मराठी अभ्यास केंद्र ---कार्याचा परिचय!

मराठी भाषेवर मनापासून प्रेम करणार्‍या, त्या भाषेतून स्वतःला व्यक्त करणार्‍या लेखक वाचक मंडळींनो!

मराठी अभ्यास केंद्राचा हा अल्पपरिचय!
अनेक तरुण मंडळी मराठी भाषेला ऊर्जितावस्था यावी यासाठी प्रयत्नशील आहेत.
याचे सभासदत्व स्वीकारून सक्रिय सहभाग द्यावा अशी विनंती.

अधिक माहितीसाठी अध्यक्ष -- प्रा. दीपक पवार ...दूरध्वनी क्रमांक ९८२०४ ३७६६५ deepak@marathivikas.org/santhadeep@gmail.com या पत्त्यावर संपर्क साधावा.

परिचय

‘मराठी अभ्यास केंद्र’ हे मराठी भाषा, समाज आणि संस्कृती ह्यांसाठी विधायक चळवळ उभारू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांचे संघटन आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर मराठीला लोकभाषा, व्यवहारभाषा आणि ज्ञानभाषा म्हणून मानाचे स्थान मिळेल असे स्वप्न आपण पाहिले. मराठी माणूस या राज्यातच नव्हे तर जगभर स्वत:च्या कर्तृत्वाचा ठसा उमटवेल अशी आशा बाळगली. मराठी संस्कृतीचा भविष्यकाळ हा तिच्या इतिहासाइतकाच देदीप्यमान असेल असे गर्जत राहिलो. प्रत्यक्षात स्थिती काय आहे ?

लोकभाषा, व्यवहारभाषा आणि ज्ञानभाषा म्हणून मराठीचे वेगाने उच्चाटन होत आहे. शिक्षणाच्या माध्यमापासून न्यायव्यवहारातल्या मराठीपर्यंत सर्वच क्षेत्रांत मराठीला तिचे मानाचे स्थान आपण मिळवून देऊ शकलो नाही. ज्ञानभाषा होण्याची लढाई मराठी हरल्यातच जमा आहे असा निराशेचा स्वर वाढू लागलाय. देशविदेशात मराठी माणसांनी उत्कर्ष साधला पण हा उत्कर्ष मराठी समाजाच्या तळच्या घटकांपर्यंत अजूनही पोचलेला नाही. समृद्धीचे दरवाजे ज्यांच्यासाठी खुले झालेत, अशांपैकी बहुतेकांना मराठी भाषा, संस्कृतीशी फारसे देणेघेणे राहिलेले नाही. जागतिकीकरणाच्या रेट्यात मातृभाषा वगैरे जुनाट गोष्टींच्या फंदात न पडता व्यक्तिगत उत्कर्षाकडे लक्ष द्यावे अशी भूमिका ते सर्व प्रसारमाध्यमांतून आग्रहाने मांडत आहेत. राज्यकर्ते, नोकरशहा, अभिजनवर्गापैकी अनेकजण त्यात सामील आहेत. दुसरीकडे बहुजनसमाज प्रगतीच्या नव्या संधींचा शोध घ्यायचा की आपली भाषा, समाज यांच्याशी निष्ठा राखायची या कात्रीत सापडला आहे. परिणामी मराठीच्या प्रश्नांवर कोणी आणि कसे लढायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठी अभ्यास केंद्राच्या पुढाकाराने सुरू झालेली चळवळ हे या कोंडीवरचे उत्तर आहे असा आम्हांला विश्वास आहे.

अभ्यासातून सिद्ध झालेली विधायक चळवळ…

... हे मराठी अभ्यास केंद्राचे स्वरूप आहे. प्रतिक्रियात्मक आणि प्रतीकात्मक पद्धतींनी आंदोलने चालवून मराठी भाषा, समाज आणि संस्कृतीपुढील प्रश्न सुटल्यासारखे वाटतील. पण सनदशीर मार्गाने, चिकाटीने केलेल्या पाठपुराव्याची सोबत त्याला नसेल तर हे यश तात्कालिक ठरेल. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मराठीसाठी निर्माण झालेल्या विविध राजकीय चळवळींतून या धोक्याची प्रचिती आपल्याला आलीच आहे. म्हणूनच या नंतरच्या काळात मराठीची चळवळ नव्या पायावर उभी राहायला हवी.

मराठीकारण...

