मराठी अज्ञान परिषद

लोकसत्ताच्या जून ११, २०१० च्या अंकात संपादकीयाशेजारी, नवनीत या सदरात काही अकलेचे तारे तोडलेले आहेत.
"रेशमी वस्त्र परिधान केल्यामुळे स्वाभाविकपणे शरीराच्या हालचालींबरोबर शरीरामध्ये घर्षण निर्माण, वीज निर्माण होते व त्याचा रक्ताभिसरण क्रियेला उपयोग होतो. रेशमी वस्त्राचा स्पर्श सुखकारक व मृदू असल्याने कृश व्यक्तीला तो पुष्टीकारक ठरतो. त्यामुळे वातदोषाचे शमन होते. उलट लोकरीच्या वस्त्राचा स्पर्श रुक्ष असतो. त्यामुळे त्वचेतील मेदाचे व कफदोषाचे विलयन होण्यास मदत होते. त्यामुळे स्थुल व्यक्तीने लोकरीचे वस्त्र परिधान करणे हितकारक असते.
वस्त्राप्रमाणेच अलंकाराचाही आपणास फायदा होतो. अस्थिधातू असार असेल तर मोती, कवडय़ा, शिंपले यापासून बनलेल्या अलंकाराचा उपयोग करावा, असे आयुर्वेदशास्त्रात सांगितले आहे. तर बुद्धी व सौंदर्य याची वृद्धी व विकास करण्यासाठी सोन्या-चांदीच्या अलंकाराचा उपयोग करण्यास सांगितले आहे. "
दु:खाची बाब ही की ही मते मराठी विज्ञान परिषदेच्या नावे छापले गेली आहेत. केवढा हा अधःपात!

Comments

जाहीर शोक

अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणून मी धादांत खोटं लिहिलेलं चालवून घ्यायला तयार आहे... पण निदान अशा विधानांना विज्ञानाचा आधार आहे असं भासवण्याचा प्रयत्न करू नये.

असे आयुर्वेदशास्त्रात सांगितले आहे.

असं म्हणून दुसरा परिच्छेद सत्याविषयी नसून आयुर्वेदशास्त्राविषयी आहे असं म्हणण्याची पळवाट तरी आहे. पण लज्जा झाकायला छोटीशी चिंधी एवढंच...

घर्षणाची व्याख्या
घर्षण म्हणजे घासणे. रेशमी व लोकर या वस्त्रांच्या साहाय्याने शरीर घासण्याची जी क्रिया तिला ‘घर्षण’ म्हणतात.

हे तर उच्चच!

मान्यवर संस्थेच्या नावाखाली मान्यवर वर्तमानपत्रात असं पुन्हा येऊ नये यासाठी काय करता येईल?

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

मान्यवर वर्तमानपत्रं?

अहो वर्तमानपत्र वाचतंच कोण? (सौजन्यः नेमाडे)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

शुद्धिपत्र

वरील लेख १२ जूनच्या अंकात आहे.

बुद्धी आणि सौंदर्याची वृद्धी आणि विकास

ज्या लोकांकडे सोन्या-चांदीचे दागिने भरपूर असतात, त्यांना लोक सुंदर म्हणतात (डेटिंग-लग्न वगैरे करू इच्छितात), आणि त्यांच्या तोंडासमोर त्यांच्या बुद्धीचेही कौतूक करतात. म्हणून मला सोन्या-चांदीचे दागिने मिळालेत, तर हवे आहेत.

साधारणपणे हे वडिलोपार्जित मिळतात. त्या लोकांच्या पाठीमागे त्यांच्या बुद्धीची हेटाळणी होते. मात्र वडिलोपार्जित दौलत मिळाली नाही, येनकेनप्रकारेण घाबाड मिळवले, तर अतिशय विकसित बुद्धी (डोनाल्ड ट्रंप) किंवा सौंदर्य (डोनाल्ड ट्रंपच्या बायकांपैकी कुठलीही) आहे, हे सिद्धच होते.

(मोती, कवड्या आणि शिंपले वस्त्रगाळ करून खायचे आहेत, की अंगावर वागवायचे आहेत.)

आयुर्वेद

आयुर्वेदाविषयी काय बोलावे? जे म्हणायचे ते म्हणून झाले आहे...

सन्जोप राव
तीजा तेरा रंग था मै तो
जिया तेरे ढंग से मै तो
तूही था मौला तूही आन
मौला मेरे ले ले मेरी जान

सॉलिड

लेख छानच आहे. पूर्वीच वाचला होता. सारीच वर्तमानपत्रे भ्रष्ट झाली आहेत.

जे म्हणायचे ते

आपल्याला (व मलाही) जे म्हणायचे ते छानपैकी म्हटले आहे.
धन्यवाद!

डॉ ? बालाजी तांबे?

हॅ हॅ हॅ. त्यालेखात सगळीकडे बालाजी तांबे यांचा उल्लेख डॉ असा केला आहे. काय म्हणावे या अज्ञानाला.

बाकी लेख झकास.

(कॉस्ट अकाउंटंटच्या संस्थेच्या नियामावलीत कॉस्ट अकाउंटंट नसलेला माणूस स्वतःला कॉस्ट अकाउंटंट म्हणवत असेल तर काय केले जाईल हे लिहिले आहे. डॉ नसलेल्याने डॉ म्हणवून घेतले तर काय नियम आहेत हे माहिती नाही).

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

प्रा. डॉ.?

कदाचित डॉ. बालाजी तांबे हे प्रा.डॉ. प्रकारातील डॉ. असावेत. (डॉक्टरेट ऑफ समथिंग वगैरे)

([सर्व संकेतस्थळावरील]संपादकांनो हघ्याहेवेसांनल)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

आयुर्वेद उवाच

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
हा वर्षभरापूर्वी लिहिलेला श्री.सन्जोप राव यांचा लेख आज वाचला.त्यांनी दुवा(लिंक) दिला म्हणून वाचता आला. नाहीतर या वाचनीय लेखाला मुकलो असतो. श्री.सन्जोप राव यांची नर्मविनोदी लेखनशैली साहित्यिक गुणांनी ओतप्रोत आहे. खरेच लेख छान जमला आहे. त्यांचे सर्वच लेखन वाचनीय असते. त्यांनी मराठी नियतकालिकांत लिहायला हवे.म्हणजे त्यांचे लेखन अधिक वाचकांपर्यंत पोहोचेल.
डॉ.बालाजी तांबे यांचा "श्री गीतायोग व्हर्शन२०१०" हा कार्यक्रम साम वाहिनीवरून प्रसृत होतो.( सोम ते शुक्र सकाळी ७-३० ते ८-००) त्यात गीता टॅरो नावाचा एक प्रकार असतो. पाहिला नसल्यास अवश्य पहावा.यांत काही अर्थ आहे असे प्रेक्षकांना कसे काय वाटू शकते? आश्चर्यच म्हणायचे.

आयुर्वेद?

आयुर्वेदात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आज ऍप्लिकेबल नाहीत. अर्थात, सर्वच तशा नाहीत.
मात्र हे रेशमी वस्त्र-लोकरी वस्त्र प्रकरण कुठे वाचल्याचे आठवत नाही. (मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे.)

संजोपरावांचा लेखही झकास आहे.
दुर्दैवाने आजकाल आयुर्वेद म्हणजे बालाजी तांबे, योग म्हणजे रामदेव बाबा किंवा हिंदुत्व म्हणजे तोगडीया असे समज दृढ होत आहेत. जे योग्य नाही.

