भारतभर पाण्याचा नव्हे तर विचाराचा,कामाचा दुष्काळ आहे हे जाणवते.

पाणी !! पाणी!! पाणी !! खेड्या पासून भारताची राजधानी दिल्ही पर्यंत सामान्य माणसाचा एकच आक्रोश पाणी द्या! पण जगातील महासत्तेची मुंगेरीलाल स्वप्ने पाहणाऱ्या भारतीय राजकारण्यांच्या कानात हा आवाज पोहचत नाही. अन्न-पाणी, वस्त्र, निवारा,वीज रस्ते या प्राथमिक आवश्यक गरजा गेल्या साठ वर्षात पूर्ण न करता राज्यकर्ते जनतेला रोज नवनवीन स्वप्ने दाखवण्यात दंग आहेत. ही स्वप्ने ही लहानसहान असत नाही.कधी कोकणचा कॅलिफोर्निया , कधी मुंबईचे सिंगापूर,तर कधी शांघाय , होगंकोंग तर कधी जगाची आर्थिक आण्विक महासत्ता, आणि या महासत्तेची राजधानी मुंबई. झोपडपट्टी,गरिबी मुक्त , गगनचुंबी इमारती मोल्ल्स , भव्य शॉपिंग सेंटर मल्टी फ्लेक्स सिनेमा असलेली आनंदी आनद गडे इकडे तिकडे चोही कडे अशी नगरी.
या मुळे आजच्या भयानक वास्तवा कडे डोळाझाक करणे सोप्पे जाते. प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक असणारी नवी दृष्टी व विचार कोणत्या राजकीय पक्षाकडे आहे? आणि असला तरी तो अमलात आणण्यासाठी हितसंबंध कठोरपणे मोडून पारदर्शी, प्रामाणिक व कार्यक्षम कारभार करण्याची कोणत्या राजकीय पक्षाची तयारी आहे? आजच्या घडीचे सर्वांत महत्त्वाचे प्रश्न कोणते? शेती क्षेत्राची दुरवस्था, पाण्याची टंचाई, दुष्काळाचं सावट, वाढती महागाई अशी यादी अगदी सहज करता येऊ शकते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही चालूच आहेत. पाण्याची टंचाई तर राज्याच्या पाचवीलाच पुजलेली आहे. आजही महाराष्ट्रातील शेकडो गावं टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत आणि अनेक छोट्या शहरांना आठवड्यातून एकदा पाणी मिळतं. पावसानं ओढ दिली, तर लोकांच्या तोंडचं पाणी पळतं. दुष्काळाचं सावट, ही तर आता नित्याचीच बाब बनली आहे. दर दोन-तीन वर्षांनंतर राज्यातील काही जिल्हे अवर्षणग्रस्त बनत असतात. महागाईला तर काही मर्यादाच उरलेली नाही. देशाचे असे हाल झालेले आहेत.
जमुना सुखी, नर्मदा सुखी, सुखी सुवर्णरेखा, गंगा बनी गन्दी नाली, कृष्णा काली रेखा,
तुम पियोगे पेप्सी कोला, बिस्लरी का पानी, हम कैसे अपना प्यास बुझाए, पीकर कचरा पानी? ॥
मंत्री बने ... वर्दी के दलाल हम से जमीन छीनी, उनको बचाने लेकर आए साथ मे ...
अफसर बने है राजाजी के दार बने धनी, गाँव हमारे बन गई है उनकी कोलोनी ॥

दिल्ली मधील पाणी संकटावर NDTV च्या रवीश कुमार यांनी एक रिपोर्ट तय्यार केला तो फक्त दिल्ली चा नसून संपूर्ण भारताला लागू होतो. दिल्ली,मुंबई, खानापूर, झरी, बेळगाव, कोल्हापूर सावंतवाडी सर्व भारतभर हाच पाण्याचा नव्हे तर विचाराचा,कामाचा दुष्काळ आहे हे जाणवते. आपण आवश्य हा VIDEO पाहणे
http://content.indiainfoline.com/Admin/InfoNewImages/932738985_LS_Ravish...

http://www.ndtv.com/news/videos/video_player.php?id=145226
रवीश की रिपोर्ट : दिल्ली में जल संकट
दिल्ली पानी की समस्या विकराल रूप धारण करती जा रही है।
यहां अधिकांश हिस्से पानी की समस्या से जूझ रहे हैं।
इसके लिए कौन जिम्मेदार है?
--
Thanks & regard,

Thanthanpal,
Always visit:-
http://www.thanthanpal.blogspot.com
- Show quoted text -

Comments

यातून वाचण्याचा उपाय आहे, पण...

