एक गलबलून टाकणारा अनुभव

काल रात्री साडेआठच्या सुमारास अचानक अतिशय खोल व खर्जातून येणारा ठोक्याचा आवाज कानावर येऊ लागला. प्रथम वाटले की रस्त्यावर कोणीतरी गाडीतील स्टिरिओ प्रणाली मोठ्याने लावली असावी. अलीकडे बर्‍याच तरूण मंडळीना आपल्या गाडीतील संगीत सर्व जगाने ऐकावे अशी प्रामाणिक इच्छा असलेली दिसते. तशातलाच काहीतरी प्रकार असावा म्हणून दुर्लक्ष केले. परंतु 5 मिनिटे झाली तरी हे ठोके काही कमी होईनात. रस्त्यावरही काही दिसत नव्हते. आणखी पाच मिनिटे गेली. आता ठोक्याबरोबर अत्यंत बेसूर असे व कोणीतरी गायकाने रेकून गायलेले एक गाणे ऐकू लागले. घरातले सगळेच जण आम्ही अस्वस्थ झालो. आवाजाची पातळी मिनिटा-मिनिटाला वाढतच होती. थोड्याच वेळात ती कर्णकर्कश पातळीला पोचली. आता त्या ठोक्यंबरोबर सर्व घर हादरते आहे असे जाणवू लागले.
आवाजाची पातळी एवढी वाढली होती की काहीही सुचत नव्हते. एकूण प्रकार काय असावा हे तेंव्हा ध्यानात आले. एका मोठ्या गाडीमधे ध्वनीवर्धकांची रांग बसवून त्यांच्यामार्फत ही आवाजनिर्मिती करण्यात येत होती. आवाजाच्या पातळीवरून काही हजार वॉट्स शक्तीचे तरी ध्वनीवर्धक असावेत असा अंदाज बांधता येत होता. हळू हळू एका मोठ्या समुहाचे ओरडणे, शिट्या वगैरे ऐकू येऊ लागले. ही आवाजगाडी दुर्दैवाने माझ्या घराकडेच हळू हळू प्रवास करते आहे हे माझ्या लक्षात आले. आता आवाजाची पातळी एवढी वाढली की आपले कान आता फुटणार असे मला वाटू लागले. शेवटी मी फोन उचलला व 100 नंबरला फोन लावला.

फोनला कोणी उत्तर न देता, अमुक असले तर 1 दाबा, तमुक असले तर 2 दाबा, वगैरे ध्वनीमुद्रित भाषण कानावर पडले. हे नंबर दाबून अखेरीस एक पोलिस ऑपरेटर शेवटी माझ्याशी बोलू लागली. तिला माझ्या अडचणीची कल्पना दिल्यावर हे ध्वनीवर्धक ज्या कोणत्या गाडीवर बसवले आहेत त्या गाडीचा क्रमांक काय आहे? तसेच कसल्या आनंदोत्सवाबद्दल हे संगीत वाजत आहे? अशी पृच्छा त्या पोलिसबाईंनी केली. मला यातले काहीही सांगणे शक्य नाही व आवाज असाच चालू राहिला तर आमचे काही खरे नाही हे मी त्या बाईंना परत परत सांगून बघितले. शेवटी दया येऊन त्यांनी पोलिस पाठवते म्हणून वचन दिले.
पुढचा अर्धा तास आता आवाज बंद होईल, नंतर बंद होईल म्हणून अस्वस्थपणे घालवला. परंतु आवाज बंद होण्याच्या ऐवजी वाढतोच आहे हे ध्यानात आल्यावर पुन्हा एकदा 100 नंबर फिरवला. आता दुसर्‍याच पोलिस बाई लाईनवर भेटल्या. पुन्हा एकदा हरदासाची कथा ऐकवल्यावर ध्वनीवर्धक बंदी रात्री 10 नंतर सुरू होते अशी मौलिक माहीती आम्हाला मिळाली. आवाजाची पातळी कोणत्याही मान्य मर्यादेपेक्षा बरीच जास्त आहे व ती आमच्या सहनशक्तीच्या बाहेरची आहे हे सांगितल्यावर आणखी चार पाच तक्रारी आल्या आहेत, गाडी पाठवते असे वचन आम्हाला मिळाले. पुढचा एक तास आवाज कधी बंद होईल त्याची वाट बघण्यात व 100 नंबरला फोन लावण्यात गेला. अर्थातच आमच्या तक्रारीला वाटाण्याच्या अक्षता मिळालेल्या दिसत होत्या, कारण आवाज चालूच राहिला.
साधारण रात्रीचे साडे दहा वाजता, म्हणजे दोन तास आमचा सतत छळ करून ती आवाज गाडी आमच्या घराजवळच्या चौकात आली. आता जनसमुहाचा जल्लोश काही कारणाने वृद्धिंगत होतो आहे असे लक्षात आले व नंतर फटाक्याच्या माळा फुटू लागल्या. हजार हजार फटाक्यांच्या दहा, वीस माळा तरी फोडण्यात आल्या असाव्यात.
एव्हाना माझी अवस्था दोन चार महिने अंथरूणात असलेल्या रुग्णासारखी झाली होती. डोके प्रचंड दुखू लागले होते व आपले संपूर्ण आंग आतून कापते आहे असे वाटू लागले होते. दोन तास झाले तरी पोलिस किंवा त्यांची गाडी यांचा कोठे मागमूसही दिसत नव्हता. शेवटी 10.40ला हा वडवानल शांत झाला. म्हणजे फक्त ध्वनीवर्धकांचा आवाज थांबला. बरोबर असलेल्या जनसमुहाचा जल्लोश, फटाके, किंचाळ्या चालूच होत्या. आवाज थांबल्यावर आपल्याला प्रचंड थकवा आला आहे हे जाणवू लागले. दुख:निवारक गोळ्या घेऊन मी अंथरूणावर पडलो.
सकाळी जाग आली तेंव्हा आपण एखाद्या मोठ्या आजारातून नुकतेच उठलो आहोत असेच मला वाटत राहिले. सकाळी फिरायला जाताना जरा आजूबाजूला, शेजार्‍यांच्याकडे चौकशी केली. प्रत्येकाचा अनुभव साधारण माझ्यासारखाच होता. सगळ्यात मजेची गोष्ट म्हणजे कोणालाच ही गाडी कोणाची होती? त्यावर कशासाठी ध्वनीवर्धक लावले होते? बरोबरचा जनसमूह कोण होता? तो का नाचत होता? काहीही माहिती नव्हते. त्यातले काही जण आपण पण 100 नंबरवर फोन केल्याचे म्हणाले. कालच पुण्यातून ज्ञानेश्वर माउलीची पालखी गेली. त्याची ही आधुनिक दिंडी होती की काय? पण दिंडीमधे भजने म्हणतात. 'कोंबडी पळाली' यासारखी निरर्थक गीते म्हणत नाहीत आणि वारकरी मंडळी रात्री विसावा घेतात. ध्वनीवर्धक बसवलेल्या गाडीसमोर बीभत्स नाचत नाहीत.
पुण्यात नागरिक शास्त्र जाणणारे, शिकलेले लोक रहातात असा माझा कालपर्यंत भ्रम होता. काल रात्रीच्या दोन तासात तो दूर झाला. पुणे ही अनेक जंगली टोळीवाल्यांची मिळून बनलेली वस्ती आहे हे लक्षात आले. यापैकी प्रत्येक टोळीची स्वत:ची वागण्याची तर्‍हा आहे. यामुळे इतर लोकांना कितीही त्रास झाला तरी या जंगली टोळीला त्याची पर्वा असण्याचे काहीच कारण नाही. त्या लोकांनी स्वत:चे बघून घ्यावे.
पुण्यातले पोलिस वर्तमानपत्रात जाहिराती देतात. ज्येष्ठ नागरिकांना कोणताही त्रास झाला तर 100 नंबरवर फोन करा म्हणून सांगतात. काल रात्रीच्या अनुभवावरून हे सगळे फोल आहे हे चांगलेच लक्षात आले. पोलिसांना असल्या किरकोळ गोष्टींकडे लक्ष द्यायला बहुदा वेळ होत नसावा. रस्त्यावरची वाहने थांबून त्यांच्या चालकांच्याबरोबर कोणत्यातरी गहन विषयावर चर्चा करताना नेहमीच मला पोलिस दिसतात. या सारखी कामे त्यांना असल्याने बहुदा, कोणीतरी म्हातारा काहीतरी आवाज येतो म्हणून तक्रार करतो आहे, त्याच्याकडे काय लक्ष द्यायचे असे त्यांना वाटत असावे.
आता मी इअर प्लग्स किंवा तत्सम कोणत्या तरी उपायाच्या शोधात आहे. जे वापरले की मी तात्पुरता ठार बहिरा होईन. सकाळीच कॅलेंडर बघताना पुढच्या महिन्यात गोकुळाष्टमी आहे हे लक्षात आले आहे. त्याच्या आत काहीतरी उपाय शोधलाच पाहिजे. नाहीतर माझे काही खरे नाही.
7 जुलै 2010

लेखनविषय: दुवे:

Comments

इअर प्लग्ज मिळतात

मेडिकल दुकानात इअर प्लग्ज मिळतात. किंवा एखाद्या मेकॅनिकल कंपनीतल्या शॉपफ्लोअरवर कोणी ओळखीचे असेल ते दोनतीन आणून देतील. मला झोप आली की पंख्याच्या आवाजापेक्षा दुसरा कोणताही आवाज अजिबात सहन होत नाही. त्यामुळे असे आवाज येऊ लागले की कानात बोळे घालून झोपायचा प्रयत्न करतो. घोरायला सुरुवात झाली की कानातल्या बोळ्यांमुळे डोक्यात पंख्याच्या आवाजाचे सिम्युलेशन झाल्यासारखे वाटते व शांत झोप लागते. असा स्वानुभव आहे.