.

(मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे.)
जपून रहावे. इथे मतभिन्नता हा जघन्य अपराध आहे.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

पिक ऍन्ड चूज

विज्ञानात मात्र काहीच टाकाऊ उरत नाही.
आयुर्वेदातून काय उचलावे आणि काय टाकावे याचे निर्णय तुम्ही (किंवा तुमचे महाविद्यालय) कसे घेता? दर वेळी आधुनिक तंत्रज्ञानाचेच प्रमाणपत्र शोधत असाल तर पर्यायी (आल्टर्नेटिव मेडिसिन) वैद्यक म्हणजे काय?
कृपया आयुर्वेदातील काही महत्वाच्या ऍप्लिकेबल गोष्टी सांगा. त्यांच्यामागील वैज्ञानिक तत्त्वे आयुर्वेदात ज्ञात आहेत का? 'नाडी कडक असताना येणारी चक्कर, डोकेदुखी सर्पगंधेमुळे बरी होते', अशी ट्रायल ऍन्ड एरर (प्रयत्न प्रमादी) यादी नको. 'नाडी कडक लागणे' या वर्णनाऐवजी १२०/८० वगैरे आकडे वापरू नका कारण पार्‍याचा वापर रक्तदाब वापरण्यासाठी होत नसे. रिसर्पिनचे अस्तित्व गृहीत न धरता केवळ त्रिदोष, धातु, रस, इ. च्या सहाय्याने, 'सर्पगंधेमुळे चक्कर, डोकेदुखी का बरी होते' ते सांगणारे काही वैज्ञानिक सिद्धांत आयुर्वेदात आहेत का? त्याचप्रमाणे, आयुर्वेदिक औषधांनी मधुमेह बरा होतो की नाही ते सिद्ध करण्यासाठी फोलिनवू/ग्लुकोज ऑक्सिडेज/ग्लुकोज ऑक्सिडेज इ. वापरू नका.

हे थोडं आग्रही नाही का वाटत?

मला वैद्यकशास्त्राचं ज्ञान नाही. पण एखाद्या वैद्यक विचारधारेत काही औषधांच्या बाबतीत 'कारणं माहीत नाहीत, पण उपयोग होतो ही खात्री आहे' अशी परिस्थिती असेल, तर ती औषधं स्वीकारायला काय हरकत आहे? त्यासाठी प्रस्थापित वैद्यकीची मदत घेतली तर काय बिघडलं? जर कोणी रहाटगाडगी बनवत असेल, व फ्लो-रेट वगैरे मोजण्यासाठी विदुयुत उपकरणं वापरली, तर त्यांनी मुळात विद्युत पंपच बनवावे/वापरावे असा आग्रह का? मला तुमचा आक्षेप बरोबर समजला आहे का?

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

हो

मला तुमचा आक्षेप बरोबर समजला आहे का?

आक्षेप तसाच आहे कारण "रेशमी वस्त्र-लोकरी वस्त्र प्रकरण कुठे वाचल्याचे आठवत नाही. (मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे.)" हे वाक्य.
या वाक्याचा अर्थ असा होतो की "आयुर्वेद ग्रंथाधिष्ठित असून सुश्रुत चरक आणि वाग्भट यांच्या पलिकडील मते आयुर्वेदिक नाहीत". आयुर्वेदातील मापनपद्धती (=पर्यायी बायोकेमिस्ट्री), आयुर्वेदातील शरीरप्रक्रियासिद्धांत (=त्रिदोष, इ.वर आधारित पर्यायी फिजिऑलॉजी), आणि रोगनिर्मितीसिद्धांत (=पर्यायी पॅथॉलॉजी, मेडिसिन) एवढ्यावर आधारित लुटुपुटीच्या खेळात कायकाय 'ऍप्लिकेबल' आहे ते मला जाणून घ्यायचे आहे.
आज होते असे की आयुर्वेदात नमूद असलेल्या पदार्थांच्या याद्या (=पर्यायी फार्मॅकोपिआ, मेडिकेशन्स) चाळून, त्यातील काही पदार्थांतील रसायनांचे आयुर्वेदात नमूद नसलेले उपयोग सिद्ध करून आयुर्वेदाला प्रतिष्ठा मिळते. या रसायनांची अभिक्रिया आधुनिक फार्मॅकॉलॉजीच्या मदतीने स्पष्ट केली जाते, रस, धातु, इ. च्या भाषेत नव्हे!

एखाद्या वैद्यक विचारधारेत काही औषधांच्या बाबतीत 'कारणं माहीत नाहीत, पण उपयोग होतो ही खात्री आहे' अशी परिस्थिती असेल, तर ती औषधं स्वीकारायला काय हरकत आहे?

ते एक पर्यायी पॅराडाईम असल्याचा दावा टिकत नाही.

नाही...

माझं म्हणणं अधिक सोपं होतं. प्रयास प्रमादाने सापडलेलं होईना, एखादं जरी औषध आयुर्वेदात असेल जे ऍलोपॅथीच्या पर्यायी औषधापेक्षा अधिक गुणकारी व/वा किफायती असेल तर ऍलोपथीची सर्व यंत्रणा वापरून ते औषध का कार्य करतं हे ऍलोपथीच्या परिभाषेत सांगण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. हे तुम्हाला मान्य असेल तर प्रश्न मिटला.

त्याचं श्रेय कोणाला जावं, त्याने आयुर्वेद ही पर्यायी वैद्यकपद्धती आहे हे सिद्ध् होतं का, हा पुढचा मुद्दा आहे.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

उत्तर पुढे दिले आहे

अशाच आशयाच्या पुढील प्रतिसादाला, येथील प्रतिसादात, उत्तर देत आहे.

मला तरी हे दुराग्रहीच् वाटते

मलाही वैद्यकशास्त्राचे ज्ञान नाही. पण आयुर्वेदामुळे जर फायदा होत असेल तर ऍलोपथीऐवजी मी आयुर्वेदिक औषधांचा वापर करणे पसंत करीन. भारतातील वैद्यकसेवेत अनेक हॉस्पिटलांची रुग्णांना लुबाडण्याची प्रवृत्ती, (एखाद्या हॉस्पिटलला तुम्ही इन्शुरन्सवाले पेशंट आहात हे कळले रे कळले की लगेच सलाईनच्या बाटल्यांची थप्पीच बाजूच्या टेबलवर आणून ठेवतात.) डॉक्टरांच्या चालू असलेल्या कट-प्रॅक्टिस, (एकमेकांची पाठ खाजवणे), केवळ पैसे उकळण्यासाठीच कारणाशिवाय देण्यात येणारी इंजेक्शने व सलायनी, व यावर भर म्हणून ऍलोपथीच्या औषधांचे (डॉक्टरांनाही न समजणारे) साईड इफेक्ट्स हे सगळे फार जवळून पाहिले आहे.

काही दिवसांपूर्वी एका मित्राला झालेल्या साधा कफ-खोकल्यासाठीही ५ दिवसांच्या अँटिबायोटिक्स, (त्यामुळे आधीच थकवा येतो) नंतर डिझीनेस देणारे कफ सिरप आणि वर थ्रोट इन्फेक्शन जबरी आहे असे सांगून २८९ रुपयांचे एक इन्हेलर एवढे गळ्यात मारलेले डॉक्टर पाहिले. पाच दिवसांनंतर जैसे थे. उलट त्याला चालतानाही दम लागू लागला. डॉक्टर म्हणाले अशा प्रकारचे थ्रोट इन्फेक्शन ३ आठवड्यापर्यंत राहू शकते. हा एका नामांकित हॉस्पिटलमधला ईएनटी स्पेशालिस्टचा सल्ला. दर ५ दिवसांनी खाजगी डिस्पेन्सरीत येऊन भेट हा आदेश. (हॉस्पिटलातल्या ओपीडीचे रेट कमी असल्याने मित्र तिथे जायचा.)

