पुण्याच्या पाणीपुरवठ्याचे गौडबंगाल

अलीकडे जवळ जवळ प्रत्येक वर्षी, जून किंवा जुलै महिन्यांत, पुण्याच्या पाणी पुरवठ्यामधे कपात होणार अशी बातमी कधीतरी हमखास प्रसृत केली जाते. पुण्यातले लोक कसे जास्त पाणी वापरतात, पाण्याची कशी नासाडी करतात वगैरे विषय मग मोठ्या चवीने चर्चिले जातात. मग एकदम अचानक पाऊस बरसू लागतो. तो इतका बरसतो की अगदी नकोसा होऊ लागतो. हा असा पाऊस, आठ दहा दिवस जरी बरसला तरी पुण्याला पाणी पुरवठा करणारी धरणे केंव्हाच पूर्ण भरतात. इतकेच नाही तर जादा पाणी नदीत सोडायला सुरवात होते व नदीला पूर येतो. पाणी कपातीची चर्चा, पुढच्या वर्षीच्या जून-जुलै पर्यंत, केंव्हाच बासनात बांधून ठेवली जाते. हे असे अनेक वर्षे मी बघतो आहे. मी लहान असताना पिण्याचे पाणी साठवण्यासाठी फक्त खडकवासल्याचे धरण होते. नंतर पानशेतचे झाले. ते 1961 मधे फुटले. त्यानंतर किमान 3 आठवडे तरी पुण्यात नळांना पाणीच नव्हते. परंतु पुण्याने त्याही परिस्थितीत मार्ग काढला. पानशेत धरण परत बांधले गेले. त्यानंतर त्याच्या शेजारीच वरसगावचे धरण झाले. ही दोन्ही धरणे कोणत्याही मापदंडाने खरोखरच विशाल आहेत यात शंकाच नाही. या नंतर टेमघरचे धरण झाले. मागच्याच वर्षी या टेमघर धरणाची उंची वाढवण्यात आली आहे. एवढी जलसंपत्ती पुण्यासाठी राखीव असताना ही पाणी कपातीची घोषणा दर वर्षी का करावी लागते? आहे ते पाणी पुरवून का वापरले जात नाही? असे प्रश्न सगळ्यांनाच पडतात. परंतु समाधानकारक उत्तर कोणीच देऊ शकत नाही.
काही जण म्हणतात की पुण्याची लोकसंख्या वाढल्यामुळे असे झाले. प्रथमदर्शी तरी हा मुद्दा योग्य असावा असे वाटते.
पुण्याच्या पाण्याचे हे गौडबंगाल तरी काय आहे? हे शोधून काढण्यासाठी मी आंतरजालावर शोध घेतला. त्यात जी माहिती मला मिळाली ती मोठी रोचक आहे.
पुण्याजवळच्या धरणांची उपयुक्त पाणी साठवण्याची क्षमता अशी आहे.

खडकवासला- 1.97 TMC (थाउजंड मिलियन क्यूबिक फूट)

