हिंदू धर्म, वर्णव्यवस्था वगैरे वगैरे

प्रस्तावना -

हजारो वर्षे उलटून गेली, हजारो संकटे येऊन गेली आणि असंख्य राजकीय, सामाजिक स्थित्यंतरेदेखील घडून गेली पण आमच्या हिंदू समाजाचे व्यवच्छेदक लक्षण जे की जातीव्यवस्था ते अजूनही अत्यंत चिवटपणे तग धरुन आहे. प्राप्त परिस्थितीत आमच्या आजच्या भारतीय राष्ट्रास अत्यंत हानिकारक ठरलेल्या आणि हिंदू समाजास न्यूनतः चार सहस्त्र जातींमध्ये विभागणार्‍या या व्यवस्थेच्या उगमाबद्दल, 'Origins of the caste system' या लेखामध्ये मी थोडासा ऊहापोह केला होता. यासंदर्भात आणखीन काही गोष्टी वाचनात आल्या म्हणून या लेखाचा पसारा मांडत आहे.

शेषराव मोरे यांचा लेख आणि माझे काही तर्क -

मोरे यांनी लिहिलेल्या ' हिंदू समाजाच्या सांस्कृतिक ऐक्याचे व राजकीय दास्याचे रहस्य' या लेखातील काही भागाचा सारांश खाली देत आहे. (ज्यांना मूळ लेख हवा असेल त्यांनी तसे कळवावे. माझ्याकडे इ-कॉपी आहे. ) ते लिहितात -

"हिंदू समाज हे मोठे गूढ आहे. समोर अथांग सागर दिसतो नि हाताला मात्र पाणी लागते; तसेच या समाजाचे आहे. समोर प्रचंड हिंदू समाज दिसतो, पण त्याला हात लावला की फ्क्त 'जात' हाती लागते. पाण्याच्या अमर्याद साठ्याला जसे सागर म्हणतात तसेच अगणित जातींच्या समुदायाला हिंदू समाज म्हणतात. या जाती काय आहेत? त्यांचा हिंदू समाज कसा बनला? केव्हा बनला? याचे आम्हाला जे आकळले ते उत्तर पुढीलप्रमाणे आहे. जगातल्या इतर भागांप्रमाणेच भारतातसुद्धा मानवसमूह टोळ्याटोळ्यांनी राहात होते. बाहेरुन भारतात टोळ्याटोळ्यांनी येत होते. या प्रत्येक टोळीला स्वतःचे असे नाव होते, नीतीनियम होते, टोळीधर्म होते, प्रथा-परंपरा होत्या आणि स्वतःचे असे वेगळे देवसुद्धा होते. आपल्या टोळीतील नियम टोळीतील धुरीण ठरवत असत. टोळी हे एक प्रकारचे राष्ट्रच होते. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा लोकांना स्वतःच्या टोळीचा अभिमान अधिक वाटत असे. याचेच पुढे जात्यभिमानात रुपांतर झाले. अर्थात या टोळ्यांच्या जाती होण्याआधी अनेक प्रक्रिया घडल्या. एका टोळीच्या अनेक कारणांनी अनेक उपटोळ्या बनत गेल्या. त्यातील काही कारणे अशी: एखाद्याने इतर टोळी सदस्याशी विवाह केला तर त्याची वेगळी टोळी बनत असे. टोळीनियम मोडल्यास तो सदस्य बहिष्कृत होऊन त्याची वेगळी टोळी बनत असे. स्थलांतर करुन काही सदस्य अन्यत्र गेल्यास त्याची वेगळी टोळी बनत असे. संघर्ष, सत्तेचे राजकारण किंवा सदस्यांनी वेगवेगळा व्यवसाय केल्यामुळेसुद्धा वेगवेगळ्या टोळ्या बनत असत. थोडक्यात, टोळीसंस्था ही जातिसंस्थेची मातृसंस्था होती. 'स्वतःचे काही वेगळे आणि सर्वांचे मिळून काही समान' असा समाज जगात इतर कुठेच निर्माण झाला नाही कारण तिथे सर्वांना एकाच सूत्रात बांधणारे, सामावून घेणारे, समान नीतिनियम आणि चालीरिती प्रदान करणारे किंबहुना जबरदस्तीने लादणारे ख्रिश्चन, मुसलमान यांसारखे धर्म निर्माण झाले. इस्लामने जुने सगळे अज्ञात काळातील समजून बाद ठरवले. 'काही जुने पाळा, काही नवे घ्या. काही दुसर्‍याचे पाळा, काही आपले घ्या' हा प्रकार इस्लामने बंद केला. आपले तेवढे सत्य, बाकी सगळेच अयोग्य व नष्ट करण्यास पात्र ठरवले. ( 'आजही मुसलमान स्वतःचे तेच खरे, इस्लामच खरा असेच मानतात. कोणी कितीही आपटली तरी सत्य कसे बदलणार? अर्थात हे माझे स्वतःचे मत आहे, मोरे यांनी लिहिलेले नाही याची नोंद घ्यावी. ) मूळचा टोळीस्वरुप मुस्लिम समाज आता विश्वमुस्लिम बंधुभाव मानू लागला. पण असे भारतात घडू शकले नाही. येथे टोळ्यांच्या संख्येएवढे धर्म होते. परिणामतः टोळीव्यवस्थेचे जातीव्यवस्थेत रुपांतर झाले. कडव्या धर्मसमाजात झाले नाही. " हे सगळेच्या सगळेच विवेचन पटण्यासारखे आहे, रुचण्यासारखे आहे. जे पटत नाही, रुचत नाही, तर्कदुष्ट वाटते त्याचादेखील सारांश पुढे देत आहे. ते का पटत नाही त्याचे कारणांसहित स्पष्टीकरण मी करेनच. पण त्यापूर्वी तो न पटणारा सारांश एकदा नजरेखालून जाणे आवश्यक आहे. तो पुढीलमाणे आहे -

