धर्म, संप्रदाय, साम्प्रदायिकता-भाग २
यज्ञाची संकल्पना
त्यागालाच यज्ञ म्हटले आहे. "अग्नेय स्वाहा:" म्हणजे अग्निला अर्पण. 'अग्नेय इद् म्' म्हणजे हे अग्नीचे झाले. पुनः म्हणायचे असते "न मम" म्हणजे माझे काही नाही. कधी कधी दानामध्ये सहज अहंकार असतो. अमुक अमुक याने पाचशे रुपये या मंदिराच्या एका पायरीसाठी दिलेले आहेत्. असे त्या पायरीवर लिहीलेले असते. यज्ञात असे काही नसते. "न मम" आपण यज्ञ बुध्दीने, निरपेक्ष बुध्दीने, समूहाच्या कल्याणासाठी जे काम करतो त्यालाच यज्ञ म्हटलेले आहे.
भगवद् गीतेमध्ये यज्ञाची कितीतरी नावे दिली आहेत. 'ज्ञानयज्ञ" म्हटले आहे. म्हणजे आपण ज्ञानाची आहूती टाकतो काय्? नाही. तर निरपेक्ष बुध्दीने ज्ञानाचे वितरण करतो. समाजाच्या कल्याणासाठी करतो, म्हणुन तो ज्ञानयज्ञ. देता आले पाहिजे. समाजाला यज्ञाच्या स्वरुपात देता आले पाहिजे. त्याग बुध्दीने देता आले पाहिजे. तर हे देणे म्हणजे 'धर्म' आहे. तो जो मनुष्य पाळीत नाही त्याला गीतेमध्ये पुष्कळ शिव्या दिल्या आहेत. "भुंजते ते त्त्वर्ध पापां ये पचन्ति आत्मकारणात् " जो स्वतःसाठी अन्न शिजवतो व स्वतःच अन्न भक्षण करतो, तो अन्न भक्षण करत नाही तर तो पाप भक्षण करतो. असे गीता सांगते. याच्याहून काय वाईट शिवी पाहिजे?
तर हा जो यज्ञ चाललाय, त्या यज्ञाच्या भरवशावर जग चालते. समाज चालतो. मी यज्ञासह प्रजा उत्पन्न केली असे जेंव्हा भगवान म्हणतात तेव्हा त्याचा हा अर्थ आहे. "सहयज्ञा: प्रजा: सृष्ट्वा" मनुष्याने असे निरपेक्षतेने दुसर्यासाठी काम केले पाहिजे अशी परमेश्वराची अपेक्षा असते. असे जे समाजासाठी करतात तो धर्म आहे. पुष्कळदा आपल्याला वाटते की, आपण उपकाराची फेड करतो. खरेच उपकाराची परीपुर्ण फेड करु शकता का तुम्ही? शंभर टक्के कोठल्याही उपकाराची फेड कोणी परत् करु शकत नाही.
अशी कल्पना करा. मी नागपूरचा रहाणारा मुंबईत आलो. माझी कोठेही ओळख नाही. माझ्या स्कुटरला अपघात झाला आणि मी नाली मध्ये पडलो. श्री. देशपांडे तिथे आले. त्यांची व आमची काही ओळख नाही. पण त्यांनी पाहिले की एक माणूस तळमळतो आहे. त्यांनी मला उचलले व दवाखान्यात नेले. मलम पट्टी केली. चहा दिला. पत्ता घेतला माझ्या घरी पत्र टाकले. पुनः जेवणासाठी डबा आणून दिला. आता त्यांनी माझ्यावर जे उपकार केलेत त्यांची शंभर टक्के परतफेड मी कशी करणार? थैंक्यू म्हणून? की त्यांनी खुप उपकार केलेत त्यांच्या पत्नीने मला डबा वगैरे आणून दिला. म्हणुन् मग केव्हातरी त्यांना माझ्या घरी बोलवून आहेर वगैरे देऊन परतफेड करुन? नाही. अशी परतफेड होऊच शकत नाही.
मग शंभर टक्के परतफेड करायची असेल तर? देशपांडेंना अपघात कधी होतो, याची आपण वाट बघायची? दोन वर्ष वाट बघितल्यानंतर जेव्हा अशी संधी आली नाही तेव्हा माझी स्कुटर त्यांना पायी जाताना पाहून त्यांच्या अंगावर नेऊन त्यांना पाडले. त्यांचा हात फ्रैक्चर झाला आहे असे बघून मी त्यांना विचारणार "काय हो, फ्रैक्चर हात डावा की उजवा?" तर अशा रीतीने काही उपकाराची फेड होत नाही.
