गोत्र आणि विवाह संबंध

नसते वाद विवाद उकरून काढण्यात भारतातील मंडळी जशी वाकबगार आहेत तशी बहुदा दुसर्‍या कोणत्याही देशातील नसतील. खाप पंचायत ह्या उत्तर भारतातल्या एका जुन्या समाज व्यवस्थेने आता सगोत्र विवाहाचा वाद असाच उपस्थित केला आहे. ही खाप पंचायत तशी अनेक वर्षे अस्तित्वात आहे आणि किरकोळ तंटे मिटवण्यासाठी उपयुक्त असल्याने ब्रिटिश व नंतर स्वातंत्र्य मिळाल्यावर भारत सरकारने तशीच चालू ठेवली आहे. दोन हजार किंवा तत्सम कालापूर्वी प्रेषित म्हणून मानल्या गेलेल्या कोणा एका व्यक्तीने सांगितलेले नियम एकविसाव्या शतकातही आम्ही शिरोधार्य मानणार हे म्हणणे जसे सयुक्तिक आहे असे वाटत नाही त्याच प्रमाणे हजार वर्षापूर्वी कोण्या ऋषी मुनीने सांगितलेले सिद्धांत आजही ग्राह्य मानून त्याप्रमाणेच आम्ही वर्तन करणार हे म्हणणेही फारसे तर्कशास्त्रदृष्ट्या सुसंगत व सयुक्तिक आहे असे म्हणता येणार नाही.

ही गोत्र पद्धती आहे तरी काय? भारतात रहाणार्‍या ब्राम्हण, क्षत्रिय व वैश्य समाजातील लोकांचे या गोत्रात म्हणजे काही गटात वर्गीकरण करण्यात आलेले आहे. उदाहरणार्थ ब्राम्हण समाजातील लोकांचे, अंगिरस, अत्रि, कश्यप, भृगु, वशिष्ठ या सारख्या नऊ दहा गटात वर्गीकरण करण्यात आलेले आहे. या गटांना काही ऋषिंची नावे दिली गेली आहेत. असे मानले जाते की हे ऋषि या गोत्राचे मूळ पुरुष होते.या शिवाय प्रवर, शाखा वगैरे आणखी वर्गीकरणे आहेतच. ही गोत्र व्यवस्था पूर्णपणे पितृसत्ताक असल्यामुळे लग्न होईपपर्यंत बापाचेच गोत्र मुलीचे असते व लग्न झाल्यावर ते नवर्‍याच्या गोत्राप्रमाणे बदलते. गोत्र म्हणजे कुल नव्हे. एकच कुल देवता असलेली कुटुंबे एका कुलातली मानली जातात. त्यांच्यातील परस्पर विवाह संबंध निषिद्ध मानले जात नाहीत. मात्र सगोत्र (म्हणजे ज्या ठिकाणी वर आणि वधु हे एकाच गोत्राचे असतात) विवाह संबंध निषिद्ध मानले जातात.

आता असल्या जुनाट व खुळचट रुढी व समजुतींचे कोणाला पालन करावेसे वाटत असले तर त्यांनी करावे. इतर लोकांना त्यात पडण्याची काही जरूरी व गरज आहे असे मला तरी वाटत नाही. परंतु ही गोत्र व्यवस्था अतिशय शास्त्र शुद्ध असून आधुनिक जनुक शास्त्रातील तत्वांना धरून असल्यामुळे या गोत्र व्यवस्थेचे कायद्यात रुपांतर करावे अशी मागणी आता ही खाप पंचायत करू लागली आहे. ही गोत्र व्यवस्था Genealogy किंवा Genetic studies मधली निरिक्षणे व अनुमाने यांना धरून आहे का नाही? हेच पडताळून बघण्याचा या लेखाचा उद्देश आहे. गोत्र व्यवस्था ही जनुक शास्त्रातील तत्वांना धरून आहे का? हे शास्त्रीय पद्धतीने शोधून काढावयाचे असले तर त्यासाठी शास्त्रीय बैठक असलेली शोधपद्धती आवश्यक आहे व तीच अनुसरली पाहिजे.
मानवी शरीर हे पेशींपासून बनलेले असते हे सर्वज्ञात आहे. या पेशीमधले दोन घटक या अभ्यासासाठी उपयुक्त ठरतात. प्रत्येक पेशीमधे एक केंद्रबिंदू असतो. या केंद्रबिंदूत 23 रंगद्रव्यांच्या (Chromosomes) जोड्या असतात. प्रत्येक रंगद्रव्यात, डी.एन.ए.(D.N.A) या द्रव्याची सर्पिल आकाराची एक लांबलचक साखळी असते. एका रंगद्रव्यांच्या जोडीत एक रंगद्रव्य पित्याकडून आलेले व एक मातेकडून आलेले असते. प्रत्येक रंगद्रव्याच्या साखळीत ऍडिनिन (ए), गुवानिन (जी), सायटोसिन (सी), थायमिन (टी) ही प्रमुख व महत्वपूर्ण रसायने असतात. ही सर्व रसायने वेगवेगळ्या अनुक्रमाने साखळीमधे गुंफलेली असतात. उदाहरणार्थ, सीजीएटी... सीएजीटीटीसीए... जीटीसीएएजीटी वगैरे. अशा अनुक्रमांच्या पद्धतीने या रसायनांच्या अनेक साखळ्या असतात. त्या काही वेळा मूळस्वरूपी पूर्ण शृंखला रूपात किंवा लघुस्वरूपी पुनरावृत्तीय शृंखला या स्वरूपात असतात.
रंगद्रव्याची शेवटची म्हणजे 23वी जोडी त्या शरीराचे लिंग ठरवते. स्त्रीच्या शरीरात या 23व्या जोडीत दोन्ही समान रंगद्रव्ये असतात व त्यांना एक्स(X) रंगद्रव्य म्हणतात. पुरुषाच्या शरीरात, या जोडीतील एक रंगद्रव्य एक्स प्रकारचे व दुसरे त्याहून भिन्न म्हणजे वाय(Y) प्रकारचे असते. बापाकडून आपल्या पुरुष वारसाला मिळालेला हा वाय क्रोमोसोम, हुबेहुब त्याच्या स्वत:च्या वाय क्रोमोसोमसारखा असतो. म्हणजेच आजोबा, बाप, मुलगा, काका, चुलत भाऊ या सगळ्यांच्या शरीरातील पेशीत बरोबर हुबेहुब असा तोच वाय क्रोमोसोम असतो. यालाच पुरुष वारसासाखळी (Male Lineage) म्हटले जाते.

