मध्यमवर्गाचे मासीक खर्चाचे बजेट

उपक्रमावर काही चर्चांमधे मध्यमवर्ग, नवराबायको दोघांनी नोकरी (चैन की गरज) यावरुन असे वाटते आहे की मध्यमवर्ग म्हणजे नेमके कोण, आजच्या भारतीय शहरात, सोयीसाठी पुणेच समजुया, एका छोट्या कुटुंबाकरता म्हणजे बघा नवरा-बायको व एक अपत्य (एक अपत्य याकरता की एका अपत्याचा खर्च निघाला की दोन मुले म्हणजे साधारण ८०% ते १००% तेवढा वाढीव धरता येईल )

सोयी करता आपण या महीन्याच्या खर्चात घरभाडे अथवा घरकर्जाचा हप्ता धरायला नको कारण ज्याचे त्याचे घराचे बजेट. कोणी ५० हजार रुपये होम लोन मासीक हप्ता देत असेल (यांना मुळातच मध्यमवर्गीय म्हणावे का? हा चर्चेचा वेगळा मुद्दा असो.) कोणी १०,००० रु.

बरं शहरात रहाणार्‍या एका सामान्य कुटुंबाचा खर्च तो नेमका काय असेल याचा अंदाज लावूया. एक यादी देत आहे त्यात काही कमी आहे का सांगा. मी यादीत ज्या गोष्टी लिहीत आहे त्या शक्यतो गरजेच्या व बेताची चैन म्हणता येतील अश्याच आहेत. अर्थात आपल्या मतांचा, सुचनेचा आदर आहेच.

हेतू असा की त्या निमित्ताने
१) आजचा ते म्हणतात ना की आटे-डाल का भाव कळेल.
२) खर्च पाहून सिंगल् इंजीन की डबल इंजीन चैन की गरज अंदाज येईल.
३) पैशाच्या मागे सुसाट पळणार्‍या मध्यमवर्गियांना एक गोल मिळेल की साधारण कितपत कमावले तर करीयर मधे फार तडजोड करायची गरज नाही किंवा आधी गरज असेल पण मग एकजण कुटुंब संस्था मोडकळीस न येता जीर्णोद्धार करायच्या कर्तव्याकडे वळू शकेल.

त्यामुळे घरात मध्यमवर्गीय घरात महीन्याचा
किराणा व भाजीपाला = महीन्याला किती लागतील तीन जणांच्या कुटुंबाला
दुध = दिवसाला एक लिटर धरले तर महीना ३० लिटर चितळे / कात्रज दुधाची पिशवी??
गॅस सिलिंडर= महीन्याला एक सिलिंडर
वीज बील = १ किंवा २ बी एच के फ्लॅट (ट्युबलाईट्, फ्रीज, टिव्ही, गीझर, पंखा)
पाणीपट्टी / महानगरपालीका टॅक्स =
एक धुणीभांडीवाली/ला महीना पगार =
प्रवास खर्च, रिक्षा , पेट्रोल, दुचाकी सर्व्हिसींग (नवरा + बायको) =
वर्तमानपत्र=
केबल टिव्ही =
मोबाईलचे बील (माणशी एक फोन असल्याने लँड लाईन खर्च चैन समजुन धरला नाही.) =
इन्शुरन्सचा हप्ता / सरासरी वैद्यकिय बील =
मुलाची शाळा, रिक्षा/बस, छंद वर्ग/ पॉकेट मनी =
इस्त्री, लॉन्ड्री =
महिन्यात किमान एखादा सिनेमा /नाटक /कार्यक्रम (३ तिकीटे) = प्रकाशकाका यांच्याकडे चौकशी केली तर हे मोफत देखील होउ शकेल
हाटेलात खाणे पिणे =
ग्रंथालय फी =
सोसायटीची वर्गणी =

काही खर्च अगदी महीन्याचे महीन्याला होत नसले (उदा. सहा महीन्यातुन एकदा कपडे खरेदी) तरी एक महीना सरासरी रक्कम काढता येईल त्यात
कपडेलत्ते खर्च =
एक वार्षीक सहल =

अजुन एक खर्च म्हणजे दुनियादारी. म्हणजे बघा कितीही माणुसघाणे म्हणले तरी किमान काही लोक ओळखीचे असतात त्यामुळे कधी बर्थे डे पार्टी, कधी लग्न इ कार्यक्रम, ऑफीसमधे काही कार्यक्रम असला तर त्याचे कॉंट्रीब्युशन इ. कधी आपल्याकडे कोणी रहायला आले तर त्यांचा पाहुणचार इ.