म्हणुन म्हटले आहे की "यज्ञचक्र" चालवावे लागते. हे चक्र कसे चालवायचे? देशपांडेंनी मला जे उचलले व मदत केली, ते माझ्याकडून त्यांना काही मिळेल, या अपेक्षेने केली नाही. माझ्या कडून काही मिळणार नाही. कदाचित् मी बेशुध्द असल्यामुळे मी अपघातात थैंक्यु सुध्दा म्हणणार नाही. त्यांनी केलेला हा यज्ञ आहे. या यज्ञाची फेड अशी आहे की हे यज्ञ चक्र चालविले पाहिजे. म्हणजे दुसरा कोणी अपघातामध्ये किंवा दुसर्या संकटामध्ये बघितला तर मी मला फायदा काय होईल, काय तोटा होईल , मला काय मिळणार आहे, याचा विचार न करता मी मदत केली पाहिजे. याला म्हणतात 'यज्ञ चक्र'. आणी या यज्ञ चक्राला प्रत्येक व्यक्तीने समाजाच्या कल्याणासाठी गती देत राहिले पाहिजे. म्हणून जो या प्रकारे 'यज्ञचक्राला' गती देत नाही त्याला भगवद् गीतेमध्ये शिव्या दिल्या आहेत . पापी म्हटले आहे.
"एवम् प्रवर्तितम् चक्रं नानु वर्तयतीह यः - अधायुरिन्द्रियारानो मोघं पार्थ स जीवति" (गीता अध्याय ३ श्लोक् १६) 'अधायु: म्हणजे त्याचे आयुष्य पूर्णपणे पापांनी भरलेले आहे. "इंद्रियारामः" तो इंद्रियांचा गुलाम आहे आणि 'मोघं जीवति' त्याचे जीवन मोघ म्हणजे निरर्थक आहे.
समाजाशी बांधिलकी
ही जी व्यक्तीच्या धार्मिक आचरणाची पहिली अवस्था आहे, ती धर्माची पहिली पायरी आहे. समाजाकडे या दृष्टीने बघितले पाहिजे. समाज हा आपला एक प्रकारचा उपकारकर्ता आहे असे बघितले पाहिजे. सॉकैटिसाची गोष्ट आपल्याला माहित आहे. सॉक्रेटिस एथेन्स शहरामध्ये आला. 'वाइझेस्ट मैन इन् एथेन्स' असा देवतेने कौल दिला होता . त्याच्या नंतर त्याने विचार केला की मला काय म्हणून शहाणं समजतात लोक? म्हणुन् एथेन्स शहरामध्ये जे मान्यवर विद्वान होते त्यांच्याकडे तो गेला. आणि त्यांच्या विद्वत्तेची परिक्षा घ्यायला लागला. ' कोणीही त्यांच्या विद्वत्तेची परीक्षा घेतली म्हणजे तो लोक रागावणारच. त्याला कळेचना , हे सगळे लोक एवढे विद्वान असताना आपल्याला देवतेने वाईझेस्ट मैन कसे म्हटले? सर्वात शहाणा कसे म्हटले. मग त्याच्या लक्षात असं आलं की, 'प्रॉबेब्ली, आय एम द वाईजेस्ट मैन बिकॉज आय नो दैट्, आय नो नथिंग' आणि बाकीचे जे तथाकथित विद्वान आहेत त्यांचे नावं का नाही घेतले? कारण की त्यांना जेवढे माहित आहे, त्यापेक्षा जास्त माहित आहे असे ते समजत होते म्हणून त्यांना शहाणे म्हटले नसेल. त्यामुळे साहजिकच सॉक्रेटिसने पुन्हा शत्रू निर्माण केले. अथेन्स शहरामध्ये मग त्याच्यावर खटला चालला.