सुदैवाने माझे घर तथाकथित रेसिडेंशिअल एरियापासून थोडे लांब आहे त्यामुळे श्रीगणेशोत्सव, श्रीनवरात्रौत्सव, गोकुळाष्टमी वगैरे सामाजिक त्रासांपासून माझी सोयीस्कर मुक्तता झाली आहे. सोसायटीत कोणाचे लग्न-वास्तुशांत असली तरी लोक गाणीबिणी लावायच्या भानगडीत पडत नाहीत. पार्किंगमधल्या गाड्यांचे हॉर्न (गर्लफ्रेंडला हॉर्न वाजवून बोलावणारे बॉयफ्रेंड्स) वगळता फारसे त्रास नाहीत. मोबाईलचा सुळसुळाट झाल्यापासून हल्ली मिस्डकॉल देण्याची पद्धत वाढल्याने हॉर्नचा त्रासही कमीकमी होत आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सहानुभूति

दिवसाही ५५ डेसिबलपेक्षा अधिक आवाजास बंदी आहे.
हा अतिघृणास्पद प्रकार केवळ पुण्यातच आहे असे वाटते. १० चे ११/१२/०१ पर्यंत ताणणे हे मात्र सार्वत्रिक आहे.
न्यायालयाच्या अवमानाचा खटला पोलिसांवर करणे हा एक उपाय आहे.

असे मुळीच नाही

हा अतिघृणास्पद प्रकार केवळ पुण्यातच आहे असे वाटते.

असे मुळीच नाही. धुळे येथे एका लग्नासाठी गेलो असता तेथे असा 'मोबाईल डिस्कथेक' प्रत्येक लग्नात कंपल्सरी वापरला जातो असे समजले.
(पिअर प्रेशर) ..त्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर बॉक्स स्पीकर्सची भिंत उभी केली होती. या भिंतीच्या मागे जॉकी (संगीतनियंत्रक) वेगवेगळी गाणी वाजवत होता.
तसेच या ट्रॉलीवर लेझर्स् व आरशाचे ग्लोब इ. रोषणाईचीही सोय होती.

आपल्याच (बायकोच्या) कडचे लग्न असल्याने 'आपलेच दात आणि आपलेच ओठ' खात बसलो. :)

कोल्हापुरात जाऊन बघा...

पुण्यात काय बघितला नाही असा अजब प्रकार मी कोल्हापुरात बघितला.

दोन वर्षांपूर्वी मी नातेवाईकांकडे राहायला गेलो होतो तेव्हा रात्री दहानंतर अचानक छातीत धडकी बसेल अशा आवाजात कर्णकर्कश्श गाणी वाजू लागली. मी नातेवाईकांना विचारले तेव्हा ते म्हणाले, की ही इथली पद्धत आहे. कॉलनीतल्या अमक्या तमक्यांच्या घरात लग्न झाले आहे आणि अंबाबाईच्या दर्शनानंतर नवरानवरीला मिरवून आणताहेत. मी आश्चर्याने विचारले, 'या वेळी?' तर ते म्हणाले, ' हो आता हा प्रकार दोन एक तास चालेल. त्या वरातीत कॉलनीतील तरुण मुले बेभानपणे नाचत होती. तो खर्च नवर्‍यामुलाच्या खिशातून झाला होता. वरात प्रत्येक घरासमोर थांबत होती. प्रत्येक घरातून नवरानवरीसाठी दुधाचा ग्लास दिला जात होता. तो नाकारायचा नसतो म्हणे.
त्या दोन तासात माझे ह्रदय फुटून बाहेर पडेल, असे वाटत होते. माझी सोनुली वारंवार दचकून जागी होत होती. अखेर तिच्या कानात कापसाचे बोळे घालून तिला आतल्या खोलीत दारे घट्ट बंद करून झोपवले. आम्ही एकपर्यंत जागत बसलो. मी साहजिकच विचारले, 'का हो! याबद्दल कुणी कधी तक्रार करत नाही का?' त्यावर आमचे नातलग म्हणाले, ' नाही. त्याचा उपयोग नसतो. इथे सगळ्यांना एकमेकांना धरून राहावे लागते. उद्या आपल्याही घरात कार्य निघेल. त्यावेळी आपली मर्जी असो वा नसो, आपल्यालाही हे प्रकार करावेच लागतात. तुम्हाला समाजापेक्षा वेगळी भूमिका घेऊन चालत नाही. त्याचा त्रास तुम्हालाच भोगावा लागतो.'

मला न्यूयॉर्क पोलिसांचा पूर्वी कुठेतरी वाचलेला विनोदी, पण व्यवहार्य इशारा आठवला.
' बलात्कार होणे अपरिहार्यच असेल तर निदान जीव वाचवा आणि समागमाचा आनंद लुटा' (If rape is inevitable, enjoy it.)

बेस

bass जितका जास्त तितकी ती सिस्टीम लई भारी. या मिरवणुकीत कमी कंप्रतेला (<२०० हर्टझ) जास्तीत जास्त आवाज देणारे ध्वनीक्षेपक (२४ इंची वूफर) असे ढिगाने बसवलेले असतात.
मग त्यात नाशिक ढोलची सीडी आणि पोटात पावशेर टाकली की काम तमाम! *

यहाँ वहाँ सारे जहाँ मे तेरा राज हैं

हा प्रकार फक्त पुण्यात नाही. पुण्यापासून 60 किमी दूर गावात मी 25 वर्षे राहिलो. मला आठवते त्यानुसार 3-4 वर्षे गणेशोत्सवात माझ्या वडिलांचे मंडळाच्या कार्यकर्त्यांशी भांडण झाले होते. मंडळाचे लोक खुन्नस म्हणून गणपतीचा कर्णा आमच्या घराच्या दिशेने वळवून लावत. शहरात दारेखिडक्या बंद केल्या की बऱ्यापैकी आयसोलेशन होते. गावाकडची घरे पुरेशी साऊंडप्रूफ नसतात. त्यामुळे ते 10 दिवस आम्हाला नेहमीच यातनादायक होत होते. मी आठवीला पोचल्यावर यावर 'उपाय' म्हणून (दहावी जवळ आल्यावरही अभ्यासाला असा त्रास होईल हे गृहित धरून) मंडळाला आमच्या घरातून (आमच्या मीटरद्वारे) वीज पुरवण्याची खंडणी आम्ही दोन वर्षे दिली व त्यांनी तो कर्णा दोन वर्षे बंद ठेवला. कर्ण्याचा आवाज हा साऊंडबॉक्सच्या तुलनेत अतियातनादायक असतो हे सांगणे न लगे.

लग्नाची वरात हा तर अजूनच भयंकर प्रकार पण तो तासाभरापुरता असतो. तेवढा वेळ त्या मानसिक बलात्काराची मौज लुटायची असते. नंतर सारे काही शांत शांत होते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अरेरे

अरेरे!
वाईट गेले असणार दिवस.
मी समजू शकतो. मीही त्यातून काही काळ गेलो आहे.

पण इफ यु कांट बीट देम जॉइन देम या उक्तीनुसार
मी सढळ हाताने वर्गणी देत असे, शिवाय सामान वाहायला माझी जीप ड्रायव्हरसह मिळत असे.
मला कोणताही त्रास झाला नाही. शिवाय अनेक खरोखरचे उपयोगी कार्यक्रमही राबवून घेतले ते वेगळेच.

आपला
गुंडोपंत
~घरची भारीतली असली तरी मंडळाची प्यायला जितकी मजा येते, तेव्हढी घरी येतच नसे! बाप्पा मोरया!!~

नरकयातना

अरेरे!
वाईट गेले असणार दिवस.
हेच म्हणतो. नरकयातना. दुसरा शब्द नाही.

