जनगणना अनुभव

आजच आमच्याकडे जनगणनेसाठी एक बाई आल्या होत्या. अन्य माहिती सोबतच त्यांनी माझी जात सुद्धा विचारली. खरतर सरकारने जातीनिहाय जनगणनेसाठी अजूनही आदेश काढलेला नाही. काही राजकीय पक्षांच्या मागणीवर विचार करण्यासाठी मंत्रीगटाची नियुक्ती केली आहे असे बातम्यांमध्ये आले होते.

मी त्या बाईंना माझी जात नोंदविण्यास नकार दिला. परंतु त्या म्हणाल्या की, नोंदणी तक्त्यातील रकाना मोकळा सोडता येणार नाही. आम्हाला तशा सूचना आहेत. मी पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला, तरीही त्या ऐकण्यास तयार नव्हत्या शेवटी त्यांनी त्यामध्ये 'अन्य' अशी नोंद केली.

आपल्याला कुणास असा काही अनुभव आला आहे का? याबाबत नक्की काय आदेश आहेत याची माहिती असल्यास येथे देणे.

जयेश

लेखनविषय: दुवे:

Comments

आंध्रातला अनुभव

आंध्र प्रदेशात 'प्राथमिक जनगणना' सुरू आहे.
जनगणना दोन फेर्‍यात होणार आहे असे ऐकून आहे.

प्राथमिक जनगणनेचा अर्ज कुटुंबातील व्यक्तीने स्वहस्ताक्षरात भरायचा आहे. वादाचे दोन मुद्दे आहेत-
१. हा अर्ज केवळ तेलुगु भाषेत छापलेला असून तो केवळ तेलुगु लिपीतच भरण्याची मुभा आहे.
- कुटुंबातील काही व्यक्ती तेलुगु लिपीत लिहू शकत असल्याने मी ठार तेलुगु निरक्षर असूनही अडचण आली नाही. पण इतर राज्यातून नुकतेच आंध्रात स्थायिक झालेले लोक ही समस्या कशी सोडवणार? (अर्ज कुटुंबातील व्यक्तीनेच भरायला हवा ही अट आहे.)
२. 'जात' हा प्रकार फारच विचित्र आहे. तो रकाना आणि विषय जनगणनेतून काढूनच टाकायला हवा.
- जनगणनेसाठी आलेला स्वयंसेवक जात नोंदवण्यासाठी हटून बसला. मला तेलुगू येत नसल्याने :((आणि त्याला तेलुगूशिवाय कोणतीही भाषा येत नसल्याने ;)) वाद घालता येत नव्हता आणि 'जात न नोंदवण्याचा विकल्प' ही संकल्पना त्याच्या मेंदूत शिरत नसल्याने नाईलाजाने 'जात' सांगावीच लागली. (अन्य हा विकल्प त्याला मान्य नव्हता. )तर त्याला तेही पटेना. तुमचे आडनाव 'हे' आहे आणि/मग 'ही' जात तुम्ही कशी सांगता असा वाद तो घालू लागला. (त्याच्या अवतारावरून तो 'ह्या' जातीचा अभिमानी दिसत होता.) त्याला सांगितले की तुला पटत नसेल तर तुला 'आमची ' वाटते ती जात 'तू' लिही. पण त्याला काहीही लिहायची मुभा नसल्याने त्याने वाद आवरता घेतला.
'आडनाव ~ जात' हे समिकरण जात अथवा आडनाव किंवा दोन्ही बंद केल्यानेच नाहीसे होईल असे वाटते.

धर्माबद्दलही असेच वाटते.
अवांतर - महाराष्ट्राबाहेर जातिव्यवस्था अधिकच घट्ट आहे. उदा. इथे आंध्रात 'राव' हे नामाभिधान काही विशिष्ट जातीचे लोकच लावू शकतात. इतरांना बंदी आहे.

वेगळा अनुभव

जनगणनेचा फॉर्म कर्मचारी भरतात असे पाहिले आहे. अन्यथा निरक्षरांची पंचाईत होईल.
यावेळी दोन फॉर्म असून केवळ एकावर कुटुंबप्रमुखाने स्वाक्षरी करायची आहे.

निरक्षरांची पंचाईत

निरक्षरांची पंचाईत तर आहेच! (मीही तेलुगूसाठी निरक्षरच!)
जो अर्ज भरतो तो काय लिहित आहे हे त्यांना कळण्यास मार्ग नाही. (म्हणून निरक्षरांसाठी त्यांच्या ओळखीच्या साक्षराकडून अर्ज भरले जातात.)
अर्जावर खाडाखोड चालत नाही. चुकीची माहिती भरली तर साक्षर लोक भांडण करू शकतात. म्हणून साक्षरांचे अर्ज भरताना स्वयंसेवक स्वतः ते भरण्यास ठामपणे नकार देतो.
अर्जात खाडाखोड झाल्यास 'नोकरी जाण्याची' तंबी त्यां बिचार्‍या स्वयंसेवकांना मिळालेली आहे असे त्यानेच सांगितले.
निरक्षरांबाबत तो काय करतो ते कळले नाही.

