कशांतून काय निघेल सांगता येत नाही.

१) एक घटनाक्रम
१९९० ते ९४ या दरम्यान सबवे (रेल्वे) चालवणार्‍या न्यूयॉर्क ट्रान्झिट् आथॉरिटीने स्वयंचलित तपास-यंत्रणेला चुकवून विनातिकीट प्रवास करणार्‍यांची संख्या भरमसाठ वाढल्यामुळे त्यांना पकडण्यासाठी पोलीसांची मदत घेतली. त्यावेळी ही गोष्ट पोलीसखात्यासह सर्वांनाच हास्यास्पद वाटली. कारण पकडलेल्या शेकडो लोकांना पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्यांची नोंद करण्याच्या कारकुनी कामांत पोलीसांचे अवाढव्य मनुष्यतास खर्च होत होते व त्यामानाने त्यांतून होणारी वसुली नगण्य होती. पण या फुकट्या प्रवाशांची लक्षपूर्वक छननी केल्यावर त्यांतील काहींना गुन्हेगारीचा पूर्वेतिहास असल्याचे तर काहीजण खून, बेकायदा शस्त्र बाळगणे, लूटमार करणे, यांसारखे गंभीर गुन्हे करून फरारी झालेले आढळून आले. त्यामुळे पोलीसांना सुरवातीला हमालीसारख्या वाटणार्‍या कामांत "आज कोण सापडतंय?" या उत्सुकतेपोटी मजा वाटू लागली आणि दुसरा परीणाम असा झाला की सबवेंत विनातिकीट प्रवासाबरोबर इतर गुन्ह्यांचे प्रमाण तर कमी झालेच पण न्यूयॉर्क शहरांतील गुन्हेगारीचा चढत जाणारा निर्देशांक अल्पावधीतच एकदम खाली आला. ( Ref: "The Tipping Point" by Malcom Gladwell, Chapter 4, The Power of Context)

२) आपणही असे काही करू शकतो.
मध्यंतरी ठाणे व मुंबई येथे पोलीसांनी सार्वजनिक ठिकाणी शारीरिक प्रेमाचे चाळे करणार्‍यांवर दंडुका उगारून अनेक प्रेमी युगुलांना अटक केली होती. पोलीसांच्या या कृतीवर उलट सुलट मते व्यक्त करण्यांत आली. सकृद्दर्शनी बंदोबस्त, गुन्हे अन्वेषण, खटले भरणे, अशी अनेक महत्त्वाची कामे असतांना पोलीसांनी प्रेमी युगुलांच्या मागे लागावे हा अगोदरच अपुर्‍या असलेल्या पोलीसबळाचा अपव्यय आहे असे कोणालाही वाटेल. पण या 'बिनमहत्वाच्या' कारवाईंत काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.
पकडलेल्या जोडप्यांना नुसते दंड करून किंवा ताकीद देऊन सोडून देण्यापूर्वी त्यांतील कुणाचा गुन्हेगारीचा पूर्वेतिहास आहे का हे तपासून पाहिल्यास किंवा अन्वेषण प्रलंबित असलेल्या प्रकरणांतील न सापडलेल्या गुन्हेगाराचे वर्णन पकडलेल्यांपैकी कोणाशी जुळते आहे का ते पाहिल्यास गुन्हे अन्वेषणाला मोठी मदत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खून, बलात्कार, घातपात, सायबर क्राइम यांसारखे काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून न सापडलेले किंवा फरारी झालेले गुन्हेगार आयतेच हातांत सापडण्याची शक्यता आहे. त्यांना पुढील तपासासाठी ताब्यांत घेता येईल. काही काळाने त्याचा परिणाम गुन्हेगारी कमी होण्यांत होईल.

Comments

नक्किच

त्याचा परिणाम गुन्हेगारी कमी होण्यांत नक्किच होईल.

पण येथे पोलिसांच्या अपु-या संख्येचाही विचार करावा लागेल (त्याच वेळी आपल्या लोकसंख्येचाही). कदाचित तोच अमेरिकन पोलिस आणि भारतीय पोलिसांमधील मुख्य फरक असेल.

गुन्हे अन्वेषणाला मोठी मदत होण्याची शक्यता आहे
हे पटले.

आकडेवारी द्या..

कोर्डे साहेब,

अलिकडेच मुंबई, ठाणे परिसरातील काही प्रेमी युगुलांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यापैकी किती जण खून, बलात्कार, घातपात, सायबर क्राइम यांसारखे काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून न सापडलेले किंवा फरारी झालेले गुन्हेगार असल्याचे सिद्ध झाले आहे, याची आकडेवारी दिलीत तर आपल्या म्हणण्यात तथ्य आहे असे म्हणता येईल!