शरीरातील प्रत्येक पेशीमधे केंद्रबिंदूच्या बाहेर जी द्रव्ये असतात त्यात काही घन पदार्थही असतात. त्यांना मायटोकॉन्ड्रिया (Mitochondria) असे म्हणतात. या मायटोकॉन्ड्रिया मधे सुद्धा डी.एन.ए.च्या साखळ्या असतात. आईकडून आपल्या मुलांना हा मायटोकॉन्ड्रियल डी.एन.ए. मिळतो व तो हुबेहुब आईच्या स्वत:च्या मायटोकॉन्ड्रियल डी.एन.ए. सारखाच असतो. या आईच्या फक्त मुलीच हा मायटोकॉंड्रिअल डी. एन.ए., आपल्या मुलांच्याकडे जसा का तसा पुढे पाठवू शकतात. म्हणजेच आजी, आई, मुलगी, मावशी, मावसबहिणी या सर्वांत हा मायटोकॉन्ड्रियल डी.एन.ए,. हुबेहुब सारखाच असतो. यालाच स्त्री वारसासाखळी (Female Lineage) असे म्हटले जाते. थोडक्यात सांगायचे तर वाय रंगद्रव्य, पुरुष वारसासाखळी ठरवण्यास व मायटोकॉन्ड्रियल डी.एन.ए. स्त्री वारसासाखळी ठरवण्यास अत्यंत महत्वाचे ठरतात. मायटो कॉंन्ड्रिअल डी.एन.ए. मधे रसायनांचे अनुक्रम कमी असल्याने त्यांचा अभ्यास करणे वाय क्रोमोसोम मधील डी.एन. ए पेक्षा सोपे जाते व त्यामुळे याचा जास्त सखोल अभ्यास झाला आहे. परंतु दोन्ही वारसा साखळीत तसा मूलभूत फरक काहीही नाही.

अनेक पिढ्यांच्या या वारसा साखळीचा अभ्यास संगणकाच्या सहाय्याने केल्यावर शास्त्रज्ञांना एक अतिशय अजब गोष्ट आढळून आली. आधुनिक मानवाचा इतिहास सुमारे 150000 वर्षांपूर्वी आफ्रिकेत वास्तव्य असणार्‍या एका मानवी गटापासून सुरू झाला आहे. या मानवी गटात हजारावर तरी स्त्रिया असाव्यात असा अंदाज करता येतो. असे असले तरी आज पृथ्वीवर असलेली प्रत्येक स्त्री या हजार स्त्रियांपैकी फक्त एकाच स्त्रीची वंशज आहे. म्हणजे या मूळ गटातील इतर सर्व स्त्री वंशजांना कोणत्या ना कोणत्या पिढीत फक्त पुरुष वंशजच उरले व त्यामुळे त्यांच्या वारसा साखळ्या नष्ट (Extinct) झाल्या.या स्त्रीला आधुनिक मानवी ईव्ह असे म्हणले जाते. कोणत्याही एका मोठा गटातील स्त्रियांच्या वारसा साखळ्या या पद्धतीने अभ्यासल्या तर असेच आढळून येते की फक्त एक आणि एकच वारसा साखळी चालू रहाते व बाकी सर्व वारसा साखळ्या, मुलगे झाल्याने नष्ट होतात.

बरोबर याच पद्धतीने 60000 वर्षांपूर्वी जिवंत असलेल्या फक्त एका पुरुषाचे, आज पृथ्वीवर हयात असलेले सर्व पुरुष हे वंशज आहेत. म्हणजेच त्या पुरुषाच्या कालात त्याच्या बरोबर जे इतर पुरुष होते त्या सर्वांच्या वंशजांना कोणत्या ना कोणत्या पिढीत फक्त मुलीच झाल्या व त्यांची पुरुष वारसा साखळी नष्ट (Extinct)झाली. या पुरुषाला आधुनिक ऍडम असे म्हणले जाते. आता आधुनिक ईव्ह व आधुनिक ऍडम यांच्यात ऐंशी नव्वद हजार वर्षांचे अंतर आहे ही मोठी गंमतीची गोष्ट आहे इतकेच. बाकी त्याला तसे महत्व फारसे नाही.
या सगळ्या पृथ:करणाचा गोत्र व्यवस्थेशी कसा संबंध जोडता येतो ते पाहू. भारतातील मानवी वास्तव्य सुमारे 74000 वर्षांपूर्वी संपूर्णपणे नष्ट झाले होते. ( टोबा ज्वालामुखी) या नंतर फक्त 10,000 वर्षांपूर्वी आधुनिक मानव परत भारतीय उपखंडात आले. आर्य संस्कृती तर इ.स.पूर्व 1500 नंतरच भारतात आली. त्यामुळे इ.स.पूर्व 1000 हा कालखंड आपल्याला या गोत्र व्यवस्थेसाठी अगदी पूर्वीचा म्हणून मानता येईल. आता असे धरून चालले की या कालखंडातील या नऊ किंवा दहा ऋषिपासून भारतातील सध्याची उत्तर भारतीय ब्राम्हण पुरुष लोकसंख्या निर्माण झाली आहे. परंतु 3000 वर्षात फक्त 75 च्या आसपास पिढ्या होतात. एवढ्या कमी कालखंडात फक्त नऊ किंवा दहा पुरुषांकडून उत्तर भारतातील सध्याचा व एवढ्या मोठ्या संख्येचा पुरुष ब्राम्हण समाज निर्माण होणे ही अशक्यच बाब आहे. म्हणजेच सगोत्र पद्धतीला शास्त्रीय बैठक आहे असे म्हणणे जरा धाडसाचेच ठरावे.

तरीही क्षणभर आपण असे मानू की इ.स.पूर्व 1000 मधे अस्तित्वात असलेले हे नऊ किंवा दहा ऋषिच सर्व उत्तर भारतीय ब्राम्हण समाजाचे पूर्वज आहेत. परंतु हे नऊ किंवा दहा ऋषी काही आकाशातून पडलेले नाहीत. ते ही कोणाचे तरी वंशजच आहेत. व त्या सर्वांचा मूळ पुरुष वर निर्देश केलेल्या तत्वाप्रमाणे एकच असला पाहिजे. एकच पूर्वज असलेले हे ऋषी मग निरनिराळ्या गोत्रांचे कसे असणार? ते तर सर्व एकमेकांचे भाऊबंदच असणार. त्यामुळेच गोत्र व्यवस्थेच्या संकल्पनेला शास्त्रीय आधार किंवा बैठक आहे असे मी तरी म्हणणार नाही.
खाप पंचायतीची मागणी शास्त्रीय बैठकीवरून केलेली नसून राजकीय आहे हे यावरून उघड होते. त्याला राजकीय डावपेच समजून तसेच उत्तर दिले पाहिजे. बाकी फारसा अर्थ त्या मागणीकडे देण्यात अर्थ आहे असे मला तरी वाटत नाही.