माझे निरीक्षण

अजून जात नोंदविण्याचा आदेश आलेला नाही. केवळ अ.जा., अ.ज., आणि इतर एवढेच नोंदविले जाते आहे.
प्रथम भाषा आणि धर्म या दोन रकान्यांची सोयच नाही याचे सखेदाश्चर्य वाटले. आंतरजालावर केवळ तुरळक ओरडा सुरू आहे. हे रकाने जातीपेक्षा अधिक महत्वाचे आहेत.

माझा अनुभव

माझ्याकडे आलेल्या जनगणना अधिकार्‍यांनी जातीबद्दल काहीच विचारले नाही. तसेच मी सही केलेल्या फॉर्मवर तसा कॉलमही मला कुठे आढळला नाही. जनगणना अधिकारी अतिशय चांगले वाटले. सर्व प्रकल्पाबद्दल अतिशय उत्तम माहिती त्यांनी दिली. माझा एकूण अनुभव फारच सुखद वाटला.

चन्द्रशेखर

असेच झाले

हेच झाले
प्रमोद

सहमत

वरील दोन्ही अनुभवांशी सहमत. जनगणनेचा माझा अनुभव सुखद होता. मला जात विचारली नाही. मी घरी नसताना आलेल्या अधिकार्‍यांनी मला दोनदा फोन केला आणि माझ्या सोयीच्या वेळी ते परत घरी आले.
या निमित्ताने आणखी एक. जनगणना करणार्‍या अधिकार्‍यांची ओळख पटवून घेऊन त्यांना घरात बोलवावे. तो किचकट आणि भलामोठा फॉर्म भरण्यासाठी त्यांना बसून घ्यायला सांगावे. त्यांना किमान पाणी तरी विचारावे.
जनगणना हे अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय कार्य आहे. नेहमीची बथ्थड बेफिकिरी आणि कुजकट वृत्ती सोडून या कार्याला किमान सहकार्य द्यावे. माझ्याकडे आलेल्या अधिकार्‍यांना मी 'तुम्ही फार चांगले काम करता आहात, हे देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे' इतकेच म्हणालो, तर ते इतके भारावले की त्यांना काय बोलावे, हे सुचेना.

सन्जोप राव
तीजा तेरा रंग था मै तो
जिया तेरे ढंग से मै तो
तूही था मौला तूही आन
मौला मेरे ले ले मेरी जान

सहमत

नेहमीची बथ्थड बेफिकिरी आणि कुजकट वृत्ती सोडून या कार्याला किमान सहकार्य द्यावे. माझ्याकडे आलेल्या अधिकार्‍यांना मी 'तुम्ही फार चांगले काम करता आहात, हे देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे' इतकेच म्हणालो, तर ते इतके भारावले की त्यांना काय बोलावे, हे सुचेना.

सहमत आहे पण अवघड आहे. या वृत्ती वाडवडिलांपासून आम्ही अभिमानाने चालवत आहोत त्यांना सोडून देणे कठीण आहे.

--
अनुदिनी : http://rbk137.blogspot.com

हैफ़ उस चार गिरह कपड़े की क़िस्मत ग़ालिब
जिसकी क़िस्मत में हो आशिक़ का गरेबां होना

जनगणना:जात

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
आमच्या घरी जनगणना कर्मचारी आला.त्याने एकच फॉर्म दिला.म्हणाला,"हा फॉर्म भरून ठेवा.उद्या याच वेळी न्यायला येईन"
फॉर्मच्या वरच्याबाजूला "जात" असे छापले होते. म्हणजे ते संपूर्ण कुटुंबासाठी होते. कुटुंबाची जात एकच असे गृहीत धरले असावे. तिथे मी"भारतीय" असे लिहिले.विचारल्याप्रमाणे अन्य सर्व माहिती भरली. दुसर्‍या दिवशी जनगणना कर्मचारी फॉर्म घेऊन गेला.

माझे मत

आता सगळ्यांनी मिळून उच्चारवाने आपली जात प्रथम सांगावी. सोनिया गांधीची जात कोणती. सरकार भारतीय नागरीकाला जात विचारत असेल तर प्रत्येक नागरीकालाही जात विचारण्याचा / समजून घेण्याचा हक्क आहे. मग जाती वरून कोणी हाक मारली तर कोर्टात केस का दाखल होते. हा शुद्ध दांभिकपणा आहे. जाती विरहीत समाज घडविण्याची ही पहीली पायरी आहे. (?) शेवटी माउंटबेटन देश सोडून जाताना जे म्हणत होता ते राजकीय पुढारी खरे करून दाखवित आहेत.