अन्यथा, पोलिसांना काही कामधंदा नसल्याने त्यांनी उगाचच्या उगाच प्रेमी युगुलांना पकडायची मर्दानगी दाखवली असेच म्हणावे लागेल.

मोठमोठे गुन्हे शोधता येत नाहीत, किंवा शोधले तरी राजकीय दबावाखाली काहीही करता येत नाही, म्हणून मग काही धागेदोरे हाती लागतात का हे बघण्याकरता उगाचच्या उगाच प्रेमी युगुलांना पकडायचा फार्स करायचा, हे पोलिसांच्या असमर्थतेचे पोकळ समर्थन आहे असे माझे मत आहे.

अनथा आकडेवारी द्या! तरच आपल्या म्हणण्यात पॉईंट आहे असे म्हणता येईल.

अर्थात, सार्वजनीक ठिकाणी असे काही प्रेमी चाळे करणे हे नक्कीच योग्य नाही आणि म्हणूनच प्रेमी युगुलांना निवांतपणे भेटायला, घटकाभर एकमेकांच्या हातात हात, गळ्यात गळे घालून बसण्याकरता काही प्रेमीपार्कसची नितांत आवश्यकता आहे असे मला वाटते!

अवांतर -

बाकी काही म्हणा कोर्डेसाहेब, एखाद्या छानश्या मुलीसोबत बागेतल्या अंधारात कुचुकुचू करण्यात मजा असते बरं का! ;)

असो!

आपला,
(कोपर्‍या-कोनाड्यातला!) तात्या.

राम राम कोर्डेसाहेब,

अलिकडेच मुंबई, ठाणे परिसरातील काही प्रेमी युगुलांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यापैकी किती जण खून, बलात्कार, घातपात, सायबर क्राइम यांसारखे काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून न सापडलेले किंवा फरारी झालेले गुन्हेगार असल्याचे सिद्ध झाले आहे, याची आकडेवारी दिलीत तर आपल्या म्हणण्यात तथ्य आहे असे म्हणता येईल!

अहो आकडेवारी देताय ना?

तात्या.

इथे आम्ही काहीही बरळतो - http://tatya7.blogspot.com/

आकडेवारी?

कोर्डॅसाहेब,

आकडेवारीची वाट पाहात आहे!!

तात्या.

संत तात्याबा गमभन वापरतात!

कोर्डेकाका

आपल्या लेखाशी मी सहमत. पण त्यासाठी पोलीस दलाने नविन विभाग तयार केल्यास उत्तम. पोलीसांची नजर बरोबर ओळखते कोण गुन्हेगार आणि कोण सज्जन. प्रेमी युगुलांवंर कारवाई झालीच पाहीजे.
आपला
कॉ.विकि

खरं आहे..

प्रेमी युगुलांवंर कारवाई झालीच पाहीजे.

खरं आहे! भर गर्दीच्या वेळी लोकल गाडीमध्ये बाँबस्फोट होऊ देत, त्यात अनेक निरपराध माणसांचे बळी जाऊ देत, घरफोड्या होऊ देत, दरोडे पडू देत, घरात शिरून असहाय्य वृद्धांची दिवसाढवळ्या हत्या होऊ दे, गँगवॉर होऊ देत, रोज नवीन नवीन दादा आणि भाई उदयाला येऊ देत, सरकारी कार्यालयातील भरदिवसा सर्वांसमक्ष आणि सर्वांच्या साक्षीने होणारी लाचखोरी तशीच अव्याहतपणे होऊ दे, खुद्द् पोलिस खात्याला अगदी यथासांग, त्यांचा जन्मसिद्ध अधिकार असल्यासारखी लाच खाऊ दे, अगदी काहीही होऊ दे! याबाबत पोलिसखाते शिथील राहिले तर राहू देत बापडे, पण प्रेमी युगुलांवंर कारवाई झालीच पाहीजे.!!

वा! काय पण पोलिसांची कार्यक्षमता! मानना पडेगा बॉस! ;)

तात्या.

१) मीही काही मित्रांच्या सांगण्यावरून विकिपिडियाचा सदस्य झालो आहे, पण तिथे मी फारसा जात नाही!
२) मी गमभन वापरत नाही. इथेच काय ते डयरेक्ट लिहितो! आता इथे लिहिणंही गमभनचाच वापर केल्याने होतं की काय, ही तांत्रिक माहिती मला नाही!