विस्कळीतपणे पसरलेल्या या टोळीस्वरुप समाजाला एकजीव करण्यासाठी तत्कालीन भारतीय धर्मधुरीणांनी ( यांनाच काहीजण ऋषीमुनी असेही म्हणतात असेही ते लिहितात. ) वेगवेगळे उपाय योजले. प्रत्येक टोळीचा स्वतंत्र देव होता. याचीच अतिशयोक्ती करुन पुढे म्हटले की हिंदूंचे ३३ कोटी देव आहेत. मुळात ईश्वर एकच आहे, आपण मानतो ते सगळे देव ही त्याचीच रुपे होत. म्हणून तुम्ही तुमचे स्वतंत्र टोळीदेवही माना आणि एकच ईश्वरही माना. आपल्या अनुयायांची एवढी सोय केल्यामुळे हिंदूंमध्ये धार्मिक सहिष्णुतेचा पाया घातला गेला. सांस्कृतिक ऐक्यासाठी योजलेला हा पहिला उपाय होता. वास्तवातील अनेक टोळ्यांचा वा जातींचा एक समाज बनावा म्हणून त्या धुरीणांनी चातुर्वर्ण्याचा सिद्धांत मांडला. सगळ्या जाती या एका मोठ्या समाजाचे अविभाज्य अंग आहेत हे ठसवण्यासाठी समाजपुरुषाची कल्पना पुढे आली. ब्राम्हण मुखातून, क्षत्रिय बाहूंपासून, वैश्य मांड्यांमधून आणि शूद्र पायांमधून उत्पन्न झाले हे सांगण्यामागे ते सगळे एकाच शरीराच्या अवयवांप्रमाणे आहेत असे दाखविणे हाच पुरुषसूक्ताचा उद्देश आहे. प्रत्येक टोळीचे चार वर्गांत वर्गीकरण केल्यामुळे एका टोळीतील ब्राम्हणाला दुसर्‍या टोळीतील ब्राम्हणाबद्दल एकात्म भाव निर्माण होणार होता. असाच प्रकार भाषेबाबतही करण्यात आला. भाषातज्ञ 'विश्वनाथ खैरे' यांनी हे सिद्ध केले आहे की तेंव्हाच्या प्रचलित भाषांपासून एक नवीन भाषा (संस्कृत) बनवण्यात आली आणि तीच सर्व भाषांची जननी आहे असा प्रचार करण्यात आला. 'अनेकांकडून एकाकडे' असे सूत्र येथेही अवलंबिण्यात आले. चौथा उपाय म्हणजे सर्वांकरिता श्रद्धास्थान म्हणून व्यक्तींची निवड व ग्रंथांची निर्मिती करण्यात आली. त्यांना सर्व भारतीयांचे श्रद्धास्थान बनविण्यात आले. याच गरजेतून रामायण- महाभारत, राम-कृष्ण, भागवतकथा तयार झाल्या. येथील लोकांना सांस्कृतिक दृष्ट्या एक करण्यासाठी म्हणून आमच्या पूर्वजांनी असे अनेक उपाय योजले. पण त्यांनी या देशातील लोकांना एका राजछत्राखाली आणले नाही. सर्वांची एक सामायिक व केंद्रीय राजशक्ती उभी केली नाही. बाहेरुन वेगवेगळ्या टोळ्या येत होत्या. त्यांच्याशी संघर्षही होत होते. पण त्या टोळ्यांचा आपल्यात समावेश करुन घेण्याची त्यांची पद्धती होती. 'जगा आणि जगू द्या' असे तत्त्वज्ञान त्यांना प्रिय होते. बाहेरुन आलेल्यांना आपण सहजपणे सामावून घेऊ असा त्यांना विश्वास होता. तुम्हीही जगा, आम्हीही जगू, सर्वजण एक समाज म्हणून राहू. ते दुराग्रही नव्हते, समन्वयवादी होते. वगैरे वगैरे वगैरे ...........................

अंडरलाईन केलेला जो दुसरा परिच्छेद आहे त्यावर कोणतेही भाष्य करण्यापूर्वी काही गोष्टी स्पष्ट करतो.

ज्याला 'Aryan migration theory' असे म्हणतात तो आर्य टोळ्यांच्या भारतावर झालेल्या आक्रमणाचा सिद्धांत अत्यंत त्रोटक स्वरुपात इतिहासाच्या क्रमिक पाठ्यपुस्तकांमधून शिकवला जातो. निदान मी शाळेत असताना तरी सातवी किंवा आठवीच्या पुस्तकातून ( नक्की कितवीच्या ते आठवत नाही ) म्हणजे सुमारे १२-१३ वर्षांपूर्वी तरी तो तसा शिकवला जात होता. माझे यासंदर्भातले जे काही तुटपुंजे अवांतर वाचन आहे तेदेखील त्याच दिशेने झालेले असल्यामुळे मी तीच 'theory' गॄहीत धरुन तर्क बांधण्याचा प्रयत्न करतो आहे. मी इतिहास संशोधक नसल्यामुळे या ''theory' चा खरेपणा मी तपासून पाहिलेला नाही. त्यामुळे किंवा इतर काही कारणांमुळे हे तर्क ऐतिहासिक पुराव्यांच्या कसोटीवर पूर्णपणे चुकीचेसुद्धा ठरु शकतील. ( पण अमुक एका पुस्तकात असे लिहिलेले आहे किंवा तमुक इतिहासकाराने असे म्हटले आहे हा काही ऐतिहासिक आधार किंवा पुरावा नव्हे हेदेखील लक्षात ठेवले पाहिजे. ) एवढे स्पष्टीकरण दिल्यानंतर 'शेषराव मोरे' यांच्यासारख्या प्रकांड पंडित आणि विद्वान माणसाने लिहिलेली काही विधाने पटण्यासारखी नाहीत असे म्हणण्याचा प्रमाद मी करु शकतो हे मी गॄहीत धरतो आहे.