पाणीटंचाई, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, जलप्रदूषण, तापमानवाढ या समस्यांतून वाचण्याचा उपाय आहे हो, पण दुर्दैवाने भारतीय जनतेची मनोवृतीच पराभूत, बेफिकीर, आळशी (आणखी काय म्हणायचे ते म्हणा) आहे आणि म्हणूनच 'जनता ज्या लायकीची असते त्याच लायकीचे राज्यकर्ते तिला मिळतात' हे वाक्य आपल्या देशाकडे बघून अगदी पटते.

बहात्तर रोगांवर अक्सीर इलाज असलेला हा उपाय म्हणजे 'रेन वॉटर हार्वेस्टिंग' याला मराठीत 'पावसाळी पाण्याचा संचय' म्हणतात. खरे तर भारतावर निसर्गाने कृपा केली आहे. दर वर्षी नैऋत्य मोसमी पाऊस वर्षातून चार महिने आपल्याला हमखास गोडे पाणी पुरवतो. हे शुद्ध पाणी गटारे, ओढे, नद्यांतून वाहून जाऊन समुद्राला मिळते आणि धरणे व बंधारे वगळता यातील फार थोडे पाणी अडवले जाते. ते जमिनीत जिरतही नाही. हे पाणी अडवावे आणि साठवावे, एवढाही सोपा उपाय आपल्याला करायचा नाहीय. पण ते करण्याची ना आपल्या राज्यकर्त्याची उमेद ना जनतेची. सारे काही सरकारने करावे आणि कुठुनही का होईना पण आम्हाला पाणी पुरवावे, हीच सगळ्यांची अपेक्षा.
आत्ता तातडीने या क्षणी एक उपाय केला तर एखादी जादूची कांडी फिरल्याप्रमाणे पाणीटंचाईची समस्या संपेल. हा उपाय म्हणजे सरकारने पहिल्याप्रथम देशातील सर्व आस्थापना (आपल्या व खासगी कंपन्या आणि प्रकल्प), बहुमजली इमारती, बंगले आणि मोकळ्या जागा असलेल्या सोसायट्यांना रेन वॉटर हार्वेस्टिंग कायद्याने सक्तीचे करावे. एका बंगल्याला यासाठी सुमारे ४०००० ते ५०००० रुपये खर्च येतो. जर सरकारने बँका व वित्तसंस्थांच्या सहाय्याने अगदी दहा वर्षे मुदतीसाठी, अल्प व्याजात ही रक्कम कर्जरुपाने उपलब्ध करुन दिली तर बंगलेधारकांची हरकत असणार नाही. (त्यातही 'आम्ही हा खर्च कशाला करायचा? अडलंय आमचं खेटर!' असे म्हणणारे असतीलच, पण कायद्याचा बडगा दाखवला, की सगळे सरळ येतात.) रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काम समाधानकारक केले आहे, हे सरकार/स्थानिक प्रशासकीय संस्था व बँकांचा प्रतिनिधी यांनी प्रमाणित करावे. कर्ज मंजूर करतानाच ते काम कोण करणार आहे, याची खातरजमा करून घ्यावी म्हणजे या सर्व प्रक्रियेत पोकळ्या, फसवाफसवी अगर भ्रष्टाचाराला जागा राहणार नाही. पावसाळी जलसंचय केल्याबद्दल या लोकांना मिळकतकरात लक्षणीय सवलत द्यावी (नाहीतरी जनतेच्या करांवर राजकीय गुरे सुखेनैव चरत असतात. त्यातील थोडा भाग समाजालाच समाजाच्या हितासाठी वापरु देत.) आता यात फायदा कसा होतो ते बघू. आपल्या टेरेसवरील वाहून जाणारे पावसाळी पाणी पीव्हीसी पाईप्सद्वारे एकतर टाकीत साठवता येते किंवा तिथून पुढे बोअरवेलच्या तोंडातून थेट भूगर्भात सोडता येते. पावसाळा संपल्यावर पुढे आपण हे साठवलेले पाणी आपल्या बागेसाठी, भांडी धुण्यासाठी, टॉयलेटसाठी, गाड्या धुण्यासाठी वापरु शकतो. नुकतेच अशा यशस्वी प्रयोगाचे उदाहरण 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाले होते. पुण्यात कर्वेनगर भागात एका उद्योजकाने स्वयंस्फूर्तीने ५०००० रुपये खर्च करून हे काम करून घेतले आणि संपलेल्या उन्हाळ्याचे चार महिने रोज ११०० लिटर पाणी बोअरवेलमधून उपसले तरी पाणी संपलेले नाही. त्यांची बाग तर फुललीच, पण ते इतरांनाही पाणी देत आहेत. या उपायात एवढी ताकद आहे, की महाराष्ट्रात गावोगावी निदान उच्चभ्रूंनी (ज्यांना हा खर्च परवडू शकतो) रेन वॉटर हार्वेस्टिंग केले तर पुढची ५० वर्षे या राज्यात मुबलक पाणी खेळेल. कुणाला आश्चर्य वाटत असेल तर यातले सोपे रहस्य समजून घ्या. पावसाळ्यात साठलेले पाणी एखाद्याने उधळपट्टी करून वापरले तरी पुढचे ३ महिने पुरते आणि काटकसरीने वापरले तर ५ महिने. याचाच अर्थ हे पाणी वापरताना धरणांतून आपल्याला पुरवल्या जाणार्‍या पाण्याची बचत होणार आणि उन्हाळ्यात कुठेही टँकर पाठवायची वेळ येणार नाही. या मार्गाने कोट्यवधी लिटर पाणी वाचू शकेल. ते पाणी शेतीला आणि वृक्षसंवर्धनासाठी मुबलक ठरेल.
जलप्रदूषण रोखण्यासाठी मात्र प्रचंड प्रयासाची, गुंतवणुकीची आणि निर्धाराची गरज आहे.