लेखनविषय: दुवे:

Comments

सहमत

खाप पंचायतीची मागणी शास्त्रीय बैठकीवरून केलेली नसून राजकीय आहे हे यावरून उघड होते. त्याला राजकीय डावपेच समजून तसेच उत्तर दिले पाहिजे. बाकी फारसा अर्थ त्या मागणीकडे देण्यात अर्थ आहे असे मला तरी वाटत नाही.

प्राथमिक वंशनात्यांमध्ये (पिता-पुत्री, माता-पुत्र आणि सहोदर बंधु-भगिनी) विवाहसंबंध नको असा कायदा असला म्हणजे पुरे.
गोत्रनामातून कदाचित फार पूर्वीचा पैतृक संबंध कळत असेल. तरी त्याहून कितीतरी निकटचे मामा-मामेभावंडे वगैरे वेगळ्या गोत्राची असतात. त्यांचे विवाह चालतात. हे योग्य नव्हे.

- - -
"गोत्र" म्हणजे "गायींचा कळप", "कळप पाळायचे क्षेत्र" असेसुद्धा आहे. (स्रोत अमरकोषाची रामाश्रमी टीका.) पुत्रांमध्ये गायी वाटून न घेता सर्व गायी पिढ्यान् पिढ्या एकाच कळपात किंवा क्षेत्रात ठेवण्याची पद्धत असावी. विवाहसंबंधामधून पूर्वीच्या काळात गायींची [किंवा दीर्घकालिक मालमत्तेची] देवाणघेवाण होत असावी, गायी एका कळपातून दुसर्‍या कळपात नेत असावेत. त्या काळात "एका गाय-कळपातल्या" सगोत्रविवाह-प्रतिबंधाला काही आर्थिक-सामाजिक पाया असावा.

आजकाल असा सामायिक कळप (किंवा सामायिक पैतृक मालमत्ता) दिसत नाही, आणि सामायिक मालमत्तेमधून विभागणी करायचा विचारच अनाठायी होतो. जरी पूर्वी कधी या रूढीला आर्थिक पाया असेल, तरी आज तो नाही, म्हणून ही कालबाह्य रूढी त्यागल्यास* काहीच हरकत नाही.

(*"त्यागावी" म्हणजे काय? याचा अर्थ "सगोत्रच विवाह करावेत" असा आचरट अर्थ काही लोक आरोपित करू शकतील. तसे नव्हे. ज्या व्यक्तीला परगोत्रात विवाह करायचा असेल - असेच बहुसंख्य असणार - त्यांचे स्वातंत्र्य पूर्वीसारखेच अबाधित राहील. ज्यांना सगोत्र विवाह करायचे असतील आणि ज्यांचे प्राथमिक नाते नाही, त्यांनाही कोणती खाप पंचायत रोखू शकणार नाही, इतकाच माझा अभिप्राय आहे.)

प्राथमिक वंशनात्यांमध्ये विवाहसंबंध

विशेष विवाह कायदा १९५४ नुसार कोणत्या वंशनात्यांमधील विवाहसंबंध प्रतिबंधित आहेत याची यादी येथे पाहावयास मिळेल. हिंदू विवाह कायद्यानुसार या यादीतील काही विवाहसंबंधांना परवानगी असावी. (उदा. महाराष्ट्रात होणारे मामेभाऊ-आतेबहीण वगैरे स्वरुपाचे विवाह)


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सहमत +

खाप पंचायतीची मागणी शास्त्रीय बैठकीवरून केलेली नसून राजकीय आहे हे यावरून उघड होते. त्याला राजकीय डावपेच समजून तसेच उत्तर दिले पाहिजे. बाकी फारसा अर्थ त्या मागणीकडे देण्यात अर्थ आहे असे मला तरी वाटत नाही.

खाप पंचायत आणि त्यांची ही अथवा इतर अजून काही मागणी, ही फारशी कोणी गांभिर्याने घेत असेल असे वाटत नाही. व्यक्तिगत मी काही चर्चांपूर्वी खाप पंचायत हा प्रकार देखील ऐकलेला नव्हता.

आता प्रश्न गोत्रांचा आणि लग्नांचा. किती लोकं केवळ गोत्रावर आधारीत लग्न करतात अथवा गोत्र जुळले नाही म्हणून लग्न करत नाहीत हा एक संशोधनाचा विषय होऊ शकतो. मी काही येथे गोत्र बघण्याच्या अथवा बघणार्‍यांच्या बाजूने बोलत नाही, तसा उद्देशही नाही . कारण "आमच्यात" तशी पत्रिका बघण्याची पद्धत नाही ;)

मला वाटते जेंव्हा लग्न ठरवून होते (ऍरेंज मॅरेज) तेंव्हा कुंडली हे एक कारण म्हणून वापरणारे अधिक असतील. म्हणजे असे की जर (विशेष करून) मुलगी आवडली नाही तर पत्रिका जुळत नाही म्हणून मोकळे. अर्थात रिलिजियसली पत्रिका बघणारे पण अनेक असतील. तरी देखील त्यांच्या घरात मुलाने पत्रिका न बघता लग्न करायचे ठरवले तर, बदलेल्या काळात, भारतातील काही भाग सोडल्यास एकूण विरोधाचे प्रमाण हे कमी असेल असे वाटते. अर्थात खाप वगैरे त्याला अपवाद असतील. पण त्यांचे चालवून दिले ही स्वतंत्र भारतातील चूकच आहे असे म्हणेन कारण कायदा हा केवळ भारताचा आहे. इतर गोमे-सोमे कायदा सांगायला लागले तर चालणार नाही. तरी देखील, संपूर्ण भारताचा विचार केल्यास कदाचीत पत्रिकेपेक्षा हुंडा हा अजून देखील गंभीर प्रश्न आहे असे वाटते.