एक वाचलेला अनुभव

चित्रलेखात एका जणगणना करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचा अनुभव वाचला. एका घरामध्ये एकटी महिला होती. मी जणगणना कर्मचारी आहे असे सांगुनही तिने दार उघडले नाही. नंतर शेजारी कळले की तिचा नवरा घरी आल्यावर विशिष्ट तऱ्हेने दोनदा शीटी वाजवतो मग नंतर ती दार उघडते. इतर वेळी ती घरातच असते.

निवडणूक आयोगाने अशा शिट्ट्यांचे ही प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना द्यायला हवे होते असे वाटते.

बाप रे

चित्रलेखात एका जणगणना करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याचा अनुभव वाचला. एका घरामध्ये एकटी महिला होती. मी जणगणना कर्मचारी आहे असे सांगुनही तिने दार उघडले नाही. नंतर शेजारी कळले की तिचा नवरा घरी आल्यावर विशिष्ट तऱ्हेने दोनदा शीटी वाजवतो मग नंतर ती दार उघडते. इतर वेळी ती घरातच असते.

बाप रे!! आपण कुठल्या काळात जगतो आहोत.

निवडणूक आयोगाने अशा शिट्ट्यांचे ही प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना द्यायला हवे होते असे वाटते

आयड्या चांगली आहे.

आमच्याकडे जनगणवाल्यांनी जात विचारली नाही. विचारली असती तर 'आम्ही जातिहीन' असेच सांगितले असते.

अवांतर:
चित्रलेखाचा ज्ञानेश महाराव हा रॅबल राऊज़र आहे असे माझे मत झाले आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

अजात जात

आमच्याकडे जनगणवाल्यांनी जात विचारली नाही. विचारली असती तर 'आम्ही जातिहीन' असेच सांगितले असते.

महाराष्ट्रात कुठेतरी एका गावात लोकांनी जात-पात टाळण्यासाठी 'अजात' अशी जात लावायला सुरुवात केली. मग तीसुद्ध एक जात् झाली. त्यांना अजातवाले म्हणतात..मराठवाड्यातलं गाव असल्यासारखं वाटतय..लोकसत्ताची लिंक सापडली पण फाँट प्रोब्लेम आहे.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

लोकसत्ताची जुनी पाने

लोकसत्ताच्या जुन्या पानांसाठी MillenniumVarun हा फाँट वापरावा लागतो असे स्मरते. त्यासाठीचा दुवा त्या पानांवर असतो.

हे घ्या पान

अजात संप्रदाय गूगलच्या कॅशमधले युनिकोडित पान. हे नवीनच कळले.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

अवांतरच

अवांतर:
चित्रलेखाचा ज्ञानेश महाराव हा रॅबल राऊज़र आहे असे माझे मत झाले आहे.

माझ्या मते ज्ञानेश महाराव हे समाजजागृती बद्दल सडेतोड लेखक आहेत. अर्थात हे फक्त माझे मत झाले. त्यांचे देवाधर्माच्या नावानं नावाचे एक पुस्तक पूर्वी वाचले होते. जिंकू दाही दिशा या त्यांच्या लिखाणाला महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीची पूरस्कार मिळाल्याचेही वाचनात आले होते. चित्रलेखातले त्यांचे लेख मी बऱ्याच दिवसांपासून वाचतो. यावरुन मला वरीलप्रमाणे वाटले. स्वतंत्र चर्चा अपेक्षित. आणि हो संभाजी ब्रिगेड ही संघटना दहशतवादी हे जरा अतिरंजित वाटले बूआ.
या एकदोन प्रतिसादांवरून काही अंदाज नका लावू राव ;)

सहमत

स्वतंत्र चर्चा अपेक्षित.

सहमत. त्यासाठी मी तुम्हाला खरडवहीत काही दुवे दिलेले आहेत :) दोन्ही बाजूच्या भूमिका मांडून चांगली चर्चा घडवता येईल.
या एकदोन प्रतिसादांवरून काही अंदाज नका लावू राव ;)
काय राव! बस का:)

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

विचारून सांगतो

माझ्या आईला गणनेची ड्युटी आहे. मात्र सध्या जी चालु आहे ती "घरगणना" आहे. त्यात घरात (म्हणजे चार भिंती असलेली कोणतीही जागा, ज्यात अगदी पंपहाऊसही आले) कोण रहाते, किती माणसे, ग्यास वापरता की चूल, टाईल्स आहेत का नाहि आदी बर्‍याच प्रश्नांचे पाल्हाळ आहे.. जनगणना सूरू होणे बाकी आहे.

