ओपन बुक् परिक्षेचा उपक्रम

ऑपन बुक परीक्षा ..... या विषयावरील चर्चा मध्यंतरी चालू होती. मी माझा अनुभव येथे मांडू इच्छिते. मी अलिबाग जवळच्या एका गावात माध्यमिक शाळेत मुख्याध्यापिका आहे.शाळेतील बहुतेक विद्यार्थी कामगार ,शेतकरी कुटुंबातील आहेत.घरी फारसं अभ्यासाचं वातावरण नाही. त्यामुळे या मुलांना अभ्यासाची गोडी लावणं हे आव्हानच असतं. विशेषतः इयत्ता १० वी मध्ये सतत उजळणी करण्याचा विद्यार्थी आळस करतात.यासाठी आम्ही ओपन बुक परी़क्षा पद्धतीचा वापर गेली ५,६ वर्ष करतो आहोत. सगळा अभ्यासक्रम शिकवून् पूर्ण झाल्यावर प्रत्येक विषयाचे शिक्षक एक एक दिवस परीक्षा घेतात. त्यासाठी प्रश्नपत्रिका देखील आदल्या दिवशीच विद्यार्थ्याना दिली जाते.
दुस-या दिवशी विर्थ्यायानी पूर्ण प्रश्नपत्रिका कोणताही विकल्प (ओप्शन) न घेता,पाठयपुस्तक समोर ठेवून सोडवायची,त्यासाठी वेळेचे बंधन देखील नसते.(भाषा विषयात निबंधासाठी पाच विषय असतात, त्यापैकी एक विषय मात्र शिक्षक आयत्यावेळी देतात) या पध्दतीमुळे किमान एकदा तरी मुलं सगळं पुस्तक वाचतात आणि एक प्रश्नपत्रिका सोडवण्याच्या निमित्ताने किमान ७०% पुस्तकाचा अभ्यास होतो, असं लक्षात आलं.हा पूर्णपणे परिक्षाकेंद्री उपक्रम आहे,हे मान्य! पण ज्या आर्थिक, सामाजिक ,शैक्षणिक स्तरामधील विर्थ्यांयाना आम्ही शिकवतो त्यांना त्याचा काही प्रमाणात तरी उपयोग होतो ,हे नक्की!

लेखनविषय: दुवे:

Comments

छान

उत्कृष्ट व अनुकरणनीय उपक्रम यात शंकाच नाही. आपल्या सारख्या मुख्याध्यापिका सर्व माध्यमिक शाळांना मिळाल्या तर महाराष्ट्रातील माध्यमिक शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास वेळ लागणार नाही.
चन्द्रशेखर

मस्त!

सुजाताताई,

तुमचा उपक्रम फार आवडला.
शाळेच्या विद्यार्थ्यांची परिस्थिती ध्यानात घेऊन,
चातुर्याने ती परिस्थिती बदलण्यासाठी काही तरी करण्याबद्दल आपले अभिनंदन!

तुमचे शिक्षण विषयक अनुभव आणि शाळेतील प्रत्यक्ष अडचणी, यावर वाचायला नक्की आवडेल!
अजून लिखाण नक्की येऊ द्या.

आपला
गुंडोपंत

अभिनंदन!

सुजाताताई नमस्कार!

आपण आपल्या शाळेत परीक्षेआधिच प्रश्नपत्रिका देता. हे वाचून मला आनंद झाला. खरचं! आमच्या वेळी शाळेत अशी पद्धत असती तर.. असा विचार करून मला गंमत वाटली. प्रश्नपत्रिकेत नेमके काय येणार? ह्या विचारांचेच टेंशन नेहमीच असायचे. अभ्यास करून ही, 'परीक्षेच्या दिवशी केलेल्या अभ्यासाचाच जॅकपॉट लागेल कि नाही?, स्मरणशक्ती दगा तर देणार नाही ना?' या विचारांनी डोकं सुन्न, बधीर असायचे.
'परीक्षेचे टेंशन टाळत विद्यार्थ्यांनी पुस्तकांचे वाचन,मनन करावे', ह्या मुद्दा नजरेसमोर ठेवून आखलेल्या आपल्या ह्या उपक्रमाबद्दल आपले मनापासून अभिनंदन!