इथे आम्ही काहीही बरळतो - http://tatya7.blogspot.com/

असे वाटत नाही

'बिनमहत्वाच्या' कारवाईंत काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

न्यूयॉर्कमधल्या घटनेत कायदा मोडणारे लोक पकडायचे होते. एक कायदा मोडणारे लोक एकाहून जास्त कायदे मोडत असतील असे होणे तर्कसंगत आहे. प्रेमी युगुले कसले कायदे मोडत नाहीत असे वाटते. त्यामुळे त्यांच्यात असे काही धागेदोरे सापडण्याची शक्यता अगदीच नगण्य.

सहमत

मृदुलाशी सहमत. प्रेमी युगुले कायदा मोडत नसल्यामुळे त्यांतून गुन्हेगार सापडण्याचे प्रमाण अगदीच अत्यल्प ठरेल. मृदुलाचे "एक कायदा मोडणारे लोक एकाहून जास्त कायदे मोडत असतील असे होणे तर्कसंगत आहे" हे वाक्य १००% पटण्यासारखे आहे. असा कोणताही तर्कसंगत निष्कर्ष वरील चर्चाप्रस्तावातून काढता येईल असे वाटत नाही.

प्रवृत्ति महत्त्वाची

प्रेमी युगुलांच्या प्रेमाच्या प्रकटीकरणांत काही गोष्टी जाहीर रीतीने करण्याला (त्याबाबतींत कायदा अस्तित्वांत नसल्यामुळे) कायदेशीर किंवा बेकायदेशीर म्हणता आले नाही तरी त्या लोकांच्या दृष्टीने आक्षेपार्ह असू शकतात. अशा वागण्यांत इतरांच्या मताबद्दल बेपर्वाई दिसून येते. ही बेपर्वा वृत्ति असणारे कायद्याच्या दृष्टीने आक्षेपार्ह - म्हणजेच बेकायदेशीर - कृति करायला मागेपुढे न पाहण्याची शक्यता असते.

चायनीजच्या गाड्या!

ही बेपर्वा वृत्ति असणारे कायद्याच्या दृष्टीने आक्षेपार्ह - म्हणजेच बेकायदेशीर - कृति करायला मागेपुढे न पाहण्याची शक्यता असते.

आजच्याच वर्तमानपत्रातील एका बातमीचा गोषवारा -

ठाण्यात अनेक ठिकाणी रस्त्यावर चायनीजच्या गाड्या लागलेल्या असतात. अत्यंत थर्डरेट माल वापरून या गाड्यांवर चायनीज पदार्थ बनवले/विकले जातात. या गाड्यांवर बनणार्‍या चायनीज पदार्थांसोबत खाण्याकरता मिळणारे चिली सॉस आणि सोया सॉस याचं उत्पादन हे धारावी सारख्या झोपडपट्टीमध्ये अत्यंत गलिच्छ वस्तीत होतं.

अनेक मंडळी या रत्यावरच्या कडेला लागलेल्या चायनीज गाड्यांवर स्वस्तात मिळतं म्हणून गर्दी करतात. इथे येणारे लोक हे हळूच, चोरून मद्यपानही करत असतात. त्यात काही माझ्या ओळखीचे पोलिसही आहेत. आपण म्हणत असाल तर त्यांची नांवं आपल्यास देतो! उपक्रमावर, किंवा मनोगतावर एखादा चर्चाविषय टाकून, किंवा वर्तमानपत्रात त्यांच्या विरुद्ध आवाज उठवून करता त्यांच्यावर कारवाई? बोला कोर्डेसाहेब!

आपल्या गाडीवर मिळणार्‍या पदार्थांचं लोकांना व्यसन लागावं म्हणून हे चायनीज गाडीवाले त्यात अफूही मिसळतात. एका चायनीज गाडीवरील पदार्थ खाऊन एक अठरा वर्षांची मुलगी नुकतीच मृत्युमुखी पडल्याची घटना ठाण्यात घडली आहे. त्या संपूर्ण कुटुंबाने रस्त्याच्या कडेला असलेल्या चायनीज गाडीवरून जेवण मागवलं होतं, त्यात ती मुलगी वारली आणि तिचे इतर कुटुंबीय रुग्णालयात आहेत.

सर्व सरकारी यंत्रणा, म्हणजे अन्न व औषध खाते, महापालिका, आणि प्रेमी युगुलांना पकडणारे आमचे शूरवीर (!!) पोलिस हा सगळा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहात असतात! ;)

ही बेपर्वा वृत्ति असणारे कायद्याच्या दृष्टीने आक्षेपार्ह - म्हणजेच बेकायदेशीर - कृति करायला मागेपुढे न पाहण्याची शक्यता असते.