तिथल्या जनतेने खटला भरला आणि सांगितले की, हा दोन गोष्टी करतो. (१) इथल्या तरुणांना बिघडवतो. (२) शहरातील ज्या मानलेल्या देवता आहेत त्यांच्या विरुध्द हा प्रचार करतो. असे त्याच्यावर आरोप ठेवले. त्यांची जी न्यायदानाची पध्दत होती त्या पध्दती प्रमाणे सगळी असेंब्ली (५०० जणांची) हायकोर्ट झाली. त्यांच्या न्यायदानाच्या प्रथेनुसार ज्याला आरोप ठेवायचे असतात तोच शिक्षाही सुचवितो. तेव्हा ज्यांनी आरोप ठेवला त्यांनी मृत्युदंडाची शिक्षाही सुचविली. मग साक्रेटीसने आपली सफाई दिली. आणी त्यावर मतदान झाले. २८० विरुध्द २२० मतांनी साक्रेटिस दोषी ठरला. मग त्यांच्या पध्दती प्रमाणे ज्याला अशी शिक्षा झालेली असते त्याला पर्यायी शिक्षा सुचविण्याचा अधिकार असे. "तुला मृत्युदंडाची शिक्षा झाली आहे. तू दुसरी शिक्षा सुचव" असे साक्रेटिसाला सांगण्यात आले. साक्रेटिसला राग आला तो म्हणाला " या अधेन्स शहरातल्या सभागृहामध्ये ज्यांनी ज्यांनी अथेन्स शहराचे कल्याण केलेले आहे; त्यांची चित्रे लागलेली आहेत. मी माझे संपूर्ण आयुष्य निरपेक्ष भावनेने अथेन्स शहराच्या कल्याणासाठी वेचलेले आहे. तेव्हा मी मृत्युदंड् स्विकारायला तयार आहे. मात्र माझे चित्र या सभागृहात तुम्ही लावा.' त्यानंतर ती असेंब्ली अधिकच रागावली. आणि मृत्युदंडाची शिक्षा ३२० विरुध्द १८० मतांनी नक्की झाली. म्हणजे साक्रेटिसच्या बाजूने अजून ४० मते कमी झाली.
आणि साक्रेटिसला तुरुंगामध्ये रहावे लागले. आता या मूर्ख लोकांच्यामुळे हा एवढा विद्वान, शहाणा मनुष्य नाहक मरतो याचे त्याच्या शिष्यांना फार वाईट वाटले. आणि क्रायटो नावाचा एक शिष्य होता, त्याने पहारेकर्याला वश करुन आणि एका शिपायाचा वेश घेऊन ज्या दिवशी साक्रेटिसला विष प्राशन करुन मृत्युला कवटाळावे लागणार आहे त्याच्या आदल्या दिवशी पहाटेला तुरुंगामध्ये प्रवेश केला आणि म्हणाला, "लवकर कपडे बदल आणि माझ्या बरोबर चल."
साक्रेटिस - चलू? मी ?
क्रायटो - हो चल, नाहीतर उद्या हे सर्व तुला मारतील
या नंतर दोघांचा झालेला संवाद मोठा बोधप्रद आहे.
क्रायटोला साक्रेटिस म्हणतो की, ' मी जर पळून गेलो इथुन् तर या देशाचा कायदा मला काय म्हणेल ? या समाजाचा कायदा मला काय म्हणेल? ' या कायद्याने तुला जो पर्यंत फायदे मिळत होते तो पर्यंत तू सगळे फायदे उपभोगलेस. हे जे घर तुझ्या वडीलांनी बांधलेले आहे ते तू मेल्यावर तुझ्या मुलाला मिळणार आहे. हे या देशाचे कायद्यामुळे मिळणार आहे. त्यावेळी तुला कायदा चांगला वाटला आणि आता तो समाजाचा कायदा तुला सांगतो की, तू मेलं पाहिजेस , तर तू पळून जातोस? असा जर मला कायद्याने प्रश्न विचारला तर मी काय उत्तर देऊ?
क्रायटो निरुत्तर झाला. आणि साक्रेटिसने आपण जितक्या सहजतेने चहाचा पेला पितो, तितक्या सहजतेने विषाचा प्याला प्राशन केला.