आता गोत्र काय असावे ह्याचे माझ्या दृष्टीने लॉजिक, "स्कूल ऑफ थॉट" सारखे आहे. अथवा त्या काळात तसे असावे असे वाटते. म्हणजे उ.दा. (काल्पनिक प्रकार): कश्यप स्कूल ऑफ थॉट वाल्यांचे म्हणून एक वागणे, गार्ग्य स्कूल ऑफ थॉट वाल्यांचे म्हणून एक वागणे... मग त्या दोन भिन्न विचारांमधील फरकाचा त्यातील दोन व्यक्तींना त्या काळातील पद्धतीने संसार थाटताना होणारा त्रास होऊ नये म्हणून सोपा उपाय काय तर जे गोत्र आपल्या गोत्राशी (स्कूल ऑफ थॉट्स शी) मिळते जुळते त्यात लग्न करावे. मग अत्री स्कूल ऑफ थॉट सगळ्यात लिबरल :-), म्हणून त्यांच्याशी कुणालाच काही प्रॉब्लेम नाही... मग म्हणायचे, "अत्री गोत्री सर्वांशी मैत्री". थोडक्यात याचा अर्थ त्यातील प्रत्येक व्यक्ती ही काही काश्यप अथवा गार्ग्य मुनींची आहे असा नाही. असा अर्थ जर घेतला तर किती पिढ्या किती गोत्रात झाल्या वगैरेची अवघड गणिते बदलू शकतात इतकेच म्हणायचे होते.

परंतु हे नऊ किंवा दहा ऋषी काही आकाशातून पडलेले नाहीत. ते ही कोणाचे तरी वंशजच आहेत.

अहो म्हणूनच तर ॠषीचे कूळ आणि नदीचे मूळ विचारू नये असे म्हणतात ना! ;)

भारतातील मानवी वास्तव्य सुमारे 74000 वर्षांपूर्वी संपूर्णपणे नष्ट झाले होते. ( टोबा ज्वालामुखी) या नंतर फक्त 10,000 वर्षांपूर्वी आधुनिक मानव परत भारतीय उपखंडात आले.

हे वाक्य धार्ष्ट्याचे आहे. भारतातील जीवन तेंव्हा संपूर्णपणे नष्ट झाले नव्हते हे दाखवणारे ऑक्सफर्ड विद्यापिठाचे सात वर्षाच्या (सहा वर्षाच्या थंडीपेक्षा जास्त :) ) संशोधनाचे निष्कर्ष बघता येतील. तसेच हा दुवा पण वाचण्यासारखा आहे...

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

गणित ?

>> परंतु 3000 वर्षात फक्त 75 च्या आसपास पिढ्या होतात. एवढ्या कमी कालखंडात फक्त नऊ किंवा दहा पुरुषांकडून उत्तर भारतातील
सध्याचा व एवढ्या मोठ्या संख्येचा पुरुष ब्राम्हण समाज निर्माण होणे ही अशक्यच बाब आहे. म्हणजेच सगोत्र पद्धतीला शास्त्रीय बैठक आहे असे म्हणणे जरा धाडसाचेच ठरावे

कसा काय बुआ ?

-धनंजय कुलकर्णी

संख्या- वंश

१. प्रत्येक पुरुषाला १.३ मुलगे झाले तर ७५ पिढ्यांमध्ये ३५ कोटी पुरूष एका पुरुषापासून होतील.
२. सध्याचा वंशज खरेच त्या ऋषीचा असतो की मधल्या काळात (सोयीच्या वंशावळी बनवून) केव्हातरी तो संबंध निर्माण केलेला असतो ? (अनेक राजे महाराजांचा सूर्याचे वंशज म्हणून संबंध जोडलेला असतो तसा. किंवा शिवाजीचा शिसोद्यांशी जोडला तसा).

नितिन थत्ते
(आय ओवरकम "१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)

गणित?

या वाक्याचा जास्त खुलासा करणे जरूरीचे आहे. मी काढलेला उत्तर भारतातील ब्राम्हण पुरुष समाजाच्या संख्येचा अंदाज असा आहे. भारताची एकूण लोक संख्या 120 कोटी. उत्तरेकडच्या राज्यातील जनसंख्या अंदाजे 80 कोटी. त्यापैकी निम्मे पुरुष म्हणजे 40 कोटी. त्यापैकी 5% ब्राम्हण समाजाचे असावेत असे धरून ब्राम्हण पुरुष 2 कोटी. गणिती व संख्याशास्त्रीय शक्यतेप्रमाणे 9 पुरुष 75 पिढ्यांमधे एवढे वंशज नक्कीच निर्माण करू शकतात. परंतु तसे नसण्याची शक्यता मला अधिक वाटते. याची दोन कारणे आहेत.
1. मागच्या 3000 वर्षातील व्यक्तींची आणि विशेषत: स्त्रियांची, आयुष्य मर्यादा, बाल मृत्युंचे प्रमाण हे सर्व लक्षात घेतले तर एवढे वंशज निर्माण होणे कठिण वाटते.

2. या पेक्षा सर्वात महत्वाचे कारण म्हणजे 9 पुरुषांपासून सुरू झालेल्या वारसा साखळ्या, 75 पिढ्यांनंतर टिकून रहाण्य़ाची शक्यता (Extinction Principle) जवळ जवळ नाहीच. या पैकी एक किंवा फार तर दोन पुरुष वारसा साखळ्या टिकून राहिल्या असाव्यात. यामधेही आणखी काही कालानंतर फक्त एक आणि एकच वारसा साखळी टिकून राहील. ती कोणत्याही ऋषिची असू शकते. याचा अर्थ असा की अस्तित्वात असलेला सर्व ब्राम्हण समाज एक किंवा फार तर दोन ऋषिचे वंशज असणार आहेत. यामुळेच गोत्र पद्धतीला व सगोत्र विवाहाला विरोध या सगळ्या गोष्टींना काही शास्त्रीय बैठक आहे असे म्हणणे धाडसाचे आहे.
चन्द्रशेखर

शक्यता

>>1. मागच्या 3000 वर्षातील व्यक्तींची आणि विशेषत: स्त्रियांची, आयुष्य मर्यादा, बाल मृत्युंचे प्रमाण हे सर्व लक्षात घेतले तर एवढे वंशज निर्माण होणे कठिण वाटते.

