बदल

वटपौर्णिमेच्या धाग्यातील चर्चा वाचताना एक प्रश्न डोक्यात आला: गेल्या पन्नास-साठ वर्षात आपण आपल्या सणांमधे-सणांच्या प्रथांमधे नक्की किती बदल केले का पूर्णपणे स्थितिस्थापकत्वच दिसते? व्याप्ती फारच लांबेल म्हणून हे सणांच्या संदर्भात मर्यादीत असावे असे वाटते. पन्नास-साठ वर्षे म्हणायची दोन कारणे आहेत - हा काळ स्वातंत्र्योत्तर अधुनिक भारताचा आहे. उपक्रमावरील सदस्यांच्या पिढ्यांचा (१०-१५ वर्षांची एक पिढी) विचार करता यात वेगवेगळी (जर असतील तर) स्थित्यंतरे पाहीलेल्या वर्गाचे प्रातिनिधीक स्वरूप दिसते. या शिवाय येथे केवळ मुंबई-पुणे इतकेच अथवा (मान्य नसल्या तरी) जातीनुसार एक-दोन जातीचे प्रतिनिधीच नाहीत. अर्थात अनेक दृष्टीकोन असू शकतात ज्यातून झालेला आणि होत असलेला बदल दिसू शकतो.

कोण मागासलेले आहे, अंधश्रद्धाळू आहे, काय बदलले पाहीजे वगैरे वर दोन्हीबाजूने भरपूर चर्चा झाली आहे. पण काय बदलले गेले आहे यावर जर सकारात्मक चर्चा होऊ शकली तर खूप चांगली माहीती गोळा होऊ शकेल असे वाटते म्हणून हा चर्चाप्रस्ताव. आपण आपले व्यक्तीगत अनुभव अवश्य सांगावेत ही विनंती. त्यात असे बदल घडताना कशाचा प्रभाव होता, उ.दा. समाजसुधारक, समाजसुधारक संस्था (अनिस वगैरे), आर्थिक बदल (नोकर्‍यांमुळे फिरणे), झपाट्याने होणारे शहरीकरण ज्यात सामाजीक वर्गवारीची पद्धत बदलली, इत्यादी अनेक असू शकतात. आणि अर्थातच प्रत्येक बदल हा कायमच योग्य असतो, आवडला पाहीजे अशातला भाग नसतो. तर तसे देखील येथे सांगितले तर उत्तम.

असो. मी सुरवात माझ्यापासून करतो:

होळीबद्दल आजही ऐकतो. अनिसला "होळी लहान करा, पोळी दान करा" सारखा प्रकल्प आजही राबवावा लागत आहे. त्याला वाढता प्रतिसाद मिळत असेल अशी आशा आणि सदीच्छा. अर्थात पोळी दान करणे हे केवळ होळी साजरी करणार्‍यापेंक्षा सणाऐवजी पार्ट्या करणार्‍यांनी केले तर जास्त फायदा होईल. पण तो वेगळा मुद्दा आहे.

तर असा होळीचा सण, एक घरात त्या दिवशी पुरणपोळी खाणे सोडले तर कधी झाडे जाळून आम्ही कधीच साजरा केला नाही. त्यामुळे त्याची कधी आठवणही नाही... बरं हे केवळ आमच्याकडेच असे नाही तर अशी अनेक घरे, कुटूंबे माहीत होती/आहेत. काही ठिकाणी असे देखील अर्थातच होते, जे "शास्त्रापुरती" होळी करायचे. पण त्यातही देवधर्मापेक्षा सवय असायची. तरी देखील त्यांना देखील विरोध करायची गरज वाटली नाही. कालांतराने त्यांच्या पुढच्या पिढ्या पण बदलल्या... आता आम्ही केले नसले तरी आमच्या आई-वडीलांनी त्यांच्या काळात नक्कीच होळी साजरी केली असावी.. पण तरी देखील ही प्रथा आमच्याकडे अजिबात नव्हती...