विस्कळीतपणे पसरलेल्या भारतीय समाजाला एकजीव करण्यासाठी धर्मधुरीण किंवा ऋषीमुनींनी विविध उपाय योजले हेच मुळात पटण्यासारखे नाही. आज भारत ही एक स्वतंत्र 'Entity' आहे म्हणून आपण सगळ्या भारतीयांमध्ये एकोपा हवा असे म्हणतो. 'महाराष्ट्र', 'हिंदू धर्म' या स्वतंत्र अस्तित्व असलेल्या 'Entities' गृहीत करुन त्याच चालीवर सगळ्या 'मराठी' माणसांमध्ये एकोपा हवा किंवा 'हिंदूंनो संघटित व्हा' अशा आरोळ्या देत असतो. त्या काळी 'हिंदू' असे नाव असलेला कोणताही विशिष्ट धर्म अस्तित्वात नव्हता असे स्वतः मोरे यांनी त्यांच्या याच लेखात लिहून ठेवले आहे. आजच्याप्रमाणे भारत असे नाव असलेला, स्वतंत्र सम्राट किंवा स्वतंत्र सरकार असलेला कोणताही देशसुद्धा त्यावेळेला अस्तित्वात नव्हता हेसुद्धा उघड आहे. ( त्यावेळेला म्हणजे इसवी सनापूर्वी २००० ते ३००० वर्षांपूर्वी. मोरे यांनी कुठेही इसवी सनाचा उल्लेख केलेला नाही. पण ज्याअर्थी त्यांनी पुरुषसूक्ताचा उल्लेख केला आहे त्यावरुन मी हा अंदाज बांधला आहे. जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा.) भौगोलिक सीमारेषा निश्चित नाहीत, एकच विशिष्ट तत्त्वज्ञान सांगणारा, लादणारा धर्म अस्तित्वात नाही अशा परिस्थितीत 'भारतीय समाज' एकजीव व्हावा असे धर्मधुरीणांना वाटण्याचे कोणतेही कारण दिसत नाही. ३३ कोटी देवांची संकल्पना आणि एकेश्वरवाद यांमधील सांधेजोड नक्कीच पटण्यासारखी आहे. पण त्यामागे भारतीयांचे 'सांस्कृतिक ऐक्य' व्हावे असा उदात्त हेतू असेल हे मात्र अजिबातच खरे वाटत वाटत नाही. हिंदू धर्मामध्ये अशा असंख्य संकल्पना अस्तित्वात आहेत. त्या सगळ्या प्रामुख्याने आध्यात्मिक संकल्पना आहेत आणि तेवढीच काय ती त्यांची मर्यादा आहे. ईश्वर अस्तित्वात नाही अशीही संकल्पना हिंदू धर्मास मान्य आहे. ईश्वराच्या अस्तित्वाचे ज्ञान आपणास नाही असे मानणारे अज्ञेयवादीही हिंदूंमध्ये आहेत. या संकल्पनांचा आणि 'सांस्कृतिक ऐक्याचा' काय संबंध आहे ? त्या संकल्पना आणखीन कोणत्या तिसर्‍याच ऐक्यासाठी आहेत ? अखिल भारतीय पातळीवर सांस्कृतिक ऐक्य व्हावे असा प्रयत्न झाला असता तर तसा एखादातरी प्रेषित किंवा धर्मगुरु ज्याने तसे प्रयत्न केले त्याचा उल्लेख आपल्या इतिहासामध्ये आला असता. जसा गौतम बुद्ध किंवा वर्धमान महावीर यांचा उल्लेख त्या त्या विचारांचे प्रेषित म्हणुन येतच असतो. मोरे यांनी ऐक्यवादी लोकांना ऋषीमुनी असे म्हणून एका फटक्यात गुंडाळून टाकलेले आहे. निदान नावानिशी उल्लेख दिले असते तर बरे झाले असते. या एकेश्वरवादाच्या संकल्पनेमुळे हिंदूंमध्ये धार्मिक सहिष्णुतेचा पाया घातला गेला असेदेखील त्यांनी म्हटले आहे. पण मग ही धार्मिक सहिष्णुता केवळ वरिष्ठवर्गीयांपुरतीच मर्यादित होती आणि अस्पृश्यांवर अन्याय करणारी होती याचे कारण काय असावे ? मुळामध्ये पुरुषसूक्ताचा उद्देश चांगला होता, समाजामध्ये एकात्मता निर्माण करण्याच्या दिशेने प्रयत्न करणारा होता, नंतर त्यामध्ये फेरफार झाले, बदल झाले, केले गेले, चुकीचा अर्थ लावला हे म्हणणे एकदा तपासून पाहिले. जर काही खरे असेलच तर ते हे की जे मुळात रचले गेले तेच बर्‍याच अंशी चुकीचे होते, अन्यायकारक होते, वरिष्ठ वर्गीयांचे वर्चस्व प्रस्थापित करणारे होते. आधी सगळे काही छान होते, उदात्त होते, आलबेल होते असे म्हणणे हा सगळा आपल्या श्रद्धाळूपणाचा, सनातनीपणाचा भाग आहे. वर्तमानामध्ये समर्थ, समृद्ध भारत घडवण्यात अपयश आलेलेच आहे. भविष्यात काही सकारात्मक घडेल अशी कोणतीही शक्यता दिसत नाही. म्हणून प्राचीन काळात जी कधी अस्तित्वातच बव्हती अशी एक 'Hypothetical perfect system' आपण गृहीत केली आहे. असे केल्याने फारतर आपल्या मनाचे समाधान होऊ शकेल. परंतु ऐतिहासिक सत्य काय आहे ते मात्र सापडू शकणार नाही. आपली विचार करण्याची दिशा चुकते कारण वर्णव्यवस्था ही एक आदर्श, कोणाचेही हक्क न मारणारी समाजव्यवस्था होती असे गृहीत धरतो. वस्तुस्थिती काहीशी अशी असली पाहिजे.

आर्यांच्या ज्या टोळ्या भारतात स्थलांतर करुन आल्या ते आर्य लोक हे शेती करणारे लोक होते. आर्य या शब्दाचा अर्थच मुळी 'to till' म्हणजे शेती करणे असा आहे असे पंडित नेहरुंनी लिहून ठेवले आहे. ( 'Noble' किंवा उदात्त हा अर्थ त्याला नंतर चिकटला असेही ते म्हणतात. ) 'कृण्वन्तो विश्वमार्यम' अशी गर्जना करणार्‍या, युद्धकलेत निष्णात असणार्‍या, विजीगीषु आणि आक्रमक वृत्तीच्या ह्या लोकांना शेती करण्यासाठी जमीन हवी होती, उपभोग घेण्यासाठी स्त्रिया हव्या होत्या, दूध देणारी जनावरे हवी होती आणि प्रचंड संख्येने गुलाम हवे होते. त्या काळी म्हणजे ख्रिस्तपूर्व २००० च्या आगेमागे जेंव्हा यंत्रांचा शोध लागलेला नव्हता, खतांचा शोध लागलेला नव्हता आणि पीके घेउन निकस झालेली जमीन सकस कशी बनवावी हेदेखील ठाऊक नव्हते त्या काळात लोखंड आणि अग्नी यांच्या साहाय्याने जंगले नष्ट करणे आणि नवनवीन सुपीक जमिनींचा शोध घेणे हा उद्योग करणे त्यांना क्रमप्राप्तच होते. थोडा अंदाज यावा यासाठी 'Origins of the caste system' या लेखातील उतारा जसाच्या तसा येथे उतरवीत आहे.