मी सढळ हाताने वर्गणी देत असे, शिवाय सामान वाहायला माझी जीप ड्रायव्हरसह मिळत असे.
तुमच्याकडे पैशाचे झाड दिसते. तुम्ही बिल्डरला ११ हजार जादा दिले होते ना. तुम्ही अबूधाबीचे शेख आहात की काय? शंका अधिक दाट होते आहे.

~घरची भारीतली असली तरी मंडळाची प्यायला जितकी मजा येते, तेव्हढी घरी येतच नसे! बाप्पा मोरया!!~
~बाप्पाने उठून दोन मुस्काटात मारल्या नाहीत काय पिणाऱ्यांच्या? की सरळ सोंडेने बंफर उचलला? गणपती बाप्पा मोरया. विस्कीसोबत सोडा घ्या.~

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

झाड

तुमच्याकडे पैशाचे झाड दिसते. तुम्ही बिल्डरला ११ हजार जादा दिले होते ना. तुम्ही अबूधाबीचे शेख आहात की काय? शंका अधिक दाट होते आहे
छे! झाड कसले आले आहे?
फक्त कुठे जास्त द्यायचे आणि नाही याचे अनुभवाने आलेले नाममात्र ज्ञान झाले आहे असे वाटते. अक्कल वगैरे आली आहे असे काहे नाही. अजूनही फसू शकतोच!

सढळ वर्गणी म्हंणजे 'माझ्या मते' सढळ.

या प्रसंगी तुम्ही पैसे किती देता पेक्षा, काय आणि कसे बोलता, कोणत्या आठवणी काढता, काय खायला प्यायला वगैरे देता याला महत्त्व असते.

तुमचा अनुभव वेगळा असू शकतो.

आपला
गुंडोपंत
~बाप्पाने उठून दोन मुस्काटात मारल्या नाहीत काय पिणाऱ्यांच्या? की सरळ सोंडेने बंफर उचलला? गणपती बाप्पा मोरया. विस्कीसोबत सोडा घ्या.~

~ छे! बाप्पा कशाला मुस्काटात मारेल? उलट आम्हीच मारायचो कुणी उठवायला आला, तर त्याच्या! तुमच्या बसली होती का? - सोडा नाही हा! पाणी फक्त छान साधे गार पाणी ~

छे हो.

~ छे! बाप्पा कशाला मुस्काटात मारेल? उलट आम्हीच मारायचो कुणी उठवायला आला, तर त्याच्या! तुमच्या बसली होती का?

छे हो! दुर्दैवाने तुमच्या प्रश्नाचे उत्तर 'नाही' असेच आहे. आम्ही पडलो नास्तिक. आम्ही कुठल्याही मंडळात नव्हतो. त्यामुळे गणपतीसमोर बसून किंवा न बसता मद्यप्राशन करण्याचा प्रश्नच आला नाही. मात्र गणपतीने त्याच्यासमोर बसून किंवा न बसता मंडळाच्या पैशाची पिणाऱ्यांच्या मुस्काटात चार लगावायला हव्या. किंवा त्यांच्याबरोबर बसून मद्यप्राशन तरी करायला हवे. त्यानिमित्ताने बाप्पाचे (म्हणजेच देवाचे) अस्तित्व तरी सिद्ध होईल. तुमच्या बसली होती की तुमच्यासोबत बसून त्याने मद्यप्राशन केले? सांगावे. म्हणजे परमेश्वराला मानायला आम्ही मोकळे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

छ्या!

आधीच वैयक्तिक अनुभव, तशात मद्य-प्याला! अशा अनुभवांच्या दाव्याला काय भुलायचे?

हम किसीसे कम नही

या निमित्ताने खाली मान घालून एक कबुलीही द्यावी वाटते. नवरात्र उत्सवात आम्ही मित्रमंडळींनी वर्गणी न देणार्‍या कुटूंबाकडे कर्ण्याचे तोंड केले होते. त्यांच्या दारासमोरील अंगणात साउंड सिष्टीमही लावली होती. पुढे होळीला मोक्कार बोंबा त्यांच्या दारासमोर मारल्या होत्या. सदरील कुटूंब होळीच्या दिवशी पोलिसात तक्रार करायलाही गेले होते. पण, पोलिसांनी आजच्या दिवशी पोरांकडे दुर्लक्ष करायचे असते असे म्हणून त्यांना वाटेला लावले होते. पुढे मात्र नियमित वर्गणी मिळत गेली हे वेगळे सांगणे न लगे.

-दिलीप बिरुटे

आम्ही वर्गणी देत होतो

सार्वजनिक गणेशोत्सव या संकल्पनेबाबत माझ्या कुटुंबाच्या मनात अढी नव्हती. असा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी, मंडप, लायटिंग, देखावे, स्थापना व विसर्जन मिरवणूक, रात्रभर पत्ते कुटताना खावयाचा गुटखा, दारु वगैरेंसाठी पैसे लागतात. पैशाचे सोंग आणता येत नाही. त्यामुळे आम्ही नियमित वर्गणी देत होतो. माझे एक दोन चुलतभाऊ मंडळाचे कार्यकर्तेही होते. आमचे म्हणणे आवाज कमी ठेवा इतकेच असायचे. त्याचाही 'कार्यकर्त्यांना' राग यायचा. माझ्या घरापासून 40 मीटर अंतरावर तो गणपती बसायचा. आता गणपतीच्या मूर्तीचे कान मोठे असले तरी मूर्ती एकंदर निर्जीव असल्याने बाप्पाला काही त्रास होत नसला तरी आम्हाला घरात एकमेकांचेच बोलणे ऐकायला यायचे नाही. खाणाखुणा करुन बोलायला लागायचे.

अशा लोकांच्या नादी लागण्यापेक्षा त्यांचे म्हणणे निमूटपणे मान्य करण्याशिवाय एकट्यादुकट्या माणसाकडे पर्याय नसतो. पाहा तुम्हालापण नियमित वर्गणी मिळू लागली की नाही. मस्त धडा शिकवला त्यांना!


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

त्रासदायक

या कर्कश, ध्वनी प्रदुषणाने डोके उठते. मानसिक संतुलन राखणे अवघड बनते. मलातर बेसीन च्या नळाचा जास्त फोर्सचा आवाज सुद्धा त्रासदायक वाटतो. टपटप गळणारा नळ देखील लक्ष विचलित करतो.
प्रकाश घाटपांडे

अरेरे

लग्नाची मिरवणूक इ. असावी काय?

हॉरीबल!

----------------------
लष्कर-ए-तोयबा, हिज्बुल मुजाहदीन इ. संघटनांना जर फक्त वर्षाला अमुक एक् हेडकाउंट भरायचा असेल तर शहरी काही ट्रॅफीक सिग्नलला दोन अतिरेकी शार्प शूटर बसवायची परवानगी, कर्कश्य आवाज प्रदुषण करणार्‍या दिवसात १० अतिरिक्त शार्पशुटर असा काही तोडगा निघतो का बघीतले पाहीजे.

मंडळात

कोणत्याही मंडळात आवाज मोठा करायला लावणारी १ किंवा २ डोकी असतात. त्यांना एखाद्या लोच्यात गुंतवले तर बाकीच्यांना बहुदा मॅनेज करता येते असा माझा अनुभव आहे.

मी एक दोन जणांना त्यासाठी 'दंगल घडवण्याच्या प्रयत्नासाठी', मारहाण केली म्हणून वगैरे पोलिस केसेसही केल्या आहेत. त्यामुळे उत्सवा आधी काही लोक उचलले जातात, किमान जाम केले जातील असे पाहिले तर आमचे प्रश्न सुटत असत (त्या काळात!)

शिवाय मंडळाच्या लोकांना आमच्याकडे कायम सकाळच्या नाष्ट्याचे आणि चहाचे आमंत्रण असायचे त्यामुळे आमच्या मताला किंमत असे. पण हे प्रत्येकाला जमेलच असे नाही.

आताचे माहित नाही. आता दूर असल्याने तेव्हढा त्रास नाही. निवांत असते.

आपला
गुंडोपंत

...कुंडल आता पहिले उरले नाही !

पुणे ही अनेक जंगली टोळीवाल्यांची मिळून बनलेली वस्ती आहे हे लक्षात आले. यापैकी प्रत्येक टोळीची स्वत:ची वागण्याची तर्‍हा आहे. यामुळे इतर लोकांना कितीही त्रास झाला तरी या जंगली टोळीला त्याची पर्वा असण्याचे काहीच कारण नाही. त्या लोकांनी स्वत:चे बघून घ्यावे.

अगदी खरे आहे. `कृष्णा(ष्णे)काठी कुंडल आता पहिले उरले नाही ` ही गोविंदाग्रजांची उक्ती पुण्याबाबत हजार टक्के खरी ठरली आहे.