तुम्हाला कठीण वाटते आहे, बर ! श्री. थत्ते यांच्या म्हणण्या प्रमाणे ७५ पिढीत ३५ कोटी पुरुष तयार होतील(१.३ आपत्य / पुरुष). आणि हेच जर २.५ घेतले तर आणखी जास्त.
कठीन जरी वाटत असलं तरी अशक्य तर मुळीच नाही. ५०% - ५०% शक्यता आहेत.

>>2. या पेक्षा सर्वात महत्वाचे कारण म्हणजे 9 पुरुषांपासून सुरू झालेल्या वारसा साखळ्या, 75 पिढ्यांनंतर टिकून रहाण्य़ाची शक्यता (Extinction Principle) जवळ जवळ नाहीच. या पैकी एक किंवा फार तर दोन पुरुष वारसा साखळ्या टिकून राहिल्या असाव्यात.

हे पण बरोबर वाटत नाही. असं झालच असेल असं काही नाही. शक्यता वाटते म्हणुन अस ग्राह्य धरने बरोबर वाटत नाही.

-धनंजय कुलकर्णी

गुणसुत्रे

Chromosomes ना पर्यायी मराठी शब्द हा गुणसुत्रे असा वापरला गेला आहे. Chromosomes ना रंगद्रव्य हा शब्द कसा वापरात आला या विषयी अधिक माहिती द्यावी.
प्रकाश घाटपांडे

क्रोमोसोम

क्रोमा या इंग्रजी शब्दाचा अर्थ रंग हाच आहे. या अर्थावरून रंगद्रव्य हा शब्द तयार केला गेला असावा असे वाटते. जास्त माहिती शोधण्याचा मी प्रयत्न करतो. हा शब्द मी एका जुन्या मराठी पुस्तकातून घेतला आहे. आपण म्हणता तसे गुणसूत्र हा शब्द मलाही जास्त योग्य वाटतो आहे. चन्द्रशेखर

पिग्मेंट

मी पिंग्मेंटला रंगद्रव्य असा शब्द वाचला आहे. उदा. मेलॅनिन हे रंगद्रव्य आहे.
प्रकाश घाटपांडे

रंगसूत्र

Chromosome = रंगसूत्र
Gene = गुणसूत्र
Pigment = रंगद्रव्य
क्रोमा म्हणजे Colour/रंग आणि सोमा म्हणजे Body/अवयव यावरुन क्रोमोसोम हा शब्द बनला हे बरोबर आहे.
पेशी अभ्यासाच्या सुरवातीच्या दिवसांत सुक्ष्मदर्शकातून पेशीकेंद्रक पाहिले गेले तेव्हा ईतर रंगहीन व पांढरट द्रव्याच्या पार्श्वभूमीवर क्रोमोसोमचे धागे रंगीत दिसायचे म्हणून क्रोमोसोम (रंगसूत्र) नाव.

शिपाईगडी

एक शंका

प्राथमिक नात्यांमधून उत्पत्ती झाल्यास त्यात जनुकीय दोष असण्याचा संभव असतो.
हे फक्त माणसांसाठीच खरे आहे का? प्राण्यांना लागू होत नाही का?

लेखाशी सहमत.

गोत्र फित्र बघुन लग्न करणार्‍यांचं हसुच येतं.

प्राथमिक नात्यांमधून उत्पत्ती झाल्यास त्यात जनुकीय दोष असण्याचा संभव असतो.

हे सिद्ध झाले आहे का? मला वाटतं, अनुवांशिक् रोग पुढे चालु राहु नयेत् म्हणुन प्राथमिक् नात्यांत् लग्न करु नये असे असावे.कारण् जर् आई आणि वडील् दोघानाही जर अनुवांशिक् रोगाचा इतिहास् असेल् तर् अशावेळेस् मुलाला तो रोग् होण्याची शक्यता खुपच् वाढते. जनुकीय् दोष् उद्धभवतो ह्या बद्दल काही शास्त्रीय स्पष्टीकरण असल्यास वाचायला आवडेल.

हसु ?

मग काय बघायला पहिजे ?
जरा सांगाल काय की लग्न करताना काय बघायला पाहिजे जेनेकरुन पुढची पिढी strong रहिल.
( * दिल विल च्या गोष्टी न केलेल्याच बर्‍या. )

-धनंजय कुलकर्णी

उत्तर

फक्त आपले गोत्र सोडुन इतर कुठल्याही गोत्रात लग्न केल्याने पुढची पिढी "strong" कशी राहते यावर् स्पष्टीकरण द्याल् का?

बघण्यासारख्या अनेक कॉमनसेन्सच्या गोष्टी आहेत,म्हणुन त्यावर लिहणे गरजेचे नाही.

-Nile

कॉमनसेन्स

रंग , आकार , आवाज , स्वभाव , वय , रोग हेच फक्त आपण कॉमनसेन्स म्हणून वापर करत असाल तर एक सांगू इच्छीतो की गोत्र पद्धतीत
हा कॉमनसेन्स वापरला जातोच. गोत्र पद्धतीत गोत्र पाहणे हा एक अधीक पॉइंट आहे.

तुमच्याकडे रंग , आकार , आवाज , स्वभाव , वय , रोग ह्यापेक्षा वेगळा पॉइंट असेल जो की गोत्र पद्धतीत नाही तर सांगीतलेत तर बरे होइल. मी तो
वापरू इच्छीतो. कृपया शिक्षण हा मुद्दा मांडू नका (तो सुद्धा गोत्र पद्धतीत सामील झाला आहे)

-धनंजय कुलकर्णी

गोत्र पद्धत् की अरेंज् मॅरेज्?

तुम्ही वर लिहलेले प्रकार् गोत्र पद्धतीत् आहेत् का याबद्दल् मला श्ंका आहे. ते प्रकार "अरेंज मॅरेज" पद्धतीत् आहेत्.

हा धागा "गोत्रांसंबंधी" आहे. तुम्ही वर लिहलेल्या गोष्टी पाहुन्, पण् गोत्राला काही किंमत् न देता अरेंज् मॅरेज पद्धत चालुन जाते. म्हणुन गोत्र पहाण्याला(लग्न जुळवण्याकरता, ह्या धाग्यापुरता) माझ्यामते काही अर्थ नाही, थोडक्यात, लेखकाशी सहमत असा प्रतिसाद् मी वर दिला.

-Nile

बरोबर.

बहुतेक लोकांना वाटत असेल की गोत्र पद्धतीत फक्त गोत्रचं पाहतात तर चुक आहे. बाकी कॉमनसेन्सच्या गोष्टी पण पाहिल्या जातात
(आधी कॉमनसेन्स कमी वापरत असावेत आताशी जास्त वापरत आहेत एवढचं).