तरीही तिला उद्या विचारुन लिहितो.

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

जनगणनेचे माहित नाही पण

स्पेसिफिक् जात बहुधा मागासवर्गीयांना सांगावी लागते. म्हणजे अमागासवर्गीयांना नॉन बी सी एवढे सांगून पुरते. सध्या शाळेच्या प्रवेशाबाबतही हीच पद्धत आहे.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

नक्की कल्पना नाही पण तसे नसावे

स्पेसिफिक् जात बहुधा मागासवर्गीयांना सांगावी लागते. म्हणजे अमागासवर्गीयांना नॉन बी सी एवढे सांगून पुरते. सध्या शाळेच्या प्रवेशाबाबतही हीच पद्धत आहे.

शाळेच्या प्रवेशाबाबत सध्या काय परिस्थिती आहे याची कल्पना नसली तरी शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जातीचा स्पष्ट उल्लेख असतो असे दिसते. त्यामुळे शाळाप्रवेश घेताना जात सांगावी लागत असणार. शिवाय फक्त मागासवर्गीयांचीच जातीनिहाय गणना केली तर, जात्याधारित आरक्षणासाठी इच्छुक असणाऱ्या व सध्या बिगरमागास असणाऱ्या मराठा व तत्सम जातींचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण शोधणे शक्य होणार नाही.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

हिंदू- नॉन बीसी

माझ्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर हिंदू- नॉन बीसी एवढाच उल्लेख आहे.

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

फॉर्म्याट वेगळा असावा?

माझ्या अनेक नॉन बीसी मित्रांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर हिंदू-ब्राम्हण, हिंदू-मराठा, हिंदू-जैन(?) असे उल्लेख वाचले आहेत. हिंदू-नॉन बीसी ही भानगड पहिल्यांदाच ऐकली.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

माहिती हवी

आमच्याकडे एक दिवस काही कर्मचारी आले त्यांनी दारावर खडूने क्रमांक टाकले. आज आणखी एक कर्मचारी आला त्याने कोरा झेरॉक्स मारलेला फॉर्म हाती दिला आणि म्हणाला फॉर्म भरुन ठेवा. उद्या येऊन फॉर्म घेऊन जाईन.

प्रगणकाने जो फॉर्म दिला त्या फॉर्म च्या एका बाजूला 'A' आणि दुसर्‍या बाजूला 'B' असे भाग दिसले. पण त्या फॉर्मवर मला जातीचा उल्लेख दिसला नाही. अजून एखादा फॉर्म यासोबत असतो काय ?

असलाच जातीचा उल्लेख तर मी जातीसहीत माहिती भरुन देणार आहे.

-दिलीप बिरुटे

माझा अनुभव.

माझ्या घरी दोन महिला अधिकारी आल्या होत्या..दोघीही मराठीच होत्या...आमच्या इमारतीत मी एकटाच मराठी असल्यामुळे त्या अंमळ सुखावल्या. खरं तर एकीचीच नेमणूक होती....पण दुसरी..तिची नातेवाईक.. तिला त्या दिवसापुरती मदतनीस म्हणून आलेली होती. त्यांनीच मला विचारून चटाचट माहिती भरली....जात विचारली नाही..हे विशेष. चहा-पाणी (पैसे नव्हेत हो)देऊन त्यांचे आतिथ्य केल्यामुळे त्या अजूनच खुश झाल्या.

जसे घरात कुणी एकटे असल्यामुळे अनाहुतांना दार उघडणे धोकादायक तसेच एकेकट्या महिलेने कुणा अनोळखी लोकांच्या घरात जाणे हेही तसे धोकादायकच असू शकते. म्हणून मी माझ्याकडे आलेल्या त्या स्त्री अधिकार्‍याला ह्याबद्दल जागरूक केले आणि शक्य तो असेच कुणी तरी जोडीला घेऊनच पुढचे काम करण्याचा सल्ला दिला. ती आमच्याच विभागात जनगणना करणार असल्यामुळे....वेळप्रसंगी मदत लागलीच तर माझ्याशी संपर्क साधण्यासही सांगितले.

जनगणनेचे काम करणारर्‍यात बहुसंख्येने स्त्रियाच आहेत आणि म्हणून त्यांच्या सुरक्षेच्या कारणांस्तव खरं तर सरकारने प्रत्येक ठिकाणी किमान दोन स्त्रियांना एकत्र जनगणनेसाठी पाठवावे अशी माझी अपेक्षा आहे.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

 
^ वर