त्वरित डॉक्टरला रामराम ठोकून 'आजीचा बटवा' सदरात येणाऱ्या तुळस-गवतीचहा-मिरी यांचा काढा, वारंवार गरम पाणी पिणे, मधाचे चाटण या अवैज्ञानिक परंतु घरगुती उपायांनी त्याला दोनतीन दिवसांत आराम पडला.

विशेषतः स्वाईन फ्लू सारख्या प्रसंगात WHO सारख्या संस्थाही किती दिशाभूलमूलक अफवा पसरवू शकतात हे पाहिल्यानंतर प्रस्थापित वैद्यकव्यवसायाविषयी घृणा निर्माण होणे साहजिकच आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

वेगळा मुद्दा

माझा प्रतिसाद रुग्णांसाठी नसून पुरस्कर्त्यांसाठी आहे.
वैयक्तिक अनुभवांची मर्यादा, आयुर्वेदिक उपचार स्वस्त असल्याचा समज, आयुर्वेदिक उपचारकांचे गैरव्यवहार, इ . मुद्दे वगळता तुमच्याशी माझी सहमती आहे.

अनुभवावरून शहाणे व्हावे.

माझा अनुभव. सर्दी खोकला तापाने हैराण झाल्याने, लवकर आराम मिळावा म्हणून ऍलोपथी डॉक्टरांनी दिलेली ऍन्टिबायोटिक्स आणि इतर औषधे १५ दिवस घेतली. बाकीच्या गोष्टी बर्‍या झाल्या, पण खोकला कमी व्हायचे नाव घेईना. शेवटी कुणाच्यातरी सांगण्यावरून दारुहळद आणि ज्येष्ठमधाचे एकत्र चूर्ण मधाबरोबर घेण्यास सुरुवात केली. रात्री झोपताना काही वेळासाठी बेहड्य़ाचा तुकडा तोंडात ठेवला की ढास लागत नाही हा अनुभव आला. जो ऍलॉपथीने बरा होऊ शकला नाही तो जीवघेणा खोकला घरगुती औषधाने बरा झाला.
केवळ मानवी शरीरावर केलेल्या प्रत्यक्ष प्रयोगांनी ज्या गोष्टी सिद्ध होतात, त्यांच्यासाठी वापरल्या जाणार्‍या, तथाकथित औषधी घटकांच्या आनुषंगिक बर्‍यावाईट परिणामांचा जरूर अभ्यास व्हावा. पण केवळ घटकांचे औषधी गुणधर्म प्रयोगशाळेत सिद्ध करता आले नाहीत म्हणून, आयुर्वेद त्याज्य मानू नये.--वाचक्‍नवी

प्रयोगशाळेची मर्यादा

तुमच्या मुद्द्याशी सहमत

पण केवळ घटकांचे औषधी गुणधर्म प्रयोगशाळेत सिद्ध करता आले नाहीत म्हणून

जर मानवी रोगांवर विशिष्ट पदार्थांचा उपचार म्हणून वापर होऊ शकत असेल आणि त्या घटकांचे औषधी गुणधर्म प्रयोगशाळेत सिद्ध करता येत नसतील तर ती प्रयोगशाळेची मर्यादा मानण्यात यावी. त्या घटकांची किंवा त्या घटकांच्या पुरस्कर्त्यांची (येथे उदा. आयुर्वेद) नव्हे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सिद्धता

हा प्रतिसाद तुम्हाला आणि वाचक्नवी यांना सामायिक आहे.
'एखाद्याला लागोपाठ दोनदा लॉटरीचे बक्षीस मिळाले' या योगायोगावरून लॉटरी लागण्याच्या शक्यतेचे मापन चूक आहे. वैयक्तिक अनुभवांमध्ये अनेक कारणांमुळे निष्कर्ष चुकू शकतात. इतर धाग्यांवर तशी चर्चा चालू आहेच.
प्रयोगशाळेत (किंवा क्लिनिकल ट्रायलमध्ये) हे चुकविणारे घटक टाळण्याचा कसोशीने प्रयत्न केला जातो. तशा प्रयोगांत ज्येष्ठमध उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले तरच त्यास वैज्ञानिक उपचार म्हणता येईल. तसा उपचार स्वीकारला तरी त्यास आयुर्वेदिक उपचार म्हणणे चूक आहे असा युक्तिवाद मी या धाग्यात केला आहे.

दह्याची मालकी विरजण घालणाऱ्याकडे नसते

प्रयोगशाळेत (किंवा क्लिनिकल ट्रायलमध्ये) हे चुकविणारे घटक टाळण्याचा कसोशीने प्रयत्न केला जातो. तशा प्रयोगांत ज्येष्ठमध उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले तरच त्यास वैज्ञानिक उपचार म्हणता येईल. तसा उपचार स्वीकारला तरी त्यास आयुर्वेदिक उपचार म्हणणे चूक आहे असा युक्तिवाद मी या धाग्यात केला आहे.

हा युक्तिवादच चूक आहे असे माझे म्हणणे आहे. समजा आयुर्वेदाने एक विशिष्ट उपचार सांगितला आहे. तो इतके दिवस वैज्ञानिक पातळीवर तपासून पाहता येत नव्हता. मात्र नुकताच काही प्रयोगांअंती समजा हा उपचार औषधी असल्याचे प्रयोगशाळेत सिद्ध करता आले तरीही तो उपचार आयुर्वेदिकच राहतो. फक्त विज्ञानाला तो प्रयोगशाळेत आता सिद्ध करता आला व विज्ञानाशिवाय इतर गोष्टींवर श्रद्धा ठेवण्यास नकार देणाऱ्यांच्या पसंतीस तो आता उतरला म्हणून त्याला अआयुर्वेदिक उपचार म्हणणे चुकीचे होईल. जे आयुर्वेदाला आधीच कळले होते ते प्रयोगशाळेत आता कळले तर आयुर्वेदाचे श्रेय ढापण्याचा प्रयत्न विज्ञानाने करु नये.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

वैद्यक म्हणजे काय?

वैद्यक म्हणजे नुसती उपचारांची यादी नव्हे. आयुर्वेदिक सिद्धांतानुसार ते उपचार चालत नसून त्यांचा कार्यकारणभाव आधुनिक नियमांवर आधारित असल्याचे सिद्ध झाल्यास 'ते उपचार आयुर्वेदिक आहेत' हा दावा निराधार आहे.

प्यार तो होनाही था

एखाद्या हॉस्पिटलला तुम्ही इन्शुरन्सवाले पेशंट आहात हे कळले रे कळले की लगेच सलाईनच्या बाटल्यांची थप्पीच बाजूच्या टेबलवर आणून ठेवतात.

भारतीय वैद्यकीय क्षेत्रातील भ्रष्टाचाराची फळे आता पेशंटला भोगावी लागणार!


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

'उलट' ?