+१

उत्कृष्ट उपक्रम.

माझ्या अनुभवानुसार मी जेव्हा दहावीत होतो तेव्हा गणिताचा पेपर (बीज तसेच भूमिती) तुम्हाला सगळी गणिते येत असतील तर असलेल्या वेळात जस्ट सोडवून होत असे. पण जर तुम्हाला गणित कसे सोडवायचे याचा विचार करण्यासाठी वेळ द्यावा लागत असेल तर पूर्ण पेपर दिलेल्या वेळात सोडवून होत नसे. याचा परिणाम म्हणजे ज्यांनी गणिताच्या संकल्पना नीट समजावून घेतल्या आहेत आणि सर्व गणिते सोडवू शकतो पण हजारो गणिते सोडवून सराव केलेला नाही अशा मुलांपेक्षा ज्यांनी तसा सराव केला आहे अशी मुले एका पाठोपाठ एक प्रश्न सोडवून पेपर पुरा करू शकतात. ज्याला सगळी गणिते जराश्या विचाराने सोडवता येत आहेत त्याचा मात्र पेपर पूर्ण होत नाही. आणि सरावावर भर असलेली मुले स्कॉलर म्हणून पुढे येतात.

मी दहावीत असतानाचीच परिस्थिती आजही असेल यात तिळमात्र शंका नाही.

प्रत्यक्ष आयुष्यात बहुतेक कुठलाच प्रश्न तत्क्षणी सोडवायला लागत नाही.

त्यामुळे या उपक्रमातला भरपूर वेळ हा भाग फारच आवडला.

ट्रिकी गणिते आणि भरपूर वेळ अशी परीक्षा घेतल्यास ज्यांना खरोखर गणित कळते अशी मुले अधिक चमकतील जे खरोखर व्हायला हवे.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

+ १ सहमत.

>>सरावावर भर असलेली मुले स्कॉलर म्हणून पुढे येतात.>>
>>प्रत्यक्ष आयुष्यात बहुतेक कुठलाच प्रश्न तत्क्षणी सोडवायला लागत नाही.>>
>>त्यामुळे या उपक्रमातला भरपूर वेळ हा भाग फारच आवडला.>>

+ १ सहमत.

कारणे दाखवा नोटीस

कारणे दाखवा नोटीस
सुजाताताई, माध्यमिक शाळा मुख्याध्यापिका अलिबाग
आपण शिक्षण खात्याची खाते मान्यता न घेता, शिक्षण अधिकाऱ्यास विश्वासात न घेता, जो ओपन बुक परीक्षेचा उपक्रम राबवत आहात. हा उपक्रम शासनाच्या अधिकृत शैक्षणिक धोरणाचा अवमान करणारा आहे.शासनाच्या अधिकृत धोरणा विरुद्ध काम केल्या बद्दल आपणा विरुद्ध कार्यवाई का करण्यात येवू नये याचा लेखी खुलासा या खात्यास ८ दिवसाच्या आत करावा ,नसता आपणावर निलंबनाची ची कार्यवाई करून शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी . शिक्षणाधिकारी .

Thanks & regard,
Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com

भयंकर

सहमत आहे.

या पद्धतीमुळे मुलांच्या मनात शिक्षणाची/अभ्यासाची आवड निर्माण होऊ शकते; जे शासकीय धोरणाच्या पूर्णपणे विरुद्ध आहे.
त्यामुळे ताबडतोब हा प्रकार बंद करावा. हा हा हा.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

अभिनंदन

सुजाताताई,
अतिशय स्तुत्य उपक्रम .. आपल्याला अनेक शुभेच्छा!

ठणठणपाळ,
तुम्ही कोणत्या नात्याने अशी नोटीस बजावत आहात. उपक्रम हे दुसर्‍याला नोटीस बजावण्याचे स्थान नव्हे.
उपक्रमराव वरच्या खोडसाळ व प्रस्तुत लेखिकेच्या स्तुत्य कार्याला बाधा आणु शकणार्‍या या प्रतिसादावर योग्य कारवाई करेल का?

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

मला वाटतं

मला वाटतं की ठणठणपाळ औपरोधिक भाषेत शासनाचा बुळचटपणा दाखवत आहेत.

