श्रद्धा : काही उदाहरणे
श्रद्धेवर हल्ली इथे आणि इतरत्र बरेच लेख वाचायला मिळतात. या सर्व लेखांमध्ये कुणाचे तरी वैयक्तिक अनुभव आणि त्या अनुभवांचे स्पष्टीकरण असते.
हे अनेकवेळा वाचल्यानंतर राज ठाकरे जसे हमालांवर मराठी बोलण्याची सक्ती करतात पण अंबानींबद्दल मौन बाळगतात तसे काहीसे वाटले.
दुसरी बाजू मांडण्यासाठी श्रद्धेची ही काही उच्चभ्रू उदाहरणे.
१. अमेरिकन डॉलरवरील "इन गॉड वी ट्रस्ट"
२. आपली कोर्टातील गीतेवरची शपथ
३. नाताळच्या सुट्टीत अमेरिकन फिजिकल सोसायटीपासून क्यालटेकपर्यंत सर्व संस्था बंद असतात.
४. झेंडा म्हणजे काय? रंगीबेरंगी एक कापडाचा तुकडा. मग त्याला राष्ट्राध्यक्षांपासून सगळे जण वंदन का करतात?
५. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि दगडू माळी ही सर्व माणसेच आहेत. मग त्यांना देण्यात येणार्या वागणूकीत इतका फरक का?
६. राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सर्व मंत्री शपथ घेतात. शपथ म्हणजे काय?
सर्वसामान्य माणसे रोजचे आयुष्य जगण्यासाठीच युद्ध करत असतात. भ्रष्टाचार, गुन्हेगारी, सोई-सुविधांच्या नावाने बोंब
या सगळ्याशी संघर्ष करत असताना एखाद्याला श्रद्धेमुळे मानसिक आधार मिळत असेल तर त्यात काय वाईट?
सर्वांकडून बर्ट्रांड रसेलच्या तर्कनिष्टतेची अपेक्षा करणे कितपत बरोबर आहे?
Comments
विवेकवाद्यांचा अपमान वगैरे
याचे स्पष्टीकरण असे की, त्या नाण्यासंदर्भात जे काही घडले त्याची संपूर्ण जबाबदारी साने गुरुजींची नसून त्यांच्या कुटुंबियांची होती*. त्यामुळे त्यांच्या आईवडिलांच्या त्यावेळच्या तथाकथित इर्रॅशनल वागण्याची जबाबदारी साने गुरुजींवर टाकून, त्यांनी सुरु केलेल्या साधना मासिकाचे काम दाभोळकरांनी करणे यात आपणाला विरोधाभास दिसतो. हा विवेकवाद्यांच्या बुद्धीचा अपमान आहे. विवेकवाद्यांनी त्या (किंवा तत्सम) प्रसंगासंदर्भात गुरुजींची भूमिका समजावून घेतली व विवेकी विचार दाखवले.
साने गुरुजी विवेकवाद्यांच्या काय कामाचे असे वाक्य विवेकवाद्यांच्या बुद्धीचा कोतेपणा दाखवण्याचा प्रयत्न करते व त्याअर्थाने ते निंदाव्यंजक आहे.
*थोडेसे अवांतरः
[त्याच अर्थाने शहाजी निजामाच्या व इतर शाह्यांच्या पदरी सरदार म्हणून काम करत होता म्हणून शिवाजीनेही तसेच करणे आपणाला अपेक्षित होते काय? बघा शहाजी असा वागला पण तरीही गंमत म्हणजे शिवाजी तुम्हाला चालतो असा युक्तीवाद करायचा?]
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
कौतुक
कृती कुटुंबियांची असली तरी प्रौढ झाल्यावर लिहिलेल्या पुस्तकात तिच्याविषयी नावड दाखविली नसल्यामुळे 'साने गुरुजींचेही तेच मत आहे' असा माझा निष्कर्ष आहे.
कोतेपणा हा समन्वयाच्या विरुद्धार्थी शब्द आहे ना?
कोतेपणा व समन्वय हे शब्द संबंधित नाहीत
कोतेपणा = खुजेपणा
समन्वय ह्या शब्दाच्या अर्थाचा कोतेपणाशी संबंध नाही.
श्यामची आई हे पुस्तक मला रिपोर्ताज प्रकारचे वाटते. (त्यात रिपोर्ताज प्रकारचा कोरडेपणा नसला तरीही.) पुस्तकात गुरुजींनी कोणताही स्पेसिफिक स्टँड घेतला आहे असे वाटत नाही. त्यामुळे प्रत्येकास हवा तो निष्कर्ष काढण्याची मुभा आहे.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
मऊ लगते म्हणून खणणे
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
कांही जणांचा असा समज असतो की हे अंनिसवाले हिंदुधर्म, हिंदू देवदेवता,रूढी, संस्कृती यांवर वेडी वाकडी काहीही टीका करतात.बिच्चारे हिंदू गप्प बसून हे सगळे सहन करतात.अंनिसने अशी टीका अन्य धर्मांवर केली तर त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील.हिंदूंच्या बाबतीत मऊ लागते म्हणून खणतात.
*" विवेकजागरणाचा वाद संवाद"असे एक अभियान(चळवळ) अंनिसने चालविले होते.प्रमुख वक्ते होते डॉ.श्रीराम लागू आणि डॉ. नरेन्द्र दाभोळकर.एका कार्यक्रमाला डॉ.लागू आले. ते गाडीतून उतरल्यावर पंधरा वीस जणांचे टोळके त्यांच्या अंगावर धाऊन गेले. धक्काबुक्की केली. अंनिस कार्यकर्त्यांनी डॉ.लागूंभोवती कडे केले पुढचा प्रसंग टळला.
* विहिंप,बजरंगदल,पतितपावन,भाजप, शिवसेना असे हिदुत्ववादी अंनिसच्या सभेत खुर्च्या फ़ेकणे, गोंधळ घालणे असे प्रकार करीत असतात.
*गाडगेबाबा सांगत "देवळात देव नसतो. तिथे असते दगडी मूर्ती.देव माणसात असतो" दॉ.दाभोळकरांनी हे एका सभेत सांगितले..दुसर्या दिवशी स्थानिक वृत्तपत्रात आले:"कोट्यवधी भक्तांचे आराध्य दैवत विठोबा हा दगड आहे असे डॉ.दाभोळकर म्हणतात. दाभोळकरा, तू दगड, तुझा बाप दगड, तुझे खानदान दगड. तुला पैजारांनी हाणले पाहिजे." शिवसैनिकांचे फोन आले:"सेनाप्रमुखांचा आदेश आला नाही. आल्यावर ठोकून काढू"
* नाणीजच्या नरेंद्र महाराजांनी भक्तांना आदेश दिला" धर्मद्रोही डॉ.दाभोळकर आणि एन्.डी. पाटील यांचे हातपाय तोडून टाका."
*सनातन संस्थेने केवळ द्वेषापोटी डॉ.नरेंद्र दाभोळकरांवर वेगवेगळ्या ठिकाणी चौदा खटले भरले आहेत.डॉ.दाभोळकर लिहितात."अशा खटल्यांमुळे वेळ आणि ऊर्जा वाया जातात.पण कृतिशील समाजप्रबोधन करायचे म्हणजे हे अटळ आहे. याला सामोरे जावेच लागते."
तर अशी ही मऊ मऊ जमीन!