याला काय व्हेरीयस ऑव्हरहेडस का जे नाव द्याल ते =

जनरल हाउस होल्ड खर्च /सिझनल म्हणजे ट्युबलाईट बदलणे, चप्पलबूट खरेदी, केस कापणे, पावसाळा सुरु झाला तर रेनकोट, छत्री, मे महीन्यात असे दर महीन्यात रिपिट न होणारे पण दर महीन्याला यातले कशा न कशावर खर्च होणारे.

जनरल अदर =

अजुन काय आठवत असेल तर सांगा, तसेच प्रत्येक गोष्टीतल्या खर्चाकरता साधारण किती रक्कम एका तुमच्या कल्पनेतल्या मध्यमवर्गीय कुटुंबाने खर्च करावी हे लिहा.

शक्यतो कोणाला अर्धपोटी ठेवू नका. मुलाला अति महागड्या किंवा मनपाच्या शाळेत पाठवू नका.

चला सगळे मिळून काय बजेट होते पाहूया!

Comments

शंका

पुण्याची आजची लोकसंख्या व एकूण लोकसंख्येपैकी आयटी क्षेत्राशी थेट संबंधित लोकांचे गुणोत्तर काढले तर माझ्या अंदाजानुसार 2 टक्क्यांपेक्षा कमी लोक आयटीमध्ये काम करत असतील.

म्हणूनच मी माझ्या प्रतिसादामधे "न्यू इकनॉमी" ही संज्ञा वापरली आहे. नव्वदीनंतर अस्तित्त्वात आलेले अनेक व्यवसाय हे केवळ आय्टी चे नव्हेत. कॉल् सेंटर्स् आहेत, परदेशी गाड्यांचे कारखाने आहेत. जे लोक एमेन्सी ऑटो इंडस्ट्रीला स्पेअर्स् पुरवतात त्यानाही या न्यू इकनॉमीमधे गणायला हवे. आणखी एक वर्ग अस्तित्त्वात आलेला दिसतो : डे ट्रेडर्स्. २००३ ते २००७ मधे मला अनेक लोक भेटले जे आपापल्या नोकर्‍या सोडून यात आले. अनेक लोक आपले पूर्वीचे व्यवसाय सोडून रिअल्-इस्टेट् एजंट्स् बनले. या सर्वांची मिळून संख्या अर्थातच आय्टीवाल्यांपेक्षा जास्त आहे - आय्टी हा याचा सबसेट् आहे.

आयटीवाल्यांना आणखी किती झोडपणार?

पुण्यात व बेंगळुरात कोणत्याही गोष्टीचे खापर आयटीवाल्यांवर फोडण्याचा प्रकार मी पाहिलेला आहे. महागाई, घरे महाग होणे, ट्राफिक जाम, पाऊस न पडणे, खूप पाऊस पडणे वगैरे सर्व गोष्टींसाठी आयटीवाल्यांना जबाबदार धरले जाते.

न्यू इकॉनॉमीमध्ये आयटीवाल्यांइतकाच पगार इतर क्षेत्रातही आहे. आयटीवाल्यांच्या बाबतीत ऑनसाईट ट्रीप हे एक ट्रम्पकार्ड असते हे इतर क्षेत्रात नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

आठवण

अजानुकर्ण यांच्या प्रतिसादावरून , ह मो मराठे यांच्या एका पुस्तकाची - खरे म्हणजे पुस्तिकेची - आठवण झाली :-)

आता या मुद्द्यावर आ. ह. साळुंखे कोण बनणार त्याची प्रतीक्षा करणे आले ;-)

पाऊस न पडणे, खूप पाऊस पडणे वगैरे सर्व गोष्टींसाठी आयटीवाल्यांना जबाबदार धरले जाते.

"न्यू इकनॉमी"च्या आधी हवामानखात्याचे अधिकारी स्केपगोट्स् असावेत . सुटले बिचारे ;-) [पहा : "दोन महिने झाले पावसाचा पत्ता नाही . हवामानखात्याचे अधिकारी काय झोपा काढताहेत ?!" - पु.ल. ]

चुरा लिया है तुमने

त्यांच्याच पुस्तिकेवरुन मी हे शीर्षक दिले. :)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

अजून एक जबाबदारी

महागाई, घरे महाग होणे, ट्राफिक जाम, पाऊस न पडणे, खूप पाऊस पडणे वगैरे सर्व गोष्टींसाठी आयटीवाल्यांना जबाबदार धरले जाते.