ही समाजाच्या संबधीची जी बांधिलकी आहे ती राज्याच्या सत्तेशी बांधिलकी नसते. हे जे समाजाच्या व्यवस्थेचे चित्र आहे (फॉर्मेट) त्याच्याशी ती बांधिलकी असते. आणि त्याच्यासाठी प्राणाचीही आहुति दिली पाहिजे. हे साक्रेटिसाचे वर्तन आहे ते धर्माचे वर्तन आहे. हा धर्म आपण विसरुन गेलो. ख्रिश्चन नाही विसरले. मदर टेरेसांचा उद्देश काहिही असो. पण् रस्त्यावर पडलेला अपंग मनुष्य तिला दिसला की, ती त्याला उचलून चर्च मध्ये घेऊन जाते. मी ख्रिश्चन संस्थेमध्ये १७ वर्ष नोकरी केली आहे. त्यामुळे सांगतो की, त्यांचे सगळे गुणदोष मला माहित आहेत. पण चर्च म्हटले की, तेथे लेपर होम असते. तेथे ऑर्फनेज असते. आपल्याकडे एकाही मठामध्ये, मंदिरामध्ये हे सापडणार नाही. आपण म्हणू हे सामाजिक कार्य आहे हे धार्मिक कार्य नाही. परंतु हे धार्मिक कार्य आहे. हा धर्म आहे, व्यष्टाची समष्टीशी. व्यक्तीचा समाजाशी हा जो सामंजस्यपूर्ण संबंध , त्याचे नाव 'धर्म' आहे. व्यक्तीने स्वतःला समाजाशी जोडून घेण्याचे अनेक प्रकार आहेत. कोणी धर्मशाळा बांधून, कोणी धर्मार्थ दवाखाना काढून , कोणी उन्हाळ्यात साधी पाणपोई लावुन धर्म करु शकतो. 'पुत्रधर्म' म्हणजे पुत्राने मात्यापित्याच्या सुखाशी स्वताला जोडून घेणे. 'राजधर्म' म्हणजे राजाने ,(आता आपण राज्याने म्हणू) प्रजेच्या सुखाशी जोडून घेणे. 'प्रजाधर्म' म्हणजे प्रजेने राज्याच्या हिताशी स्वतःला जोडून घेणे. ही जी जोडण्याची क्रिया असते, ती पुत्राचे, राजाचे, किवा प्रजेचे कर्तव्य ठरते. म्हणुन पुत्रधर्म म्हणजे पुत्राचे कर्तव्य, राजधर्म म्हणजे राजाचे कर्तव्य. प्रजाधर्म, म्हणजे प्रजेचे कर्तव्य असे अर्थ निष्पन्न झालेत. हे आपण लक्षात घेतले पाहिजेत.
सृष्टिमातेशी नाते -
हे जसे मनुष्याच्या समाजाशी असलेल्या संबंधामध्ये आहे त्याचप्रमाणे ते सृष्टीच्याही संबंधाने आहे. कशा रितीने बघायचे सृष्टीकडे? आदराने आणि सर्वात आदराचे नाते कोणते? तर मातेचे. म्हणून सृष्टीकडे माता म्हणून बघायचे. एखाद्या वस्तूला माता म्हटले की, आपला त्या वस्तूकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. बायॉलॉजिकली माझी आई आणि दुसरी स्त्री यात काही फरक नाही. पण् आई म्हटले की, माझे सगळे भावविश्व बदलून जाते. मला हे माहित आहे की, ही पृथ्वी दगड मातीची बनली आहे. पण एकदा तिला भूमाता म्हटले म्हणजे, मातृभूमी म्हटले की माझे आणि तिचे नातेच बदलते. मग माझ्याकरता ती निर्जीव रहात नाही. ती विष्णुपत्नी बनून जाते. जगदंबा बनते आणि मी म्हणतो, " विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्वं" मी तुझ्या अंगावर विचरण करणार आहे. पायांनी तुला तुडवणार आहे. आई मला क्षमा कर.
त्याचप्रमाणे गाय ही चार पायांची पशू राहत नाही. तर गो माता बनून जाते. आणि नदी नुसते पाणी रहात नाही तर गंगामय्या बनते. किंवा लोकमाता बनते. आम्हाला पूर्णपणे माहित आहे की, गंगेमध्ये काय आहे. पाणी आहे म्हणजे एच.टू.ओ. दुसरे काय असते? गंगेचे पाणी काय कुठल्याही तलावाचे पाणी काय् ? नळाचे पाणी काय? ते एच.टू.ओ.च पण तुम्ही प्रयागला जा त्रिवेणी संगमावर जा आणि मी एच टी ओ आपले अंग स्वच्छ करुन आलो असे म्हणा, आणि मी गंगामैय्याच्या अंकावर जरा लोळण घेऊन आलो किंवा जरा पहडून आलो असे म्हणा. दोन्हीत फरक आहे. तीच गंगा वेगळी बनून जाते. लोकमाता बनते. गंगामैय्या बनते.