One of the references over the internet sheds some more light on another aspect of this discussion. It says that use of iron must have played a vital role in these regards. It says that such a connection was first established by famous Mr. D.D. Kosambi. Indo-aryans used to use iron tools in those days. They penetrated into India through north-western mountain passes & over a period of several hundreds of years they spreaded right up to the fertile and densely forested gangetic plains. Nomadic though initially they were, by the time they reached India they had learnt art of the agriculture. Fertile northern plains were waiting for getting farmed. They cut down the jungles using fire & iron axe & cultivated the land using iron ploughs ensuring them an assured food supply. This devastated forest dwellers whose resource base for living was hampered.

The author says =>
Gadgil & Guha quote Iravati karve to the effect.
“They (Brahmins) served as pioneers establishing their outposts in forests & initiating rituals which consumed large quantities of wood & animal fat. Thus, provoked native food gatherers termed demons or rakshasas would attempt to disrupt the holocaust & save their resource base in order to retain the control over their territory. Specialist warriors, Kshatriyas would then rush to the rescue of the Brahmins.
……….Dushyanta combs the forest with the help of hundreds of assistants, killing wild animals with complete abandon. It appears reasonable to conclude that the purpose of this slaughter was to destroy the resource base of hunting & gathering tribes who lived in the forest.”

बाहेरुन भारतामध्ये सातत्याने टोळ्या येत राहिल्या हे तर खरेच आहे. आणि त्यांच्याशी संघर्ष होत होते हेही खरे आहे. पण या टोळ्यांना एकमेकांबद्दल सहानुभूती वाटण्याचे काही कारण नव्हते. आक्रमक आणि स्थानिक यांच्यातल्या सबंधांमध्ये 'जगा आणि जगू द्या' असे तत्त्वज्ञान कसे टिकाव धरेल ? जो वरचढ ठरला त्याने इतरांना गुलाम केले आणि स्वतःच्या पुढच्या पिढ्या मालक आणि गुलामांच्या पुढच्या पिढ्या गुलाम म्हणूनच जगतील याची सोय पाहिली. त्यासाठी सोयीस्कर असे तत्त्वज्ञान बनवले. कदाचित त्याच भावनेतून जो ज्या जातीत जन्माला आला तोच काय तो त्या जातीत राहू शकेल हे तत्त्व अस्तित्वात आले असेल. गुलामांचा, शोषितांचा हा समाज (म्हणजे जे खालच्या जातीतले मानले गेले ते लोक) आणि मालक ( म्हणजे जे स्वतःला उच्चवर्णीय समजत त्या जाती ) यांच्या अनेक पिढ्या गेल्या आणि काळाच्या ओघात या समाजाचे हिंदू धर्मात रुपांतर झाले. हे संक्रमण कसे झाले असेल ? काहीसे असे.

हिंदू धर्म आणि हिंदू राष्ट्रवादाचा उदय -

आज आपण जो हिंदुत्ववाद जागोजाग पाहतो त्याचा उदय इसवी सनाच्या आगेमागे दोन- चार शतकांमध्ये क्रमाक्रमाने झाला असण्याची शक्यता आहे. ख्रिस्तपूर्व दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वी जेंव्हा आर्य टोळ्यांनी भारतावर आक्रमण केले तेंव्हा हा 'हिंदुत्ववाद' किंवा ज्यास 'हिंदू' धर्म म्हणतात तो अस्तित्वात नव्हता हे आधीही सांगून झाले आहे. आर्यांची वैदिक संस्कृती आणि स्थानिक रहिवाशांची द्रविड संस्कृती यांच्या संक्रमणातून या दोन हजार वर्षांमध्ये ज्यास 'हिंदुत्व' म्हणता येईल असा आराखडा तयार झाला असावा. सनपूर्व दुसर्‍या आणि तिसर्‍या शतकामध्ये अ‍ॅलेक्झांडर (ख्रिस्तपूर्व ३२६), सेल्युकस निकेटर (ख्रिस्तपूर्व ३१५), डेमेट्रियस (ख्रिस्तपूर्व २००) आणि मिनॅन्डर (ख्रिस्तपूर्व १८४) या ग्रीक आक्रमकांची आक्रमणे होऊन गेली. पण हे सगळे ज्याला 'highly cultured civilization' म्हणता येईल अशा संस्कृतीचे प्रतिनिधी होते. पण ह्यानंतर सनपूर्व पहिल्या शतकामध्ये आलेले शक, इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये आलेले कुशाण आणि पाचव्या शतकात आलेले हूण या पशूंसारख्या माणसांची जी आक्रमणे झाली त्यांनी सगळा भारत, विशेषतः उत्तर भारत हादरुन गेला. ज्यांच्या पुरुषांप्रमाणे स्त्रिया आणि लहान मुलेसुद्धा घोड्यावर स्वार होत असत अशा या रानटी टोळ्या संख्येने प्रचंड असून त्यांना दिवस रात्रीची तमा नसे. वाटेत येतील ती ती नगरे, ग्रामे उध्वस्त करत, जाळपोळ करत संख्येने प्रचंड असलेल्या ह्या टोळधाडी शत्रूपक्षाचा पराभव झाल्यावर किंचाळत, आरडाओरडा करत, कवट्यांमधून रक्त पीत पीत ही मंडळी विजयोत्सव साजरे करीत. त्यांना विजयापेक्षा विध्वंसाचीच आवड अधिक होती असे सावरकरांनी लिहून ठेवले आहे. ( या आक्रमणांचा समग्र इतिहास ज्यांना वाचायचा असेल त्यांनी 'सहा सोनेरी पाने' हे पुस्तक अवश्य वाचावे. ) या आक्रमणांचा भारतीय मनांवर जबरदस्त परिणाम झाला असावा. आजपर्यंत त्यांनी आक्रमकांना थोपवलं होतं, ठार केलं होतं आणि शेकडो वर्षांच्या कालपटलावर अ‍ॅब्सॉर्ब सुद्धा केलं होतं. पण आता मात्र ते परकीयांबाबत खूपच आक्रमक झाले होते. किंबहुना प्रथा, परंपरा आणि ट्रेंड्ससकट सगळ्याच परकीय गोष्टींबाबत ते आक्रमक बनले होते. असे काहीतरी सिम्बॉलिक जे स्पष्टपणे भारतीयत्वाचे प्रतिनिधित्व करु शकेल आणि परकीयांविरुद्ध लढताना प्रेरणादायी ठरु शकेल अशी गोष्ट त्यावेळेपर्यंत पुरेशी विकसित झाली होती. त्यामुळे ज्यास 'हिंदुत्ववाद' किंवा 'ब्राम्हणवाद' म्हणता येईल असा एक प्रभावी राष्ट्रीय प्रवाह जो जुन्या स्मृती, श्रुती आणि वेद यांच्यातल्या ब्राम्हणी नियमांच्या आधारे पोसला गेला होता तो बदाबदा वाहू लागला. 'हिंदू' हा शब्द जो उघडपणे त्यावेळेच्या राष्ट्रीय धर्माचे प्रतिनिधित्व करत होता तो शब्द त्याला जोडल्या गेलेल्या इतिहास, परंपरा, तत्त्वज्ञान आणि संस्कॄती या घटकांमुळे खोलवर दडलेल्या प्रेरणांना आवाहन करु लागला. पण भारत किंवा आर्यावर्ताचे हिंदुस्थान होत असताना जुनी लवचिकता नष्ट होत चालली होती. टोकाचा राष्ट्रवाद एकटा आला नाही. येताना मनाचा संकुचितपणाही बरोबर घेउन आला. पण या संकुचितपणाचा फटका बसण्याआधी 'हिंदूंचे सुवर्णयुग' किंवा भारताचे सुवर्णयुग अवतरणार होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर गुप्त साम्राज्याचा सूर्य उदयाला आला. वर्ष होते सन ३२०. (त्याविषयी पुन्हा केंव्हातरी)