बाकी, सुजाताताईंचा उपक्रम स्तुत्य वाटला.

क्षमस्व

मला हा उपरोध समजला नव्हता. क्षमस्व.
माझा वरील (आणि हा) प्रतिसाद उडविल्यास हरकत नाहि.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

वा!

आपला उपक्रम व अनुभव आवडला.

शुभेच्छा तसेच उपक्रमावर वेळोवेळी आपल्या इतर प्रकल्प व शिक्षण विषयक महत्वाच्या विषयांवर वाचायला नक्की आवडेल.

शुभेच्छा...!

व्वा मस्त उपक्रम...!

पण, खरंय बरं का ! कितीही चांगले धोरण असले तरी शासनाचे नसलेले धोरण राबविले म्हणून कार्यवाही होऊ शकते....!

-दिलीप बिरुटे

अभिनंदन.

सुजाताताई, अभिनंदन.

"या पध्दतीमुळे किमान एकदा तरी मुलं सगळं पुस्तक वाचतात आणि एक प्रश्नपत्रिका सोडवण्याच्या निमित्ताने किमान ७०% पुस्तकाचा अभ्यास होतो,"

ह्या प्रयोगाची ही खूप मोठी जमेची बाजू आहे असे वाटले.

ओपनबुक, टेकहोम

प्रकल्पाबद्दल अभिनंदन.

आम्हाला ग्रॅज्युएट स्कुलात ओपन बुक, टेक होम अशा परिक्षांचे खूप भ्याव वाटत असे. असे पेपर लई म्हणजे लई अवघड असत असत.

________________________________
माझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का? नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.

तुमची बाजू कृपया मांडाल का?

सुजाता ताई,

चर्चेत काही सदस्यांनी म्हटल्याप्रमाणे खरचं का 'हा उपक्रम शासनाच्या अधिकृत शैक्षणिक धोरणाचा अवमान करणारा आहे.'?
तुमची बाजू कृपया मांडाल का?
माझ्या मते,आपण लिहीलेला लेख हा सगळी माहीती विषद करणारा नसल्यामुळे काहींचा (शहनिशा न करण्यामुळे) गैरसमज झाला असावा.

त्यासोबतच-
कारवाई/ कार्यवाही/ कारवाया/कार्यवाई ह्या शब्दांचे वेगळेपण (असल्यास) स्पष्ट करून माझ्या मनातील गोंधळ दूर करा.

उपरोध

मी तरी तो उल्लेख उपरोधाने केला होता.

मुलांच्यात आवड निर्माण होणे हे धोरणाविरुद्ध आहे हे औपरोधिकच आहे.
ठणठणपाळ यांनीही तसेच लिहिले असावे.

नितिन थत्ते
(नाऊ आय डोंट हॅव टु राईट धिस वे)

स्तुत्य उपक्रम

या उपक्रमाची सरळ-सरळ स्तुती करण्याऐवजी उपरोध वापरल्यामुळे असे गैरसमज झाले असावेत. त्यात ठणठणपाळ (बाप रे कितीवेळा शिफ्ट की दाबायला लागतीये - ठ, ण, ठ, ण, ळ ;-) ) यांनी लाल रंग वापरुन सुनावल्यामुळे गैरसमजाची तीव्रता थोडी वाढली असावी.

खरोखरच स्तुत्य उपक्रम. सुजाताताई आपले अभिनंदन. तुमच्यासारखे प्रयोगशील शिक्षक-शिक्षिका निर्माण होणे ही काळाची गरज बनली आहे.