त्याचप्रमाणे "तुळस" झाड राहत नाही. तर तुलसीमैय्या बनून जाते. मग वृक्षाची पुजा का याचा अर्थ स्पष्ट होतो. मी ज्या ख्रिश्चन संस्थेमध्ये काम करत होतो तेथे एकदा चर्चा चालली होती. ते म्हणाले, " काय तुमचा धर्म? झाडालाही देव मानतो." मी सांगीतले, " आमचा धर्म मोठा आहे, म्हणून तो झाडातही देव बघतो. सृष्टीतही देव बघतो." या सृष्टीशी मानवाने स्वतःला कसे बांधुन घ्यायचे? तर आपण पुत्र आहोत आणि ती आपली माता आहे असे मानून बांधून घ्यायचे. मग पर्यावरणाची समस्या राहणारच नाही. आपण आवळीची पूजा करतो. चांगली गोष्ट आहे. वडाची पूजा करतो. चांगली गोष्ट आहे. सर्वसाधारण माणसाला काय सांगायचे. तर कर पूजा आवळीची. पुष्कळदा वजन कमी करायचे असते अशा॑ बायकांना मुद्दाम काही वैद्य सांगतात की, वडाच्या झाडाला १०० प्रदक्षिणा घाला. १०० प्रदक्षिणा घातल्या की १ किलो मिटर चालणे होणार आणि वजन कमी होणार. सृष्टीशी अशी बांधिलकी सांगितलेली आहे. हा धर्म आहे. काँक्वेस्ट ऑफ नेचर अशी भाषा नाही. आईचा कॉन्क्वेस्ट असतो का? आईचा कॉन्क्वेस्ट नसतो. म्हणजे सृष्टीची ही पूजा आहे. सृष्टीचे दोहन आहे. सृष्टी माता आहे. गाय तुम्हाला दुध देईल . रोज थोडसं दूध देईल पण तीच्या जन्मभर दुध देईल आणि ती कापली तर एकाच वेळेस तीचे मांस खूप देईल पण दूध कधीच मीळणार नाही. गाय कापून खाण्यासारखेच आपल्या सृष्टीच्या बाबतीत आपण करीत असतो. जंगले कापतो. हे बरोबर नाही.
तर सृष्टीकडे माते समान बघायचे आणि मग चैतन्याकडे कसे बघायचे? चैतन्य आम्हाला अनेक रुपांमध्ये दिसेल . आम्ही म्हणणार की हा 'परमात्मा' आहे. म्हणा. ते म्हणतील 'गॉड' आहे. त्यांचा गॉड येत् नाही. जन्म घेत नाही. आमचा घेतो. काहींचा प्रेषित येतो. पैगंबर येतो. तर ठीक आहे. आमचे काही म्हणणे नाही. तुम्ही मानता नां. तुम्हाला ही आकृती मान्य नाही. नका मानू. पण मला मान्य आहे. त्याला तुमचा विरोध नको. त्याला विरोध असण्याचे काही कारण नाही.
हे चैतन्य मनुष्याला निरनिराळ्या रुपात दिसेल . आणि या चैतन्याची कशी उपासना करायची हे मी ठरवीन. जसे सृष्टीशी कसे बांधुन घ्यायचे हे मी ठरवीन . समाजाशी कसे बंधून घ्यायचे हे मी ठरवीन . मी धर्मशाळा बांधीन , नाहीतर नदीमध्ये उतरण्यसाठी घाट बांधीन . घाटाला संस्कृतमध्ये तीर्थ म्हणतात. म्हणून त्या ठीकाणी जे जल असते त्याला 'तीर्थजल' म्हणतात. समाजाशी कशा रीतीने बांधीन याचे मला स्वातंत्र्य् असले पाहिजे. अमूक रीतीने बांधले म्हणजेच माझी समाजाशी बांधीलकी ठरते असे नाही. अमुक प्रकारे मी पूजा केली किंवा केली नाही म्हणून काही मी सृष्टीशी नाते तोडले असे होत नाही. त्याच प्रमाणे चैतन्याचे जे स्वरुप मला भावले आहे, मला मान्य झालेले आहे त्याचीच मी पूजा करीन . त्यामुळे आमच्याकडे अनेक देवता आल्या आहेत. आलेल्या देवता बदलल्या आहेत. ऋग्वेदामध्ये ज्या देवता आहेत त्या देवतांचे एकही मंदिर नाही. प्रधान देवता इंद्र आहे, मंदिर नाही. दुसरी देवता वरुण आहे, मंदिर नाही. तिसरी अग्नी आहे, मंदिर नाही. आणि ज्यांची मंदिरे आहेत त्यांची ऋग्वेदामध्ये नावेच नाही. शिवाचे नाव नाही. विष्णुचे नांव नाही. काली देवीचा प्रश्नच नाही. गणपतीचे शक्य नाही. मारुती नाही, कृष्ण नाही येणारच नाही. या नविन देवता आलेल्या आहेत. राम्, कृष्ण, हनुमंत , काली, साईबाबा, संतोषी माता. पन्नास वर्षापुर्वी संतोषीमातेचे नांवही माहित नव्हते. पण आता संतोषीमातेची मंदिरे बनली आहेत. शंकराची मंदिरे बनली आहेत. मारुतीचे मंदिर बनले आहे, रामाचे बनले आहे. या धर्माचे हे वैशिष्ठ्य आहे ते लक्षात ठेवले पाहिजे. तर हा जो धर्म आहे. तो व्यक्तीला समाजाशी जोडून ठेवणारा आणि व्यक्ती व समाजाला राष्ट्राशी जोडून ठेवणारा आणि या सगळ्यांना चैतन्याशी जोडून ठेवणारा असा हा धर्म आहे.