>>पण् गोत्राला काही किंमत् न देता अरेंज् मॅरेज पद्धत चालुन जाते.
गोत्र पाहुन लग्न करणे हा अरेंज मॅरेजचंचाच पार्ट आहे. गोत्र पाहुन लव मॅरेज फारच कमी होत असावीत.

तर गोत्र न पाहता आजुन् कुठली पद्धती चांगल्या प्रकारे (कमी खर्चात ,कुणाचा विश्वास न मोडता , कमी वेळात आणि जास्त श्वास्वतीने (पूढील पिढीच्या सबळतेसाठी) ) अवलंबता येयील हे काही सांगता येयील का ?

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

विषय् काय् आहे?

बहुतेक लोकांना वाटत असेल की गोत्र पद्धतीत फक्त गोत्रचं पाहतात तर चुक आहे

विषय् गोत्र आहे साहेब, अरेंज् मॅरेज नव्हे. असो ह्या विषयांतराला माझ्याकडुन् विराम.

-Nile

इनब्रिडींग

प्राथमिक नात्यांमधून उत्पत्ती झाल्यास त्यात जनुकीय दोष असण्याचा संभव असतो.

या संदर्भात विकीचा हा दुवा बघा.

हे फक्त माणसांसाठीच खरे आहे का? प्राण्यांना लागू होत नाही का?

ह्या दुव्याप्रमाणे प्राणीच काय "स्वीट चेरीज्" सारख्या वनस्पती पण इनब्रिडींग टाळतात.

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

मला असे वाटते....

(पितृगोत्राशि व मातृगोत्राशी विवाह करू नये असे म्हणतात) आजच्या युगात - विभक्त कुटुंब पद्धतीत, गोत्र पद्धती सुरु रहावी व ती उपयुक्त असे मला वाटते. कारण, आज खुप जण करियर साठी स्थलांतर करतात, कित्तेकांची आडनावे सारखी असतात, स्थलांतरामुळे कित्तेकांना आपल्या चुलत,-चुलत,-चुलत,-चुलत,-चुलत लोकांची माहीती नसते. गोत्र पद्धती मुळे निदान चुलत, (भावकीत, भाऊ बंदकीत) भावा-बहीणींचे एकमेकांशी चुकुन विवाह तरी होणार नाहीत. आपण माणुस प्राणी आहोत, जनावरे नाहीत. (आपण कितीही इंग्रजी शिकलो असलोतरी) आपल्या पुढ्च्या पिढीला आपल्या कुळा विषयी संपुर्ण माहीती द्यावी. यामुळे समाज व्यवस्था टिकण्यास मदत होईल.

वैज्ञानिक कारण सांगावे- -जरी एकाच कुळातील चुलत भाऊ -बहीणींचे विवाह झाले असता पुढील पिढीत शाररिक, बौद्धिक काही दोष निर्माण होतात का?

कायदा असावा नसावा या बाबत - नो कोमेन्ट्स्.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आ. आ. : मी असे ऐकले आहे की, मुस्लिम धर्मात चुलत, मावस बहिण- भावांचे विवाह करु शकतात. या बाबत काही माहिती असल्यास सांगावी.

मला असे वाटते

आपला प्रतिसाद वाचून रामायण वाचल्यावर सीता ही रामाची कोण? असा प्रश्न कोणी विचारावा असे वाटले. आपण उपस्थित केलेल्या मुद्यांना परत एकदा उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.

1. गोत्र हे पितृसत्ताक असते. आपल्या मातेचे जेंव्हा लग्न होते तेंव्हा तिचे गोत्र आपल्या पित्याचे असते तेच होते. मातेच्या आई वडीलांच्या गोत्राला कदाचित आपण मातृ गोत्र म्हणत असण्याची शक्यता आहे. परंतु त्या गोत्रात विवाह नको असे मी कोठे वाचलेले नाही.
2. ग़ोत्र पद्धती शास्त्रीय नाही एवढेच मी माझ्या लेखात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आपणास ती आवडत असल्यास तिचे पालन करावे.
3. सगोदर म्हणजे एकाच आईच्या पोटातून बाहेर आलेले भाऊ बहीण, चुलत भावंडे, मावसभावंडे यांच्यातील डी.एन.ए. समान असू शकतात. परंतु ही नाती इतकी जवळची आहेत की त्यात विवाह संबंध होत नाहीत. चुलत-चुलत नाती किंवा आते-मामे भावंडे यांच्यातील डी.एन.ए. समान असू शकत नाहीत.त्यांच्यातील विवाह संबंध बर्‍याच समाजात समाजमान्य असतात. त्यांत जनुक दोष कमी प्रमाणात येण्याची शक्यता असते.

4. कुल किंवा कुळ म्हणजे गोत्र नव्हे.
5. चुलत भावंडाचे वडील हे स:ख्खे भाऊ असतात.मावस भावंडांच्या आया स:ख्या बहिणी असतात. त्यामुळे त्यांचे डी.एन.ए. समान असू शकतात. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या डी.एन.ए. मधे परस्पर साम्य असू शकते. म्हणून असे विवाह समाजमान्य नसतात. परंतु आणखी एका पिढीने पुढे गेलेल्या चुलत-चुलत नात्यात डी.एन.ए. मधे साम्य असण्याची शक्यता अतिशय अल्प होते. आते मामे भावंडांत डी.एन.ए.चे साम्य आढळत नाही त्यामुळे या नात्यात विवाह अतिशय कॉमन आहेत. सासूला आत्या म्हणण्याची प्रथा या मुळेच आली असावी. शिवाय अशा नात्यात इस्टेटीची मालकी फारश्या बाहेरच्या माणसाकडे जात नाही हे ही कारण असावे.
6. मनुष्य जनावर नसला तरी प्राणी आहे हे आपणच सांगितले आहे. तरी माणसाचे जनुक नियम हे प्राण्यांसारखेच असणार हे ओघानेच आले.