सरतेशेवटी -

हिंदू धर्मातल्या वर्णव्यवस्थेवर जी टीका होत असते ती बर्‍याच अंशी रास्त असली तरीसुद्धा हेही लक्षात घेतले पाहिजे की वर्णव्यवस्थेपेक्षाही अधिक अन्यायकारक, रानटी प्रथा ख्रिश्चन आणि मुसलमानांच्या धर्मातही अस्तित्वात होत्या. त्यामुळे जेंव्हा कोणत्याही एका धर्माचे लोक स्वतःच्या जाज्वल्य, उज्ज्वल वगैरे इतिहासाचे, परंपरांचे दाखले देतात तेंव्हा त्यात बर्‍याच अंशी अभिनिवेशाचाच भाग अधिक असतो या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे. ह्याचे कारण कदाचित हे आहे की धर्म ही इहलौकिक जीवनामध्ये जबरदस्त ढवळाढवळ करणारी गोष्ट आहे. त्यामुळे भूतकालीन वस्तुस्थितीकडे धार्मिक परंपरा, प्रथा यांच्या चष्म्यातून पाहिले जाते. त्याऐवजी धार्मिक परंपरा, प्रथा यांच्याकडे वस्तुस्थितीच्या चष्म्यातून पाहिले तर बरेच प्रश्न सुटू शकतील. (अशाच दृष्टिकोनातून विचार करत 'नरहर कुरुंदकर' यांनी वर्णव्यवस्था ही व्यवहारात अस्तित्वातच नव्हती फक्त पोथ्यांमध्येच अस्तित्वात होती असा दावा 'शिवरात्र' या पुस्तकात केला आहे.) विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या नव्नव्या वाटा धुंडाळून आपले आणि आपल्या भावी पिढ्यांचे आयुष्य अधिकाधिक प्रसरणशील आणि आधुनिक बनवणे हे प्रत्येक पिढीचे कार्य असते. त्याचप्रमाणे आपली पुरातन मूल्ये, संस्कॄती आणि इतिहास यांचा वस्तुनिष्ठपणे धांडोळा घेणे हेदेखील प्रत्येक पिढीचे कार्य असते. हे करत असताना वृथा अभिमानी वृत्ती किंवा न्यूनगंड या दोन्ही गोष्टी मारक ठरु शकतात. या दोन्ही गोष्टी दूर ठेवून वाचलेल्या माहितीचा स्वतंत्रपणे अर्थ लावण्याचा प्रयत्न मी माझ्या अल्पशा बुद्धीने केला आहे. त्याचा त्याच दृष्टीने विचार व्हावा.

लेखनविषय: दुवे:

Comments

सुपरहिट विषय

मूळचा टोळीस्वरुप मुस्लिम समाज आता विश्वमुस्लिम बंधुभाव मानू लागला. पण असे भारतात घडू शकले नाही. येथे टोळ्यांच्या संख्येएवढे धर्म होते. परिणामतः टोळीव्यवस्थेचे जातीव्यवस्थेत रुपांतर झाले. कडव्या धर्मसमाजात झाले नाही. " हे सगळेच्या सगळेच विवेचन पटण्यासारखे आहे, रुचण्यासारखे आहे.

विवेचन रुचण्याबाबत काही नाही. पण ते का बरे पटण्यासारखे आहे? असे अप्पा म्हणतात की शेषराव? सांगितल्यास बरे होईल. विषय होमिओपॅथीसारखाच सुपरहिट आहे. असो. अधोरेखित भाग वाचताना फार त्रास झाला हो. तिरका केला तरी चालला असता.

अवांतर:
निदान मी शाळेत असताना तरी सातवी किंवा आठवीच्या पुस्तकातून ( नक्की कितवीच्या ते आठवत नाही ) म्हणजे सुमारे १२-१३ वर्षांपूर्वी तरी तो तसा शिकवला जात होता.
अच्छा म्हणजे अप्पा अप्पा नाहीत. पप्पू आहेत.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

काय म्हणता ?

असे अप्पा म्हणतात की शेषराव?
लेख धड वाचलेला दिसत नाही. कोणाला काय् म्हणायचं आहे त्याचा स्पष्ट् उल्लेख केलेला आहे. न वाचता कशाला उगाच पिंका टाकायच्या ?

अधोरेखित भाग वाचताना फार त्रास झाला हो.
वाचावा अशी सक्ती नाही.
लाडवात् साखर कमी पडल्येय त्यामुळे अगोड झालाय. आणि पीठ नीट भाजून घेतलेलं दिसत नाहीये. कच्चा वाटतोय्. आटळ्याला चिकटतोय्.

कळावे,
आपलाच (ठम्मक झाडू )

साला पप्पू फिर फेल हो गया

चिडू नका. मग 'ते लिहितात' नंतर जो मजकूर अधोरेखित केलेला आहे तो कशासाठी? आणि जो केला नाही तो कशासाठी केला नाही.