धन्यवाद

सर्वांना धन्यवाद...! खरेतर या ओपन बुक चर्चेची सुरुवात इतक्या उच्च पातळीवरुन झाली होती की माझ्या या शाळकरी उपक्रमाबद्द्ल कसे लिहावे, असा संकोच् वाटत होता. पण मराठी शब्द अर्थात् अजय भागवत यांच्या आग्रहामुळे हे आपल्यासमोर मांडले. आपल्या सर्वांचा प्रतिसाद खुपच उत्साहवर्धक आहे! असे उपक्रम आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करताना येणा-या असंख्य अडचणी मांडण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळाल्याचा आनंद झाला. ठणठणपाळ यांच्या प्रतिसादाने काही मित्रांचा गैरसमज झाला.....पण सध्याच्या शिक्षण व्यवस्थेवर,आणि सरकारच्या शिक्षणविषयक लाल फितीच्या धोरणावर ती अतिशय मार्मिक टिप्पणी आहे ,हे कॄपया लक्षात घ्या! मला अतिशय मनापासून ती पटली आहे. ज्या शिक्षण क्षेत्रात सर्जनशीलतेचा विकास झाला पाहिजे,तेच क्षेत्र बिनकामी तांत्रिकता, भ्रष्टाचार, अनागोंदी यांनी इतकं बजबजलेलं आहे की संवेदनशील मनाच्या माणसाला इथे काम करताना नैराश्यच येतं अनेकवेळा..! ज्या अवस्थेतुन मी स्वतःसुध्दा जाते आहे. याविषयावर आपणा सर्वांशी लवकरच सविस्तर संवाद साधेन..! पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद !

उपक्रम

उपक्रम आवडला.
माहितीबद्दल धन्यवाद.

प्रशंसनीय

अतिशय प्रशंसनीय उपक्रम आहे हे नक्कीच. आपला हा अभिनव प्रयोग शिक्षणखात्याच्या त्या बूर्झ्वा मनोवृत्तीच्या अधिकार्‍यांच्या पचनी पडो वा ना पडो पण त्या अनेक विद्यार्थ्यात या निमित्ताने शाळेची आणि पर्यायाने शिक्षणाची गोडी कितीतरी पटीने वाढेल हे सांगायला कोणत्याही शासकीय परिपत्रकाची गरज नाही. आपण ज्या भागात हे आदर्श कार्य करीत आहात तेथील "स्कूल ड्रॉपआऊट" चे प्रमाण लक्षणीय आहे आणि त्यामुळेच या भागाचा ज्या गतीने विकास व्हायला हवा तितका होत नाही हे खुद्द शासनच मान्य करीत आहे. भागातील "रिझर्व्ह कॅटेगरी"तील आमदार आणि खासदारांना मुंबई काय किंवा दिल्ली काय, तेथे सरकारी ठरावाच्या बाजूने फक्त हात वर करायचे आणि भत्ते घ्यायचे इतकीच अक्कल असते. अशा विचित्र परिस्थितीत एक "सुजाता पाटील" नावाची व्यक्ती नोकरीच्या नित्याच्या पाट्या न टाकता असे काही विधायक (जरी प्रयोगात्मक असले तरी...) कार्य करते तेव्हा ते निश्चितच प्रशंसनीय बनते यात संदेह नाही. आपल्या उपक्रमास सुयश चिंतीतो.

(एक सूचना : अलिबाग शहरात जर काही निमित्ताने जात असाल तर तेथील लायन्स क्लबच्या पदाधिकार्‍यांना [लेखी स्वरूपात सविस्तर] या उपक्रमाची माहिती द्या. या क्लबच्या परंपरेत असणार्‍या कार्यात आपला प्रयोग येतो आणि त्यामुळे त्यांच्याकडून आपल्या कार्याची नोंद घेतली जाईल तसेच शाळा भागातील विद्यार्थ्यांना शाळोपयोगी साहित्यही त्यांच्याकडून मिळेल.)

परीक्षाकेंद्री उपक्रम

हा उपक्रम परीक्षाकेंद्री आहे असे म्हणण्याचे कारण जर विद्यार्थ्यांना सोडवायला दिलेले प्रश्न असेल तर तुम्ही म्हणताय ते ठिक आहे. पण जर इतर उद्दीष्ट्ये अशा प्रयोगातून साध्य होतील की नाही असे पहायचे ठरल्यास ती उद्दीष्ट्ये कोणती असायला हवीत? व त्यासाठी ओपन बुक पद्धतीत काय बदल करायला हवेत? (उदा- प्रश्न, वेळ, काळ, उत्तरे तपासण्याची पद्धत, शिक्षकांच्या सहभागाची पद्धत, ई)

परिक्षाकेंद्री उपक्रम

तुम्ही म्हणता त्या मुद्दयावर विचार करायला हवा..

अभिनंदन

अभिनंदन.
अधिक अनुभव येथे लिहावेत ही विनंती.

 
^ वर