पुण्यातले पोलिस वर्तमानपत्रात जाहिराती देतात. ज्येष्ठ नागरिकांना कोणताही त्रास झाला तर 100 नंबरवर फोन करा म्हणून सांगतात. काल रात्रीच्या अनुभवावरून हे सगळे फोल आहे हे चांगलेच लक्षात आले. पोलिसांना असल्या किरकोळ गोष्टींकडे लक्ष द्यायला बहुदा वेळ होत नसावा. रस्त्यावरची वाहने थांबून त्यांच्या चालकांच्याबरोबर कोणत्यातरी गहन विषयावर चर्चा करताना नेहमीच मला पोलिस दिसतात. या सारखी कामे त्यांना असल्याने बहुदा, कोणीतरी म्हातारा काहीतरी आवाज येतो म्हणून तक्रार करतो आहे, त्याच्याकडे काय लक्ष द्यायचे असे त्यांना वाटत असावे.

दुर्दैवाने हेही खरे आहे...
तुम्ही गोकुळाष्टमीचा उल्लेख लेखात केला आहे. त्यानंतर पुढे गणपतीही आहेत..आणि हा विघ्नहर्ता आवाजाचे हे विघ्न काही हरणार नाही. उलट त्याच्या आगमनाबरोबर दिवसेंदिवस ते अधिकच मोठे होत जाणार...

आवाजाचा हा त्रास केवळ वृद्धांनाच होतो असे नाही. लहान मुले, महिला, तरुण, प्रौढ साऱयांनाच होत असतो. वृद्धांना आणि रुग्णांना तो अधिक वाटतो, एवढेच. हाती बरेच काही (अनेकदा सगळेच) असूनही सरकारी यंत्रणा ढिम्म असतात व त्यामुळेच असे `आवाज` मोठे होतात.

माझा एक अलीकडचाच पुण्यातील अनुभव सांगतो...
तीन-चार टाळकी मोटारीत गाणी लावून गाडी वेडीवाकडी चालवत निघाली होती. काचा बंद केलेल्या नसल्याने आवाज गाडीबाहेर येत होता. त्यांचे ते `ढुच्चुक` `ढुच्चुक` दुचाकी वाहनचालकांना खूपच त्रासदायक होत होते. त्यांचे लक्ष विचलित करीत होते. मी ती गाडी एका वळणावर अडविली. टोळक्यातील चालकाला आवाजाची कल्पना दिली... `मी सांगत आहे, तोवरच आवाज बंद कर`, असा दम त्याला भरला...`नाहीतर पुढे पस्तावशील`, असेही बजावले. (त्याचा गाडी क्रमांक मी घेऊन ठेवला होता). माझ्या सुदैवाने मला जास्त रक्त आटवत बसावे लागले नाही. चूक मान्य करून त्याने आवाज तत्काळ बंद केला...पुढे दीडेक किलोमीटरपर्यंत मी त्या मोटारीवर लक्ष ठेवले...आवाज बंदच होता. पुढे माझे वळण आले. नंतर त्या आवाजाचे काय झाले, ठाऊक नाही !

थोडक्यात, पुण्यात सार्वजनिक शिस्तीचे तीन-तेरा वाजले आहेत, हे अगदी सत्य आहे.

गोकुळाष्टमीचा आणि गणेशोत्सवाचा तुमचा काळ शांततेचा जावो, ही प्रार्थना !

तुम्ही

शक्य असेल तर तुम्ही लाल चामडी बुट आणि खाकी मोजे घालत चला.
भाषा जितकी उर्मट तेव्हढे शब्दाला चांगले वजन येईल याची खात्री देतो.

बारीक केस, लाल चामडी बुट आणि खाकी मोजे फार परिणाम करतात!

आपला
गुंडोपंत

आणखी एक `पोलिसी`किस्सा...

तुमच्या सूचनेचे स्वागत, गुंडोपंत. :)

पण अशा गणवेशाची काहीच गरज नाही मला...माझा चेहराच पुरेसा उग्र आहे !
मला अनेकजण पोलिसच समजतात. :)

एवढेच काय कधी कधी वाहतूक पोलिसही फसतात...

याबाबतच्या बऱयाच गमतीजमती आहेत...पण तूर्तास एक गंमत सांगूनच टाकतो : वाहतूकविषयक नवनवे नियम अमलात आणायची चूष पु्ण्यासारखी दुसऱया कुठल्या शहरात नसेल ! काही महिन्यांपूर्वी अशीच एक चूष निघाली...(अर्थात सार्वजनिक शिस्तीसाठी ती चांगलीच होय). ती म्हणजे `स्टॉपलाईन`च्या पुढे वाहन आणायचे नाही.

चौकातला सिग्नल अगदी नुकताच लाल झाला होता. तरीही मी वेगातच होतो. पण मग गती एकदम कमी करावी लागली आणि मी थांबलो. मागे सरकलो. त्या घाईत माझ्या मोटारसायकलचे चाक या रेषेच्या जरा पुढे गेले होते...दहा-पंधरा पावलांवर चार वाहतूक पोलिस उभे होते. त्यातील एक अगदीच नवखा वाहतूक पोलिस मला बघून धावतच आला. (सापडला बकरा !) मला दम भरण्याचाच त्याचा आवेश होता. माझी किरकोळच चूक असल्याने मीही ढिम्मच होतो. (पोलिस नवखाच तर होता !) त्याने मला नीट निरखून घेतले.
टायरला पाय लावून तो बोलू लागला, ``गाडी स्टॉपलाईनच्या पुढे आली आहे...``
मी म्हटले, ``घेतो मागे. पण टायरला पाय कशासाठी लावला ? ``
त्याने माझ्याकडे पुन्हा नीट पाहिले. माझ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आणि हेल्मेट कुठंय, प्रदूषणनियंत्रणाचे प्रमाणपत्र आहे का, `लायसेन` दाखवा अशा हजार वाटांनी तो मला घेऱू लागला. माझ्याकडे हेल्मेट नव्हतेच...(ठेवणार कुठे ?). त्याच्या भाषेतील `लायसेन` आणि प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र मी त्याला दाखविले...मी अडकत नाही, हे पाहताच त्याने हेल्मेटचे टुमणे लावले...
मी म्हटले, ``इथे असलेल्या किती जणांच्या डोक्यावर हेल्मेट आहे ?``
तो म्हणाला, ``त्यांचे सांगू नका. इतरांची गाडी `स्टॉपलाईन`च्या पुढे आलेली नाही. तुमची आली आहे. तुमचे बोला...``
माझा आवाज (आणि पाराही !) एव्हाना वाढू लागण्याच्या बेतात होता...
मी म्हटले, ``तुम्ही मला कोण समजताय ?`` (कोण समजायला पाहिजे होतं, कुणास ठाऊक !)
माझा आवाज ऐकून अनुभवी, मध्यमवयीन असलेला वाहतूक पोलिस धावतच आमच्याजवळ आला. योगायोगाने मी त्या दिवशी पोलिसी खाकी नव्हे; पण साधारण खाकी पॅंट घातलेली होती. पायात (नेहमीप्रमाणेच) काळे बूट होते. माझा उग्र चेहरा, जाडजूड मिश्या, खाकी पॅंट, काळे बूट असा सगळा अवतार बघून अनुभवी पोलिस नवख्याला म्हणाला, ``अरे कुणालाही अडवतो का तू ? आपल्या `डिपारमेंट`चेच आहेत ते. सध्या कुठल्या चौकीला असता साहेब ? `` (चौकीला कुठला आलोय, या चौकात तुमच्या तावडीत सापडलोय...!)
हे ऐकताच नवख्याचा चेहरा झरझर बदलला. त्याला काय बोलावे ते सुचेना...(आणि अर्थातच मलाही !)

मी अनुभवी पोलिसाला म्हटले, ``तुमचा काहीतरी गैरसमज... ``
आणि एवढ्यात हिरवा दिवा लागला आणि माझी सुटका झाली...अर्थात अनुभवी पोलिसाला `थॅंक्य यू` म्हणायला मी अजिबात विसरलो नाही (आणि तेवढ्यात नवख्याकडेही एक तुच्छ कटाक्ष टाकून घ्यायलाही...!)

-थोडक्यात, माझा `अवतार` पोलिसांनाही कधी कधी असा फसवून जातो.

मानले!

मानले!
सर्व सुचना रद्द मानाव्यात! ;))

आपला
गुंडोपंत

सहमत

सहमत आहे. आवाजाचे प्रदूषण होऊ शकते ही कल्पना आपल्याकडे अस्तित्वात नाही. गणेशोत्सव, गोकुळाष्टमी, दिवाळी, जयंत्या, पुण्यतिथ्या सर्वकाळी जास्तीत जास्त आवाज केला म्हणजे सण साजरा होतो या आदिम संकल्पनेवर आपण जगत आहोत.
पुढील सणांसाठी शांततेच्या शुभेच्छा.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

आता वाजले की बारा !!