पुढच्या भागात सांप्रदायांची विविधता
Comments
??
ही लेखमाला चर्चा करण्याश्या उद्देशाने येत आहे की "पत्रक वाटण्या"च्या उद्देशाने?
पहिल्या भागावर खूप प्रतिसाद आले आहेत त्यावर या मालिकेच्या प्रवर्तकांनी काहीच भाष्य वगैरे केले नाही.
नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)
अपेक्षा
भाष्य वगैरे काही मिळत नसते.
चर्चा करण्याश्या उद्देशाने....?
साहेब, मी लिखाणाचा प्रकार पाहिला त्यात "लेख" म्हणून वर्गीकरण आहे. चर्चा करणे न करणे वाचकांच्या हाती आहे. चेंडू आपल्या अंगणात आहे. लाथ मारायची की नाही
ते तुम्ही आणी मी ठरविणार.
मात्र लेख आवडला. मुदयांशी सहमत होणे न होणे हा वेगळा आणी चर्चेचा विषय आहे.
मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com
हेटाळणी
लाथाळ्या करायला मिळतात तर संधी का सोडावी?
चर्चेला तयार नाहीत त्यांची टवाळी करण्याचा हक्क वाचकांना मिळतो असे वाटते.
भाष्य
लेखकाने विचारलेल्या प्रश्नांवर भाष्य करावे किंवा उत्तरे द्यावीत हे खरेच पण असा नियम नाही किंवा लेखकावर सक्ती नाही.
परंतु, असे न केल्याने लेखांना किंवा लेखकाच्या विचारांना वाचक गांभीर्याने घेत नाहीत हे लेखकांनीही लक्षात घेण्याजोगे आहे.
बाकी पत्रक वाटू लेख वाटला नाही. लेखाशी सहमती-असहमती हा वेगळा मुद्दा आहे.
नेमाड्यांच्या कादंबरीवर लिहिणारे नेमाड्यांचे एजंट्स आहेत असे कोणी म्हटले नाही म्हणजे मिळवली. ह. घ्या.
पत्रक
पत्रक वाटणे म्हणजे कुणाचे तरी म्हणणे ऐकवणे आणि त्यावर काही रिटर्न घेण्याची अपेक्षा/तयारी न ठेवणे. म्हणजे पत्रक वाटणे हा जसा वन वे व्यवहार असतो तसे.
नितिन थत्ते
(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)
अमाप पीक
सध्या उपक्रमावर धर्म, संप्रदाय, साम्प्रदायिकता, हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ, प्लॅसिबो हे एकदम "हॉट्ट्" विषय आहेत.
उपक्रमावर सतत पडीक राहिल्याने हा "प्लॅसिबो इफेक्ट तर नाही ना !" अशी दाट शंका येतेय.
मला येथेही भेट द्या.
http://rajdharma.wordpress.com
जुनाट
पळून गेल्यावर कायद्याला कशाला भेटायचे?
की "कानून के हाथ बहुत लंबे होते हैं|" असे त्याला सूचित करायचे होते?
म्हणजे बावळंच होतं!
