वि.स. खांडेकर व अंधश्रद्धा
वि.स.खांडेकर व अंधश्रद्धा
विष्णू सखाराम काही त्यांचे जन्मजात नाव नव्हे. गणेश आत्माराम खांडेकर वयाच्या अठराव्या वर्षी आपल्या चुलत चुलत्याना,सखारामपंतांना, दत्तक गेले. दत्तकाचा निर्णय खांडेकरांना न विचारता परस्पर घेतला गेला. वडील गेलेले, सखारामपंत सधन, त्यामुळे आईला व भावाला थोडाफार आधार देता येईल, आपले फर्गुसनमधील पुढील शिक्षण निर्वेध पार पडेल म्हणून खांडेकर तयार झाले.
अंधश्रद्धेचा तडाखा खांडेकरांना कसा बसला त्याची ही कहाणी. सखारामपंतांना पहिली चवदा मुले. त्यातील तेरा मुले वारली व एक मुलगी बालविधवा म्हणून कायमची माहेरी परतलेली.स्वत: सखारामपंत अंथरुणाला खिळलेले व औषधोपचाराचा काही उपयोग नाही अशी अवस्था. वात्सल्याला वाट करून द्यावी म्हणून त्यांनी दत्तक घेतला नाही.८०-९० र्षांपूर्वीची कोकणातील, खेडेगावातील गोष्ट. गावातल्या पुजार्याच्या अंगात येत असे व त्याने सखारामपंतांना सांगितले की "तुमचा आजार काही साधा नाही. तुमचा एक पुर्वज समंध होऊन तुमच्यामागे लागला आहे. त्याने तुमची मुले गिळली व उरलेल्या मुलीला विधवा केले. आता तो तुम्हालाही खलास करणार व वाचावयाचा एकच उपाय आहे; त्याला दुसरा एक बळी द्यावयास पाहिजे." म्हणून हे दत्तकविधान !
सखारामपंतांना विष्णूबद्दल सोडाच पण स्वत:च्या बायकोबद्दल व मुलीबद्दलही काही आस्था नव्हती. सधन असूनही ते घरातील कोणाकरताही वा कोणत्याही सुविधेकरिता पैसे खर्च करत नसत. बायकोचे बाळंतपण जवळ आले की चक्क गावाला निघून जात ! घरात गडीमाणुसही नसे. बायको-मुलीने सर्व घरगाडा ओढावा. वडील शिक्षणाकरिता सोडाच पण कोणत्याही गरजेला पैसे देणार नाहीत, हे लक्षात आल्यावर खांडेकरांनी शिरोड्याला शिक्षकाची नोकरी स्विकारली. व त्यांची दत्तक बहीण त्यांची काळजी घ्यावयाला तेथे येऊन राहिली.
शरद
Comments
कुणीही
कुणाच्याही आयुष्यात अंधश्रद्धेचा संबंध कशा ना कशा प्रकारे येतोच.
प्रकाश घाटपांडे
काही तरीच काय?
अहो पण मग त्या
विवेकवादी विज्ञानवाद्यांचे काय?
ते पण?
असो, त्याच्या आयुष्यात नकारात्मकपणे येत असेल असे मानू या! ;)))
आपला
गुंडोपंत
लहानपणी
हे विवेकवादी अनुभवाने,अभ्यासाने विज्ञानवादी (आणि विवेकवादी सुद्धा) बनले असावेत. जन्मताच " हा विज्ञानेश्वर " असा कुणी शिक्का मारणार नाही.
>> त्याच्या आयुष्यात नकारात्मकपणे येत असेल
किंवा सकारात्मकपणे पण कमी ज्ञान असतानासुद्धा येत असेल.
---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी
यातच
प्रकाश घाटपांडे यांनी म्हटल्या प्रमाणे कुणाच्याही आयुष्यात अंधश्रद्धेचा संबंध येनकेनप्रकारे येतोच. पण शेवटी या प्रकाराला आपण अंधश्रद्धा म्हटले यातच आपला जागरुकपणाही दिसून येतो. जोपर्यंत आजूबाजूला विचारांची झापडे बंद करुन वावरणारी माणसे आहेत तोपर्यंत असा संबंध येणारच.
तुमचा एक पूर्वज भूत होऊन मागे लागला आहे अशी बात गावातील पूजाऱ्याने सखारामपंतांना ठोकून दिली आणि अजून एक बळी द्यावयाचा उपाय म्हणून दत्तकविधानाचा उपाय सांगितला. पूजाऱ्याचे म्हणणे म्हणजे निव्वळ थापाडेपणा कसा होता हे वि.स. खांडेकरांच्या नंतरच्या सर्वसाधारणपणे समाधानी आयुष्यावरून स्पष्ट होते.
खांडेकरांची दूसरा एक बळी म्हणून निवड केल्यावर सखारामपंतांना पून्हा एखादे जगणारे मूलबाळ होईल अशी शक्यता यात दिसत नव्हती. आणि ज्याची बळी म्हणून निवड केली तोच जगल्याने पून्हा पूढचा उपायच खुंटला असावा.
पैसा असूनही बायकोचे बाळंतपण जवळ आल्यावर चक्क गावी निघून जाणाऱ्या माणसाची चौदा अपत्य एकामागून एक गमावली यात त्या माऊलीची बाळंतपणात होत असणारी आबाळच कारणीभूत असली पाहीजे.
भूत ही थाप नसेल
पुजार्याने खरेच सांगितले असेल. भूत ही थाप नसेल. :-) झाले असे असेल की सखारामपंतांचा दुष्टपणा आणि कावेबाजपणा पाहून भूतालाच शरम वाटली असेल आणि ते बिचारे संन्यास घेऊन :० निघून गेले असेल ;-) आणि खांडेकरांना सर्वसाधारण जीवन जगता आले असेल. असा माझा आपला कयास हं! 'आता भूतांवर कोट्यावधी लोकांचा विश्वास असतो त्याविषयी असे बोलू नका ' असे भूत कोणात न संचारेल अशी आशा बाळगते. ;-)
बापरे
बापरे मोठेच कष्टदायक दिवस पाहिले असावेत खांडेकरांनी.
>>व त्यांची दत्तक बहीण त्यांची काळजी घ्यावयाला तेथे येऊन राहिली.
शरदराव तुम्हाला सावत्र बहिण असे म्हणायचे आहे काय ?
सावत्र नाही.
बहिणीला सावत्र म्हणता येणार नाही कारण सावत्र म्हणजे माता-पित्यापैकी एक जन्मदाता/दाती तो/तिच असतो पण दुसरा जन्मदाता/दाती वेगळी असते. इथे मात्र तसा प्रकार नाही.
खांडेकरांना दत्तक घेतल्याने खांडेकर दत्तक भाऊ ठरतात असे वाटते परंतु बहिणीला दत्तक न घेतल्याने तिला दत्तक बहिण म्हणणे योग्य वाटत नाही असे वाटते. मानलेली बहिण वगैरे असे म्हणता येईल. किंवा अशा नात्याला काही योग्य संबोधन आहे का याची विशेष माहिती नाही. तज्ज्ञांनी खुलासा करावा.
दत्तक बहिण
सखारामपंत हे वि.सं.चे दत्तक वडील (दत्तक विधानाने मिळालेले). तेव्हा त्यांची मुलगी ही दत्तक बहिणच म्हणावयास पाहिजे.
शरद