पानशेत - 10.65 TMC
वरसगांव- 12.82 TMC
टेमघर- 10 TMC + 1.5 TMC
या सगळ्या उपयुक्त पाणी साठ्याची बेरीज केली तर एकूण क्षमता येते 36.94 TMC.
इ.स. 1950 मधे, म्हणजे पानशेत धरण पूर्ण होण्याअगोदर, पुण्याची लोकसंख्या होती अंदाजे 6 लाख. म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी 0.33 TMC एवढी क्षमता उपलब्ध होती. आता पुण्याची लोकसंख्या अंदाजे 46 लाख आहे म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी आता 0.80 TMC एवढी क्षमता उपलब्ध आहे. या आंकड्यावरून एक गोष्ट तर नक्कीच सांगता येते की पुण्याची लोकसंख्या वाढल्यामुळे पाण्याची टंचाई होते आहे या मुद्यात काही दम नाही कारण प्रत्येक व्यक्तीसाठी उपलब्ध पाणी 1950 च्या मानाने अडीच पट तरी वाढले आहे. यावर असे म्हणता येईल की पाण्याची ही क्षमता असली तरी प्रत्यक्ष उपलब्ध पाणी किती होते? ते कदाचित कमी असेल. अगदी मागच्याच वर्षाचे उदाहरण घेऊ. मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत सर्व धरणे पूर्ण भरलेली होती म्हणजेच 9 महिन्यांपूर्वी 37 TMC पाणी उपलब्ध होते. आजचा धरणांच्यातला साठा फक्त 1.3 TMC एवढाच आहे. म्हणजे पुणेकरांनी 35.7 TMC पाणी वापरले का? असे असले तर पुणेकर पाण्याची प्रचंड नासाडी करतात असे म्हणणे योग्य ठरावे. परंतु पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणते की ते इरिगेशन खात्याकडून वर्षाला फक्त 14 TMC पाणी उचलते म्हणजे ऑक्टोबर 09 मधे उपलब्ध असलेल्या 37 TMC पाण्यापैकी, 9 महिन्यात पुणे कॉर्पोरेशनने अंदाजे 10.5 TMC पाणी( 14/12*9) फक्त उचलले असणार.
याचा स्पष्ट अर्थ होतो की इरिगेशन खात्याने गेल्या 9 महिन्यात 26.5 TMC पाणी दुसर्‍या कोणत्या तरी उपयोगासाठी पुरवले आहे.
आता या गौडबंगालाचे थोडे फार स्वरूप तुमच्या लक्षात येऊ लागले असेलच. हे पाणी जाते कुठे? याचे उत्तर सोपे आहे. इरिगेशन खाते हे पाणी पुण्याच्या Downstream तालुक्यांमधल्या शेतजमिनींना व इतर उद्योगांना पुरवते आहे. आता हे Downstream तालुके कोणते तर पुरंदर, दौंड, बारामती व इंदापूर. यापैकी पुरंदर तालुक्यात भाटगर व वीर ही दोन धरणे आहेत. इंदापूर जवळ उजनीचे महाविशाल धरण आहे. या उजनी धरणातून इंदापूर, बारामती व दौंड या तालुक्यातल्या शेतजमिनींना पाणी पुरवठा करण्याची कल्पना होती. परंतु उजनीचे पाणी विषारी बनले आहे. ते शेतांना दिले तर शेते पिके जळून जातील अशी भिती वाटत असल्याने शेतकरी हे पाणी उचलायला नकार देत आहेत. मग आता त्याच्यावर मार्ग कोणता? तर पुण्याजवळच्या धरणांचे पाणी या तालुक्यांना द्यायचे. बारामतीजवळ आता अनेक दूध व फळे यावर प्रक्रिया करणारे कारखाने उभे राहिले आहेत. डिस्टिलरी उभ्या राहिल्या आहेत. या कारखान्यांना चांगले व शुद्ध पाणी सतत लागते. हे पाणी कोठून आणायचे? अर्थातच पुण्याजवळच्या धरणांच्यातून.
मी जर इरिगेशन खात्याचा मुख्य अभियंता असतो तर मी काय केले असते? असा प्रश्न मला पडला. मी गेल्या ऑक्टोबर मधे जेंव्हा धरणे पूर्ण भरलेली होती त्यावेळी असे ठरवले असते की पुण्याला लागणारे 14 TMC पाणी मी राखीव ठेवून बाकीचे 23 TMC पाणी शेतजमिनी, प्रक्रिया कारखाने यांना पुरवायचे. कदाचित जे कोणी सध्या या पदावर असतील त्यांनीही असा विचार केला असल्याची शक्यता आहेच. मग माशी कुठे शिंकली? 9 महिन्यात फक्त 10.5 TMC पाणी उपयोगात आणल्याबरोबर पुण्याला पाणी टंचाई कशी भासू लागली? अर्थ स्पष्ट आहे. बोलविता धनी कोणी निराळाच आहे. त्याला पुण्याला पाणी मिळेल की नाही यापेक्षा Downstream उपभोक्त्यांची जास्त काळजी आहे.
पाऊस जून-जुलै मधे पडेलच तेंव्हा धरणे परत भरतीलच! मग पुण्याला भरपूर पाणी मिळेलच! पुणेकरांची काळजी आधीपासून कशाला करत बसायची.
जर पाऊस नाहीच पडला बघू. 1961 सालासारखा, पुणेकर सामना करतीलच पाणी कपातीचा!

