मध्यमवर्गाचे मासीक खर्चाचे बजेट

उपक्रमावर काही चर्चांमधे मध्यमवर्ग, नवराबायको दोघांनी नोकरी (चैन की गरज) यावरुन असे वाटते आहे की मध्यमवर्ग म्हणजे नेमके कोण, आजच्या भारतीय शहरात, सोयीसाठी पुणेच समजुया, एका छोट्या कुटुंबाकरता म्हणजे बघा नवरा-बायको व एक अपत्य (एक अपत्य याकरता की एका अपत्याचा खर्च निघाला की दोन मुले म्हणजे साधारण ८०% ते १००% तेवढा वाढीव धरता येईल )

सोयी करता आपण या महीन्याच्या खर्चात घरभाडे अथवा घरकर्जाचा हप्ता धरायला नको कारण ज्याचे त्याचे घराचे बजेट. कोणी ५० हजार रुपये होम लोन मासीक हप्ता देत असेल (यांना मुळातच मध्यमवर्गीय म्हणावे का? हा चर्चेचा वेगळा मुद्दा असो.) कोणी १०,००० रु.

बरं शहरात रहाणार्‍या एका सामान्य कुटुंबाचा खर्च तो नेमका काय असेल याचा अंदाज लावूया. एक यादी देत आहे त्यात काही कमी आहे का सांगा. मी यादीत ज्या गोष्टी लिहीत आहे त्या शक्यतो गरजेच्या व बेताची चैन म्हणता येतील अश्याच आहेत. अर्थात आपल्या मतांचा, सुचनेचा आदर आहेच.

हेतू असा की त्या निमित्ताने
१) आजचा ते म्हणतात ना की आटे-डाल का भाव कळेल.
२) खर्च पाहून सिंगल् इंजीन की डबल इंजीन चैन की गरज अंदाज येईल.
३) पैशाच्या मागे सुसाट पळणार्‍या मध्यमवर्गियांना एक गोल मिळेल की साधारण कितपत कमावले तर करीयर मधे फार तडजोड करायची गरज नाही किंवा आधी गरज असेल पण मग एकजण कुटुंब संस्था मोडकळीस न येता जीर्णोद्धार करायच्या कर्तव्याकडे वळू शकेल.

त्यामुळे घरात मध्यमवर्गीय घरात महीन्याचा
किराणा व भाजीपाला = महीन्याला किती लागतील तीन जणांच्या कुटुंबाला
दुध = दिवसाला एक लिटर धरले तर महीना ३० लिटर चितळे / कात्रज दुधाची पिशवी??
गॅस सिलिंडर= महीन्याला एक सिलिंडर
वीज बील = १ किंवा २ बी एच के फ्लॅट (ट्युबलाईट्, फ्रीज, टिव्ही, गीझर, पंखा)
पाणीपट्टी / महानगरपालीका टॅक्स =
एक धुणीभांडीवाली/ला महीना पगार =
प्रवास खर्च, रिक्षा , पेट्रोल, दुचाकी सर्व्हिसींग (नवरा + बायको) =
वर्तमानपत्र=
केबल टिव्ही =
मोबाईलचे बील (माणशी एक फोन असल्याने लँड लाईन खर्च चैन समजुन धरला नाही.) =
इन्शुरन्सचा हप्ता / सरासरी वैद्यकिय बील =
मुलाची शाळा, रिक्षा/बस, छंद वर्ग/ पॉकेट मनी =
इस्त्री, लॉन्ड्री =
महिन्यात किमान एखादा सिनेमा /नाटक /कार्यक्रम (३ तिकीटे) = प्रकाशकाका यांच्याकडे चौकशी केली तर हे मोफत देखील होउ शकेल
हाटेलात खाणे पिणे =
ग्रंथालय फी =
सोसायटीची वर्गणी =

काही खर्च अगदी महीन्याचे महीन्याला होत नसले (उदा. सहा महीन्यातुन एकदा कपडे खरेदी) तरी एक महीना सरासरी रक्कम काढता येईल त्यात
कपडेलत्ते खर्च =
एक वार्षीक सहल =

अजुन एक खर्च म्हणजे दुनियादारी. म्हणजे बघा कितीही माणुसघाणे म्हणले तरी किमान काही लोक ओळखीचे असतात त्यामुळे कधी बर्थे डे पार्टी, कधी लग्न इ कार्यक्रम, ऑफीसमधे काही कार्यक्रम असला तर त्याचे कॉंट्रीब्युशन इ. कधी आपल्याकडे कोणी रहायला आले तर त्यांचा पाहुणचार इ.

याला काय व्हेरीयस ऑव्हरहेडस का जे नाव द्याल ते =

जनरल हाउस होल्ड खर्च /सिझनल म्हणजे ट्युबलाईट बदलणे, चप्पलबूट खरेदी, केस कापणे, पावसाळा सुरु झाला तर रेनकोट, छत्री, मे महीन्यात असे दर महीन्यात रिपिट न होणारे पण दर महीन्याला यातले कशा न कशावर खर्च होणारे.

जनरल अदर =

अजुन काय आठवत असेल तर सांगा, तसेच प्रत्येक गोष्टीतल्या खर्चाकरता साधारण किती रक्कम एका तुमच्या कल्पनेतल्या मध्यमवर्गीय कुटुंबाने खर्च करावी हे लिहा.

शक्यतो कोणाला अर्धपोटी ठेवू नका. मुलाला अति महागड्या किंवा मनपाच्या शाळेत पाठवू नका.

चला सगळे मिळून काय बजेट होते पाहूया!

Comments

यादी तयार होते आहे

यादी तयार होते आहे. थोडा वेळ लागेल.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

आणखी काही खाती

मी अजून संसारात पडायचा आहे, तरीपण एकत्र कुटुंबातील एक कमावती व्यक्ती असल्यामुळे मला खर्चाच्या ज्या काही बाबी माहित आहेत (जिचा आम्ही मासिक खर्चात नेहमीच समावेश करतो) व ज्यांचा उल्लेख या धाग्यात आलेला नाही, त्या म्हणजे ~~

१. हॉस्पिटल -- कित्येकांना असे वाटते की, दवाखाना ही काही नित्याची बाब नाही, पण ज्यावेळी या दिशेकडे पाऊल वळते त्यावेळी बसणारा फटका डोळ्यासमोर काजवे चमकवितो. त्यामुळे माझ्या घरातील ज्येष्ठांनी ही पध्दत पाडली आहे की, घरात दरमहा येणार्‍या "आय्" मधील काही विशिष्ट रक्कम "दवाखाना" या खात्यासाठी बाजुला काढायचीच मग त्या स्पेसिफिक महिन्यात त्या विभागात खर्च होवो वा ना होवो. मला संसार सुरू करण्यापोटी ज्या काही टिप्स मिळतात त्यात अशा पध्दतीचे एक "रिझर्व्ह" खाते जरूर ठेवावे असे सांगितले जाते. त्यात नक्कीच तथ्य असणार. (माझ्या घरी प्रतिमहा एक हजार रुपये या खात्यावर टाकले जातात. आता तिथे बर्‍यापैकी आकडा दिसत आहे, त्यामुळे मागील् महिन्यात या ना त्या कारणाने घरातील लहानमोठ्यांच्या तीनचार् वेळा दवाखान्याच्या चकरा झाल्या तरी बिलाबाबत चिंता वाटली नाही. हाही एक फायदा किंवा "रिलिफ" म्हणावा लागेल.)
२. कॉम्प्युटर् -- वीज बिलात हा एक आयटम घालावा लागेल. आज जवळजवळ सर्वच मध्यमवर्गीय कुटुंबात संगणक आवश्यक घटक बनला आहे (धाग्यात 'पुणे' हे शहर गृहीत आहे, तेव्हा तर ही बाब अशा कुटुंबात असावीच.)
३. घरात मुलींची संख्या मोजण्याइतकी असेल तर् सौंदर्यप्रसाधनाचा खर्च धरणे क्रमप्राप्त आहे.
४. मुलांच्या शाळेबाबत लेखकाने "रिक्षा/बस, छंदवर्ग, पॉकेटमनी" या बाबींचा उल्लेख केला आहे. पण "देणगी" हा एक अत्यंत घातक असा प्रकार या शिक्षणाच्या बाजारात बोकाळला आहे. आणि कुणी कितीही म्हणो शासन या देणगी व्हायरसला आटोक्यात आणु शकलेले नाही. जरी वर्षातून एकदाच हा देणगीचा बागुलबुवा भेटत असला तरी त्याला १२ महिन्यांनी भागले तर मासिक बजेट कोलमडलेच. उदा. गेल्या वर्षी स्वतः मी माझ्या मावसबहिणीच्या ११ वी सायन्सच्या प्रवेशासाठी शहरातील एका नामवंत महविद्यालयात १५ हजार भरले, म्हणजे इकडे मासिक खर्चात १२०० रुपयाचा खड्डा पडला. (अर्थात हे प्रत्येक कुटुंबाला लागू होईल् असे नाही, पण असाही आकस्मिक खर्च असू शकतो - हे सांगण्याचा उद्देश.)