जवाबदारी कोणाची?

सरकार पाणीसुद्धा देणार नसेल तर त्याचे कामच काय?

ते गाणे आक्रस्ताळे आणि विपर्यस्त आहे.

टॅग

टॅग!

हे कसे करता येइल...

मी पुण्यात राहतो.. माझी सदनिका स्टिल्ट् मजल्यावर आहे. सुमारे ह्जार् स्क्वे फुट् उघडि गच्चि घराच्या मधोमध् आहे. आमच्या प्रकल्पाच्या विकासकाने रेन् वॉटर् हार्वेस्तिंग च्या नावाने तोंडाला पाने पुसण्याचे सत्कर्म चोख् केले आहे. तेव्हा कॉमन सुविधा म्हणुन् हि व्यवस्था आकाराला येण्याचि शक्यता न्यायालयिन् साठ्मारिच्या निकालावर् तरंगते आहे. तोवर् इकडे लाखमोलाचे पावसाचे पाणी वाहुन् चालले आहे.

अश्या स्थितित् मी माझ्या सदनिके पुरते हे करु शकेन् का? असे करण्यासाठि योग्य् ती सल्लामसलत देणारी पुण्यात् कोणि व्यक्ति किंवा संस्था आहे का?

भूजलसंधारण

भूजलसंधारण किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग हा फारच महत्त्वाचा विषय आहे.
त्याचे फायदे किती? कोणते? ते कसे करावे? याबाबत श्री. ठणठणपाळ यांनी आकृतींसह लेख लिहिला तर बरे होईल.

