भाईकाकांची एक लहानशी आठवण!

१९९६ की ९७ सालची गोष्ट.मी एकदा प्रथमच धीर करून भाईकाकांच्या घरी गेलो. बेल वाजवली. सुनिताबाईंनी दरवाजा उघडला. मी भाईकाकांचा फ्यॅन असून त्यांना भेटायचे आहे असे सांगितले.

"आपण पाणी घेणार का?"

"खूप माणसं त्यांना भेटायला सारखी येत असतात, त्यामुळे त्यांना जराही आराम मिळत नाही. आत्ता ते आराम करत आहेत, आपण रात्री ८ ते ९ च्या दरम्यान या." असं मला सुनिताबाईंनी सांगितलं.

मी पुन्हा रात्री ८ च्या सुमारास त्यांच्या घरी गेलो. भाईकाका दिवाणखान्यात बसले होते.

"या!"

महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व माझ्याकडे पाहात म्हणालं!

धन्य वाटलं!!

"इथे पुण्यात काही कामाकरता आलो होतो. आपल्याला भेटण्याची खूप इच्छा होती म्हणून आलो होतो. बाकी माझं आपल्याकडे काहीच काम नव्हतं."

कुठे असता, काय करता वगैरे भाईकाकांनी कॅज्युअल चौकशी केली.

"आपलं 'गजा खोत' हे व्यक्तिचित्र मला सर्वात जास्त आवडतं."

हे ऐकल्यावर भाईकाकांच्या चेहेर्‍यावर प्रसन्न् हास्य उमटलं.

"अरे आमचा गजा गोडच आहे. कुणीही प्रेम करावं असा! मलाही खूप आवडतो!" प्रसन्नपणे भाईकाका म्हणाले.

त्यांना बोलायला त्रास होत होता.

सुनिताबाईंनी माझ्या हातावर नारळाच्या दोन वड्या ठेवल्या.

भाईकाकांची प्रकृती फारशी बरी नसल्याचं त्यांच्याकडे बघून जाणवत होतं. मी निघायला म्हणून उठलो. त्यांना वाकून नमस्कार केला. मी तेव्हाही शरीराने तसा सुदृढच होतो. भाईकाकांना नमस्कार करायला त्यांच्यापुढे वाकल्यावर माझ्या पाठीवरून हात फिरवत भाईकाका मिश्कीलपणे म्हणाले,

"वा! तुमची पाठ म्हणजे छानसं एक छोटेखानी रायटींग टेबलच आहे की!! " ;)

"या हां पुन्हा!"

मंडळी, भाईकाकांचे ते वाक्य आणि सुनिताबाईंनी दिलेल्या नारळाच्या वडीचा गोडवा आजही माझ्या मनात कायम आहे!

-- तात्या अभ्यंकर.

Comments

विडंबन!

आता दुसर्‍या एखाद्या मराठी संकेतस्थळावर वरील किश्श्याचं एखादं छानसं विडंबन वाचायला मिळावं एवढीच इच्छा! ;)

भाईकाकाकी जय! ;)

तात्या.

इथे आम्ही काहीही बरळतो - http://tatya7.blogspot.com/

मस्त हं तात्या.

तात्या,
आठवण आवडली.

छान

:)

पल्लवी

 
^ वर