असो.
(एका गोष्टीबाबत धागाकर्ते श्री.सहज यांचे अभिनंदन ~~ त्यांनी मासिक खर्चात "ग्रंथालय" या बाबीचा समावेश केला आहे. ही अनुकरणीय बाब आहे. मी नगर ग्रंथालयाची वार्षिक वर्गणी भरतो, जी रुपये ३५०/- आहे, म्हणजे महिना ३०/- पेक्षा कमी. एक लिटर पेट्रोलचा खर्च याच्यापेक्षा जास्त होतो. त्यामुळे कुणीही ग्रंथालयावर जादा खर्च होतो असे म्हणू नये.)

धन्यवाद

धन्यवाद प्रतिक. पण इथवर थांबू नका कृपया कोष्टक बनवा व लिहाच. जे काही तुम्हाला माहीती आहे उदा. तुमचा महीन्याचा प्रवास खर्च तो लिहाच.

मी "इन्शुरन्सचा हप्ता / सरासरी वैद्यकिय बील = " असे लिहले आहे बघा.

हो मी संगणक त्याचे पैसे फिटले समजा. तरि ब्रॉडबेंडचा खर्च धरला नाही पण तो साधारण महीना २०० रु असावा. अर्थात धम्मकलाडू यांना सांगावे की मध्यमवर्गीय कुटूंबाला संगणक, इंटरनेट चैन की गरज. :-)

सौंदर्यप्रसाधने म्हणा किंवा दाढीचे ब्लेड इ म्हणा. वैयक्तिक खर्च असा एक रकाना करता येईल. तीन सदस्य व त्यांचा महीन्याचा असा साधारण गरजेचा वैयक्तिक खर्च.

एक अंदाज

किराणा व भाजीपाला = 3500 ते 4000 लागावेत
दुध = (प्रतिदिवस 32 रुपये पकडल्यास) 1000 रुपये
गॅस सिलिंडर= महीन्याला एक सिलिंडर (नवीन दराप्रमाणे 360?)
वीज बील = 350 रुपये
पाणीपट्टी / महानगरपालीका टॅक्स = 750
एक धुणीभांडीवाली/ला महीना पगार = आम्ही घरीच सगळी कामे करतो. त्यामुळे कल्पना नाही.
प्रवास खर्च, रिक्षा , पेट्रोल, दुचाकी सर्व्हिसींग (नवरा + बायको) = 4000
वर्तमानपत्र= 75 (सकल जनांचा सोबती सकाळ)
केबल टिव्ही = 250
मोबाईलचे बील (माणशी एक फोन असल्याने लँड लाईन खर्च चैन समजुन धरला नाही.) = प्रीपेड आहे पण साधारणतः 600 यावा
इन्शुरन्सचा हप्ता / सरासरी वैद्यकिय बील = 3000 ?
मुलाची शाळा, रिक्षा/बस, छंद वर्ग/ पॉकेट मनी =नो आयडिया
इस्त्री, लॉन्ड्री = 350
महिन्यात किमान एखादा सिनेमा /नाटक /कार्यक्रम (३ तिकीटे) = मी पाहत नाही पण 500 पकडावा
हाटेलात खाणे पिणे =मी शक्यतो करत नाही पण 1000 पकडावा
ग्रंथालय फी =नाही त्याऐवजी जमेल तशी पुस्तके विकत घेतो. (700 रुपये प्रतिमहिना सरासरी)
सोसायटीची वर्गणी = 500
इंटरनेट चे भाडे = 1050


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अच्छा

साधारण १८०००/- रु.

मोबाईलचे बील (माणशी एक फोन असल्याने लँड लाईन खर्च चैन समजुन धरला नाही.) = प्रीपेड आहे पण साधारणतः 600 यावा
हे ६०० एकाचे की दोघांचे?

बाय द वे मी जो इन्शुरन्स् धरला आहे तो खर्च आहे, गुंतवणुक प्रकारच्या पॉलीसी नाहीत. उदा. मेडीकल, मोटर, टर्म लाईफ इ. ही हे पैसे परत मिळणे नाही.

अजानुकर्ण धन्यवाद.

इन्शुरन्स=खर्च

मोबाईलचे बिल 600 रुपये दोघांचे धरले आहे. (लग्नाला किती वर्षे झाली आहेत यावर हे मोबाईलचे बिल अवलंबून असावे असे वाटते.) जसजसे लग्न जुने होईल तसा मोबाईलचा खर्चही कमी व्हावा.

मीही इन्शुरन्स खर्च म्हणूनच धरला आहे. उदा. हेल्थ इन्शुरन्स व टर्म पॉलिसी वगैरे.

शिवाय वरील खर्चात घर स्वतःच्या मालकीचे आहे असे गृहित धरुन ईएमआय किंवा घरभाडे लावलेले नाही. तेही परिस्थितीनुसार खर्चात धरावे लागेल.

बायकांच्या सौंदर्यप्रसाधनावर होणाऱ्या खर्चाचा मला अंदाज नाही. त्या फ्याक्टरमुळे खर्च एक्सपोनेंशियली वाढतो असे अनुभवी मित्र कळवतात.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

धन्यु

खुलाशाबद्दल धन्यवाद :-)

बाकी अजुन काही खर्च धरायचा राहीला आहे का मुळ धाग्यात? तसेच हे एका मध्यमवर्गीय कुटुंबाचे मासीक खर्च दर्शवतात असे वाटते ना?

मिटर बंद आहे का ?

>>वीज बील = 350 रुपये
वीज मिटर बंद आहे का तुमचे ?

-दिलीप बिरुटे

बत्ती ना बुझा मुझे लगता है डर

नाही हो. वीज मीटर चांगले जोरात पळते. पुण्यात दरमहा वीजबिल येते. (ग्रामीण भागात द्वैमासिक किंवा त्रैमासिक असावे.) मागच्या मे महिन्यात 670रु. पर्यंत बिल आले होते. तसेच ऑक्टोबरमध्येही येते. पण वर्षभराची सरासरी काढल्यास 350 प्रतिमाह वीजबिल येते.

आमच्याकडे टीवी, फ्रीज, मिक्सर, वॉशिंगमशीन, पंखे, सीएफएल बल्ब व ल्यापटॉप वगळता इतर इले. साधने नाहीत. त्यातही माझ्या घरच्यांना उन्हाळा वगळता इतर ऋतुंमध्ये पंख्याची गरज भासत नाही. मला पंख्याच्या हवेपेक्षा त्याच्या आवाजाची जास्त सवय आहे. त्यामुळे माझ्यापुरता पंखा मला लावावाच लागतो.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

पाळणाघर आणि इंटरनेटचा खर्च राहिला यादीत...