20 जुलै 2010

लेखनविषय: दुवे:

Comments

धन्यवाद

चांगली आकडेवारी आणि युक्तिवाद.

काहि प्रश्न पुणेकरांसाठी

पुढील प्रश्नांच्या उत्तरातून कदाचित चर्चेला दिशा मिळु शकेल
१. ही सगळी धरणे फक्त पुण्याला पुरवठा करतात का?
२. ह्या धरणातून फक्त राहत्या जागांनाच पाणी मिळते का? माझ्या मते तसे नसावे रहाती घरे, दुकाने, हॉटेले, गॅरेज्, कारखाने, शेती अश्या अनेक बाबींसाठी हे पाणी लागावे. यातील शेती व राहती घरे सोडल्यास बाकी गोष्टी पेशवाईत नसाव्यात (असल्या तरी सध्याच्या प्रमाणात) असे वाटते.
३. पुण्यात पाण्याचा माफिया कितपत प्रभावी आहे?
४. पुण्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकांना किती वेळ आहे?
५. पुण्यात पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरच्या जाहिराती अचानक अधिक दिसु लागल्यात का?

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

२५% पाणी वाफ होते.

चंद्रशेखर, तुम्ही दिलेले स्ट्याट विचारात टाकणारे आहे. नॉऊ थिस इज कॉल्ड अ पॉइंट फॉर डिस्कशन.
ऋषिकेशने काही पॉइंटर्स दिलेले आहेतच. त्या यादीत निसर्गही टाकू या- इव्ह्यापोरेशन लॉसेस धरायला हवेत. माझ्यामते जवळपास २५% पाणी वाफ होते.

मी पाणी संधारण प्रक्रियेचा कट्टर पुरस्कर्ता आहे. त्यामुळे पाणी जमीनीत साठून राहते, ह्याच कल्पनेमुळे मी माझ्या धाग्यावर पाणीवाहीनीला मुद्दाम छीद्रे पाडून पाणी जमीनीत मुरवायला बजावलेले आहे. अशा रीतीने संपऊर्ण गावाला, शहराला संतत पाणी पंपत काढता येईल.

शुद्धीपत्र

माझ्या लेखात टेमघर धरणाची क्षमता 1.5 च्या ऐवजी चुकून 10 पडली आहे त्यामुळे पुढचे आकडे बदलतात.

त्यामुळे सुधारित पॅराग्राफ असा वाचावा.
टेमघर- 1.5 TMC + 1.5 TMC

या सगळ्या उपयुक्त पाणी साठ्याची बेरीज केली तर एकूण क्षमता येते 28.5 TMC.