सारे काही शक्य आहे

मन्जुलिकजी,
रेन वॉटर हार्वेस्टिंग या विषयातील अनेक व्यावसायिक पुण्यात आहेत. 'सकाळ'मध्ये कर्वेनगरमधील उद्योजकाचा जो अनुभव नुकताच प्रसिद्ध झाला आहे त्यात ते काम करुन देणार्‍याचाही संपर्क दिला आहे.
जर आपल्याकडे केवळ लहान टेरेस असेल तरीही आपण किमान दहा हजार लिटर पाणी साठवू शकतो आणि त्या पाण्याचा वापर त्याच टेरेसवर फुलबाग/फळबाग फुलवण्यासाठी करु शकतो. तुमच्या माहितीस्तव सांगतो. गेल्या महिन्यात मी एका जर्मन कंपनीचे उत्पादन पाहिले. खूपच सुंदर आहे. ही एक मोठी छत्री आहे. ती एरवी आपल्याला ओपन टेरेसवर सावलीसाठी वापरता येते. (समुद्रकिनार्‍यावर आपण अशा छत्र्या बघतोच) पावसाळ्यात हीच छत्री वरच्या दिशेने उलटवायची. पावसाळ्यात बघा कधीकधी आपली छत्री वार्‍याने उलटते आणि वरच्या बाजूने शंकूचा आकार येतो. तेच तत्त्व येथे आहे. तर या शंकूमध्ये पावसाचे पाणी साठते आणि मध्यभागी असलेल्या पोकळ दांडीतून खाली येते. ते पाणी आपण थेट प्लॅस्टिक टाकीत सोडू शकतो. फक्त आपल्याला छत्रीत आणि पाईप टाकीला जोडला असेल तेथे दोन बारीक जाळ्या (फिल्टर) बसवाव्या लागतील. म्हणजे पाने, कचरा टाकीत जाणार नाही.
आता तुमच्याकडे १०००० लिटर शुद्ध पाणी जमा आहे. हे पाणी तुम्ही नोव्हेंबरपासून ते फेब्रुवारीपर्यंत चार महिने आरामात वापरु शकता. मात्र हे पाणी पिण्यासाठी वापरु नका. पाण्याचा कमीतकमी वापर करुन बाग फुलवायची असेल तर एक उपाय आहे. सकाळी उन्हे चढण्यापूर्वी पाणी देणे. नंतर दुपारच्या कडक उन्हात हँडी स्प्रिंकलरने पानांवर पाणी फवारायचे. बस. एवढ्यावर तुमची रोपे कायम सतेज राहतील.

धन्यवाद...पण थोडासा अजुन त्रास देउ का ?

रेन वॉटर हार्वेस्टिंग या विषयातील अनेक व्यावसायिक पुण्यात आहेत. 'सकाळ'मध्ये कर्वेनगरमधील उद्योजकाचा जो अनुभव नुकताच प्रसिद्ध झाला आहे त्यात ते काम करुन देणार्‍याचाही संपर्क दिला आहे.

हे जे आपण उल्लेखिलेत त्या लेखाचा तारीख -वार असा काही तपशिल देउ शकाल काय... म्हणजे मला शोधुन काढता येइल..
शिवाय त्या जर्मन छत्री ने हि उत्सुकता निर्माण केली आहे. त्या प्रकाराचेही अधिक वर्णन कुठे वाचता येइल?

या घ्या लिंक्स्

मन्जुलिकजी,
या घ्या सकाळमधील रेन वॉटर हार्वेस्टिंग संबंधित बातम्यांच्या लिंक्स.
http://72.78.249.124/esakal/20100527/5362151576721512002.htm
http://72.78.249.124/esakal/20100531/5532091735693544524.htm
http://72.78.249.124/esakal/20100606/4783158143270394587.htm
http://72.78.249.124/esakal/20100529/5366630058646326120.htm
http://72.78.249.124/esakal/20100528/4705158459561056173.htm

ती जर्मन छत्री मी पुण्यातील आर्किटेक्ट्स् ऍन्ड इंटिरियर डिझायनर्स असोसिएशनच्या एका मेळाव्यात पाहिली होती. तपशील जरा शोधावा लागेल. प्रयत्न करतो.

चांगली चर्चा

मूळ लेखात उत्तेजना आणि प्रतिसादांत काही व्य्वहार्य उपाय, दोन्हीमुळे चर्चा चांगली चालू आहे.