>>> पुण्यात काय बघितला नाही असा अजब प्रकार मी कोल्हापुरात बघितला. <<<

+ सहमत. कारण सध्या जरी मी परगावी, परराज्यात असलो तरी मुळचा कोल्हापुरचा असल्याने श्री.योगप्रभु यांना आलेल्या अनुभवाची मी पुष्टी करतो. धागाकर्ते यांनी पुण्यातील स्थिती लिहिली आहे पण त्याला १० ने गुणले तर त्यांना कोल्हापुरचे उत्तर सापडेल अशी शोचनीय स्थिती सध्या त्या शहरात आहे, जी माता अंबाबाई मुकाट्याने पाहात हताश उभी आहे. >>> (नाहीतरी काय करणार?)

पुण्यामध्ये निदान १०० ला उत्तर तरी मिळते (कदाचित लेडी ऑपरेटर असल्याने), पण कोल्हापुरात चुकूनदेखील १०० क्रमांक कुणी फिरवित (किंवा सेलच्या भाषेत "दाबत") नाही, कारण टिपिकल रिस्पॉन्स माहित असतोच असतो.

आतातर दोनतीन महिन्यात कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत व त्यापूर्वी "श्री.रा.रा. गणपतराव देव" यांचे आगमन होणार असल्याने इच्छुक उमेदवारांची असा 'हलकल्लोळ' घुमविण्याची सुरसुरी खूपच जागरूक झाली आहे.

परवा सुट्टीत तीनचार दिवस घरी गेलो होतो, त्यावेळी श्री.चन्द्रशेखर यांना आलेल्या अनुभवाची एक छोटी झलक चाखली आणि सध्याच्या "फॅशन"मधील एक नवीनच प्रकार ऐकायला (आणि बघायलासुद्धा) मिळाला. तो असा की, जो वाजंत्रीचा जथा (टीम्) असतो तीत १० पैकी ९ "तडम् तडम् धाडधुडुम्" असा आवाज काढणारे ड्रमर्स असतात व एका मोटारीच्या टपावर यांचा लीडर सिन्थेसायझर घेऊन एकदम तयारीत. रात्री दहा ते अकरा मिरवणूक अंबाबाईच्या देवळातून निघुन नवरदेवाच्या गल्लीच्या तोंडावर येते आणि त्यावेळी जमलेल्या बघ्यांसमोर रात्री ११ ते १२ पिऊन तर्रर् झालेल्यांचा (सो कॉल्ड् फ्रेण्ड्स) एक हिडीस नाचाचा प्रकार सुरू होतो आणि वाद्यांच्या (खरेतर ड्रम्सच्या) कल्लोळात गाणे सुरू होते ~~ "मला जावू द्या ना घरी, आता वाजले की १२ !"

बाप् रे ! कदाचित विश्वास बसणार नाही पण 'नटरंग' चा हा खेळ बरोबर १२ वाजताच दणदिशी एका ठोक्यावर थांबतो. मग यानंतर वरात संपली म्हणून १-१ हजारांच्या फटाक्याच्या माळा.

"मरा लेको ! कुठं करायची तिथं जावून तक्रार करा आम्ही काय तुम्हाला घरी जावू देणार नाही, आता बारा वाजले तरी !"

अरेरे! मुंबईतही...

वरील सर्व अनुभव केवळ वाचूनच त्रास झाला. :-(

बाकी असे अनुभव मुंबईतही येत असतच. आधीच रहदारीने गच्च रस्ते. त्यात ते दुडक्या चालीचं घोडं. घोड्यावर स्वार गाढव (सर्व नवरे गाढवच [का पशू]...असे कोणीतरी म्हटले होते. माझा आपला परप्रकाश.). ढणाढणा वाजणारा ब्यांडबाजा, फटाक्याच्या माळा आणि त्यावर नाचणारे (म्हणजे संगीत आणि फटाक्यांच्या माळांवर) वरातीतले महाभाग.

पोलि कधी सुधारतील?

माझा मोबाईल चोरीला गेला. पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी गेल्यावर पोलीस खेकसला, "तुम्ही मोबाईल हरवायचे आणि आम्ही शोधून द्यायचे, आम्हाला काय ऐवढीच कामे आहेत?"
मदत सोडा पण तक्रार लिहून घेण्याचे व दोन शब्द चांगले बोलण्याचे किमान सौजन्य तरी पोलिसांनी दाखवावे.

हम्म! माझा उपाय

भयानक प्रकार आहे. पण गलबलून मात्र आले नाही!
असो, असेच घडते आहे.
माझे घर सुदैवाने 'जरा' दूर असल्याने याचे इतके तीव्र परिणाम भोगावे लागत नाहीत.

पण तरी गोंधळे मात्र बरेचदा तुणतुणे लाऊन रात्र जागवतात.
त्यावर उपाय म्हणून मी एका वायरमनला 'तयार करून' ठेवले आहे.
मी सहसा पोलिसांना फोन न करता, वायरमनला करतो. मग अचानक त्या परिसराची वीज जाते. तो भड# माझ्याकडून दर वेळी ५०० रुपये घेतो.
कधी हे चालते कधी नाही कारण कधी कधी फॉल्ट शोधून सगळे परत सुरु होते (मग रु. २५० परत घेतो!) - मग पोलिसांना फोन वगैरे, असो.

तुमच्या प्रकारात मोबाईल व्हॅन असल्याने लोच्या आहे.
कुणी म्यॅकेनिक हाताशी 'तयार ठेवा' आणि तुमच्या घराजवळ आल्या की या गाड्यांची इलेक्ट्रीकल सिस्टीम 'अपघाती शॉर्ट झाल्याने अचानक जळेल' अशी तजवीज करता येईल. वायरींग जळाल्यावर लगेच दुसरे लावता येत नाही. वायरी वितळल्या तरच पैसे देईन ही कबूली घ्यावी.
म्यॅकेनिकचे भरपूर बौद्धीक (कम्युनिस्ट स्टाईलने) घ्यावे लागेल आणि थोडा खर्च येईल पण काम होऊन जाईल! ;))

शिवाय 'हा रस्ता देवाला आणि लग्नाच्या लोकांना चांगला नाही' अशी आवई उठवता आली तर पाहा. दोनचार कहाण्या, भानामतीचे प्रकारही उपयोगी पडतील. (पण तुम्ही पडले अंधश्रद्धा निवारक विज्ञानवादी, तेव्हा तात्वीक दृष्ट्या परवडत असेल तर वापरा - समाज उपयोगी असल्याने मला हे ठीक वाटते - तुमचे तुम्ही पाहा.)

या उपर तेथेच नाचायला जाऊन वर आपणच राडा करून सिस्टीम बंद पाडणे हा ही उपाय होऊ शकतो.

आपला
गुंडोपंत शांततावादी!

भिक नको पण कुत्रं आवर असले अघोरी उपाय.

मी सहसा पोलिसांना फोन न करता, वायरमनला करतो. मग अचानक त्या परिसराची वीज जाते. तो भड# माझ्याकडून दर वेळी ५०० रुपये घेतो.

शिवी कशाला देताय त्याला? वायरमनने घेतले ५०० तर कुठे बिघडले? उलट त्याने ५०० मागीतले तर तुम्ही त्याला ६०० तरी काढून दिले पाहिजेत. (त्यामुळे तर्कविसंगत फायदा होतो असे तुमचेच मत आहे ना?)

शिवाय 'हा रस्ता देवाला आणि लग्नाच्या लोकांना चांगला नाही' अशी आवई उठवता आली तर पाहा. दोनचार कहाण्या, भानामतीचे प्रकारही उपयोगी पडतील.

आणि ह्याच अंधश्रद्धाळूंमुळे अख्या सोसायटीचे अवमुल्यन होऊन जागेचे भाव अव्वाच्या सव्वा कोसळतील.

या उपर तेथेच नाचायला जाऊन वर आपणच राडा करून सिस्टीम बंद पाडणे हा ही उपाय होऊ शकतो.

जेष्ठ नागरीक, लहान बाळांना झोपवणारे पांढरपेषा पालक हे तिथे नाचत आहेत आणि राडा करुन सिस्टम बंद पाडता आहेत. वा!

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

कारण

शिवी कशाला देताय त्याला?
छे! शिवी नाही. फक्त वर्णन, कारण त्यानेच फॉल्ट काढून द्यायचे हजार रुपये त्यांच्या कडून घेतले असे मला कळले.

तर्कविसंगत फायदा होतोच असे वगैरे काही माझे मत नाही. काही प्रसंगी झाला आहे इतकेच.

आणि ह्याच अंधश्रद्धाळूंमुळे अख्या सोसायटीचे अवमुल्यन होऊन जागेचे भाव अव्वाच्या सव्वा कोसळतील.

ऍलोपॅथिक औषधांसारखा साईड एफेक्ट? होऊ शकतो. सांगता येत नाही. त्यांना अंनिसवाले मदत करतील अशी आशा आहे.
मी सला दिला आहे तो वापरलाच पाहिजे असे काही नाही.