एरवी असा आग्रह असतो की तुमची ज्ञानशाखा कुठलीही असू दे, तिचे नियम 'प्रचलित' विज्ञानशाखेच्या मोजपट्ट्या वापरुन सिद्ध करुन दाखवा - उदा: ज्योतिष, भूते, आयुर्वेद् पण "रिकामटेकडा' मात्र नेमके उलटे म्हणत आहेत. हे समजले नाही - का माझीच काही चूक होतेय ?

मला चालेल

आयुर्वेदातील उपयुक्त पदार्थांपासून बनलेले उपचार वैज्ञानिक वैद्यकात वापरणे मला मान्य आहे. पण ग्रंथाधिष्टित आयुर्वेदापलिकडील उपचारांना आयुर्वेदिक म्हणण्यास 'ज्ञानेश...' यांचा आक्षेप दिसतो. (हे मत प्रातिनिधिकही आहे, आणि मला मान्यही आहे.) म्हणून माझी टिप्पणी अशी आहे की त्याच न्यायाने इतर कोणत्याही आयुर्वेदिक उपचारांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अंतर्भाव केल्यास त्या उपचारांना आयुर्वेदिक म्हणणे चूक ठरेल.

श्री रिकामटेकडा यास-

आयुर्वेदातून काय उचलावे आणि काय टाकावे याचे निर्णय तुम्ही (किंवा तुमचे महाविद्यालय) कसे घेता? दर वेळी आधुनिक तंत्रज्ञानाचेच प्रमाणपत्र शोधत असाल तर पर्यायी (आल्टर्नेटिव मेडिसिन) वैद्यक म्हणजे काय?

हा निर्णय आम्ही घेत नाही. परिस्थितीच हा निर्णय घेते.
दात काढण्यासाठी एक सूत्र हलणार्‍या दाताला बांधून, त्याचे दुसरे टोक घोड्याच्या पायाला बांधावे, आणि घोड्याला जोराने चाबूक मारावा, सर्पदंश झाल्यास रुग्णाच्या टाळूला कावळ्याच्या पायाच्या आकाराचा छेद घ्यावा, आणि त्यात तूप भरून काही विशिष्ठ मंत्र म्हणावे, शस्त्रक्रियेआधी रुग्णाला भरपूर मद्य पाजून बेशुद्ध करावे इत्यादि अनेक सुरस आणि चमत्कारिक 'उपचार' आयुर्वेदिक ग्रंथात दिलेले आहेत. वर लेखात म्हटल्याप्रमाणे रत्न, खडे धारण करणे प्रकारही.
हे उपचार आज करावे किंवा नाही हे ठरवण्यासाठी मोठ्या चर्चेची गरज नाही. कॉमनसेन्स पुरेसा आहे.

कृपया आयुर्वेदातील काही महत्वाच्या ऍप्लिकेबल गोष्टी सांगा. त्यांच्यामागील वैज्ञानिक तत्त्वे आयुर्वेदात ज्ञात आहेत का?

'पंचकर्म' हे एक उदाहरण देतो.
वैज्ञानिक तत्त्वे- नक्कीच आहेत. आयुर्वेदाचे स्वतःचे असे चिकित्साविज्ञान आहे, सिद्धांत आहेत.
त्रिदोष, सप्तधातू आणि त्रिमल यांना समस्थितीत (हार्मनी) मधे आणणे हा प्रत्येक चिकित्सेचा हेतू आहे. आता मुळात दोष, धातू, मल असतात का? अशी सुरूवात केली तर पुढचे बोलणे खुंटेल. पण आयुर्वेदाने जी काही शमन आणि शोधन चिकित्सा सांगीतली, त्याची कारणमीमांसा आयुर्वेदाकडे आहे. ती आपल्याला पटेल किंवा पटणार नाही, हा भाग वेगळा.

पण ग्रंथाधिष्टित आयुर्वेदापलिकडील उपचारांना आयुर्वेदिक म्हणण्यास 'ज्ञानेश...' यांचा आक्षेप दिसतो.

हे खरे आहे. हल्ली कुठल्याही 'हर्बल' गोष्टीला आयुर्वेदिक म्हटले जाते.
माझा आयुर्वेदीय चिकित्सापद्धतीचा अभ्यास असल्याने 'आयुर्वेदिक' शब्दाचा स्कोप माझासाठी इतरांपेक्षा लहान आहे, असे आपण म्हणू शकता. ग्रंथोक्त चिकित्सापद्धती हीच आयुर्वेदिक असे मी मानतो.
बाजारात मिळणारे 'मूव्ह' किंवा 'फेअर अँड लव्हली' सुद्धा स्वतःला आयुर्वेदिक म्हणवतात. ही आयुर्वेदिक चिकित्सापद्धती आहे, असे मी म्हणू शकत नाही !

अंशतः सहमत

हे उपचार आज करावे किंवा नाही हे ठरवण्यासाठी मोठ्या चर्चेची गरज नाही. कॉमनसेन्स पुरेसा आहे.

मुडदूस झालेल्या बाळाला रोज देवळाबाहेर ठेवण्याची पद्धत आहे. कमजोरीपासून बरे होण्यासाठी मांत्रिक बोकड सांगतात. बाळाला उन्हातून ड जीवनसत्व मिळाले किंवा दुसर्‍या उदाहरणात बोकडातून ब१२ जीवनसत्व मिळाले तर? चाबूक, छेद/तूप, मद्य, या उपायांमध्येही काहीतरी (आधुनिक) वैज्ञानिक मार्ग असणे शक्य आहे आणि तसा तो सापडला तर त्या वैज्ञानिक तत्त्वांचा (मूळ पद्धत नाही पण उपयुक्त भाग) (आधुनिक) वैज्ञानिक वैद्यकात समावेश होईल. फक्त अशा आधुनिक तत्त्वांनी उपयुक्तता सिद्ध झाली तर ती मूळची पद्धत आयुर्वेदिक उरणार नाही. ती आयुर्वेदिक ठरवायची असेल तर कफ-पित्त-वात यांच्या भाषेत 'पर्यायी' वैज्ञानिक स्पष्टीकरण आयुर्वेदात असले पाहिजे. कॉमनसेन्स दुर्मिळ असतो असे व्हॉल्टेअर म्हणाला होता. चर्चा हवीच.

'पंचकर्म' हे एक उदाहरण देतो.
वैज्ञानिक तत्त्वे- नक्कीच आहेत. आयुर्वेदाचे स्वतःचे असे चिकित्साविज्ञान आहे, सिद्धांत आहेत.
त्रिदोष, सप्तधातू आणि त्रिमल यांना समस्थितीत (हार्मनी) मधे आणणे हा प्रत्येक चिकित्सेचा हेतू आहे. आता मुळात दोष, धातू, मल असतात का? अशी सुरूवात केली तर पुढचे बोलणे खुंटेल. पण आयुर्वेदाने जी काही शमन आणि शोधन चिकित्सा सांगीतली, त्याची कारणमीमांसा आयुर्वेदाकडे आहे. ती आपल्याला पटेल किंवा पटणार नाही, हा भाग वेगळा.

"दोष, धातू, मल असतात का?" हा प्रश्न विचारणे चूक ठरविता येईल. i=(-१)^(१/२) किंवा इलेक्ट्रॉनप्रमाणे त्यांचा काही उपयोग झाला की पुरे.
मी जो प्रश्न विचारला त्याचे आपण पुरेसे उत्तर दिले आहे. तर माझा नेमका प्रश्न आपणाला असा की 'त्रिदोष, सप्तधातू आणि त्रिमल' यांच्यात पंचकर्मामुळे होणार्‍या बदलांचे आयुर्वेदिक पद्धतींत मापन केले जाते का? असे फॉल्सिफाएबल सिद्धांत सापडले तर आयुर्वेदाला एक पर्यायी विज्ञान म्हणण्यास मी तयार आहे.