बारावीच्या वनस्पतीशास्त्रातील काँक्वेस्ट ऑफ लँड हा भयानक 'वेटेज' असलेल्या भयानक धड्यांचा समूह आठवला. शेवटी मेकॉलेपुत्रांचेच पुस्तक ना!
एका प्येप्रात वाचले होते की तान्ही बाळे रडताना श्वसनमार्गात अडथळा झाल्याचा आवाज काढतात तो अनेकदा खोटा असतो. 'आपल्याकडे आवश्यकतेपेक्षा अधिक लक्ष द्यावे' हा ड्रायविंग फोर्स उत्क्रांतीमुळे टिकून आहे.
मुळात वार (प्लॅसेंटा) हा परजीवच आहे. पुल्लिंगी बाळ असले की परजीवीपणा अधिक उठून दिसतो.
********
पुन्हा पायर्या:
ही पायरी २ आहे.
ही पायरी १ आहे. पायरी २ वरील लोक पायरी १ ला विसरतात यात नवल काय? तसे ते मूळ लेखातही अपेक्षितच आहे. उदा. "हे जे समाजाच्या व्यवस्थेचे चित्र आहे (फॉर्मेट) त्याच्याशी ती बांधिलकी असते. आणि त्याच्यासाठी प्राणाचीही आहुति दिली पाहिजे." म्हणजे पायरी १ वरील लोकांनी पायरी १ च्या अपेक्षांच्या पूर्तीसाठी पायरी ० च्या कर्तव्यांकडे दुर्लक्ष केले तर चालते. हाच नियम वरील पायर्यांवरील लोकही करतात.
उत्तम कीर्तन
कीर्तन हा प्रकार विचारापेक्षा ललित वाङमयाच्या जवळ जात असल्याने उपक्रमावर तो यावा का हा प्रश्न आपण सोडून द्यावा अशी सूचना करतो.
पण प्रश्न असा पडतो, की या कीर्तनात ज्या परोपकारांचा महिमा सांगितला आहे, त्याची कारणं काय? मुळात देशपांडेंना एखाद्या बेशुद्ध व्यक्तीला मदत करावीशी का वाटते? उत्क्रांतीची तत्वं वापरून माणसांच्याच नव्हे तर सर्व प्राण्यांच्या परोपकरी स्वभावाची कारणं देता येतात. सेल्फिश जीन हे पुस्तक पूर्णपणे त्यासाठी वाहिलेलं आहे. आणि त्यात कीर्तनापेक्षा पटण्यासारखी कारणं, विदा वगैरे दिलेला आहे. मग या धार्मिक वृत्तीचा पाया जनुकांत आहे असं म्हणावं लागतं.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
मा गो वैद्यांचे लिखाण
यातील पहिल्या भागातील बराचसा मजकूर मी पूर्वीच वाचला होता. अगदी भिंतीच्या मजुरांच्या उदाहरणासकट. गंमत म्हणजे हे लिखाण मी साधारण २० वर्षांपूर्वी 'आजचा सुधारक' मधे 'मी हिंदू आहे का?' या चर्चेतील प्रतिवादावर लिहिल्याचे आठवते. या चर्चेच्या दरम्यान यावर झालेल्या टीकेला त्यांनी प्रतिसाद दिला की नाही हे आठवत नाही.
मा.गो.वैद्य हे नागपूरच्या तरुण भारतात होते. माडखोलकर संपादक असल्यापासून. त्यांनतर ते संपादक झाले आणि ते वर्तमान्पत्र रास्वस चे मुखपत्रासारखे झाले. मा.गो.वैद्य रास्वसचे बौद्धिक प्रमुख झाले. सरसंघचालक होणार होते अशी वदंता होती.
प्रस्तुत पुस्तक हे त्यांच्या लेख संग्रहांचे संकलन या अर्थाने आले अहे का हे मला माहित नाही. विश्वास कल्याणकर यावर प्रकाश टाकू शकतील. पण वर नमूद केल्याप्रमाणे ते या प्रतिक्रिया वाचतात की नाही यावरच शंका येते.