... हे या नव्या चळवळीला आम्ही दिलेले नाव आहे. मराठी भाषा, समाज आणि संस्कृतीचे अर्थकारण, राजकारण यांचा समग्र वेध म्हणजे मराठीकारण. मराठीची ही आजच्या काळाची, आजच्या पिढीची चळवळ आहे. आजवर मराठीची आंदोलने ज्या वैचारिक आधारावर पोसली गेली त्यापेक्षा अधिक व्यापक भूमिकेने मराठीच्या प्रश्नांचा पाठपुरावा केला पाहिजे, या भूमिकेतून ‘मराठी अभ्यास केंद्र’ काम करत आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांना, घटनात्मक यंत्रणांना मराठीच्या प्रश्नांवर भूमिका घ्यायला भाग पाडणे, केंद्र आणि राज्य शासनाच्या मराठीविरोधी धोरणांत संसदीय, बिगरसंसदीय मार्गांनी बदल घडवून आणण्यासाठी जनमत उभारणे आणि आज मर्यादित वर्तुळात फिरत राहणाऱ्या मराठीच्या जतन, संवर्धनाच्या चळवळीचे लोकलढ्यात रूपांतर करणे हे आमचे ध्येय आहे.

वैचारिक आणि विवेकी भूमिका…

विविध विषयांचा सखोल अभ्यास करून मांडलेल्या उपाययोजना आणि त्या उपाययोजनांवर आधारित कृतिलक्ष्यी चळवळ ही ‘मराठी अभ्यास केंद्रा’च्या कार्यपद्धतीची वैशिष्ट्ये आहेत. या भूमिकेतून उभ्या राहिलेल्या चळवळीला वेळप्रसंगी राजकीय लढ्याचे स्वरूप आले तरी आम्ही मागे हटणार नाही. किंबहुना एक दिवस या चळवळीला तसे व्यापक रूप येईल असा आम्हांला विश्वास आहे. अभ्यास केंद्राची रचना ही कृतिगटांवर आधारित आहे. प्रत्येक कृतिगट हा त्या त्या विषयावरच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास करून त्यावरील शक्य असलेल्या उपायांची मांडणी समाजातील संबंधित गटांपुढे करत असतो. समाजात विविध स्तरांवर चर्चा घडवून एक व्यापक कृतिआराखडा तयार करण्यावर केंद्राचा भर असतो. त्या कृतिआराखड्याप्रमाणे विशिष्ट कालमर्यादेत एखादा प्रश्न निर्णायकपणे सोडवण्यासाठी सामाजिक, राजकीय, प्रशासकीय स्तरांवर पाठपुरावा करणे हे एक महत्त्वाचे कार्य असते.

संयुक्त महाराष्ट्रासाठीचा दुसरा लढा...

या प्रयत्नांतून सर्व थरांतला, महाराष्ट्रातला आणि बृहन्महाराष्ट्रातला मराठी माणूस जोडला जाईल. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सर्वस्व पणाला लावून मराठी जनता उतरली आणि राजसत्ता, धनसत्तेला आव्हान देऊन आपण मुंबईसह महाराष्ट्र मिळवला. आज तो महाराष्ट्र टिकवण्याचे आणि घडवण्याचे आव्हान आपल्यापुढे आहे. एका अर्थाने मराठीकारणाचा हा लढा म्हणजे संयुक्त महाराष्ट्रासाठीचा दुसरा लढा आहे. आज वातावरणात कितीही निराशा, पराभूतता दाटून आली असली तरी मराठी माणसाच्या विवेकशक्तीच्या, समूहशक्तीच्या जोरावर आपण सगळे हे निर्णायक युद्ध जिंकू असा आम्हाला विश्वास आहे. या लढ्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याची हमी हीच मराठी अभ्यास केंद्राची ओळख आहे, सदोदित असणार आहे.

‘मराठी अभ्यास केंद्रा’चे कृतिगट

१. मराठी माहिती कोष

मराठी भाषा व संस्कृती यांच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या व कार्य करू इच्छिणाऱ्या व्यक्ती, संस्था तसेच उपलब्ध साधनसामग्री यांची माहिती, आकडेवारी यांचे एकत्रीकरण करणे.

गटप्रमुख - संतोष आग्रे – ९३२४२७३५०५ – santosh@marathivikas.org

२. मराठी संशोधन प्रकल्प

मराठी भाषा विषयक प्रश्नांसंबधी संशोधन, सर्वेक्षण प्रकल्प स्वतंत्रपणे व सहकार्याने राबविणे. ह्या संशोधनाचा मराठीच्या विकासासाठी उपयोग करून घेणे.