थोडे अंकगणित

मुंबई ठाण्यासारख्या जागेची टंचाई असलेल्या मात्र भरपूर पाऊस असलेल्या भागात संपूर्ण पावसाळा धरला तर दर चौ फूटावर सुमारे १८५ लीटर पाऊस पडतो. मी राहतो त्या बिल्डिंगमध्ये ४० बिर्‍हाडे आहेत आणि बिल्डिंगच्या छताचे क्षेत्रफळ ४५०० चौ फूट आहे. त्या हिशेबाने आमच्या बिल्डिंगवर ८ लाख ४० हजार लिटर पाणी पावसाळ्यात पडते.

एवढे पाणी साठवायचे झाले तर ३० फू * ३० फू * ३० फू अशी टाकी मला बांधावी लागेल. ३० फुटा ऐवजी १० च फूट खोल ताकी करायची तर ५४ * ५४ फूट टाकी बांधावी लागेल. एवढी मोकळी जागा आमच्या बिल्डिंगच्या आसपास नाही.

आमच्या बिल्डिंगमध्ये घरटी सरासरी ३.५ माणसे राहतात असे धरले तर राहणार्‍या १४० माणसांना दररोज १०० लिटरच्या हिशोबाने वर्षाला सुमारे ५१ लाख लीटर पाणी लागते. म्हणजे बिल्डिंगवर पडणारे पाणी गरजेच्या सुमारे १५% आहे. हे उत्तम आहे. पण सध्याच्या इमारतीच्या आसपास जागा नाही म्हणून आम्हाला हे पाणी साठवता येत नाही. अनेकजण हे पाणी टाकीतून न साठवता बोअरवेलमध्ये सोडून द्यावे असे सुचवतात. पण असे सोडलेले पाणी आपल्याच बोअरवेलच्या आसपास राहील याची काहीच खात्री देता येत नाही. ते इकडे तिकडे पसरल्यास शेजारच्या सोसायटीतील बोअरमधून ते पाणी त्यांना मिळू शकते. याच्या उलट झाले तर ते अधिक बरे ;)

नव्या इमारतीच्या तळघरात मात्र अशी ९-१० फूट खोलीची टाकी बांधली जाऊ शकते आणि वर इमारत बांधली जाऊ शकते. नव्या इमारतीचा प्रॉब्लेम हा की नव्या इमारती या अधिक उंच असतात. म्हणजे ४५०० चौ फू क्षेत्रफळाच्या इमारतीत १४० ऐवजी किमान दुप्पट माणसे रहात असतील. म्हणजे गोळा झालेले पाणी एकूण गरजेच्या फक्त ७-८ % असेल. मग पुन्हा सगळा उपद्व्याप करून हाती काही लागत नाही असे होते.

दुसरीकडे मुंबई ठाण्यासारख्या समुद्रसपाटीच्या भागात बोअरवेल खणली तर जवळजवळ हमखास आणि अक्षय्य पाणीसाठा मिळतो कारण समुद्र जवळ असल्याने जमिनीखालचे पाणी रिप्लेनिश होत राहते. (हा समज चुकीचा असेल तर जाणकारांनी सुधारणा करावी).

विरळ लोकवस्तीच्या आणि बैठ्या किंवा साधारण दुमजली घरे असलेल्या प्रदेशात हा उपाय चांगला. अर्थात देशावर पाऊस कमी पडत असल्याने पुन्हा साठलेल्या पाण्याचा हिशेब फारसा फायद्याचा होत नसावा.

मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या ठिकाणी रेनवॉटर हारवेस्टिंगपेक्षा बोअरवेल हा अधिक चांगला उपाय आहे असे मला वाटते. त्या बोअरवेल मध्ये पावसाचे पाणी सोडल्यास पाण्याची क्षारता कमी होण्यास मात्र मदत मिळेल.

एकाच नदीवर एकापुढे एक बांधलेले छोटे बंधारे आणि डोंगरउतारावरील कंटूर कटिंग हे अधिक परिणामकारक ठरेल असे वाटते.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

क्षारयुक्त पाणी

दुसरीकडे मुंबई ठाण्यासारख्या समुद्रसपाटीच्या भागात बोअरवेल खणली तर जवळजवळ हमखास आणि अक्षय्य पाणीसाठा मिळतो कारण समुद्र जवळ असल्याने जमिनीखालचे पाणी रिप्लेनिश होत राहते. (हा समज चुकीचा असेल तर जाणकारांनी सुधारणा करावी).

