संस्कृत सुभाषिते

सुभाषिते हे संस्कृत भाषेचे एक आगळे वैशिष्ट्य आहे असे म्हणता येईल.अन्य भाषांत अशी स्वतंत्र सुभाषिते नसावी.सर्वच भाषांत म्हणी,वाक्प्रचार असतात.तसेच साहित्यातील
वेचक सुवचनेही संग्रहित केलेली असतात.मराठी भाषेत असे सुविचारसंग्रह विपुल आहेत.
मात्र दोन अथवा चार ओळींच्या नीतिपर,बोधपर स्वतंत्र पद्यरचना केवळ संस्कृत भाषेतच असाव्या.प्राकृत भाषेत आहेत(गाथा शप्तशती)पण त्यातील बहुतेक रचना केवळ शृंगारिक आहेत.नीतिपर एकही नाही.
उपक्रम संकेतस्थळावर "माझे आवडते सुभाषित" या शीर्षकाखाली काही सुभाषिते आली. प्रतिसादही चांगला मिळाला.पण सुभाषितांच्या एकूण संख्येचा तुलनेत ती नगण्यच म्हणायची. संस्कृत सुभाषितांचा बृहत्संग्रह "सुभाषितरत्‍नभाण्डागारम्।"प्रसिद्ध आहे. (माझ्याकडे एक जुनी प्रत आहे. १९३५ची) त्या संग्रहात अकरा हजारांच्या आसपास सुभाषिते आहेत.अर्थ दिलेला नाही.शेवटी वर्णानुक्रमणिका आहे.
संस्कृत सुभाषितांची लहान -मोठी अनेक पुस्तके उपलब्ध आहेत.काही सार्थ आहेत. "सुभाषित सरिता",व्यावहारिक सुभाषिते,चारशे सुभाषिते,पाचशे सुभाषिते, संस्कृतसाहित्यातील सुभाषिते, असे अनेकानेक संग्रह आहेत.
संस्कृत सुभाषितांचे मराठी पद्यरूपांतर पूर्वीपासून होत आहे.राजा भर्तृहरी याच्या शृंगारशतक,नीतिशतक,वैराग्यशतक यांतील सर्व सुभाषितांचे मराठी पद्यरूपांतर वामन पंडिताने केले आहे.ते आज उपलब्ध आहे.संस्कृत सुभाषितांची कृष्णशास्त्री चिपळूणकरकृत पद्यरूपे(विशेषतः अन्योक्ती) आपण शालेय पाठ्यपुस्तकात वाचली आहेत.
सर्वाधिक (पाच-सहाशे तरी) सुभाषितांचे पद्यरूप मराठीकरण ल.गो.विंझे यांनी केले आहे. ते दोन खंडांत प्रसिद्ध झाले आहे.
प्रस्तुत लेखातील मराठी पद्यरूपांतर स्वरचित आहे.मूळ सुभाषिताचा अर्थ मराठीत जसाच्या तसा उतरविण्याचा प्रामाणिक प्रयत्‍न केला आहे.
१)पृथिव्यां त्रीणि रत्‍नानि जलमन्नंसुभाषितम्।
मूढै: पाषाणखण्डेषु रत्‍नसंज्ञा विधीयते।

जगती असती तीनच रत्ने अन्न,सुभाषित,पाणी।
दगडखड्यांना रत्‍ने म्हणती मूर्खशिरोमणि कोणी।

२) सज्जनस्य हृदयं नवनीतम्। यद्वदन्ति कवयस्तदलीकम्।
अन्यदेहविलसत्परितापात्। सज्जनो द्रवति नो नवनीतम्।

सज्जनहृदया नवनीताची उपमा देती कोणी।
बुद्धिवंत ते , परी वाटते खोटी त्यांची वाणी।
आच लागुनी तापे जेव्हा तेव्हा वितळे लोणी।
परपीडेने सुजनहृदय ते होते पाणी पाणी ॥

३) काव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमताम्।
व्यसनेनतु मूर्खाणां निद्रया कलहेन वा।

काव्यशास्त्र अन् मनोविनोदनी बुद्धिमतांचा वेळसरे।
घोर झोपुनी, व्यसनी, कलहीं वेळ दवडती वेडसरे॥

४) इतर शापशतानि यदृच्छया वितर तानि सहे चतुरानन।
अरसिकेषु कवित्वनिवेदनं शिरसि मा लिख मा लिख मा लिख।

ब्रह्मदेवा दे अन्य शाप काही
शेकडों, ते मी मूकमुखी साही
"अरसिकाला काव्यार्थ समजवावा"
ललाटी हे लिहू नको नको देवा!