7. हजारो वर्षांपूर्वी जेंव्हा मानवी स्थलांतर सुरू झाले तेंव्हा शंभर दोनशे लोकांचे गट मुख्य गटापासून फुटून नवीन जागेत स्थलांतर करत असले पाहिजेत. या गटात पुनरुत्पादन करू शकतील अशा वयोगटातील मानव ठराविक संख्येनेच असणार. त्यांचे आपापसात संबंध आले तरी जनुक दोष निर्माण होणार नाहीत याची निसर्गानेच काळजी घेतलेली होती. मानवाला ती घेण्याची गरज आहे असे दिसत नाही.
चन्द्रशेखर

सगोत्र विवाह

गोत्रासंबधात सुरु असलेली चर्चा शेवटी हे सर्व थोतांड आहे येथे येवुन थांबली यातच आपल्या शास्त्रीय माहितीचे दुर्दव्य आहे. पाश्चात्य संस्क्र्ती, त्यांचे संशोधन याचा आपल्या मनावर इतका पगडा बसला आहे की आपले ते सर्व थोतांड असा निश्कर्श काढण्यातच आपल्याला आधुनिक तेचे वलय मिळते. भारतातील नवी पिढी परदेशात जाउन नवनविन संशोधनात अग्रेसर आहे त्यातील च काहींनी आपल्या शास्त्रिय माहितीवर संशोधन केल्यास निश्चीतच बरेच आश्चर्यकारक परिणाम प्राप्त होउ शकतात. पत्रिका जुळवितांना जे निकष लावले जातात त्यावर आधुनिक तंत्रद्न्यानाद्वारे संशोधन गरजेचे आहे. त्यात अजिबातच तथ्य नाही असे म्हणणे पुर्वजांवर व त्यांच्या विद्वत्तेवर त्यांनी केलेल्या निष्कर्षावर अन्याय केल्या सारखे होईल. आज शास्त्रातील माहिती आजच्या कसावर उतरत नसेल तर त्यात अधिक खोलात जाउन असे ठोकताळे कां केले गेले यावर संशोधन् व्हावे असे वाटते.

सगोत्र विवाह होउ नये असे शास्त्र सांगते पण असे जर झाले असेल तर त्याचा पुढे काय परिणाम होतो हे त्यावर वैद्न्यानिक द्रुष्ट्या संशोधन करुन मग निष्कर्षावर यावे. रामदेव बाबा असा प्रयोग प्राणायाम च्या परिणामाबद्दल करित असल्याचे मी ऐकले आहे. तसाच डाटा हा उपलब्ध जोडप्यांच्या पत्रिकेचा अभ्यास करुन व त्यांच्या द्रुश्य परिणामांवर अभ्यास करुन काढला तर ते अधिक संयुक्तिक होईल व जुने शास्त्र हे थोतांड असेल तर ते वैद्न्यानिक द्रुष्ट्या सिध्द केल्या सारखे होइल.

खाप पंचायत जे नियम पाळते त्याला माझा आक्षेप नाही पण नियम मोडण्याला शिक्षा देण्याचा मात्र त्यांना अधिकार नाही हे मात्र तितकेच खरे. त्याबाबतीत भारतिय न्याय व्यवस्था पुर्ण सक्षम आहे हे निर्विवाद आणी असे नियम मोडण्यार्यांबाबत न्याय देण्याचा अधिकार हा भारतिय न्याय व्यवस्थेचा आहे यात शंका नाही. कुणी जर हा अधिकार वापरत असेल तर त्याला देखिल भारतिय न्याय व्यवस्थेसमोर आणणे व शिक्षा करणे गरजेचे आहे.

विश्वास कल्याणकर

तुम्ही संशोधन करा ना!

आज शास्त्रातील माहिती आजच्या कसावर उतरत नसेल तर त्यात अधिक खोलात जाउन असे ठोकताळे कां केले गेले यावर संशोधन् व्हावे असे वाटते.

आम्हाला संशोधन करण्यात धादांतवादामुळे हंशील वाटत नाही. पण तुम्हाला कोणी अडविलेही नाही. तुम्हाला यश मिळेपर्यंत टिंगल करण्याचा हक्क मात्र राखीव आहे. 'ठोकताळे' या विषयावर हा दुवा रोचक आहे.

गोत्र,गुण,ग्रह आणि इतर भंपकपणा

लेखाशी सहमत आहे. गोत्र,गुण,ग्रह आणि इतर भंपकपणा अरेंज्ड मॅरेजमध्ये वाढतच चालला आहे का काय अशी शंका येऊ लागली आहे. इतर वेळेस सुधारकत्वाचे बुरखे पांघरणारे लग्न जमवायची वेळ आली की -

१. आमचा एकुलता एक मुलगा (किंवा मुलगी). उगीच विषाची परीक्षा का घ्या.
२. आम्ही नाही म्हणत होतो पण मुला/मुलीकडचे ऐकायला तयार नाहीत.
३. इतके दिवस नाही म्हणून लग्नच जमत नाही म्हणून आता हा पण प्रयत्न करून पाहतो.

वगैरे कारणे दिली जातात.

बाकी, लेख उत्तम जमून आला आहे.खाप पंचायती वगैरे हे सबलांकडून दुर्बलांना वचकात ठेवायचे उद्योग आहेत. हे काही नवे नाही. याआधी जातीपातींच्या नावाखाली हेच होत होते. "आमचे गोत्र ब्राह्मणांचे. विश्वकर्म्याचे गोत्र सांगण्यार्‍या सुतारांच्या गोत्राला आम्ही गोत्र मानत नाही." असे उद्गार माझ्या एका मित्राच्या प्रेमविवाहाला घरच्यांना अटकाव करते वेळी ऐकलेले आहेत.

उपाय ?

अरेंज मॅरेज मधे गोत्र सोडुन काय काय बघावे अस आप्ल्याला वाटते ? जेणेकरुन पुढची पिढी सबल असण्याची शक्यता जास्त वाढेल ?
मेडीकल क्षेत्र फार पुढे गेलं आहे हे मान्य आहे, पण समाजात ज्ञानाची विषमता जास्त आहे.
वेळ, पैसा , नातेसंबंध ह्याचा विचार करता गोत्रासारखी सोपी पद्धत वापरणे जस्ती सोयीचे ठरते आहे असं वाटत नाही का आपल्याला ?

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

विषयांतर

ही चर्चा अरेंज मॅरेजवर नाही त्यामुळे अरेंज मॅरेजमध्ये काय बघावे हा प्रश्न विषयांतर ठरतो. आपण वेगळी चर्चा सुरु करावी तेथे उहापोह करता येईल.

येथे विषयांतर नको.