माझ्यामते हा समज खरा असावा पण मी जाणकार नाही. :-) मुंबईतील आमची इमारत आणि तिच्या आजूबाजूच्या सर्व इमारतींनी बोअरवेल्स खणल्या त्या सर्वांना क्षारयुक्त पाणी लागले आहे आणि ते १२ महिनेही पुरते. या पाण्याचा उपयोग फक्त झाडांना पाणी घालण्यास, बिल्डिंग धुणे, गाड्या धुणे वगैरे आणि संडासात केला जातो. त्यात कपडे-भांडी धुता येत नाहीत. जर पावसाचे पाणी सोडून ते कमी क्षारयुक्त ठरत असेल आणि इतरत्रही वापरता येत असेल तर उपयोगाचे ठरेल परंतु कमी क्षारयुक्त ठरण्यासाठी बोअरवेलचे पाणी किती लागते आणि त्यात किती पट पावसाचे पाणी मिसळले असता ते कमी क्षारयुक्त ठरेल याचा अंदाज नाही.

बोअवेलचे पाणी पिण्यातर वापराला...

बोअवेलचे पाणी पिण्यातर वापराला...

प्रियाली, नितिन, माझेही हेच मत आहे आणि प्रत्येक सोसायटीमधे अगदी कमी खर्चात होण्यासारखी ही सोय असते. नव्या सोसायट्यात हे सुरुवातीलाच योजता येते.
तसेच अशाही काही योजना हव्यात

२०००-३००० रुपये खर्च .सामान्य माणूस ही हे काम करू शकतो.

विसुनाना , सोबत दोन लिंक्स पाठवत आहे .आणि लवकरच या बद्दल सविस्तर लिहित आहे. या प्रयोगाला जास्त खर्च येत नाही.२०००-३००० रुपये खर्च .सामान्य माणूस ही हे काम करू शकतो. फक्त मी हे करू शकतो ही जिद्द मनात पाहिजे. गच्ची वरचे पाणी नाही तरी नाल्यात , रस्त्यावर वाहून जाते तेच पाणी पाइपणे जमिनीत सोडले तर उन्हाळ्यातील पाण्याचा प्रश्न सहज सुटू शकतो. हिवाराबाझार पोपटराव पवार, आण्णा हजारेनी , औरंगाबाद च्या केडीयानी, राजस्थान मध्ये याची खु कामे झाली आणि वर्षभर पाणी पुरते.त्याच बरोबर पाण्याने समृद्धी ही आली. सरकारी नोकरशाहीला, राजकारण्यांना या योजनेत रस नाही.त्यांना करोडो रुपयाच्या योजना पाहिजे असतात या योजनेत भ्रष्ट्राचार करता येतो. लोकांना मूर्ख बनवता येते. जल स्वराज योजनेत आता पर्यंत हजारो करोडो रुपये खर्च झाले. नतीजा 000 . परभणी जिल्यात लोअर दुधना नावाचा एक धरण प्रकल्प गेल्या २५ वर्षा पासून अपूर्ण अवस्थेत आहे, ५० कोटीचा प्रकल्पावर १००० कोटी रुपये खर्च झालेत पण पावसाच्या पाण्यातच कालवा तडकला. दर निवडणुकीत आश्वासन मिळते आणि हवेत विरते जनता पाण्यासाठी वणवण फिरते. ५-८ किलोमीटरची पाण्यासाठी उन्हात वणवण स्त्रिया फिरतात. पण हे साधे काम कोणी करत नाही. औरंगाबाद च्या केडीयांचे यात काम मोठे आहे. खालील लिंक्स पहा दुसर्या लिंक्स वर पाणी वाचण्याचे CALCULETAR दिले आहे.
http://www.varshajal.com/marathi/index.htm .
http://www.aboutrainwaterharvesting.com/rwh_quantity.htm
आता आपणच पुढाकार घेतला पाहिजे.