लेखनविषय: दुवे:

Comments

छान

पद्यरुपांतर आवडले. ही सुभाषिते अतिपरिचित आहेत. काही नवीन सुभाषिते आल्यास उत्तम.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

असेच म्हणतो

वरील तीनही वाक्ये परत म्हणतो.
शिवाय 'वेळ सरे आणि वेडसरे' हा कोटीक्रम खूपच आवडला असेही म्हणतो.

असेच म्हणतो

असेच म्हणतो. भाषांतरे छान उतरलेली आहेत.

- - -

मराठीमधील संत किंवा पंत कवींच्या कवितांमधून एखादे कडवे स्वतंत्र अर्थाचे असेल तर त्याला "सुभाषित" का म्हणू नये?

नाहीतरी वर दिलेले "काव्यशास्त्रविनोदेषु" श्लोक हितोपदेश या कथाग्रंथातून वेगळा काढलेला आहे. "मराठीमध्ये सुभाषिते नसतात" याचा अर्थ असा घ्यावा का - "मराठीत छोटे-छोटे पद्यखंड उद्धृत करण्याची प्रथा नाही".

संस्कृतामध्ये सुद्धा असली पद्ये उद्धृत करणारा स्वतंत्र प्रतिभेचा कवी किंवा लेखक क्वचितच सापडेल. संस्कृतातमध्ये सुद्धा मौलिक किंवा स्वतंत्र वाङ्मयात "सुभाषिते" थोडीच सापडतात. आणि उत्तम संस्कृत काव्यात कवीची स्वरचित सुवचने भरपूर सापडतात.

मराठीत हल्ली स्वतंत्र प्रतिभेचे लेखन बहुतकरून गद्यात आहे. त्यातून पद्य सुवचने उद्धृत करणे शक्य नाही. पंत आणि संत कवींकडून अशी पद्य सुवचने उद्धृत करण्यालायक भरपूर आहेत. अधूनमधून उद्धृत केलेली दिसतात. त्यांना "मराठीमधील सुभाषिते" म्हणण्यास माझी तरी काही हरकत नाही.

फक्त एक कडवे असलेली सुवचन-पद्ये कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी लिहिलेली आहेत. परंतु अशा काव्यप्रकारात प्रतिभा खर्च करणारे कवी मराठीत थोडेच असावेत. संस्कृतातही प्रतिभावान असे थोडेच. (भर्तृहरीचे "नीतिशतक" हा एकत्रित ग्रंथ आहे. शंभर-शंभर सुटी सुभाषित-पद्ये नव्हेत.)

कन्नड व तेलुगुतील् सुभाषिते

अन्य भाषांत अशी स्वतंत्र सुभाषिते नसावी.

कन्नड भाषेत सर्वज्ञन वचनगळू या नावाची (सुमारे २०००) त्रिपदी असून ते सुभाषित आहेत.ही सुभाषिते १६व्या शतकात लिहिली असावीत.याचा संदर्भ येथे.
त्याच प्रमाणे तेलुगु भाषेतही आहेत.

सुवचने

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.धनंजय लिहितातः-"पंत आणि संत कवींकडून अशी पद्य सुवचने उद्धृत करण्यालायक भरपूर आहेत. अधूनमधून उद्धृत केलेली दिसतात. त्यांना "मराठीमधील सुभाषिते" म्हणण्यास माझी तरी काही हरकत नाही."
अशा उद्धृतांना सुवचने, सुविचार असे म्हणतात. असे सुविचार संग्रह उपलब्ध आहेतच. अनेक संस्कृत सुभाषिते ही साहित्यातील उद्धृते असतात. रामायण सुभाषिते, महाभारत सुभाषिते ,कालिदासाची वचने असे संग्रह आहेत. पण केवळ सुभाषितासाठी म्हणून सुभाषित रचायचे हे संस्कृत भाषेचे वैशिष्ट्य असावे. हे रचनाकार अनामिक असतात.
२/ श्री.प्रभाकर नानावटी यांनी संत सर्वज्ञ यांच्या कन्नड त्रिपदी सुवचनांची माहिती उपयुक्त आहे. कधितरी वाचलेले त्यांना नेमके आठवले हे महत्त्वाचे आहे. कबिराचे दोहे सुद्धा सुवचनेच म्हणायची.
३/ भर्तृहरीच्या नीतिशतकात शंभर श्लोक जरी नीतिपर असले तरी प्रत्येक श्लोक स्वतंत्र आहे.ते एकमेकात अनुस्यूत नाहीत.एकाचा दुसर्‍याशी काही संबंध आहे असे वाटत नाही.
म्हणजे ते संत सर्वज्ञ यांच्या त्रिपदीं सारखे आहेत.