'हे सगळेच्या सगळेच विवेचन पटण्यासारखे आहे, रुचण्यासारखे आहे. जे पटत नाही, रुचत नाही, तर्कदुष्ट वाटते त्याचादेखील सारांश पुढे देत आहे. ते का पटत नाही त्याचे कारणांसहित स्पष्टीकरण मी करेनच. पण त्यापूर्वी तो न पटणारा सारांश एकदा नजरेखालून जाणे आवश्यक आहे. तो पुढीलमाणे आहे - '
हा मजकूर का बरे अधोरेखित केलेला नाही. काही विशेष कारण आहे काय? अधोरेखित केलेला नसल्यामुळे तो शेषरावांनी लिहिलेला नसून अप्पाने लिहिलेला आहे असाच समज होण्यास मदत होते आहे. आपले लेखन संदिग्ध नसावे ह्याबाबतीत लेखकाने काळजी घ्यायला नको का?

फॉर्म्याटिंग किमान असावे. वाचताना खरेच त्रास होतो. तुम्ही हे दोन भलेमोठे परिच्छेद अधोरेखित केलेले आहेत. २-३ असत्या तर गोष्ट वेगळी. असो. ते जाऊ द्या. तुम्ही मूळ प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही. असे अप्पा म्हणतात की शेषराव?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

धम्मक लाडू,

ते लिहितात नंतर जे अधोरेखित केलं आहे ते मोरे यांनी लिहिलेलं आहे.
'हे सगळेच्या सगळेच विवेचन पटण्यासारखे आहे, रुचण्यासारखे आहे. जे पटत नाही, रुचत नाही, तर्कदुष्ट वाटते त्याचादेखील सारांश पुढे देत आहे. ते का पटत नाही त्याचे कारणांसहित स्पष्टीकरण मी करेनच. पण त्यापूर्वी तो न पटणारा सारांश एकदा नजरेखालून जाणे आवश्यक आहे. तो पुढीलमाणे आहे - '
- हे वाक्य मी म्हणजे सौरभ/अप्पा ने लिहिलेलं आहे. मला वाटतं हा कॉमन सेन्स आहे. आणि ते सरळ सरळ लक्षातही येतंय.

फॉर्म्याटिंग किमान असावे. वाचताना खरेच त्रास होतो. तुम्ही हे दोन भलेमोठे परिच्छेद अधोरेखित केलेले आहेत.
सहमत. पुढच्या वेळेला काळजी घेईन.

आपले लेखन संदिग्ध नसावे ह्याबाबतीत लेखकाने काळजी घ्यायला नको का?
+१.
मी लिहिलंय ते चुकीचं असू शकेल. संदिग्ध आहे असं अजिबात वाटत नाहीये.

काल-सापेक्ष

प्रत्येक समाज व्यवस्था हि काल-सापेक्ष असते, किंबहुना प्रत्येक विचार किवा कल्पना हि काल-सापेक्ष असू शकते.
काळाप्रमाणे बदल करणे हे मनुष्याच्या हिताचे आणि योग्य हि आहे.
केवळ व्यवस्थेचे चटके बसतात म्हणून ती चुकीची आहे असे मानणे हे अयोग्य आहे, तीमध्ये योग्य तो बदल करण्यासाठी प्रयत्न करणे हि सृजनशीलता आहे.
एक उदाहरण देतो - टिळकांनी गणेशोत्सव चालू केला समाजप्रबोधानासाठी, पण त्याचे आजचे स्वरूप पाहता टिळकांना दोष देणे अयोग्य आहे. ???

म्हणूनच

केवळ व्यवस्थेचे चटके बसतात म्हणून ती चुकीची आहे असे मानणे हे अयोग्य आहे, तीमध्ये योग्य तो बदल करण्यासाठी प्रयत्न करणे हि सृजनशीलता आहे.

+१.

प्रत्येक समाज व्यवस्था हि काल-सापेक्ष असते, किंबहुना प्रत्येक विचार किवा कल्पना हि काल-सापेक्ष असू शकते.
+१. म्हणूनच ती व्यवस्था त्या काळात कशी असेल याचा केवळ तर्क करता येउ शकेल.

आधि मराठि बाणा मग हिन्दुत्व

हिन्दु धर्म हा जगातिल सर्वात जुना धर्म आहे. कोणतिहि जुनी सन्स्क्रुति हि एकतर नामशेष होत असते अथवा नव्या बदलाशी अनुकुलन करुन नविन रूप् धारण करुन नव्या बदलान्शी जुळवुन घेण्याचा प्रयत्न करत असते. अपवाद फक्त मुस्लिम व ख्रिश्चन यान्चा. या धर्मसन्स्क्रुतिन्नि हिन्दु विशेशत भारतिय सन्स्क्रुतिन्वर अनेक हल्ले करुन आपली वर्णव्यवस्था व प्रथा, परम्परा खिळखिळ्या करुन सोडल्या. त्यामुळे खडबडुन जागे झालेल्या आपल्या सन्स्क्रुतिमध्ये एक प्रकारचे स्फुल्लिन्ग पेटले आणि त्यामुळेच हिन्दु धर्मात खरि एकि दिसुन येउ लागलि.

जसे महाराश्ट्र निर्मिति नन्तर, मराठि लोकान्मधे विशेष असे एकिकरण होत नव्ह्ते. परन्तु परप्रान्तियान्चा विळखा जसजसा मोठा होत गेला, तसतसे मराठि एकिकरण (राजकियद्रुष्ट्या का होइना) जोमाने सुरु झाले.

आता तुम्हि म्हणाल कि परप्रान्तिय सुधा हिन्दुच आहेत कि,

त्यावर असे म्हणावे लागेल कि माकडाचा माणुस व्हायला कैक वर्षे गेलि, परन्तु त्या माणसाचि सन्क्रुति निर्माण व्हायला चौपट वर्षे गेलि त्यामुळे सन्स्क्रुतिरक्षण हे त्याचे आद्य करत्य बनले आहे.

बिनबुडाचे

त्यामुळे खडबडुन जागे झालेल्या आपल्या सन्स्क्रुतिमध्ये एक प्रकारचे स्फुल्लिन्ग पेटले आणि त्यामुळेच हिन्दु धर्मात खरि एकि दिसुन येउ लागलि.