ही यादी खूपशी आमच्या यादीशी जुळते आहे. फक्त यात एका मुलाचा पाळणाघरात ठेवायचा महिन्याला १५०० रुपये खर्च आणि ब्रॉडबँड इंटरनेटचा मासिक ५०० रुपये खर्च हे समाविष्ट व्हायला हवेत. (लागू असेल त्यांच्यापुरते)

पुण्यातल्या पुण्यातही अनेक खर्च वेगवेगळे असतात. आमच्या कर्वेनगर भागात भाज्या ६० ते ८० रुपये किलो आहेत. जणू काही सगळेच बंगल्यात राहातात आणि आयटीमध्ये काम करतात, अशी भाजीवाल्यांची समजूत दिसते. मार्केटयार्डमध्ये घाऊक भावाने घेतल्यास भाज्या स्वस्त पडतात आणि फुले मंडईतही इथल्यापेक्षा थोड्या स्वस्त मिळतात पण तेवढ्यासाठी तिकडे कोण जाणार? सध्या कोथिंबीर २० रुपये जुडी, पालेभाजी १८ रुपये जुडी आहे. पाच रुपयांची कोथिंबीर (चार काड्या) घेतल्यास भाजीवाला सहानुभूतीने बघतो. हल्ली पूर्ण नारळ आणणे सोडून दिले आहे. गरज पडेल तेव्हा ६ रुपयाची फोडलेली वाटी आणतो. एक रुपयाचे नाणे देवळात टाकण्यासाठी, भिकार्‍याला देण्यासाठी किंवा वजनकाट्यावर दोन मिनिटे स्वतःचे वजन बघून करमणूक करण्यासाठी उपयोगी पडते. फळे परवडत नाहीत म्हणून मग मुलांनाच आठवड्यातून दोन वेळा २० रुपयांच्या फ्रूट डिश खायला घालतो. लाज वाटते, पण परिस्थितीपुढे इलाज नाही. हॉटेलिंग बंद केले आहे. आयटीमध्ये काम करणार्‍यांकडे खूप आदराने बघतो. कुणी स्वखर्चाने पार्टी देत असेल तर त्याला देव भरपूर देवो, अशी कामना करतो. जे परदेशात गेले आहेत त्यांच्या समयसूचकतेचे कौतुक करतो.

अरे मित्रांनो. हे बजेट निश्चित झाल्यावर कुठेकुठे खर्च वाचवता येईल, याचा एक धागा सुरू करुया का?
(बाकी कुछ बचा वो महंगाई मार गई)

जरुर

>हे बजेट निश्चित झाल्यावर कुठेकुठे खर्च वाचवता येईल, याचा एक धागा सुरू करुया का?

जरुर. पण योगप्रभु आपल्यामते अजानुकर्ण यांच्या अंदाजपत्रकात २००० रु घालून पुरेसे आहेत? कारण आपल्या मते कदाचित किराणा-भाजीपाला मधे वाढ होउ शकते. तसेच पाळणाघरा व्यतिरिक्त मुलाच्या खर्चात काही वाढ होउ शकते?

तसेच आपल्याकडे मोलकरीण, गडी येत असल्यास?

कृपया तुमच्या मते बजेट अजुन काटेकोर करण्यास सहकार्य करावे.

काटेकोर होईल का शंकाच आहे.

आमच्याकडे पोळ्या, झाडलोट व भांडी यासाठी ज्या मावशी येतात त्यांना आम्ही महिन्याला १००० रुपये देतो. दिवाळीच्या वेळी एक महिन्याचा पगार जादा (बोनस) म्हणून द्यावा लागतो. म्हणजे वर्षाला आमचे १३००० रुपये यावर जातात. गडी म्हणाल तर नवरा म्हणून मी असतोच वरकड कामाला त्यामुळे तो खर्च नाही. :)

काल इंधन वाढल्यावर पहिली वाढ रिक्षावाल्या काकांनी केली आहे. मुलगी शाळेला जाते. त्यासाठी महिन्याला ३५० रुपये होते ते जुलै महिन्यापासून ४०० रुपये झाले. आता इतर खर्च हळू हळू वाढतील. गॅस वाढला आहे त्यामुळे खाद्यपदार्थांचे भाव वाढतील.

(पाळणाघरात एक तास मूल ठेवण्यासाठी मासिक किमान २५० रुपये दर आहे. म्हणजे तुम्ही रोज सहा तास मूल तेथे ठेवत असाल तर महिन्याला १५०० रुपये द्यावे लागतात. त्यातून मूल सहा महिने ते दोन वर्षापर्यंतचे असेल तर हा दर अधिक असतो. ते एक वेगळेच अर्थशास्त्र आहे.)

एक काम करावे. हे अंदाजपत्रक तयार करताना प्रत्येक कामासाठीचा एक बेस रेट पकडून चालावे. म्हणजे मग त्यावरून पुढचा अंदाज करता येईल. आजानुकर्ण यांच्या अंदाजपत्रकाच्या धर्तीवर एक समावेशक असे वेळापत्रक व्हावे. मीपण करून बघतो.

महिन्याचे बजेट आणि आय. टी.

आय. टी. मधील लोकांमुळे भाववाढ होत आहे असा प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष आरोप होताना दिसतो. पण आय. टी वाले नीट तक्त्ते वगैरे आखून काम करतात याचे उदाहरण खाली देत आहे.

http://tinyurl.com/3729ynv

यात आपण फक्त आपले आकडे टाकले की आपले महिन्याचे बजेट तयार!

धन्यु

शंतनु यांचे लेखन नेहमीच अतिशय उपयुक्त.

शंतनु कृपया धाग्यास उपयुक्त असे आपल्या अनुसार कोष्टक इथे टंका अथवा दुवा द्या ना. आपल्यामते वरील मुद्दे लक्षात घेता कितीचे बजेट होईल्?

'आयटी'मुळे भाववाढ : वाल्यांमुळे नाही

आयटीवाल्यांनी स्वतःच्या खर्चावर नियंत्रण ठेवले तरी त्यांच्या पगाराचे आकडे बाहेर जातात.
"तुम्ही एवढे कमावता, मग आम्हालाही थोडे कमावू द्या ना" असे म्हणत भाववाढ होते आणि बिन आयटीवाल्यांना तिचा फटका बसतो.

शंतनुराव, तुमचे अंदाजपत्रक वाचले. अजून लग्न झालेले दिसत नाही. सुपा(/खा)त आहात. असो...

सहमत आहे

प्रतिसादाशी सहमत आहे.

पण आयटीवाल्यांना जबाबदार धरण्याचे एक कारण म्हणजे काही मूर्ख आयटीवाले विचार न करता खर्च करत असतात. आणि त्याच्या परिणामांचा विचार करत नाही.

एक उदा. हिंजवडी ते डांगे चौक या 5 किमी अंतरासाठी रिक्षाला 150 रुपये देणारे अनेक आयटीवाले/आयटीवाल्या मी सर्रास पाहतो. सहा सीटरने गेल्यास हे काम फक्त 8 रुपयात होते. बसने गेल्यास 5 रुपये. त्यामुळे सर्व रिक्षावाल्यांची अपेक्षा आता या अंतरासाठी 150 रुपये झाली आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सरकारी

भारतात सरकार कडून काय केले जाते आहे याची सद्य कल्पना नाही.
पण ऑस्ट्रेलियन सरकार बजेट बनवण्यासाठी मदत करते.
खाली दिलेल्या सरकारी स्थळावर बजेटचे एक टेंप्लेट मिळेल. ते उतरवून घेता येईल.
http://www.fido.gov.au/fido/fido.nsf/byheadline/Budget%20planner

मी वापरून पाहिले. बरे आहे. शिस्तीचा अभाव असल्याने उपयोग फार झाला नाही. :(
येथे अजूनही स्कॅम्स वगैरे विषयक बरीच उपयुक्त माहिती असते.

योगप्रभूंचे मत वाचून गंमत वाटली. परदेशात खर्च कमी येतो असे वाटत असल्यास साफ चूक आहे!
येथील पाळणाघरांचे भाव म्हणजे तासाला $७५ असे आहेत. सरकार त्यात मामूली मदत करते.
दोघांनी नोकरी करून पाळणाघराचे पैसे दिल्यावर - 'पाळणाघर चालवण्यासाठी नोकरी करायची का?'
असा प्रश्न उभा राहतो.