इ.स. 1950 मधे, म्हणजे पानशेत धरण पूर्ण होण्याअगोदर, पुण्याची लोकसंख्या होती अंदाजे 6 लाख. म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी 0.33 TMC एवढी क्षमता उपलब्ध होती. आता पुण्याची लोकसंख्या अंदाजे 46 लाख आहे म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी आता 0.62 TMC एवढी क्षमता उपलब्ध आहे. या आंकड्यावरून एक गोष्ट तर नक्कीच सांगता येते की पुण्याची लोकसंख्या वाढल्यामुळे पाण्याची टंचाई होते आहे या मुद्यात काही दम नाही कारण प्रत्येक व्यक्तीसाठी उपलब्ध पाणी 1950 च्या मानाने दोन पट तरी वाढले आहे. यावर असे म्हणता येईल की पाण्याची ही क्षमता असली तरी प्रत्यक्ष उपलब्ध पाणी किती होते? ते कदाचित कमी असेल. अगदी मागच्याच वर्षाचे उदाहरण घेऊ. मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत सर्व धरणे पूर्ण भरलेली होती म्हणजेच 9 महिन्यांपूर्वी 28.5 TMC पाणी उपलब्ध होते. आजचा धरणांच्यातला साठा फक्त 1.3 TMC एवढाच आहे. म्हणजे पुणेकरांनी 27.2 TMC पाणी वापरले का? असे असले तर पुणेकर पाण्याची प्रचंड नासाडी करतात असे म्हणणे योग्य ठरावे. परंतु पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणते की ते इरिगेशन खात्याकडून वर्षाला फक्त 14 TMC पाणी उचलते म्हणजे ऑक्टोबर 09 मधे उपलब्ध असलेल्या 28.5 TMC पाण्यापैकी, 9 महिन्यात पुणे कॉर्पोरेशनने अंदाजे 10.5 TMC पाणी( 14/12*9) फक्त उचलले असणार. याचा स्पष्ट अर्थ होतो की इरिगेशन खात्याने गेल्या 9 महिन्यात 18 TMC पाणी दुसर्‍या कोणत्या तरी उपयोगासाठी पुरवले आहे.

अर्थात आकडे बदलले असले तरी मूळ मुद्दा तोच राहतो हे लक्षात घेतले पाहिजे.

चन्द्रशेखर

'धरणाची क्षमता कागदोपत्री? '

पण आता कालांतराने त्यात गाळ साठून ती (बरीच) कमीही होउ शकते ना. मग आकडे आणि मोजदाद बदलेल.
त्याचप्रमाणे पाईपमधून होणारा पाण्याचा अपव्यय (साधारण १०% असावा ?: अंदाजपंचे) तोही समाविष्ट करावा लागेल.

अर्थात 'बारामती' वगैरे तालुक्यात् 'हितसंबंध' असणे अगदी सहज् शक्य आहे.

मुळात वरसगांव आणि टेमघर ही धरणे पिण्यासाठी नव्हतीच

श्री. शरद पवार यांच्या एका भाषणात ऐकल्यानुसार पानशेत आणि खडकवासला वगळता इतर धरणे ही पुणेकरांच्या वापरासाठी किंवा पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून मुळातच बांधण्यात आली नव्हती. पुणे परिसरातल्या व तुम्ही downstream म्हणता त्या परिसरातल्या जलसिंचनासाठी हे प्रकल्प होते. पानशेत व नंतर खडकवासला या दोन धरणांमधून पुण्याच्या पाणीवापराचा प्रश्न सुटेल असे वाटते होते. मात्र पुण्याच्या गेल्या दशकांमध्ये झालेल्या बेसुमार लोकसंख्य़ावाढीमुळे हे शेतीच्या वापरासाठीचे पाणी पुण्यासाठी व पिण्यासाठी वापरावे लागत आहे. त्यामुळे पुणेकरांचा या धरणांवर पहिला हक्क आहे हा मुद्दा न पटण्यासारखा आहे.

(पुण्याला पाणीपुरवठा करणारी सध्या 5 धरणे आहेत. पाचवे धरण मला आठवत नाही. पिंपरी चिंचवडला पवना धरणातून पाणीपुरवठा होतो.)

चू.भू.द्या.घ्या.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

आजानुकर्ण यांच्या प्रतिसादाशी सहमत....