हिंदू धर्माच्या व्याख्येत तुम्ही कोणकोणत्या समाजांचा समावेश करता? चातुर्वण्यातील दोन समाज तर उघडपणे ब्राह्मणांचा दुस्वास करतात (आणि ब्राह्मण समाज त्यांचा). वैश्य समाज मराठी लोकांच्यात मला तरी माहिती नाही. शिवाय ओबीसीचा झेंडा वेगळा आणि अनु. जा/ज. चा वेगळा. एकी कुठे दिसते?

परन्तु त्या माणसाचि सन्क्रुति निर्माण व्हायला चौपट वर्षे गेलि त्यामुळे सन्स्क्रुतिरक्षण हे त्याचे आद्य करत्य बनले आहे.

काही आकडे आहेत का?

संपादित.

माझा मराठी बाणा!

'मराठी बाण्याने हिंदुत्व खुलवुया' असा केंद्रभुत विचार असेल, तर पोपटराव यांच्या मुद्द्यांचे काही अंशी मी समर्थन करेन. भारतातील प्रत्येक भाषकांकडे वेग-वेगळी खूबी आहे, चांगल्या गोष्टी आहेत. पण त्यासाठी त्या अगोदर 'मराठी बाणा' म्हणजे काय? व तो किती व कोणत्या बाबतीत संकुचित असावा? कोणत्या बाबतीत व्यापक असावा? हे शांत डोक्याने ठरवले गेले पाहिजे.

मी इंदूरला कामानिमित्त सहा महिने खाजगी गेस्ट हाऊसवर रहात असताना, माझ्या शेजारील बिहारी तरूण विद्द्यार्थ्याने मला 'मोठा भाऊ' म्हणत मला लहान भावाप्रमाणे प्रेम केले होते. त्याच्या हातचे मालपोहे मी खाल्लेले आहेत. ते मी कधीही विसरणार नाही. सांगायचा मुद्दा हा की, बिहारी लोक गरीब जरी असली तरी प्रेमळ असतात. फरक परिस्थितीमुळे घडत असतो. त्यासाठी इतरांना तुच्छ लेखण्याची गरज नाही, व तशी स्वत:ला सवय ही लावून घेवू नये.

संस्कॄती

पोपटराव, संस्कृतीचे रक्षण म्हणजे नक्की काय करायचे ? कोणतीही आधुनिक संस्कॄती ही जुन्या परंपरा, श्रद्धा क्रमाक्रमाने उध्वस्त करतच विकसित होते. हे तुम्हाला मान्य आहे काय?

दुवा मिळेल का?

'Origins of the caste system' या लेखामध्ये मी थोडासा ऊहापोह केला होता.

याचा दुवा मिळेल का?
प्रमोद

हा घ्या दुवा

मी हजर आहे.

अप्पा,
मला चर्चेत भाग घ्यायचाय पण मला लेख समजला नाही. तुम्हाला नेमके काय सांगायचे तेही समजले नाही.
नावातच 'वैगरे,वैगरे' असे का लिहीले?

निवांत

मला चर्चेत भाग घ्यायचाय पण मला लेख समजला नाही. तुम्हाला नेमके काय सांगायचे तेही समजले नाही.

मला जितकं सोपं लिहिता आलं तितकं लिहिलं आहे. मला वाटतं एकदा निवांतपणे बैठक मारा आणि वाचा म्हणजे कळेल.

हो लेख पुन्हा वाचला, पण....!

सौरभ जोगळेकर,
मी आपल्या आदेशाप्रमाणे बैठक मारली पण तरीही नाही कळले. मी नुकताच एक लेख वाचण्यास ठेवला आहे. त्यावर आपले विचार, मते कळवावीत.

हिन्दु सन्स्क्ऋती

जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते
पहा नव्या पिढि समोर ठेवा; त्यानी निवड केल्यावर चर्चा केलेली अधिक उपयुक्त होइल. कसे???
रज

जे जे

जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते
पहा नव्या पिढि समोर ठेवा; त्यानी निवड केल्यावर चर्चा केलेली अधिक उपयुक्त होइल. कसे???

मी नव्या पिढीतलाच आहे. पंचवीस् म्हणजे नविन पिढीच असं गॄहीत धरतोय्.
भारतीय इतिहासात शिवाजी आहे, चंद्रगुप्त आहे, विक्रमादित्य आहे, भास्कराचार्य आहे. त्यांचा जरुर अभिमान् बाळगावा. पण् जे गचाळ आहे, गलिच्छ आहे, ज्या घटकांनी अस्पृश्यतेच्या,गुलामगिरीच्या, अन्यायमूलक,कूपमंडूक प्रथा निर्माण केल्या. त्यांचा अभिमान बाळगावा याचे मला तरी कोणतेही कारण दिसत नाही. चांगल्यास ठणठणीतपणे चांगले म्हणावे आणि वाईटास ठणठणीतपणे वाईट म्हणावे.चिकित्सा त्यालाच म्हणतात.

कालपासून

कालपासून मी इथे प्रतिसाद देण्यासाठी झगडतो आहे. लॉग्-इन् व्यवस्थित व्हायच पण लॉग्-इन् केल्यावर् ज्या फॅसलिटीज् मिळतात् त्या मिळत नव्हत्या. म्हणजे प्रतिसाद देण्यासाठी विंडो येत नव्हती, फक्त हजर् सदस्यांमध्ये नाव यायचं. (याचा अर्थ नवा सेशन् तर् क्रीएट होतो आहे.) कंटाळून नविन आयडी बनवला.(आधी 'अप्पाजोगळेकर्' होता. नविन आयडी - अप्पाजोगळेकर) साहाय्य मध्ये असा एखादा मेल- आयडी दिलेला नाही की जिथे याविषयी तक्रार करता येईल्. संपादक मंडळाने नोंद् घ्यावी अशी विनंती आहे.

अशीच अडचण मलाही

अशी अडचण मलाही हापिसातून येत होती. घरातून कधीच येत नाही. इतरांना येते का ते ही माहित नाही. काय प्रकार आहे ते कळत नाही. कोणता ब्राऊजर वापरता?

असो. कॅश साफ केली की लॉग-इन करता येते. तसे तूर्तास करून बघा.

संपादक मंडळ याबाबत काही करू शकत नसावे. आपण "उपक्रम" या आयडीकडे कळवावे.