सर्वा भाज्या आणि इतर किराणा खरेदी सुपर मार्केटमध्येच होते (इतर दुकाने कोल्स आणि सेफवे या महा कंपन्यांनी खलास केली). मग ते म्हणतील तोच दाम. खर्च कमी करणे फार अवघड आहे.
शिवाय डिस्नी ऑन आईस सारखा एखादा कार्यक्रम, मग तर बचत अशक्यच!
इन्क्रेडिबल ची थीम असलेला बर्फाचा गोळा येथे $२७ ला आहे!
-निनाद

माझ्या सहकार्‍याचे बजेट

महानगरपालिका टॅक्स =६०००/१२= ५००/- प्रती महिना
पाणीपट्टी टॅक्स = ४०००/ १२= ३३३ /-
एक धुणीभांडीवाली/ला महीना पगार =५०० /-
प्रवास खर्च, रिक्षा , पेट्रोल, दुचाकी सर्व्हिसींग (नवरा + बायको) = २५०० /-
वर्तमानपत्र= २०० /-
केबल टिव्ही = ३५० /-
मोबाईलचे बिल (माणशी एक फोन असल्याने लँड लाईन खर्च चैन समजून धरला नाही.) = ४५० /-
इन्शुरन्सचा हप्ता / सरासरी वैद्यकीय बिल = ३००० + २००० = ५००० /-
मुलाची शाळा, रिक्षा/बस, छंद वर्ग/ पॉकेट मनी = नाही
इस्त्री, लॉन्ड्री = १५०/-
महिन्यात किमान एखादा सिनेमा /नाटक /कार्यक्रम (३ तिकीटे) = प्रकाशकाका यांच्याकडे चौकशी केली तर हे मोफत देखील होउ शकेल = ४०० /-
हाटेलात खाणे पिणे = ७०० /-
ग्रंथालय फी = नाही
सोसायटीची वर्गणी = नाही
काही खर्च अगदी महीन्याचे महिन्याला होत नसले (उदा. सहा महिन्यातून एकदा कपडे खरेदी) तरी एक महिना सरासरी रक्कम काढता येईल त्यात
कपडेलत्ते खर्च = ५०० /-
एक वार्षिक सहल = ८३५ /-
अजू एक खर्च म्हणजे दुनियादारी. म्हणजे बघा कितीही माणूसघाणे म्हणले तरी किमान काही लोक ओळखीचे असतात त्यामुळे कधी बर्थे डे पार्टी, कधी लग्न इ कार्यक्रम, ऑफीसमधे काही कार्यक्रम असला तर त्याचे कॉंट्रीब्युशन इ. कधी आपल्याकडे कोणी रहायला आले तर त्यांचा पाहुणचार इ.
याला काय व्हेरीयस ऑव्हरहेडस का जे नाव द्याल ते = १०००/-
जनरल हाउस होल्ड खर्च /सिझनल म्हणजे ट्युबलाईट बदलणे, चप्पलबूट खरेदी, केस कापणे, पावसाळा सुरु झाला तर रेनकोट, छत्री, मे महीन्यात असे दर महीन्यात रिपिट न होणारे पण दर महिन्याला यातले कशा न कशावर खर्च होणारे.
जनरल अदर = १००० /-
चला सगळे मिळून काय बजेट होते पाहूया!
माझा, माझ्या पत्निचा व एका मुलाचा एकुण मासिक खर्च = १९,५३८/ -

माझा वाढीव खर्च :
आई, वडिल औषधे = ३०० /-
त्यान्चा वैयक्तिक चैनीचा खर्च = २००० /-
माझा एकूण खर्च = २४५३८/-

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

आदर्श मध्यमवर्गीय

माझ्या दृष्टीने आजचा आदर्श मध्यमवर्गीय - (२+१)
म्हणजे आमच्या वडिलांनी आम्हाला ज्या परिस्थितीत वाढवले तसे -

किराणा व भाजीपाला= ३०००
दुध = १०००
गॅस सिलिंडर= महीन्याला एक सिलिंडर=३७५
वीज बील = ३५०
पाणीपट्टी / महानगरपालीका टॅक्स =५००
एक धुणीभांडीवाली/ला महीना पगार =८००
प्रवास खर्च =२०००
वर्तमानपत्र=८०
केबल टिव्ही =२५०
मोबाईलचे बील + ब्रॉडबँड +लँडलाईन फोन =१०००
इन्शुरन्सचा हप्ता / सरासरी वैद्यकिय बील ( हेल्थ + मोटर) २०००
मुलाची शाळा, रिक्षा/बस, छंद वर्ग/ पॉकेट मनी =५०००
इस्त्री, लॉन्ड्री =३००
महिन्यात किमान एखादा सिनेमा /नाटक /कार्यक्रम (३ तिकीटे) =५००
हाटेलात खाणे पिणे =२०००
ग्रंथालय फी /पुस्तके =१००
सोसायटीची वर्गणी =१०००
कपडेलत्ते खर्च =१५००
एक वार्षीक सहल =५०००
व्हेरीयस दुनियादारी ऑव्हरहेडस=५००
जनरल अदर =१५००

यात सोनेनाणे खरेदी, सणासुदीची हौसमौज नाही.

बजेट वगैरे सगळे..

झूट आहे असे आम्ही मानतो.
आपली महिन्याची कमाई जितकी असेल त्यात भागवता यायला हवं इतकंच आम्ही जाणतो.
त्या कमाईत भागवणं...हे आम्ही शिकलो आणि त्याप्रमाणे आजवर वागलो...बाकी नैमित्तिक खर्च वगैरे गृहित धरून जमेल तशी(खरं तर जमवायलाच हवं) बचत करायला हवी.
महिना दीडदोन हजार कमावणारा असो अथवा लाख कमावणारा असो....त्याला भागवावंच लागतं....न भागवून सांगतो कुणाला?
सरासरी वगैरे काढणं हे एकमेकांवर अन्याय करण्यासारखे होईल.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

कोष्टक

>>>> पण इथवर थांबू नका कृपया कोष्टक बनवा व लिहाच.