मराठी संकेतस्थळे (एकूणच आंतर्जाल) चालू होण्यास आयटीवाले कारणीभूत आहेत. त्यांच्यातल्याच येथल्या विचारवंतांमुळे आता आम्हाला वर रिकामटेकड्यांनी म्हणल्याप्रमाणे अपराधीपणाची भावना येत आहे. ;)

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

किंचित दुरुस्ती सुचवतो

सगळ्याच सरकारी नोकरांना अथवा बँकेतील कर्मचार्‍यांना भरभक्कम पगार मिळू लागले आहेत, असे नाही.

आयटीतील सुस्थापित व अनुभवी कर्मचार्‍याला महिना ५० हजार रुपये पगार आहे, असे गृहित धरल्यास तिथपर्यंत पोचलेले इतर क्षेत्रातील कर्मचारी म्हणजे प्राध्यापक, प्राचार्य, लष्करातील अधिकारी, कंपन्यांतील उच्चाधिकारी, सरकारी सेवेतील क्लास वन अधिकारी, बँकांचे व्यवस्थापक (मॅनेजर), वर्तमानपत्रांचे मुख्य संपादक.

सध्या बँकांमधील अधिकार्‍यांना (ऑफिसर) नव्या वेतनवाढीमुळे ३५००० ते ५०००० रुपयांपर्यंत पगार आहे व कारकुनांचा (क्लार्क) पगार किमान १५ हजार ते ३५००० रुपयांपर्यंत आहे. ही किमान व कमाल पातळी सेवेच्या वर्षांनुसार आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

दहा वर्षांपूर्वी चार पदवीधर तरुणांनी पुढील उद्योगात फ्रेशर्स म्हणून प्रवेश केला असल्यास त्यांचे आजचे पगार काय असतील?

आयटी क्षेत्र - ३०००० ते ४०००० रुपये दरम्यान
वर्तमानपत्र पत्रकार - १५०००० रुपये ते २५००० रुपये दरम्यान
बँक कारकून - १६००० ते २०००० रुपये दरम्यान
सरकारी कारकून - १५००० रुपये ते १८००० रुपये दरम्यान

(मी या चारही क्षेत्रांतील कार्यरत व्यक्तींना विचारूनच वरील आकडे नमूद केले आहेत. त्यात कंपन्यांच्या आकारानुसार थोडे इकडे-तिकडे होऊ शकते म्हणजे राष्ट्रीयीकृत बँक व सहकारी बँकेतील कारकुनांच्या पगारात, बीपीओ व सॉफ्टवेअर कंपन्यातील कर्मचार्‍याच्या पगारात, इंग्रजी व मराठी वर्तमानपत्रातील पत्रकाराच्या पगारात फरक पडू शकेल पण क्रमवारी बदलणार नाही.)

आकडेवारी चुकीची

आकडेवारी थोडी चुकीची वाटते. मला योग्य वाटणारी आकडेवारी मित्रांशी चर्चा करुन देतो. या आकडेवारीमध्ये डॉक्टर, वकील, प्रोफेसर यांचाही समावेश करावा. सरकारी कारकुनांना आता पेन्शनच 15000 च्या आसपास मिळते. त्यामुळे 10 वर्षे नोकरी केलेल्या सरकारी कारकुनांना 20000 पेक्षा कमी पगार असेल असे मला वाटत नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

फारशी चुकीची नाही

माझी आकडेवारी आपण जरुर दुरुस्त करा. थोडाफार फरक पडला तरी अगदीच चुकीची ठरणार नाही, असे वाटते. माझा सांगण्याचा उद्देश एवढाच, की नोकरीच्या पहिल्या दहा वर्षांत आकर्षक वेतनवाढ देण्यात आयटी क्षेत्र पहिल्या क्रमांकावर आहे.

पेन्शनरची पेन्शन आणि दहा वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचार्‍याचा पगार यात तुलना नाही करता येणार कारण १५००० रुपये पेन्शन मिळवलेल्याचा निवृत्त होतानाचा शेवटचा पगारच ३५००० रुपये असतो. त्याची वेतनश्रेणी कमाल पातळीला पोचलेली असते. मी नोकरीत दहा वर्षे झालेल्या तरुणांचा पगार उदाहरणादाखल घेतला याचे कारण ही चर्चा मध्यमवर्ग आणि नवरा-बायको-एक लहान मूल अशा कुटुंबाचे बजेट यावरून सुरू झाली होती. हे उदाहरण अशाच तरुणांसाठी लागू पडते. असो. चूभूदेघे.