अच्छा? बरं बरं!

कोर्डेसाहेब, प्रेमी युगुलांच्या बाबतीत आपण तर नुसती शक्यता वर्तवताय. अहो पण जिथे सर्वांसमक्ष कायद्याचे सर्रास उल्लंघन होतं त्या बाबतीत प्रेमीयुगुलांना पकडणारे शूरवीर पोलिस काहीच कारवाई कशी करत नाहीत? बोला कोर्डेसाहेब! प्लीज उत्तर द्या!!

आणि त्या बाबतीत उपक्रमावर एखादा चर्चाविषय आपण कळकळीने टाकाल्याचं मला आठवत नाही! टाकला असेल तर कृपया दुवा द्या!

कोर्डेसाहेब, मी माझ्या नोकरीधंद्याच्या निमित्ताने मुंबईचा मटका बाजार, रेडलाईट एरिया, फुगे भरलेल्या हातभट्टीचा व्यवसाय, रस्त्याच्या कडेला चालणारा वैश्या व्यवसाय हे सगळं फार जवळून पाहिलं आहे. इथे नक्की काय काय चालतं आणि पोलिसांच्या साक्षीने हरक्षणी कायद्याचं कसं उल्लंघन होतं याची कदाचित आपल्याला कल्पना नसावी असं वाटतं!

महापालिका अधिकरी, मंत्रालयातील गृहखात्यातील मंडळी, आणि हो, प्रेमी युगुलांना पकडणारे आणि पर्यायाने कायद्याचं (!!) पालन करणारे आमचे शूरवीर पोलिसही फार जवळून पाहिले आहेत! किती उदाहरणं देऊ बोला! अगदी त्यांच्या पदानिशी, आणि नावानिशीही!

वरील सगळे धंदे सोडून आपले शूरवीर पोलिस प्रेमी युगुलांना पकडण्यात मशगूल आहेत त्याबद्दल पोलिसांचं आणि इतर सरकारी यंत्रणेचं कौतुक करावं तेवढं थोडंच! लवकरच या सर्व सरकरी नोकरशाही मंडळींचं कौतुक करणारा (!!) एखादा चर्चाविषय आपण टाकावा अशी आपल्याला नम्र विनंती!

एवढे सगळे अनधिकृत धंदे सोडून, जिथे सर्वप्रकारच्या गुंडगिरीला अगदी पोषक वातावरण असतं, त्या ऐवजी आमचे पोलिस प्रेमीयुगुलात एखादं गुन्हेगारीचं बीज तर सापडत नाही ना म्हणून कारवाई करतात असं म्हणणं हे माझ्या मते अत्यंत विनोदी किंवा पोरकटपणाचं (!) आहे!

कोर्डेसाहेबांकडून उत्तराच्या अपेक्षेत! म्हणजे मलाही पुढे ही चर्चा सुरू ठेवता येईल! ही तर केवळ मी एक झलक सांगितली!

आपला,
(ठाण्यामुंबईतलं गुन्हेगारी विश्व खूप जवळून पाहिलेला!) तात्या.

संत तात्याबा गमभन वापरतात!

तात्यानू....

(ठाण्यामुंबईतलं गुन्हेगारी विश्व खूप जवळून पाहिलेला!) तात्या.
-आपण कंपनीचा (डी,जी,आर.)माणुस तर नाही ना .
आपल्याला घाबरलेला
कॉ.विकि

असहमत

नव्वदच्या दशकात न्यूयॉर्कमधील गुन्हेगारीचे प्रमाण कमी होण्यामागे अनेक कारणे सांगितली जातात. कार्यक्षम पोलीस, वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था वगैरे. 'फिक्सिंग ब्रोकन विंडोज' थिअरी किंवा वरील लेखात सांगितलेले विनातिकीट प्रवाशांना पकडण्याचे धोरण यामुळेही गुन्हेगारीला आळा बसला असे सांगण्यात येते.

प्रत्यक्षात 'फ्रीकॉनॉमिक्स' या गाजलेल्या पुस्तकात डॉ. स्टीव्हन लेविट यांनी वेगवेगळा विदा (डेटा) देऊन दाखवून दिले आहे की, याला सत्तरच्या दशकात पारित झालेला गर्भपाताला अनुमती देणारा कायदा मुख्यत्वेकरून कारणीभूत आहे. न्यूयॉर्कमध्ये वाढत्या गुन्हेगारीला कारणीभूत गुन्हेगार हे १६ ते २४ या वयोगटातून, गरीब परिस्थितीतून आलेली मुले होती. गर्भपाताला कायदेशीर मान्यता मिळाल्याने आईलाच नकोशी झालेली, गरिबीतून वर आलेली ही शेकडो मुले जी अखेरीस गुन्हेगारीकडे वळतात, ती जन्माला आलीच नाहीत. १९७३ मध्ये पारित झालेल्या या कायद्याने १६-१८ वर्षांनंतर आपला असा परिणाम दाखवला.