तुमचे प्रतिसाद बहुदा वैयक्तीक असतात. त्यातला 'मला' चांगला भाव दिसत नाही.
त्यामुळे मला तुमच्याशी चर्चा करण्यात रस नाही.
तुम्हाला हा माझा शेवटचा प्रतिसाद.

आपला
गुंडोपंत

अनुभव वाईट

आपल्याला आलेला पोलिसांचा अनुभव वाईटच. पोलिसांना अशा लहानसहान गोष्टीत काही इंट्रेष्ट नसतो असे वाटते. दुसरी गोष्ट 'डिजे'ची [डिजिटल साउंड सिष्टीम] हे काही पुण्यातच नसावे. आमच्या औरंगाबादेत तर हमखास दिसणारे दृष्य आहे. लग्नाची वरात, विविध मिरवणुका यात ही डिजेची सिष्टीम असतेच. एका मोठ्या टेंपोत मोठ-मोठे स्पीकर्स बसवलेले असतात. आणि त्याचा आवाज इतका मोठा असतात की विचारु नका. कान फुटायची वेळ येते. तरीही वरातीतला आणि मिरवणूकीतील उत्साह मात्र वाढलेलाच असतो. इतर पब्लीकशी त्यांना काही देणे-घेणे नसते, असेही वाटते.

-दिलीप बिरुटे

हो ना!

सहमत आहे हो.
शिवाय ट्रापिक जाम होतो तो वेगळाच

शिवाय लग्ने झाल्यावरही हे लोक (म्हणजे आपण सगळे) भांडतातच ते प्रदुषण वेगळेच ;)))

आपला
गुंडोपंत

इथे

इथे एक्सकेसीडी आठवले :)

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

प्रतिसाद

प्रस्तावलेखकाचा आणि इतरांचे अनुभव वाचून वाईट वाटले.

मुंबई-पुण्याकडे राहाणार्रे माझ्या ओळखीच्यापैकी काही लोक दिवाळीच्या दिवसांत फिरायला नेमाने बाहेरगावी जातात. मी त्यांना सणाच्या दिवसात घरी असण्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की नाहीतरी घरात बसून हवेच्या आणि आवाजाच्या अतिरिक्त प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागतोच. मग निदान सुटीचे बाहेर तरी जावे.

हो हे खरे आहे...

मुक्तसुनीत म्हणतात ते खरे आहे. पण पुण्याचे बरेचसे उच्चभ्रू लोक आता या सणांच्या तमाशापासून दूर जात आहेत. गणेशोत्सवात दहा दिवसांत तो कोलाहल, लाऊड स्पीकरवरची कर्कश्श गाणी आणि देखावे बघायला लोटलेली गर्दी या सगळ्यांचा त्रास होणारे लोक याच काळात परराज्यांत सहलींसाठी जातात. अनंत चतुर्दशीला पुण्यात ३० तास मिरवणूक चालते. रस्ते बंद केलेले असतात. त्याचा वैताग येऊन लोक कोकणात तीन दिवस सहलीला जातात.
पितृ पंधरवडा शांततेत गेला की नवरात्राचे नऊ दिवस पुन्हा ढणढणाट सुरू. तेव्हा मात्र सगळे चरफडत घरात बसतात. दिवाळी साजरी करण्याचीही पद्धत अनेकांनी बदलून घेतली आहे. पूर्वी अभ्यंगस्नान झाल्यावर गावागावांमध्ये देवदर्शनाला जायची पद्धत होती त्यानंतर घरी येऊन फराळ करायचा. आताशा लोक अभ्यंगस्नान केल्यावर थेट बालगंधर्व किंवा यशवंतराव चव्हाण सभागृह गाठतात. तिथे संगीताची मैफल असते. ती ऐकून दहा साडेदहाला बाहेर पडतात. तोवर पहाटेच्या फटाक्यांचा दणदणाट विरलेला असतो आणि सारसबागेतील गर्दीही कमी झालेली असते. मग बाप्पाचे दर्शन घेऊन मस्त सहकुटूंब पक्वान्नांची थाळी ओरपायला दुर्वांकुर, सुकांता, ऋतुगंध अशा ठिकाणी जातात. दुपार लोळून काढतात. दुसर्‍या दिवशी घरचे लक्ष्मी-पूजन झाले की गाड्या काढतात आणि मस्त आठवडाभर कोकण किंवा दुसर्‍या राज्यांत जातात.

आर यू रेडीऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ

मिरवणुकांमधल्या भिंतींचा त्रास व्हायचं कारण म्हणजे स्पीकर उलट्या दिशेने लावून यू टर्नसारखी रचना करुन तो परत पुढच्या दिशेला जोरात फेकला जाण्याची व्यवस्था केलेली असते. घरातल्या मोबाईलवरही गाणी ऐकताना तो भिंतीच्या कोपर्‍यात स्पीकर मागे करुन ठेवला तर आवाज लक्षणीयरित्या वाढतो.

आमच्या इथेही त्रास होतोच. पुण्यातले रस्त्याला लागूनच असलेले घर बदलून आम्हीही आता लवकरच दुसरीकडे जात आहोत. दरवर्षीचा गोकुळाष्टमी, गणपती, नवरात्रात सलग नऊ दिवस गरबा (नवीन निघालेल्या देवीच्या तोरणाच्या मिरवणुका ) दिवाळीतल्या हजारोंच्या माळा, अर्धा अर्धा तास चालू राहणारे आकाशातल्या रोषणाईचे फटाके यांचा आवाजाचा त्रास सहन करण्यापलीकडे जातो. घरामागेच असलेल्या एका देवीच्या मंदिरात सणासुदीला म्हातार्‍या बायकांची भसाड्या आवाजातली भजनं ऐकायला लागतात. रोडलाच असल्याने खालच्या रिक्षास्टँडवाल्यांचा वर्षात एकदा सत्यनारायण असतो. त्या दिवशी पूर्ण दिवसभर त्रास होतो. याशिवाय वाहतुकीच्या आवाजाचा त्रास, मुद्दाम सायलेंसर काढून टाकलेले दुचाकीचालक, घराजवळ चढ असल्याने गाडीचा जीव काढत ( अक्षरशः फाटलेल्या आवाजात) जाणारे बसचालक, गाड्यांचे रिव्हर्स हॉर्न यांचाही त्रास आहेच. (आमच्या गाडीला नाहीच. काहीही बिघडले नाही अजून.)

गोकुळाष्टमीची आठवण बरी झाली करुन दिलीत. लवकरच इयरप्लग कुठे मिळतात ते बघतो.

==================

+

खेदजनक

सगळे सण/उत्सव/समारंभ ओरबाडत साजरे करायची रोगट सवय लागली आहे. त्यावर उपाय करणे अवघड आहे. एक घरगुती उपाय म्हणजे चांगल्या प्रतीचे 'नॉइज कॅन्सलींग हेडफोन्स' घेउन पाहा.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

शिकून-सवरुन ब्लॉगर झाले असते तर?

नशीब ते तेथे मोठ-मोठ्याने गाणी लावून नाचत बसलेत; शिकून-सवरुन ब्लॉगर झाले असते तर?...

स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहोत आम्ही

स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक आहोत आम्ही . हे आपण हे विसरला आहात का ? आमच्या विरुद्ध तक्रार करण्याची आपली हिम्मतच कशी झाली. आमच्या वागण्यावर आपले बंधन का ? आम्ही आपण शांत बसता याकरता कधी तक्रार केली का?
नाचेगा गायेगा वोही जिसमे जान होती है!! खामोशी खास मुर्देकी पहचान होती है!! समझे आप .
महात्मा गांधीजीनी भारताच्या स्वातंत्र्याची चळवळ काय शांत बसण्या साठी केली होती काय? आपणास आवाजाची अलर्जी असेल तर आपण या सिमेंटच्या जंगलात का राहता? ताडोबाच्या जंगलात , हिमालयात जावून निवांत राहा तुम्हाला कोण अडवत. या शांततेच्या वागण्याची भारताने आधीच खूप किमत मोजली आहे. हे आपणास माहित नाही का? आपण शांत बसतो याचा शेजारील देश गैर फायदा घेतात आपणावर दहाषदवादी हम्मले करतात आणि आपण आवाज होवू नये या करता हातात मेणबत्या घेवून मूक मोर्चा काढतो. मोर्च्यात DJ लावा मग बघा त्याच्या आवाजानेच हे अंतकवादी ****** पाय लावून पळून जातील. आपण न्यायालयाच्या अवमानाची भीती कोणाला दाखवता . आम्ही न्यायालयात गेलो तर न्यायालय आमच्या हक्काचा मान राखत आम्हाला बोंबा बोंब करायचा अधिकार देईल. मागे नाही का गे ना न्याय दिला. तसेच लग्न न करता स्त्री पुरुषास एकत्र स्वच्छंदी जीवन जगण्याचा अधिकार दिला. तेंव्हा प्रथम आमच्या स्वातंत्र्यचा आदर करण्याचे शिका .डोके दुखी: थांबेल

गंभीर बाब

>> सगळ्यात मजेची गोष्ट म्हणजे कोणालाच ही गाडी कोणाची होती? त्यावर कशासाठी ध्वनीवर्धक लावले होते? बरोबरचा जनसमूह कोण होता? तो का नाचत होता? काहीही माहिती नव्हते.