रास्वसंची एक नीति मी पाहिली होती. एक म्हणजे अधिकृत वाण्ङ्मय फारसे नसणे. (हल्ली त्यांचे असे काही आहे की नाही माहित नाही.) गोळवलकरांची अधिकृत पुस्तके अडचणीची ठरल्यानंतर जवळपास त्यांचे विधार अधिकृत पणे बघायला मिळत नाही. तेही पुस्तक परत छापले जात नाही. याचा एक फायदा म्हणजे टीका झाली की म्हणायचे (ते देखील खाजगीत) हे संघाचे विचार नाहीतच. अशामुळे वादांतून निसटून जाता येते. असाच अनुभव मला अनिरुद्धबापुंच्या लिखाणाचा आला. ते देखील उपलब्ध नाही. (अधिकृत).
यज्ञः असे म्हटले जाते की गीता ही यज्ञसंस्कृतीच्या विरुद्ध होती. मा.गो.वैद्य हे गीतेतील यज्ञाचे दाखले देतात हे पाहून गंमत वाटली.
ज्ञानयज्ञ हा शब्द गीतेत कुठे आला हे जाणून घेण्याची इच्छा आहे. 'त्यागालाच यज्ञ म्हटले आहे' कुठे? कोणी? अशा साध्या प्रश्नांची उत्तरे मिळतील यावर मला शंका आहे.
प्रमोद
प्रतिक्रिया
मी ऐच्छीक निवृत्ति घेतल्यानंतर आपल्या हातुन काही तरी चांगले व्हावे या हेतुने सेवा भारति च्या संपर्कात आलो. मी नागपुरचा असुनही संघाशी माझा कधी संबध आला नाही. लगेच २० व्या वर्षी पोटापाण्याला लागलो व ५३ वर्षे त्यातच रमलो. पुण्याला स्थाईक झाल्यानंतर सामाजिक बांधिलकी च्या भावनेतुन ईशान्या भारतातील सेवा भारति च्या कार्यालयाशी २००८ मध्ये संबध आला तो माझा पहिला संघाशी प्रत्यक्ष संबध. पण तेथे निरनिराळ्या विषयावर पुस्तके वाचायला मिळाली त्यातीलच हि एक पुस्तिका. १९९५ मध्ये ती प्रकाशीत झाली होती. ती मी नागालैण्ड् च्या दिमापुर् कार्यालयात असतांना माझ्या हातात आली व अनेकदा वाचुन काढली. विषय तसा जड पण त्यातिल विचार व भाष्य मला खुप भावले व माझ्या धर्माबद्द्ल च्या संकल्पनेला एक स्वच्छता मिळाली. इतरांनाही याबद्दल सांगावे व याबद्द्ल इतरांचेही काय मत आहे ते जाणुन घ्यावे जेणेकरुन यावर अधिक प्रकाश पडेल या हेतने हे प्रस्तुन केले आहे. मा. गो. वैद्य हे मी नागपुरचा असल्याने मला माहित होते. परंतु त्यांच्याशी संबध कधीच आला नाही. पण ते तरुण भारतात होते आणि त्यांचे संपादकिय मी लहानपणी वाचत असे. त्यावेळी ते मला फार जड जात असे. आजही मला ते पुर्ण् कळते असे नाही. माझा रोल या बाबत केवळ त्यांचे विचार येथे प्रस्तुन करणे इतकाच मर्यादित असल्याने त्यावर प्रतिक्रिया देणे माझ्या अधिकारात आहे असे मला वाटत नाही आणि तेवढी माझी पात्रता आहे असे मला वाटत नाही पण आलेल्या प्रतिक्रिया मात्र मी जिज्ञासेने वाचत आहे हे नक्की.
विश्वास कल्याणकर
प्रतिसाद
तुमचा प्रतिसाद वाचून बरे वाटले.
विषय तसा जड पण त्यातिल विचार व भाष्य मला खुप भावले व माझ्या धर्माबद्द्ल च्या संकल्पनेला एक स्वच्छता मिळाली.
माझा रोल या बाबत केवळ त्यांचे विचार येथे प्रस्तुन करणे इतकाच मर्यादित असल्याने त्यावर प्रतिक्रिया देणे माझ्या अधिकारात आहे असे मला वाटत नाही आणि तेवढी माझी पात्रता आहे असे मला वाटत नाही
तुम्हाला सगळे भावले हीच तुमची पात्रता असे मी समजतो. याचे कारण तुम्ही वेगळे आणि मागोवै वेगळे. तुम्ही स्वतंत्र विचार केला आणि त्यांचे लिखाण वाचले तुम्हाला भावले. आता प्रतिक्रिया उलट्या आल्या. त्यातील काय भावले काय नाही हे कळण्यास आम्ही उत्सुक आहोत.
प्रमोद