हल्ली कुठल्याही 'हर्बल' गोष्टीला आयुर्वेदिक म्हटले जाते.
माझा आयुर्वेदीय चिकित्सापद्धतीचा अभ्यास असल्याने 'आयुर्वेदिक' शब्दाचा स्कोप माझासाठी इतरांपेक्षा लहान आहे, असे आपण म्हणू शकता. ग्रंथोक्त चिकित्सापद्धती हीच आयुर्वेदिक असे मी मानतो.
बाजारात मिळणारे 'मूव्ह' किंवा 'फेअर अँड लव्हली' सुद्धा स्वतःला आयुर्वेदिक म्हणवतात. ही आयुर्वेदिक चिकित्सापद्धती आहे, असे मी म्हणू शकत नाही !

१००% सहमत. (माझा आयुर्वेदाचा अभ्यास फारसा नाही.)
आयुर्वेदिक औषधांना करसवलत मिळते म्हणून 'मूव्ह' किंवा 'फेअर अँड लव्हली' आयुर्वेदिक असल्याचा शिक्का वापरतात.

पर्यायी वैद्यक

मुडदूस झालेल्या बाळाला रोज देवळाबाहेर ठेवण्याची पद्धत आहे. कमजोरीपासून बरे होण्यासाठी मांत्रिक बोकड सांगतात. बाळाला उन्हातून ड जीवनसत्व मिळाले किंवा दुसर्‍या उदाहरणात बोकडातून ब१२ जीवनसत्व मिळाले तर?

कुठल्याही कृतीचा उद्देश महत्त्वाचा असतो.
मुडदूस झालेल्या बाळाला देवळाबाहेर ठेवण्यामागे 'देव त्याला बरा करील' ही भावना असते. मांत्रिक बोकड कापायला सांगतात ते देवाचा कोप शांत व्हावा म्हणून. (मला वाटते, कापलेला बोकड मांत्रिकालाच मिळत असावा, यजमानाला नाही.) यात योगायोगाने काही फायदा झालाही तरी ते विज्ञान खचितच नाही. हे म्हणजे युद्धात एखाद्या सैनिकाला गोळी लागावी आणि उपचारादरम्यान त्याची जुनाट सर्दी बरी व्हावी, या प्रकारचे योगायोग आहेत. एकंदर केला जाणारा उपक्रम आणि त्यापासून मिळणारे फायदे याचे गुणोत्तर केल्यास अशा उपचाराला- त्यापासून काही आनुषांगिक लाभ मिळत असले तरीही- टाळणेच योग्य. खास करून तेव्हा, जेव्हा आपल्याला 'मूडदूस' आजाराचे किंवा कमजोरीचे कारण आणि उपचारही उपलब्ध आहेत.

चाबूक, छेद/तूप, मद्य, या उपायांमध्येही काहीतरी (आधुनिक) वैज्ञानिक मार्ग असणे शक्य आहे

पुन्हा एकदा- उद्देश महत्त्वाचा.
चाबूक, छेद आणि मद्य यांचे उद्देश अनुक्रमे दात उपटणे, सर्पदंशावर उपचार आणि भूल देणे असे आहेत. (आणि हे अगदी स्पष्टपणे नमूद केलेले आहेत.) हीच कामे करण्यासाठी आज अनुक्रमे डेंटीस्ट, अँटी स्नेक व्हेनम आणि ऍनेस्थेशिया असे पर्याय आपल्याकडे आहेत. दोन्हींचा मूळ हेतू सारखा आहे. मात्र आपण दुसरा पर्याय वापरतो. इथे 'ऍप्लिकॅबिलीटी' चा मुद्दा येतो. या गोष्टी आज ऍप्लिकेबल नाहीत, म्हणून आयुर्वेदाला एक विज्ञान म्हणून काहीही कमीपणा येत नाही. आज आपण कॅन्सरला केमोथेरपी देतो. कालांतराने एखादा नवा उपाय निघाल्यास आपण केमोथेरपी बंद करू. कारण ती ऍप्लिकेबल नसणार. पण म्हणून आज केले जाणारे उपाय अवैज्ञानिक ठरत नाहीत.

'त्रिदोष, सप्तधातू आणि त्रिमल' यांच्यात पंचकर्मामुळे होणार्‍या बदलांचे आयुर्वेदिक पद्धतींत मापन केले जाते का? असे फॉल्सिफाएबल सिद्धांत सापडले तर आयुर्वेदाला एक पर्यायी विज्ञान म्हणण्यास मी तयार आहे.

अतिशय महत्त्वाचा मुद्दा.
हो, असे मापन केले जाते. पंचकर्मांपैकी वमन हे कफावर, विरेचन हे पित्तदोषावर आणि बस्ति हे वातदोषावर गुणकारी उपक्रम सांगीतले आहेत. वमनाचे उदाहरण विस्ताराने पाहू.

शरीरात वाढीस लागलेला कफदोष काढून टाकणे, हा वमनाचा उद्देश. या उपक्रमाचे सविस्तर वर्णन करतांना चरकसंहितेत पुढील गोष्टी सांगीतल्या आहेत-
१)शरीरात कफ वाढला आहे, हे ओळखण्याची लक्षणे.
२)वमन केव्हा करावे, याचे निर्देश
३)वमनाची पूर्वतयारी- कुठली औषधे घ्यावीत, त्याचे प्रमाण किती असावे इत्यादि.
४)प्रत्यक्ष वमन (उलटी काढणे) करतांना काय खबरदारी घ्यायची, किती वेग (उलट्या) झाल्या यावरून वमनाचे हीन योग, सम्यक् योग, अति योग किंवा मिथ्या योग
५)सम्यक् वमन झाले आहे हे कसे ओळखावे. उलटीतून काय काय आणि कुठल्या क्रमाने बाहेर येते- म्हणजे आधी कफ, नंतर पित्त आणि शेवटी वात.
६)वमन योग्य आणि पुरेसे झाले आहे, हे दर्शवणारी लक्षणे/ शरीरात होणारे बदल.
७)वमनाचा अतियोग झाला (जास्त उलट्या झाल्या) हे दाखवणारी लक्षणे व त्यावरील उपाय
८)वमनाचा अयोग झाला (पुरेसा दोष बाहेर निघाला नाही) हे दाखवणारी लक्षणे व उपाय
९)वमन यथायोग्य संपन्न झाल्यावर करावयाचे पश्चातकर्म.
आणि हेच सर्व विरेचन, बस्ति, नस्य, रक्तमोक्षण या इतर कर्मांबद्द्लही सांगीतलेले आहे.

जर्मनीची होमिओपथी, चीनचे ऍक्युपंक्चर, युनानी, निसर्गोपचार वगैरेंना आपल्याकडे पर्यायी वैद्यक म्हणतात. आयुर्वेदालाही पर्यायी (किंवा समांतर किंवा देशी) वैद्यक म्हणण्यास हरकत नसावी.