जरूर

आपल्या लेखाच्या प्रतिक्षेत आहे. सर्वांनाच त्याचा लाभ होईल आणि तेही असे बांधकाम करण्यास उद्युक्त होतील.

अवांतर -
मी रहात असलेल्या सदनिका-संकुलाच्या आवारात अत्यंत उत्तम (शास्त्रीय रितीने बांधलेले) ३ मोठे भूजल संधारक आहेत. प्रत्येकाचा आकार २५ फूट * २० फूट * २० फूट आहे. त्यात बांधकाम कंत्राटदाराने बारीक वाळू, कोळसा, मुरूम, मोठे दगड यांचे थर घालून पाणी गाळून झिरपेल अशीही सोय केलेली आहे. संकुलाच्या वेगवेगळ्या दिशांना असल्याने कोणत्याही एकात अतिरिक्त पाणी भरून ते (शक्यतो) बाहेर/वाया जात नाही.
वरून सिमेंट काँक्रीटची आच्छादने घातल्याने मोटर ड्राईव्हवेखाली हे संधारक आहेत याची कल्पनाही येत नाही. गच्चीवरील बहुतेक सर्व पावसाचे पाणी ६ इंच व्यासाच्या मोठ्या नळ्यांनी या खड्ड्यामध्ये जाते. त्याचा फायदा आमच्या बोअरिंगना किती होतो ते प्रश्न अलाहिदा. पण पावसाच्या वेळी इतर संकुलांमधील पाणी रस्त्यावरून वहात असताना आमच्या संकुलातून पाणी बाहेर पडत नाही याबद्दल बांधकाम कंत्राटदराला मी (इतर सर्व सोयींपेक्षा जास्त) धन्यवाद देत असतो.
भारताच्या प्रत्येक शहरात अशी सोय करण्याची सक्ती प्रत्येक संकुलनिर्मात्यावर झाली पाहिजे. संकुलात जिम आहे का किंवा स्विमिंग पूल आहे का हे पहाण्याआधी त्यात योग्य असे भूजलसंधारक आहेत का? हे रहिवाश्यांनी जरूर पहावे/तशी मागणी करावी.

चांगली चर्चा

चर्चा खूप चांगली चालली आहे आणि बरीच नवीन माहिती कळत आहे. वरील रेनवॉटर हार्वेस्टींगचे दुवे पण खूप उपयुक्त वाटले. थोडे अधिकः

पाणी जिरवणे हे देखील पाणी साठवण्याइतके महत्वाचे असते. काहीचे उपयोग हे तात्काळ असतात तर काहीचे दूरगामी. त्यामुळे नितीन यांनी सांगितलेल्या सोसायट्यांच्या योजनांमध्ये तसेच इतरत्र सर्वच ठिकाणी पाणी जिरवणे पण शक्य करणे महत्वाचे आहे. त्या संदर्भात वास्तवीक सरकारने सर्वेक्षण करणे महत्वाचे आहे. पण तसे शक्य नसेल तर अगदी वार्डाच्या पातळीवर नगरसेवकाच्या मदतीने असे सर्वेक्षण करून घेतले पाहीजे. नाहीतर त्यांना मिळणारे मतदारसंघातील पैसे ते पाण्यासारखे वापरतात. यात पाण्यासाठी वापरल्याने त्यांचे किमान काहीतरी नाव होईल. :-)

दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पाण्याचा होणारा सरकारी वापर. सरकारी खर्च किमान कागदोपत्री दिसतो, पण पाण्याचा वापर कधीच दिसत नाही. सरकार अनेक ठिकाणी पाणी वापरते ज्याचा उपयोग जर त्यांनी अशा साठवलेल्या पाण्याने केला तरी देखील खूप पाणी वाचू शकेल. नवीन बांधकामांना कदाचीत शक्य होणार नाही पण जुन्या ठिकाणीच नवीन बांधकाम अथवा सुधारणा होत असताना कॉक्रीटीकरणाच्या वेळेस साठवलेले पाणी वापरले जाऊ शकते.