गणपती-नवरात्रात पण धार्मिक सण असले तरी त्यात आरत्या, सकाळची पूजा आणि हळदीकुंकू सोडल्यास खाण्यावरच विशेष लक्ष असायचे. त्याचे सार्वजनीक रूप पण गणपतीच्या सार्वजनीक उत्सवात फारसे आवडणारे नसले तरी "घंटाळी नवरात्रोत्सव मंडळा"चे मैदानातील कार्यक्रम, त्यात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील दिग्गज यांची हजेरी आणि शिस्तबद्ध कार्यक्रम यामुळे हा सण लक्षात राहीला आणि एक वेगळाच प्रभाव करून गेला. अष्टमीच्या दिवशी घागरी फुंकणार्‍या बायकांच्या दर्शनाला विरोध न करता एक चांगला आणि वेगळाच आल्टरनेटीव्ह लोकांना मिळाला. तरी तेथे देखील उत्सुकतेने आणि/अथवा श्रद्धेने लाईनी लावून जाणारे लोकं होती. पण त्यात देखील रात्रभर इकडून तिकडे फिरणे हा उद्देश जास्त असणारे होते.

पूर्वी श्रावणात उपवास चालायचे ते आता किमान शहरी भागात बंद झालेत असे वाटते. किमान थोडा मोठा झाल्यापासून शाळेत असल्यापासून जे आठवते त्यात माहीत असलेल्यांनी देखील उपवास सोडल्याचेच आठवते. तेच चातुर्मासाचे नियम. काहीजण चहा सोडायला लागले पण ते त्या प्रथेचा फायदा घेत स्वतःवर नियंत्रण आणायला...

दिवाळीला फराळ केला तरी तो सामाजिकसंस्थांतर्फे इतरांना वाटला जायचा आणि भाऊबीज फंडाला देखील मदत केली जायची. लहानपणी सगळेच खूप फटाके उडवताना पाहीले पण मोठे झालो तसे स्वखुषीने आणि अनुभवाने टाळणारे देखील तितकेच तयार झाले.

या सर्व सणासुदीं टाळण्यात जर काहीतरी हरवले असले तर ते माणसामाणसांशी असलेला संपर्क. अर्थात तो देखील इतर विविध पद्धतीने तयार झाला/ होत आहे. फक्त तो केवळ विकेन्ड टू विकेन्ड मिटींग अँड इटींग असाच राहू नये असे वाटते. कारण असा बदला एक अनिष्ठ प्रथाच ठरू शकतो.

असे बरेच काही लहान-मोठे असू शकते, जे आपण पाहीले/अनुभवले आहे. सुरवातीस म्हणल्याप्रमाणे, याचा अर्थ आता समाजसुधारणा झाली, असे म्हणायचे नाही आहे पण बर्‍याच गोष्टी त्याला विरोध न होताच आपोआप बदलत गेल्या. त्यात ते सण राहीले असतील/नसतील पण बदल मात्र नक्कीच घडत गेले.

लेखनविषय: दुवे:

Comments

शास्त्रापुरते

कोणत्याही बदलाला मूळ ढाच्याचा विसर पडू नये म्हणुन या "शास्त्रा॑पुरत्या" अर्थात सिंबॉलिक गोष्टींच अधिष्ठान द्यावे लागे. वारकरी (प्रसंगी)मटन खाताना माळ काढुन ठेवतो हे त्याच (अ)शास्त्रापुरता केलेला बदल असतो. लग्नपत्रिका स्वीकारताना 'शास्त्रापुरती' टोपी घालावी लागते.नैवेद्याला 'शास्त्रापुरते' पुरण करावे लागते.
तर असा हा समयोचित बदल सामावुन घेताना शास्त्रापुरत्या गोष्टी केल्या की ते स्वीकारणे सोपे जाते
प्रकाश घाटपांडे

शास्त्रापुरता विरोध

शास्त्रापुरत्या गोष्टी केल्या की ते स्वीकारणे सोपे जाते

म्हणूनच ज्योतिषाचा, नाडीचा शास्त्रापुरता विरोध करायचा. हो ना?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

बदल हा मानवाच्या जीवनाचा स्थायी भाव आहे.