चांगले उदाहरण

मुडदूस झालेल्या बाळाला रोज देवळाबाहेर ठेवण्याची पद्धत आहे. कमजोरीपासून बरे होण्यासाठी मांत्रिक बोकड सांगतात. बाळाला उन्हातून ड जीवनसत्व मिळाले किंवा दुसर्‍या उदाहरणात बोकडातून ब१२ जीवनसत्व मिळाले तर?

कुठल्याही कृतीचा उद्देश महत्त्वाचा असतो.
...
एकंदर केला जाणारा उपक्रम आणि त्यापासून मिळणारे फायदे याचे गुणोत्तर केल्यास अशा उपचाराला- त्यापासून काही आनुषांगिक लाभ मिळत असले तरीही- टाळणेच योग्य. खास करून तेव्हा, जेव्हा आपल्याला 'मूडदूस' आजाराचे किंवा कमजोरीचे कारण आणि उपचारही उपलब्ध आहेत.

चाबूक, छेद/तूप, मद्य, या उपायांमध्येही काहीतरी (आधुनिक) वैज्ञानिक मार्ग असणे शक्य आहे

पुन्हा एकदा- उद्देश महत्त्वाचा.
...
पण म्हणून आज केले जाणारे उपाय अवैज्ञानिक ठरत नाहीत.

मूळ स्वरूपातील उपचार करू नयेत हे मी आधीच मान्य केले होते. मात्र त्या उपचारांतील वैज्ञानिक तत्त्वे (उदा. सूर्यप्रकाशातील ड किंवा बोकडातील ब्१२ जीवनसत्वे) आधुनिक वैद्यकात स्वीकारली जातात. तसे आयुर्वेदाला करता येणार नाही कारण तो ग्रंथाधिष्ठित आहे. सर्पगंधा आज ऍप्लिकेबल नाही पण रिसर्पिन आधुनिक वैद्यकात वापरले जाते. सर्पगंधा आयुर्वेदिक असले तरी रिसर्पिनला आयुर्वेदिक म्हणण्यास माझा आक्षेप आहे. केमोथेरपीचे उदाहरण गैरलागू आहे कारण आधुनिक विज्ञान ग्रंथाधिष्ठित नाही. ग्रंथाधिष्ठित विज्ञान ही संकल्पनाच विरोधाभासी आहे.

असे मापन केले जाते. पंचकर्मांपैकी वमन हे कफावर, विरेचन हे पित्तदोषावर आणि बस्ति हे वातदोषावर गुणकारी उपक्रम सांगीतले आहेत. वमनाचे उदाहरण विस्ताराने पाहू.
...
९)वमन यथायोग्य संपन्न झाल्यावर करावयाचे पश्चातकर्म.

सविस्तर उदाहरण दिल्याबद्दल धन्यवाद. कफ या पदार्थाची व्याख्या आपण दिलीत तर मला उदाहरण समजण्यात मदत होईल. 'कफ असतो का?' असा प्रश्न मी विचारत नाही परंतु मला आक्षेपार्ह ओळी पुढीलप्रमाणे आहेत.
शरीरात कफ वाढला आहे, हे ओळखण्याची लक्षणे
ही लक्षणे कफ वाढल्यामुळेच आहेत याची खात्री करण्यासाठी या लक्षणांपेक्षा स्वतंत्र अशी कफमापन पद्धत हवीच.
उलटीतून काय काय आणि कुठल्या क्रमाने बाहेर येते- म्हणजे आधी कफ, नंतर पित्त आणि शेवटी वात.
हे पदार्थ खरोखरीच बाहेर येतात या दाव्याच्या पुष्ट्यर्थ काही निरीक्षणे आहेत का? या पदार्थांचे शब्दशः अर्थ (म्यूकस, बाइल, गॅस) आयुर्वेदात अभिप्रेत नाहीत म्हणून विचारतो आहे.
इलेक्ट्रॉन दिसत नसला तरी तो प्रक्षेपित (एमिट) झाला असल्याचे दृष्य परिणाम शक्य असतात त्याचप्रमाणे एक सोय म्हणून त्रिदोषांचे अस्तित्व गृहीत धरण्यासाठी त्यांचे दृष्य परिणाम आवश्यक आहेत. चर्चेतील लक्षणांपेक्षा हे परिणाम वेगळे हवेत अथवा एक वर्तुळाकार सिद्धता (सर्क्युलर प्रूफ) निर्माण होईल:

  • कफ असतो याचा पुरावा काय?
  • उत्तरः अमुक अमुक लक्षणे.
  • ही लक्षणे कफामुळे होतात याचा पुरावा काय?
  • उत्तरः कफ गेला की ही लक्षणे बरी होतात.


पुढचा मुद्दा:
एवढी सगळी मेहेनत घेतल्यावर कदाचित आयुर्वेदिक सिद्धांत फॉल्सिफाएबल असल्याचे सिद्ध होईलही. परंतु तो त्वरित फॉल्सिफायसुद्धा होईल. म्हणजे असे की वमनामुळे फायदा होईल असे काही रोगच नाहीत.

  1. तात्पुरता उपचार म्हणून क्वचित प्रसंगी ते केले तरी असे उलटी काढणे वाईटच! त्यापेक्षा राईल्सट्यूब चांगली. उलटी करण्यापेक्षा वमन हा पर्याय हीन असल्याचे वैज्ञानिक चाचण्यांमध्ये सिद्ध होईल.
  2. 'रोगाचा समूळ उपचार' वगैरे दावेही निकालात निघतील. काही प्रकारचे विषप्राशन वगळता कोणतीही समस्या पोट रिकामे करण्याने पूर्ण बरी होणे शक्य नाही.

जर्मनीची होमिओपथी, चीनचे ऍक्युपंक्चर, युनानी, निसर्गोपचार वगैरेंना आपल्याकडे पर्यायी वैद्यक म्हणतात. आयुर्वेदालाही पर्यायी (किंवा समांतर किंवा देशी) वैद्यक म्हणण्यास हरकत नसावी.

पर्यायी असल्याचा दावा ते सारेच करतात हे मान्य आहे. परंतु त्यांना पर्यायी वैज्ञानिक वैद्यक का म्हणावे हा प्रश्न आहे.

गल्लत

"तसे आयुर्वेदाला करता येणार नाही कारण तो ग्रंथाधिष्ठित आहे. सर्पगंधा आज ऍप्लिकेबल नाही पण रिसर्पिन आधुनिक वैद्यकात वापरले जाते. सर्पगंधा आयुर्वेदिक असले तरी रिसर्पिनला आयुर्वेदिक म्हणण्यास माझा आक्षेप आहे. केमोथेरपीचे उदाहरण गैरलागू आहे कारण आधुनिक विज्ञान ग्रंथाधिष्ठित नाही. ग्रंथाधिष्ठित विज्ञान ही संकल्पनाच विरोधाभासी आहे..."

दोषधातूमलविज्ञानावर पुढे संशोधन झाले नाही आणि त्यामुळे आयुर्वेदाची वाढ खुंटली असे आपण म्हणू शकता. आयुर्वेद 'ग्रंथाधिष्ठित' आहे असे म्हणण्यापेक्षा 'ग्रंथोक्त' आहे असे आपण म्हणूया. आयुर्वेदात पुढे नवे ग्रंथ तयार झाले नाहीत, हा दोष आयुर्वेदाचा नाही. माझ्या मते 'उपयुक्तता' हा एक निकष आपण विचारात घेतला पाहिजे. म्हणजे त्रिफळा घेऊन जर माझे पोट साफ होते असा अनुभव असेल, आणि 'त्रिफळ्यात कोणतेही रेचक गुणधर्म नाहीत' असा प्रयोगशाळेचा (वैज्ञानिक?) अहवाल मिळाला तर मी कशावर विश्वास ठेवावा?
विज्ञान हे जास्तीतजास्त गोष्टी समजून घेण्यासाठी आहे, नाकारण्यासाठी नाही असे मला वाटते.