ही मजेची नव्हे तर सगळ्यात गंभीर बाब आहे. गणपती, नवरात्र, होळी आणि दिवाळी ठरलेल्या वेळी येतात त्यात काय काय "भोगायला" लागणार आहे ते आधी माहिती असते. चतुर लोक कोकणात फिरायला जाणे वगैरे उपाय करतात असे ऐकून आहे. त्या दिवसांत ऑफिसातील काम अचानक वाढून मला रात्री उशिरापर्यंत थांबावे लागते किंवा दौऱ्यावर जावे लागते हा निव्वळ योगायोग नसावा हे एव्हाना चाणाक्ष लोकांच्या लक्षात आलेच असेल! काहीच कारण मिळाले नाही तर मी त्या दिवशी बाहेर जेवायला जाऊन जिवाची मुंबई (अक्षरशः) करून घेतो.
आपला समाज आता तुकड्या तुकड्यात विभागला गेला आहे. तसा तो पूर्वीपासूनच होता, पण त्यात द्वेष नव्हता. शत्रूला आगावू सूचना न देता खिंडीत कसे गाठावे याचे शास्त्रशुद्ध शिक्षण देणार्‍या राजकीय पक्षांच्या शाळा नव्हत्या. शहरातला मध्यमवर्ग हा सर्वांचाच कायम एक सॉफ्ट टार्गेट बनून राहिला आहे.
वर्गणी न देणे, सेक्रेटरीकडे तक्रार करणे, नवरात्राचा प्रसाद न स्वीकारणे अशी काही गांधीगिरी मी करून पाहिली आहे, त्याचा काही उपयोग होत नाही. ध्वनि प्रदूषणाची लढाई (इतर काही लढायांसारखी) आपण हरलेलो आहोत अशी मी माझ्या मनाची खात्री करून दिली आहे.

सहानुभुती

अहो त्या गोंगाटाबरोबर पोलिस सिक्युरीटी असेल तर कोणाकडे तक्रार करणार? ;)

बाकी, तुमचा अनुभव ऐकून सहानुभुती वाटली'मुंबईत राहूनही सोसायटी रस्त्यापासून दूर आहे आणि शांतताप्रिय लोकांची आहे. वर्षातून एकदा श्री. दत्ताची पालखी (अख्ख दहिसर लोटतं) मात्र तेव्हाही ११ ला स्पिकर बंद केले जातात (ते ही स्थानिक पोलिस का नगरसेवक कोणाच्या तरी अखत्यारीतला १ अतिरिक्त तास ऑफीशियली वापरून). मे मधे सोसायटीतील लहानग्यांच्या कलागुणांच्या प्रदर्शनाचा कार्यक्रम असतो.. कारटी जरा मोठ्याने विव्हळल्यासारखी गातात व मोठ्या आवाजातल्या गाण्यांवर नाचतात मात्र वर्षातून एकदा ही तीन तास (७ ते १०) चालणारी वटवट सहज खपते.
बाकी गणपती, नवरात्र गोंगाट नसतो (सार्वजनिक गणपती असतो. नवरात्र केवळ टिपर्‍यांनी - कोणत्याही स्पिकरविना -खेळली जाते, गुजराती पुरुष-बायका एका तालात गाणी गातात व बाकीचे खेळतात.. हा एका ठेक्यातला टिपर्‍यांचा आवाज तर फारच सुंदर असतो).

दिवाळी मात्र दणक्यात असते. मात्र मला त्याचा वैयक्तिक त्रास होत नाहि कारण मला व घरातील सगळ्यांना फटाके फोडायला आवडतात (माझी आजी असे पर्यंत -वय ६९- तीही ताजमहाल लीलया फोडायची.. तिलाही इतका त्रास होत नसे)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

वाईट वाटले

वाईट वाटले.

तुम्ही आणि शेजार्‍यांनी अनेकदा १०० टेलिफोन केला, याचा भविष्यात काही फायदा होईल अशी आशा करूया.

मात्र तुमच्या कुठल्याही शेजार्‍यांना "गोंगाट कुठल्या समारंभाचा होता" हे कळले नाही, याबाबत आश्चर्य वाटते. (ध्वनिवर्धक स्पष्ट शब्दप्रक्षेपणात भलतेच अकार्यक्षम होते, म्हणावे. हे. घ्या.)

समारंभाबद्दल/आयोजकांबद्दल काही कळले असते (ते धनदांडगे आहेत काय, तुमच्या गल्लीशी त्यांचे काय नाते, हे कळले असते) तर पुढील नियोजनाबद्दल काही निर्देश मिळू शकले असते.

पुनश्च : तुमच्या अनुभवाबद्दल वाईट वाटले.

लढाई चालु ठेवा

सध्याचा ध्वनीप्रदूषणाचा कायदा (http://www.cpcb.nic.in/oldwebsite/Noise%20Pollution/default_Noise_Pollut... ) येण्यासाठी ऍक्टिविस्टांची न्यायालयीन लढाई आणि त्याविरुद्ध लढणार्‍या लोकांचा रेटा उपयोगी ठरला होता.
सध्या मुंबईत आणि काही प्रमाणात ठाण्यात या कायद्याचा परिणाम दिसतो. आम्ही फोन केला की १०-१५ मिनिटात (रात्री १० नंतर) आवाज बंद होतो. नवरात्रीतील आवाजाचे दिवस ठरलेले असतात.
दिवसा केलेल्या गेलेल्या ध्वनीप्रदुषणावर् नियंत्रण आहे पण ते अजून पाळले जात नाही.

याची काही कारणे म्हणजे ध्वनीमापन यंत्रांचा अभाव असे मला एका ऍक्टिविस्टने सांगितले होते. कायद्यात किती अंतरावर किती डीबी असे काहीसे लिहिले आहे. पण ते नेमके मोजायला व त्यावर केस करायला कठीण जाते.
माझ्या मते यावर उपाय म्हणजे एवढ्या तांत्रिक मुद्यात न जाता सरळ ध्वनीक्षेपकाच्या पॉवर आऊटपुट वर बंधने आणावित. म्हणजे उघड्यावर अमुक आणि बद दारात अमुक अशा पद्धतीची. अर्थात हे होण्यास कायदा बदलावा लागेल्.

पोलिस हा कायदा पाळत नाहीत. हे बरेचदा घडते. त्यांच्या मागे धोशा लावावा लागतो. एकदा अशाच वेळी माझ्या बायकोने पोलिस कमिशनरला फोन केला होता. तो झाल्यावर मात्र सूत्रे हलली. माझ्यामते माहितीहक्काच्या कायद्याने याचा पाठपुरावा करता येईल. म्हणजे पोलिसांना हे विधारायचे की अशा तक्रारी आल्या होत्या का? त्यानंतर त्यांनी काय कारवाई केली? पहिल्याचे उत्तर हो असेल आणि दुसर्‍याचे उत्तर काही नाही असेल तर ही माहिती घेऊन वरिष्टांकडे तक्रार करावी. (पोलिस कमिशनर) याचा फायदा होतो हे मला इतर बाबतीत भेटून माहिती आहे.

प्रमोद

सोसा की थोडा वेळ

>>> नवरात्रीतील आवाजाचे दिवस ठरलेले असतात. <<<

याला कारण म्हणजे नवरात्रीच्या काळात आवाज व वेळेचे बंधन अमुक ठिकाणी पाळले जात नाहीत अशी अपेक्षित तक्रार घेण्यासाठी हल्ली त्या त्या शहरात एस्.पी. ऑफिसकडून स्पेशल सेल स्थापन केले जातात शिवाय मोबाईल व्हॅनदेखील नजर ठेवण्यासाठी कार्यरत असते. कोल्हापुरात तर एका एका गल्लीत आठदहा मंडळचा नवरात्रीचा धागडधिंगा चालत असतो, पण एकाचा आवाज बंद झाला की लागलीच दुसर्‍याचा बंद होतो कारण तसे झाले नाही तर अगोदर बंद झालेल्या मंडळामधील "मिथुन्, जॅकी, आमीर, शाहरूख, जॉन् इ. इ." आता तिकडे आपली "कला" दाखवायला येतील म्हणून, अन् असे झाले तर "मेरे अपने" स्टाईल राडा ठरलेला. आवाज थांबण्यासाठी इथे पोलिस कारवाईपेक्षा मंडळामंडळातील तेढ "उपयोगी" पडते.