बदल हा मानवाच्या जीवनाचा स्थायी भाव आहे. काळा बरोबर जुन्या चालीरीती बदलत गेल्या नवीन परंपरा सुरु झाल्यात त्यात जुने चांगले होते म्हणून उसासे टाकण्याचे कांही कारण नाही. आजच्या शहरी धावपळीच्या सिमेंटच्या जंगलात, हरतालिका, वटपूर्णिमा मंगळागौर हरभर्याची डाळ,पन्ह या सारखे सण आपोआपच बाद झालेत.त्याच बरोबर एका जन्मताच नकोनको होत असताना सात जन्म करता कोण फेऱ्या मरत बसणार. आणि पुरुष तरी कोठे एक जन्म प्रामाणिक राहतो.सत्यनारायणाच्या घरोघरी चालणाऱ्या पूजा सुद्धा बंद होत आहे.कारण त्यातील फोलपणा जाणवायला लागला आहे.सत्यनारायणा पूजा गणपती नवरात्र हे सण राजकारणी, समाजसेवकांनी (कंटकानी ) कधीच पळविले आहे.आणि त्यांना गल्लोगली धंदेवाईक स्वरूप दिले आहे. दशहरा दिवाळी सुद्धा आता तय्यार बाजारी मिठाया आणून साजरी केली जाते कारण एकत्रित कुटुंबाचे झालेले विभाजन. आणि काळानुसार आपणही बदलले पाहिजे. जो थांबला तो संपला ही म्हणच आहे. दे दान सुटे गरीहान महान एके काळी ग्रहणाला, दानाला, आंघोळीला, किती महत्व होते आज सर्व संपले सामाजिक जाणीवा रुंदावल्यात. भविष्यात अजून चांगले बदल होतील याची खात्री आहे.
thanthanpal.blogspot.com

शिमगा

'आता बारा महिने शिमगा आणि बारा महिने दिवाळी' इति माझा एक सहकारी.

या धाग्यात अधिक आठवणींचे प्रतिसाद येवोत.

प्रमोद

बदललो

वेळ नाही व मुख्य म्हणजे फारशी इच्छा नाही. आजीच्या काळात ठरवून असे सणवार-व्रतवैकल्य व्हायची ती जीवनशैली आजच्या शहरी करीयर करणार्‍या स्त्री पिढीची नाही. त्यामुळे ज्यांच्या जीवावर (स्त्रीवर्ग) हे सगळे चालायचे तेच मोठ्याप्रमाणावर गळल्याने हे होणे अपरिहार्य. आईची पिढी होती ती नोकरी करणार्‍या स्त्रीयांची होती त्यामुळे घरच्या प्रथा, कार्य सांभाळून थोडक्याप्रमाणात हे सगळे व्हायचे पण आजची करीयर वुमन पिढीकडून अपेक्षा करणे चुकीचे आहे. मैदानात होळी करणे व फारतर मोठ्या पुजेला बसणे सोडल्यास पुरुषवर्गाचा ह्या सगळ्यात कधीच फारसा सहभाग व उपयोग नव्हता त्यामुळे पुरुषांचा कधीच विशेष आधार ह्या सगळ्या गोष्टीत फारसा नव्हता. अर्थात आजही होममेकर स्त्रीया त्यांच्या आवडीनिवडीवर कमी जास्त प्रमाणात हे सर्व बर्‍यापैकी टिकवून आहेत, नाही असे नाही.

हे सगळे बरेचसे आता फक्त हौशी इव्हेंटमधे मोडते, मोठा नसला तरी घरगुती सुद्धा एक इव्हेंटच. अमुक दिवशी कॅलेंडर मार्क, इतकी लोक येतील, अमुक ते अमुक वेळात अमुक तमुक करायचे आहे, ही लिस्ट, एक्झीक्युट. ज्या गोष्टी एकेकाळी फार सणासुदीला, सिझनल व्हायच्या त्या बर्‍याचश्या आता कमर्शीयल गटात आल्याने पाहीजे तेव्हा उपलब्ध झाल्याने मूळ इव्हेंटची गरजही भासत नाही.

थोडक्यात आता आम्ही महानगरीय संस्कृतीचे आचरण मनःपूर्वक करतो. :-)

काही कमी - काही जास्त

विकास यांनी म्हटल्याप्रमाणे किरकोळ सण, श्रावणातले उपास वगैरे (किमान पांडरपेशा शिक्षित वर्गात) खूप कमी झाले आहेत हे खरे. पण ज्या सणांचे कमर्शिअल एक्स्प्लॉयटेशन होऊ शकते ते मात्र वाढले आहेत. याची दोन उदाहरणे मला दिसतात.

१. माझ्या लहानपणी म्हणजे ७० च्या दशकात (८० च्या दशकाच्या सुरुवातीला) नवरात्रोत्सव हा सण ठाण्यात फारसा नव्हता. (मी हरीनिवास परिसरात-गुजराती वस्तीत वाढलो आहे). दोन-तीन गुजरातीबहुल चाळींमध्ये गरब्याचे (दांडीया नव्हे) एखाद्या रात्री होणारे कार्यक्रम सोडले आणि आर्य क्रीडा मंडळात बसणारी -ठाण्यातील बंगाली कुटुंबांचाच सहभाग असलेली - देवी सोडली तर नवरात्रोसव हा ज्यांच्या घरी घट बसत असतील त्यांच्यापुरता मर्यादित असे. आज त्याचे स्केल आणि स्वरूप पूर्ण बदलले आहे.