मुळात खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही चार धरणे फक्त पुणे शहरासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी बांधली नव्हती. ती सर्व धरणे इरिगेशन प्रोजेक्ट आहेत. (खडकवासला धरणावर काही वर्षे पुर्वीपर्यंत तरी सिंचन प्रदेश दाखवणारा नकाशा देखील होता. अन्य धरणे खडकवासला धरणाचे फीडर प्रोजेक्टस आहेत. खडकवासला धरण देखील उजनीचा फीडर प्रोजेक्ट आहे.) त्यामुळे खडकवासला धरणाच्या पाणीपुरवठ्यावर् पुणे शहराचा प्राधान्यक्रमाने हक्क नाही. त्याच्यावर महाराष्ट्रातील सखल भाग तसेच कर्नाटकाचा भीमा बेसीनमधील भाग यांचाही हक्क आहे. खडकवासला व अन्य धरणांचे पाणी त्यामुळे डाऊनस्ट्रीम भागांसाठी सोडणे क्रमप्राप्त आहे. पाणी वाटप करारानुसार कर्नाटकसाठी भीमा बेसीनमधुन जे पाणी द्यावे लागते ते बव्हंशी पावसाळ्यातच नदीत सोडले जाते.

उजनीचे पाणी दौंड, बारामतीला जात नाही. (पुरंदर उपसा योजनेमुळे काही पाणी सासवड तालुक्यात जाते तर उरलेले पाणी सोलापुर जिल्ह्यात जाते. तेथे पाणीप्रदुषणाने गंभीर समस्या उदभवलेल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे. उजनीचे प्रदुषण मुख्यत्वे पुण्यातील प्रक्रिया न केलेले सांडपाणी नदीत् जात् असल्याने झालेले आहे.)

पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येला पाणी जास्त लागते हे सत्य आहेच. परंतु पुण्याला नक्की किती पाणी मिळते हा प्रश्न मनपा व इरिगेशन खात्यामधुन मिळणार्‍या वेगवेगळ्या आकडेवारीमुळे कायमच अनुत्तरीत राहतो. मनपाने पुरविलेले आकडे नेहमीच इरिगेशन खात्याच्या आकडेवारीपेक्षा कमी असतात. यासाठी पुणे मनपाने वॉटर मीटर् बसवण्याचा मुद्दाही गेली कित्येक वर्षे प्रलंबित राहिलेला आहे. बंद नळाशिवाय् पुणे मनपा उघड्या कालव्यातुन बेहिशोबी पाणी घेते हा मुद्दा देखील आहेच. शिवाय पुणे शहरातील पाणी गळती-चोरी याबाबतही कोणतीच् आकडेवारी कधीच समोर येत नाही.

राजकारण्यांना दोष द्यायची एक सवय होऊन गेली आहे

संधी मिळाली की, राजकारण्यांना दोष द्यायची एक सवय होऊन गेली आहे. बारामती कुठे, पुण्यातली ५ धरणे कुठे कशालाच कशाचा पायपोस नाही. बारामतीला अनेक वर्षे जुना कालवा आहे. सध्या वीर धरणातील पाणी बारामतीला मिळते. एम्मायडीशीला उजनी- भिगवणहून पाणी येते.
पुणेकरांनी राजकारण्यांना दोष देण्यापेक्षा स्वतःच्या सवयींकडे लक्ष द्यावे- वाहतूक शिस्त, ओला कचरा- सुका कचरा व्यवस्थापन, पुण्यातील घाणेरडे पाणी प्रक्रिया न करता सोडून देणे, ई.

