त्यांना हिंदीमध्ये भाषण करायचे झाले तर करता आले पाहिजे. हिंदीमध्ये शाळा काढता आली पाहिजे. हिंदीमध्ये नाटक करता आले पाहिजे. बस संपले. पण त्यांनी म्हटले की, आम्ही हिंदी भाषी १० टक्के आहोत तर महानगरपालिकेत १० टक्के जागा पाहिजेत. पोलिसांमध्ये आम्हाला १० टक्के पाहिजेत, नोकरीमध्ये १० टक्के पाहिजेत तर त्यांना सांगितले पाहिजे की, तुमचा अल्पसंख्यकत्वाचा जो आधार आहे तो तु सोडलेला आहेस. त्याचे तू अतिक्रमण केले आहेस्.

त्याचप्रमाणे रिलिजीअस मायनॉरीटी आहेत. ख्रिश्चन आहेत, यहुदी आहेत, पारशि आहेत, मुसलमान आहेत त्यांना रिलिजस हक्क हवेत. त्यांना प्रार्थना मंदिरात जाता आले पाहिजे. धर्मग्रंथ वाचता आले पाहिजे. त्यांच्या संप्रदायाप्रमाणे उपासना करता आली पाहिजे. प्रार्थना स्थळ बांधता आले पाहिजे. आणि कुणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास सरकारने त्यांचे संरक्षण केले पाहिजे. याच्या साठी काही सवलती दिल्या पाहिजेत. कमी कींमतीच्या जागा द्यायला पाहिजे. पण 'आम्ही अल्पसंख्यक आहोत म्हणुन आम्हाला वेगळे पोलिटीकल राईटस आहेत ते मिळाले पाहिजेत.' असे कोणी म्हटले तर सांगितले पाहिजे की, " तुम्ही अल्पसंख्यकत्वाची मर्यादा सोडत आहात." तुम्ही पोलिटिकल मायनॉरिटी नाही" तो पोलिटिकल मायनॉरिटी म्हणजे जो विरोधी पक्ष असतो तो. तो पोलिटीकल मायनॉरिटी मध्ये येतो, त्याला काही मर्यादित अधिकार असतात.

समाप्त
लेखनविषय: दुवे:

Comments

विचार

सांप्रदायिकतेत विचारांचे संघटना सोबतच विघटनाची प्रक्रिया अंतर्भुत असते. 'वृद्धींगत' करणे आणि 'नामशेष' करणे या ही प्रक्रिया चालूच् असतात.
सांप्रदायिकता ही माणुस समाजशील प्राणी असल्यामुळेच तयार होते
प्रकाश घाटपांडे

अंशतः असहमत

बैलामध्ये विकृती येत नाही. बैलाचे पोट भरले आणि चारा उरला तर त्याचे गाठोडे बांधून बैल घरी घेऊन जात नाही.

हे उत्क्रांतीच्या नियमांत बसत नाही. दैनंदिन माहितीतील उदाहरणे म्हणजे कुत्रा हाडे पुरून ठेवतो, मधमाशांचे पोळे, इ.

कुशल, प्रविण, पाणिग्रहण

चांगली उदाहरणे. पण हाच नियम धर्म या शब्दालाही लावता येईल. आज धर्म हा शब्द संप्रदाय आणि कर्तव्य हा शब्द धर्म या अर्थाने वापरला जातो, नाही का?

बिलकुल आवडलं नाही...

रिकामटेकडाभाऊ, तुम्ही तर्कशुद्ध विवेचनाचे नियम कीर्तनाला लागू करता हे मला बिलकुल आवडलेलं नाही. सत्याचा इथे काय संबंध? हे प्रवचन आहे. तेव्हा प्रवचन ऐकताना जे नियम पाळायचे ते तुम्ही पाळावेत अशी नम्र पण काहीशी जरबेची विनंती. हे नियम खालीलप्रमाणे

कीर्तनकाराच्या शब्दप्रवाहात झोकून देऊन त्यात गुंग होऊन जाणे
तर्ककठोरपणा टाळून संदिग्धतेला जवळ करणे
आणि मुख्य म्हणजे भलतेसलते प्रश्न न विचारणे

असले नियम पाळले नाहीत तर काय होतं हे मी तुम्हाला सांगायला नको.

आणि हो, हे उत्क्रांती, उत्क्रांती काय प्रकरण आहे? आणि त्याचा मानवी जीवनाशी काय संबंध?

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

+१

सहमत.
पण थोडा फरक आहे. हे प्रवचन नाही. बौद्धिक आहे.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

बौद्धीकालाही तेच लागु

बौद्धिकाला ही तेच लागु.
प्रकाश घाटपांडे

मा गो वैद्य

आताच नागपूरहून आलो. तिकडचा तरुणभारत पाहिला. मागोवैंचा एक लेख ( http://www.tarunbharat.net/site.home/paper_type/1/date/2010-08-01/page_no/4) तिथे आहे. त्यात त्यांचा संपर्कक्रमांकही दिला आहे.

प्रमोद

तरूण भारत

तरुण भारत मध्ये (पाश्चात्य संस्कृतीचे थेर असलेल्या) मैत्रीदिनाच्या संदेशांसाठी जागा पुरवलेली पाहून डोळे पाणावले.

नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)

 
^ वर