२. अक्षय तृतीया हा सण तर अगदीच नगण्य. आम्ही मूळचे चिपळूणचे असल्यामुळे परशुराम जयंती म्हणून तो आमच्या घरी साजरा होत असे. म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असला तरी त्याचे स्वरूप पूर्ण घरगुती असे. आज अक्षय तृतीयेला येणार्‍या ज्वेलर्सच्या पान-पान भरून जाहिराती त्या काळी नव्हत्या.

दिवाळी जशी होती तशीच आहे असे वाटते. पण दिवाळीच्या पहाटे देवळात जाण्याची नसलेली प्रथा चालू झाली आहे असे वाटते. म्हणजे दिवाळी हा खरा सेक्यूलर-मौजमजेचा- असलेला सण अकारण धार्मिक होऊ लागला आहे.

आमच्या चाळीत साजर्‍या होणार्‍या होळीत नारळ वगैरे टाकले जात. पण हातात पूजेची ताटे घेऊन स्त्रिया होळीची पूजा करीत आहेत हे हल्ली आमच्या सोसायटीत दिसणारे चित्र त्यावेळी पाहिल्याचे आठवत नाही. (वस्ती अधिक सरमिसळ झाल्यामुळेही हे असू शकेल).

काही लोकांत मात्र सण साजरे करीत राहण्याचे (साजरे करणे न सोडता आल्याचे) कारण "पुढच्या पिढीला कळावे म्हणून" असे सांगण्याची फॅशन आली आहे.

येथे अजून एक मुद्दा मांडावासा वाटतो. रूढी पाळण्याच्या अनेक गोष्टी शहरी पुरुषांनी स्वतःच्या करिअरला आड येणार्‍या (किंवा करिअरमुळे न जमणार्‍या) म्हणून कधीच सोडल्या आहेत. याची उदाहरणे श्रावणात दाढी न करणे, शेंडी ठेवणे, बाहेर पडताना नेहमी टोपी घालणे, देशी वेशभूषा-धोतर सदरा अशी देता येतील. स्त्रियांच्या बाबतीत मात्र करिअर सांभाळूनसुद्धा रूढी पाळण्याच्या अपेक्षा अजूनही केल्या जात आहेत. वटपौर्णिमेच्या धाग्यातही लिहिल्याप्रमाणे प्रत्यक्ष मागणी नसली तरी तसे करणार्‍या दुसर्‍या महिलेचे कौतुक करणे वगैरे बाबीतून घरात नव्याने आलेल्या आणि नव्या घराला आपलेसे करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेवर दडपण येते.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

सोनारानेच कान टोचावेत

वटपौर्णिमेच्या धाग्यातही लिहिल्याप्रमाणे प्रत्यक्ष मागणी नसली तरी तसे करणार्‍या दुसर्‍या महिलेचे कौतुक करणे वगैरे बाबीतून घरात नव्याने आलेल्या आणि नव्या घराला आपलेसे करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेवर दडपण येते.

नवर्‍यानेच या बाबतीत पुढाकार घेतला आणि संस्कृती सांभाळण्याची जबाबदारी फक्त आपल्या बायकोचीच नाही हे सगळ्यांनाच सांगितले, कळू दिले की लोकांचा त्रास कमी होतो, किंबहुना होतच नाही. प्रत्येकवेळी मुली/स्त्रीनेच स्टँड घेण्याची गरज नसावी, नसते.
पण स्त्रियांना स्वतःच हे सण साजरे करायचे असतील तर काय करणार?

बाकी आवाज, ध्वनीप्रदूषण, पैशांचा माज याबाबतीत रिकामटेकडा यांच्याशी सहमत.

+१

>>नवर्‍यानेच या बाबतीत पुढाकार घेतला आणि संस्कृती सांभाळण्याची जबाबदारी फक्त आपल्या बायकोचीच नाही हे सगळ्यांनाच सांगितले, कळू दिले की लोकांचा त्रास कमी होतो, किंबहुना होतच नाही. प्रत्येकवेळी मुली/स्त्रीनेच स्टँड घेण्याची गरज नसावी, नसते.