ठीक आहे (नाहीतर आता संसार सुरु करणारच आहे, तेव्हा त्याचा "ट्रेलर" म्हणून या धाग्याकडे पाहतो.)
लग्नानंतर "स्वतंत्र" राहाणार आहेच तेव्हा तिघांच्या हिशोबाने कोष्टक बनवून पाहतो. ~~ आतातर डोक्यात "हम दो हमारा एक" हेच चित्र आहे.
१. घरभाडे धरलेच पाहिजे [निदान नव्याने संसार सुरू करताना लागलीच काही मी स्वतःच्या फ्लॅटमध्ये वा टुमदार बंगल्यात नक्कीच जाणार नाही, जाऊ शकत नाहीच्.]
-- सबब रुपये ८,०००/- ("पुण्यनगरी" च्या हिशोबाने, सोसायटी मासिक वर्गणीसह)
२. किराणा-भुसारी : १०००/-
३. भाजीपाला : १५००/- (आम्ही मांसाहारी असल्याने इथे खर्च वाढतोच. शिवाय एखादादुसरा पाहुणा घरी आला की त्याला नॉन्-व्हेज्. जेवण देणे हे "मराठा" कुटुंबियात अलिखित गृहीत धरले जाते. बीअर् वा हार्ड ड्रिंकही "मस्ट्" गटात येत् असल्याने त्याचाही खर्चात् समावेश आहे.)
४. गॅस : ३५०/-
५. दूध : १०००/-
६. वीज बील : ५००/- [हे देखील अंदाजाने धरले आहे, कारण आमच्या एकत्र कुटुंबात वीजेचे बिल जवळपास महिना दोन हजार येते. अर्थात त्याला कारण म्हणजे कायम आजारी आजीच्या खोलीतील एअर कंडिशन, जो उन्हाळ्यात बंद् होण्याचे नाव घेतच नाही. पण स्वतंत्र संसारात ए.सी.ची चैन परवडणार नाही, म्हणून फक्त लाईट, टीव्ही, कॉम्प्युटर, फ्रीझ, वॉशिंग मशिन यांचा समावेश केला आहे.)
पाणीपट्टी / महानगरपालीका टॅक्स ~~ सोसायटीच्या वर्गणीत खर्च धरला आहे.
भांडीवालीला महीना पगार : ५००/- [धुण्यासाठी सुरुवातीपासूनच वॉशिंग मशीन वापरणार आहे, म्हणून धुणेवालीचा तसेच इस्त्रीचा खर्च धरणार नाही. मी अगदी हायस्कूल जीवनापासून स्वतःच घरी इस्त्री करतो आणि आतातर अगदी "एक्स्पर्ट" झालो आहे. अगदी होणार्‍या अर्धांगीनीचा ड्रेस इस्त्री करताना मला "मेल इगो" नावाचा विंचू डसणार नाही, कारण आता या क्षणीदेखील मी आईच्या आणि बहिणीच्या साड्या तसेच हायस्कूल/कॉलेजल्या जाणार्‍यांचे ड्रेस - सुट्टीच्या दिवशी - इस्त्री करून देतो. तो खर्चही वाचतोच म्हणून्.]
प्रवास खर्च, होंडा पॅशन आहे (दोघांसाठी) : ३०००/-
वर्तमानपत्र : कोणतेही एक रुपये ५०/-
केबल टिव्ही : २५०/-
मोबाईल (दोघांकडे "मस्ट्" धरला आहे) : २०००/- : इंटरनेटच्या खर्चासह
इन्शुरन्सचा हप्ता / सरासरी वैद्यकिय बील : १०००/-
मुलाची शाळा, रिक्षा/बस, छंद वर्ग/ पॉकेट मनी : सुरुवातीस तरी हा खर्च धरत नाही, कारण "दिल्ली अभी दूर है !"
महिन्यात किमान एखादा सिनेमा /नाटक /कार्यक्रम : नाटकप्रेमी नाही, पण सिनेमाप्रेमी जरूर आहे. नवीन लग्न झाल्यानंतर सेम कॅटेगरी ग्रुपसमवेत जावे लागणारच आणि तेही सध्याच्या फॅशननुसार "मल्टीप्लेक्स्" ला. तेव्हा तेथील खर्च्याच्या अंदाजाने महिना : १०००/-
हॉटेल/आऊटिंग : १०००/-
ग्रंथालय फी : ३०/- धरली आहे, पण महिन्यातून किमान ३०० ची पुस्तके खरेदी होतेच, त्यामुळे या खात्यावरील राऊंड खर्च : ४००/-
आकस्मिक (?) : १०००/-

साधारणतः दरमहा २२०००/- खर्च होत आहे. सध्याच्या एकट्याच्या पगारात "बेअरेबल" असला तरी दोघांच्या कुटुंबाकरीता अर्थात नक्कीच हा मोठा आकडा आहे (बचत मुश्किलीने होईल्...), त्यामुळे सुरुवातीला ८०००/- भाड्याच्या फ्लॅटपेक्षा ५०००/- पर्यन्त् मिळत असल्यास त्याला पसंती द्यावी लागेल. शिवाय करमणूक, हॉटेलिंग या कलमांना कात्री लावावी लागेल्, बाकीची खाती आतातरी "अपरिहार्य" वाटत आहेत. पाहु या. (अपत्यानंतर हे बजेट "रिव्हाईज्ड्" किंवा "अपडेट" करावे लागेलच, पण तूर्तास त्याचा विचार नको.)

गिल्ट कॉन्शंस

इसापनीतीत एक गोष्ट आहे: एक मुलगा अ लिहिण्यासच तयार नसतो कारण त्याला माहिती असते की अ शिकल्यावर त्याला आ शिकावा लागेल.

तद्वतच मुळात हिशोब करणे कंटाळवाणे आहे. एकदा हिशोब केला की एकतर स्वतःलाच अपराधी वाटू शकते. शिवाय घरातले हिशोब करण्यास सांगतात कारण खर्चात काटकसर करण्याचे सल्ले त्यांना सुरू करायचे असतात. अज्ञानात सुख असते ;)

एवढेच नोंदवितो की पुण्यात प्रतिमाह ४० गृहकर्ज हे तर अपरिहार्य आहे. बाकी प्रतिमाह २० हा आकडा बरोबर वाटतो.

सहमत

+१.

काम चालू

एकूण सर्वांचे प्रतिसाद पाहता १८००० ते २०००० हा सरासरी खर्च दिसतो. आणि हा बहुतेकांनी स्वतःच्या लाईफस्टाईलनुसार कमालकडे झुकणारा खर्च दिला आहे.
चर्चेचे कारण डबल इंजिन वगैरे आहे म्हणून पुढचे लेखन.
वरच्या खर्चात फक्त रोजचा+वार्षिक + सीझनल खर्च आहे. त्याखेरीज आयुष्यातले खर्च धरायला हवे ज्यांची बेगमीही करायला हवी.

एकाच मुला/लीचा जन्म+बारसे १००००, वाढदिवस (पहिला)१००००, मुंज ५००००, अगदी जवळच्या नात्यातली ४ लग्ने/कार्ये (२००००रु), शाळेची ऍडमिशन २००००, कॉलेजची ऍडमिशन+ फी १००००० , दागदागिने १५००००, फर्निचर १०००००, घराची रंगरंगोटी (४ वेळा) ३०००००, विविध गॅजेटस १०००००, असा खर्च एकूण ७-८ (आयुष्यातला) लाख धरावा. हा सध्याच्या किंमतपातळीवर धरला आहे. ज्यांना हे खर्च भविष्यात करायचे आहेत त्यांना जास्त येईल ज्यांचे यातील काही खर्च आगोदरच करून झाले आहेत त्यांच्याबाबतीत हा आकडा कमी होईल-त्यांची अर्थातच उरलेली अर्निंग इअर्ससुद्धा कमी अस्तील.
(वाहन खरेदी, घरखरेदी, अपत्याचा विवाह हे सध्या सोडून द्या).

लक्षात न येणारे खर्च दर वर्षी एखादी गादी, चादर, बादल्या, भांडी, क्रोकरी (एकाच वेळी आलेल्या चार पाहुण्यांना चार वेगवेगळ्या कपातून चहा द्यायचा नसेल तर). घरातल्या वस्तूंची दुरुस्ती वगैरे (रु ५०००)

(अजून भयंकर लिहावे का दुसर्‍या प्रतिसादात? नकोच लोक घाबरून जातील.)

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

उत्तम

मुद्दा फार आवडला.

वाचतोय.

सिटी बजाके बोल...

नितीन,
अंदाजपत्रक काटेकोर करण्यासाठी सूचना उपयुक्त असल्यास जरूर करा. त्यात लोकांनी घाबरण्यासारखे तुम्हाला काय वाटते ते तरी समजू देत.

शिट्टी

मी वाजवायची शिट्टी सहस्रबुद्ध्यांनी वाजवली आहे.

कॉलेज ऍडमिशन + फी १००००० धरली आहे ती किमान आहे. म्हणजे मेडिकल १० लाख, इंजिनिअरिंग ५ लाख, बी कॉम वगैरे असेल तर १०००००.

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

वाचतोय

सर्व प्रतिसाद वाचतोय. सध्या माझ्याकडून भर घालण्यासारखे नाही कारण मी अमेरिकेत आहे. पण लवकरच भारतात परत जातोय. मासिक खर्च पंचवीस ते तीस हजार रुपयांपर्यंत यावा अशी अपेक्षा आहे (सध्या अजिबात अंदाज बांधलेला नाही).

नितिन थत्त्यांच्या 'काम चालू' प्रतिसादातल्या कॉलेज ऍडमिशन+फी बद्दल असे वाटते की सध्याच्या परिस्थितीत १,००,००० रुपये हा वार्षिक खर्च असावा (इंजिनिअरिंगबद्दल बोलतोय). कदाचित थोडा कमी असेल. त्यामुळे तो एकूण कॉलेज सिक्षणाचा आकडा ३ ते ४ लाखापर्यंत असावा (सध्याच्या किंमतीप्रमाणे).