गटप्रमुख - तुषार पवार – ९८२०२९५७८५ - tushar@marathivikas.org

३. मराठी विद्याजगत

शालेय व उच्च शिक्षणातील मराठी भाषेचे प्रश्न समजून घेऊन मराठीचा शिक्षणाचे माध्यम म्हणून वापर वाढवण्यासाठी प्रयत्न करणे.

गटप्रमुख - वीणा सानेकर – ९८१९३५८४५६- veena@marathivikas.org

४. मराठी अर्थकारण

रोजगार,व्यवसाय, उद्योगक्षेत्रातील मराठीच्या वापराला चालना देणे. त्यासाठी शिक्षण, कला, व्यवहार, उद्योग, प्रसारमाध्यमे इत्यादी क्षेत्रांतील व्यक्तींचे, संस्थांचे प्रश्न समजून घेणे, त्यांना एकत्र आणणे. उद्योग, व्यवसायांतील अनेक क्षेत्रांचे अभ्यासक्रम/प्रशिक्षण मराठीतून उपलब्ध करणे.

गटप्रमुख - चेतन चित्रे - ९८६०६३४०५३ - chetan@marathivikas.org

५. मराठी संस्था

महाविद्यालये, विद्यापीठांमधील मराठी विभाग/वाङमय मंडळे व इतर भाषा-साहित्य संस्था यांच्यात समन्वय साधून मराठीच्या संवर्धनाचे उपक्रम राबवणे.

गटप्रमुख - गीता मांजरेकर – ९७७३३२५३१५ - geeta@marathivikas.org

६. माहितीचा अधिकार

माहितीच्या अधिकाराचा वापर करून राज्यात मराठीच्या वापराची वस्तुस्थिती जाणून घेणे व त्याआधारे शासनावर मराठीच्या वापरासाठी दबाव आणणे.

गटप्रमुख - शरद गोखले – ९८६९४४४७५७ – sharad@marathivikas.org

७. संगणकीय मराठी व माहिती तंत्रज्ञान

मराठी भाषेला अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाची जोड देणे. महाजालावरील विविध साधनांच्याद्वारे मराठीचा प्रसार करणे. सर्वसामान्य जनतेला संगणकावर मराठीच्या वापराचे प्रशिक्षण देणे.

गटप्रमुख - राममोहन खानापूरकर - ९८२००४००६६ – rammohan@marathivikas.org

मराठी अभ्यास केंद्राचे कार्य – एक दृष्टिक्षेप

१. युनिकोड वापरून संगणकावर मराठीतून व्यवहार व्हावा यासाठी महाराष्ट्र शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, मायक्रोसॉफ्ट, सीडॅकसारख्या यंत्रणांशी संपर्क साधून अंमलबजावणीसाठी पाठपुरावा. मराठीसाठी इन्स्क्रिप्टचा कळफलक सर्वमान्य व्हावा, एम.एस.सी.आय.टी. च्या अभ्यासक्रमात युनिकोड आणि मराठीचा अनिवार्यपणे समावेश व्हावा यासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाकडे पाठपुरावा. युनिकोड-मराठीच्या प्रबोधनासाठी कार्यशाळांचे सातत्याने आयोजन.

२. मराठी शाळांच्या सक्षमीकरणासाठी कृतिआराखडा तयार करून शासनाकडे पाठपुरावा.

३. पदवी आणि पदव्युतर पातळीवरच्या मराठीच्या शिक्षणाचे विस्तारीकरण व्हावे यासाठी महाराष्ट्रातल्या विविध विद्यापीठांकडे प्रस्ताव सादर. काही विद्यापीठांमध्ये अंमलबजावणीला सुरुवात.

४. जिल्हा व तालुका पातळीवरच्या न्यायालयांचे मराठीकरण यशस्वी व्हावे यासाठी संगणकीकरण व इतर आघाड्यांवर पाठपुरावा.

५. घटनेच्या कलम ३४८(२) प्रमाणे मराठी ही मुंबई उच्च न्यायालयाची प्राधिकृत भाषा व्हावी यासाठी शासन व मुंबई उच्च न्यायालयाकडे पत्रव्यवहार.

६. माहितीच्या अधिकाराचा वापर करून केंद्र शासनाची कार्यालये, बॅंका, मोबाईल कंपन्या व इतर संस्थांमध्ये मराठीच्या वापरासंबंधी पत्रव्यवहार. मिळालेल्या माहितीच्या आधारे संबंधित यंत्रणांना मराठीचा वापर करण्यास भाग पाडणे.

७. विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयांमध्ये मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळे अनिवार्य होऊन त्यांना स्थायी निधी उपलब्ध व्हावा यासाठी यशस्वी पाठपुरावा.

८. विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या मराठीकरणासाठी विद्यापीठे व शासनाकडे पाठपुरावा. मुंबई विद्यापीठाच्या बीएमएम (बॅचलर ऑफ मास मीडिया) अभ्यासक्रमाचे मराठीकरण यशस्वी.

मराठी अभ्यास केंद्राचे सभासद होऊन तुम्ही केंद्राच्या कामात सक्रीय सहभाग देऊ शकता.

१) आश्रयदाते: रु.२०००/- अथवा त्याहून अधिक;

२) आजीव सभासद: रु.१०००/-

३) साधारण सभासद: वार्षिक वर्गणी रु.१०० /-

याशिवाय देणगी देऊणही आपण अभ्यास केंद्राला साहाय्य करू शकता.

सभासद वर्गणी अथवा देणगीचे धनादेश ‘मराठी अभ्यास केंद्र’ या नावाने काढावेत.

मराठी अभ्यास केंद्राच्या कामाचा प्रचार व प्रसार दूरवर व्हावा म्हणून तुमच्या सहकार्याची आवश्यकता आहे. आपण आपल्या परिसरातली अभ्यास केंद्राची जबाबदारी स्वीकारू शकता किंवा एखाद्या कृतिगटात सहभागी होऊ शकता. प्रसारमाध्यमांतून अभ्यास केंद्राची भूमिका व कार्य अधिकाअधिक लोकांपर्यंत जाईल यासाठी सहकार्य करू शकता.

लेखनविषय: दुवे:

Comments

चांगले पण

आपल्या संस्थेची ओळख वाचली. चांगले कार्य आहे.

मात्र मी मराठी विकास च्या संस्थळावर जाण्याचा प्रयत्न केला पण ते बंद आहे.
एसक्युएल मध्ये काहीतरी झोल आहे असा संदेश आला.

आपण योग्य त्या व्यक्तींचे संपर्क वर दिले आहेत हे पाहिले
पण येथेही माहिती संग्रहीत होईल म्हणून येथेच प्रश्न विचारतो.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळाकडे पाठपुरावा

युनिकोडसाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ काय निर्णय घेणार आहे?
त्यांचा यात काय सहभाग असतो? त्यांना मराठी भाषेच्या लिपी विषयक सल्ला कोण देते?

मला वाटायचे की राज्य मराठी विकास संस्था यात काही करू शकते.
अंतिम निर्णय टी आय डी एल घेते, आणि तसे युनिकोड संघटनेला कळवते व त्या प्रमाणे बदल घडवून आणला जातो.

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ साहित्य संमेलना शिवाय नक्की काय करते यावरही खरे तर काही लिहू शकाल का?

तसेच मायक्रोसॉफ्ट कडे मराठी विषयक कसला पाठपुरावा करत आहात, या विषयीपण उत्सुकता आहे.
हा पाठपुरावा कशा पद्धतीने केला जातो आहे?
(कारण त्यांनी तर मराठी भाषा मासॉ ऑफिसमध्ये आणि विंडोज एक्सपी वर आधीच दिली आहे.
सुमारे २००४ नंतर तो प्रकल्पही गुंडाळला असावा... चुभुदेघे)

२. मराठी शाळांच्या सक्षमीकरणासाठी कृतिआराखडा तयार करून शासनाकडे पाठपुरावा.

सक्षमीकरण म्हणजे नक्की काय केले जाते आहे?
कृतिआराखड्याची अजून माहिती द्याल का?
मला यात रस आहे.

३. पदवी आणि पदव्युतर पातळीवरच्या मराठीच्या शिक्षणाचे विस्तारीकरण व्हावे यासाठी महाराष्ट्रातल्या विविध विद्यापीठांकडे प्रस्ताव सादर. काही विद्यापीठांमध्ये अंमलबजावणीला सुरुवात.

अरे वा! हे वाचून आनंद झाला. पण मग त्या विद्यापीठांचे नाव का नाही दिलेले?
वृत्तपत्रविद्या* या विषया शिवाय अजून कोणते अभ्यासक्रम मराठी मध्ये सुरु झाले?

कृपया माझे प्रश्न कुजकटपणे विचारलेले नसून, माहिती व्हावी या अर्थाने विचारले आहेत.
मला या विषयात मनापासून रस आहे. मदत करायला नक्की आवडेल.

आपला
गुंडोपंत

(* वृत्तपत्रविद्या हा अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठात झगडून सुरु केला तरी त्यासाठी विद्यार्थीच मिळेनात. ही परिस्थिती काही काळापूर्वी लोकसत्ता मध्ये वाचली होती.)

 
^ वर