" alt="">

उजनी धरण

मूळ आराखड्याप्रमाणे उजनी धरणाचे पाणी दौंड. इंदापूर व बारामती तालुक्यांना देणे अपेक्षित होते व त्या साठी माझ्या माहितीप्रमाणे ऍक्वाडक्ट पण बांधलेला आहे. परंतु उजनी धरणाचे पाण्यात मिथेन वायुचे प्रमाण अतिशय वाढले असल्याने ते पाणी वापरण्यास कोणी धजावत नाही. या बाबतीत एक ब्लॉग पोस्ट मी एका वर्षापूर्वी लिहिले होते. ते आपण बघू शकता. उजनीचे पाणी वापरास योग्य नसल्याने सर्व भार पुण्याजवळच्या धरणांच्यावर येतो आहे.
उजनीचे पाणी विषारी होण्यास मुख्यत्वे पुणे महानगरपालिकाच जबाबदार आहे हे ही खरे आहे. सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडल्यामुळे हे घाण पाणी उजनीपर्यंत वाहत जाऊन त्या जलाशयाचे पाणीच विषारी झाले आहे.
माझ्या मूळ लेखात उपस्थित केलेला मुद्दा थोडा वेगळा आहे. ऑक्टोबरमधे धरणे पूर्ण भरलेली असताना पुण्यासाठी एक वर्षाचा राखीव साठा ठेवला असता तर जास्त योग्य झाले असते असे मला वाटते.
मी राजकारणी लोकांवर टीका करतो आहे हे निदान कसे काढण्यात आले आहे हे मला कळले नाही. सध्या मुंबईला पाणी कपात असल्याने पाणी माफियाच्या ऑपरेश न्सबद्दलच्या बातम्या आपण जरूर वाचाव्या.तशी काही शक्यता पुण्यात कशावरून नाही?

चन्द्रशेखर

धरणे बांधली म्हणजे ते पाणी पुणेकरांचे कसे झाले?

"उजनीचे पाणी वापरास योग्य नसल्याने सर्व भार पुण्याजवळच्या धरणांच्यावर येतो आहे."- हाच तो वादग्रस्त मुद्दा. त्यासाठीच तर् मी मुद्दाम ते गुगल म्यापचे चित्र टाकले. त्या चित्रातून् मला उलगडा झाला नाही की, "पुण्याच्या धरणातील"पाणी उजनीच्या लाभा क्षेत्रातील जनतेला कसे देता येईल? खडकवासल्यातून निघ्णार्या कालव्यातून ते दिले जाते का? आणि जर दिले जात असेल तर ते चुकीचे कसे? (हे मला चंद्राबाबू प्रकरण वाटते आहे) धरणे बांधली म्हणजे ते पाणी पुणेकरांचे कसे झाले?

"मी राजकारणी लोकांवर टीका करतो आहे हे निदान कसे काढण्यात आले आहे हे मला कळले नाही."- "बोलावता धनी" म्हणून तुम्ही एक वाईड बॉल टाकला आहे. त्यापेक्षा पुण्यातून सोडले जाणारे घाणेरडे पाणी स्वच्छ करुन पुढे पाठवा.

ते पाणी पुणेकरांचे नव्हतेच

धरणे बांधली म्हणजे ते पाणी पुणेकरांचे कसे झाले

अगदी बरोबर. पुण्याची लोकसंख्या अमाप वाढल्यामुळे या धरणांचे पाणी पुण्याला देण्यास पाटबंधारे खात्याने परवानगी दिली आहे. मुळात ते पाणी पुण्याचे नाही. महाराष्ट्रात पाण्याच्या बाबतीत पुणेकरांनाच कमी तोशीस पडते हेही सर्वज्ञात आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

रोचक

रोचक लेख व आकडेवारी.

पण असाही मुद्दा पटतोय की सर्वच्या सर्व धरणे पुण्याला पाठीपुरवठा करण्यात करारबद्द आहेत की कसे?

तसेच या निमित्ताने एक् प्रश्न उपस्थित करावासा वाटतो की शीतपेये विशेषता त्यातुन 'मिनरल वॉटर' बनवले जाणार्‍या कंपन्यांना कितपत पाणी पुरवठा केला जावा यावर काही निर्बध आहेत का? विशेषता पाणी टंचाई ज्या भागात आहे तिथे काही पाणी वाटपाचा फॉर्म्युला आहे का?