माझे वडील मला सांगायचे सुरक्षित भविष्यासाठी एकूण उत्पन्नाच्या २५% बचत झाली पाहिजे. बाकीचे ७५% तू पाहिजे तसे खर्च कर. एकूण उत्पन्नात (पगार + बाकीचे उत्पन्न - वेगवेगळे सरकरी कर) अंतर्भूत आहे. मी विचार करत होतो हे गणित सध्याच्या परिस्थितीत शक्य आहे का? भारतात वस्तू आणि सेवांच्या किंमती दरवर्षी १५-२०% टक्के वाढत असताना बचतीच्या पूर्वापार सवयींवर पहिला घाला पडत असला पाहिजे.

बचत किती हवी?

खर्चाचे गणित २५-३० हजारात जाते (वार्षिक खर्च धरून) हे मान्य.

बचत किती असावी याबद्दल माझ्या मनात खूप शंका आहेत. सेवानिवृत्तीच्या वेळी ज्यांना निनृत्ती वेतन मिळत नाही त्यांच्या साठी हे गणित फार मजेदार होते.

सेवानिवृत्तीनंतर मी २०/३०/४० वर्षे जगणार असे धरले तर. तेवढ्या रुपयांची सोय माझ्याकडे असायला हवी. आता ही किती असावी. म्हणजे सेवानिवृत्तीच्यावेळी माझा खर्च २५-३० हजार होत आहे. त्यानंतर नोकरीवर जाण्याच्या प्रवासखर्चात, मुलांच्या शिक्षणात वगैरे बचत झाली तरी खर्च १५-२० हजार राहणार. दरवर्षी महागाईने तो १०/५/४ (?) टक्के वाढणार. याशिवाय आरोग्याच्याबाबतीत अचानक खर्चाची तरतूद हवी. आता माझ्या जवळ समजा ५० लाख रुपये आहेत तर त्यावर व्याज दर वर्षी ५ लाख मिळत्तील. त्यातून वर्षाचा खर्च २-३ लाख (शिवाय प्राप्तीकर) गेला की वर्ष अखेर ५१-५२ लाख राहतील. दर वर्षी वाढीव ख्रर्च धरला आणि जगण्याची तरतूद ३० वर्षाची धरली तर मला असे वाटते की आजचे ५० लाख कदाचित कसेबसे पुरतील. (मी ओपनऑफिस वर हिशोब केला नाही.) आणि समजा ते आजचे ५० लाख धरले तर सेवानिवृत्तीला ज्यांना १०-२०-३० वर्षे राहिली तर त्यांना त्यावेळी महागाईदरा प्रमाणे वाढीव रक्कम राहील एवढी बचत केली पाहिजे. (याचे गणित पण ओपनऑफिस वर वेगळे होईल). तेवढी रक्कम बचतीत धरली पाहिजे.

खुपशा ठिकाणी भविष्यनिर्वाह निधी ची सोय असते. पण त्यातील रक्कम बरीच तुटपुंजी असते.

प्रमोद

ही वाट दूर जाते

ये तो एक छाकी है अभी समथिंग समथिंग बाकी है च्या चालीवर..

हा तर आजचा फक्त गरजेचा खर्च आहे. बर्‍याच जणांना पेंशन नसणार आहे त्यामुळे एकदा का पैसे कमावणे थांबले की नंतर आहे ती लाइफस्टाईल नुस्ती चालू ठेवायची म्हणजे. वर थत्ते म्हणाले तसे मुलांचे उच्च शिक्षण, आरोग्याशी संबधीत खर्च, उपचार, व अर्थात निवृत्ती नंतरचे आयुष्य, त्याकरता आजपासुन बचत, शिवाय लक्षात घ्याह्या वीसेक हजारात घराचा हप्ता नाही. आज घराचा हप्ता २ बि एच के तुम्ही जिथे रहाता त्या भागात काय आहे हे तुम्हालाच माहीत असेल.

तर पुन्हा एका मुद्याकडे नक्की गरीब कोण, श्रीमंत कोण व मध्यमवर्गीय कोण? म्हणजे जश्या टॅक्स स्लॅब्ज असतात तसे काही वर्गीकरण करता येईल?

आता ही सो कॉल्ड मध्यमवर्गीय लाईफ स्टाईल चालु ठेवायची असेल तर व कुटुंबसंस्था टिकवून ठेवायची असेल तर किती हवेत, सहत्रबुद्धे म्हणत आहेत किमान ५०-६० लाख. इतरांना काय वाटते.

धम्मकशेठ डबलइंजीन जरा अजुन विशद करा राव. एकट्याच्या जीवावर काय निभाव लागतोय असे वाटत तर नाही आहे.

2,46,78,250 फक्त

ही लाईफस्टाईल चालू ठेवण्यासाठी पुरेसे पोस्ट रिटायरमेंट इन्कम मिळावे यासाठी 2 कोटीच्या आसपास रुपये लागतील. (6% महागाई दर पकडल्यास). ढोबळ गणित केले आहे. अधिक काटेकोर गणित करुन नेमकी रक्कम काढता येईल.

या दुव्यावर प्राथमिक माहिती देऊन सध्या असलेली लाईफस्टाईल तशीच ठेवण्यासाठी कितपत रक्कम लागेल याचा अंदाज घेता येईल.

सर्व खर्च इनफ्लेशनरी पकडून मी दिलेल्या खर्चाचा तपशील असा
1. 18000 मासिक खर्च (वर विवरण दिले आहे ज्यात प्रवास/सणवार किंवा इतर अनियोजित खर्च पकडले नाहीत.)
2. 5000 मासिक खर्च (प्रवास/सणवार/दुरुस्त्या व इतर अनियोजित खर्च)

सध्या होणारा मासिक खर्च 23000/-
सध्याचे वय 30 व निवृत्तीचे वय 55 पकडून सरासरी महागाईवाढीचा दर 6% पकडला आहे. तर निवृत्तीच्या वेळी हा मासिक खर्च 98,713 रुपये असेल.

हा खर्च करण्यासाठीचे उत्पन्न (पेन्शन नसल्याने) केवळ गुंतवणुकीतून मिळू शकते. प्री टॅक्स रिटर्न 12% व गुंतवणुकीवरील फायद्यांवर 10% कर पकडला तर हे उत्पन्न मिळवण्यासाठी 2,46,78,250 एवढे रुपये निवृत्तीच्या वेळी हाताशी असणे आवश्यक आहे.

या खर्चामध्ये श्री. थत्ते यांनी सांगितलेली मुलांची महागडी शिक्षणे, लग्ने, वा इतर गंभीर आजारपण यांचा समावेश केलेला नाही. घराचे किंवा गाडीचे हप्ते यांचाही समावेश या खर्चामध्ये नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

आजची बचत काय?

दुवा चांगला आहे.
दुव्यावर वर प्रयत्न केले पण यश मिळाले नाही.
यात सेवानिवृत्तीनंतर किती वर्षे जगणार याला स्थान नाही. विशेष आरोग्यसेवेसाठी द्यायच्या खर्चाची तरतुद नाही.

अडीच कोटी हा आकडा मोठा वाटला तरी ३० वर्षात व्याज घेऊन ते जमा करायचे आहेत. कदाचित आजची लागणारी बचत १५-२० हजारात जाईल? (व्याज दर १२ टक्के धरला तर, हिशोब नक्की नाही.)
१२ टक्के व्याज दर हा असुरक्षित व्याज दर आहे, ६ टक्के महागाई ही आज ठीक वाटते पण पेट्रोल शॉक आला तर तीच राहील?

हे सर्व धरले तर कदाचित लागणारी बचत २५ हजाराच्या घरात जाईल. यात घराचा हप्ता पण धरला पाहिजे कारण ती पण एक प्रकारची बचत आहे. असेच आकडे कदाचित अन्य वयाचे येतील.