सेशन

असो. कॅश साफ केली की लॉग-इन करता येते. तसे तूर्तास करून बघा.
धन्यवाद. इट वर्क्स. जेंव्हा आपण जाण्याची नोंद न करता डायरेक्ट विंडो क्लोज करतो तेंव्हा प्रॉब्लेम् येतो बहुधा. मी आय. ई. - ७ वापरतो. पण या प्रॉब्लेमचा ब्राउजरशी संबंध नाहीये. क्रेझी ब्राउझरमधून् पण् हा प्रॉब्लेम येतो. सेशन मॅणेजमेंटमधे गडबड. 'उपक्रम' ला कळवतो.

अशी अडचण मलाही येत होती

अशी अडचण मलाही येत होती. काय प्रकार आहे ते कळत नाही.

शैलु

+१

लेख आता पूर्ण वाचला.

बरेचसे विवेचन योग्य आहे.
काही गोष्टी चुकीच्या आहेत. आर्य (किंवा जे कोणी) वायव्येकडून आले ते शेतीप्रधान नव्हते तर पशुपालक होते. शिवाय ते ब्रॉन्झ युगाचे प्रतिनिधी होते. लोखंडाचा वापर तिकडे नव्हता. ते पुढे सरकत गंगेच्या खालच्या खोर्‍यात आल्यावरच लोखंडाचा उपयोग सुरू झाला. अर्थात तोपर्यंत एतद्देशीयांकडून शेतीचे तंत्र आत्मसात केले असणार.

कुरुंदकरांचे वर्णव्यवस्था हे जातिव्यवस्थेचे एक्स्प्लनेशन आहे हे विवेचन मान्य आहे. तसेच तथाकथित वर्ण कोणत्यातरी काळी गुणकर्माने मिळत असण्याची शक्यता अजिबात नाही हे विवेचनही मान्य आहे. तसेच विद्यादान करणारा तो ब्राह्मण, रक्षण करणारा क्षत्रिय आणि सेवा करणारा शूद्र
ही मांडणी चुकीची आहे हेही मान्य.

(सल्ला : सहा सोनेरी पाने हे पुस्तक इतिहास म्हणून वाचू नका हो).

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

थत्ते सर्

सहा सोनेरी पाने हे पुस्तक इतिहास म्हणून वाचू नका हो
'सहा सोनेरी पाने' हा ठसठशीतपणे इतिहासच आहे. त्यातल्या किती गोष्टी अभिनिवेशातून लिहिल्या आहेत आणि किती वस्तुनिष्ठपणे लिहिल्या आहेत हे ज्याचं त्याने स्वतःच्या विवेकबुद्धीने ठरवलं पाहिजे.

आर्य (किंवा जे कोणी) वायव्येकडून आले ते शेतीप्रधान नव्हते तर पशुपालक होते. शिवाय ते ब्रॉन्झ युगाचे प्रतिनिधी होते. लोखंडाचा वापर तिकडे नव्हता. ते पुढे सरकत गंगेच्या खालच्या खोर्‍यात आल्यावरच लोखंडाचा उपयोग सुरू झाला. अर्थात तोपर्यंत एतद्देशीयांकडून शेतीचे तंत्र आत्मसात केले असणार.
काहीतरी घोटाळा आहे किंवा माझी माहिती चुकीची/अर्धवट् आहे.

प्रयत्न करून समजला नाही.

हा लेख व त्यापूर्वीचा दुवा प्रयत्न करूनही समजला नाही. आतापर्यंत दोघांनी अशीच प्रतिक्रिया दिली आहे.

बर्‍याच उलटसुलट मतांचा उहापोह आहे पण लेखकाचे म्हणणे काय हे नीटसे कळत नाही. ज्या लोकांचे संदर्भ वापरले आहेत त्यातील काही शेषराव मोरे, नेहरू आणि सावरकर यांच्या वस्तुनिष्ठ इतिहासकथनावर माझा फारसा विश्वास नाही. कदाचित त्यामुळे हे घडले असेल. किंवा परिच्छेद मोठमोठे असणे असे ही कारण असेल.

शेवटचा परिच्छेद सारभूत असल्याचे धरून मी काही प्रतिक्रिया नोंदवतो.

हिंदू धर्मातल्या वर्णव्यवस्थेवर जी टीका होत असते ती बर्‍याच अंशी रास्त असली तरीसुद्धा हेही लक्षात घेतले पाहिजे की वर्णव्यवस्थेपेक्षाही अधिक अन्यायकारक, रानटी प्रथा ख्रिश्चन आणि मुसलमानांच्या धर्मातही अस्तित्वात होत्या.

या मुस्लिमा आणि ख्रिश्चन रानटी प्रथा कुठल्या? त्या वर्णव्यवस्थेपेक्षाही अन्यायकारक कशा?

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या नव्नव्या वाटा धुंडाळून आपले आणि आपल्या भावी पिढ्यांचे आयुष्य अधिकाधिक प्रसरणशील आणि आधुनिक बनवणे हे प्रत्येक पिढीचे कार्य असते. त्याचप्रमाणे आपली पुरातन मूल्ये, संस्कॄती आणि इतिहास यांचा वस्तुनिष्ठपणे धांडोळा घेणे हेदेखील प्रत्येक पिढीचे कार्य असते. हे करत असताना वृथा अभिमानी वृत्ती किंवा न्यूनगंड या दोन्ही गोष्टी मारक ठरु शकतात. या दोन्ही गोष्टी दूर ठेवून वाचलेल्या माहितीचा स्वतंत्रपणे अर्थ लावण्याचा प्रयत्न मी माझ्या अल्पशा बुद्धीने केला आहे. त्याचा त्याच दृष्टीने विचार व्हावा.

सहमत.

प्रमोद

प्रमोद सर,

परिच्छेद् मोठे असल्यामुळे घोटाळा होत असेल् तर् तो लेखकाचा म्हणजे माझा फॉल्ट् आहे. पुढच्या वेळेला थोडी वेगळी मांडणी करेन्.

शेषराव मोरे, नेहरू आणि सावरकर यांच्या वस्तुनिष्ठ इतिहासकथनावर माझा फारसा विश्वास नाही.
हा माझा फॉल्ट नाही.

या मुस्लिम आणि ख्रिश्चन रानटी प्रथा कुठल्या? त्या वर्णव्यवस्थेपेक्षाही अन्यायकारक कशा?
अभ्यास् करुन वेगळा लेख लिहावा लागेल. सध्याचं वर्कलोड पाहता ते इतक्यात् शक्य दिसत नाहीये. तरी एखादा दुवा सापडला तर कळवेन.

 
^ वर