शुद्धिकरण प्रक्रिया न केलेले

शुद्धिकरण प्रक्रिया न केलेले पाणी कोणत्याही नदीत सोडण्यास कायद्याने बंदी आहेच.तरीही ज्याअर्थी उजनी धरणाचे पाणी मिथेन गॅसने भरलेले आहे त्याअर्थी
त्याचा दोष पुण्याच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर येतो. (कारण कोणतेही इतर मोठे शहर भीमेतून उजनीला सांडपाणी सोडत नाही.)
-किंवा- प्रदुषण नियंत्रण मंडळात भ्रष्टाचार चालतो असा त्याचा अर्थ आहे.
पुण्याच्या सांडपाण्यामुळे पुण्याला पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे असे दिसते. हा चक्रव्यूव्ह पुण्यानेच भेदला पाहिजे.
पुण्याच्या नागरीकांनी इतरांना दोष न देता पुण्याच्या सांडपाणी शुद्धीकरण यंत्रणेवर (पर्यायाने पिंचिमनपा + पुमनपा) दबाव आणायला हवा असा याचा अर्थ आहे.

गाळ?

मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत सर्व धरणे पूर्ण भरलेली होती म्हणजेच 9 महिन्यांपूर्वी 37 TMC पाणी उपलब्ध होते.

असू शकेल. पण माझा असा समज झाला आहे की आपल्याकडच्या धरणांमधील गाळाचे प्रमाण वाढले आहे, आणि गाळ नियमितपणे काढला जात नसावा.
याचे कारण एवढेच आहे की दरवेळी पाऊस जरा एकदोन दिवस जोरदार पडला, की धरणातले पाणी सोडून देतात असे पाहिले. हे छायाचित्र (बहुतेक १८ जुलै, २००७), सिंहगड रस्त्याच्या अलिकडच्या राजाराम पुलाच्या बाजूने काढलेले. तेव्हा जुलै महिन्यात काही दिवस पाऊस "लागला" होता, हे खरे आहे, पण तरी इतक्या कमी वेळात पाणी सोडून देण्याची वेळ यावी याचे मला आश्चर्य वाटले होते. पण मला तेव्हा यासंबंधीचा अधिक डेटा मिळू शकला नाही - तेव्हा हा नुसता समजच असू शकतो.

Pune July 18, 2007" alt="">

पडणारा ताण

हे धरणाच्या खालच्या भागातील पुण्याच्या मुख्य शहरातील झोन्स असतात त्यांच्यातील बदल. "वैकुंठ" च्या बाजूच्या या जमिनीला रेसिडेन्शियल झोनमध्ये घातले आहे, हिरव्या रंगाने दर्शवलेल्या खेळण्याच्या मैदानालाही रेसिडेन्शियल झोनमध्ये घातले आहे. धरणातील गाळाच्या प्रमाणाशी याचा काही संबंध नाही, पण शहरातील अतिरिक्त वस्तीचा वाढता ताणही सगळ्या योजनांवर पडत आहे याची ही झलक.

Zone changes - Pune" alt="">

धरणातील पाण्याचा उत्सर्ग

माझ्या माहितीप्रमाणे इतिगेशन खाते पुढे पडणार्‍या पावसाचा अंदाज आला की जुलै महिन्यापासूनच धरणातील पाणी सोडण्यास सुरवात करते. ही पद्धती जुन्या कालापासूनच कार्यरत आहे.

चन्द्रशेखर

हो,

ते खरे आहे.
पण गाळाचे प्रमाण वाढले असल्याने नक्की किती पाण्याचा साठा होऊ शकतो? पाणी सोडावे लागण्याचे कारण पाऊस खूप जास्त पडतो असे नसावे - तर गाळ वाढला असल्याने कपॅसिटी कमी झाली असावी (हे सगळे स्पेक्युलेशन आहे - पुरावे नाहीत). पण एकंदरीत खडकवासला, सेडिमेंटेशन असे सर्च दिल्यास अनेक दुवे येतात, नाशिकमधील "मेरी" ही सरकारी संशोधन यंत्रणा हे काम करते पण दुवे बघता आले नाहीत, कारण व्हायरस येत असल्याची नोंद आली :(

 
^ वर