कफ असतो याचा पुरावा काय?
दिलेल्या लक्षणांव्यतिरीक्त कफाचे स्वतंत्र अस्तित्व (कफमापन करून) सांगणे कठीण आहे. ही आयुर्वेदाची मर्यादा समजली तरी हरकत नाही. मी आधीच म्हटल्याप्रमाणे या गोष्टी मानल्याच नाहीत, तर पुढचा सगळा डोलारा कोसळून् पडतो.

तात्पुरता उपचार म्हणून क्वचित प्रसंगी ते केले तरी असे उलटी काढणे वाईटच! त्यापेक्षा राईल्सट्यूब चांगली.

राईल्सट्यूब आणि वमन यांची तुलनाच चुकीची आहे. दोहोंचे उद्देश पूर्णपणे भिन्न आहेत.
'उलटी काढणे वाईटच' असेल तर नाकात नळी टाकणे तरी चांगले कसे? याच न्यायाने मूत्रमार्गात नळी टाकणे किंवा शरीरात सुया खुपसणेही वाईट का नाही? निसर्गतः लघवी होणे जास्त चांगले नाही का?

काही प्रकारचे विषप्राशन वगळता कोणतीही समस्या पोट रिकामे करण्याने पूर्ण बरी होणे शक्य नाही.

हा केवळ आपला तर्क आहे.
अशा अनेक समस्या बर्‍या झालेल्या तुम्हाला प्रत्यक्षात पहायला मिळतील. केवळ आपल्याला त्यामागचे विज्ञान ज्ञात नाही किंवा त्यावर पुरेसे संशोधन झाले नाही असे म्हणता येईल.

शंका

कफ असतो याचा पुरावा काय?
दिलेल्या लक्षणांव्यतिरीक्त कफाचे स्वतंत्र अस्तित्व (कफमापन करून) सांगणे कठीण आहे. ही आयुर्वेदाची मर्यादा समजली तरी हरकत नाही. मी आधीच म्हटल्याप्रमाणे या गोष्टी मानल्याच नाहीत, तर पुढचा सगळा डोलारा कोसळून् पडतो.

माझ्या नातेवाईकांबरोबर सोबत म्हणून मी कधीकधी आयुर्वेदिक डॉक्टरकडे जातो. हाताची नाडी तपासून पित्तदोष जास्त आहे, कफदोष जास्त आहे हे आयुर्वेदिक डॉक्टर कसे सांगतात हे मला कळत नाही. हाताची नाडी तपासल्याने फार तर पल्सरेटचा (व त्या अनुषंगाने रक्तदाबाचा अंदाज) येऊ शकतो. शरीरात कफ प्रवृत्ती जास्त आहे हे कसे कळते? की हा डॉ. भोंदू आहे?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

हेच म्हणतो

योग्य शंका

व्याख्या

दोषधातूमलविज्ञानावर पुढे संशोधन झाले नाही आणि त्यामुळे आयुर्वेदाची वाढ खुंटली असे आपण म्हणू शकता. आयुर्वेद 'ग्रंथाधिष्ठित' आहे असे म्हणण्यापेक्षा 'ग्रंथोक्त' आहे असे आपण म्हणूया. आयुर्वेदात पुढे नवे ग्रंथ तयार झाले नाहीत, हा दोष आयुर्वेदाचा नाही. माझ्या मते 'उपयुक्तता' हा एक निकष आपण विचारात घेतला पाहिजे.

त्रिदोषांची व्याख्या विचारण्याआधी मी आयुर्वेदाचीच व्याख्या विचारली पाहिजे. कृपया तेथूनच सुरुवात करा.

म्हणजे त्रिफळा घेऊन जर माझे पोट साफ होते असा अनुभव असेल, आणि 'त्रिफळ्यात कोणतेही रेचक गुणधर्म नाहीत' असा प्रयोगशाळेचा (वैज्ञानिक?) अहवाल मिळाला तर मी कशावर विश्वास ठेवावा?

वैयक्तिक अनुभव येण्यामागेही काही विशेष कारण असू शकते आणि त्याचा शोध घेता येतो.

विज्ञान हे जास्तीतजास्त गोष्टी समजून घेण्यासाठी आहे, नाकारण्यासाठी नाही असे मला वाटते.

जरूर. पण नाकारण्याजोग्या संकल्पनाच नसतात असेही नाही.

दिलेल्या लक्षणांव्यतिरीक्त कफाचे स्वतंत्र अस्तित्व (कफमापन करून) सांगणे कठीण आहे. ही आयुर्वेदाची मर्यादा समजली तरी हरकत नाही. मी आधीच म्हटल्याप्रमाणे या गोष्टी मानल्याच नाहीत, तर पुढचा सगळा डोलारा कोसळून् पडतो.

कठीण असले तरी चालेल, अशक्य नसावे. अन्यथा आयुर्वेद अवैज्ञानिक ठरतो.

राईल्सट्यूब आणि वमन यांची तुलनाच चुकीची आहे. दोहोंचे उद्देश पूर्णपणे भिन्न आहेत.
'उलटी काढणे वाईटच' असेल तर नाकात नळी टाकणे तरी चांगले कसे?

उद्देश भिन्न कसे ते समजले नाही.
उलटीमुळे पोटातील पदार्थ श्वासनलिकेत जाण्याची भीती असते. आम्लामुळे अन्ननलिका, जीभ, इ. ना कर्करोगाची भीती असते. दात खराब होऊ शकतात. शिवाय जठरातून अन्न वर येऊ नये म्हणून असलेली झडप खराब होते.

याच न्यायाने मूत्रमार्गात नळी टाकणे किंवा शरीरात सुया खुपसणेही वाईट का नाही? निसर्गतः लघवी होणे जास्त चांगले नाही का?

त्यांची उपयुक्तता चाचण्यांमध्ये वारंवार तपासण्यात येते.

हा केवळ आपला तर्क आहे.
अशा अनेक समस्या बर्‍या झालेल्या तुम्हाला प्रत्यक्षात पहायला मिळतील. केवळ आपल्याला त्यामागचे विज्ञान ज्ञात नाही किंवा त्यावर पुरेसे संशोधन झाले नाही असे म्हणता येईल.

विज्ञान ज्ञात नसेल किंवा संशोधन झाले नसेल तरी चालेल पण किमान प्लॅसिबो कंट्रोल्ड चाचण्या तरी झालेल्या असाव्यात. तशा त्या झाल्या तर ते उपचार आधुनिक वैद्यकातही स्वीकारले जातील.

आयुर्वेदीय तत्वप्रणाली

आयुर्वेदाची तत्त्वप्रणाली आधुनिक वैद्यकापेक्षा वेगळी आहे हे तर उघड आहे. पण उपचाराला आयुर्वेदीय का म्हणू नये या बाबतीतले रिकामटेकडा यांचे म्हणणे नीटसे कळले नाही.