आयटी मध्ये काम करणार्‍यांमुळे सामाजिक प्रतिष्ठेची पातळी कशी बदलली याचा किस्सा इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांच्या पुस्तकात वाचायला मिळाला. सुधा मूर्ती ज्या दुकानात फळे घ्यायला गेल्या त्याचा मालक त्यांना नावाने ओळखत नव्हता. तेथे सफरचंदाचा भाव ऐकून सुधा मूर्तींनी आश्चर्य प्रकट केले. तेवढ्यात इन्फोसिसमध्येच काम करणारा एकजण घाईगडबडीत आला. मालक लगबगीने पुढे धावला आणि त्याने लगेच सफरचंदे अदबीने पॅक करून त्याच्या हातात दिली. तो गेल्यावर दुकान मालक सुधा मूर्तींकडे वळून म्हणाला, 'हे असे आयटीवाले ग्राहक आम्हाला आवडतात. ते घासाघीस करत बसत नाहीत. हुज्जत घालत नाहीत. नाहीतर तुमच्यासारखे मध्यमवर्गीय लोक बघा. पावशेर घेणार त्यासाठी अर्धा तास घालवणार.' यावर सुधा मूर्ती मनाशी हसून बाहेर पडल्या.

साधी गोष्ट. विवाह जुळवणी संस्था, मासिके अथवा संकेतस्थळावर जाऊन बघा. मुलींच्या अपेक्षांत प्राधान्य आयटी क्षेत्रात काम करणार्‍यांना असते.

मी या सगळ्याला काळाचा महिमा समजून चालतो म्हणून टीका करावीशी वाटत नाही. त्यातून आयटी कंपन्यांचे मालक त्यांच्या कर्मचार्‍यांना भरपूर पगार देत असतील तर त्यात काय वावगे आहे? त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून देत असतील. (जाणार्‍याचे जात असेल तर कोठावळ्याच्या पोटात का दुखावे?)

शिक्षण क्षेत्र

सहाव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे उच्च शिक्षण क्षेत्रात तर दिवाळीत फुटणार नाहीत असे प्रचंड आवाजाचे फटाके फुटत आहेत. आमच्या कॉलनीतील एक घरोब्याचे गृहस्थ स्थानिक कॉलेजचे प्राचार्य आहेत आणि त्यांचा एक मुलगा माझा जवळचा मित्र असल्याने त्यांच्या घरी सतत येजा असते. तर या प्राचार्यांकडून घेतलेली ही डोळे फिरविणारी प्राध्यापकांच्या "सुधारित" वेतनाची माहिती :

वेतन स्केलपेक्षा एकत्रीत स्वरूपात देत आहे : (दर महिन्याचे वेतन आहे हे)

१. प्राचार्य ~~ रुपये ९५,०००/- (होय्, इतका पगार आमच्या या प्राचार्यांना सध्या मिळतो) + महिना ३,०००/- पेट्रोलसाठी + ड्रायव्हर (याचे वेतन कॉलेज देते) + दोन टेलिफोन् + निवासस्थान + एक शिपाई बंगला साफसफाईसाठी (याचाही पगार कॉलेज देणार) + उन्हाळी सुटीत व दिवाळी सुटीत कॉलेजला यावे लागते म्हणून् विशेष् वेतन जे त्या महिन्याच्या नित्याच्या वेतनाइतकेच असते.
२. सीनिअर असोसिएट प्रोफेसर ~~ रुपये ७५,००० ते ९०,०००/-
३. असोसिएट प्रोफेसर ~~ रुपये ६५,००० ते ७५,०००/-
४. असिस्टंट प्रोफेसर (सीलेक्शन ग्रेड) ~~ रुपये ५०,०००/- ते ६५,०००/-
५. असिस्टंट प्रोफेसर (म्हणजे जी आजच नोकरीला लागली आहे अशी व्यक्ती) ~~ रुपये ३५,००० ते ४०,०००/-
वरील वेतनात पाच वर्षानंतर बदल होणारच कारण याना त्या त्या पिरिअडनंतर पुढचे प्रमोशन मिळतेच.

शिवाय यांना अडीच ते तीन महिन्याच्या पगारी दीर्घ सुट्ट्या आहेतच, तीत बदल नाही.
वरील माहिती ही पदवी शिक्षण देणार्‍या महाविद्यालयांशी संबंधीत आहे. विद्यापीठाचे आकडे यापेक्षा अधिकचे आहेत.

टक्केवारी

एक सुचवणीची टक्केवारी.