>>> आम्ही फोन केला की १०-१५ मिनिटात (रात्री १० नंतर) आवाज बंद होतो. <<<

या "रात्री १० नंतर आवाज बंद" चा इलाज फक्त "सार्वजनिक" स्वरूपात होत असलेल्या आवाजांना आहे (उदा.गणेशोत्सव व नवरात्री). "लग्नाची मिरवणूक" या प्रकाराकडे पोलिस सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतात असा अनुभव आहे. त्याला कारण म्हणजे, फोन केला तर ठरलेले उत्तर, "अहो, लग्नात जरा इकडेतिकडे आवाज येणारच, सोसा की थोडा वेळ !" तुम्ही म्हणता तसे मुंबई-ठाणे-पुणे इथे नोंद घेतली जात असेल पण उर्वरित महाराष्ट्रात आवाज प्रदुषण कायद्याला केराची टोपली सर्रास दाखविली जाते.

सोसा??

सोसायचच् असेल तर पोलिस कशाला हवेत? बन्द करा ती न्यायालये सुद्धा!! सोसतो आम्ही.... भारतीयत्वाचा दुसरा अर्थ् सहनशीलताच् आहे. कुठेसं वाचल्याचं आठवतय्!!! कुठे बरं????

आवाज कोणाचा?

श्री चंद्रशेखर यांना झालेल्या त्रासाविषयी वाचून वाईट वाटले. कॉलेजात शिकत असतांना बाजूच्या वडारवाडीत होत असलेल्या आवाजानेही खूप त्रास होत असे. समाजातील काही घटकांमध्ये आवाज करून आनंद साजरा करण्याची उर्मी सर्वत्र आहे असे दिसून येते. पण या आवाजाचे नियमन होणे आवश्यक आहे. श्री चंद्रशेखर यांनी प्रयत्न करूनही आवाजावर काहीच परिणाम झाला नाही हे खेदजनक आहे. परंतु इतक्या सर्व जागरुक नागरिकांना आवाजाचा त्रास झाल्यानंतरही आवाज कोणाचा व कशाबद्दल होता हे कळू शकले नाही हे आश्चर्यजनक आहे. (हे सर्व जागरुक नागरिक ज्येष्ठ नसतील असे गृहीत धरले आहे. तसे नसल्यास अर्थातच कुणासही आवाजाची शहानिशा करणे शक्य झाले नसावे यात फारसे आश्चर्य नाही.)

मजकूर संपादित.

इतर संकेतस्थळांवरील हीन दर्जाच्या टिका-टिप्पणीसाठी उपक्रमाच्या माध्यमाचा वापर करू नये याची कृपया नोंद घ्यावी.

धन्यवाद

इतर संकेतस्थळांवरील हीन दर्जाच्या टिका-टिप्पणीसाठी उपक्रमाच्या माध्यमाचा वापर करू नये याची कृपया नोंद घ्यावी.

संपादनाच्या कृतीबद्दल धन्यवाद. इतर संकेतस्थळांवर हीन दर्जाची (हीन म्हणजे काय हे कसे ठरविले जाते कोणास ठाऊक?) टीका-टिप्पणी न करता निव्वळ टिका-टिप्पणी केल्यास ते योग्य समजले जाईल का?

उदाहरणार्थ, संपादीत केलेल्या मजकुराच्या जागी खालील वाक्य वापरल्यास ते योग्य ठरेल काय?

मराठी संकेतस्थळांवरही 'धत्ताड तत्ताड' असे टंकून* आनंद साजरा केला जातो यावरून आवाज करण्याची उर्मी मराठी लोकांत किती भनलेली आहे, हे लक्षात येईल.

*काही उदाहरणे

व्याप्ती

इतर संकेतस्थळांवरील हीन दर्जाच्या टिका-टिप्पणीसाठी उपक्रमाच्या माध्यमाचा वापर करू नये याची कृपया नोंद घ्यावी.

धन्यवाद. असा वापर केला जात असल्याचे संपादनाचा अधिकार असलेल्यांना वाटले असल्यास दिलगीर आहे. पण माझ्या कॉलेजच्या बाजूला वडारवाडी नावाची वस्ती होती (अजुनही आहे पण तिचे नाव आजकाल बदलले असणे शक्य आहे) व तिथून होणार्‍या आवाजाने होणार्‍या त्रासाबद्दलचे वाक्य अनावश्यकपणे उडवण्यात आले आहे हेही लक्षात आणून द्यावेसे वाटते.

ध्वनिप्रदूषणाशी किंवा एकंदरच "पुण्यात नागरिक शास्त्र जाणणारे, शिकलेले लोक रहातात असा माझा कालपर्यंत भ्रम होता. काल रात्रीच्या दोन तासात तो दूर झाला. पुणे ही अनेक जंगली टोळीवाल्यांची मिळून बनलेली वस्ती आहे हे लक्षात आले. यापैकी प्रत्येक टोळीची स्वत:ची वागण्याची तर्‍हा आहे." या वाक्यात उल्लेखिलेल्या टोळ्यांविषयीच्या चर्चेत सयुक्तिक अशी काही व्युत्पत्ती वडारवाडी या शब्दाच्या अर्थाच्या व्याप्तीविस्तारामागे आहे काय?
मराठी जालविश्वातले पारिभाषिक शब्द शिकताना आणि घडविताना वडारवाडी या शब्दाच्या अर्थाच्या व्याप्तीचा विस्तार केला गेल्याची काही उदाहरणे आहेत काय?

रूढार्थ

या वाक्यात उल्लेखिलेल्या टोळ्यांविषयीच्या चर्चेत सयुक्तिक अशी काही व्युत्पत्ती वडारवाडी या शब्दाच्या अर्थाच्या व्याप्तीविस्तारामागे आहे काय?

वडारवाडी या वस्तीत बहूसंख्येने वडारी जातीचे लोक राहत असत. हे लोक मूळचे महाराष्ट्रातील आहेत का याविषयी साशंक आहे कारण मोठ्या आवाजात कर्कश्शपणे वाजणारी गाणी एखाद्या दक्षिण भारतीय भाषेत असल्याचे जाणवत असे. (माझी माहिती साधारणत: दहा वर्षांपुर्वीची आहे. आता परिस्थिती बदलली असल्यास कल्पना नाही.) कुठल्यातरी कारणाने 'अलिबाग से आया क्या?' याचा अर्थ 'मूर्ख आहेस का?' असा आजकाल रूढ झालेला दिसतो. काही वेळा वडारवाडी हा शब्द थिल्लर चर्चांनी भरलेल्या संकेतस्थळासाठी वापरला गेल्याचे मी पाहीले आहे. अर्थात तो शब्द जालावर त्या अर्थाने रूढ आहे (अलिबागप्रमाणे) का याविषयी कल्पना नाही. वडारवाडी म्हणजे कुठली वाईट वस्ती असावी किंवा तेथील लोक हे सबह्युमन प्रकारात मोडत असावेत असे वाटल्याने त्या शब्दाचा वापर हीन समजला गेला आहे का? हे समजण्यास मार्ग नाही.

इतर संकेतस्थळे

इतर संकेतस्थळांवर हीन दर्जाची (हीन म्हणजे काय हे कसे ठरविले जाते कोणास ठाऊक?) टीका-टिप्पणी न करता निव्वळ टिका-टिप्पणी केल्यास ते योग्य समजले जाईल का?

इतर मराठी संकेतस्थळे म्हणजे काही पॉर्न साईट्स् नव्हेत की त्यांचे नुसते उल्लेखही खटकावेतत. हीन पातळी न गाठता केलेले उल्लेख ठेवण्यास काहीच हरकत नसावी.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

विचित्र

वेश्याव्यवसायाचे समर्थन करणार्‍या चर्चा स्वीकारणार्‍या संस्थळाला पॉर्न साईट मुळीच हीन वाटू नये.

वेगळे

वेश्या व्यवसायाचे समर्थन वेगळे आणि स्वत: त्यात भाग घेणे वेगळे. पॉर्नसाईट्स असणे योग्य की अयोग्य ह्यावर उपक्रमावर चर्चा झाल्यास त्यात अवश्य भाग घेऊ पण उपक्रमावर पॉर्नसाईट्सच्या जाहिराती अथवा त्याविषयी माहितीपर लेख आल्यास मला तरी ते खटकेल.

वसुलि
वसंत सुधाकर लिमये

विरोध

मराठी संकेतस्थळांवरही 'धत्ताड तत्ताड' असे टंकून* आनंद साजरा केला जातो यावरून आवाज करण्याची उर्मी मराठी लोकांत किती भनलेली आहे, हे लक्षात येईल.

जिंकल्या नंतरचा जल्लोष हि वृत्ती मानवात स्वाभाविक् असावी. मराठ्येतरांमध्येही (ध्वनी माध्यमे वापरुन) केलेला जल्लोष सगळीकडेच दिसेल. त्यामुळे फक्त् मराठी लोकांमध्ये हा गुण आहे ह्या म्हणण्याला विरोध करतो.

-Nile

 
^ वर