माझी शंका उदाहरणाने मांडून पाहतो.
--------------------------
क्ष हा रोग (लक्षणसमुच्चय) य जंतू शरीरात शिरल्यामुळे होतो असे आधुनिक वैद्यक म्हणते तर तो वाताचे प्रमाण वाढल्याने होतो असे आयुर्वेद म्हणतो. - असे समजू

त्यासाठी आधुनिक वैद्यक काही औषध देते आणि आयुर्वेद काही दुसरे औषध देते. समजा दोन्हीच्या परिणामाने रोग बरा होतो असा वैज्ञानिक पद्धतीने केलेल्या संशोधनाचा निष्कर्ष आहे.

तर या उपचाराला आयुर्वेदीय उपचार म्हणायला काय अडचण आहे?
(य जंतू होते आणि आता ते नाहीत असे आधुनिक वैद्यक सिद्ध करू शकते तसे वात वाढला होता आणि आता तो कमी झाला हे अर्थातच आयुर्वेद सिद्ध करू शकत नाही कारण वात ही मुळातच मेझरेबल वस्तू नाही).
----------------------------

अजून एकः आज ऍलोपथीमध्ये ऍण्टी-हिस्टॅमिन म्हणून अनेक औषधे आहेत. ही ऍण्टीहिस्टॅमिन अत्यंत वेगवेगळ्या विकारांवर दिली जातात. उदा. सेट्रिझिन/सिनरेस्ट - सर्दीवर व प्रोमेथझाइन-ऍवोमिन- मोशन सिकनेसवर. तीनही औषधांना ऍण्टीहिस्टॅमिन म्हटले जाते. तसे हिस्टमिन मोजण्याची कुठली टेस्ट केली जाते असे मला वाटत नाही. त्या अर्थी हिस्टॅमिन ही 'कफ/वात' यासारखीच 'कल्पना' असावी-किंवा तशीच वापरली जात असावी. ती जर स्वीकारली जाते तर वात ही संकल्पना म्हणून स्वीकारायला काय हरकत आहे?(मी डॉक्टर नसल्याने या उदाहरणात चूक असू शकेल).

अर्थात नुसती कल्पना स्वीकारणे पुरेसे नाहीच. पण दिलेले औषध आणि आलेला गुण यांचे 'कोरिलेशन' (आता हाच शब्द वापरायचा. ;) ) आधुनिक संख्याशास्त्राच्या कसोट्यांनी मान्य झाले तर ते पुरेसे आहे असे मला वाटते.
पण याचा एक तोटा असा की तत्त्वे ही वैज्ञानिक दृष्ट्या एस्टॅब्लिश झालेली नसतील (कफ वाढणे म्हणजे काय हेच कळले नसेल) तर त्या तत्त्वांच्या आधारे नवी औषधे शोधणे अशक्य होईल. आणि चरक आदिंनी लिहिलेले ग्रंथ ही आयुर्वेदाची सीमा बनेल. आणि संशोधनाचे स्वरूप औषधे आणि त्नंची परिणामकारकता वॅलिडेट करणे एवढेच राहील.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

प्रश्नच संपला

य जंतू होते आणि आता ते नाहीत असे आधुनिक वैद्यक सिद्ध करू शकते तसे वात वाढला होता आणि आता तो कमी झाला हे अर्थातच आयुर्वेद सिद्ध करू शकत नाही कारण वात ही मुळातच मेझरेबल वस्तू नाही

-१ चे वर्गमूळ किंवा इलेक्ट्रॉनप्रमाणे किमान अप्रत्यक्षरीत्यातरी वात चे अस्तित्व सिद्ध झालेच पाहिजे. अन्यथा आयुर्वेदास पर्यायी विज्ञान असे प्रमाणपत्र मिळणार नाही.

आज ऍलोपथीमध्ये ऍण्टी-हिस्टॅमिन म्हणून अनेक औषधे आहेत. ही ऍण्टीहिस्टॅमिन अत्यंत वेगवेगळ्या विकारांवर दिली जातात. उदा. सेट्रिझिन/सिनरेस्ट - सर्दीवर व प्रोमेथझाइन-ऍवोमिन- मोशन सिकनेसवर. तीनही औषधांना ऍण्टीहिस्टॅमिन म्हटले जाते. तसे हिस्टमिन मोजण्याची कुठली टेस्ट केली जाते असे मला वाटत नाही. त्या अर्थी हिस्टॅमिन ही 'कफ/वात' यासारखीच 'कल्पना' असावी-किंवा तशीच वापरली जात असावी. ती जर स्वीकारली जाते तर वात ही संकल्पना म्हणून स्वीकारायला काय हरकत आहे?(मी डॉक्टर नसल्याने या उदाहरणात चूक असू शकेल).

हिस्टॅमिनचे मापन शक्य असते परंतु ते रक्तात उतरतच नाही. ते पेशींच्या आजूबाजूच्या आंतरपेशीय द्रवात असते. ते प्रयोगशाळेत मोजता येते पण नुसते रक्त पाठवून चालणार नाही (शिवाय रक्तात ते काही मिनिटेच टिकते).
सेट्रिझिन नाकातील हिस्टॅमिनवर परिणाम करते तर प्रोमेथॅझिन मेंदूतील (चूभूदेघे). सर्दीसाठी हिस्टॅमिन मोजणे म्हणजे माणूस मेला आहे की नाही याची खात्री करण्यासाठी इ.सी.जी. काढण्यासारखे आहे.

अर्थात नुसती कल्पना स्वीकारणे पुरेसे नाहीच. पण दिलेले औषध आणि आलेला गुण यांचे 'कोरिलेशन' (आता हाच शब्द वापरायचा. ;) ) आधुनिक संख्याशास्त्राच्या कसोट्यांनी मान्य झाले तर ते पुरेसे आहे असे मला वाटते.

त्यालाच मी फॉल्सिफाएबल सिद्धांत खरेच फॉल्सिफाय होणे, इ. म्हणालो.

पण याचा एक तोटा असा की तत्त्वे ही वैज्ञानिक दृष्ट्या एस्टॅब्लिश झालेली नसतील (कफ वाढणे म्हणजे काय हेच कळले नसेल) तर त्या तत्त्वांच्या आधारे नवी औषधे शोधणे अशक्य होईल. आणि चरक आदिंनी लिहिलेले ग्रंथ ही आयुर्वेदाची सीमा बनेल. आणि संशोधनाचे स्वरूप औषधे आणि त्नंची परिणामकारकता वॅलिडेट करणे एवढेच राहील.

'ज्ञानेश...' यांचा तसाच दावा आहे आणि तो प्रातिनिधिकही आहे. आयुर्वेदाची इतर कोणती व्याख्या केल्यास ते चूकच ठरेल.

अस्सं

आत्ता कळले. म्हणजे त्या रोगाचा वाताशी टँजिबल संबंध आणि औषधाचा वात कमी होण्याशी टँजीबल संबंध (सध्याच्या वैद्यांकडून) प्रथापित झाल्यशिवाय त्या वाताच्या थिअरीलाच मान्यता देता येणार नाही. किंवा वात म्हणजे नक्की काय हे समजून घ्यावे/द्यावेच लागेल. जर तसे करायचे नसेल मग 'वात' या ठिकाणी 'नितिन' असा शब्द लिहिला तरी मूळ थिअरीत काही फरक पडत नाही. नितिन रोग्याच्या शरीरात शिरला होता ही थिअरीपण मान्य करावी लागेल.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

मला अजूनही कळले नाही

मला अजूनही काहीच कळले नाही. कृ. सोप्या भाषेत समजावून सांगाल काय?


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
 
^ वर