_________________

प्रकार वर्ग सामान Total
गुंतवणूक म्युचुअल फंड डायव्हरसिफाईड फंड 17.86%
टॅक्स सेवरफंड 1.47%
बचत पीपीएफ 10.28%
मुदत बंद ठेव 7.34%
थेट गुंतवणूक शेअर मार्केट 4.29%
धातू सोनेनाणे 4.29%
____________
नियमित मालमत्ता/घरभाडे 21.88%
संपर्क इंटरनेट 1.79%
मोबाईल 1.79%
टेलिफोन 0.89%
प्रवास पेट्रोल 1.96%
प्रवास 1.34%
विमा इन्शुरन्स - लाईफ 1.79%
इन्शुरन्स - गाडी 0.00%
घर इलेक्ट्रिसिटी 1.79%
सफाई 0.54%
सौंदर्य प्रसाधने 0.43%
स्वयंपाकघर 0.37%
करमणूक केबल 0.36%
माहिती वर्तमानपत्र 0.18%
मासिक 0.09%
कपडेलत्ते 0.14%
औषधे 0.05%
फर्निचर 0.03%
स्टेशनरी 0.02%
मसाला 0.00%
धान्य 0.00%
खाद्यपदार्थ 0.00%

______________________
ऐच्छिक हौस सहल 5.36%
खाणे 3.06%
सिनेमा 1.07%
कपडेलत्ते 1.79%
माहिती पुस्तके 0.45%
___________________--
एकवेळ (सिंकिंग फंड) 7.15%
Grand Total 99.82%

टीप वरील खर्च दोन माणसांसाठीचा असून मासिक उत्पन सुमारे ५०,००० पकडले आहे. टक्केवारी उत्पनाच्या प्रमाणात आहे. अन्नखर्च (जो यात नाही) माणशी १००० असावा.

तुम्ही भारतात असाल तर तुमच्या भ्रमणध्वनीवर उपक्रम चे नवे लेख एस.एम.एस. ने मिळवण्यासाठी हे पाहा.

...असहमत

त्यामुळे महागाईबाबत काहीही झाले की आयटीवर खापर फोडायच्या प्रकार चुकीचा आहे. आयटीतल्या लोकांमुळे महागाई वाढली आहे हा गैरसमज ऍनेक्डोटल पुराव्यांवर आधारित आहेत.

..आम्ही ४ वर्षांपूर्वी भैरवगड- प्रचितगड ट्रेकला गेलेलो तेव्हा तिथल्या पाथरपुंज गांवातल्या वाटाड्यांनी प्रचितपर्यंत ४०० रु. घेतले होते. २ वर्षांनंतर पुन्हा गेलो तर रेट!! १४०० रु.
कारण विचारता ....पुण्याचे आय.टी. वाले...!
.. ६व्या वेतन आयोगानंतर भरभक्कम पगार जरी हातात आला तरी ६ रु.त आज रिक्षाने जाणारा माणूस रिक्षाला १५० रु. देणार नाही. ब्यांकवाली मंडळीही हिशेबी असतात. (पगार कितीही वाढले तरीही..)
----तात्पर्य आयटी वाल्या मंडळीना पगार असला तरी व्यवहारग्न्यान् कमीच .. व त्याची झळ आपल्याला..

व्यवसाय आणि व्यक्तिमत्त्व

आयटीवाले बेहिशोबी असावेत असा तुमचा अंदाज का आहे? माझे निरीक्षण आहे की मुली रिक्षावाल्यांना वाटेल तितके पैसे देण्यास तयार असतात. रिक्षावाले आमच्यासाठी थांबतच नाहीत कारण त्यांना माहिती असते की आम्ही अधिक पैसे देण्यास नकार देऊ.

तुमचं आमचं जमलं

मुली रिक्षावाल्यांना वाटेल तितके पैसे देण्यास तयार असतात

पूर्णपणे सहमत. मुलींना एकंदर व्यवहारज्ञान कमी असते. हिंजवडीतील रिक्षावाल्यांचा माज वाढण्याचे कारण आयटीतल्या अव्यवहारी मुली आणि त्यांना इंप्रेस करु पाहणारी गाढव मुले हेच आहे.

सामान्यपणे नव्याने नोकरीला लागलेले आयटीवाले बेहिशोबी असतात असे माझेही निरीक्षण असते (कदाचित हे सर्वच नव्या नोकरदारांच्या बाबत होत असावे, पण महागड्या ब्र्यांडेड वस्तू किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेटी खरेदी करणे हे आयटीवाल्यांबाबत जास्त होते.)

मात्र मी स्वतः आयटीवाला आहे पण खूपच हिशोबी आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

झळा या लागल्या जीवा

तात्पर्य आयटी वाल्या मंडळीना पगार असला तरी व्यवहारग्न्यान् कमीच .. व त्याची झळ आपल्याला

थोडेसे खरे वाटते. मी आयटीवाला असूनही मला या झळा लागतात. त्यामुळे मलाबी तुमच्यामंदीच घ्या.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
 
^ वर