सहमत आहे. पण नवरा बर्‍याचदा "तुमच्या भानगडीत मी पडणार नाही" असा शहामृगी पवित्रा घेतो.

>>पण स्त्रियांना स्वतःच हे सण साजरे करायचे असतील तर काय करणार

स्वतःच साजरे करायचे असतील तरी तिला त्यातला फोलपणा दाखवावाच.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

- ०.५

>> नवरा बर्‍याचदा "तुमच्या भानगडीत मी पडणार नाही" असा शहामृगी पवित्रा घेतो. <<
मग अशा शहामृगाबरोबर आयुष्यभर रहाण्याची तयारी ठेवावी नाहीतर शहामृगाला माणूस बनण्याचे पद्धतशीर ट्रेनिंग द्यावे.

>> स्वतःच साजरे करायचे असतील तरी तिला त्यातला फोलपणा दाखवावाच. <<
का दाखवावा? मी करते तेच्च बरोबर आणि इतरांची काय ती चूक हे सिद्ध करणं मलातरी जमत नाही. "मला आनंद वाटतो, मला आवडतं, म्हणून मी करते", यापुढे काय लॉजिक चालवून "फोल"पणा दाखवणार? जोपर्यंत पारंपारिक मतं इतरांवर लादली जात नाहीत, अशा वागण्याचा इतरांना त्रास होत नाही तोपर्यंत मधे पडण्यात काय हशील?

संस्थळांमुळे

थोडे अवांतरः संस्थळांमुळे आम्हाला वटपौर्णिमा होती हे समजले....

बाकी वटपौर्णिमा म्हणल्यावर मला कायम सख्खेशेजारी मधील सुहास जोशीं - अरूण जोगळेकरचा प्रसंग आठवतो. "त्याला" वाटत असते की पुराणमतवादी "ती" नट्टा पट्टा करून वटपौर्णिमेच्या पूजेला चालली आहे, म्हणून तो त्राग्याने आपल्या शेजार्‍याला सांगतो की काय कटकट आहे, ती पूजा करून परत परत मला मागणार. तेव्हढ्यात हा शेजारी (सतीश पुळेकर) विचारतो, "वहिनी कुठे निघालात?" वहीनी म्हणतात, "रम्मी खेळायला"!
"म्हणजे?" मग आधी तक्रार करणार्‍या "त्याचे" डोके फिरते, "तू वटसावित्रीची पूजेला चालली नाहीस?" तात्काळ उत्तर मिळते, "नाही गं बाई, सात जन्म गळ्यात तीच धोंड बांधून घेयला मला काय वेड लागलयं का?" :-)

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

पैशाचा माज

ध्वनिप्रदूषण प्रचंड वाढले आहे. प्रत्येक खासगी समारंभ साजरा करताना यांना रात्री १ वाजेपर्यंत गाव जागे ठेवायचे असते. ट्रॅक्टरच्या मागील ट्रॉलीत १५-२० फूट उंच ध्वनिक्षेपक खोकी घेऊन रस्ता अडवून नाचत बसतात. मुंबईत छट पूजा सुरू झाल्या आहेत. माझा अंदाज असा की सबाल्टर्न लोकांकडे अचानक पैसा आल्यामुळे हे सारे घडते आहे.

सहमत आहे

पूर्णपणे सहमत. हा सगळा पैशाचा माज आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सहमत

रिकामटेकड्यांच्या पैशाचा माज ह्या शब्दप्रयोगाशी पूर्ण सहमत. तीच कथा मुंबई-पुण्यात नवरात्रोत्सवासंदर्भात आणि अक्षय तृतियेच्या संदर्भात दिसते. पण हे केवळ हिंदू धार्मिक सणांच्याच बाबतीत होत आहे असे नाही. व्हॅलेंटाईन डे विशेष करून आणि इतरही असले कुठले डेज् पण साजरे करताना पार्ट्यांचे प्रमाण आणि प्रकार हे पैसाच दाखवत असतात आणि बर्‍याचदा संपूर्ण समाजावर असे करण्याचे दडपण आणत असतात.