अर्थात, यातून अधोरेखित होणारी गोष्ट एवढीच की केवळ दोन परस्परांना कारणीभूत होऊ शकतील अशा घटना एकाच वेळी घडल्याने त्यांच्यांत कार्यकारणभाव प्रस्थापित होतोच असे नाही. कावळा बसायला आणि फांदी तुटायला गाठ पडते तसे. कदाचित डॉ. लेविट यांनी मांडलेले कारण खरे नसेलही (त्यांनी इतका वेगवेगळा विदा [डेटा] त्याच्या पुष्टीकरणासाठी दिला आहे, की त्यांनी दिलेले कारणच सर्वात सयुक्तिक वाटते), पण ते ही गोष्ट (कार्यकारणभाव प्रस्थापित करण्याची) ठळकपणे दाखवून देते.

त्यामुळे तसेच भारतातही करावे, असे सुचवणे योग्य वाटत नाही. नुकतीच ऐरोली पुलावर एका पंधरा वर्षीय तरूणीवर बलात्कार झाल्याची जी घटना घडली, त्यानंतर असं समजलं की ते प्रेमी युगुल तेथे येण्यापूर्वी जेमतेम दहा मिनिटे आधीच पोलीसांची गाडी तेथे आली होती आणि त्यांनी तेथे आलेल्या प्रेमी युगुलांना हटवण्याचे काम बजावले होते. जर त्यांनी तसे केले नसते, तर कदाचित एकटेपणाचा फायदा घेऊन अपराध्यांना संधी साधता आली नसती.

पोलीसबळाचा वापर यापेक्षा इतर चांगल्या गोष्टींत नक्कीच करता येईल. ठाणे-मुलुंड स्थानकांबाहेर सुरु असलेल्या रॅकेटविषयी नुकतेच वृत्तपत्रांत वाचले. गर्दीच्या वेळेस एखादी महिला कुणाला तरी हेरून त्याला धक्का मारते आणि त्या माणसानेच धक्का मारला असा आरडाओरडा सुरू करते. गर्दी जमते, पोलीस येतात, सावजाला पकडून नेऊन समज देतात आणि त्याचे पाकीट हलके करून तडजोड केल्याचा आव आणतात नि त्याला सोडून देतात. पुन्हा चक्र सुरू. अशी अवस्था असताना, प्रेमी युगुलांवर कारवाई करण्याचा -- तोदेखील एकंदर समाजाच्या सुरक्षिततेला धोका पोहोचू शकतो या सबबीखाली, अधिकार पोलीसांना देणे म्हणजे चोराच्या हाती जमादारखान्याची किल्ली देण्यासारखेच होईल.

फ्रीकॉनॉमिक्स आणि कार्यकारणभाव

नंदन यांनी सांगितलेले फ्रीकॉनॉमिक्स मधील विश्लेषण आणि खाली राजेंद्र यांनी मांडलेला कार्यकारणभावाचा मुद्दा यांच्याशी सहमत आहे.

अवघड

या दोन गोष्टींमध्ये कार्यकारणभाव असणे अवघड वाटते. धागेदोरे हवे असतील तर पोलिसांकडे साध्या वेशातील हेर, खबरे अशी बरीचशी साधने असतात. त्यासाठी प्रेमी युगुलांच्या मागे लागण्याचे कारण नाही.

कार्यकारणभाव

न्यूयार्क शहरांतील गुन्हेगारी कमी होण्याचे "द टिपिंग पॉइंट" पुस्तकांत दिलेले कारण म्हणजे न सापडलेले व फरारी गुन्हेगार (विनातिकीट प्रवासाचा गुन्हा केल्यामुळे) आयतेच हातांत सापडले. त्यामुळे ते मोठ्या प्रमाणावर पोलीसांच्या ताब्यांत आले व गुन्हे करायला मोकळे राहिलेल्या गुन्हेगारांची संख्या बरीच घटली. शिवाय जे मोकळे राहिले तेही सावध झाले व त्यांनी ज्यास्त धोका न पत्करायचे ठरवले.

 
^ वर