थोडक्यात अतिरीक्त पाणी हे मला वाटते, आपल्या (भारत/मुंबई/तत्सम शहरे) संदर्भात जास्तकरून सार्वजनीक आणि उद्योगक्षेत्रे जास्त वापरतात. त्यांना मागणी करण्यापेक्षा उत्तेजना दिली पाहीजे आणि ती योग्य पद्धतीने आमलात आणली जात आहे का नाही ते पाहीले पाहीजे.

विलासराव साळुंख्यांनी चालू केलेली शेतकर्‍यांसाठीची पाणीपंचायत आता इतरत्र ठिकाणी पण योग्य बदल करून आमलात आणली पाहीजे.

बाकी अजून महत्वाचे म्हणजे आपण कसे, कुठे आणि किती पाणी वापरतो या संदर्भात लोकशिक्षणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यात नेहमीपेक्षा अतिरीक्त वापराबद्दल बोलत आहे: उ.दा. गाडी कितीवेळा साफ केली जाते आणि कशी? काही घरांमधे पाण्याने खूपदा (टाईल्सच्या) भिंतीसकट साफ केले जाते. त्याची गरज असली तरी त्याच्या अतिरेकाची गरज नाही. तेच शेती आणि बागकामासंदर्भात. असे अनेक प्रकार आहेत.

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

गावांचे काय ?

आपण सगळेजण शहरातील पाण्याचा वापर कमी करण्याबाबत / पाणी अडविणे, जीरवीणे याबाबत विचार करतोय ही फार चांगली गोष्ट आहे. मात्र गावी देखील वेगळी परिस्थीती नाहीये. आजही शेतात पाटाद्वारे पाणी दिले जाते ज्यात बरेच पाणी वाया जाते. सुधारीत पाणी वाटप पद्धतीचा वापर अजूनही फार थोडया प्रमाणावर होत आहे. याला बर्‍याच अंशी आपली मानसिकता देखील कारणीभूत आहे. नवीन (चांगल्या) गोष्टी स्वीकारण्यास आपण नेहमीच नाखुश असतो.
बाकी राजकारणी लोकांना अशा प्रकल्पांत सामिल करुन घेणे म्हणजे आपल्याच पायावर कुर्‍हाड मारुन घेणे. शक्यतो स्वयंसेवी संस्था, पाच-पंचवीस जणांचा संघ हे काम प्रामाणिकपणे करण्याची शक्यता जास्त.
राजस्थानच्या "water man" ची http://www.thehindu.com/fline/fl1817/18170810.htm ही कहाणीदेखील प्रेरणादायी.

तिथे पण शिक्षण आणि चिमटा

आजही शेतात पाटाद्वारे पाणी दिले जाते ज्यात बरेच पाणी वाया जाते.

तेथे देखील शिक्षण आणि पोटाला अलगद का होईना चिमटा बसेल याची व्यवस्था (अथवा धाकधूक) करणे महत्वाचे आहे.

फुकटाला मोल नसते... जेंव्हा वीज आणि पाणी फुकट मिळते तेंव्हा त्याचे देखील महत्व नसते. मला आठवते आहे की बाळासाहेबांनी, निवडून आल्यास शेतकर्‍यांना वीज फुकट देऊ म्हणता क्षणी सुशीलकुमारांनी वीज फुकट केली. त्याचा काही अंशी परीणाम हा उगाच पंप वापरण्यात झाला. ज्यातून जास्त उपसा काढला गेला. असे पाणी जमिनीत जास्त गेले तर शेतीला देखील वास्तवीक चांगले नसते. परीणामी वीजेपरी वीज जाते, पाण्यापरी पाणी आणि जमिनीचे देखील नुकसान होते...

अर्थात असा चिमटा म्हणजे राजकीय बुमरँग होईल या भितीने कोणी करेल का नाही याबाबत शंकाच आहे...

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

पाणीपट्टी

एक प्रश्न:

वीजेचे दर जसे सातत्याने वाढत गेले आहेत तसे पाण्याचे वाढले आहेत का? तसेच पाणीपट्टी ही माझ्या ऐकीव माहीतीप्रमाणे, किमान मुंबईत (आणि कदाचीत इतर शहरातही) नवीन जागांच्या ठिकाणी वाढते पण जुन्या घरांना (उ.दा. मलबार हील) नाही...

याबाबतीत काही माहीती आहे का?

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

 
^ वर