वैयक्तिक निर्णय

प्रत्येकाने विवाह करतेवेळी/ठरवितेवेळी काय निष्कर्ष लावावेत, कोणाशी करावा, कोणत्या लिंगासमवेत करावा वगैरे वैयक्तीक प्रश्न आहेत. खाप पंचायत, मुस्लिम लॉ बोर्ड, चर्च किंवा भारतीय कायदा अश्या कोणीच त्यात पडायची गरज नाहि असे वाटते. (भारतात जरी हे काहिसे कौटुंबिक/सामाजिक प्रश्न असले तरी अंतिम निर्णय वैयक्तिक असावा असे वाटते)

पारशांमधे भावाबहिणीत लग्न होतात. त्याचे परिणामही तो समाज भोगतो आहे. पण म्हणून त्यावर कुणीही बंदी घालावी / त्यास प्रोत्साहन द्यावे असे वाटत नाहि. जो तो हा वैयक्तिक निर्णय घ्यायला समर्थ आहे.

ऋषिकेश
------------------
भ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा(?) उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे

अधुनिक खाप पंचायत...

भारतात जरी हे काहिसे कौटुंबिक/सामाजिक प्रश्न असले तरी अंतिम निर्णय वैयक्तिक असावा असे वाटते

आधी पण म्हणल्याप्रमाणे कुंडली, ज्योतिष वगैरे मी काही पहात नसलो तरी इतरांनी त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात पाहीले म्हणून मी काही यावर बोलू नये हेच योग्य. आणि म्हणूनच ऋषिकेशच्या वरील मुद्याशी सहमत.

म्हणूनच बर्‍याचदा इतर अनेक चर्चा ज्या होतात त्यात कधी कधी जी इतरांबद्दल, त्यांच्या वैयक्तीक श्रद्धा/अंधश्रद्धांवर होणारी चर्चा आणि कडक मते असतात ती वाचताना ही देखील अधुनिक खाप पंचायत वगैरेतील मते आहेत का असे वाटू लागते.

--------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

इन्सेस्ट

चर्चेतील बराचसा वाद इन्सेस्ट : नात्यातील शरीरसंबंध या संकल्पनेशी जुळलेला दिसतो.
वेगवेगळ्या समाजात वेगवेगळ्या कल्पना आहेत. भारतातच आते-मामे भावंड (महाराष्ट्र) , मामा-भाची (कर्नाटक), चुलत (सख्खे) भावंडे (काही मुस्लिम) अशा पद्धती आहेत.
सख्खे संबंध बहुतांशी सर्व समाजात नाकारले आहेत असे मला वाटते. खालील दुव्यावर यावर अधिक माहिती मिळेल.
http://en.wikipedia.org/wiki/Incest

गोत्र (गोत) मात्र त्यापलिकडचा आहे (नाते संबंध माहित नसण्यापलिकडचे).
केवळ पुरुष वंशातील (गोत्र) संबंध हे गैरमानायचे आणि स्त्री वंश (गण) हे ग्राह्य मानायचे याकरिता कुठले कारण दिसत नाही.

विश्वास कल्याणकर यांच्या 'संशोधन करायला पाहिजे' या मताशी सहमत आहे. पण कोणी करायला पाहिजे यावर मतभेद संभवतो.

प्रमोद

मेमेटिक्स?

गोत्र संकल्पना मेमेटिकही असू शकते. म्हणजे असे की जनुके इन्ब्रीड झाल्यामुळे (म्यूटेशन जमा होऊन) निर्वंशाची भीती असते त्याचप्रमाणे तसा धोका मीम्सनाही असेलच की! ज्याप्रमाणे फुलांमध्ये इन्ब्रीडिंग टाळणारी (=फिटनेस देणारी) जनुके उद्भवली त्याचप्रमाणे आपल्यात मेमेटिक इन्ब्रीडिंग टाळणार्‍या मीम्स बनल्या असाव्यात.
गोत्र संकल्पना जनुकीय नाही हे दाखविणारी आकडेवारी येथे आहे. परंतु गोत्र संकल्पनेस मेमेटिक पाया असू शकतो.
(डिस्क्लेमरः "निसर्गात आहे या कारणास्तव घटनांना चांगले मानणे" ही नॅचरॅलिस्टिक फॅलसी आहे हे मला पूर्ण मान्य आहे.)

विवेकी विचारांवर पडलेली 'खाप'

जरा थांबा, की भारत पुढची महासत्ता म्हणून उदयाला आलाच म्हणा, अशी पवारडी वक्तव्ये करणार्‍यांना भानावर आणण्याचे काम खाप पंचायतीने केले आहे, त्या न्यायाने या पंचायतीचे अभिनंदनच केले पाहिजे. लग्न म्हणजे शरीरसंबंध व लिंगभोगाचे घर्षणजन्य सुख आणि प्रजनन हेच लग्नाचे एकमेव प्रयोजन या ढळढळीत आदिम नग्न प्रेरणेशी एकनिष्ठ राहून तथाकथित वैचारिक प्रगतीची वक्तव्ये खाप पंचायतीने फोलपटासारखी उडवून लावली आहेत, हे वाचून अत्यंत समाधान वाटले. 'यू गेट व्हॉट यू डिझर्व' म्हणून शांत रहावे. काहीही करु नये. वाटल्यास नेमाडेंचे वरकरणी अश्लील वाटणारे 'खुल्लमखुल्ला चढने दो सालोंको, अपने आप ठंडे पड जायेंगे' हे वाक्य आठवावे. मदत होईल.
सन्जोप राव
तीजा तेरा रंग था मै तो
जिया तेरे ढंग से मै तो
तूही था मौला तूही आन
मौला मेरे ले ले मेरी जान

चर्चा

मुद्दाम उकरून काढत आहे.

  1. खाप पंचायतींनी 'न्यायदान' नावाखाली विकृती करावी किंवा नाही.
  2. 'सगोत्र' विवाह योग्य की अयोग्य

यापैकी नक्की कोणत्या विषयावर बोलणे अपेक्षित होते? सगोत्र प्रकरणासंबंधी जेनेटिक्स् ला अनुसरून जी चर्चा झालेली आहे ती 'इन ब्रीडींग्' हे शब्द गूगलून केलेली दिसते. "Consanguinous marriage" ही योग्य संज्ञा आहे.
या विषयात् थोडी पात्रता असल्याने माहिती देण्याची इच्छा होते आहे, म्हणून धागा वर काढला. यावर बोलण्याची कुणाची इच्छा असल्यास पुढे बोलता येईल.

पुढे बोला

तुमची माहिती वाचायला आवडेल. पुढे लिहा.

 
^ वर