प्रमोद

13500 च्या आसपास

12 टक्के व्याजदर पकडला तर 13500 पर्यंतची नियमित मासिक गुंतवणूक यासाठी पुरेशी व्हावी. अगदीच सेफ गुंतवणुकीचा पर्याय स्वीकारला (8 टक्के) तर नियमित मासिक गुंतवणूक 26000 पर्यंत करावी लागेल.

बायदवे गाडीला डब्बल इंजिन असावे की सिंगल याचा अंदाज येथे घेता येईल.;)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

घराचा हप्ता

निवृत्तीच्या सुमारास आपल्या नावावर घर असेल तर त्यातील काही रक्कम ही निवृत्तीच्या बचतीत धरली जाऊ शकते.
याला रिव्हर्स मॉर्टगेजिंग म्हणतात. म्हणजे घर आपण तारण ठेवायचे आणि कर्ज मात्र गरज लागेल तसे उचलायचे (मासिक सुध्दा). भारतात याची सोय आहे की नाही याबद्दल माहित नाही. पण तात्विक दृष्ट्या हे शक्य आहे.

प्रमोद

भारतात सोय आहे

एचडीएफसी, आयसीआयसीआय व स्टेट बँकेने रिवर्स मॉर्गेजिंगच्या काही योजना जाहीर केल्याचे मागे पेप्रात वाचले होते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

तू पैसा पैसा करती है, तू पैसे पे क्यू मरती है

खर्चाचे गणित २५-३० हजारात जाते (वार्षिक खर्च धरून) हे मान्य.

यात अतिमहत्त्वाचा न पकडलेल्या फ्याक्टर म्हणजे घराचा हप्ता. गाडी ही चैन आहे हे मी मानतो. (अनेकांना ती गरजही वाटत असावी.) पण घर हे तर रोटी-कपडा-मकान मधील मूलभूत गरज आहे.

25-30 हजारांचा काढलेला अंदाज हा घराचा हप्ता न पकडता काढलेला आहे. आज स्वतःचे घर नसेल तर लग्न न जमण्यापासूनच्या अडचणी निर्माण होतात. (आयटीत असून स्वतःचे घर नाही. थूः!). पुण्यात रिस्पेक्टेबल आकाराचे घर घ्यायचे (1000 स्क्वे. फूट) तर सरासरी 25 लाखापर्यंत कर्ज काढावे लागते. त्याचा 20 वर्षाचा हप्ता दरमहा 24000 पर्यंत येईल. रिटायरमेंट साठी आवश्यक पैसा मिळवण्यासाठी काँझर्वेटिव साधनांध्ये गुंतवणूक करायची म्हटली तर 26000 रुपये लागतील.

म्हणजे दरमहा 80000 रुपये 'इन ह्यांड' उत्पन्न कुटुंबाला आवश्यक आहे. यात मुलांच्या शिक्षणाचा, लग्नासाठीच्या तरतुदीचा व इतर न पकडलेला खर्च मिळवून म्याजिक फिगर सहा आकडी होते की नाही पाहा.

आता गाडीला किती विंजिने लावावीत सांगा बरे?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

गृहकर्ज

गृहकर्ज ही चैन आहे असे तो मानतो. जोवर घरभाडी कर्जाच्या हप्त्याच्या निम्म्यात आहेत (तेवढ्याच व तश्याच घराच्या) तोवर घरभाड्याचा पर्याय निवडावा असे तो मानतो.

उलटपक्षी प्रवास अपरिहार्लसल्यास वाहन एकूणात खर्च कमी करण्यास मदत करू शकते.

तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.

मान्य

गृहकर्ज ही चैन आहे हे मान्य. 'त्यामुळेच मूर्ख लोक घरे बांधतात व शहाणे लोक त्यात राहतात' अशा अर्थाची म्हण तयार झाली असावी. माझ्या एका आयटीतील मित्राने घरभाडे भरणे हे लोनचे हप्ते भरण्यापेक्षा फायदेशीर कसे हे सिद्ध करणारी एक्सेल बनवली होती. मी ती कुठेतरी अपलोड करुन त्याचा दुवा देतो.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

इविक्शन

दर ११ महिन्यांनी टांगती तलवार परवडणार नाही. यावर उपाय म्हणून ९९९ वर्षाचा भाडेपट्टा असलेल्या सदनिका उपलब्ध आहेत. त्यांवर डेरिवेटिव म्हणून ९९ वर्षांचे करार मिळाले तर खूपच स्वस्तात पडतील.

घर देता का घर!

गृहकर्ज घेऊन स्वतःचे घर करणे जास्त फायद्याचे की भाड्याच्या घरात राहणे जास्त फायद्याचे याची तुलना करणारे माझ्या मित्राने बनवलेले एक सोपे एक्सेलशीट खालील दुव्यावर पाहा.

दुवा


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अंदाजपत्रक

बर्‍याच उपक्रमींनी दिलेली अंदाजपत्रके वाचली.
1. बहुतेकांनी 18000 ते 24000 असा अंदाज दिला आहे. या आकड्यात महिन्याचा खर्च बसवणे पूर्ण शक्य आहे. परंतु त्यासाठी प्रत्येक गोष्टीत काटकसर करावी लागेल.
2. चौकोनी मध्यम वर्गीय कुटुंबाला ठीक पद्धतीने जगण्यासाठी (चैनी खुशालीत नव्हे) महिन्याला 35000 ते 40000 एवढा तरी खर्च आता येतो असे मला वाटते.

चन्द्रशेखर

तुमच्या

४०,००० मधे तुम्ही घरभाडे धरले आहे काय? नसल्यास त्या ४० हजाराची प्लीज विभागणी सांगा ना.

माझे अंदाजपत्रक

ढोबळ मानाने ज्याला आपण क न्झुमेबल्स म्हणतो त्याना 20000 रुपये लागतील. विजेचे बिल 2000, टेलिफोन लॅ न्डलाईन 1300, मोबाईल 2 किंवा 3 एकूण बिल 1500, घर भाडे किंवा हप्ता 10000 शाळा कॉलेज फी 4000 व करमणूक (सिनेमा, नाटक) 2000 , वाहन हप्ता 5000 एकूण खर्च 45000
चन्द्रशेखर

आमचा खर्च

कुटुंबात एकुण व्यक्ति ४= आई, मी, बायको व मुलगी

किराणा व भाजीपाला= २००० +३०००
दुध = १०००
पाईप गॅस बिल=२००
वीज बील = ६००+१०००(२ र्‍या घराचे)
पाणीपट्टी / महानगरपालीका टॅक्स =८००+६००( २र्‍या घराचे)
तीन् फरशी धुणीभांडीवाली/ला महीना पगार =२०००
गाडी धुणे-३००
पेट्रोल खर्च =२०००
वर्तमानपत्र=१००
केबल टिव्ही =२५०
मोबाईलचे बील + ब्रॉडबँड +लँडलाईन फोन =[१६०+८००+१००]+[३८५]+[२५०]

इन्शुरन्सचा हप्ता / सरासरी वैद्यकिय बील= २०००
मुलाची शाळा, रिक्षा/बस, छंद वर्ग/ पॉकेट मनी =५००
इस्त्री, लॉन्ड्री =१००
महिन्यात किमान एखादा सिनेमा /नाटक /कार्यक्रम =३००
हाटेलात खाणे पिणे / बाहेरील अन्न =५००
ग्रंथालय फी /पुस्तके =१००
सोसायटीची मेंटेनन्स वर्गणी =१८००
कपडेलत्ते खर्च =२००

व्हेरीयस दुनियादारी ऑव्हरहेडस=५००
जनरल अदर =१५००
एकूण~२२०००/-

वरील खर्चातील माझा सरासरी व्यक्तिगत खर्च
पेट्रोल ५००
मोबाईल १६०
इंटरनेट - ३८५ (६४ कबपस)
सुदर्शनची नाटके व इतर- २००
औषधे -१००
क्वचित बिअर वगैरे ३००
किरकोळ-३००
एकूण~ २०००/-