नितीनना दिवाळीला पहाटे उठून देवळात जायची प्रथा जरी नवीन वाटत असली तरी मी ती माझ्या लहानपणापासून कायम करत आलो आहे. मीच नाही तर ठाण्यातील आमचे अनेक शेजारीपाजारी, नातेवाईक पण. पहाटे अभ्यंगस्नान करून तळ्यावरून जांभळी नाक्याच्या गणपतीला जाताना जो काही गारवा असायचा त्यात मजा येयची. दर्शन घेऊन आलो की मग फराळ. दिवाळी हा सेक्यूलर सण वाटत नाही. कारण लक्ष्मीपूजन असते तसेच व्यापार्‍यांचे वर्ष देखील बलीप्रतिपदेला सुरू होते. पण एकंदरीत दिवाळीचा सण हा कोणी धार्मिक म्हणून साजरा करतात असे देखील वाटत नाही. बाजूच्या माणसाला पाय लागला तरी आपण चटकन हात मागेपुढे करत नमस्कार करतो. तेथे सेक्यूलर नक्की काय असू शकते? :-)

बाकी एक अतिशय मजेशीर गोष्ट मी किमान बॉस्टनमध्ये बघितली आहे. तमाम दाक्षिणात्य हे १ जानेवारीला देवळात जाऊन पूजा/अभिषेक करतात. हा नक्की कुठला मुहुर्त हे कधी समजले नाही.

अमेरिकेत नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात येणारा थँक्सगिव्हींग डे हा म्हणलं तर सेक्यूलर आणि कौटूंबिक सण. ख्रिसमसपेक्षाही या सणाच्यावेळेस लोकं एकमेकांकडे जातात, देशभर रस्ते, रेल्वे आणि विमाने यांनी जास्तित जास्त प्रवास होतो वगैरे. नेटीव्ह अमेरिकन्सनी युरोपातून आलेल्या "पिलग्रिम्स" ना वाचवायला म्हणून खायला प्यायला दिले. त्यात टर्की चे जेवण होते म्हणून या दिवशी टर्की खातात. तर या एका दिवसासाठी ३०० मिलियन्स टर्कीज मारल्या जातात. अर्थात हा आकडा अधुनिक आहे. अमूकने केले म्हणून तमुकने पण टर्की करायची. असला प्रकार असतो. पण जी टर्की केवळ अर्धीवगैरे खाऊन वाया जाते त्याच्या ऐवजी चिकन करा आणि संपूर्ण खा. त्या मारलेल्या प्राण्याला पण थँक्स अशा प्रकारे देता येऊ शकतात. त्याला किमान न्याय द्या हे अजूनही सुचत नाही, सुचले तरी पचनी पडत नाही. कारण काय तर, सेक्यूलर असली तरी प्रथा...

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

सुधारकांचा दृष्टिकोन

निर्माल्य/मूर्ती विसर्जन, गावजेवण(+दारू) देणे, फटाके फोडणे आणि बोकडांचा बळी देणे यांविरुद्ध अंनिसला अवाजवी उत्साह आहे असे मला वाटते.

बदल

आमच्या घरात फारसे सण समारंभ कधीच झाले नाहीत. हळदीकुंकू, वटपौर्णिमा, हरतालका वगैरे आमची आजी देखील करत होती का याबाबत साशंक आहे. (घरी विचारायला हवे.) येऊन जाऊन गणपती घरात येत असे. आजोबांच्या मृत्यूनंतर माझ्या वडिलांनी आणि काकांनी दरवर्षी प्रत्येकाकडे गणपती आणून जबाबदारी वाटून घेण्याचे ठरवले हाच बदल.

बाकी, भारतात जुने सण कमी झाले तरी नवे सण आणि त्यांचे प्रस्थ बरेच बोकाळले आहे. व्हॅलेंटाईन्स डे आणि इतर मॉलसंस्कृती फुलवणार्‍या डें प्रमाणे लवकरच थँक्स गिविंगही भारतात साजरा होईल असा अंदाज आहे. ;-)

भरीस भर

यात भर म्हणून ठराविक काळांनी नवनवीन् देवही जन्माला "घातले" जातात, आणि मग त्यांच्या जयंत्या-पुण्यतिथ्यांचा उरूस होतोच. बाबासाहेबांबद्दल संपूर्ण आदर आहे, पण तरीही ठराविक भागांमधे आंबेडकर जयंती, बुद्धपौर्णिमा आणि महापरिनिर्वाणदिनी जाणे/जगणे कठीण होते. तीच अवस्था शिवाजी महाराजांच्या जन्मतिथी, राज्याभिषेकांच्या दिवशी!

 
^ वर