विस्मृतीचे वैशिष्ट्य

कवी (रचना करते समयी) अनामिक असतील हे अशक्यप्राय वाटते. आणि श्री. यनावालांचा असा मथितार्थही नसावा. मग मथितार्थ काय बरे असावा?

या पद्यांना रचणार्‍या कवींची नावे आपल्याला सध्या ठाऊक नाहीत, असाच अर्थ अपेक्षित असावा.

पण हे मात्र समाजाच्या विस्मृतीवर अवलंबून आहे. काही शतकांच्या नंतर काही मराठी संत-पंत कवींची नावेही विसरली जातील, पण त्यांची काही सुवचने मात्र उपलब्ध असतील. सध्या संस्कृत कवींबद्दल जी विस्मृती आहे, ती मराठी कवींबद्दलच्या विस्मृतीपेक्षा अधिक आहे, हे संस्कृताचे वैशिष्ट्य नव्हे - एक ऐतिहासिक अपघात आहे.

संस्कृत अवकळेला पोचली तेव्हा मौलिक ग्रंथ रचण्याची धमक नाही असे एक-एक कडव्यांच्या कविता रचणारे कवी होते, बहुधा. मधल्या काळात (संस्कृत न बोलणार्‍या) राजाला रिझवण्यासाठी कवींचे मेळावे जमत, एका-एका कडव्यांच्या समस्यापूर्तीची कडवी रचत, अशा कथा आपण ऐकतो. (पैकी अनेक दंतकथाही असाव्यात.)

कधीकधी उत्तम कवी प्राकृत नाटकांमध्ये एखाद्या पात्राच्या तोंडी एकच संस्कृत श्लोकही घालतात, अशा कलाकृती सुद्धा आपल्याला सापडतात. मराठीला अवकळा येईल तेव्हा असले प्रकार मराठीमध्येही दिसू लागतील.

पंत-मराठीच्या मुमूर्षुकाळातच कृष्णशास्त्री चिपळूणकर असल्या एक-कडव्याच्या कविता लिहीत होते, हे लक्षात घेतले पाहिजे. कृष्णशास्त्री हे नाव विसरले जाईल, तेव्हा त्यांच्या गमतीदार "शुकान्योक्ती" वगैरे एक-कडव्याच्या कविता याच प्रकारात मोडतील. (नाहीतरी विष्णुशास्त्र्यांचेही नाव "असे लिहू नये" प्रकारच्या उदाहरणांतच नवीन पिढीतले आम्ही लोक वाचतो. कृष्णशास्त्र्यांचे नाव मला तरी हल्ली-हल्लीपर्यंत ठाऊक नव्हते. शाळेतील अभ्यासक्रमाला दोष द्या नाहीतर सामाजिक विस्मृती म्हणा.)

किंवा आजकाल लग्नप्रसंगासाठी सुटी-सुटी मंगलाष्टके रचतात. जात्यावरच्या ओव्या सुट्या-सुट्या असतात. "अनामिक" असतात. ही सर्व मराठी सुभाषितेच.

छान अनुवाद

श्री यनावाला यांनी केलेला अनुवाद बर्‍याच प्रमाणात व्यवस्थित आहे. हे काम कौतुकास्पद आहे. पण दोन मुद्दे मांडावेसे वाटतात.
प्रत्येक शब्दाला असलेल्या सर्व छटा त्याच्या प्रतिशब्दाला नसतात. उदाहरणार्थ 'मूर्ख' आणि 'वेडसरे'.
कदाचित अतुपरिचयामुळे असेल, पण संस्कृत सुभाषिते जशी जिभेवर बसली आहेत तसे त्यांचे अनुवाद बसणार नाहीत असे मला वाटते.

 
^ वर