यात वार्षिक खर्च- हे पालिका टॅक्स, इन्शुरन्स,सोसायटी मेंटेनन्स, शैक्षणीक खर्च फी हे असतात ते महिन्यात रुपांतर केले आहेत तसेच यात बायकोच्या व्यवसायाचे अपरिहार्य व्यक्तिगत खर्च समाविष्ट आहेत उदा मोबाईल, पेट्रोल.
प्रकाश घाटपांडे

बजेट कोलमडणार्

माझ्या २२,००० च्या बजेटमध्ये लिखाणाच्या नादात (इथे प्रत्येक अक्षरासाठी अखेरीस एक जादाचा "a" टंकावा लागतो, हे सर्वांना करावे लागत आहे की, माझ्या की बोर्डमध्ये काही प्रॉब्लेम झाला आहे? या संदर्भात कुणाकडे चौकशी करायची असते?) एक बाब मी पूर्ण विसरून गेलो आहे, अन् ती म्हणजे माझ्यावर असलेली माझ्या धाकट्या बहिणीची जबाबदारी ! काही वैयक्तीक कारणासाठी मी विवाहानंतर स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे (सध्याचे एकत्रीत कुटुंबाचे घर अपुरे आहे हेही कारण आहेच) पण असे जरी असले तरी माझी धाकटी बहिण, जी आता कॉलेज करीत आहे, तिच्या पुढील वाटचालीसाठी नित्यनेमाने मला आर्थिक हिस्सा बाजुला काढून ठेवलाच पाहिजे. तो किती असतो वा असावा याचे कसलेही चित्र या क्षणी माझ्या नजरेसमोर नाही, पण ती एक "दर महिना" खर्चाची बाजू समजणे आत्यंतिक गरजेचे आहे. तेव्हा वरील २२,०००/- मध्ये नक्कीच "सबस्टॅन्शियल इन्क्रिमेन्ट" होणार.

ड्रुपल ५

शेवटचा अ सगळ्यांनाच टंकावा लागतो कारण उपक्रम अजून ड्रुपल ५ वर आहे. ड्रुपल ६ वर आधारित गमभन मध्ये शेवटचा अ टंकावा लागत नाही.

ड्रुपल प्रॉब्लेम

थॅन्क्स्. हीच बाब (वा कळीचा मुद्दा) मला आताच एका सदस्याने खरडीवरून सांगीतली. तत्पूर्वी मी अगदी की बोर्ड सफाईसाठी बसलोच होतो. सवय नसल्याने शब्द टाईप झाल्यानंतर ते "पाय" मोडके अ़क्षर दुरुस्त करायला परत मागे जावे लागत आहे. शब्द तसाच चुकीचा ठेवून पुढे जाण्यास मन धजावत नाही.

काही सुचलेले मुद्दे

घराचा/घरभाड्याचा/कर्जाच्या हप्त्याचा मुद्दा हा अतिशय महत्त्वाचा आहे.

मागे एका धाग्यात एक फ्लॅट्- मग दुसरा फ्लॅट् - इ. इ. वर्णने ऐकली. हे किस्से मीही ऐकतो. नव्वदीच्या दशकात ज्यांचे करीयर सुरु झाले ते याबाबतीत सुदैवी म्हणायला हवेत. नव्वदीमधे "न्यू इकॉनॉमी"च्या घटनेला - ज्याला सोयीसाठी "आय्टी वाले" असे म्हण्टले जाते - सुरवात झाली आणि पगार क्रमशः वाढत होते. या काळातच ज्यांच्या परदेशवार्‍या घडल्या , त्यांच्याकरता एक्स्चेंज् रेट् (काकणभर का असेना) पण सरस होता, घरांच्या मार्केटला अद्यापपावेतो जाग आलेली नव्हती. अगदी मुंबईतल्या उपनगरांमधे सुद्धा घरांच्या किमती आजसारख्या भीषण नव्हत्या.

२००३ ते सुमारे २००७ च्या शेअरबाजार मधील तेजीने सर्व समीकरणे पार पालटवून टाकल्याचे दिसते आहे. मुंबईची उत्तरेतली उपनगरे आणि पुणं यांचे जागांचे बाजारभाव समसमान दिसायला लागले. आणि आता , अर्थातच , पुण्यातल्या काही भागांनी मुंबईतल्या उपनगराना जागांच्या बाबतीत सहजच मागे टाकले आहे.

घरांच्या किमतीबरोबरच भाडीसुद्धा वाढत होती हे वेसांनल. ही सगळी चर्चा येथे करण्याचे कारण : २०००-२००९ या दशकात जागांच्या संदर्भात महागाईने जे स्वरूप धारण केलेले आहे त्याच्या झळा नुकतीच करीयर सुरू केलेल्या किंवा नव्वदीमधे घर घेऊ न शकलेल्या लोकांना चांगल्याच बसत आहेत. एकामागोमाग एक फ्लॅट् घेणे यापुढे आय्टीवाल्यानातरी शक्य होईल का याबाबत मला शंका वाटते.

माझे वरील विश्लेषण माझ्या भारताबद्दलच्या अल्पज्ञानातून आलेले आहे. चूभूदेघे.

धागा पास

मी इतका हिशोब करून राहू शकत + इच्छित नाहि..
तेव्हा तुर्तास हा धागा पास

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

ज्याचा त्याचा आयटीवर कटाक्ष

पुण्याची आजची लोकसंख्या व एकूण लोकसंख्येपैकी आयटी क्षेत्राशी थेट संबंधित लोकांचे गुणोत्तर काढले तर माझ्या अंदाजानुसार 2 टक्क्यांपेक्षा कमी लोक आयटीमध्ये काम करत असतील.

या लोकांपैकी निदान टॉप टिअर आयटी कंपन्यांमध्ये ब्रेड अँड बटर स्वरुपाची कामे करणारी मुले ही साधारणपणे नॉन इंजिनियरिंग ग्रॅज्युएट्स असतात. त्यांच्यासाठी बिट्स पिलानी किंवा तत्सम ठिकाणचे पदव्युत्तर शिक्षण व त्यासोबत नोकरी (अर्न अँड लर्न) स्वरुपाचे धोरण राबविलेले असते. अशा मुलांचे पगार हे चार वर्षांपर्यंत फिक्स असतात. त्यातही पहिल्या दोन वर्षांपर्यंतचे पगार हे मासिक चार आकडी पर्यंतच असावेत.

इंजिनियरिंग ग्रॅज्युएट्समध्ये एलिट इन्स्टिट्यूट व नॉन एलिट इन्स्टिट्यूट असा फरक केला जातो. एलिट इन्स्टिट्यूटमधील मुले शक्यतो पदव्युत्तर शिक्षणासाठी परदेशात जातात. जे जात नाहीत ते इथे काम करतात. नॉन एलिट इन्स्टिट्यूटमधील मुलांचे साधारण पहिल्या तीन वर्षांपर्यंतचे पगार हे वर दिलेला खर्च भागवण्यापुरतेच असतात. एलिट इन्स्टिट्यूटमधल्यांना त्यातल्या त्यात बरा पगार मिळतो.

त्या तुलनेत बरेच कमी काम असणाऱ्या सरकारी नोकरांना सहाव्या वेतन आयोगानंतर भरभक्कम पगार मिळू लागले आहेत. ब्यांक्यांच्या कर्मचाऱ्यांना आयटी कंपन्यांमधील वर उल्लेख केलेल्या कर्मचाऱ्यांपेक्षा चांगले पगार मिळतात.

त्यामुळे महागाईबाबत काहीही झाले की आयटीवर खापर फोडायच्या प्रकार चुकीचा आहे. आयटीतल्या लोकांमुळे महागाई वाढली आहे हा गैरसमज ऍनेक्डोटल पुराव्यांवर आधारित आहेत.

माझा प्रतिसाद भारतातील आयटी उद्योगात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबत आहे.

मुक्तसुनीत यांनी वर मांडलेले मुद्दे योग्य आहेत असे मला वाटते.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
 
^ वर